फॉलोअर

ganesh chavan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ganesh chavan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२० मे २०२२

माझा विद्यार्थी सिनेमा दिग्दर्शक झाला


गणेश शंकर चव्हाण... कामगार ते दिग्दर्शक
माझा विद्यार्थी सिनेमा दिग्दर्शक झाला 

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं खुप जिव्हाळ्याचं असतं हे आपल्याला माहीत आहेच.आपल्याकडे शिकलेला एखादा विद्यार्थी गरीब असो वा श्रीमंत असो तो भेटल्यानंतर किंवा तो मोठा झाला आहे हे पाहून जो आनंद होतो, तो आनंद केवळ शिक्षकच जाणतो.1990 ते 2001 या दहा अकरा वर्षाच्या कालावधीत मी यादव मोरे क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राशी जोडलेला होतो. 

करवडी,ओगलेवाडी,बनवडी, विद्यानगर या ठिकाणी आमचे क्लासेस होते. ओगलेवाडी परिसरातील बाबरमाची, राजमाची, वनवासमाची,हजारमाची,करवडी, टेंभू, गोवारे, सुर्ली,कामथी तसेच शामगाव, वडोली निळेश्वर, पार्ले, बनवडी या गावातील अनेक विद्यार्थ्यांसाठी आमचा क्लास यशाची खात्री देणारा होता. आमच्या क्लासेसमध्ये प्रवेश घेतला म्हणजे शंभर टक्के पास होण्याची खात्री अशी आमची एक प्रतिमा झालेली होती. ज्या मुलांना इंग्लिश विषयामध्ये कधीच पास होता आले नाही, कधीही इंग्रजीमध्ये दहावीस पेक्षा जास्त मार्क पडले नाहीत, त्या मुलाला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 35 ते 40 मार्क मिळवून देण्याची हमी  मोरे सरांनी म्हणजे मी दिली होती. तीच परिस्थिती होती गणित विषयाची. 52 मार्क पडण्यासाठी लागणारी प्रमेय, सूत्रे याचा मेळ कसा लावायचा आणि पास कसे व्हायचे याचा एक शिस्तबद्ध फाॅर्मुला इथं यादव सर शिकवायचे. फक्त पास होणेच नव्हे तर इंग्लिशमध्ये 80 तर गणितात पैकीच्या पैकी 150 मार्कस मिळवणारे विद्यार्थी सुद्धा आमच्या यादव मोरे क्लासेसने घडवले आहेत.दहावीच्या गुणवत्ता यादीमध्ये आमच्या क्लासचे दोन विद्यार्थी झळकले होते. आज यादव मोरे क्लासेस माध्यमातून आम्ही घडवलेल्या एका विद्यार्थ्याविषयी मला बोलायचे आहे. हा विद्यार्थी खरंच असाधारण,असामान्य अवलिया आहे. ज्याचं नाव आहे गणेश शंकर चव्हाण !

आमच्या करवडी गावच्या शेजारीच आमच्या गावच्या हद्दीत  पाटबंधारे विभागाची आरफळ वसाहत 1980 च्या दरम्यान उभी राहिली. त्याचं आरफळ वसाहत आणि पुढे करवडी कॉलनी असं नामकरण झाले. काॅलनीमध्ये त्या काळात फार मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालये अधिकाऱ्यांची रेलचेल होती. आरफळ आणि धोम या कालव्याची कामे सुरू असल्यामुळे याठिकाणी कामाचा मोठा व्याप होता. करवडी कॉलनीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांसाठी  निवासस्थाने होती. मध्यभागी दत्त मंदिर, दुकानगाळे, सांस्कृतिक हाॅल,भव्य क्रिडांगण होते. शनिवार रविवारी याच मैदानावर आम्ही क्रिकेट खेळायला जात असू. याठिकाणी आमचे सद्गुरू किराणा दुकान होते. या कॉलनी मुळेच आमच्या करवडी गावचे अर्थकारण उभारी लागले होते.

