फॉलोअर

३१ ऑगस्ट २०२६

वारीची ओढ... आणि बाजीराव विहीर येथील अविस्मरणीय गोल रिंगण

वारीची ओढ... आणि बाजीराव विहीर येथील अविस्मरणीय गोल रिंगण


– सतीश मोरे

सन २०१४ मध्ये प्रथमच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा योग आला आणि तेव्हापासून पंढरीच्या वारीची लागलेली ओढ आजही तितकीच कायम आहे. २०१४ नंतर सलग आठ वर्षे आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी करण्याचे भाग्य लाभले. कोरोनाकाळात प्रत्यक्ष वारी शक्य नव्हती. त्या काळात कराड परिसरात आम्ही स्वतंत्र "निसर्ग वारी" काढली, तर दुसऱ्या वर्षी "व्हर्च्युअल वारी"चा अनोखा उपक्रम राबविला. त्यानंतरही वारीला जाता आले नाही, तरी माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला किंवा शेवटच्या टप्प्यात बंडीशेगाव, वाखरी आणि पंढरपूर येथे जाऊन माऊलींचे दर्शन घेण्याचा प्रयत्न सातत्याने केला.


यंदा अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे आळंदीला जाणे शक्य झाले नाही. आळंदीतील वारकरी मित्रांनीही परिस्थिती गंभीर असल्याने येऊ नकोस, असा सल्ला दिला. त्यामुळे यंदा थेट वाखरी येथे माऊलींच्या दर्शनाचा संकल्प केला.

माऊलींचा पालखी सोहळा सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण, बरड, माळशिरस, वेळापूर असा प्रवास करत भंडीशेगाव येथे मुक्कामी आला होता. दुसऱ्या दिवशी वाखरीकडे प्रस्थान होणार असल्याने मी आणि माझे पाहुणे माझे मार्गदर्शक सुभाष होसले सावकार व त्यांच्या मंडळीसमवेत सकाळी नऊ वाजता पंढरपूरकडे निघालो.


महुदपर्यंत प्रवास सुरळीत झाला. मात्र पुढे लहान  पालख्यांची आणि वाहनांची गर्दी वाढू लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. जवळपास दीड तास ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास पंढरपूरला पोहोचलो. खोडशीकर मठात सामान ठेवून वाहन पार्क केले आणि रिक्षाने वाखरीकडे प्रयाण केले.


वाखरीत पाऊल ठेवताच वातावरण भक्तिमय झाले होते. "संत ज्ञानेश्वर महाराज की जय", "संत तुकाराम महाराज की जय", "माऊली... माऊली..." या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता. हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने चालत होते. दुपारचे ऊन असले तरी भक्तांच्या उत्साहावर त्याचा किंचितही परिणाम नव्हता.


वाखरीपासून पुढे बाजीराव विहीर येथे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील सर्वात मोठे आणि भव्य गोल रिंगण होणार होते. त्यामुळे आम्ही उलट्या दिशेने चालत त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. कराड नाका, सातारा फाटा ओलांडत पुढे जात असताना रस्त्यांवर वारकऱ्यांची अखंड मानवसाखळी दिसत होती. सर्वत्र वाहतूक कोंडी होती; मात्र कोणाच्याही चेहऱ्यावर नाराजी नव्हती. प्रत्येकाच्या ओठांवर नाम आणि मनात माऊली होती.


बाजीराव विहीर परिसरात पोहोचलो तेव्हा जणू भक्तीचा महासागरच लोटला होता. पुणे–सोलापूर महामार्गावर वारकऱ्यांसाठी आणि वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. पुलावर, रस्त्याच्या दुतर्फा आणि विशाल मैदानात लाखो भाविकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्या, पालख्या आणि वारकऱ्यांनी संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता.


