*निसर्गवारी*
संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा!
4 जुलै 2021
राम कृष्ण हरी माऊली
कराडच्या कृष्णा नाक्यावर जमून पावणेसहा वाजता आज आमचा निसर्ग वारीचा दिवस सुरु झाला. आम्ही बरोबर सहा वाजता कोपर्डे हवेली येथील सिद्धनाथ मंदिरासमोर पोहचलो. देवाचे दर्शन घेऊन आम्ही हरिपाठ सुरू केला. आज निसर्ग वारीमध्ये अमित खाडे सहभागी झाले होते.
कोपर्डे हवेली ते वडोली रस्ता म्हणजे हिरवीगार उस शेती, काठोकाठ भरलेल्या विहिरी आणि वनराई. आज या गावातून जाताना एक वेगळा आनंद होता. हे गाव खूप मोठं आहे, अतिशय चांगलं गाव आहे. या गावाची लोकसंख्या 15 हजारच्या सुमारास आहे. खूप सधन गाव आहे, या गावात गावातील लोक सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. मात्र एकेकाळी या गावाची ओळख 'कोपर्डे आलं,नाकावर रुमाल धरा' अशी अस्वच्छ गाव म्हणून होती. मला आठवते 2002 साली या गावातील अस्वच्छतेवर मी पुढारीमध्ये 'गाव तसं चांगलं पण अति पुढाऱ्यांच्या संख्येने वेशीला टांगलं' या शीर्षकाखाली बातमी दैनिक पुढारीमध्ये छापली होती. या बातमीनंतर गावातील काही नेत्यांनी मला फोन करून नाराजी व्यक्त केली. मात्र काही जणांनी हे सत्य स्वीकारून गाव स्वच्छ होण्यासाठी, गावाची कुओळख पुसण्यासाठी दै. पुढारीने योग्यच केलं,आमचे डोळे उघडले,अशी प्रतिक्रिया दिली होती.
नंतरच्या काळात 2004 नंतर ग्रामस्वच्छता अभियानाचं वारं मोठ्या प्रमाणात वाहू लागलं. ग्राम विकास मंत्री आर आर पाटलांना सुचलेली संकल्पना संपूर्ण राज्याने उचलून धरली. त्यानंतर केंद्र सरकारचं निर्मल ग्राम अभियान आलं. स्वच्छता अभियान आणि शौचालयाचे महत्त्व गावागावांत पटू लागलं. कोपर्डे गावाने या स्वच्छता अभियानात भाग घेतला. अनेकांनी घरात,घरासमोर शौचालये बांधली. मोठमोठे बंगले उभे करताना त्या बंगल्याच्या बाहेर शौचालयेही बांधली गेली आणि गाव स्वच्छ आणि सुंदर होत गेलं. आज कोपर्डे गावाची ओळख अतिशय स्वच्छ आणि सुंदर गाव अशी आहे. या नवीन गावातून चालत जाताना मला आज खूप आनंद होत होता. जाताना आम्हाला गावातील सुबत्तेचं दर्शन होत होतं. घराघरासमोर उभे असलेले ट्रॅक्टर,चार चाकी वाहने, गोठ्यामध्ये गोधन असं सुखद चित्र होतं. धारा काढायची वेळ झाली होती.अतिशय सुंदर दृश्य पाहत आणि याचा आनंद घेत आम्ही कोपर्डे हवेली पार करून पुढे गेलो.
रेल्वे फाटका जवळ आलो. रेल्वेचं लहानपणापासून सर्वांनाच आकर्षण आहे,असतं. मला पण होतं. करवडी ते कराड टिळक हायस्कूलमध्ये जाताना एसटी बस मधून मला रोज रेल्वेचे दर्शन व्हायचं. करवडी कराड एसटी जर पार्ले मार्गे जाणार असेल तर हमखास साडेदहाच्या दरम्यान कोयना एक्सप्रेससाठी फाटक बंद केलेलं असायचं. कधीकधी कोयना एक्सप्रेस आणि महाराष्ट्र एक्सप्रेस एकाच वेळेला येणार असतील तर दहा पंधरा मिनिटे रेल्वे गेट बंद राहायचं आणि आम्हाला या दोन्ही एक्स्प्रेस पाहायला मिळायच्या. आज रेल्वेट्रेन जाताना जाताना काहीच वाटत नाही. लहानपणी रेल्वे गाडी जवळून गेली की किती डबे आहेत हे मोजायचे. मालगाडी असेल तर त्याला खुप डबे असतात. प्रवासी वाहतूक असेल तर कोणती एक्सप्रेस आहे, कुठल्या गावाहून आली आहे, याची आम्हाला उत्सुकता असायची. आजच्या छोट्या मुलांना ह्या ट्रेन गाडी विषयी किती आकर्षण आहे कल्पना नाही. आम्ही रेल्वे रुळावर रेल्वे जाण्यापूर्वी एखादे नाणे ठेवायचे रेल्वे गेल्यानंतर ते शोधण्याचा पराक्रम केला आहे.
