फॉलोअर

Mangala Bansode Tamasha लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Mangala Bansode Tamasha लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१२ सप्टेंबर २०२४

मंगला बनसोडे करवडीकर २७ (७२) वर्षाची तमाशा सम्राज्ञी!


मंगला बनसोडे करवडीकर  
२७ (७२) वर्षाची तमाशा सम्राज्ञी!
 

महाराष्ट्राची तमाशा लोककला ज्यांनी जिवंत ठेवली,कला हेच जीवन असं ब्रीद डोळ्यासमोर ठेवून वयाच्या नव्या वर्षापासून तमाशा फळात आपली कला दाखवणाऱ्या, करवडी गावचे भूषण श्रीमती मंगला बनसोडे करवडीकर यांचा आज ७२ वा वाढदिवस. वय फक्त एक आकडा असतो असं म्हणतात आणि हे वाक्य मंगला बनसोडे यांना तंतोतंत लागू पडतं. आज सकाळी मी त्यांना भेटायला गेल्यानंतर 72 वा वाढदिवस नसून हा तुमचा 27 वाढदिवस आहे असा सहज बोलून गेलो.यामागे कारणही तसंच आहे. 27 वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशी लावणी आजही त्या करतात, समोर असणाऱ्या हजारो तमाशा रसिकांना लावणीच्या तालावर नाचवतात, त्यांचं मनोरंजन करतात त्यांना दुःख विसरायला भाग पडतात. 

औद्योगिक क्षेत्रात जशी टाटा, बिर्ला, बजाज ही घराणी आहेत, किंवा सिनेमा क्षेत्रात जशी कपूर, खान, बच्चन, देओल घराणी आहेत तसे तमाशात क्षेत्रात शंभर वर्ष जुनं एक घराणे आहे.अनेकदा ‘ घराणेशाही ’ हा शब्द उपरोधानं वापरला जातो पण खरतरं मोठा नावलौकिक असलेल्या घरात जन्माला आल्यावर मोठी जबाबदारी असते, लोक आपल्या अगोदरच्या पिढीशी त्या व्यक्तीची तुलना करतात. या सगळ्या परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेलं कलाक्षेत्रातील आभाळाएवढं मोठ्ठ नाव म्हणजे
मंगल बनसोडे. आजोबा भाऊ बापू मांग नारायणगावकर, आई विठाबाई नारायणगावकर या दोन मोठ्ठा वारसा अभिमानाने आपल्या नावासोबत घेऊन मात्र स्वकर्तृत्वावर यश मिळवून आज तमाशासृष्टीवर मंगलताई अधिराज्य गाजवीत आहे.


तमाशा कलावंतांचे जीवन किती कष्टाचं असतं हे त्या कुळाला गेल्यानंतरच कळतं. मला थोडंफार कळलं,दिसलं त्यावरून मी म्हणू शकतो मंगलताईनीं खुप कष्ट सोसलं आहे. अनेक मी नेहमीच म्हणतो चित्रपटातील टॉपच्या हिरोईन पेक्षा मंगला बनसोडे कितीतरी पटीने श्रेष्ठ आहेत. आठ महिने तमाशा दौऱ्यामध्ये असताना त्या रोज कार्यात व्यस्त असतात. दिवसातील आठ दहा तास प्रवासात जातात. तमाशाच्या ठिकाणी पोचल्यानंतर मग थोडाफार आराम मिळतो, पुन्हा संध्याकाळी तमाशा सुरू होतो. रात्री उशिरा संपतो. पहाटे पुन्हा प्रवास सुरू होतो. कला सादर करत असताना रोज नवीन गावातील नवीन प्रेक्षक असतात. नव्या ढंगाचे असतात. कुणी तमाशा बघायला आलेला असतो, कुणी बाई बघायला आला असतो तर कोणी कला बघायला असतो.‌ मात्र या सर्वांसमोर अभिनय करताना त्या सर्वोत्तम द्यायचा प्रयत्न करतात. रोज नवा नवा अभिनय करत असतात. तमाशामध्ये रिटेक नसतो, चित्रपटांमध्ये अनेक रिटेक असतात. एका टेक मध्ये रोज तमाशाच्या फडात कला सादर करताना मंगला बनसोडे यांच्यातील कलाकार अजून प्रगल्भ होत जातो.

