फॉलोअर

help me लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
help me लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१९ ऑक्टोबर २०२१

भुकण्यांचा अर्थ "हेल्प प्लिज आणि थँक यू" असाही असतो !


तिच्या भुकण्यांचा अर्थ "हेल्प प्लिज आणि थँक यू"

रक्षा विसर्जन विधीसाठी करवडी गावी जाण्यासाठी पियुष आणि मी सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर पडलो. नित्यनियमाप्रमाणे कराड स्मशानभुमी लगत असणाऱ्या चढाजवळील गवळवेस गणपतीच्या दर्शनासाठी थांबलो. गणेश दर्शन घेतल्याशिवाय ऑफिसला जायचे नाही असा माझा गेल्या अनेक महिन्यापासूनचा नित्यनेम आहे. गणेशभक्ती आणि अनुभवाबाबत मी नंतर बोलेन मात्र आज घडलेली एक एका कुत्रीची मातृवात्सल्य कहाणी 'आई तुला सलाम' यांची प्रचिती देऊन गेली. कुत्र्याच्या भुंकण्याच्या अर्थ "हेल्प मी किंवा थँक्यू" असेही असू शकतात, हे अनुभवलं.

गवळवेस गणेश मंदिरासमोर गाडी लावून खाली उतरलो. तेवढ्यात काळा आणि लाल रंगाची दोन कुत्री, दोन पिल्ले जोरजोरात भुंकत माझ्याजवळ आली. मला हे अनपेक्षित होतं. कुत्री माझ्याकडे काय कुणाकडेही बघून नेहमीच  भुंकतात यात काही नवीन नव्हते. मात्र आज अखेर कधीही कुत्र्यांनी मला त्रास दिलेला नाही .आज मात्र समोर आलेली ती दोन कुत्री मला पाहून माझ्याकडे नेहमीच्या पद्धतीप्रमाणे भुंकत नव्हती. 

कुत्र्यांशी संवाद साधण्याची माझी जुनी सवय आहे. कुठलेही कुत्रे दिसले तर मी नेहमी त्याच्याशी बोलतो. आपण जसे मित्र भेटल्यानंतर चौकशी करतो तसेच कुठलेही कुत्रे दिसले तर मी त्याला भाऊ, दादा,आप्पा, काका, मामा,नाना,बाबा,आबा,ताई,काकू या नावाने हाक मारतो. माझ्या मुलीला देवयानीला माझी ही सवय माहिती आहे. रस्त्यात कुत्रे दिसली की माझी मुलगी मला चेष्टेने म्हणते, पप्पा तुमचा भाऊ, मामा आला. तिलाही माझ्या या सवयीचे कौतुक वाटते. 

माझ्याकडे बघत भुंकणाऱ्या त्या दोन कुत्र्यांना पाहून नेहमीप्रमाणे, 'काय झाले तुला, ताई ?'असे मी त्याला सहजपणे विचारलं. तीच्या डोळ्यातील भाव मला  जाणवले. तीला कशाची तरी गरज आहे, हे माझ्या लक्षात आलं. तिचे डोळेच मला सर्व काही सांगत होते. प्रत्येक प्राण्याची बोलण्याची भाषा वेगळी असते. कुत्र्याची भाषा भुंकण्यातून असते. पण त्या भुंकण्यामध्ये सुद्धा एक वेगळेपणा असतो. ही कुत्री माझ्याकडे भुंकत आहे, मात्र तीला मदत हवी आहे हे लक्षात आल्यानंतर माझी नजर आजूबाजूला गेली.

स्मशानभूमीच्या कोपऱ्यावर गवळवेस गणपती समोर वीज कंपनीचा डीपी आहे. डीपीला तारेचे कंपाउंड आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लागणारी लाकडे,ओंडके तिथे टाकलेली आहेत. या डीपीच्या लगतच छोटी झाडे, वेली वाढलेली आहेत, तारा पडलेल्या आहेत. या वेलीमध्ये कुत्र्याचे एक पिल्लू अडकले होते,ते मला दिसले.. त्याला बाहेर पडता येत नव्हते. हे पिल्लू व्याकुळतेने ओरडत होते. अडकलेल्या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी आणखीन एक पिल्लू त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. कुत्र्याची दोन्ही पिल्ले मदतीसाठी ओरडत होती,आक्रोश करत होती. काटेरी कंपाऊंड निमुळते असल्यामुळे त्यांची आई त्या कंपाऊंड मधून आत मदतीला जाऊ शकत नव्हती. 

