फॉलोअर

२९ जुलै २०२१

लय भारी कारभारी



बाळासाहेब पाटील आज नामदार आहेत. कराडसह सातारा जिल्ह्याची शान आहेत.  ते आमदार नव्हते, तेव्हापासूनचा त्यांचा माझा परिचय आहे. या व्यक्तीमध्ये एवढी सहनशीलता आणि ताकद कुठून येते ? हेच खरं कळत नाही. स्व. यशवंतराव चव्हाण, ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांचे विचार जोपासत नामदार बाळासाहेब पाटील हे जिल्ह्याचा कारभार पहात असून त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्याचा ते नेहमीच प्रयत्न करतातच. मात्र ते करतानाच ‘साहेबां’च्या नावाला कुठेही डाग लागता कामा नये, यासाठी सहकारमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्यासह त्यांचे सर्व कुटूंबियांकडून नेहमीच काटेकोरपणे योग्य ती दक्षता घेतली जाते.


1997 साली करवडी येथे माझ्या लग्नाला आलेले बाळासाहेब पाटील मला आठवतात. सफारी घालून आलेले बाळासाहेब पाटील तेव्हा सह्याद्रि कारखान्याचे नुकतेच चेअरमन झाले होते. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने मुलांना बाहेर काढण्याचे कौशल्य किंवा दूरद़ृष्टी फक्त पी. डी. पाटील साहेब यांच्याकडेच असावी. 1996 साली सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेण्यापूर्वी साहेबांनी आपल्या सर्व मुलांना योग्य जागी संधी दिली आणि त्यांच्या सर्व मुलानींही अतिशय योग्य पद्धतीने कार्यभार सांभाळत सर्वच पातळीवर साहेबांची उंची वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.


बाळासाहेब पाटील यांच्याकडे पी. डी. पाटील साहेब यांनी सर्वात मोठी जबाबदारी का दिली?  याचा जेव्हा माझ्यासह सर्वजण विचार करतात, तेव्हा उत्तर येते त्यांच्यामध्ये असणारा संयम आणि सहनशीलता. बाळासाहेबांमध्ये असणारे गुणही त्यांनी परखले असतील. पी. डी. पाटील साहेब यांचे सर्व सुपूत्र त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रयत्न करत असतात. मुलांना योग्य जबाबदारी योग्य दिल्यामुळेच सहकारी संस्था, शिक्षण संस्था, शेती, बँक, समाजकारण, कराड नगरपालिका, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासह कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकारणणात पी. डी. पाटील साहेब यांच्या नावाचा अजूनही दबदबा कायम आहे.

सह्याद्री साखर कारखान्याची जबाबदारी बाळासाहेब पाटील यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी गेल्या 25 वर्षात सह्याद्रि कारखान्याला एका उच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे. स्व. पी. डी. पाटील यांनी स्थापन केलेला कारखाना योग्य नियोजन, अभ्यास, काटकसर या त्रिसूत्रीवर नामदार बाळासाहेब पाटील हे पुढे नेत आहेत. राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि नव महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या कल्पनेतून साकार झालेला हा कारखाना फक्त सभासदांचा आहे, याचे भान ठेवूनच या संचालक मंडळाचा कारभार चालतो. या कारखान्यात संचालकांना भत्ता किंवा गाडी देण्याची, संचालक मंडळाच्या घरच्या कार्यक्रमाला कारखान्याची यंत्रणा देण्याची पद्धत नाही.

गेल्या 25 वर्षापासून नामदार बाळासाहेब पाटील या कारखान्याचे चेअरमन आहेत. ही वास्तू सभासदांची आहे. या कारखान्याची स्थापना झाल्यानंतर पी. डी. पाटील साहेबांनी हा कारखाना मुलाप्रमाणे जपला आहे, याचे भान ठेवून काम करणारा नामदार बाळासाहेब पाटील यांच्यासारखा चेअरमन सभासदांनी  अनेकदा अनुभवला आहे. नामदार बाळासाहेब कोणत्याही दौर्‍यावरून परत येत असताना रात्रीच्या दोन वाजले तरी ते कारखान्यांमध्ये जातात. कधी कराडमध्ये लवकर पोहोचले किंवा नियोजित कार्यक्रम रद्द झाला, तर अचानकपणे कितीही वाजता कारखान्यात जातात. वेगवेगळ्या युनिटला भेट देतात. कुठे कचरा पडला आहे का? कुठे एखादे मशीन बंद आहे का? एखाद्या युनिटमध्ये कोणतीही अडचण निर्माण झाली आहे का ? कामगारांच्या काही अडचणी आहेत का? याची माहिती घेतात. कारखान्यातल्या प्रत्येक विभागाची मशिनरीची त्यांना इतंभूत माहिती आहे. अगदी छोट्या मोठ्या मशिनरींची किंमत सुद्धा माहिती आहे. एखाद्या मशीनमध्ये वेगळा आवाज येत असला तरी ओळखतात, तिथे उपस्थित तंत्रज्ञाला सांगतात. उसाचे टिपरे जरी खाली पडलेले असले किंवा कुठे साखर खाली पडत असली, तर उपस्थित लोकांना नजरेखाली आणून देतात.
सह्याद्री कारखान्याचा वार्षिक सर्वसाधारण सभा पॅटर्न राज्यभर आदर्श का  मानला जातो ? याचे कारण म्हणजे इथे सभासदांना बोलू दिले जाते, कुणावरही अन्याय केला जात नाही. कारखान्याच्या सभांमध्ये विरोधकांना बोलण्यासाठी खाली स्वतंत्र माईक ठेवण्याची सह्याद्रीमध्ये अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. ज्याला बोलायचे आहे, त्यांनी त्या माईक जवळ बसायचे, त्यांचे प्रश्न मांडायचे आणि संचालक मंडळाने त्याची उत्तरे द्यायची अशी एक पद्धत आहे. मी स्वतः सह्याद्री कारखानाचा सभासद असून पत्रकार म्हणून अनेक वार्षिक सभांना उपस्थित राहिलो आहे. मागील वीस वर्षात सभेच्या वेळी तात्विक मुद्यावर जोरदार विरोध करणारे विरोधक नामदार बाळासाहेबांच्या कार्यपद्धतीमुळे बाळासाहेबांच्या जवळचे झालेले आहेत. या लोकांना किंवा लोकांचा विरोध नामदार बाळासाहेबांनी मोडून काढला नाही, तर या विरोधकांचे म्हणणे विचारात घेतले. त्यांच्यामध्ये जे चांगले आहे, त्याचे अनुकरण करत कारखान्याच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचा जरूर प्रयत्न केला आहे. कारखान्याच्या हितासाठी जे करता येईल, ते करत असतात. म्हणून विरोधक सुद्धा नामदार बाळासाहेब पाटील यांच्या जवळचे होतात.

यापूर्वीच्या 11 पंचवार्षिक निवडणुकांपैकी तब्बल 8 निवडणुका बिनविरोध अथवा अशंतः बिनविरोध झाल्या आहेत. प्रति हंगाम 1 हजार 500 कोटीची उलाढाल असणारा हा सहकारी कारखाना बिनविरोध होतो, हीच चेअरमन म्हणून नामदार बाळासाहेब पाटील यांच्या कामाची पोहचपावती आहे.

