फॉलोअर

३० मार्च २०२०

रामायण का पाहु या!

नदी आणि साधू एका ठिकाणी राहू शकत नाही, त्यांनी एका ठिकाणी रहायचे नसते.




नदी आणि साधू एका ठिकाणी राहू शकत नाही, त्यांनी एका ठिकाणी रहायचे नसते.वशिष्ठ ऋषींनी अयोध्या नगरीत अजून काही दिवस राहा असा आग्रह विश्वामित्रांना केल्यानंतर विश्वामित्रांनी दिलेलं तर हे वेगळे उत्तर मला रामायण सिरीयल पाहताना ऐकायला मिळालं.

ही मालिका पाहत असताना मला माझी मुलगी देवयानी याने याचा अर्थ विचारला. मी पण तिला याचा अर्थ तुच समजावून सांग,असे देवयानीला सांगितले देवयानीने याचा अर्थ सांगण्याचा थोडा प्रयत्न केला, तो बरोबर होता. मग मी मला उमजलेल्या शब्दात तीला उत्तर दिले.

 नदी जर एका जागेवर थांबली तर नदीत झाडे,झुडपे उगवतील, शेवाळ वाढेल. नदीचे डबके तयार होईल आणि नदीमध्ये दुर्गंधी वाढेल व तिची पवित्रता नष्ट होईल. नदीने सतत वाहिले पाहिजे,वहात राहणे, सतत कार्यरत राहणे हा नदीचा उपजत गुण आहे. काठावरच्या सर्व लोकांना पाणी देऊन त्यांची तहान भागवणे, काठावरच्या जमिनीला पाणी देऊन ती जमीन समृद्ध करणे, लोकांची तहान भागवणे  हा नदीचा गुणधर्म असतो तो गुणधर्म. जर ती एकाच ठिकाणी थांबून राहिली तर तर नदीचे पावित्र्य संपेल, म्हणून नदीने सतत वाहत राहिले पाहिजे.

साधू असो किंवा ज्ञानी मनुष्य असो त्याचेही असेच असते. त्यानेही नदीप्रमाणे एका ठिकाणी थांबता कामा नये. साधू जर एका ठिकाणी राहिला तर तो त्या गावाच्या भागाच्या प्रेमात पडेल. त्याचा मोह वाढेल. एखाद्या गावात मिळत असणार्‍या वस्तू, अन्न,मान सन्मान, कौतुक, प्रतिष्ठा याच्या तो प्रेमात पडेल. असे झाले तर तो संन्यासीपणा सोडून देऊन प्रपंच करणारा मनुष्य होऊन जाईल. त्या गावचा होऊन जाईल. तो त्या गावातच थांबून राहिला  तर त्याला त्याची तपश्चर्या करण्यामध्ये मोहामुळे अडचणी निर्माण होतील. ज्ञानार्जन करणे, ज्ञानप्रसार करणे आणि तपश्चर्या करणे हे साधूचे कर्तव्य असते, त्याने हे काम केले पाहिजे आणि हे करण्यासाठी त्याला सतत नवीन ठिकाणी जावे लागते. त्यामुळे साधूने कधीही एका ठिकाणी राहू नये.

रामायण मालिकेतील एका वाक्यावर आपण जर विचार केला, चिंतन केले तर एका एका वाक्यात खुप अर्थ लपलेले आहेत आणि हे अर्थ आपल्या पिढीला आपल्या मुलांना समजावून सांगण्यासाठी रामायण ही मालिका रोज पाहिली पाहिजे.

 या मालिकेतील प्राचीन काळातील जे शब्द आहे ते शब्द सुद्धा आपल्या मुलांना समजावून सांगितले पाहिजेत, त्याचा अर्थ समजावून सांगितले पाहिजे.

*धन्यवाद भारत सरकार*
आणि *धन्यवाद लाॅकडाऊन*

२६ मार्च २०२०

वेळ मिळाला आहे, कोरोनाने दिला आहे

प्रीतीसंगमावरून


दैनिक *पुढारी*
दिनांक २६ मार्च २०२०

*कुटुंबासाठी वेळ मिळत नव्हता आता मिळाला आहे, घरी बसून हे कराच !*
       

कराड *सतीश मोरे*

कोरोनाची भीती आता वाढू लागली आहे,आणि ही भीती मनात बसणे गरजेचेही आहे. उपचार करून हा आजार बरा करणे इतके सोपे नाही.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यापासून बरा होईपर्यंतच्या प्रक्रिया खूप किचकट आहेत. या काळात कुटुंब, नातेवाईकांपासून दूर राहणे, घरातील कुटुंबातील लोकांना त्रास होणे, कुटुंबातील आणखी काही लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणे, मुला-बाळांना याचा त्रास होणे, गल्लीतील लोकांना त्रास होणे, आपल्या घरातील लोकांना समाजाने वाळीत टाकणे किंवा एकूणच कोरोनामुळे होणार्‍या सामाजिक दुष्परिणामांना सामोरे जाण्याचे बळ, तयारी सामान्य माणसाकडे नाही. म्हणून कोरोनापासून दूर राहणे हा एकमेव पर्याय आज आपल्यासमोर आहे.


काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण राष्ट्राला संबोधित करताना संपूर्ण देशभर लॉकडाऊन जाहीर केले आहे. पंतप्रधानांचा हेतू अतिशय स्वच्छ आणि साफ आहे. कोरोना हे अखिल विश्वावर आलेले फार मोठे संकट आहे. या संकटावर मात करण्यासाठी अवघे जग एकवटले असले तरी आजपर्यंत कोरोनावर उपचारासाठी एखादी लस तयार करण्यात कोणालाही यश आलेले नाही. जगात अनेक लोक या  विषाणूच्या प्रादुर्भावाने आजारी पडले आहेत. काही बरेही झाले आहेत. मात्र सोळा हजारांहून अधिक लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. कोरोना प्रतिबंधक लस जेव्हा येईल तेव्हा येईल, मात्र कोरोनावर आजच्या घडीला नियंत्रण ठेवणे सर्व जगाला जिकिरीचे झाले आहे. प्रगत देशांनासुद्धा या रोगावर नियंत्रण करण्यासाठी तात्काळ उपाय योजना करता आल्या नाहीत. मात्र सुदैवाने भारतात हा विषाणू जरा उशिरा पोहोचल्यामुळे भारताला या लढ्याला तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे.

 गेल्या पंधरा दिवसांत महाराष्ट्र व निवडक काही राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मात्र आता संपूर्ण देशभर बहुतांश राज्यांमध्ये कोरोनाचे बाधित रुग्ण आढळले आहेत. हा आकडा आता 600 च्या पुढे गेला आहे. कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी एकमेकांपासून दूर राहणे हा एकमेव आणि रामबाण उपाय असल्यामुळे पंतप्रधानांनी देश  बंद ठेवण्याचा निर्णय केला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जनसंपर्क कमी करणे हा सर्वोत्तम उपाय आहे आणि त्याचमुळे आपण घरात बसून राहणे हा सर्वात मोठा पर्याय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पंतप्रधान म्हणून नव्हे तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून तुम्हाला साद घालत  हृदयस्पर्शी आवाहन केले. जीव वाचवणे ही आज सर्वात मोठी प्राथमिकता आहे.

 भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये कोरोना महाराक्षसाने जर विळखा घातला तर देशाची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात कमी होईल, अनेक लोक मरण पावतील. या रोगातून जे काही वाचतील त्यांच्या हातात जाणारा देश पुन्हा मुळ पदावर आणण्यासाठी पुढची एकवीस वर्षे लागतील, अशी विद्वानांनी व्यक्त केलेली भीती आणि सुचवलेल्या उपायांचा  विचार करून नरेंद्र मोदी यांनी घरात बसूनच देशसेवा करावी असे केलेले आवाहन योग्य आहे.
अनेकांना असा प्रश्न पडला असेल घरात बसून काय करायचे? घरात बसून जर आपला जीव वाचत असेल, आपल्या कुटुंबाचे रोगापासून संरक्षण होत असेल तर आपण घरात बसणे हेच योग्य आहे.

नुकताच अभिनेत्री काजोल यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये ती म्हणते, ‘आपण आपले आई-वडील, पती-पत्नी किंवा मुलांना नेहमी म्हणत असतो की, ‘माझ्याकडे वेळ नाही. मला नोकरी आहे, मला उद्योग आहे, पैसे कमवून मुलांना चांगले शिक्षण घ्यायचे आहे, त्यामुळे माझ्याकडे वेळ नाही. माझ्याकडे वेळ असता तर मी निवांत तुम्हाला घेऊन फिरायला गेलो असतो, तुम्हाला वेळ दिला असता’ अशी भावना आपल्यापैकी अनेक जण आपल्या कुटुंबाकडे व्यक्त करत असतो. मात्र आज तुमच्याकडे वेळच वेळ आहे. पुढचे एकवीस दिवस तुम्हाला तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी खूप वेळ आहे. एकवीस दिवस तुम्ही तुमच्या आई-वडीलांसोबत लहानपणी अनेक गोष्टी शेअर करत होता, त्या गोष्टी शेअर करू शकता. तुम्ही तुमच्या मुलांसोबत गप्पा मारू शकता, खेळ खेळू शकता. पूर्वी अनेक घरांमध्ये एकत्र जेवायला बसण्याची पद्धत होती ती पद्धत गेले काही दिवस बंद पडली होती. आता संपूर्ण कुटुंब एकाच वेळेला घरात जेवायला बसू शकते.

