फॉलोअर

०३ जुलै २०२६

ज्याचा सखा हरी...


ज्याचा सखा हरी... त्यावरी विश्व कृपा करी!

वारीत अनुभवलेला अभंग, श्रद्धा 
आणि ईश्वराच्या अदृश्य सहवासाची जाणीव..!

पंढरपूरची वारी हा केवळ पायी चालण्याचा प्रवास नसतो. तो आत्मशोधाचा, श्रद्धेचा आणि ईश्वराशी नातं अधिक दृढ करणारा अनुभव असतो. लाखो वारकऱ्यांसोबत चालताना प्रत्येकाच्या ओठांवर विठ्ठलाचं नाम असतं आणि मनात एकच विश्वास—"तो आहे... तो आपल्या पाठीशी आहे."

वारीत मलाही हा अनुभव अनेकदा आला. चालताना आम्ही मोबाईलवर सतत अभंग ऐकत होतो. त्यामध्ये एक अभंग वारंवार लावला जायचा आणि प्रत्येक वेळी तो मनाला नव्याने स्पर्श करून जायचा. तो म्हणजे संत जनाबाईंचा—

ज्याचा सखा हरी ।
त्यावरी विश्व कृपा करी ॥१॥
उणें पडों नेदी त्याचें ।
वारें सोसी आघाताचें ॥२॥
तयावीण क्षणभरी ।
कदा आपण पत्नी दुरी ॥३॥
आंगा आपुले ओढोनी ।
त्याला राखे जो निर्वाणीं ॥४॥
ते अंकित भक्तांसी ।
म्हणे नामाची दासी ॥५॥

हा अभंग आकाराने छोटा आहे; पण त्याचा आशय अफाट आहे. विशेष म्हणजे, पंडित भीमसेन जोशी यांच्या भारदस्त आणि भावपूर्ण आवाजात हा अभंग ऐकताना त्यातील गहराई अधिकाधिक जाणवत जाते. त्यांच्या गायकीने या अभंगाला केवळ सूर दिले नाहीत, तर एक विलक्षण आध्यात्मिक उंची दिली आहे. प्रत्येक ओळीतून भक्ती, करुणा, विश्वास आणि ईश्वराशी असलेलं सख्य जिवंत होतं.

वारीत चालताना हा अभंग कानावर पडला की पायातील थकवा नकळत कमी व्हायचा. उन्हाची तमा राहायची नाही. पुढचा रस्ता किती आहे, याचाही विचार मनात यायचा नाही. फक्त विठ्ठलाच्या नामात चालत राहावंसं वाटायचं. त्या क्षणी जाणवायचं—वारी फक्त पायांनी होत नाही; ती मनाने आणि श्रद्धेने होते.

या अभंगातील "हरी" हा केवळ श्रीकृष्ण  नाही. प्रत्येकाच्या श्रद्धेतील परमेश्वर आहे. तो विठ्ठल असो, राम असो, शंकर असो, देवी असो,दत्तगुरू असोत किंवा कोणत्याही रूपातील ईश्वर असो. ज्याच्या जीवनाचा तो सखा असतो, त्याला जगात कधीच एकटं वाटत नाही.
"उणें पडों नेदी त्याचें..." ही ओळ जीवनाचं मोठं सत्य सांगते. आपल्या आयुष्यात अनेकदा अशी माणसं भेटतात, जी अगदी योग्य वेळी मदतीला धावून येतात. एखादा शब्द, एखादा सल्ला, एखादी छोटी मदतही आयुष्याला नवी दिशा देऊन जाते. आपण त्याला योगायोग म्हणतो; पण श्रद्धाळू मनाला वाटतं—ही व्यक्ती देवानेच पाठवली आहे. देव प्रत्यक्ष येत नाही; तो माणसांच्या रूपाने आपल्याला आधार देतो.

वारीतही हे वारंवार दिसतं. एखाद्या वारकऱ्याला पाणी लागतं आणि दुसरा वारकरी न बोलता बाटली पुढे करतो. कोणाच्या पायाला गोळा येतो, तर अनोळखी माणूस थांबून त्याला उभं करतो. कोणाची चप्पल तुटते, तर दुसरा त्याची व्यवस्था करतो. कुणी कुणाला ओळखत नसतं, पण सगळे एकमेकांचे असतात. त्या क्षणी जाणवतं की ही फक्त माणसांची मदत नसते; ती विठ्ठलाचीच कृपा असते.

या अभंगातील "वारें सोसी आघाताचें" ही ओळ मनाला विशेष स्पर्शून जाते. भक्तावर येणाऱ्या संकटांचे आघात देव स्वतः झेलतो, अशी जनाबाईंची श्रद्धा आहे. कदाचित म्हणूनच संकटातून बाहेर पडल्यावर अनेक जण सहज म्हणतात—"देवाने वाचवलं."

वारी संपते पण हा अभंग अजूनही मनात घुमतो आहे. आजही पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात तो ऐकला की पंढरीचा रस्ता, दिंडी, टाळ-मृदंगाचा नाद, विठ्ठलाचा गजर आणि हजारो वारकऱ्यांमध्ये चालत असलेला तो क्षण पुन्हा डोळ्यांसमोर उभा राहतो.

संत जनाबाईंचा हा छोटासा अभंग आपल्याला एक मोठा संदेश देऊन जातो—जीवनात श्रद्धा असेल, ईश्वरावर नितांत विश्वास असेल, तर संकटं संपणार नाहीत; पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद नक्की मिळेल. कारण...

"ज्याचा सखा हरी, त्यावरी विश्व कृपा करी."

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...