नामदार बाळासाहेब पाटील 1999 साली पहिल्यांदा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. तेव्हापासून त्यांचा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधील जनसंपर्क सतत वाढतच गेला. 1999 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यांच्यासमोर आनंदराव पाटील यांचे काँग्रेस पक्षामधून आव्हान होते. त्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांचा नावाचा दबदबा शहर आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये असल्यामुळे बाळासाहेबांना ही निवडणूक सोपी होती. त्यानंतर सन 2004 साली विरोधक कराड शहरातील अरुण जाधव हे विरोधात निवडणूक लढवत होते. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात पी. डी. पाटील साहेबांचा मतदारसंघातील जनसंपर्क आणि त्यांच्या सर्व कुटुंबीयांनी केलेला जोरदार प्रयत्न यामुळे बाळासाहेब पाटील हे विजयी झाले होते.

त्यानंतर 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नामदार बाळासाहेब पाटील यांना पक्षाने डावलून अतुल भोसले यांना तिकिट दिले होते. अशा वेळी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन बाळासाहेब पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले आणि जनतेने त्यांना विक्रमी 41 हजारांच्या मताधिक्याने विजयी केले होते. नामदार बाळासाहेब पाटील यांचा लोकसंपर्क, मतदारसंघाचा चौफेर विकास यावर या विजयामुळे मोहोर उठली होती. त्यानंतर नामदार बाळासाहेब पाटील यांनी अधिक गतीने मतदारसंघाचा विकास केला आहे.
परिणामी 2014 साली नामदार बाळासाहेब पाटील, धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे अशी तिरंगी निवडणूक झाली होती. या निवडणुकीतही नामदार बाळासाहेब पाटील यांनीच बाजी मारली. दोन वर्षांपूर्वी 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांनी त्याच दोन्ही विरोधकांना 40 हजारांहून अधिक मताधिक्याने पाणी पाजून ते सलग पाचव्यांदा विजयी होऊन विधानसभेत गेले. बाळासाहेब पाटील यांचा पाच विधानसभा निवडणुकीतील कामाचा आणि विजयाचा चढता क्रम पाहिला, तर याचे श्रेय त्यांच्यामधील अभ्यासू नेतृत्वाला आणि गावागावातील जनसंपर्काला जाते. 

जुना उत्तर मतदारसंघ असो वा नवीन असो, या सर्व गावात सह्याद्री कारखान्याचे फार मोठे नेटवर्क आहे. पैशाने किंवा जेवणावळीने नव्हे तर विकासकामांच्या आणि नियोजनाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याची त्यांची खास पद्धत आहे. पक्षातील अनेकांना त्यांची काम करण्याची पद्धत आवडत नाही किंवा त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे आश्चर्य वाटते. सर्वसामान्य हिताला प्राधान्य देत मतदारसंघाचा कायापालट करत नामदार बाळासाहेब पाटील यांनी एक वेगळा पॅटर्न तयार करणार्‍या नामदार बाळासाहेबांना त्यांच्या सहकारातील आणि विशेषतः साखर कारखान्यातील मोठ्या अभ्यासाचे फळ म्हणून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी थेट कॅबिनेट मंत्रिपदी काम करण्याची संधी दिली. मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही, असं म्हणतात. मात्र त्याला नामदार बाळासाहेबासारखा एखादा अपवादही असतो. पी. डी. पाटील यांचे कार्य आभाळाएवढे आहे, यात वादच नाही. त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची कधी संधी मिळाली नाही. कराडचे नगराध्यक्ष म्हणून पी. डी. पाटील यांची कारकीर्द विश्वविक्रमी आहे. मात्र पी. डी. पाटील यांचे मन कराड शहर आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाशिवाय अन्य कुठे रमले नाही. मात्र त्यांच्या पुढे एक पाऊल जाऊन चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असणार्‍या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेब पाटील यांनी दबदबा निर्माण केला आहे. कारखाना उच्च पातळीवर नेऊन ठेवला असून राज्यात सर्वाधिक ऊस दर सभासदांना दिला. विधानसभेत सलग पाचव्यांदा जाऊन मंत्रीपदी निवड झाली. आज ते संपूर्ण जिल्ह्याचा, राज्याचा कारभार पहात आहेत. ‘बाप से बेटा सवाई’ हे राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी करून दाखवले आहे.

मंत्रीपदी निवड झाल्यानंतर नामदार बाळासाहेबांनी आपल्या कामाची पद्धत व सवय बदललेली नाही. ‘काम जास्त अन् बोलणे कमी’ या उक्तीप्रमाणे सह्याद्रि कारखान्यात निर्माण केलेला पॅटर्न त्यांनी सातारा जिल्ह्यात सुरू केला आहे. त्यामुळेच कोरोनामुळे निर्माण झालेली अतिशय भयावह परिस्थिती, त्यानंतर या परिस्थितीला तोंड देण्यासाठी नामदार बाळासाहेब यांच्या संयमी नेतृत्वाचा नक्कीच जिल्ह्याला फायदा झाला आहे. योग्य नियोजनामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणाबरोबरच दोन ते तीन वेळा आलेल्या पूरपरिस्थितीला नामदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने चांगली पद्धतीने तोंड दिले आहे.

बाळासाहेब पाटील यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांना जिल्ह्यात एक वेगळा आदर मिळतो. कॅबिनेट मंत्री असूनही गाजावाजा न करणारा केवळ निवडक लोकांना आणि प्रशासनाला घेऊन आंबेघर सारख्या दुर्गम गावाला प्रतिकूल परिस्थितीतही भेट दिली. अगोदरच गावागावची नाडी ओळखणारा, सर्वसामान्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा मंत्री म्हणून त्यांची ओळख होती आणि आता ती अधिक घट्ट झाली आहे. खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा जिल्हा हा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यात नामदार बाळासाहेब पाटील यांना पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पक्षातील ज्येष्ठ, समवयस्क तसेच युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मागील दीड वर्ष पक्ष वाढीसोबत पक्षीय, राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वसामान्यांसह जिल्ह्याच्या हिताला नामदार बाळासाहेब पाटील यांनी प्राधान्य दिले आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट ओढवले. त्या अगोदर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. पक्ष वाढीबरोबरच विकासकामांवर भर देऊन आपले स्थान मजबूत केले आहे. मंत्रिमंडळात बाळासाहेब पाटील यांच्याकडे अतिशय आदराने पाहिले जाते. त्यांच्याकडे पक्षाने सहकार खात्यातील खात्याची जबाबदारी देताना हे खात्याचा कारभार पारदर्शकपणे होईल, याची खात्री असल्यामुळेच ही जबाबदारी दिली होती. गेल्या दीड वर्षात सहकार खात्यातील अनेक बदल, हे याचेच द्योतक आहे. स्व. यशवंतराव चव्हाण आणि स्व. पी. डी. पाटील यांचे विचार व आदर्शानुसार मार्गाक्रमण करणार्‍या नामदार बाळासाहेब पाटील यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर आजवर जिल्ह्याला सदैव पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे.