याच ठिकाणी एक अनपेक्षित आनंदाचा क्षण अनुभवायला मिळाला. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण सुरू होणार होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वारकरी उभे राहिले होते. महिलांच्या फुगड्या, टाळ-मृदंगाचा निनाद आणि "माऊली... माऊली..."चा अखंड जयघोष वातावरण भारावून टाकत होता. पोलिस कर्मचारीही या भक्तिमय वातावरणात रममाण झाले होते.क्षणभरात उभे रिंगण सुरू झाले. माऊलींचे अश्व वेगाने पुढे धावले आणि उपस्थित लाखो वारकऱ्यांनी एकाच स्वरात "माऊली... माऊली..."चा गजर केला. तो क्षण शब्दांत मांडणे अशक्य आहे.


त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील सर्वात भव्य गोल रिंगणाची तयारी सुरू झाली. पालखी मैदानात आणण्यात आली. रथातून माऊलींच्या पादुका अत्यंत भक्तिभावाने खाली उतरविण्यात आल्या. नाचत-गात, टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी रिंगणाच्या मध्यभागी विराजमान झाली. "संत ज्ञानेश्वर महाराज की जय", "संत तुकाराम महाराज की जय" या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.


आणि मग टाळकऱ्यांनी गोल रिंगणाभोवती फेर धरला. 


माऊली धावा... माऊली धावा...! आणि भक्तीच्या महासागरात हरवलेला क्षण


"धावा... धावा... धावा..." या आरोळ्यांनी संपूर्ण बाजीराव भीर परिसर दणाणून गेला. हजारो टाळकरी एकाच लयीत गोल रिंगणाभोवती धावत होते. टाळांचा निनाद, मृदंगाचा गजर, वीणेचे सूर आणि लाखो कंठातून उमटणारा "माऊली... माऊली..."चा अखंड जयघोष वातावरणाला एका वेगळ्याच आध्यात्मिक उंचीवर घेऊन गेला.


रिंगणाच्या मध्यभागी माऊलींच्या पादुका विराजमान होत्या. प्रत्येक वारकऱ्याच्या नजरेत भक्तिभाव, चेहऱ्यावर आनंद आणि मनात माऊलींच्या चरणी पोहोचल्याचे समाधान दिसत होते. या क्षणी जात, धर्म, श्रीमंती, गरिबी, पद-प्रतिष्ठा यांचा लवलेशही नव्हता. लाखो लोक असूनही सर्वत्र शिस्त, संयम आणि एकमेकांबद्दलचा आदर अनुभवायला मिळत होता.


क्षणात चोपदारांनी संकेत दिला आणि माऊलींचे अश्व रिंगणात उतरले. काही क्षणांतच ते भरधाव वेगाने रिंगण पूर्ण करू लागले. अश्वांच्या टापांचा आवाज आणि त्याचवेळी उसळलेला "ज्ञानोबा-तुकोबा"चा जयघोष अंगावर अक्षरशः रोमांच उभे करणारा होता. वारकरी नम्रपणे मस्तक झुकवून त्या पवित्र क्षणाचा आशीर्वाद घेत होते.


रिंगण पूर्ण झाल्यानंतर अनेक वारकरी त्या पवित्र मातीचा स्पर्श करून कपाळी लावत होते. काही जण ती माती ओंजळीत भरून जपून ठेवत होते. त्यांच्यासाठी ती साधी माती नव्हती; ती माऊलींच्या चरणस्पर्शाने पावन झालेली प्रसादरूपी धूळ होती.


मीही काही क्षण स्तब्ध उभा राहिलो. अनेक वर्षे वारी केली, असंख्य सोहळे पाहिले; पण प्रत्येक वेळी हा अनुभव नवा वाटतो. रिंगणातील भक्ती, वारकऱ्यांची शिस्त, निःस्वार्थ सेवा आणि माऊलींवरील अपार श्रद्धा मनाला पुन्हा पुन्हा पंढरीकडे खेचत राहते.