करवडी कॉलनीमध्ये माझे अनेक मित्र आहेत, होते. किराणा दुकान माध्यमातून आमच्या कुटुंबाचे कॉलनीमधील अनेक कुटुंबाशी जवळचे नाते होते, घरी येणं जाणं होतं. कॉलनीच्या पूर्व बाजूला शंकर चव्हाण हे वाई तालुक्यातील एक गृहस्थ तिथे राहत होते तर त्यांच्या शेजारी मदनेकाका हे दुसरे वाई तालुक्यातील नोकरदार राहत होते. शंकरराव चव्हाण यांच्या यांना संतोष आणि गणेश ही दोन मुले. ही दोन्ही मुले क्लाससाठी सुरुवातीला करवडी गावात तर त्यानंतर ओगलेवाडी येथे माझ्याकडे येत होती. सायकलवरुन डबल सीट येणारी ही दोन्ही मुले मला आजही आठवतात.अवखळ,खोडकर मात्र तितकीच आज्ञाधारक. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच आमच्या यादव क्लासेस मध्ये शिक्षण घेऊन दोघेही 1996 साली दहावी पास झाले. पुढील दोन वर्षानंतर आयटीआय कोर्स करून २००० च्या दरम्यान गणेश चव्हाण ऑस्ट्रेलिया येथे नोकरीनिमित्त गेला.

दरम्यानच्या काळात करवडी कॉलनीमधील शासकीय काम संपत आल्यानंतर या कॉलनीतील अनेक कुटुंबे कॉलनी सोडून त्यांच्या मूळ गावी किंवा कराड विद्यानगर मलकापूर अशा ठिकाणी स्थलांतरित झाली. हळूहळू कॉलनी ओस पडू लागली. आज तर हि कॉलनी पूर्णपणे भकास आहे.या कॉलनीची आणखी एक आठवण मला सांगायची तर या कॉलनीत प्रत्येक वर्षी साजरा होणारा भव्य गणपती उत्सव. ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करून त्या काळात हा गणपती उत्सव साजरा केला जायचा. उत्सवात खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असे. सलग चार पाच दिवस मोठ्या पडद्यावर हिंदी मराठी चित्रपट दाखवले जात, नाटकेही होत. चित्रपट, ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी करवडी परिसरातील अनेक स्त्रिया आणि पुरुष दीड दोन किलोमीटर पायपिट करून जात. याठिकाणी पाहिलेले तीसरी मंजिल, मोहरा आणि दोस्ताना हे तीन चित्रपट तरी मला चांगलेच आठवतात. याशिवाय सुशीला, अष्टविनायक हे मराठी चित्रपट सुद्धा मी या ठिकाणी पाहिलेले आहेत. कॉलनी ओस पडल्यानंतर कॉलनीमधील माझे मित्र आणि नोकरदारांचे संबंध तुटले. मात्र रवि सुतार, महेश सटवे तसेच गणेश, विजय सुतार सारखे काही विद्यार्थी संपर्कात होते.रवींद्र सुतार, महेश सटवे यांच्यासारखे निवडक मित्रच आजही संपर्कात आहेत. 

गणेश शंकरराव चव्हाण या विषयाकडे मी पुन्हा येतो. ऑस्ट्रेलियामधील नोकरी करून चार-पाच वर्षांपूर्वी गणेश पुण्याला आला. पुढे वाईला आला आणि याच काळात त्याच्या डोक्यात चित्रपट काढण्याचे खूळ आले. चित्रपट सृष्टीचा कसलाही अनुभव नाही, चित्रपट शूटिंग कसं होतं माहीत नाही, कॅमेरा कसा धरतात माहीत नाही, कोणत्याही नाटकात काम केले नाही, चित्रपटाचं समीक्षण केले नाही, चित्रपटगृहांमध्ये जाऊन फार चित्रपट पाहिलेले नाहीत, लेखक काय असतो? दिग्दर्शक काय असतो? निर्माता काय असतो ?याचं कसलंच ज्ञान नाही. पटकथा, छाया, मेकअप याची कसलीही माहिती नाही. टीव्हीवर किंवा कधीतरी थेटर मध्ये जाऊन पाहिलेला सिनेमा एवढंच काय या गणेशला चित्रपटाविषयी असलेलं ज्ञान. मात्र तरीही त्याने चित्रपट निर्मिती करायची ठरवली. 

नागराज पोपटराव मंजुळे हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गणेशने चित्रपट निर्मिती करण्याचा निश्चय केला. गणेशचं करवडी कॉलनीवर इतकं प्रेम आहे की त्याने निर्मिती संस्थेला 'काॅलनी फिल्मस' असे नाव दिले. काॅलनीमधील दत्त मंदिरात जाऊन शुभारंभ केला. त्याच्या डोक्यात जी कथा होती, ती कथा हळू स्फुरत गेली. त्या कथेची पटकथा तयार झाली आणि "जिव्हारी" चित्रपट पुढे सरकू लागला. 