कोणत्याही संकटाला खंबीरपणे तोंड देण्याचा नामदार बाळासाहेब पाटील यांचा गुण अनेकांनी पाहिला आहे. मात्र हळवे नामदार बाळासाहेब खूप कमी जणांनी अनुभवले आहेत. वैयक्तिक किंवा घरगुती कोणत्याही संकटाला कणखरपणे तोंड देणारे बाळासाहेब पाटील, पी. डी. पाटील यांच्यानंतर त्यांच्या घराचे नेतृत्व करणारे बाळासाहेब पाटील, कुटूंब प्रमुख म्हणून घरातील सर्वांना विचारात घेऊन त्यांच्यावर हृदयापासून प्रेम करणार्‍या बाळासाहेब पाटील यांना मी पाहिले आहे. माझ्या भाऊजींमुळे त्यांच्या कुटुंबाशी निर्माण झालेल्या जवळच्या संबंधांमुळे बाळासाहेबांचा त्यांच्या कुटुंबातील सदस्यासोबत असणारा स्नेह मला जवळून अनुभवता आला आहे.

काटेकोरपणा आणि अचूकता बाळासाहेबांनी पी. डी. पाटील यांच्याकडून घेतलेला आहे. त्यांचे अनेक उदाहरणे देता येतील. दोन दिवसापूर्वी कोयनानगर येथे पत्रकारपरिषदेवेळी नामदार बाळासाहेब पाटील यांच्याशी माझी भेट झाली. पत्रकार हॉलमध्ये कोपर्‍यावर एका खुर्चीवर बसलो होतो, त्या खुर्चीच्या खाली असणारे पायदानी खुर्चीखाली अडकली होती. नामदार बाळासाहेब पाटील यांचा या हॉलमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांनी हात खांद्यावर ठेवून सतीश जरा उठा, असे सांगितले. मला वाटले माझ्याकडे काही तरी काम असेल, तर त्यांनी मला उठून ती खुर्ची बाजूला करत पायाने पायदानी सरळ केली. एक कॅबिनेट मंत्री हे करू शकतो, याचे माझ्यासह उपस्थित सर्वांना आश्चर्य वाटले.
गेल्या आठवड्यात पावसाने कोयनानगर विभागासह सातारा जिल्ह्यात हाहाकार माजवला होता. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून लोक गाडले गेले होते. आंबेघरसारख्या दुर्गम भागात जाणे, खरं म्हणजे दिव्य होते. या ठिकाणी मंत्री जाऊ शकेल, हे तेथे गेल्यावर कोणालाही पटणार नाही. मात्र नामदार बाळासाहेब पाटील सुमारे दोन तास चिखलातून, दगडातून आणि निसरड्या पायवाटेने पायपीट करत आंबेघरमध्ये पोहचले होते. त्यांच्या या कामाचे फार मोठे कौतुक झाले आहे. मात्र कौतुकाने हुरळून जाणारे नामदार बाळासाहेब पाटील नाहीत. या गावावरून खाली आल्यानंतर अनेक जण कंटाळले असतील, मात्र त्यानंतरही पुढचे चार तास त्यांनी पाटण तालुक्यातील अनेक गावात जाऊन पाहणी केली.

नामदार बाळासाहेब पाटील जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जातात, तेव्हा कुटूंबातील सदस्याची आपुलकीने चौकशी करतात. विद्यार्थी असेल तर त्याला पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन तर करतात. याशिवाय त्यांच्या घरात ज्या गोष्टी नवीन पहायला मिळतात, त्याचे कौतुक करतात. एखाद्या शेतकर्‍याच्या बांधावर जातात, तेव्हा ते ऊस लागणीपासून कोणती खते वापरली ? किती तारखेला ऊस लावला ? याचे संपूर्ण माहिती माहिती ते एक शेतकरी म्हणून घेतात. नवीन पद्धतीने शेती करणार्‍या शेतकर्‍याला ते सतत पाठबळ तर देतातच, मात्र स्वतःच्या शेतामध्ये त्याचे अनुकरण करत असतात. सह्याद्रि कारखान्याचा शेती विभागातील अधिकार्‍यांना जेवढी माहिती नसेल, तेवढी शेतीची माहिती बाळासाहेब पाटील यांना आहे आणि असे चेअरमन राज्यात खूप कमी असतील. नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हातून भविष्यात अजून फार मोठे काम होणार आहे. कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प, विकासकामे पूर्ण करण्यासाठी नामदार बाळासाहेब पाटील यांना पुढील काळात शक्ती मिळो, हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !!!

