फॉलोअर

३० जून २०१६




🚩🚩🚩  माझी वारी 🚩🚩🚩
पुणे सतीश मोरे
मंगळवारी  माऊली पालखी प्रस्थान सोहळा डोळे भरून पाहिला  आणि मठात येऊन निवांत बसलो. दुपारी हेवी जेवण झाल्यामुळे आणि सोहळा पाहून पोट भरले असल्याने भुक लागली नव्हती.  तरीही तारूखच्या कुलकर्णी काकानी आग्रह धरला, नव्हे द्रोण पत्रावळी,  भात आणि भाजी घेऊन आले.  थोडा भात खाल्ला आणि झोपण्याची तयारी केली. दहा वाजताच्या सुमारास पडलो,  झोप लागत नव्हती,  डोळ्यासमोर फक्त माऊलीची पालखी आणि वारकरी दिसत होते.

सकाळी  उठून लवकर निघायचे होते.  रात्री दोन तीन वेळा जाग आली,  फक्त घड्याळात पाहिले पुन झोपलो. साडे तीन वाजता शेजारी गजर झाला,  पटकन जागा झालो. अंगात थोडी कणकणी होती,  जाणवले. इंन्दायणी मध्ये  स्नान करायला जायचे रद्द करून फ्रेश होऊन तयार झालो.  साडेचार वाजता सहकारी सोबत बाहेर पडलो.  माऊली मंदिर शिखराचे दर्शन घेतले,  नदीमध्ये अनेक जण स्नानासाठी उतरले होते.  नदीचा पुल पार करून पुणे रस्ता पकडला.
पालखी  सकाळी सात वाजता  आळंदीतून निघणार होता.  पहिल्या दिवशी यामध्ये जायचे नव्हते.  मी मोकळा समाजातून जायचे ठरवले होते.  रस्त्याला लागलो.


नुकताच जोरदार पाऊस पडला होता, आळंदीमधील सर्व रस्ते चिखलमय झाले होते. पहाटे  अंतर उरकते म्हणून बाहेर पडलेले वारकरी  रस्त्यावर , नदीत स्नान करण्यासाठी निघालेले वारकरी , स्नान करून बाहेर पडणारे वारकरी या सर्वाची रस्त्यावर लगबग सुरू होती. पाठीवर सॅक , डोक्यावर टोपी घालून मी चालायला लागलो. रस्त्यावर एका बाजूला पुण्याकडे जाणारे वारकरी यांचा प्रवाह तर  डावीकडे दिंड्याचे साहित्य घेऊन जाणारी अवजड वाहने,  ट्रक याची लाईन लागली होती .
झानेश्वर माऊली,  तुकोबा महाराज यांच्या नावाचा जयघोष,  राम कृष्ण हरी चे स्मरण, हाताने टाळी वाजवत वारकरी चालत होते.  रस्त्यावर खुप चिखल होता,  काही ठिकाणी पाणी पण साठले होते.  यातून मार्ग क्रमण करत वारकरी चालले होते.  एकमेकांना दाटून, आपला ग्रुप धरून जात होते,  दिंडीचे चोपदार कोणालाही रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊ देत नव्हते. अंधारात कोणी चुकून जाऊ नये,  हरवू नये म्हणून काही दिंड्यानी एल ईडी दिव्याची माळ काठीला बांधली होती. 

 अंतर उरकत होते, वारकरी चालत होते. पायात साधे चप्पल, स्लिपर किंवा साधा सॅन्डल . या चपल्यामुळे अनेकांच्या कपड्यावर, साडीवर,  धोतरावर चिखलाची रांगोळी झाली होती.  रस्त्यावर झालेल्या रबडीमुळे पाय घसरत होता,  गती कमी होत होती,  पण थांबता येत नव्हते.  एक तर बाजूला व्हा, पण तसे केले तर ग्रुप पुढे जातो,  त्यामुळे  आहे त्या परिस्थितीत वारकरी चालत होते , अंतर जवळ करत होते. 
आता साडे पाच वाजले होते, थोडं दिसायला लागले होते,  थोडं दमलो होतो , शुजचे लेस पण लुज झाले. थांबायची इच्छा झाली,  बाजूला आलो.  चहाची टपरी बघितली, खुर्ची वर जाऊन बसलो.  कटींग चहा मागितला.   आय टी दिंडीतील पाचपन्नास युवक युवती तिथे आले.  त्याची माहिती घेतली गप्पा मारल्या.  वास्तविक  या दिंडीच्या  एका व्हाॅटसअप  ग्रुपमध्ये मी वर्षभर मी आहे.  खुप चांगले लोक आहेत.
पुन्हा चालायला लागलो.  दिघी गाव आणि मिलिटरी एरिया सुरू झाला,  रस्त्याकडेला सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक  नेत्यांनी मोफत चहा, नाश्ता उपलब्ध केला होता.  काही वारकरी तेथे जात होते,  आंघोळी साठी शाॅवर पण सोय होती.  मिलिटरी  एरियातून जाताना दोन्ही बाजूला सैनिक, त्याची वाहने, त्याचा ड्रेस रूबाब पाहून खूप हेवा आणि आनंद झाला. 