चित्रपट तयार करण्याची जिद्द गणेशने मनाशी खुणगाठ बांधली खरी पण चित्रपट काढणे म्हणजे लहान मुलांचा खेळ नसतो. त्यासाठी पैसा लागतो. हा पैसा आणायचा कोठून ? कुणाकडून कर्ज काढायचे? असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये आले. मग कुणाकडे पैसे मागण्याची मागण्याऐवजी आपणचं पैसे गोळा करू या असा विचार त्याच्या मनामध्ये आला. घरात असलेलं सर्व सोने-नाणे दागिने, घर-दार, पुण्यामध्ये विकत घेतलेला फ्लॅट, सर्व संपत्ती त्याने विकून टाकली. या माध्यमातून कसेबसे एक कोटी रुपये गोळा झाले आणि जिव्हारीच्या शूटिंगला सुरुवात झाली. 

गेल्या दोन-तीन वर्षांत फेसबुकच्या माध्यमातून त्याचा माझा संपर्क वाढला आहे.फेसबुक वरील त्याचे कोव्हिड कालावधीतील त्याचे लिखाण पाहून गणेश आता प्रगल्भ झाला आहे हे जाणवले. याच काळात त्यांने चित्रपट निर्मिती विषयी सांगितले होते. त्यावेळी मला त्याचं खूप आश्चर्य आणि अप्रुप वाटलं होतं. गणेश चव्हाण आणि थेट पिक्चर काढणार! पण माझा एक विद्यार्थी थेट चित्रपट क्षेत्रात उतरतो, निर्माता लेखक दिग्दर्शक होतो, ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानाची होती. गणेशचा चित्रपट सृष्टीतला प्रवास आत्ता सुरू झाला. खरं तर चित्रपट सृष्टीमध्ये पैशांची गुंतवणूक करणे हे फार अवघड काम आहे. कसल्याही प्रकारे यशाची खात्री नसते. आजच्या काळात वेगवेगळे अधिकार, गाणी तसे चित्रपटाचे अधिकार वाहिन्यांना विकून पैसे गोळा होतात खरे. मात्र घरदार विकून चित्रपट काढण्याचं धाडस करणारा गणेश शंकर चव्हाण यांच्या सारखा वेडा एखादाच असतो. 

मला आणखी एका कारणासाठी गणेशचा अभिमान वाटतो. लहानपणी आपणास कोणी नाव विचारल्यानंतर आपण पूर्ण नाव सांगत असतो. अजूनही गणेशला नाव विचारलं तर तो आपले पूर्ण नाव सांगतो. फेसबुक अकाउंटवर गणेश शंकरराव चव्हाण अशी नोंद आहे. मलाही वडलांचं नाव सांगायला खूप आवडते. पितृप्रेमी गणेशच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडे थोडे आहे. चित्रपटाचे शुटींग दरम्यान त्याने अनेकदा आपल्या वडिलांना सेटवर नेले होते.

मध्यंतरी क्रांती नावाचा एक मल्टीस्टार हिंदी चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी निर्माता मनोज कुमार यांनी संपूर्ण घरदार बँकेला तारण ठेवले होते, असे मी ऐकले होते. गणेश चव्हाण यांनी बँकेला संपत्ती प्रॉपर्टी गहाण ठेवण्याऐवजी ती विकून पैसे गोळा केले आहेत. चित्रपट निर्माण करताना येणाऱ्या सगळ्या अडचणींवर मात करून गणेशने हा चित्रपट तयार केला आहे. हा चित्रपट सातारा व कराड येथे  20 मेला रिलीज होणार आहे. 

सातारा कराड येथील मुलं चित्रपट तयार करतात, दिग्दर्शक बनतात हा खरंच आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे. माझी सुद्धा खूप वर्षापासून दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे. पण मला आयुष्यात कधीही ती संधी मिळाली नाही किंवा मी त्यावर जास्त विचारही केला नाही. मनातली ती एक अतृप्त इच्छा अनेक वेळा माझ्या मित्रांना बोलून दाखवली होती. मला हे शक्य झालं नाही, मात्र माझ्या विद्यार्थ्याने गणेशने हे शिवधनुष्य पेलले आहे. गणेश दिग्दर्शक झाला आहे. आज सोनियाचा दिनू आहे. गणेशला खुप खुप शुभेच्छा.

...सतीश वसंतराव मोरे
 २० मे २०२२

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...