२० जुलै २०२१

*याचसाठी केला होता अट्टहास* *शेवटचा दीनु गोड व्हावा!*

 *निसर्गवारी*

*याचसाठी केला होता अट्टहास*
*शेवटचा दीनु गोड व्हावा!*
_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
२० जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
नमस्कार माऊलींनो,
आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा!
आज आम्ही पंढरीत पोहोचलो, निसर्ग वारी पूर्ण झाली.ज्या उद्देशाने आम्ही ही वारी सुरू केली होती तो उद्देश आणि 221 वृक्षलागवडीचा संकल्प माऊलींच्या कृपेने पूर्ण झाला. आजच्या दिवसाचे एका वाक्यात वर्णन करायचं म्हणलं तर, 'याच साठी केला होता अट्टाहास शेवटचा दीस गोड व्हावा'
गेली दोन वर्षे पंढरीची वारी होऊ न शकल्यामुळे वारी चुकते की काय अशी भावना मनामध्ये आली होती. याचाच विचार करून गेल्या वर्षी आम्ही पंढरीच्या दिशेने चालत आहोत असा मनात विचार आणून मनमंदिर वारी केली होती. या वर्षी निसर्गवारी करण्याचा निश्चय केला, ही वारी करताना यामध्ये काय असावं यावर आम्ही चर्चा केली. झाडे लावावीत, वृक्ष लागवडीचे महत्व लोकांना समजून द्यावे असा विचार आला आणि तो फलद्रुप झाला.
गेल्या 19 दिवसांमध्ये आमची सव्वाशे झाडे लावून पूर्ण झालेली आहेत. आज एका दिवसात डिचोली धोंडेवाडी येथे 104 झाडे लावली आणि 221 झाडे लावण्याचा आमचा संकल्प पूर्ण झाला. या कार्यक्रमास सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी आणि माझे गेल्या वर्षभरात कोरोणाच्या अपडेट वरून अतिशय जवळचे संबंध झालेले आहेत. हरिष पाटणे यांनी जिल्हाधिकारी यांची ओळख करून दिली आणि तेथून पुढे फक्त मोबाईल मेसेज वरुन आम्ही संवाद साधत आहोत. एक दोन वेळा ओझरती भेट झाली आमची. या भेटीनंतर झालेल्या ओळखीतून परवा मी त्यांना आमच्या निसर्ग वारीच्या समारोपाला येण्याचं निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण त्यांनी एका सेकंदात स्वीकारलं.फक्त सामाजिक डिस्टन्स ठेवून 25 ते 30 लोकांचा कार्यक्रम व्हावा कमीत कमी लोकांचा कार्यक्रम व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आम्ही आज सकाळी धोंडेवाडी डिचोली येथे वृक्ष लागवडीचे नियोजन केले होते. या कार्यक्रमास आमच्या निसर्ग वारीतील सात सदस्य, वीस ग्रामस्थ एवढेच लोक उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिंह यांचे वेळेनुसार म्हणजे बरोबर नऊ वाजता त्यांचे डिचोली येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी यांच्या समवेत आलेल्या मान्यवरांच्या हस्ते आम्ही डिचोली ग्रामपंचायत समोरील जागेत आज एकादशी असल्यामुळे 11 वड वृक्ष लावले. ही झाडे लावल्यानंतर त्या ठिकाणी उभे राहूनच ग्रामस्थ समवेत एक बैठक संपन्न झाली.
तीन ठिकाणी पुनर्वसन झालेल्या डिचोली गावातील ग्रामस्थांनी सुविधा,समस्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमोर मागणी केली.या सर्व मागण्या काळजीपूर्वक ऐकून मला जे शक्य आहे तेवढेच मी बोलतो आणि ते मी नक्की तुम्हाला देईन, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात डिचोली गावाचे पुनर्वसन या एकाच विषयावर आपण बैठक आयोजित असे आश्वासन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उपस्थितांना दिले.
खरंतर डिचोली या छोट्या पुनर्वसित गावात जिल्हाधिकाऱ्यांची गाडी येणार आहे हेच या गावकऱ्यांसाठी फार मोठं अपूर्व होतं. काल दुपारनंतर या गावात ही तयारी सुरू झाली होती. आज प्रत्यक्ष जिल्हाधिकारी गावात आल्यामुळे या या लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता आणि पुनर्वसन प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे हे लोक खूप खुश झाले. ग्रामस्थांनी निसर्ग वारी ग्रुपमधील सर्व सदस्यांना धन्यवाद दिले. माऊलींच्या कृपेमुळेच आम्हाला डिचोली गावात झाडे लावायची इच्छा झाली आणि त्यामुळे येथे जिल्हाधिकारी आले,माऊलींची इच्छा आहे म्हणूनच हे सर्व शक्य झाले आहे, अशी कृतज्ञता आम्ही सर्वांनी ग्रामस्थांशी बोलताना व्यक्त केली.
या कार्यक्रमाची सविस्तर बातमी, प्रेस नोट या खाली मी आपणास देत आहे.
निसर्गवारीचे वृक्षलागवडीचे काम सर्वश्रेष्ठ :जिल्हाधिकारी शेखर सिंह;
निसर्गवारी परिवारातर्फे डिचोलीत वृक्षारोपण
संतांनी निसर्गात देव शोधला. हेच काम निसर्ग वारीच्या माध्यमातून सुरू आहे. निसर्गवारी ग्रुप वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे जे काम करतेय ते सर्वश्रेष्ठ आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
पुनर्वसीत डिचोली (धोंडेवाडी) (ता. कराड) येथे निसर्गवारी 2021 अंतर्गत आयोजित 'संकल्प 221 वृक्ष लागवडीचा' या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, निसर्ग वारी ग्रुपचे प्रमुख सतीश मोरे, सहप्रमुख रणजित पाटील. सदस्य व नगरसेवक विजय वाटेगावकर, गौतम करपे, संदीप सुर्यवंशी, अभिजीत सुर्यवंशी, डॉ. अमित खाडे तसेच जि.प. सदस्य मंगलताई गलांडे, सरपंच रेखा काकडे, उद्योजक बाळासाहेब कोळेकर, माणिक गंगवणे, अनिल पवार, संजय काकडे, शैलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेखर सिंह म्हणाले, निसर्ग वारीच्या माध्यमातून हाती घेतलेला वृक्षलागवडीचा उपक्रम कौतुकास्पद आहे. झाडे म्हणजे देवआहहेत. झाडांमधील देवाला ओळखून निसर्ग वारीच्या माध्यमातून काम झाले आहे. निसर्गवारी ग्रुप जे काम करतेय ते सर्वश्रेष्ठ आहे.
जर्मनीमध्ये अतिवृष्टी होऊन पूर आला. त्यामध्ये 180 ते 200 लोकांचे मृत्यू झाले. अरबी समुद्रात कधी सायक्लॉन येत नव्हते परंतु 2001 पासून ते येऊ लागले आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये 50 डिग्री सेल्सीअस होते. याला कुठे न कुठे माणूसच जबाबदार आहे. वृक्षतोड कारणीभूत आहे. या परिस्थितीत निसर्गवारी ग्रुपचे वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन समाजाला दिशा देणारे ठरेल.
पहिला पाऊस जून-जुलै, ऑगस्ट मध्ये पडत होता. मात्र गेली 10 ते 15 वर्षांपासून पाऊस अवेळी पडत आहे. यामध्ये शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे झाडे लावण्यामध्ये मोठा वाटा शेतकरी बांधवांचा वाटा असला पाहिजे. आपण आषाढी वारी निमित्त झाडे लावतो आहे. आपण विठ्ठलाचे रुप म्हणून त्याचे संगोपन करा. डिचोली ग्रामस्थ झाडांची काळजी घेतील. सयाजी शिंदे सुद्धा वृक्ष लागवड व संवर्धनाची संकल्पना राबवित असतात. सातारा जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवडीबाबत चळवळ उभी रहात आहे, याचे समाधान आहे.
सतीश मोरे म्हणाले, 2015 पासून आळंदी ते पंढरपूर वारी करत आहे. मात्र कोरोनामुळे वारी बंद आहे. मागील वर्षी मनमंदिर वारी केली. यावर्षी वारी कशी करावी असा विचार सुरू होता. ऑक्सिजनची वाढलेली गरज आणि वाढणारे प्रदूषण ओळखून 221 वडाची झाडे लावण्याचा संकल्प केला. आळंदी ते पंढरपूर अंतर 221 कि.मी.असल्यामुळे येवढी झाडे लावली. प्रत्येक झाडात माउलीचे रूप आहे. डिचोलीत वृक्षारोपणाचा योग आला. येथे लावलेल्या झाडांचे संगोपन येथील ग्रामस्थ करतील याची खात्री आहे. आज वारी सार्थकी लागली आहे. 'याच साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिन गोड व्हावा', याची प्रतिची आली.
बाळासाहेब कोळेकर म्हणाले, तीन ठिकाणी पुनर्वसीत झालेल्या डिचोली गावाच्या काही अडचणी आहेत. जिल्हाधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालून ही कामे मार्गी लावावीत. निसर्ग वारीमुळे येथील वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळाले आहे.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन काकडे यांनी केले.आभार सुरेश चौघुले यांनी मानले.यावेळी डिचोली येथे 104 वृक्षारोपण ग्रामस्थ व निसर्गवारु परिवाराच्या वतीने करण्यात आले.
पुनर्वसीत डिचोलीमधील ग्रामस्थ वृक्षप्रेमी आहेत. येथील प्रत्येकाच्या घरासमोर लावण्यात आलेली विविध प्रकारची झाडे याची जाणीव करून देत आहेत. वृक्षांबाबत त्यांचे प्रेम पाहूनच येथे जास्तीत जास्त झाडे लावण्याचा निर्णय निसर्गवारी परिवाराने घेतला आहे. आज येथे 104 झाडे लावण्यात आली आहेत. यातील 75 झाडे वडाची आहेत. येथे मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे. भविष्यात हे गाव केवळ डिचोली म्हणून नव्हे तर वडाची डिचोली म्हणून ओळखले जाईल,असा आशावाद सतीश मोरे आणि रणजित पाटील यांनी व्यक्त केला.
हा कार्यक्रम संपल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आमच्या समवेत फराळ केला. गेल्या अनेक दिवसांपासून वारी सुरू असताना आमच्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला या असा आग्रह धरणारे संतोष शेट्टी यांच्या गंधर्व हॉटेलच्या वतीने आज सर्व पाहुणे आणि ग्रामस्थांना फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. याबद्दल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रजत शेट्टी यांचा तुळशीचे रोप देऊन सत्कार केला आणि कृतज्ञता व्यक्त केले. दरम्यान आम्हाला कमी दरामध्ये वडाची व इतर रुपये उपलब्ध करून दिल्याबद्दल नर्सरीचे शैलेश पाटील यांचाही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार केला.
तत्पूर्वी या कार्यक्रमात डिचोली ग्रामस्थांच्या वतीने
सर्व निसर्गवारी सदस्यांचा तुळशीचे वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला तर आमच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना वडाचे एक झाड देऊन त्यांचा आम्ही सत्कार केला. या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी सातारा येथे महत्त्वाची बैठक असल्यामुळे तिकडे रवाना झाले.
त्यानंतर डिचोली ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे चार तास श्रमदान करून आम्ही सर्व सदस्यांनी या गावाच्या परिसरात 104 झाडे लावली. माउलीनीं कोणतीही अडचण येऊ दिली नाही. गावातील सुमारे २० ग्रामस्थ, युवक या कामी शेवटपर्यंत आमच्यासोबत झटत होते. या सर्व माऊलींच्या कष्टाला, चिकाटीला खरंच सलाम! लागवडीनंतर बाळासाहेब कोळेकर यांच्या निवासस्थानासमोर दुपारी दोन वाजता आम्ही चहा पाणी केले. सर्व माऊलींना धन्यवाद दिले आणि फुल रिचार्ज होऊन होऊन आम्ही कराडला परत आलो.
*कृतज्ञता*
गेल्या वीस दिवसात मी पाठवलेले सर्व मेसेज आपण वाचले, आम्हाला प्रतिक्रिया दिल्या,आशीर्वाद दिले,आमच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तुमच्या सहकार्यामुळेच,तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळेच आमची ही निसर्गवारी अतिशय आनंदात संपन्न झाली.आपले मार्गदर्शन आशीर्वाद आणि कृपादृष्टी अशीच राहू द्या ओ माऊली!
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*
२०.०७.२०२१

