फॉलोअर

३० एप्रिल २०२४

मी तीन वेळा पाहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी

' मी ३ वेळा पाहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी '


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण जगाला आकर्षण आहे. गेली दहा वर्षे भारताचे पंतप्रधान म्हणून मोदी यांनी मिळवलेली लोकप्रियता, त्यांची काम करण्याची पद्धत याबाबत लोकांच्यामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नरेंद्र मोदी चांगले काम करतात की वाईट करतात? ते हुकूमशहा आहेत की भारताला वेगळी दिशा देणारे नेते आहेत, याबाबत मतप्रवाह आहेत,असावेत.एखाद्या व्यक्तीकडे पाहण्याच्या वेगवेगळ्या नजरा असू शकतात. मला बोलायचं आहे नरेंद्र मोदी यांना मी केव्हा पाहिलं आणि जेव्हा पहिलं तेव्हा मला त्यांच्यामध्ये काय वेगळे दिसलं यावर. मी आजपर्यंत तीन वेळा नरेंद्र मोदी यांना जवळून पाहिलं आहे. 

पुढारीमध्ये गेल्या 24 वर्षापासून मी कार्यरत आहे. पुढारीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापूर येथे ४ जानेवारी २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. पुढारीच्या रौप्य महोत्सवाला पंतप्रधान इंदिरा गांधी त्यानंतर सुवर्ण महोत्सवाला पंतप्रधान राजीव गांधी आणि 75 व्या म्हणजेच अमृत महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी असे तीन पंतप्रधान आले आहेत. एका प्रादेशिक वृत्तपत्राच्या प्रगतीच्या तीन टप्प्यात देशाचे तीन पंतप्रधान येणे हा मोठा योग भारतातील कुठल्या दैनिकाला क्वचितच आला असेल. पुढारीचे संपादक आदरणीय पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या करिष्मामुळेच या दिव्य व्यक्ती कोल्हापूरमध्ये येऊन गेल्या. या अगोदरच्या दोन पंतप्रधानांना मला पाहता आले नाही. मात्र नरेंद्र मोदींना पहिल्यांदा कोल्हापूरला पाहिलं. पुढारीचा हा घरचाच कार्यक्रम असल्यामुळे आम्हा सर्व वरिष्ठ पत्रकारांकडे व्यक्तींकडे नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाची विशेष जबाबदारी माननीय संपादक साहेब आणि आदरणीय योगेश जाधव साहेब यांनी दिली होती. कार्यक्रम भव्य दिव्य झाला. या कार्यक्रमात अवघ्या काही फुटावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदा मी पाहिले. कोल्हापूरमध्ये येऊन कोल्हापूर सारख्या रांगड्या मराठी भाषेत सुरुवात करून नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी कोल्हापूरकरांना  जिंकले होते. त्यावेळी पंतप्रधान मला खुप भावले होते. नरेंद्र मोदी यांचं 'लव्ह अट फर्स्ट व्हिजिट दर्शन' आणि कोल्हापूर मधील हा भव्य दिव्य कार्यक्रम माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा पाहण्याचा योग आला तोही दिवस देशाच्या इतिहासातील सर्वोच्च क्षण होता. सातारचे खा. श्रीनिवास पाटील यांच्या सहकार्यामुळे 2 फेब्रुवारी २०२० रोजी कराडचे आम्ही काही पत्रकार दिल्लीला गेलो होतो. तेथील नवीन महाराष्ट्र सदन मधील दोन सूट आमच्यासाठी बुक करण्यात आले होते. श्रीनिवास पाटील यांनी त्यांच्या कोट्यातून आम्हाला लोकसभेचे पास मिळवून दिले होते. सुरक्षा विषयक सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्हाला लोकसभेत प्रवेश देण्यात आला. लोकसभा प्रेक्षा गॅलरीमध्ये आम्ही जाऊन बसलो. लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू होती. या चर्चेत खासदार श्रीनिवास पाटील,सुप्रिया सुळे यांनी भाग घेतला. सकाळी अकराची वेळ असल्याने त्यावेळी सभागृहात 100 च्या सुमारास खासदार असतील. अचानक शांतता पसरली. झप झप पावले टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि समवेत गृहमंत्री अमित शहा यांचे सभागृहात आगमन झाले.