यंदा संपूर्ण वारी करता आली नाही, याची खंत मनात होती. मात्र वाखरी बाजीराव विहीर येथे अनुभवलेले हे अविस्मरणीय क्षण त्या खंतीवर फुंकर घालणारे ठरले. माऊलींच्या दर्शनाने मन तृप्त झाले आणि पुन्हा एकदा जाणवले—वारी ही केवळ पायी चालण्याची यात्रा नाही; ती मन शुद्ध करणारी, माणसाला माणसाशी जोडणारी आणि भक्ती, समता, सेवा व प्रेम यांचे जीवनमूल्य शिकवणारी जीवनशाळा आहे.


भव्य गोल रिंगणाचा सोहळा अनुभवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. पुढचा टप्पा होता वाखरी येथील पालखी तळ. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक पालख्या वाखरीत मुक्कामी येतात. मात्र प्रमुख आठ-दहा पालख्यांना पालखी तळावर मानाचे स्थान असते.


रात्री साडेआठच्या सुमारास आम्ही पालखी तळावर पोहोचलो. आमचे लक्ष्य होते कराडकरांच्या बारा नंबर दिंडीचा तंबू. पालखीसमोरच पाण्याच्या टाकीजवळ या दिंडीचा मुक्काम असतो. अनेक तंबूंच्या गर्दीतही आपल्या दिंडीचा तंबू क्षणात सापडला आणि मन भरून आले.


गेल्या अनेक वर्षांपासून वारीत सोबत असलेले माझे सहकारी तेथे भेटले. रणजित नाना पाटील,खरात माऊली, सावकार माऊली, बाजीराव माऊली आणि इतर अनेक वारकरी मित्रांना भेटलो. एकमेकांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. अनेक वर्षांच्या आठवणींना उजाळा मिळाला. क्षणभर तंबूत निवांत बसलो आणि दिवसभराचा सर्व शीण कुठल्या कुठे पळून गेला.


दिवसभरात जवळपास नऊ किलोमीटर चालल्यामुळे पाय दुखत होते, अंग थकले होते. पण मित्रांच्या सहवासात, माऊलीच्या दिंडीत बसल्यानंतर शरीराचा थकवा आणि मनाचा कंटाळा क्षणात नाहीसा झाला. हीच तर वारीची खरी ताकद आहे.


दरम्यान, माऊलींचा पालखी सोहळा वाखरीतील पालखी तळावर दाखल झाला. सायंआरतीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. आरतीनंतर बारा नंबर दिंडीतील टाळकरी आणि वारकरी परतले आणि रात्री दहाच्या सुमारास भव्य पंगत बसली.


वारकऱ्यांसोबत एका पंगतीत बसून प्रसादाचे भोजन करण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. सर्वांना वाढप सुरू होईपर्यंत "श्रीराम जय राम जय जय राम" या मंत्राचा अखंड जप सुरू होता. सर्वांना भोजन वाढून झाल्यानंतर "बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम!" असा जयघोष झाला आणि मग प्रसाद ग्रहण करण्यास सुरुवात झाली.


त्या साध्या पण प्रेमाने वाढलेल्या भोजनात समाधानाचा अमृतरस होता. तिथे श्रीमंत-गरीब असा भेद नव्हता; सर्वजण माऊलीची लेकरं म्हणून एका पंगतीत बसले होते. हीच वारीची समतेची शिकवण आहे.


रात्री जवळपास बारा वाजता सर्व वारकरी मित्रांचा निरोप घेऊन आम्ही पंढरपूरकडे निघालो. दिवसभराचा प्रवास, गोल रिंगणाचा अलौकिक अनुभव, वारकरी मित्रांची भेट, दिंडीतील मुक्काम आणि पंगतीतील प्रसाद… या प्रत्येक क्षणाने मन समृद्ध केलं.


"ज्ञानोबा... तुकाराम...! माऊली... माऊली...!"


माऊली सतीश वसंतराव मोरे 

९८८११९१३०२

पियुषच्या स्वप्नासाठी



*पियुषच्या स्वप्नासाठी… आणि माझ्या जगण्याच्या गणितासाठी*

पियुषला न्यूझीलंडला उच्च शिक्षणासाठी पाठवण्याचं जेव्हा अंतिम ठरलं, तेव्हा सर्वात मोठा प्रश्न होता तो आर्थिक नियोजनाचा.