रेल्वे फाटक ओलांडून आम्ही उत्तर पार्ले मध्ये आलो. या ठिकाणी गेल्या काही वर्षात नागरी वस्ती खूप वाढली आहे. पार्ल्यातील अनेक लोक या परिसरात राहायला आले आहेत. त्यांनी बंगले बांधले आहेत. या ठिकाणी मंदिर उभारले आहे. याच ठिकाणी शासकीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीग्रह बांधण्यात आले आहे. नजीकच कराड पालिकेसाठी आ. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या कचरा डेपोची 25 एकर जागा आहे, ही जागा पाहून उंडाळकर काकांनी कराड पालिकेसाठी केलेला एक मोठं काम डोळ्यासमोर आलं. या ठिकाणी कचरा डेपो किंवा कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा प्रयत्न झाला मात्र परिसरातील ग्रामस्थांना आपण नक्की काय करून देणार आहोत हे पटवून देण्यास कराड पालिका अपयशी ठरल्यामुळे इथे काही होऊ शकले नाही. आज ती जागा पडून आहे,भविष्यात या ठिकाणी कराड पालिकेकडून एक मोठा प्रकल्प उभा राहिल,अशी अपेक्षा आहे.
निसर्गाचं रूप पाहत आम्ही पुढे जात होतो, हरिपाठ संपला होता. आता भक्ती गीते सुरू होती. राम कृष्ण हरी चा जप सुरू होता. सातच्या सुमारास आम्ही वडोली निळेश्वर या गावात पोहोचलो. या गावाच्या पश्चिमेला डोंगरावर एक दत्त मंदिर आहे, त्या मंदिराकडे जाण्यासाठी आम्ही वळालो. गावाच्या पलीकडे असणारा आरफळ कॅनॉल पार करत रूळलेल्या पाऊलवाटेने आम्ही चालत राहिलो. याही रस्त्यावर आम्हाला मोरांचे आवाज ऐकत होते. मोरांचे दर्शनही झाले. पुढे एक छोटासा तलाव होता, या तलावात अनेक बगळे स्नान करत होते, अतिशय सुंदर असे दृश्य होते ते! तिथून पुढे वळणावर एक मोठा शेडवजा गोठा पाहायला मिळाला. या गोठ्यात असणारी पशु संपत्ती पाहून खूप आनंद वाटला. पुढे निघालो टेकडीवरील दत्त मंदिर खूप आम्हाला खुणावत होते. आम्ही पुढे टेकडी चढायला लागलो, तोपर्यंत आमचे जावई विजय पवार आणि त्यांचे बंधू संभाजी पवार, त्यांचा पुतण्या तिथे आले. दोन मिनिटांत टेकडीवर पोहचलो. हळूवार वाहणारा थंड वारा आनंद देत होता आणि त्याच वेळेला 'आनंदी आनंद गडे,जिकडे तिकडे चोहीकडे' ही बालकवींची कविता आठवली.
आता झाडं लावण्यासाठी तयारी सुरू केली. दोन-तीन जागेवर आम्ही खड्डा काढण्याचा प्रयत्न केला मात्र खाली दगड लागत असल्यामुळे आमचे प्रयत्न अयशस्वी झाले. शेवटी तीन खड्डे काढल्यानंतर एका जागी खूप माती मुरूम लागला. त्या ठिकाणी आम्ही वडाचे एक झाड संभाजी पवार आणि विजय पवार यांच्या हस्ते लावले. पुंडलिंक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आणि गुरुदेव दत्तचा जयघोष केला आणि मंदिरात जाऊन दत्त भगवानांचे दर्शन घेतले.
वडोली गावात काही काही वर्षापूर्वी एक महाराज आले होते, त्यांनी हे छोटेसे दत्त आणि शंकर मंदिर उभारले. मात्र काही वर्षांनंतर हे महाराज येथून निघून गेले आणि मग ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिर उभे केले. या मंदिरात दत्ताच्या मूर्तीच्या खाली गाभारा असून यामध्ये महादेवाची पिंड आहे. टेकडीवर वसलेले हे मंदिर आणि ही जागा वन विभागाच्या ताब्यात आहे. ग्रामस्थांनी प्रयत्न करून या ठिकाणी अनेक छोटी मोठी झाडे लावली आहेत, शेजारी बोअर मारले आहे. बोअरच्या पाण्यावर ही झाडे जगविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र वन विभागाकडून या लोकांना त्रास होतो. सिमेंटची पाण्याची टाकी उंचावर ठेवण्यासाठी भिंत उभी केली होती मात्र हे बांधकाम वन विभागाने दोन दिवसात तोडून टाकले. आजही ही पाण्याची टाकी तिथेच आहे.
काही वर्षापूर्वी या जागेत खोदलेल्या बोअरसाठी वीज कनेक्शनसाठी वन विभागाने खूप अडवणूक करत वीज कंपनीला कनेक्शन न देण्याचे पत्र लिहिले. शेवटी कंटाळून संभाजी पवार हे छत्रपती उदयनराजे भोसले यांना भेटले.उदयनराजेनीं त्यांच्या खास 'स्टाईल'मध्ये वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर काही तासातच याठिकाणी वीज जोडणी झाली होती. ही माहिती संभाजी पवार यांनी आम्हाला सांगितली. हे ऐकताना सातारा जिल्ह्यात कोणतेही काम होत नसेल तर लोक उदयनराजेंकडे का जातात? उदयनराजे लोकांच्या हृदयामध्ये का आहेत? याचा प्रत्यय आला.शासकीय नियमाप्रमाणे सगळेच अधिकारी, पदाधिकारी काम करतात मात्र कायदा, नियम आणि व्यवहार याची सांगड घालून जनतेच्या हिताचे काम करणारा नेता म्हणून उदयनराजेंना ओळखलं जातं.
मंदिराच्या समोरच टेकडीवर बसून कांदे पोहे नाष्टा केला. त्या ठिकाणावरुन उंच डोंगर, हिरवीगार झाडी आणि उसाची शेती पाहून तनामनात उत्साह संचारला, हा उत्साह घेऊनच आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला.
आजची वारी खूप सुंदर आणि आनंदी झाली.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा