फॉलोअर

इस्त्रीवाले गुरू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इस्त्रीवाले गुरू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१७ मे २०२६

इस्त्रीवाले गुरू... शशिकांत चन्ने आणि संजय कुंभार

माझे इस्त्रीवाले गुरु – शशिकांत चन्ने आणि संजय कुंभार


गुरू म्हणजे केवळ आध्यात्मिक मार्ग दाखवणारा प्रकाश नसतो. विश्वसंत विचारवंत सदगुरू वामनराव पै यांनी म्हटल्याप्रमाणे —"जन्मापासून मृत्यूपर्यंत आयुष्यात जो जो तुम्हाला काही तरी शिकवतो, तो प्रत्येक जण तुमचा गुरू असतो."

खरंच, जीवन ही एक अखंड शाळा आहे. कोणी आपल्याला धडपडत सायकल चालवायला शिकवतं, कोणी इंग्रजी शब्दांची ओळख करून देतं, तर कोणी सुरांचा लयीत गाणं म्हणायला शिकवतं. कोणी शेतातल्या मातीशी नातं सांगत पाण्याचे पाट (दारं) धरायला शिकवतं, तर कोणी पंक्चर काढण्याचं कसब शिकवतं. सुंदर अक्षराचा वळणदार वळसा असो, टीव्ही-मोबाईलचे गुंतागुंतीचे सर्किट्स असोत, विहिरीत मारलेली पहिली पोहण्याची उडी असो, की एखाद्या नवीन ॲपचे आधुनिक तंत्रज्ञान... अगदी डोंगर चढण्याचा थरारही आपल्याला कोणीतरी शिकवतच असतं.

जीवनाच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक क्षणी आपल्याला समृद्ध करणारा एक माणूस भेटत असतो. तो श्रीमंत असो वा गरीब, वयाने लहान असो वा मोठा — ज्याच्याकडून आपल्याला जगण्याची एक नवी दृष्टी मिळाली, तो आपला गुरूच! आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या पाठीवर अनुभवांचे, ज्ञानाचे आणि संस्कारांचे कप्पे सोडून जाते. म्हणूनच, हे संपूर्ण आयुष्य म्हणजे एक महा-गुरुकुल आहे आणि इथे भेटणारा प्रत्येक जीव आपला आचार्य आहे.

आज मला माझ्या अशा दोन गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, ज्यांनी मला कधी वर्गात बसवून पाटी-पेन्सिल दिली नाही, की माझा हात धरून अक्षरे गिरवली नाहीत; पण त्यांच्या हातांच्या जादू कडे पाहता पाहता मी आयुष्याचं एक मोठं कौशल्य शिकून गेलो. ती दोन नावं म्हणजे करवडी गावचे इस्त्रीवाले शशिकांत चन्ने आणि संजय कुंभार.

पाचवी ते दहावीच्या त्या सोनेरी दिवसांची ही गोष्ट. करवडी गावातून कराडच्या शाळेत जाण्यासाठी माझा रोजचा प्रवास एसटी बसने व्हायचा. सकाळी दहा वाजता मी करवडीच्या एसटी स्टँडवर येऊन थांबायचो. सव्वादहाची 'वाघेरी-कराड' बस कधी गर्दीमुळे थांबायची, तर कधी तशीच सुसाट निघून जायची. मग आमचा आसरा असायची साडेदहाची 'करवडी-कराड' बस. ही बस आधी आरफळ कॉलनीत जाऊन परतायची आणि मग आम्हाला घेऊन कराडकडे निघायची.

बसने ओगलेवाडी सोडली की विरवडे हद्दीत रेल्वेचं एक फाटक लागायचं. पावणे अकराच्या सुमारास तिथून 'कोयना एक्सप्रेस' धावायची, त्यामुळे ते फाटक हमखास बंद असायचं. बसच्या खिडकीतून डोकावत, तोंडात बोट घालून ती झुक-झुक आगीनगाडी पाहण्याचा आनंद काही वेगळाच होता. ते रेल्वे फाटक, ती धावणारी कोयना एक्सप्रेस, मालगाड्या आणि तो एसटीचा धुरळा... हे सगळं माझ्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग होतं.