आम्ही अचंबित झालो होतो. केवळ वीस फुटावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दर्शन होत होते. इथे येऊन मोदी पाहायला मिळतील याचा आम्ही विचारही केला नव्हता. लोकसभेत या अगोदर मी अण्वस्त्र ऊर्जा चर्चावर बोलताना पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन पंतप्रधान कार्यालयीन राज्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाहिले होते,ऐकले होते. मात्र आता माझ्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. ते त्यांच्या जागेवर आसनस्थ झाले. आता ते काय बोलणार, काय होणार याची आम्हा सर्वांनाच उत्सुकता होती. काही क्षणातच पिठाशीन अधिकाऱ्यांनी सूचना केल्यानंतर गृहमंत्री अमित शहा बोलायला उभे राहिले. हिंदुस्थानच्या आयुष्यातील आज ऐतिहासिक क्षण आहे अशी आपल्या भाषणाची सुरुवात करत अमित शहा यांनी अयोध्या येथे राम जन्मभूमीसाठी न्यायालयीन निर्णय झाल्यानंतर जमिनीचा वाद मिटला आहे असे सांगून न्यायालयाने या मंदिरासाठी जागा दिलेली आहे त्याबाबतची माहिती त्यांनी सभागृहात दिली. ते केवळ एक मिनिटच बोलले. सभागृहातील सर्वांनी टाळ्या वाजवत अमित शाह यांच्या घोषणेचे स्वागत केले. त्यानंतर काही क्षण पुढचे काही क्षण फक्त टाळ्यांचा कडकडात आमच्या कानावर ऐकू येत होता. त्यानंतर नरेंद्र मोदी उभे राहिले त्यांनी सभागृहाला हात जोडून वंदन केले आणि लगेच ते सभागृहातून निघून गेले. केवळ दहा मिनिटांच्या झंझावाताने त्यांनी सभागृहाला जिंकले होते. लोकसभा लाईव्ह चॅनेलच्या माध्यमातून हा क्षण भारतातील अनेकांनी पाहिलेला होतं. नरेंद्र मोदी यांचं माझे हे दुसरे दर्शन होते. काही वेळानंतर आम्ही सभागृहाच्या बाहेर पडलो. मात्र काय बोलावे आणि काय करावं, आम्हाला सुचत नव्हते.माझ्यासमवेत पत्रकार गोरख तावरे, विकास भोसले, खंडू इंगळे, अशोक मोहने, नितीन ढापरे यांनी हा अविस्मरणीय क्षण अनुभवलेला आहे.राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद हा वाद गेली अनेक वर्षे सुरू होता.न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून तो वाद मिटला. अनेक तडजोडी आणि न्यायालयीन घडामोडी झाल्या. काही कटू आठवणी सोडून हा वाद मिटला. मात्र हा मिटलेल्या वादाची घोषणा लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या लोकसभेत ऐकावयाची पहावयाची संधी मला मिळाले, यासारखे मोठे भाग्य कोणते असू शकते! विशेष म्हणजे त्याच दिवशी आम्ही सभागृहाबाहेर राहुल गांधी आणि शरद पवार यांनाही भेटलो होतो.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तिसरं दर्शन होण्याचा योग आला तो म्हणजे काल २९ एप्रिल २०२४ रोजी.कराड शहरांमध्ये लोकसभेच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार हेच मोठे आश्चर्य होते. लोकसंख्येने कमी असले तरी कराडचे राजकीय वजन फार मोठे आहे, हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. देशाला उंपपंतप्रधान देणारं कराड हा राजकीयदृष्ट्या सक्षम शहर आहे. शहर व उपनगर मिळून सव्वा लाख लोकसंख्या असणाऱ्या या गावात अनेक दिग्गज राजकारणी होऊन गेले मात्र यशवंतराव चव्हाण यांच्या इतकी उंची कोणी गाठू शकला नाही.  चव्हाण साहेबांच्या पाठोपाठ पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाचे उच्च स्थान मिळवलं आहे. जिल्हा सातारा असला तरी जिल्ह्यातील मुख्य घडामोडीचे केंद्र कराड असते आणि या कराडला जोडून असलेला पाटण तालुका नेहमी कराडच्या बरोबर राहत असतो. अशा कराड शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आणि त्यांचं वृत्तांकन करण्याचे भाग्य माझ्यासहित पुढारी टिमला मिळणार होतं यामुळे गेल्या काही दिवसांपासून आम्ही सर्वजण एक्सायटेड होतो. 


