फॉलोअर

Goa 2006 And 2016 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Goa 2006 And 2016 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०५ एप्रिल २०१६

गोवा ट्रीप @ 2006 आणि 2016


2006 

2016

गोवा आणि मी खुप जवळच नातं आहे.  खुप जवळचं म्हणजे गोव्यात माझं कुणी नाही  किंवा   मला  गोव्यातील खुप सारी माहिती आहे, असे नाही. गोवा हा महाराष्ट्राच्याच विचाराचा, संस्कृतीचा, मराठी कम् कोकणी भाषिकांचा आहे. गोव्यात गेल्यावर मराठी बोलले तरी चालतं, गोव्यात गेल्यावर रोमिंग पडत नाही, म्हणजेच तो महाराष्ट्राचाच एक भाग आहे, अशी मनाची तयारी होते, म्हणून गोवा मला फार आवडतो. मी गोव्याला चार वेळा गेलो आहे. आज सुद्धा गोव्यातच आहे. तिथे गेल्यावर यापुर्वी आलो तेव्हाच्या काही आठवणी शेअर करण्याची इच्छा झाली, म्हणून तर हे लिहतोय.

मला माझी गोवा पहीली ट्रिप चांगली आठवतेय. 2006 मध्ये केलेली.  दुचाकीवरून फिरायची मला पहिल्या पासूनच फार हौस आहे. त्याअगोदर सायकल वरून सुद्धा औदुंबर, सागरेश्वर, कडेपूर, बत्तीस शिराळा या ठिकाणी सायकल प्रवास केला आहे. पहीली नवी कोरी दुचाकी एम 80 मी स्वकमाईतून 1996 मध्ये खरेदी केली होती.  MH-11-E- 7836 नंबर होता त्या गाडीचा ! कराड तालुक्यात एकन एक गाव फिरलो मी एम 80 वरून. त्यावेळी क्रेझ होती म्हणा ग्रामीण भागात एम 80 ची. दुचाकी वाहन घरात असणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण होते. तेव्हा लोक काय अडचण आली तर जायला गाडी मागायला यायचे. यादव मोरे क्लासेसचा तो बहरता काळ होता.  याच गाडीवरून सांगली, सातारा, कोल्हापूर ,पुणे जिल्ह्यात बराच प्रवास केला मी आणि बापु डुबल यांनी. इस्लामपूर येथील माणकेश्वर  थिएटर मध्ये पिक्चर पहायला जायला हीच गाडी असायची. पुढे हिरो होंडा SS, बजाज बाॅक्सर AT, स्पेन्डर ,  NXG स्पेन्डर अशी वाहने झाली, पण एम 80 ची मजा औरच.

2006 मध्ये गोवा दुचाकी दौरा आखला होता. सोबत लक्ष्मण कचरे, अंकुश पाटील  आणि बापु. फार मोठे थ्रिल होते. कोकण दौरा म्हणजे दुचाकी चालवायला प्रचंड जोश अपोआपच निर्माण होतो. हिरवीगार झाडे, नागमोडी रस्ते, उंच अवघड घाट , चकाचक रस्ता आणि गार वारे अशा वातावरणात गाडी चालवायला मजा खुप येते, कितीही वाहन चालवा कंटाळा येत नाही. आम्ही तीन दिवसाचे नियोजन करून निघालो. सकाळी सकाळी बाहेर पडलो, साहित्य मागे बांधलेले. राधानगरी जवळपास मार्ग एका पुलाजवळ थांबलो, फोटो काढले. पुन्हा प्रवास सुरू. रस्ता माहित नाही, विचारत गेलो. सायंकाळी सात वाजता म्हापसा येथे पोहचलो. कुठे रहायचे माहीत नव्हते.  विचारपूस करत एक शेअर बेसवर हाॅटेल मिळाले. संपूर्ण दिवस प्रवास केला होता, जेवलो आणि झोपलो. सकाळी लवकर उठून कलिंगुट बीचवर पोहोचलो, समुद्रात खेळलो. बारा वाजता निघालो. पणजी,जुन्या गोवा, चर्च पाहीले, फिरलो. पुन्हा मुक्काम म्हापसा. आम्ही चौघे, खर्च काॅमन, मजा अनलिमिटेड !

तिसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरु झाला. पुन्हा कलिंगुट बीच, बागा बीच वर गेलो,  'सौंदर्या'चा आनंद लुटला  किनारपट्टी रस्त्यावरून निघालो, अतिशय दाट झाडीतून जाणारा हा रस्ता खुप छान होता.  एक सुंदर बीच पाहीला, तिथेच आंघोळीला थांबलो. छोटंसं गाव होतं ते.  स्वच्छ विस्तीर्ण समुद्र किनारा, बेफाम वारा यामुळे वेळेचं भान राहीलं नाही. पुढे गोवा महामार्ग सीमेवर फेरीत (बोटीत) गाड्या घातल्या, खुप मजा आली.  दुचाकी, चारचाकी, टेम्पो सारी वाहने एका मोठ्या फेरी बोटीत घातलेली पहिल्यांदाच पाहीली. अद्वितीय, अविस्मरणीय अनुभव होता तो. रेडी गाव लागले.  एव्हाना चार वाजले होते. प्रवास सुरू केला खरा पण तीनशे किलोमीटर कसे पार करायचे, हा प्रश्न निर्माण झाला. सकाळी उठून लगेच निघायला हवे होते, मात्र आम्ही फिरत बसलो. घाटात रात्री प्रवास कसा करायचा, गाडी बंद पडलीतर काय होईल, रात्रभर गाडी कशी चालवायची असा प्रश्न पडला.  आम्ही सगळे एकाच  ऑफिसला,  उद्या कामावर तर गेले पाहिजे, पण कसे पोहचणार, असा प्रश्न पडला.  सायंकाळी सहा वाजता सावंतवाडी मध्ये पोहचलो.  एकत्र बसून चर्चा केली, काय पर्याय नव्हता, शेवटी रहायचे ठरवले.  पण बाॅसना काय सांगणार,  हा विचार मनात आला.  शेवटी गाडी पंक्चर झाली म्हणून फोन केला आणि लाॅज शोधला. बाॅसने ओळखले होते सारं . पण पर्याय नव्हता.  खिशात पैसे थोडे, मग  एकदम साध्या ठिकाणी उतरलो.

सकाळी  उठून तयार झालो. आता आंबोली मार्गे कराड. पण पुन्हा निर्णय बदलला,  आता आजचा दिवस आहे, ऑफीस दांडी पडलीच आहे  तर चला सिंधुदुर्ग, मालवणला.  निघालो सारे. मालवण किल्ला पाहिला, आता जवळच विजयदुर्ग आहे चला पुढे.  मज्जा आली.  तीन वाजता निघालो तेथून.  गगनबावडा मार्गे मजल दरमजल करत रात्री नऊ वाजता कोल्हापूर येथे पोहचलो. रात्री उशिरा कराड!   दुचाकी वरून केलेली ही खास ट्रिप मी कधीच विसरू शकणार नाही.  ऑफिसात आलो सारे अंदाज घेऊन. जे व्हायचे ते झाले, बाॅसनी हेड  ऑफिसला तक्रार केली होती, 'एकाच दिवशी चौघे अनुपस्थित राहिल्याने कामकाज विस्कळीत झाले. ' पुन्हा खुलासा करावा लागला. समजून घेतले सर्वानी.
या ट्रिपनंतर फॅमिली सोबत 2009 मध्ये पुन्हा गोवा पाहीला,  गतवर्षी ऑफिसने गोवा बक्षीस  ट्रिप दिली.  आज पण गोवा ट्रीप वरून परत येत आहे. आता मी ऑफिस बाॅस आहे, ट्रिप पण  ऑफिस स्पाॅन्सर आहे. प्रवासाला आराम कार होती, रहायला मस्त हाॅटेल होतं, स्विमिंग पूल होता, खिशात पैसे होते, जेवण पण लय भारी होतं. परंतु टु  व्हिलर एवढी मजा नाय आली . गोवा तेव्हा पाहिला तितका सुंदर नाही दिसला. 

तीन दिवससोबत माझे जवळचे सहकारी होते. आम्ही enjoy केला, खुप फिरलो, खरेदी पण केली, बीचवर क्रिकेट खेळलो. सर्व उपलब्ध होतं, खुप होतं, साथीदार तर  एकास एक होते. पण थ्रिल नव्हते टू व्हिलर प्रवासाएवढं!


,
2016




We 4

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...