फॉलोअर

१३ सप्टेंबर २०२२

आठवण येते का माझी ?



आठवण माझी येते का माझी माझ्याकडे काम नसतानाही?

आठवण माझी येते का माझी काहीतरी वेगळं खाताना ?

आठवण माझी येते का माझी काहीतरी नवीन वाचताना?

आठवण माझी येते का माझी थंड झुळूक आल्यावर ?

आठवण येते का माझी अवकाशात काळे नभ आल्यावर?

आठवण येते का माझी रिमझिम पाऊस पडून गेल्यावर?

आठवण येते का माझी काही तरी भास झाल्यावर ?

आठवण येते का माझी दूर कुठेतरी ते गाणं ऐकल्यावर ?

०८ सप्टेंबर २०२२

पाट्या नसलेला वेगळा बावर्ची ! लव यु राजेश खन्ना, जया आणि ऋषिकेश मुखर्जी !


पाट्या नसलेला वेगळा बावर्ची !
लव यु राजेश खन्ना, जया आणि ऋषिकेश मुखर्जी  !

खरंतर शालेय जीवनापासून मी अमिताभ बच्चन यांचा डाईंग फॅन आहे. मात्र त्या काळात मिथुन चक्रवती, धर्मेंद्र, जितेंद्र आणि राजेश खन्ना यांचे अनेक चित्रपट मी पाहिलेले आहेत. राजेश खन्ना हा हिंदी चित्रपट सृष्टीतला पहिला सुपरस्टार. राजेश खन्नाने सलग रोप्य महोत्सवी चित्रपट दिलेले आहेत. त्यांच्या नंतर त्यांची जागा अमिताभ बच्चन यांनी घेतली.

राजेश खन्ना यांचे दो रस्ते, दाग, आप कि कसम,सौतन, अवतार, अमृत, रोटी हे चित्रपट मी अनेकदा पाहिले आहेत. ते मला खूप आवडतात. विटा (सांगली) येथील भैरवनाथ थेटर मध्ये फळीवर बसून पाहिलेला दो रस्ते मला चांगला आठवतो. या या चित्रपटातील 'छुप गये सारे नजारे ओए क्या बात हो गई' हे गाणे मला खूप आवडते. कराडच्या प्रभात मध्ये सौतन हा चित्रपट पाहिलेला अजूनही डोळ्यासमोर आहे. आपकी कसम हा चित्रपट आणि त्या चित्रपटातील 'जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकान' हे गाणं मला खूप आवडते. या चित्रपटात राजेश खन्नाच्या मुलीचे नाव एकता आहे, हे नाव मला त्यावेळी खूप आवडलं होतं. अवतार मधील 'दुनिया मे कितना गम है, मेरा गम कितना कम है, लोगो का गम देखा तो, मैं अपना गम भूल गया' हे गाणे आणि राजेश खन्ना यांचा दमदार अभिनय मला खूप आवडला आहे. कदाचित डिस्को डान्सर या चित्रपटातील 'गोरो की ना कालोंकी, दुनिया है दिलवालोकी' हे राजेश खन्ना यांच्यावर चित्रित गाणे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे.

राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी आनंद या चित्रपटात एकत्र काम केले तर पूर्वी त्यांनी नमक हराम या चित्रपटातही काम केले होते. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांचे राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे ऑल टाइम आवडते कलाकार. राजेश खन्ना यांचा  ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित बावर्ची हा चित्रपट मी पाहिलेला नव्हता. बुधवारी रात्री युट्युबवर लावून टिव्ही वर हा पूर्ण चित्रपट पाहिला. या चित्रपटात सुद्धा अमिताभ बच्चन आहेत हे मला आज पहिल्यांदाच कळलं. चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा अभिनय कुठेही नाही किंवा त्यांच्यावर कुठेही चित्रिकरण नाही. मात्र चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटी अमिताभ बच्चन यांचा आवाज आहे.

चित्रपटाच्या नावाच्या पाट्या (टाईटल) आपण नेहमीच पाहतो. मात्र बावर्ची या चित्रपटाला हा अपवाद आहे. या चित्रपटाच्या सुरुवातीला नावाच्या पाट्या दाखवलेल्या नाहीत तर पिक्चरचे निर्माते,दिग्दर्शक, संकलक, संगीतकार,गायक या सर्वांची नावे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आवाजात ऐकवली आहेत. त्याला हिंदीमध्ये कथा वाचक असे म्हणतात. (हा प्रयोग नाटकात राबवला जातो) अशा प्रकारे चित्रपटाची सुरुवात मी पहिल्यांदाच पाहिली. 

'बावर्ची' हा चित्रपट मला खूप आवडला. हा चित्रपट पाहताना अधून मधून आनंद पिक्चरची आठवण येत होती. स्वतःसाठी स्वतःचे काम कोणीही करतात पण दुसऱ्यासाठी काम केलं तर त्यात खरा आनंद असतो. आनंद वाटत राहा, छोट्या छोट्या गोष्टीत खूप आनंद मिळतो. मात्र तो लुटायचा सोडून मनुष्य मोठ्या आनंदाच्या मागे लागतो. त्याऐवजी छोटा छोटा आनंद घेतला पाहिजे. छोटा छोटा आनंद दिवसभरात अनेक वेळा मिळतो, लुटता येतो. तो घेता आला पाहिजे. मोठा आनंद वर्षातून चार-पाच वेळा मिळतो मात्र तेवढ्यासाठी आपण छोट्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो,  असा संदेश ऋषिकेश मुखर्जी यांनी या चित्रपटाद्वारे दिला आहे. (७ जुलै १९७२ रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता त्यानंतर चार महिन्याने माझा जन्म झाला आहे)

ऋषिकेश मुखर्जी यांची दिग्दर्शनाची एक वेगळी शैली याही चित्रपटात मला पाहायला मिळाली. चित्रपट कुठेही बोअर झालेला नाही किंवा या चित्रपटात घेतलेले कलाकार चुकीचे आहेत असं कुठेही वाटलं नाही. सहज फुलत जाणारं कथानक, राजेश खन्ना यांचा सहज अभिनय आणि शेवटपर्यंत उत्सुकता ताणलेला क्लायमॅक्स हे ही या चित्रपटाचे यश आहे. हा चित्रपट मला खुप आवडला, तुम्ही पाहिला असेल तर छानच. नसला पहिला तर अवश्य पहा.

जाता जाता.. या चित्रपटात जया भादुरी आहे. या चित्रपटात राजेश खन्नाला कोणतीही हीरोइन नाही. (आनंद प्रमाणे याही चित्रपटात सुपरस्टार राजेश खन्नाला हीरोइन नाही) जया भादुरीने राजेश खन्नाच्या मानलेल्या बहिणीची भूमिका केली आहे. खूप सुंदर,अल्लड जया या चित्रपटात मला पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

...सतीश मोरे सतिताभ
    ०८.०९.२०२२
    वेळ रात्री साडे बारा.

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...