खरं तर या अगोदर कराड शहरात झाली सर्वात मोठी सभा मी कव्हर केलेली आहे. 2004 साली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी कराडला आल्या होत्या. काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात सोनिया गांधी प्रथमच आल्या होत्या. शरद पवार यांनी परदेशी वंशाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्ष सोडून स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर सातारा जिल्ह्यात कराड दक्षिण वगळता काँग्रेस पक्ष शून्य झाला होता. कराडमध्ये विलासराव पाटील उंडाळकर यांच्या पुढाकाराने सोनिया गांधी यांची सभा झाली होती. कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर ही भव्य दिव्य सभा झाली होती. या सभेने आतापर्यंतचे उपस्थितीचे सर्व रेकॉर्ड तोडले होते आणि ही सभा मी कव्हर केली होती. 'स्वतःला राष्ट्रवादी म्हणून कोणी राष्ट्रवादी होत नाही' अशी टीका सोनिया गांधी यांनी त्यावेळी शरद पवार यांच्यावर केली होती आणि तीच हेडलाईन पुढारी मध्ये प्रसिद्ध झाली होती. या सभेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांना निमंत्रित केले नव्हते, पण ते आले आणि सभा संपेपर्यंत उभे राहिले. विलासराव पाटील उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे संबंध त्यावेळी खुप ताणले होते.‌ दोघामधून विस्तव जात नव्हता. त्यामुळे काकांनी पृथ्वीराज चव्हाण यांना बसायला खुर्ची मिळू नये अशी व्यवस्था केली होती. दुसऱ्या दिवशी ही बातमी सर्व आवृत्तीला माझ्या नावासहित पुढारीत आली होती. हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. सोनिया गांधी यांच्या या सभेनंतर कराडमध्ये एवढी विक्रमी सभा आज अखेर झालेली नाही. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भर दुपारी उन्हात ५० हजार लोक उपस्थित होते.मध्यंतरी मराठा आरक्षण मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर यसभा झाली मात्र ही सभा राजकीय नव्हती याही सभेने रात्रीच्या सभेच्या उपस्थितीचे रेकॉर्ड तोडले होते, या अगोदर स्टेटीयमवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रात्री उशिरा सभा झाल्या होत्या. या दोन्ही सभेला मी उपस्थित होतो. या दोन्ही सभांचे रेकॉर्ड जरंगे पाटील यांनी तोडले होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कराड येथील सभेबाबत मला उत्सुकता लागली होती.

विद्यानगर येथील बीज गुणन परिक्षेत्राच्या 35 एकरच्या मैदानावर नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी भारतीय जनता पक्षाने भव्य तयारी केली होती. नियोजित वेळेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुपारी दोन वाजता आगमन होणार होते. मात्र बागलकोट, सोलापूर येथील सभा लांबत गेल्यामुळे नरेंद्र मोदी यांना कराडमध्ये यायला फार वेळ झाला. एक वाजता सभा आहे म्हणून बारा वाजल्यापासूनच जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून लोक कराडमध्ये यायला लागले होते.भर दुपारी उन्हातानात लोक हातात झेंडे घेऊन येत होते. उन्हातही लोकांचा उत्साह वाखाण्यासारखा होता. नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी,ऐकण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या बरोबरच कराड शहर व परिसरातील नागरिकांचा मोठी गर्दी होती. कराड शहरातील जैन समाजातील अनेक लोक तसेच उद्योगपती, व्यापारी,वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मला या सभेसाठी चालत जाताना दिसले. तीन वाजेपर्यंत संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते. ऑनलाईनच्या जमानात मोदी आता कुठे आहेत याची जाणीव याची माहिती सभागृहातील लोक मोबाईल वरून घेत होते. आता मोदींची सभा सोलापूरला चालू आहे असा संदेश काही जण देत होते. तीन वाजून दहा मिनिटांनी सोलापूर येथील मोदी यांची सभा संपल्याचे कळल्यानंतर आता पुढच्या पन्नास मिनिटात मोदी कराडमध्ये पोहोचणार याचा लोकांनी अंदाज घेतला. उकाड्याने त्रस्त झालेले लोक हातात मिळेल ती वस्तू घेऊन वारा घेण्याचा प्रयत्न घेत होते. पिण्याच्या पाण्याची संयोजकांनी सोय केली होती मात्र ती यंत्रणा तोकडी पडली. 

नरेंद्र मोदी येण्याची उत्सुकता ताणलेली होती. पन्नास हजाराहून अधिक क्षमता असलेल्या या मंडपातील सर्व आसने भरलेली होती. सव्वा चारच्या सुमारास हेलिकॉप्टरचा मोठा आवाज येऊ लागला, एका पाठोपाठ एक अशी तीन हेलिकॉप्टर उतरली. नरेंद्र मोदी यांचे काही मिनिटातच व्यासपीठावर आगमन होत आहे असे माईक वरून जाहीर करण्यात आले. यावेळी पालकमंत्री शंभूराज यांचे भाषण सुरू होते मात्र मोदी मोदीच्या घोषणेने पालकमंत्र्यांना भाषण आटोपतं घ्यावं लागलं. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही क्षणातच मोदी व्यासपीठावर येत आहेत अशी घोषणा केली आणि पुढच्या 30 सेकंदातच नरेंद्र मोदी यांचे व्यासपीठावर आगमन झाले. डी झोन पासून साधारण ३० फुटावर विशेष कक्षामध्ये माझ्यासहित काही पत्रकार बसलेले होते. आम्ही जवळून मोदींना पाहत होतो. मोदी व्यासपीठावर येताच व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मंडपातील सर्व नागरिक उभे राहिले,मोदी मोदीचा जयघोष सुरू झाला. पुढचे काही मिनिटे फक्त मोदी मोदी हीच घोषणा सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र यांच्या दमदार एंट्रीने उपस्थितांमध्ये नव चैतन्य आणि बळ आणलं. नरेंद्र मोदी यांचं माझे हे तिसरे दर्शन होते. पुढच्या काही मिनिटात छत्रपती उदयनराजे यांचे भाषण झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी व्यासपीठ ताब्यात घेतले. 


मोदी भाषणासाठी उभे राहिल्यानंतर पुढील काही मिनिटे चारही कोपऱ्यातून मोदी मोदी चा जयघोष सुरू होता. कोणा एका नेत्यांना मिळालेला एवढा मोठा सन्मान आणि  जयघोष मी पहिल्यांदाच पाहत होतो. या अगोदर अनेक सभा पाहिल्या मात्र वक्त्याला डोक्यावर घेऊन त्याचा नावाचा जयघोष करणारे लोक मी पहिल्यांदाच पाहिले. नरेंद्र मोदी यांनी त्यानंतर 32 मिनिटे केलेलं भाषण अविस्मरणीय, मोहनीय होते. या भाषणातील राजकीय मुद्द्यांच्या खोलात मी जाणार नाही. मात्र त्यांच्या भाषणातील प्रत्येक मुद्द्यावर समोरून येणारा प्रतिसाद आणि नरेंद्र मोदी यांचे बोलण्याची स्टाईल असा वेगळा अनुभव मी पहिल्यांदाच पाहत होतो. नरेंद्र मोदी यांची एक वेगळी स्टाईल आहे, ती मी पुन्हा एकदा अनुभवली. त्यांना ज्या गोष्टी मांडायच्या आहेत, ते ती गोष्ट समोरच्या व्यक्तींच्याकडून वदवून घेतात. बत्तीस मिनिटांच्या भाषणात त्यांनी सात वेळा समोरच्या लोकांच्याकडून काही गोष्टी विचारून घेतल्या. समारोपात त्यांनी उपस्थितांना एक प्रश्न विचारला  'तुम्ही माझे एक काम करणार का? नरेंद्र मोदी आपणास काय काम सांगणार याची उत्सुकता उपस्थितांमध्ये होती. क्षणाचाही विलंब न लावता उपस्थित सर्वांनी 'हो करणार' असे उत्तर दिले. तुम्ही घरी जाल तेव्हा तुमच्या घरातील सर्वांना माझा एक निरोप द्या, नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला नमस्कार केला आहे असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले आणि सर्वांना जिंकले. 

नरेंद्र मोदी यांना तीन वेळा पाहण्याचा मला योग आला. एखाद्या व्यक्तीला भेटण्याची तीव्र इच्छा असते. नरेंद्र मोदी यांना वन टू वन भेटण्याची माझी पण  इच्छा आहे. अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी मी 35 वर्षे वाट पाहिली, तपश्चर्या केली म्हणले तरी चालेल. २०१६ मध्ये पहिल्यांदा बच्चन साहेबांना भेटलो, त्यानंतर ९ वेळा भेटलो. नरेंद्र मोदी यांनाही मला भेटायचे आहे. तीन वेळा फक्त दर्शन झाले आहे.आता त्यांच्याशी बोलायचे आहे, त्यांच्यासोबत चहा घेताना काही गोष्टी त्यांना विचारायच्या आहेत. ही संधी सुद्धा भविष्यात मला नक्की येईल कारण मी सकारात्मक विचाराचा माणूस आहे. नरेंद्र मोदी यांना मी भविष्यात नक्की भेटणार असा माझा दृढ विश्वास आहे.


सतीश वसंतराव मोरे सतिताभ
दैनिक पुढारी कराड.
९८८११९१३०२

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...