फॉलोअर

१५ फेब्रुवारी २०२३

कमी मध्ये समाधान


'कमीमध्ये समाधान असतं'

बसमधून प्रवासाला निघालो आहे .खचाखच भरलेल्या एसटी बसमध्ये आपणास कसातरी प्रवेश मिळतो. 'ओ जरा पुढे सरका की' म्हणत कशीबशी उभे रहायला जागा मिळते. लोखंडी पाईपला टेकायला मिळतं,थोडा आराम मिळतो. प्रवास सुरू होतो. शेजारच्या बाकड्यावर तिघेजण बसलेले असतात. कडेच्या व्यक्तीला आपण विनंती करतो 'पाव्हणं जरा सरा की '. आपण जणू त्याची प्रॉपर्टी लिहून मागितली आहे असे वाटून तो थोडं तोंड वाकड करतो, जरा सरतो. त्या कोपऱ्यावरील जागेवर आपण अंग चोरुन कसंबसं बसतो. त्या छोट्याशा जागेतही शरीराला आणि मनाला हायसं वाटतं. बस पुढे धावत असते. दुपारची वेळ असल्यामुळे थोडी डुलकी लागते. कमी जागा असूनही आपण त्या जागेत ऍडजेस्ट होऊन आरामात प्रवास करतो. पुढे हळूहळू एसटीतील गर्दी कमी होत जाते. एक एक करून प्रवासी उतरू लागतात.आता त्या बाकड्यावर आपण फक्त एकटेच राहतो. संपूर्ण बाकडं आपल्यासाठी रिकामं असते, प्रवास पण अजून बाकी असतो. मात्र त्या बाकडयावर आपल्याला पडावं वाटत नाही, पडलो तरी झोप लागत नाही. याचं कारण शोधलं तर एक लक्षात येईल की ' उपलब्धता कमी असते तेव्हा त्यामध्येही समाधान असतं '. आपल्या गरजा जेव्हा मर्यादित असतात तेव्हा आपल्या आपण आहे त्यात ऍडजेस्ट करून घेत असतो. जेव्हा त्या गरजा पुऱ्या होतात तेव्हा आपण ऍडजेस्ट न करता 'कुछ और' च्या नशेत आणखी सुख शोधायला लागतो आणि ते तिथं मिळत नाही. कमी मध्ये समाधान असतं, हा मंत्र कायम लक्षात ठेवा. अनेक अनुभव आले आहेत, तुम्हालाही आले असतील!

सतीश वसंतराव मोरे सतिताभ
१५.०२.२०२३..शिर्डी प्रवासात

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...