१९ जुलै २०२१

आनंदाचे डोही आनंद तरंग

 निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
आनंदाचे डोही आनंद तरंग
१९ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आज आम्ही धन्य झालो.आज पंढरपूरला पोहोचलो.आमची निसर्ग वारी आज पूर्ण झाली. आज आमच्यासाठी पंढरपूर होतं कराड वाखान.या रस्त्याला असणारे शिंदे बंधूनी बांधलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे आमचे पंढरी होती.आमच्यासाठी हा दिवस अतिशय आनंदाचा असा होता. गेली 18 दिवस आम्ही पायी वारी केली, त्याचा आज समारोप होणार होता.
सकाळीच साडेसहा वाजता चालावयास सुरुवात करून जरा पुढे आल्यानंतर वाकाण रस्त्याला रस्त्याकडेला विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो. सव्वा सातच्या दरम्यान टेंभू धरणाच्या अलीकडे असणाऱ्या अंबाबाई मंदिर मध्ये जाऊन पोहचलो. पावसाची रिमझिम चालू होती.अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. देवीचे दर्शन घेतल्यानंतर संदीप सूर्यवंशी यांनी आमच्यासाठी नाश्त्याची सोय केली होती, उपीट आणले होते. याचा नैवेद्य देवीला दाखवला. त्यातला काही भाग देवीच्या समोर दारातच ठेवला आणि काय काय आश्चर्य पाचच मिनिटात तिथे चिमण्या आल्या. त्यांनी तो प्रसाद खाल्ला मंदिरासमोर असलेल्या छोट्या कुत्र्याच्या पिल्ल्यांना आम्ही थोडा प्रसाद खाऊ घातला. हे दोन प्राणीमात्र जणू काही विठ्ठल रुक्मिणीच्या रुपात प्रसाद खाण्यासाठी आले होते ,अशी आमची भावना झाली. आम्ही धन्य धन्य झालो आणि परत निघालो येताना गुरुप्रसाद पाटील यांच्या हॉटेल समोर पुढे जाऊन नदी काठाला असणाऱ्या सागर मोहन पाटील यांच्या शेतात तीन झाडे लावली आणि रणजित पाटील यांच्या घरी परत आलो.
रणजीत पाटील यांच्या माऊली आईनीं आणि दोन्ही वाहिनींनी आमचे औक्षण करून स्वागत केले. हे स्वागत आमच्यातील वारकऱ्याचे होते. पंढरपूरला आमची वारी झाली नाही मात्र कराड तालुका परिसरात गेली 18 दिवस आम्ही वारी केली,या वारकऱ्यांचे स्वागत होते. या स्वागतानंतर रणजीत पाटील यांच्या घरात जाऊन आम्ही निसर्ग वारी परिवारावतीने त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला.
अकरा वाजता पोलीस संकुल परिसरात परिसरात पोलीस उपाधीक्षक रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक बी आर पाटील, साहेब पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्या उपस्थितीत अकरा झाडे लावली. ही सर्व 11 झाडे 22 पोलीस कर्मचाऱ्यांनी दत्तक घेतली आहेत. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक रणजीत पाटील यांच्या निवासस्थानी दोन झाडे लावली. ही झाडे लावताना रणजीत पाटील यांचे वडील आणि दोन वर्षाचा छोटा मुलगा युवराज आणि छोटी कन्याही उपस्थित होती. तीन पिढ्यांच्या उपस्थितीत उपाधिक्षक रणजीत पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी झालेलं वृक्षारोपण आमच्या तरी आठवणीत राहीलच पण त्यांच्या घरातील सर्वांच्या लक्षात नक्की राहील. वारकरी संप्रदायाचा वारसा असणारे बी. आर.पाटील यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आम्हा वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या या कार्यक्रमानंतर गोडावून परिसरात कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या उपस्थितीत आम्ही सहा झाडे लावली. गोडावून परिसरातील सर्व हमाल माऊलींनी या झाडांची जबाबदारी घेतली असून ही झाडे आम्ही जगवणारच असा संकल्प तहसिलदारांच्या उपस्थित केला. त्यानंतर गोळेश्वर गावच्या गोळोबा मंदिरा परिसरात मी तीन वडाची झाडे लावली. या सर्व कार्यक्रमास लोकशाही आघाडीचे युवा नेते सौरभ पाटील उपस्थित होते.
सायंकाळी पाच वाजता कराड नगरपालिका कचरा डेपो परिसरात (खरं तर याला आता बाग म्हटली पाहिजे) मुख्याधिकारी रमाकांत डाके आणि प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी रिचर्ड यानथन, ह. भ. प. दादा महाराज तुळसणकर यांच्या उपस्थितीत 50 वडाची झाडे लावली.निसर्गवारी उपक्रम अंतर्गत आज आम्ही 75 झाडे लावली.
या उपक्रमा बरोबरच रणजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रणजीत पाटील यांच्या वतीने आज जखिनवाडी येथे 40 तर मैदान परिसरात 50 झाडे लावण्यात आली.आज दिवसभरात कार्यक्रम इतका बिझी शेड्युल मध्ये झाला की आज मी जास्त लिहू शकत नाही. मात्र गेल्या 18 दिवसात निसर्ग वारी उपक्रमांतर्गत आम्ही केलेला संकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, याचा आम्हाला खूप आनंद वाटत आहे. उद्या आषाढी एकादशीनिमित्त उर्वरित 100 झाडे लावण्याचे आमचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे.
आळंदी ते पंढरपूर वारी अंतर 221 किलोमीटर आणि या वारीला जाता आले नाही म्हणून 221 वडाची व इतर झाडे लावायचे केलेला संकल्प पूर्ण होण्यासाठी तुम्हा सर्व माऊलींचे आशीर्वाद फार महत्त्वाचे आणि मोलाचे आहेत तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे हीच माऊली चरणी प्रार्थना.
आज सकाळी वारी प्रवास करताना संत तुकाराम महाराजांचा एक अभंग मला आठवणीत आला, हा अभंग माझ्या अतिशय आवडीचा आहे. अकरावीच्या पुस्तकात हा अभंग आम्हाला होता त्यावेळी प्राध्यापिका लता पाटील यांनी हा अभंग आम्हाला वारकरी संप्रदायाचे सरळ,सोप्या भाषेत शिकवला होता 'भेटी लागे जीवा लागलीसी आस' हा अभंग ब्लूटूथ स्पीकरवर मोठ्या आवाजात ऐकताना या संपूर्ण अभंगाचे निरुपण करायची माझी इच्छा झाली. खरंच विठ्ठल दर्शनाची आस आम्हाला लागलेली आहे, हे दर्शन दोनशे एकवीस वडाच्या झाडाच्या रूपातून आम्हाला होत आहे, होणार आहे!
राम कृष्ण हरी!
जय जय विठ्ठल !
जय हरी विठ्ठल !
*सतीश मोरे*

उद्यापासून पेपर वाटताना निलेश दिसणार नाही!

 उद्यापासून पेपर वाटताना

निलेश दिसणार नाही!
निलेश पोपट साळुंखे,माझा विद्यार्थी, माझा शेजारी,आमच्या शिवप्रेमी मंडळाचा जुना सच्चा कार्यकर्ता...!
सांगेल ते काम करायला कधीही तयार. कुठेही जायचं म्हटलं तर तयार.असा हसतमुख आमचा निलेश आज अचानक आम्हाला सोडून गेला. गेल्या २० वर्षापासून निलेश आणि आमच्या घराचं एक वेगळं नातं आहे. 2001 झाली जेव्हा मी कराडला राहायला आलो त्यानंतर करवडी गावातील पेपर एजन्सी कुणी चालवायची असा प्रश्न उपस्थित झाला. आमच्या दादांनी पेपर एजन्सी चालवण्याचा निर्णय घेतला मात्र वयोपरत्वे त्यांना संपूर्ण गावात जाऊन पेपर टाकणे शक्य नव्हते. त्यावेळी निलेशला मी हे काम द्यायचे ठरवले. त्याने ते आनंदाने स्वीकारले.
रोज सकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान तो आमच्या घरात यायचा, दादांनी तयार केलेल्या पिशवीमध्ये सर्व पेपर ठेवलेले असायचे, ही पिशवी घेऊन तो सायकल वरून गावात,करवडी कॉलनीत पेपर टाकायला जायचा. तास-दीड तासांमध्ये तो परत यायचा, शिल्लक राहिलेले पेपर दादांच्या ताब्यात द्यायचा.
निलेशचा हा नित्यक्रम गेले पंधरा वीस वर्षापासून चालू आहे, चालू होता. निलेशने कधीही कामाची कसलीही तक्रार येऊ दिली नाही. उलट अंक कसा वाढेल याकडे त्याचे नेहमी लक्ष असायचं. त्याच्यामुळेच गेल्या वीस वर्षात करवडी गावात पेपर विक्री दुप्पट झाली. आमचे दादा या एजन्सी मधून जेवढे कमीशन मिळायचे त्याचा निम्मा वाटा निलेशला द्यायचे. यातून त्याचा घराला थोडा हातभार लागायचा. पेपर वाटून झाल्यानंतर तो दिवसभरात शेती किंवा इतर कामे करायचा.
असा हा अतिशय प्रामाणिक मुलगा निलेश आज अचानक आमच्यातून सोडून दूर निघून गेला. पस्तीस-चाळीस हे काय जाण्याचे वय नव्हतं. खरं तर निलेश माळकरी,एकमार्गी अतिशय चांगला माणूस. कुठल्याही कामासाठी कधीही तयार असायचा.
एक वर्षापूर्वी कडक लाॅकडाउन होता तेव्हा आमच्या गावातील प्राथमिक शाळेची जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू होते. मला ही माहिती मिळाल्यानंतर माझ्या शाळेच्या आठवणी रेकॉर्ड करून फेसबुक वर टाकण्यासाठी मी शाळेत गेलो होतो. त्या वेळेला निलेश माझ्यासोबत होता. माझ्या शाळेच्या आठवणी मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना मोबाईल घेऊन निलेशने कॅमेरामनची भूमिका बजावली होती. निलेश पण त्याच शाळेत शिकला असल्यामुळे तोही आपल्या शाळेविषयी बोलला, ते मी फेसबुकवर शेअर करून ठेवले होतं. फेसबुक वरती या आठवणी अजूनही उपलब्ध आहेत.
अतिशय चांगल्या स्वभावाचा हा मुलगा गावातील कुणाचे घरातील मयत झाले तर तो सर्वात पुढे असायचा.तिरडी बांधण्यापासून त्या व्यक्तीला दहन देण्यापर्यंत शेवटपर्यंत निलेश थांबायचा. आज सकाळी अचानक निलेशचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी कळाली. त्यावेळेला मी धोंडेवाडी डिचोली येथे कार्यक्रमात होतो. ही बातमी काय आल्यानंतर धक्का तर बसलाच पण खरंच पटलं नाही.
निलेश सारख्या माळकरी व्यक्तीचा मृत्यू आज आषाढी एकादशी दिवशी व्हावा,या दिवशीचे मरण पुण्याचे असले तरी निलेश तू इतक्या लवकर जाणं तुझ्या कुटुंबाला आणि शिवप्रेमी मंडळातील तुझ्या मित्र मंडळीना परवडणारं नाही. हे दुःख आम्हाला पचणार नाही. तू गेला आहे हे पटतच नाही.
आज सकाळी सुद्धा निलेशने आपलं कर्तव्य पार पाडलं. सकाळी साडे सहाच्या दरम्यान तो आमच्या घरात आला. पेपरची बॅग घेतली संपूर्ण गावातून पेपर वाटून पुन्हा घरी गेला. दुपारी बाराच्या सुमारास त्याला हृदयविकाराचा मोठा झटका आल्याचे कळले. माझ्या वडलांचा निरोप आला आणि मन सुन्न झाले.
निलेशने गेल्या वीस वर्षात आमची मोरे पेपर एजन्सी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे,संभाळली होती. पेपर टाकण्याबरोबरच प्रत्येक महिन्याला त्या व्यक्तीकडून पैसे वसूल करणे आणि प्रामाणिकपणे बिनचूकपणे आमच्या वडिलांच्या हातात देणे,असे त्याचे काम सुरू होते.
यापुढे मात्र निलेश आपल्यामध्ये असणार नाही. करवडी आणि कॉलनीच्या रस्त्यावर गावात पेपर वाटताना निलेश दिसणार नाही, पेपर टाकायला निलेश कोणाच्या दारात येणार नाही. रोज पेपर वाचताना किंवा पेपर आला की करवडीकरांना निलेश तुझी आठवण येत राहणार आहे.
निलेश तुझ्या मृत्युनंतर तुझी मुलं पोरकी राहणार नाहीत. त्यांच्यासाठी जे काय करता येईल तेवढं करवडी ग्रामस्थ आणि आम्ही शिवप्रेमी मंडळाचे कार्यकर्ते नक्की करू.
राम कृष्ण हरी
*सतीश वसंतराव मोरे*

१८ जुलै २०२१

होतं वडगाव हवेलीचा चौरंगीनाथ डोंगर पायथा

 निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१८ जुलै २०२१
आज प्रत्यक्ष पंढरीची वारी असती तर आम्ही भंडीशेगाव येथे पोहोचलो असतो.पंढरीत पोहचण्याचा शेवटचा टप्पा आहे, वाखरी. वाखरीच्या अगोदर भंडीशेगाव लागते. याच मुक्कामात प्रत्येक वर्षी वैकुंठवासी भगवान मामा कराडकर यांची पुण्यतिथी साजरी केली जाते आणि यानंतर गुलाबजाम चा प्रसाद वाटला जातो. आज आमच्यासाठी भंडीशेगाव होतं वडगाव हवेलीचा चौरंगीनाथ डोंगर पायथा. चौरंगीनाथ हे देवस्थान पलूस तालुक्यात येतं मात्र त्याचा पायथा भाग वडगाव हवेली गावात येतो.
या गावात जाण्यासाठी सकाळी साडेसहा वाजता आम्ही वडगाव हवेली फाट्यावर म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर महात्मा गांधी हायस्कूल समोर आलो. या विद्यालयांमध्ये आमच्या सर्व गाड्या उभ्या केल्या. आज आमच्या निसर्ग वारीमध्ये नवीन सहा सदस्य सहभागी झाले होते. त्यांच्यासमवेत महामार्गावरून वडगाव हवेली गावात कडे चालायला सुरुवात केली.वडगाव हवेली फाटा ते वडगाव या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला ग्रामपंचायतीने अतिशय सुंदर पद्धतीने वृक्षारोपण केलं आहे. हे वृक्ष गावात प्रवेश करणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. या गावाचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा.
आज आमची संख्या एकदम बारावर पोहोचल्यामुळे गावात कुणी अधिकारी आले आहेत, काय असा ग्रामस्थांचा समज होत होता. मात्र एक-दोन ग्रामस्थांना आमच्या निसर्ग वारीचा संकल्प सांगून आम्ही सिद्धेश्वर मंदिरात निघालो आहे असे सांगून पुढे निघालो. दहा मिनिटात गावात प्रवेश केला. वडगाव अतिशय सधन व उपक्रमशील शेतकऱ्यांचे मोठे गाव आहे. या गावाला राजकीय दृष्ट्या फार मोठे महत्त्व आहे. गावात अनेक सर्व पक्षाचे नेते मंडळी आहेत.आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे साडू माजी मंत्री दादासाहेब जगताप यांचे गाव म्हणून वडगाव ओळखले जाते. याच गावात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बहिणी दिल्या आहेत. जगताप भावकी मोठ्या प्रमाणात असलेले हे गाव कृष्णा साखर कारखान्याच्या लिफ्ट योजनेमुळे सधन झाले आहे.
गावात प्रवेश केल्यानंतर आम्हाला अनेक जुने वाडे (हवेल्या) दिसले. ज्या गावात मोठ्या हवेली आहेत त्या गावाच्या नावासमवेत हवेली हे नाव जोडले जाते. आता वडगाव हे नाव कसे पडले याचा प्रश्न आपल्याला पडला असेल? या गावात मी अनेकदा गेलो आहे,आज केलेले निरीक्षण पाहता गावात अनेक ठिकाणी वड आणि पिंपळ यांची झाडे पहायला मिळाली.फार मोठ्या प्रमाणात रस्त्याकडेला असणारे वड पाहून आम्ही चक्रावून गेलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या पारंबी असणारे हे वड पाहताना आम्हाला त्यांचे आयुष्य किती आहे याचा अंदाज करायला भाग पाडत होते. मोठ्या प्रमाणात वड असणारे गाव म्हणून वडगाव आणि गावात मोठी हवेली आहे म्हणून हवेली असे या गावाचे नाव वडगाव हवेली पडले आहे,असे ग्रामस्थांनी आम्हाला सांगितले.
गावातील मुख्य चौकात आलो. चौकात असलेल्या यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे गावातून बाहेर पडलो. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे गावाबाहेरच्या सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या या रस्त्याला दोन्ही बाजूला आम्हाला अनेक वडाची झाडे दिसली. पुढे रस्त्याकडेला एक जुने भक्कम मंदिर आहे,या मंदिराला दगड मारले जातात. हे दगड का मारले जातात याबाबतची माहिती आम्हाला ग्रामस्थांकडून मिळाली नाही. एक दोन लोक भेटले मात्र त्यांनी माहित नाही,पण जुनी परंपरा आहे एवढेच सांगितले. मात्र याच मंदिराच्या पुढे ते एक गणपती मंदिर आहे. हे गणपती मंदिर प्रत्येक वर्षी गव्हाच्या आकाराने पुढे डोंगराच्या दिशेने सरकते अशी या गावातील लोकांचा भावना आहे.
हे मंदिर आणि परिसरातून थोडे सिद्धेश्वर मंदिराकडे जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला वड आणि पिंपळाची इतक्या मोठ्या प्रमाणात झाडे पाहिली.या झाडामुळे गावातील लोकांना मुबलक ऑक्सिजन मिळत असावा आणि त्यामुळेच वडगाव हवेली गावातील लोक तंदुरुस्त आहेत असे आम्हाला वाटले. निसर्ग वारीमध्ये आम्ही वड पिंपळ आंबा ही तीन झाडे लावण्याचा संकल्प केला आहे, तो किती योग्य होता याची आम्हाला अभिमान वाटला.
थोडे अंतर गेल्यानंतर आम्हाला उंचावर बिरोबाचे अतिशय सुंदर मंदिर दिसले मात्र या मंदिराला दुरूनच नमस्कार करून आम्ही पुढे चालत आलो. आता आम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ पोहोचलो. या मंदिरा शेजारीच आम्हाला वृक्षारोपण करायचे होते मात्र अजून आमची पायी वारी पूर्ण झालेली नव्हती. मंदिराच्या शेजारीच असणार्या पाझर तलावाकडे आम्ही निघालो. अतिशय सुंदर आणि विस्तीर्ण हा पाझर तलाव आहे. या तलावाच्या पायथ्याशी सिद्धेश्वर मंदिर आहे तर तलावाच्या शेजारी वरती डोंगरावर चौरंगीनाथ मंदिर आहे. चौरंगीनाथ डोंगरावर जाण्यासाठी सिद्धेश्वर मंदिरापासून जवळचा रस्ता आहे. चौरंगीनाथाला जाण्यासाठी निघाले काही आमचे मित्र आम्हाला या ठिकाणी भेटले.
आम्ही तलावाच्या लगत आलो. तलावाच्या कडेकडेने आम्ही चालायला सुरुवात केली, पूर्ण तलावाला गोल वेढा मारून प्रदक्षिणा घालून परत आपण पुन्हा सिद्धेश्वर मंदिराजवळ यायचे आणि मग वृक्षारोपण करायचे असे आम्ही ठरवले. तलावाच्या कढेने जात असताना अतिशय सुंदर असा नजारा मला दिसत होता. सूर्याची सोनेरी किरणे या तलावाच्या पाण्यावर पाण्यावर पडलेले होती. मोरांचे आवाज ऐकू येत होते, तलावाच्या कडेला पाणी पिण्यासाठी काही पक्षी दिसत होते. काठाला असलेल्या पाऊलवाटेवरुन आम्ही आता डोंगराच्या पायथ्याला पोहचलो. चालत राहिलो. पुढे अशी वेळ आली आम्हाला पुढे जायला रस्ता दिसत नव्हता. मात्र त्यातूनही झाड वेलीतून, दाट झाडीतून, जंगलातून पुढे जाऊन रणजीत पाटील यांनी रस्ता काढला. आम्ही नऊ जण या जंगलाच्या कसाबसा रस्ता काढून पुढे येत होतो. हा रस्ता जनावरांचा होता, बिबट्याचा होता,मात्र आम्ही त्यातून मार्ग काढत एकमेकाला आधार देत निघालो होतो. राम कृष्ण हरीचा जप करत पुढे चाललो. या अर्धा तासात आम्ही आयुष्यातील सर्वात सुंदर असा प्रवास केला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
घनदाट झाडीतून पुढे जात असताना एकमेकाला आधार देत आम्ही पुढे निघालो होतो, मागे कोणी राहणार नाही याची खात्री करत होतो. आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आम्ही निसर्गाच्या सोबतीत चाललो होतो. ही वाट आम्हाला खुप आनंद देत होती. एका ठिकाणी अशी परिस्थिती आली ओघळी पलीकडे जायला पाण्यातून जावे लागणार होते. तिथे काही दगड पडले होते. दगडावर पाय ठेवत पुढे जायचा सुरुवातीला एक जणांनी प्रयत्न केला मात्र पाय घसरल्यामुळे ते पाण्यात पडले, त्यानंतर पायातील शूज काढून पुढे जावे असे नानांनी सुचवले. तरीही मी दगडावर पाय ठेवून चालण्याचा प्रयत्न केला आणि व्हायचे तेच झाले पाय निसटून मीही पाण्यात पडलो. शूजमध्ये पाणी गेले गुडघ्यापर्यंत पॅन्ट ओली झाली. मात्र माऊलींच्या कृपेने कोणाला काही झाले नाही. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या या उक्तीप्रमाणे नंतरच्या लोकांनी शूज हातात घेऊन अतिशय काळजीपूर्वक पाण्यातला रस्ता क्रॉस करून सारे पुढे आले.अतिशय आनंददायी हा प्रवास होता. पुढे मुख्य रस्त्यावर आलो, या रस्त्यावरून एक फाटा जिकडे वळतो तिथे त्या रस्त्याला अनेक दगडाच्या खाणी आहेत. तिकडे न जाता आम्ही पुन्हा मंदिराकडे वळालो.
थोडे चालत पुन्हा सिद्धेश्वर मंदिरा पर्यंत पोहोचलो. सिद्धेश्वर मंदिरातील मठाधिपती, ग्रामस्थ, पोलिस पाटील,युवक या ठिकाणी आमची वाट पाहत होते. या सर्वांच्या उपस्थितीत आम्ही त्या ठिकाणी दोन वडाची झाडे लावली. खरं तर या मंदिराच्या परिसरात अनेक वड आणि पिंपळाची झाडे आहेत. मात्र आम्हाला झाडे लावायला मिळालेली जागा अतिशय योग्य होती. सिद्धेश्वर मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे या ठिकाणी रविवारी फार मोठ्या प्रमाणात गर्दी असते.चौरंगीनाथला जाणारे अनेक भाविक पहिल्यांदा सिद्धेश्वराचे दर्शन घेतात आणि मग पुढे जातात. हा परिसर अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रामस्थांनी विकसित केला आहे. मंदिराच्या पाठीमागे आम्ही जे झाड लावले ते मोठे झाल्यानंतर अनेक भाविकांना तिथे आराम करण्यासाठी जागा मिळणार आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं करून आम्ही मंदिरासमोर तयार केलेल्या एका पारावर आराम केला.
रणजीत पाटील यांच्या मित्रांनी, आजोळच्या नातेवाईकांनी आमच्यासाठी आज धपाटे,दही, उसळ,भात आणि कांदेपोहे चहा असा जंगी बेत आखला होता. आम्ही सर्वजण मंदिराशेजारील मठाधिपतींच्या खोलीमध्ये पंगत मांडली. दऱ्याखोऱ्यातून, पाण्यातून सुमारे 3 किलोमीटर चालल्यानंतर खूप भूक लागली होती ,त्यामुळे माऊलीने दिलेला प्रसाद आम्ही पोटभरून खाल्ला.
आज आमची निसर्गवारी पूर्ण निसर्गाच्या संगतीत झाली. माऊलींची कृपा आणि आमच्यासोबत विठ्ठलनाम असल्यामुळे आम्हाला कसलीही अडचण आली नाही. अतिशय सुंदर वातावरणात आम्ही दोन तास देहभान हरपून चाललो, हरिपाठ करत होतो,राम कृष्ण हरी चा जप करत होतो.असे सुख,असा आनंद या अगोदर क्वचितच मिळाला असेल.
राम कृष्ण हरी!
जय जय विठ्ठल!
जय हरी विठ्ठल !
*सतीश मोरे*
Ashok Mohane, Brijesh Arvind Rawal and 52 others
12 comments
2 shares
Like
Comment
Share

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...