जुलै २०२५ची ही गोष्ट. न्यूझीलंडमधील उच्च शिक्षणाची फी साधारण २१ लाख रुपये होती. त्याशिवाय एका वर्षाच्या राहण्याच्या खर्चासाठी सुमारे १० लाख रुपये अॅडव्हान्स स्वरूपात द्यावे लागणार होते. इतर आवश्यक खर्च धरला तर हा आकडा ३२-३३ लाखांवर आणि पुढे जवळपास ३५ लाखांपर्यंत जाणार होता.

एवढी मोठी रक्कम हाताशी असणं शक्यच नव्हतं. त्यामुळे बँकेच्या कर्जाचा पर्याय निवडला. सुरुवातीला बँक ऑफ इंडिया आणि त्यानंतर युनियन बँकेचा विचार केला. मात्र पूर्वीच्या एका कर्जाच्या OTS मुळे माझ्या CIBIL रेकॉर्डवर परिणाम झाला होता. कर्ज शेतीचं किंवा तुलनेने छोटं असलं तरी त्या तांत्रिक कारणामुळे युनियन बँकेकडून कर्ज मिळू शकलं नाही.

शेवटी माझ्या जवळची आणि जिथे माझा पगार जमा होतो, त्या सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेचा विचार केला. माझं पूर्वीचं सुमारे नऊ लाखांचं कार कर्ज आणि माझं उत्पन्न यांचा विचार करून बँकेने १५ लाख रुपये कर्ज देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी घर तारण ठेवावं लागलं.

१५ लाख रुपये खात्यावर जमा झाले. न्यूझीलंडमधील प्रवेश प्रक्रिया पुढे असल्यामुळे ते काही काळ सारस्वत बँकेतच ठेवले. नंतरच्या प्रक्रियेनुसार ते IDBI बँकेत ठेवण्यात आले.

याच काळात जमीन विक्रीतून आणि इतर सर्व खर्च, कर्जे, मुलाच्या शिक्षणाचा खर्च, कार्यक्रम आणि देणी वजा केल्यानंतर माझ्याकडे सुमारे १० लाख रुपये शिल्लक होते. तेही FDमध्ये ठेवले होते.

१५ लाख बँकेचे आणि १० लाख स्वतःचे—असे २५ लाख रुपये उभे राहिले.

पण अजून सहा लाख रुपये कमी पडत होते.

PFचा विचार केला. LICमधील काही गुंतवणूक काढण्याचाही विचार केला. पण त्यातून सहा लाख रुपये उभे राहणं शक्य नव्हतं.

शेवटी माझे थोरले बंधू हनुमंतराव—आमचे अण्णा—यांच्याकडे सहा लाख रुपयांची मागणी केली. त्यांच्याकडेही आमच्या सामायिक जमिनीच्या विक्रीतून आलेली काही रक्कम शिल्लक होती. त्यांनी कोणताही विलंब न करता मला सहा लाख रुपये दिले.

अशा प्रकारे ३१ लाखांची व्यवस्था झाली.

तो फेब्रुवारी २०२६चा काळ होता. पियुषच्या व्हिसाची प्रक्रिया सुरू झाली होती. पैसे न्यूझीलंडला पाठवले गेले आणि पियुष मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाणार हे निश्चित झालं.

तिकीट आणि इतर सुरुवातीच्या खर्चासाठी अजून दोन-तीन लाख रुपयांची गरज होती. माझ्या छोट्या बचतीतून काही रक्कम उभी केली आणि माझ्या एका जवळच्या राजकीय मित्राने, राजकीय सल्लागाराने, मला दोन लाख रुपये आणून दिले.

अशा प्रकारे जवळपास ३३-३४ लाखांची व्यवस्था झाली.

आणि अखेर ८ मार्च २०२६ रोजी पियुष न्यूझीलंडला रवाना झाला.

एका वडिलांनी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी केलेल्या धडपडीचा तो एक सुंदर टप्पा होता.

