फॉलोअर

१९ जुलै २०२१

उद्यापासून पेपर वाटताना निलेश दिसणार नाही!

 उद्यापासून पेपर वाटताना

निलेश दिसणार नाही!
निलेश पोपट साळुंखे,माझा विद्यार्थी, माझा शेजारी,आमच्या शिवप्रेमी मंडळाचा जुना सच्चा कार्यकर्ता...!
सांगेल ते काम करायला कधीही तयार. कुठेही जायचं म्हटलं तर तयार.असा हसतमुख आमचा निलेश आज अचानक आम्हाला सोडून गेला. गेल्या २० वर्षापासून निलेश आणि आमच्या घराचं एक वेगळं नातं आहे. 2001 झाली जेव्हा मी कराडला राहायला आलो त्यानंतर करवडी गावातील पेपर एजन्सी कुणी चालवायची असा प्रश्न उपस्थित झाला. आमच्या दादांनी पेपर एजन्सी चालवण्याचा निर्णय घेतला मात्र वयोपरत्वे त्यांना संपूर्ण गावात जाऊन पेपर टाकणे शक्य नव्हते. त्यावेळी निलेशला मी हे काम द्यायचे ठरवले. त्याने ते आनंदाने स्वीकारले.
रोज सकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान तो आमच्या घरात यायचा, दादांनी तयार केलेल्या पिशवीमध्ये सर्व पेपर ठेवलेले असायचे, ही पिशवी घेऊन तो सायकल वरून गावात,करवडी कॉलनीत पेपर टाकायला जायचा. तास-दीड तासांमध्ये तो परत यायचा, शिल्लक राहिलेले पेपर दादांच्या ताब्यात द्यायचा.
निलेशचा हा नित्यक्रम गेले पंधरा वीस वर्षापासून चालू आहे, चालू होता. निलेशने कधीही कामाची कसलीही तक्रार येऊ दिली नाही. उलट अंक कसा वाढेल याकडे त्याचे नेहमी लक्ष असायचं. त्याच्यामुळेच गेल्या वीस वर्षात करवडी गावात पेपर विक्री दुप्पट झाली. आमचे दादा या एजन्सी मधून जेवढे कमीशन मिळायचे त्याचा निम्मा वाटा निलेशला द्यायचे. यातून त्याचा घराला थोडा हातभार लागायचा. पेपर वाटून झाल्यानंतर तो दिवसभरात शेती किंवा इतर कामे करायचा.
असा हा अतिशय प्रामाणिक मुलगा निलेश आज अचानक आमच्यातून सोडून दूर निघून गेला. पस्तीस-चाळीस हे काय जाण्याचे वय नव्हतं. खरं तर निलेश माळकरी,एकमार्गी अतिशय चांगला माणूस. कुठल्याही कामासाठी कधीही तयार असायचा.
एक वर्षापूर्वी कडक लाॅकडाउन होता तेव्हा आमच्या गावातील प्राथमिक शाळेची जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू होते. मला ही माहिती मिळाल्यानंतर माझ्या शाळेच्या आठवणी रेकॉर्ड करून फेसबुक वर टाकण्यासाठी मी शाळेत गेलो होतो. त्या वेळेला निलेश माझ्यासोबत होता. माझ्या शाळेच्या आठवणी मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना मोबाईल घेऊन निलेशने कॅमेरामनची भूमिका बजावली होती. निलेश पण त्याच शाळेत शिकला असल्यामुळे तोही आपल्या शाळेविषयी बोलला, ते मी फेसबुकवर शेअर करून ठेवले होतं. फेसबुक वरती या आठवणी अजूनही उपलब्ध आहेत.
अतिशय चांगल्या स्वभावाचा हा मुलगा गावातील कुणाचे घरातील मयत झाले तर तो सर्वात पुढे असायचा.तिरडी बांधण्यापासून त्या व्यक्तीला दहन देण्यापर्यंत शेवटपर्यंत निलेश थांबायचा. आज सकाळी अचानक निलेशचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी कळाली. त्यावेळेला मी धोंडेवाडी डिचोली येथे कार्यक्रमात होतो. ही बातमी काय आल्यानंतर धक्का तर बसलाच पण खरंच पटलं नाही.
निलेश सारख्या माळकरी व्यक्तीचा मृत्यू आज आषाढी एकादशी दिवशी व्हावा,या दिवशीचे मरण पुण्याचे असले तरी निलेश तू इतक्या लवकर जाणं तुझ्या कुटुंबाला आणि शिवप्रेमी मंडळातील तुझ्या मित्र मंडळीना परवडणारं नाही. हे दुःख आम्हाला पचणार नाही. तू गेला आहे हे पटतच नाही.
आज सकाळी सुद्धा निलेशने आपलं कर्तव्य पार पाडलं. सकाळी साडे सहाच्या दरम्यान तो आमच्या घरात आला. पेपरची बॅग घेतली संपूर्ण गावातून पेपर वाटून पुन्हा घरी गेला. दुपारी बाराच्या सुमारास त्याला हृदयविकाराचा मोठा झटका आल्याचे कळले. माझ्या वडलांचा निरोप आला आणि मन सुन्न झाले.
निलेशने गेल्या वीस वर्षात आमची मोरे पेपर एजन्सी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे,संभाळली होती. पेपर टाकण्याबरोबरच प्रत्येक महिन्याला त्या व्यक्तीकडून पैसे वसूल करणे आणि प्रामाणिकपणे बिनचूकपणे आमच्या वडिलांच्या हातात देणे,असे त्याचे काम सुरू होते.
यापुढे मात्र निलेश आपल्यामध्ये असणार नाही. करवडी आणि कॉलनीच्या रस्त्यावर गावात पेपर वाटताना निलेश दिसणार नाही, पेपर टाकायला निलेश कोणाच्या दारात येणार नाही. रोज पेपर वाचताना किंवा पेपर आला की करवडीकरांना निलेश तुझी आठवण येत राहणार आहे.
निलेश तुझ्या मृत्युनंतर तुझी मुलं पोरकी राहणार नाहीत. त्यांच्यासाठी जे काय करता येईल तेवढं करवडी ग्रामस्थ आणि आम्ही शिवप्रेमी मंडळाचे कार्यकर्ते नक्की करू.
राम कृष्ण हरी
*सतीश वसंतराव मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...