आपण आपल्या कुटुंबाला अनेक नवीन गोष्टी,अनुभव सांगू शकता. तुमची मुले पुढील वर्गात जाणार आहेत, त्या वर्गातील अभ्यासक्रम शिकवू शकता. आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या  विषयात पारंगत असतो. लहानपणी आपण ज्या विषयात पारंगत होतात त्या विषयाचे ज्ञान आपण आपल्या मुलांना देऊ शकता. आपल्या कुटुंबियांना जर अशा परिस्थितीत वेळ दिला तर कुटुंबासोबतचे तुमचे बंध अजून घट्ट होणार आहेत.

एकवीस दिवस कसे जाणार? असा प्रश्न अनेकांना पडला असेल मात्र 21 दिवसात रोज काय करायचे याचे नियोजन, वेळापत्रक तुम्ही स्वतःहून कुटुंबियांना विश्वासात घेऊन तयार करा. पुढचे 21 दिवसात प्रत्येक दिवशी कोणता बैठा खेळ खेळायचा, काय वेगळा उपक्रम राबवायचा याचं वेळापत्रक करा. भगवद्गगीता रामायण, ज्ञानेश्वरी, कुराण यासारखे धार्मिक ग्रंथ आपल्या घरामध्ये आहेत. अनेक वर्षे हे ग्रंथ देवघरात बाजूला पडले असतील. पूर्वी मंदिरामध्ये किंवा घराघरांमध्ये ज्ञानेश्वरीच्या अध्यायातील एक पान रोज वाचण्याची पद्धत होती. ही पद्धत आपण पुन्हा सुरू करू शकतो. धार्मिक कार्यक्रम किंवा धार्मिक पुस्तकांत अलीकडच्या मुलांना फार रस नसतो. मात्र ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भगवद्गीता किंवा कुराण हे ग्रंथ काय आहेत हे सांगण्याची आणि त्यातील ओव्या वाचण्याची, पसायदानाचा अर्थ समजून सांगण्याची हीच वेळ आहे.

जगासाठी ज्ञानेश्वरांनी मागितलेले पसायदान आपण जर आपल्या मुलांना शिकवले, तर एक वेगळी ऊर्जा घरांमध्ये निर्माण होऊन आपला दिवस सकारात्मकरीत्या सुरू होऊ शकतो.

 जुन्या काळातील ययाती, मृत्युंजय, छावा यांसारखे ग्रंथ आपल्या घरामध्ये असतील. त्या पुस्तकातील रोज चार पानांचे सामूहिक वाचन आपल्या घरात मुलांकडून झाले तर त्यांना सुद्धा वाचनाची आवड निर्माण होऊ शकते. जर आपल्या घरात ही पुस्तके नसतील तर ऑनलाइन, फेसबुक, व्हाट्सअ‍ॅपवर ही सर्व पुस्तके उपलब्ध आहेत.  शंकर पाटील, द. मा. मिरासदार, व. पु. काळे यांच्या कथाकथनाचे वेड एकेकाळी आपल्याला लागले होते. त्या गोष्टी आज ऑनलाईन उपलब्ध आहेत. ब्लुटूथ स्पिकर लाऊन घरात बसून या गोष्टी ऐका. बाबासाहेब पुरंदरे यांचे पोवाडेही मुलांना ऐकवा.


आजचा दिवस कसा गेला, आज दिवसभरात मी काय केले याची डायरी मुलांना लिहायला सांगा, आपण स्वतः लिहा. ‘कोरोना लढाईचे ते एकवीस दिवस’ हा एक वेगळा अनुभव तुमच्या घराघरात डायरीच्या रूपातून जतन करता येऊ शकेल. पुढील काळात जेव्हा आपण या लढ्यावर विजय मिळवू, पुन्हा एकवटू.. उभे राहू तेव्हा आपल्या या आठवणी एकमेकांना शेअर करू. आम्ही काय वेगळं केलं? हे आपण जगाला सांगू शकू.

सद्यस्थितीत घरात बसणे हा एकमेव पर्याय असल्यामुळे घरात बसूनच आपण निरोगी राहू शकतो. घरात बसूनच आपण जिवंत राहू शकतो, याचे भान राखा. असे कोणतेही जगातले काम नाही की जे काम आपल्या जिवापेक्षा मोठे आहे. बाहेर जाऊन चौका-चौकात टवाळक्या करण्यापेक्षा आपल्या घरात निवांत गप्पा मारा. मुलांसोबत वेळ घालवा. हे एकवीस दिवस असेच जाणार आहेत. 21 दिवसांत भारत फार मोठी क्रांती करणार आहे. कोरोना विषाणू विरोधातील लढ्यात आपण विजयी होणार आहोत. आपल्या इमारतीमधील, आपल्या गल्लीतील लोकांना कमी-जास्त काय लागले तर त्यांना मदत करूया. घरात बसूनच देशप्रेम वाढवूया. चला आपण कोरोनाला हरवूया.


✒️ *सतीश वसंतराव मोरे*
      *पत्रकार दैनिक पुढारी

२५ मार्च २०२०

कोरोनो आलाय नाक्यावर

*प्रीतीसंगमावरून*

दैनिक *पुढारी*
दिनांक २५ मार्च २०२०

*कोरोनो आलाय नाक्यावर!*



       

कराड *सतीश मोरे*

कोरोना आमचं काही वाकडं करु शकत नाही.. भारतात कडक उन आहे. कोरोनाचा विषाणू इथं जगूच शकत नाही.. असे खूप महामारीचे रोग आम्ही भारतात पाहिले आहेत. कोरोना दिल्लीत आहे... मुंबईत आहे, पुण्यात आहे. आमच्या जिल्ह्यात.. आमच्या गावात येऊ शकत नाही, असे म्हणत कोरोनावर जोक करुन *बेपर्वाईने वागणार्‍या सातारकरांनो... कराडकरांनो कोरोना आता आपल्या जिल्ह्याच्या वेशीवर येऊन थांबला आहे नव्हे सातारा जिल्ह्यात सुद्धा आला आहे.*


कराडच्या कोल्हापूर नाक्यापासून केवळ 20 किलोमीटरवर असलेल्या वाळवा तालुक्यात येऊन थांबला आहे. होय... कोरोना आता आपल्या घराजवळ येऊन थांबला आहे. *आता काळजी करायची नाही तर काळजी घ्यायची वेळ आली आहे.*


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 15 दिवसांपासून राज्य आणि केंद्र सरकारने उचललेल्या पावलांमुळे भारतात कोरोना कमी वेगाने पसरत असला तरी लवकरच तिसरी स्टेज आली तर कोणीच त्याला रोखू शकणार नाही. मात्र *राज्य आणि केंद्र सरकारच्या आवाहनाला हरताळ फासून आम्ही लोक कोरोनावर जोक करत बसलो आहोत. कोरोनामुळे आपलं काही बिघडणार नाही या अविर्भावात आम्ही बिनधास्तपणे चौका-चौकांत गर्दी करुन थापा ठोकत आहे. व्हिडीओ तयार करीत आहेत. हा शुद्ध मुर्खपणा आहे.*


*चीन, इटली, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका यांसारख्या प्रगत देशांनासुद्धा कोरोनावर उपचार करुन प्रतिबंध करता आला नाही. इथे भारतासारख्या 130 कोटी लोकसंख्या असणार्‍या देशाला कसे बरे जमेल?* तरीही खबरदारी घेण्याचे काम सरकारने केले आहे. अनेक उपाययोजना लागू केल्या आहेत.

*आजपर्यंत कधीही घेतले नाहीत असे देशव्यापी बंदचे.. लॉकडाऊन किंवा जनता कर्फ्यूसारखे निर्णय सरकारने घेतलेले आहेत. हे निर्णय सरकारला काही तरी करुन दाखवायचे आहे म्हणून घेतले नसून भारत देशाला कोरोनाच्या महासंकटापासून वाचविण्यासाठी घेतले आहेत*. तरीही काही लोक याला वेगळाच रंग देऊन आम्हाला याच्याशीकाही देणं-घेणं नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत.


गेल्या दोन आठवड्यांपासून पुण्या-मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांचे आकडे वाचन करत कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी आदी विषयांवर भरपूर प्रबोधन झाले आहे. हात-पाय धुतल्याशिवाय घरात प्रवेश दिला जात नव्हता, या भारतीय संस्कृतीचा कित्ता आता अनेकजण गिरवू लागले आहेत. मात्र केवळ हात-पाय धुवून किंवा मास्क तोंडाला लावून कोरोना थांबणार नाही. हे लोकांना अजूनही पटत नव्हते. कारण सातारा जिल्ह्यात किंवा कराड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. *मात्र काल सोमवारी कराडच्या शिवेपासून काही अंतरावर असलेल्या वाळवा तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर सातारा जिल्ह्यातही गेल्या चोवीस तासांत दोन रुग्ण आढळले आहेत.*

आता धोका वाढला आहे. कराडपासून जवळ असणार्‍या वाळवा तालुक्यातून कराड शहरात फार मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित काही रुग्ण वाळवा तालुक्यातून कराड तालुक्यात आलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
*कराड तालुक्यातही पुणे-मुुंबईसह परदेशातून आलेले अनेक रुग्ण  क्वारंटाईनमध्ये आहेत. तालुकानिहाय किंवा गावनिहाय आकडेवारी जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केली नसती तरी प्रगत कराड तालुक्यात अनेक लोक परदेशवारी करुन आलेले आहेत. ते तालुक्यातील वेगवेगळ्या गावांत स्थानबद्ध आहेत. त्यांच्यावर प्रशासनाचे लक्ष आहे.*


कमी मनुष्यबळ असूनही महसूल, पोलिस, आरोग्य यंत्रणा कोरोनाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. मात्र वेेंंधळी जनता अजूनही या संकटाबाबत अजूनही तितकी सिरीयस झालेली दिसत नाही. संचारबंदीचा अर्थही लोकांना समजत नाही. विशेषतः कराड शहरातील जनता कोरोनाबाबत काळजी घेताना दिसत नाही. याउलट *जनता कर्फ्यूनंतर सलग दोन दिवस कराड व पाटण तालुक्यातील अनेक गावांनी आजही स्वयंस्फूर्तीने गावांतील व्यवहार बंद ठेवून स्वतःला घरामध्ये, गावामध्ये कोंडून घेतले आहे. मात्र शहरातील लोकांना असे काय काम येऊन पडले आहे? ज्यामुळे त्यांना रोज बाहेर पडावे लागत आहे*.

शहरातील सर्व उद्योगधंदे, दुकाने, हॉटेल बंद आहेत. तरीही चौका-चौकात उडाणटप्पू युवक गर्दी करत आहेत. किराणा मालाच्या दुकानात तंबाखुच्या पुडीसाठी गर्दी करत आहेत. कोरोनामुळे होणारा मृत्यू यापेक्षा तंबाखू खायला मिळाली नाही तर माझे कसे होणार? या विवंचनेत शहराजत काही ठिकाणी मागच्या दाराने पान, तंबाखू, गुटखा विक्री सुरु आहे. हे निश्चितच संतापजनक आहे. *शहराच्या तुलनेत गावाकडचे लोक शहाणे म्हणण्याची वेळ आता आली आहे.*


 राज्यभर कोरोनाला तोंड देण्यासाठी 144 कलम लागू केले आहे. मात्र रस्त्यावर, चौकात काही काम नसताना होणारी गर्दी, क्रिकेटचा डाव हे पाहिले तर शिक्षणाचा आणि अक्कलेचा काहीही संबंध नाही असेच म्हणावे लागेल. इटली, स्पेन,इंग्लंडमधून महाराष्ट्रातील अनेक नोकरदारांनी आपले अनुभव फेसबुकवर शेअर केले आहेत. आम्ही आतापर्यंत जिवंत राहिलो ते केवळ घरात थांबल्यामुळेच.. असे ते जीव तोडून सांगत आहेत. मात्र तरीही लोक हे मनावर घेत नाहीत. *जर तुम्ही घरात बसला तर कोरोना कधीही तुमच्या मागे येणार नाही हे त्रिवार सत्य आहे*. मात्र उंडारकी करण्यासाठी बाहेर पडलात आणि एखाद्या ठिकाणी कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या, वस्तुच्या सानिध्यात आला तर कोरोना तुमच्या शरीरात नक्की प्रवेश करणार आहे. हे समजून घेण्याची गरज आहे.

*कोरोनाचा विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर हळू-हळू श्वसननलिका आणि फुफ्फुसावर हल्ला करतो आणि त्यामुळे उपचारासाठी रुग्णाला व्हेंटिलेटरवरती ठेवले जाते. आज रोजी सातारा जिल्ह्यात 125 च्या घरात व्हेंटीलेटर आहेत. कोरोनाने सातारा जिल्ह्यात पाय पसरले तर हे व्हेंटीलेटर कोणाला पुरणार आहेत.याचा जिल्हावासियांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.*

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन जीव तोडून काम करीत आहे. आम्हीही माणसे आहोत, आम्हालाही कोरोना होऊ शकतो.. याची शक्यता असूनही पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील कराडमध्ये उपअधिक्षक सूरज गुरव, पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्यासह पोलिस यंत्रणा काम करीत आहे. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना जनतेच्या सहकार्याची गरज आहे.

*कोरोना सातारा, कराडच्या नाक्यावर येऊन थांबला आहे. घरात बसून राहणे आणि कोरोनाला रोखणे हे देशभक्तीचे कार्य आहे. कधी नव्हे ते घरात बसून देशसेवा करण्याची संधी आम्हाला आली आहे*. त्यामुळे आता स्वतः जगण्यासाठी...कुटुंबाला जगविण्यासाठी... राज्याला आणि देशाला वाचविण्यासाठी घरात बसणे हा एकमेव पर्याय राहिला आहे. असे आणि असेच केले तरच आपण वाचू शकणार आहोत.

*‘गो.. कोरोना गो..’ असे म्हणून कोरोना जाणार नाही. मात्र आपण घराबाहेर न पडल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन कोरोना नक्कीच जाणार आहे*. नाक्यावर आलेल्या कोरोनाला आपल्या गावात, शहरात प्रवेश करु न देण्यासाठी
चला.. आजपासून प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करुया..
घरात बसुया.. मुला-बाळांना वेळ देऊया...!

✒️ *सतीश वसंतराव मोरे*
      *पत्रकार दैनिक पुढारी*




१० मार्च २०२०

मनप्रित

मनप्रित

तु माझ्या ह्रदयातला, 
दुमडलेला कोपरा ‌ !

तु माझ्या भावनांतील, 
जादुई सप्तरंग !

तु माझ्या डोळ्यातील,
लुकलुकणारे बुबुळ !

तु माझ्या शब्दातील,
बहरणारी प्रतिभा !

तु माझ्या शरीरातील,
सळसळत्या धमण्या !

तु माझ्या तनामनातील,
उसळतं स्फु्ल्लिंग !

तु माझ्या शब्दातील,
भावरुपी खजिना !

तु माझ्या कल्पनेतील,
मनप्रित सखी !

सती

०८ मार्च २०२०

शांताई माझं शक्तिपीठ



माझी आई जिच्याविषयी मी काय लिहावे  याचा मी खूप दिवसांपासून विचार करतोय. आज महिला दिनाच्या निमित्ताने हा प्रयत्न.

माझ्या आई इतके या जगात कोणी सोशीक सहनशील आणि ग्रेट महिला असेल असे मला वाटत नाही.  आई हे जरी नाव डोळ्यापुढे घेतलं तर अनेक अडचणी सामोरं जायचं प्रेरणा मिळते. माझ्यासाठी सर्व काय केलं माझ्या शांताईने. 

माझ्या आईचं नाव शांताबाई. ती नावाप्रमाणेच खूप शांत आहे. माझी आई चिडलेली मी कधी पाहिली नाही. तिने जे सहन केले ती सहनशीलता तिला कुठून मिळाली हेच मला कळत नाही. माझ्या आई विषयी काही बोलताना डोळे भरून येतात. दोन दिवसांपासून विचार करतोय आईविषयी काही तरी लिहावं. पण मी लिहू शकतो नाही. मन घट्ट करुन लिहायचा प्रयत्न करतोय.

जेव्हा एखादी स्त्री सर्व दुखाना संकटाला सामोरे जाते तेव्हा ती किती मोठी होते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी आहे.



माझी आई, तिच्याविषयी मी काय बोलायचं !

जेव्हा मला थोडंसं कळायला लागलो होतो, तेव्हापासून मी माझ्या आईला काम करताना, शेतातून उसाच्या काचोळ्याचं ओझं आणताना, शेतात काम करताना पाहिलं होतं. माझ्या आईला हे काम का करायला लागते, असा प्रश्न मला नेहमी पडत असे. पण ती कुटुंब व्यवस्था होती, त्या व्यवस्थेमध्ये कामाची विभागणी होती. पुढे जसा मोठा होत गेलो तसतसे मला माझ्या आईचा समर्पित स्वभाव  अनुभवायला आला. कसलीही अडचण असो किंवा कोणीही काही बोलले तरी माझी आई कधी कुणाला वाकडं बोलली नाही, घरातला व्यक्ती असो वा बाहेरचा. माझ्या आईला कोणीही कसेही बोलले तरी आणि ते सहज सरळ घेत होती.



कधी अपमानाची वागणूक मिळाली तरी ती अपमान सहन करत राहिली.मात्र काही प्रसंगात अपमान होत असताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव मी टिपले होते. आपल्या कुटुंबासाठी आपल्या नवऱ्यासाठी आणि आपल्या मुलासाठी तिने अनेकदा अपमान सहन केलेला मी पाहिलेला आहे.


आमचं घर रस्ता कडेलाच आहे. जेव्हा 85 च्या दरम्यान आम्ही गावातल्या वाड्यातून स्टॅण्ड जवळील घरात राहायला आलो. ओगले काच कारखाना बंद पडल्यामुळे दादांची नोकरी बंद झाली होती, त्यामुळे आम्ही तेथे दुकान सुरू केले होते. दुकानाच्या निमित्ताने किंवा आमच्या वडिलांच्या सामाजिक स्वभावामुळे रोज घरात अनेक माणसे येत असत.गावातला कोणी आमच्या घरी आला तर आई त्याची प्रेमाने चौकशी करायची, आजही करते. दारात आलेल्या माणसाला चहा न पिता परत पाठवायचं नाही हा आमच्या वडिलांचा नियम होता. तो नियम आई तंतोतंत पाळते,आजही ते काम सुरू आहे.


1990 च्या दरम्यान माझे वडील तळेगाव दाभाडे येथे शिफ्ट झाले. दोन मुलींच्या लग्नानंतर झालेला कर्जाचा वाढता डोंगर कमी करण्यासाठी वडिलांनी तळेगाव येथे काम हाती घेतले होते. नंतर यांच्यापाठोपाठ माझा थोरला भाऊ म्हणजे अण्णा तोही तळेगावला गेला, त्यापाठोपाठ वहिनी पुण्याला गेल्या. त्यामुळे करवडीच्या घरात मी आणि आई आम्ही दोघेच राहिलो होतो. तेव्हा माझं कॉलेज सुरू होतं. कॉलेजच्या अभ्यास करत करत करवडी येथील एक छोटेसे दुकान मी आणि आई चालवत असे.



करवडी गावांमध्ये रॉकेलची एजन्सी त्यावेळी आमच्याकडे होती. प्रत्येक महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात रेशनिंगचे रॉकेल द्यायला एक टँकर गावात येत असे. तो टॅंकर आल्यानंतर माझी आणि आईची खूप तारांबळ होत असे. दादा आणि आण्णा पुण्याला असल्यामुळे रॉकेलचे दुकान चालवायचे जबाबदारी माझ्यावर आणि आईवर येऊन पडली होती. रॉकेलचा टँकर गावांमध्ये आला की ते राकेल खाली उतरून घेण्यासाठी गडबड व्हायची. रॉकेलचे मोठे बॅरेल ढकलत रस्त्याला आणायचे परत ते भरून नंतर ढकलून आत घरात न्यायचे. यासाठी मी आणि आई दोघेच काम करत.रॉकेल आल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ग्राहकांची रॉकेल न्यायला आमच्या दारात गर्दी होत होती. सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळात मी आणि आई हा रॉकेल विक्रीचा व्यवसाय करत होतो. माझ्या आईला लिहिता-वाचता येत नाही. ती शाळा शिकलेली नाही. त्यामुळे रॉकेलच्या पावत्या करणे, रेशनकार्डवर नोंदी करणे, वहीमध्ये ग्राहकांच्या सह्या घेणे आदी कामे मी छोट्या टेबलावर बसून करत असे. त्याच वेळेला शेजारी आई रॉकेल ग्राहकांच्या डब्यांमध्ये भरून देत असे. त्यावेळी पाच लिटर आणि एक लिटर चा माप असायचं हे मापटं राकल भरायचे आणि नरसाळ्यातून  ग्राहकांच्या डब्यात ओतायचे अशी पद्धत असे.



रॉकेल विक्री करत असताना संपूर्ण हाताला रॉकेलचा वास येत असे. संपूर्ण शरीर पांढरे पडत असे. मात्र माझी आई हे काम अतिशय तत्परतेने आणि हिरीरीने करत असे. मला हे काम करताना नेहमी वाटायचे हे दुकान बंद करावे आणि माझ्या आईला सुख द्यावे.पण हळूहळू परिस्थिती बदलत होती.


या अगोदर सांगितल्याप्रमाणे माझी आई जराही शिकलेली नव्हती. पण  तिच्या ह्या अशिक्षितपणाचा अनेकांनी फायदा घेतला, ते अनुभव सांगून मला कुणाला दूखावायचे नाही.  पण माझ्या आईने कधीही कुणाला फसवले नाही. शालेय शिक्षण जरी घेतले नसले तरी माझ्या आईचे व्यवहार चातुर्य खूप आहे. कोणतेही काम करायला ती कधीही मागेपुढे पहात नाही. हातात आलेले कोणतेही काम पूर्ण करण्यामध्ये माझा आईचा हात कोणी धरू शकत नाही.


आईने मला सुरुवातीपासूनच नेहमी स्वावलंबनाचे धडे दिले. काम करणे गरजेचे आहे तु काम करत जा,शाळा शिकून मोठा हो .तुझ्याकडे आता शाळा शिकण्याचे काम आहे , तू चांगला अभ्यास कर मोठा हो, असं मला नेहमी सांगत असे. जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा  रोज सकाळी उठून स्वयंपाक करून माझ्यासाठी डबा करून द्यायची. कॉलेज वरून आल्यानंतर संध्याकाळी परत दुकान काम करत आई बरोबर माझा दिवस कसा जात असे मला कळत नसे.


माझे मित्र कधीही माझ्या घरी येत  तेव्हा आई त्यांचं अतिशय प्रेमाने स्वागत करते. दिवाळीच्या काळात एक पद्धत होती. माझा वाढदिवस भाऊबीजेचा, दिवाळीला भाऊबीजेला सर्व मित्रांना घरी बोलवायचं आणि फराळ द्यायचा ही आईची पद्धत. आईने माझ्या मित्रांना नेहमी प्रेमाची वागणूक दिली. माझा मित्र श्रीधर असो किंवा बापू, भिकाजी भोसले, हनुमंत काशीद या सर्वांना आईने आपल्या घरचा सदस्य मानले. जेव्हा हे मित्र माझ्या घरी येत तेव्हा माझ्या आई जवळ बसत आणि आई कडून काही खायला मागत असत. माझे मित्र माझ्या आईची चेष्टा करत पण आईला त्याचा खुप आनंद वाटत असे. माझ्या मुलाचे मित्र आल्यानंतर त्यांना खाऊ द्यायलाच पाहिजे अशी आईची धारणा होती.


आमचं एकत्र कुटुंब. आमच्या आजीला सारं गाव थोरली आई म्हणायचे, कारण आमच्या मोरे वाड्यात आज्जी थोरली. माझी आई पण थोरलीच. मी माझ्या  चुलतीला आक्का आणि माय म्हणतो. आई शब्द घेताना पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी आईला कायम शांताई नावाने हाक मारत असे. आईला आईच्या नावाने बोलवणारा कदाचित मी पहिला मुलगा असेन. घरात आल्यानंतर आई कुठे आहे म्हणलं की प्रश्न यायचा कुठली आई  थोरली आई कि माझी आई.  आक्का मला विचारत असे कुठली आई. थोरली आई कि शांताई .


माझी शांताई खूप शांत, तिच्या शांतते मुळेच घरामध्ये नेहमी शांतता असायची. सहन करण्यामध्ये तिचा हात कोण करील असं मला वाटत नाही .सहनशक्ती चे दुसरे नाव माझी आई म्हटलं तर काय वावगं नाही. तिने माझ्यावर जे संस्कार केले त्या संस्कारामुळे कधीही माझ्या तोंडातून कुणाच्याही आईविषयी अपशब्द गेला नाही. माझ्या आईने कधीही कुणाला शिव्या दिल्या, त्यांच्या नावाचे वाटोळं करून हाक मारलेली  मी कधी ऐकलेली नाही. माझ्या वडिलांच्या बाबतीत पण मी ते सांगेन. माझ्या वडिलांनी सुद्धा कधीही कुणाला आई-वडिलांच्या नावाने शिवी दिलेलं किंवा रागावलं आहे असे मी कधीच पाहिले नाही. 


आई माझ्या आसपासच्या सर्व घरातील लोकांना खूप आवडते. आमच्या शेजारचे सर्व लोक नेहमी आईकडे येऊन बसतात. माझी आई सर्वांची अतिशय प्रेमाने चौकशी करते. माझ्या आईला कोणी फसवले तर त्यांना कधीही समाधान मिळाले नाही. मला जेव्हा माझ्या आईची आठवण येते तेव्हा मी करवडीला जाऊन येतो. असे वाटते की माझी आई कराडला माझ्या पाशी असावी. पण शहरामधील फ्लॅट संस्कृती व कोंदट वातावरण तिला कधीच आवडले नाही. तिला मी कराडला येऊन राहण्याचा आग्रह केला पण जास्तीत जास्त एक दिवस ती कराडात माझ्या फ्लॅटमध्ये राहते. आईची पूर्णवेळ सोबत मिळण्यामध्ये माझे भाऊ अण्णा नशिबी आहे असं मला म्हणावे लागेल.


आईला जेव्हा माझी आठवण येते तेव्हा ती घरात जर कोण असेल तर आजही कुणाच्या घरात जाते आणि आमच्या सतीश ला फोन लावा म्हणून सांगते. संजय कुंभार किंवा पेंटर  कुंभार मामा यांच्या फोनवरून मला आजही आई फोन करते आणि काही मागत नाही, सतीश का आला नाहीस ,कधी येणार आहेस एवढंच  विचारते.  माझी आई माझ्यासाठी शक्तिपीठ आहे ते कायमच राहिल. अजून काय लिहायचं माझ्या शांताई विषयी !



०४ मार्च २०२०

बायको पुढे काय बोलायचं?



बायको जेंव्हा बोलत असते,
तेव्हा मी का बरं बोलायचं ?

बायको जेंव्हा सांगत असते,
तेव्हा मी का बरं काय सांगायचं ?

बायको जेंव्हा समजावत असते
तेव्हा मी का बरं काय समजावयाचं ?

बायको जेंव्हा रागावत असते,
तेव्हा मी का बरं काय रागवायचं?

बायको जेंव्हा रुसलेली असते,
तेव्हा मी का बरं काय रुसायचं?

बायको जेंव्हा काही मागत असते
तेव्हा मी का बरं काय मागायचं ?

बायको जेंव्हा व्यक्त होत असते,
तेव्हा मी काय बरं व्यक्त व्हायचं ?

बायको जेंव्हा ... करत  असते
तेव्हा मी का बरं...काय करायचं ?


04.03.2020

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...