आई विठाबाई मांग नारायणगावकर यांच्यापासून वेगळी झाल्यानंतर मंगला बनसोडे यांनी स्वतंत्र फड सुरू केला. त्यावेळी आम्ही पाचवी सहावीत असेल. या तमाशाच्या रंगीत तालमी करवडी मध्ये होत असत. रंगीत तालमीसाठी आमच्या घरासमोर जनार्दन मोरे यांची बंद पडलेली पोल्ट्री निवडलेली होती. जुलै ऑगस्ट महिन्यात रिहसल सुरू व्हायच्या. त्याकाळी मनोरंजनाची फार साधने नसल्यामुळे आमच्या गावातील सर्व लोक हे बघायला तिथे जमायचे. आम्ही मुलं जात असू, काहीजण आम्हाला हटकत मात्र तरीही लांबून आम्ही गाणी,वगनाट्याच्या रंगीत तालमी पहात होतो. मंगला बनसोडे यांच्या सोबतीला त्यांचे पती रामचंद्र बनसोडे खांद्याला खांदा लावून वगनाट्यामध्ये आपला ठसा उमटवत होते. पुढे छोटा नितीन तमाशा मध्ये आला.मंगला बनसोडे यांचा थोरला मुलगा अनिल माझा पहिली ते चौथीचा जिल्हा परिषद शाळेतील क्लासमेट. शाळा सोडून त्याने तमाशा बॅक स्टेज सांभाळण्याची जबाबदारी घेतली. हळू तमाशा मोठा होत गेला. संगीताची राणी मंगला बनसोडे , लिटिल मास्टर नितीन बनसोडे आणि वग सम्राट रामचंद्र बनसोडे या तिघांच्या जोडीने राज्यात एक फार मोठा काळ गाजवला, तमाशा क्षेत्रात अक्षरश धुमाकूळ घातला. मंगला बनसोडे यांनी आई विठाबाई यांच्या पावलावर पाऊल टाकत बैठी लावणीच्या माध्यमातून तमाशाला एक उंची लावून दिली.
कधी काळी आई विठाबाईसोबत तमाशात काम करताना मंगलताईंनी बंडाचा झेंडा उभारला, पती रामचंद्र बनसोडे यांच्यासाठीने स्वतःचा स्वतंत्र फड उभारायचा हे जाहीर केलं. खरं तर सगळं सुरळीत सुरु असतांना धोका पत्करायचा नाही हे धोपट विचार करणाऱ्या माणसाचं धोरण असतं, पण जो धोका पत्करतो तोच इतरांपेक्षा अधिक यशस्वी होतो हे जगाचं यशाचं सूत्र आहे. आई विठाबाईच्या तमाशातून बाहेर पडल्यावर पती रामचंद्र यांच्यासोबत स्वतःचा तमाशा फड सुरु करताना ‘ पुनश्चः हरि ओम ‘ म्हणत आयुष्याच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात केली. या प्रवासात खडतर काटेरी रस्ता होता, अनंत अडचणी होत्या... पण स्व निर्मितीचा आनंद होता, रामचंद्रासोबतच्या सीतामाईने आहे ती परिस्थिती गोड मानली तशी इथेही रामचंद्रासोबत आहे त्या परिस्थिती सुख मानलं. रामचंद्र बनसोडे हे उत्तम कलारसिक, उत्तम वगलेखक त्यांच्या रसिक व्यक्तिमत्वाला ‘ मंगल ‘ नावाचं मांगल्याचं कोंदण लाभलं. महाराष्ट्राला विष्णू बाळा पाटील, बापू बिरू वाटेगावकर, जन्मठेप कुंकवाची, भक्त प्रल्हाद, येथे नांदते मराठेशाही असे एकाहून एक सरस वगनाट्य बघायला मिळाली. आज नीतिनकुमार आणि अनिलच्या रूपाने पुढची पिढी तमाशाचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहे. घरात नातवंडे बागडताहेत... मुलगी लक्ष्मी शेती आणि घराचा सगळा कारभार पाहत आहे. घराचं गोकुळ होणे म्हणजे यापेक्षा वेगळ ते काय असतं... 

मंगलताई तुमच्यातली अभिनेत्री, तुमच्यातली गायिका, तुमच्यातली नर्तिका, तुमच्यातली फड मालकीण, तुमच्यातली आई, तुमच्यातली बहिण.,तुमचं प्रत्येक रूप लोभस आहे. वर्षभर वेगवेगळ्या ताणतणावांनी त्रस्त झालेल्या हजारो रसिकजनांचे तुम्ही मनोरंजन करत आहात, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याच काम तुम्ही करत आहात.देवपूजा, ईश्वरभक्ती यापेक्षा वेगळी काय असणार! रसिकरंजन हे तर पुण्यांचं काम आहे. तुमच्या हातून रसिक रंजनाचे पुण्यकर्म पुढची अनेक वर्ष असेच होत राहो याच मनापासून शुभेच्छा.आपल्या मराठमोळ्या तमाशाला चांगले दिवस येवोत, तमाशाचे तंबू रसिकांच्या गर्दीने ओसंडून वाहोत .आज तुमच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 


सतीश वसंतराव मोरे 
सतिताभ 
9881191302



Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...