फॉलोअर

प्यार झुकता नही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्यार झुकता नही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१८ ऑगस्ट २०२५

ये इंसान क्या है, खुदा के भी आगे प्यार झुकता नही


माझे दक्षिणेतील आवडते निर्माते दिग्दर्शक के. सी. बोकाडिया यांच्या बॅनरखालील 1985 मध्ये रिलीज झालेला 'प्यार झुकता नही' हा चित्रपट मला खूप आवडतो. अमिताभ बच्चन यांच्या नंतर आवडणारा दुसरा सर्वात जवळचा हिरो म्हणजे मिथुन चक्रवती. 1985 साली आम्ही आठवी नववीला असेन. या काळात प्रेमाचं आकर्षण तर होतंच ! मात्र चित्रपटाचं आकर्षण फार होतं. चित्रपटातातील गाणी रेडिओवर किंवा टेप रेकॉर्डर ऐकण्याचा एक वेगळा ऑरा त्या काळात होता.

मला आठवते 'प्यार झुकता नहीं 'हा चित्रपट मी राजमहल थिएटरला पाहिलेला आहे. हा चित्रपट त्याकाळी खूप हिट झालेला होता. या चित्रपटातील 'तुमसे मिलकर ना जाने क्यू' हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. बिनाका गीतमाला मध्ये अनेक आठवडे हे गाणं टॉपला होतं. चित्रपटातील सर्वच गाणी छान होती. शब्बीर कुमार  आणि लता मंगेशकर यांच्या सुंदर आवाजातील ही गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी स्वरबद्ध केली होती. या चित्रपटातील 'तुम्हे अपना साथी बनाने से पहले, मेरी जान मुझको बहुत सोचना है, हे गाणं मला खूप आवडतं. मी या गाण्याविषयीच आज थोडसं बोलणार आहे. 

तपूर्वी या चित्रपटाची स्टोरी तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. गर्भ श्रीमंत कुटुंबातील एक तरुणी आणि सामान्य कुटुंबातील फोटोग्राफर तरूण यांची ही प्रेम कथा ! त्यांच्यातील हे प्रेम सहज फुलत जातं, दोघेही प्रेमात उत्कंठ बुडून जातात. लग्न करायचा निर्णय घेतात. मग ती तरूणी आपल्या वडलांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देते. तिचे वडील त्याला एका पार्टीमध्ये यायचं निमंत्रण द्यायला सांगतात. प्रियकराला एका पार्टीमध्ये येतो. श्रीमंत बाप या छोट्या तरुणाला बाजूला घेऊन जातो आणि त्याची पूर्ण औकात काढतो. पार्टी सुरू झाली असते आणि अपमानित झालेला तो तरुण आपल्या भावना गीतातून व्यक्त करतो. 'तुम्हे अपना साथी बनाने से पहले, मेरी जान मुझको बहुत सोचना है' हे सांगताना गरीब श्रीमंतीतील मोठी दरी आपल्याला एक करू शकत नाही, तुझ्यावर मी आयुष्याची दोरी बांधू शकत नाही असं स्पष्ट सुनावतो. तुझ्याशी लग्न केलं किंवा तुझ्यासोबत लग्न गाठ बांधली तर तुला माझ्यासोबत अनेक संकटाला तोंड द्यावे लागेल, माझ्यासोबत तुला कधी उपाशी राहावं लागेल, जगाचे टोमणे ऐकून घ्यावे लागतील असं व्यक्त होत असताना असताना तो तरुण आपल्या मनातील गरिबीच्या भावना व्यक्त करतो. 

शब्बीर कुमार यांच्या गंभीर आवाजातील हे गाणं मला खूप आवडत होतं, आजही आवडतं. हा तरुण ही भावना व्यक्त केल्यानंतर थांबतो, पार्टीतून जायला लागतो मात्र ती तरुणी त्याला थांबवते. त्यानंतर त्या तरुणीने आपल्या आई-वडिलांसमोर त्या पार्टीमध्ये दिलेलं उत्तर मला त्याहून अधिक आवडतं. लतादीदींनी एका सुरात, एका दमात हे गाणं म्हटलं आहे. एस एच बिहारी यांनी लिहिलेल्या या गीतामध्ये अनेक उर्दू शब्द आहेत, त्याचा अर्थ मला त्यावेळी कळत नव्हता. आता थोडासा अभ्यास करून किंवा माहिती घेऊन माझ्या परीने मी या गाण्याचा अर्थ काढण्याचा मी थोडासा प्रयत्न केला आहे. बघा आपणाला आवडतो का?



मोहब्बत जिन्हें हो गई हो किसी से
मोहब्बत जिन्हें हो गई हो किसी से
मोहब्बत का अंजाम कब सोचते हैं?

ये ऐसा सुहाना सफ़र है कि जिसमें
हज़ारों हैं नकाम कब सोचते हैं
चराग़-ए-वफ़ा अपने हाथों में लेकर
मोहब्बत की राहों में जो चल पड़े हैं

बयाबाँ में होगी कि सहरा में होगी
कहाँ होगी अब शाम कब सोचते हैं
कहाँ होगी अब शाम कब सोचते हैं

मोहब्बत के मारों को अब और, ऐ, दिल
सताएँगी क्या सख़्तियाँ ज़िंदगी की?
जिन्हें थक के नींद आ गई पत्थरों पर
वो दुनिया का आराम कब सोचते हैं?

ये इंसान क्या है, ख़ुदा के भी आगे
कभी प्यार दुनिया में झुकता नहीं है
प्यार झुकता नहीं है

मोहब्बत ही जिनका ख़ुदा बन चुकी हो
किसी और का नाम कब सोचते हैं?