छोट्याशा जागेतून आत जाऊन ही दोन्ही पिल्ले अडकलेली होती.आपल्या पिल्लांना वाचवू शकत नाही, त्यांच्या मदतीला जाऊ शकत नाही याची जाणीव झाल्यामुळे कुत्र्याची आई सैरभर झाली होती. मदतीसाठी ती माता सर्वांना बोलावत होती,भुंकत होती.त्या मदतीसाठी त्या माऊलीने माझ्या सहीत अनेकांना याचना केली होती. याच दरम्यान ही दोन कुत्री रस्त्यावरील इतर लोकांनाही भुंकुन मदत मागत होती. मात्र चावण्यासाठी, हल्ला करण्यासाठी ही कुत्री आपल्याकडे भुंकत आहेत असा समज करून दोन तीन माणसे माझ्या समोरूनच हाड हाड करत तिथून निघून गेली. 

याच दरम्यान नाना खामकर त्याठिकाणी आले. त्यांच्याकडे सुद्धा पाहून ही कुत्री भुंकायला लागली. एका कुत्र्याने नानांची पॅन्ट पकडून फाडली. नानांनी मला विचारल्यानंतर मी सर्व प्रकार सांगितला. तारेच्या कंपाऊंड बाहेरून थोड्या अंतरावरून झाडे-झुडपे हलवण्याचा मी प्रयत्न केला. कुत्र्याचे एक पिल्लू उलटे पडले होते, ते पाहून विजेचा धक्का लागून ते मेले असावं असा मला संशय आला. मात्र त्याचवेळी दुसरे पिल्लू तिथेच जिवंत असल्यामुळे भुंकत असल्यामुळे मी धाडसाने त्या ठिकाणी त्यांना हलवण्याचा प्रयत्न केला. 'उठ बाळा उठ, तुला काही झाले नाही,' असे म्हणत धीर दिला. छोटासा दगड एका बाजूला मारला. हा सर्व प्रकार ती माऊली व्याकुळ होऊन पाहत होती. तारेमध्ये, झुडपांमध्ये अडकलेली कुत्र्याची पिल्ले आता प्रयत्न करू लागली, हातपाय हालवू लागली आणि वेलीतून निसटली, हळूच लंगडत बाहेर आली. प्रेमाने हाक मारल्यानंतर माझ्याजवळ आली, पुढे आईला बिलगली. दोन्ही पिल्लांना पाहून त्या आईच्या डोळ्यातील अश्रू पाहून आमच्याही डोळ्यात पाणी आले. आईने बाळाला घट्ट मिठीत घेतले आणि सुटकेचा निःश्वास टाकला.

जगात आई का श्रेष्ठ आहे आणि आईला महत्व का दिले जाते, हे मी आज डोळ्याने पाहिले होते.आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी रस्त्याकडेला सर्वांना ती बोलवत होती आणि जेव्हा तिची पिल्ले सुखरूप बाहेर पडली तेव्हा त्या आईच्या डोळ्यातून आलेले अश्रू आणि पिल्लांना पाहून झालेला आनंद खरंच जगातील सर्वात सुंदर आनंदाचा क्षण होता. 

मी आज खूप दिवसानंतर मातृत्व पाहिलं, प्रत्यक्ष अनुभवलं. कोण म्हणतं प्राण्यांना प्रेम करता येत नाही? कोण म्हणलं प्राण्यांना बोलता येत नाही? प्राणी खुप काही बोलतात,फक्त ते समजले पाहिजे ! कंपाउंड मधून बाहेर आलेल्या दोन्ही पिल्लांना कुरवाळत त्या आईने पुन्हा एकदा माझ्याकडे पाहून भुंकायला सुरूवात केली. आता मात्र या भुंकण्याचा अर्थ 'थँक यू मोरे माऊली ' असा होता. 

सोबत असलेले नाना खामकर आणि माझा मुलगा पियुष यांनी हा सर्व प्रकार डोळ्यांनी पाहिला. माझे पप्पा रस्त्यावरच्या कुत्र्यांना का घाबरत नाहीत आणि कुत्र्यांशी आपण बोलले पाहिजे असं का म्हणतात, हे त्यांनं आज स्वतः पाहिले आणि मला पप्पा तुम्ही खूप छान काम केलेत असे कौतुकाचे शब्द मला सुखावून गेले. 




सतीश वसंतराव मोरे
सतीताभ
१९.१०.२०२१
कोजागिरी पौर्णिमा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...