पियुष तिथे शिक्षण घेत असतानाच काम करेल, स्वतःला हळूहळू स्थिर करेल आणि त्यातून काही पैसे वाचवून मला पाठवेल, असा एक साधा ठोकताळा मनात होता. त्या पैशातून कर्जाचे हप्ते फेडता येतील, असा विश्वास होता.

पण आयुष्याचं गणित कागदावरच्या गणितासारखं नसतं.

पियुषला तिथे स्वतःला स्थिर करण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त संघर्ष करावा लागत आहे. शिक्षण घेतानाच त्याला कष्टाची छोटी-मोठी कामं करावी लागत आहेत. नंतर त्याची नियोजित पत्नी पूनम हिलाही डिपेंडंट व्हिसावर न्यूझीलंडला पाठवण्याचा निर्णय झाला. तीही तिथे गेली आणि आता दोघेही तिथे आपापल्या पद्धतीने संघर्ष करत, हळूहळू स्थिर होण्याचा प्रयत्न करत आहेत.

माझ्या मनात मात्र भारतात एक वेगळंच गणित सुरू आहे.

सारस्वत बँकेकडून घेतलेल्या १५ लाख रुपयांच्या कर्जाचा महिन्याला सुमारे २५ हजार रुपयांचा हप्ता आहे. त्याचबरोबर कार कर्जाचा १५ हजार रुपयांचा हप्ता.

म्हणजे दर महिन्याला ४० हजार रुपये केवळ कर्जाच्या हप्त्यांमध्ये जातात.

माझा पगार सुमारे ५० हजार रुपये.

म्हणजे पगारातील जवळपास सगळे पैसे कर्ज फेडण्यात जातात.

पण जगण्यासाठी घरभाडं आहे, घरखर्च आहे, इतर वैयक्तिक खर्च आहेत. माझा साधारण मासिक खर्च ७० हजार रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे दर महिन्याला किमान २०-२५ हजार रुपयांची अतिरिक्त व्यवस्था करावी लागते.

गेल्या वर्षभरात काही चांगल्या गोष्टी घडल्या, काही माध्यमांतून दर महिन्याला दहा-पंधरा, कधी वीस हजार रुपयांची अतिरिक्त व्यवस्था होत गेली आणि हप्ते वेळेवर भरत राहिलो.

पण आता पुढचं नवीन गणित समोर उभं आहे.

पुढच्या महिन्यात माझी मुलगी लॉमध्ये प्रवेश घेणार आहे. तिची फी फार मोठी नसली तरी तिला पुण्यात ठेवायचं म्हणजे दर महिन्याला आणखी दहा ते पंधरा हजार रुपयांचा खर्च वाढणार आहे.

म्हणजे माझा एकूण मासिक खर्च आता साधारण ७५ ते ८० हजार रुपयांपर्यंत जाणार आहे.

आणि नियमित उत्पन्न?

सुमारे ५० हजार.

त्यातच अण्णांकडून घेतलेले सहा लाख रुपये अजून परत करता आलेले नाहीत. त्यांना त्यांच्या पैशाचा तोटा होऊ नये म्हणून सहा टक्के व्याजाने दर महिन्याला तीन हजार रुपये देतो.

गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांच्याकडून पैसे घेतले. या सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण होईल. त्या एका वर्षाचे ३६ हजार रुपये व्याज त्यांना दिले आहे.

पण मूळ सहा लाखांचा प्रश्न अजूनही डोक्यावर आहे.

आणि म्हणूनच आता मी वाड्यातील माझी पावणे दोन एकर जमीन विकण्याचा निर्णय घेतला आहे.

जमीन विक्रीतून पैसे मिळाले की सर्वप्रथम अण्णांचे सहा लाख रुपये परत करायचे. कारण कोणाचेही पैसे असोत—बँकेचे, मित्रांचे, नातेवाईकांचे किंवा कोणत्याही संस्थेचे—घेतलेले पैसे शेवटी परत करावेच लागतात.

कर्जाचा बोजा कमी करायचा आहे.

मनावरचं ओझं कमी करायचं आहे.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही परिस्थिती कायमची नाही, यावर माझा विश्वास आहे.

माझ्याभोवती काही माणसं आहेत. काही मित्र आहेत. काही जोडलेली नाती आहेत. अजून हा सगळा आर्थिक संघर्ष मी प्रत्येकासमोर मांडलेला नाही. पण सरिता रासो आणि माझे आणखी दोन जवळचे मित्र यांना मी हा विषय सांगितला आहे. त्यांचं सहकार्य आहे.

आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांचा मानसिक पाठिंबा आहे.

कधी कधी पैशांपेक्षा हा मानसिक आधारच जास्त महत्त्वाचा असतो.

एखादा माणूस अडचणीत असताना त्याच्या पाठीवर हात ठेवून, “काळजी करू नकोस, आपण यातून बाहेर पडू,” एवढं सांगणारं कुणीतरी असणं फार मोठी गोष्ट असते.

माझ्याकडे ती माणसं आहेत.

म्हणूनच मला विश्वास आहे की पुढचे काही महिने कठीण असतील, पण तेही निघून जातील.

पियुषला तिथे स्थिर व्हायला वेळ लागेल. तो शिक्षण पूर्ण करेल, चांगली नोकरी मिळवेल आणि एक दिवस महिन्याला ५०-६० हजार किंवा त्याहून अधिक रक्कम मला पाठवू शकेल, अशी आशा आहे.

आज सारस्वत बँकेचं १५ लाखांचं कर्ज वर्षभराच्या हप्त्यांनंतर सुमारे १३ लाखांवर आलं आहे.

म्हणजे थोडी का होईना, पण प्रगती झाली आहे.

आता माझ्यासमोरचं नवीन लक्ष्य आहे—

पुढील सहा महिने ते एक वर्ष दर महिन्याला किमान ३०-३५ हजार रुपये अतिरिक्त कमवायचे.

त्यासाठी जे करावं लागेल ते करायचं.

मेहनत करायची.

नवीन मार्ग शोधायचे.

पडायचं नाही.

थांबायचं नाही.

कारण ही केवळ माझी आर्थिक लढाई नाही. ही माझ्या मुलांच्या भविष्यासाठीची लढाई आहे.

पियुषच्या न्यूझीलंडच्या स्वप्नासाठी मी जे केलं, ते करताना किती आर्थिक गणितं मांडली, किती लोकांकडे मदत मागितली, किती कर्ज घेतलं, किती चिंता केल्या—हे कदाचित आज माझ्या मुलांना पूर्णपणे माहिती नसेल.

पण त्यांना हे माहिती असावं, एवढाच या सगळ्या लिखाणामागचा उद्देश आहे.

आई-वडील मुलांसाठी किती काही करतात, याची जाणीव मुलांना कधीतरी व्हावी.

आणि काही माणसांना हेही कळावं की बाहेरून एखादं आयुष्य व्यवस्थित दिसत असलं, तरी आतमध्ये प्रत्येक माणूस आपापली काही ना काही लढाई लढत असतो.

मीही लढतोय.

कधी पैशांशी.

कधी परिस्थितीशी.

कधी स्वतःच्या मनाशी.

पण हार मानलेली नाही.

कारण मनात एक ठाम विश्वास आहे—

काहीतरी मार्ग नक्की निघेल.

माणसं सोबत उभी राहतील.

देवाची साथ राहील.

आणि आजचं हे आर्थिक ओझं उद्या कमी होईल.

एक दिवस पियुष स्वतःच्या पायावर उभा राहील. कर्जाचे हप्ते कमी होतील. अण्णांचे पैसे पूर्ण परत होतील. मुलीचं शिक्षणही व्यवस्थित होईल.

आणि मागे वळून पाहताना कदाचित आपणच स्वतःला म्हणू—

“त्या काळात परिस्थिती कठीण होती; पण आपण टिकून राहिलो… आणि शेवटी जिंकलो.”

रामकृष्ण हरी.

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...