मोहब्बत जिन्हें हो गई हो किसी से
मोहब्बत का अंजाम कब सोचते हैं
मोहब्बत का अंजाम कब सोचते हैं

असे हे गाण्याचे बोल होते. यात खोलवर असा अर्थ आहे.

मोहब्बत जिन्हें हो गई हो किसी से
मोहब्बत का अंजाम कब सोचते हैं…
👉 ज्यांना खरं प्रेम झालं आहे, ते कधीच त्याचा शेवट किंवा परिणाम काय होईल हे विचार करत नाहीत. प्रेम हे सुंदर असतं ही भावना त्यांच्यामध्ये बसलेले असते त्यामुळे मी प्रेम केल्यावर काय होईल याचा ते का बर विचार करतील?


ये ऐसा सुहाना सफ़र है कि जिसमें
हजारों हैं नकाम कब सोचते हैं…
👉 प्रेमाचा प्रवास इतका सुंदर आहे की त्यात किती अडचणी येतात हे प्रेमिक कधी मोजतच नाहीत. या प्रवासात खूप सुंदर आठवणी मिळतात, खूप वेगळा अनुभव मिळतो हा अनुभव इतका सुखद असतो ती त्या अडचणीचा विचार प्रेमिक कधीच करत नाहीत



चराग़-ए-वफ़ा अपने हाथों में लेकर
मोहब्बत की राहों में जो चल पड़े हैं…
👉 ज्यांच्या हृदयात निष्ठेचा दिवा आहे आणि जे प्रेमाच्या मार्गावर निघाले आहेत,ते संकटे वा शेवटाची भीती बाळगत नाहीत. आलेली सगळी संकट त्यांना संधी वाढतात किंवा सोपी वाढतात. प्रेमाच्या या जादुई दिव्याच्या प्रकाशात ते अनेक वादळाला सामोरे जातात,त्यामुळे त्यांना संकटाची भीतीच वाटत नाही.


---

बयाबाँ में होगी कि सहरा में होगी
कहाँ होगी अब शाम कब सोचते हैं…
👉 त्यांच्या प्रेमाचा अंत कुठे होईल – ओसाड वाळवंटात की हिरव्या गालीच्यावर – हे ते कधीच विचार करत नाहीत. त्यांच्या दृष्टीने प्रेम एक सुंदर भावना असते त्या भावनेच्या विश्वात राहून सुखदुःखाची वाट ते सहज चालत राहतात. प्रेमाच्या या धुंद लहरी मध्ये ते चांगल्या वाईटाची पर्वा करत नाहीत.

मोहब्बत के मारों को अब और, ऐ दिल
सताएँगी क्या सख़्तियाँ ज़िंदगी की?
👉 जे आधीच प्रेमाच्या वेदनांनी विद्ध झाले आहेत, त्यांना आयुष्याची इतर अडचणी आणि त्रासाचा काय त्रास होणार? प्रेमात आलेल्या चांगल्या वाईट अनुभवाने ते आता इतके भक्कम झाले आहेत की त्यांना कसलाही त्रास झाला,कसलीही संकट आली तर त्याचं काहीच वाटत नाही.


जिन्हें थक के नींद आ गई पत्थरों पर
वो दुनिया का आराम कब सोचते हैं…
👉 जे थकून दगडांवरही झोपू शकतात, त्यांना जगाच्या सुखसोयींची काय पर्वा ? उन,वारा, वादळ  पाऊस याची त्यांना काही पर्वा नसते. खायला चांगलं अन्न मिळालं किंवा नाही मिळालं,चांगल्या सुविधा नाहीत मिळाल्या याचीही त्यांना पर्वा नसते. निखळ प्रेमाची भावना त्यांना सुखद गारवा देत असते.


ये इंसान क्या है, ख़ुदा के भी आगे
कभी प्यार दुनिया में झुकता नहीं है…
👉 माणूस देवासमोर झुकतो, पण खरे प्रेम कधीही कुणा पुढेही झुकत नाही. प्रेम हेच सर्वोच्च आहे. प्रेम आणि ईश्वर, प्रेम आणि जगाचा निर्माता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देव सुद्धा अनेकदा प्रेमासमोर नतमस्तक झाला आहे, मग जगासमोर हे प्रेमी कसे बरे हार मानतील ? खरं, निखळ प्रेम कधीच धमकी,दबाब,आकर्षण, पैसा ,सत्ता, प्रसिद्धी, बळजबरी किंवा दादागिरी यापुढे झुकलेले नाही, झुकणारही नाही.


---

मोहब्बत ही जिनका ख़ुदा बन चुकी हो
किसी और का नाम कब सोचते हैं…
👉 ज्यांच्यासाठी प्रेमच देव झाले आहे, ते दुसऱ्या कशाचाही विचार करत नाहीत. प्रेमात उत्कंठ बुडालेले आहेत.आता प्रेमालाच भक्ती मानू लागलेले आहेत. भक्ती आणि प्रेमाच्या रसाळ प्रवाहात डुंबून गेले आहेत. प्रेमाशिवाय ते इतर कोणताही  विचार कसा करतील?, प्रेम हेच त्यांच्यासाठी सर्वोच्च आनंद आहे. 


या गाण्यात प्रेमाची ताकद,त्यातील निष्ठा आणि त्याचे वेगळेपण सांगितले आहे. खऱ्या प्रेमिकांना अडचणी, शेवट, जगाच्या सुखसोयी किंवा संकटांची भीती नसते. त्यांच्यासाठी प्रेमंच ईश्वराहून सर्वोच्च असते. एस एच बिहारी यांनी यांनी प्रेमाच्या भावना कुट कुट भरून या गीतामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. हे गाणं अजरामर आहे.


#सतीश मोरे सतिताभ

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...