"प्रसाद" आणि "जानाई" मधील ते दोन जादूगार

करवडी स्टँडच्या समोर एक छोटंसं खोकेवजा इस्त्रीचं दुकान होतं — “प्रसाद पावर लॉन्ड्री”. त्याचे मालक होते शशिकांत चन्ने.  कराडला जाणारी एसटी बस येईपर्यंत मी शशिकांत चन्ने यांच्या खोके वजा दुकानात बसत होतो. पुढे काही वर्षांनी गावातच आमच्या घराजवळ स्टँड परिसरातच संजय कुंभार यांनी आपले “जानाई पावर लॉन्ड्री” सुरू केले. हा कालावधी १९८५ चा आहे. बसची वाट पाहत असताना किंवा फावल्या वेळात, माझी पाऊले नकळत त्या दुकानांकडे वळायचं आणि मी तिथे तासन्तास बसून राहायचो.

माझे डोळे त्यांच्या हातांच्या हालचालींवर असायचे.
शर्ट किंवा पॅन्टची इस्त्री सुरू करताना पहिल्यांदा कोणत्या भागाला इस्त्री करायची ?
शर्टची कॉलर कशी परफेक्ट बसवायची...?
घडी घालताना कापडाची नजाकत कशी जपायची...?
पॅंटला तलवार सारखी धारदार इस्त्री कशी करायची...?
भट्टीचे पांढरे कपडे इस्त्री करताना काय काळजी घ्यायची.?
रेशमी साडी जळू नये म्हणून कोळशाच्या किंवा विजेच्या इस्त्रीचं तापमान कसं राखायचं...?
जाड आणि पातळ कपड्यांमधील तो सुळसुळीत फरक कसा हाताळायचा...?

हे सगळं मी कोणत्याही पुस्तकाशिवाय, केवळ डोळ्यांनी आत्मसात करत होतो. त्यांनी मला कधी “ये, शिक” असं आवर्जून म्हटलं नाही. पण त्यांच्या त्या गरम इस्त्रीच्या वाफेसोबत माझं कल्पकतेचं प्रशिक्षण नकळत सुरू होतं. त्या काळात कोळशावरील इस्त्री होती. इस्त्री थंड झाली की त्यात पुन्हा कोळसा टाकला जायचा. नवीन कोळसा भरताना कधी कधी हाताला चटके बसायचे मात्र हे चटके त्यांच्या आयुष्याचा एक भाग झाला होता.

पाचवी ते सातवीतला तो हाफ चड्डीतला मी... ती माझी छोटीशी मूर्ती मला आजही स्पष्ट आठवते. गावातली माणसं त्या दुकानात बसलेल्या मला पाहून कधी कधी चेष्टा करायची, "शाळा शिकून काय  करणार आहेस ?" असं विचारायची. पण त्या कोवळ्या वयात ते इस्त्रीचं दुकान म्हणजे माझ्यासाठी फक्त एक दुकान नव्हतं, तर ते माझं हक्काचं विसाव्याचं आणि संवादाचं केंद्र होतं.

जगण्याचा वळणदार मंत्र

काही वर्षांनी आमच्या घरी स्वतःची इस्त्री आली. जेव्हा मी पहिल्यांदा कपडे इस्त्री करायला हातात घेतले, तेव्हा माझे हात जराही अडखळले नाहीत. आज मी अतिशय अभिमानाने आणि आत्मविश्वासाने सांगू शकतो की, मी कोणत्याही कपड्याला अतिशय नीटनेटकी आणि आकर्षक इस्त्री करू शकतो. माझ्या इतकी सुंदर इस्त्री माझ्या मित्रमंडळीत कुणालाही करता येणार नाही असे मी माझ्या मित्रांना कायम सांगतो आणि तेही ते मान्य करतात... आणि याचं संपूर्ण श्रेय माझ्या त्या दोन अवलिया गुरूंना — शशिकांत चन्ने आणि संजय कुंभार यांना जातं.

त्यांनी मला फक्त कपड्यांच्या सुरकुत्या मिटवायला शिकवलं नाही, तर आयुष्यातील बारकावे कसे टिपायचे, संयम कसा राखायचा आणि कोणतंही काम अगदी मनापासून केलं की त्यात 'कौशल्य' कसं उतरतं, हा जगण्याचा मोठा मंत्र दिला.

त्यामुळेच आज मागे वळून पाहताना मनापासून वाटतं — रस्त्यात गाडी बंद पडल्यावर ज्याने कार्ब्युरेटर साफ करायला शिकवलं, तोही गुरूच! पंक्चर काढणारा, पोहायला शिकवणारा, मातीत घाम गाळून शेती शिकवणारा... हे सगळेच गुरू आहेत. आणि कपड्यांना आपल्या कलेने सुंदर रूप देणारे शशिकांत चन्ने आणि संजय कुंभार हे तर माझ्या आयुष्यातील 'खरे कलाकार' आणि आदरणीय गुरू आहेत.

शशिकांत चन्ने यांच्या दुकानात आणखीन एक गोष्ट मला खूप आकर्षित करत होती ती म्हणजे त्यांच्या दुकानात लावलेले अमिताभ बच्चन यांचे दोन मोठे पोस्टर. त्यावेळी पोस्टर आणल्यानंतर ते काचेच्या फ्रेम मध्ये लावले जायचे. कुली चित्रपटातील एक फोटो आणि लावारिस चित्रपटातील उभा राहिलेला तो बच्चन असे दोन फोटो या दुकानात लावलेले होते. (आजही ते फोटो त्या दुकानांमध्ये आहेत.) हे फोटो पाहत असताना मला माझ्यातील अमिताभ बच्चन प्रेम नकळत बहरले जात होते. नवीन चित्रपट किंवा गाण्याची कॅसेट आली की या दुकानात चर्चा व्हायची.

संजय कुंभार यांच्या दुकानात यांचे दुकान म्हणजे फक्त इस्त्री दुकान नव्हते तर करवडीतील एक छोटं ग्रंथालय होते. या दुकानात प्रत्येक दिवशी सातारचा ऐक्य पेपर आणि प्रत्येक रविवारी कोल्हापूरचा सत्यवादी पेपर यायचा. ऐक्य त्या काळी जिल्ह्याचे मुखपत्र होता. तो पेपर आला की पेपर वाचण्यासाठी आमच्या उड्या पडायच्या. जिल्ह्यात काय घडलं आहे याची संपूर्ण माहिती या पेपरमधून आम्हाला मिळायची. प्रत्येक रविवारी येणारा सत्यवादी म्हणजे आमच्यासाठी ज्ञानाचा खजिना होता. फुलबाग पत्रमैत्री हा सत्यवादी मधील बालगोपाळांसाठीचा एक कॉलम होता, त्यामध्ये मी लहानपणी काही विनोद गोष्टी बोधकथा पाठविल्या होत्या, त्या सत्यवादीमध्ये प्रसिद्धही झाल्या होत्या. सत्यवादी पुरवणीमध्ये पहिल्या पानावर क्राईम स्टोरी असायची. ती वाचण्यासाठी तर पेपरला नंबर लागायचे. 

इस्त्रीच्या दुकानात मिळालेले मला दोन गुरु आणि त्या ठिकाणी मला मिळालेले ज्ञान हे आजही मला अनेक ठिकाणी उपयोगी पडतं. म्हणून मला सांगावासं वाटतं
आयुष्यात भेटणाऱ्या प्रत्येक माणसाचा आदर करा, कारण कोण, कधी आणि कोणत्या रूपात आपल्याला जगण्याचं गाणं शिकवून जाईल, हे सांगता येत नाही.

"गुरू हा फक्त छापील पुस्तकात नसतो...
तो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
माणसाच्या रूपात भेटत असतो."

महत्वाचं... संजय कुंभार यांनी या इस्त्रीच्या दुकानाच्या जोरावर अतिशय कष्टाने आपला संसार चालवला आहे त्यांची दोन्ही मुलं आज उच्चशिक्षित आहेत. त्यांचा एक मुलगा आता पुण्यामध्ये मोठ्या आयटी कंपनीमध्ये नोकरीला आहे ज्याला 25 लाखाचं पॅकेज आहे. तर मुलीचेही लग्न झाला आहे. कुंभार यांनी या दुकानाच्या जोरावरच छोटसं टुमदार घर बांधलं आहे. संजय कुंभार हे करवडीतील प्रसिद्ध गोंधळी आहेत अतिशय चांगला गोंधळ घालतात. ते जन्माने जातीने कुंभार आहेत अतिशय सुंदर गणपतीच्या मुर्त्या ह तयार करतात.

*सतीश मोरे सतिताभ* 
९८८११९१३०२

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...