 
चालत चालत अंतर बरंच कापलं होतं, अजुनही पुणे 12 किलोमीटर अंतरावर होते.  माऊलीमय वातावरण, संताची सोबत आणि विठ्ठल दर्शनाची लागलेली ओढ लागली होती . त्यामुळे अंतर कसे पार पडले कळलं नाही. उंच  इमारती दिसू लागल्या, गर्दी झालेली होती.  रस्त्यावर बॅरीकेटस लावून वाहतूक बंद करण्यात आली होती,  वारकरी सुरक्षित जावा,  दुर्घटना होऊ नये म्हणून पोलिसांनी खुप सुंदर नियोजन केले होते.
नऊ वाजले होते. साडे चार तास चालत होतो. बरंच अंतर पार पडले होते, आवाक्यात  आले होते. पालखी जिथे मुक्काम करते ते ठिकाण भवानी पेठ पाच सहा किलोमीटर अंतरावर होते.  मला मुक्कामाला कात्रज कोंढवाला जायचे होते,  बसची चौकशी केली.  पोलिसांनी पुढे दोन किलोमीटर खडकी जवळ बस मिळेल असे सांगितले.
येरवडा हद्दीत प्रवेश करण्या पुर्वी आंबेडकर उडान पुल,  अनेक रस्ते  एकत्र येऊन झालेला चौक लागतो,  तेथे पोहचलो.  एका छोट्या हाॅटेलात जाऊन नाश्ता केला. पुन्हा चालू लागलो.  इन्द्र धनुष्य बस सेवा सुरू होती.  बस पकडली. बारा वाजता सासुरवाडी मुक्कामी पोहचलो.

पाच तास सुमारे 27 किलोमीटर चाललो होतो,  थोडा थकलो होतो.  बातमी  लिखाण करायचे काम सुरू केले.  दिड वाजता बातमी मेल केली. जेवण झाल्यावर निवांत पडलो.
आज, उद्या गुरुवार पुण्यातच मुक्काम.









- सतीश मोरे,कराड 
  9881191302
     माऊली माऊली





 

🚩 माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩
सतीश मोरे
Read my blog
http//karawadikarad.blogspot.in/  


वारीतील वाढती वाहने ; नियंत्रणाची गरज
पुणे: 
पंढरीच्या वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी असणारे 10 हजारांहून अधिक हलकी व जड वाहने वारकऱ्यांचे साहित्य नेण्यासाठी  सोयीची असली तरी या वाहनांतून बाहेर पडणारा धूर आणि अवजड वाहनांमुळे रस्त्यावर उडणारी धूळ याचा वारकऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. कितीही नियोजन केले तरीही ही वाहने कोणत्या वेळेत सोडायची हा दिंडी मालकांबरोबरच पोलिस यंत्रणेसमोरील मोठा प्रश्न आहे. धूळ आणि धूर याचा आरोग्यावर होणारा परिणाम धोकादायक असला तरीही या वाहनांना आवरणार कोण? तसेच दिंडी चालक-मालकांचीच विनापरवाना अनावश्यक वाहने अडवणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पालखी सोहळ्यात नोंदणीकृत अडीचशेच्या दरम्यान दिंड्या सहभागी असतात. शेकडो वर्षांपासून या दिंड्यांचे मानकरी, मालक, चालक पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत. एका दिंडी सोहळ्यात 600 ते 2000 वारकरी सहभागी असतात. यामध्ये दिंडी चालक- मालक, वारकरी, टाळकरी, विणेकरी, स्वयंपाकी, तंबू उभारणारे, मदतनीस , ट्रक चालक व क्लिनर तसेच स्वयंपाक कामात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या महिला यांचा समावेश आहे. वारकऱ्यांच्या संख्येचा विचार करून त्यांच्या सेवेसाठी त्या दिंडीत वाहने निश्चित केली जातात. अनेक वाहने कित्येक वर्षे वारी सेवेत  आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी राहण्यासाठी तंबू व इतर साहित्य, स्वयंपाक तयार करण्याचे साहित्य, गहू, तांदूळ, तेल व इतर साहित्य तसेच वारकऱ्यांच्या पिशव्या, गाठोडी आणि इतर जीवनावश्यक वस्तू आदी वाहून नेण्यासाठी दिंडीमध्ये वाहन व्यवस्था असते.
साधारण 800 वारकरी सहभागी होणार असतील तर त्यांच्यासाठी 1 ट्रक, 1 टेम्पो, 1 पाणी टँकर (पाणी क्षमतेनुसार), 1 जीप अशी 4 वाहने लागतात. मात्र यामध्ये गरज नसताना दिंडी मालकाच्या आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसाठी असणाऱ्या 2 ते 3 वाहनांची भर पडते. दिंडी मालक-चालकांच्या आर्थिक क्षमतेनुसार 5 लाखांपासून 25 ते 30 लाख रुपयांपर्यंतच्या अत्याधुनिक वातानुकूलित वाहनांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढलेली आहे. 600 वारकरी दिंडीत सहभागी असतील तर त्यांच्यासाठी 4 ते 5 वाहने पुरेशी असतात. मात्र ही संख्या 10 वर गेली आहे. आळंदी ते पुणे दरम्यान वाहने कमी असतात. मात्र सासवड ते वाखरी दरम्यान वाहनांची संख्या वाढतच जाते. 250 दिंड्यांमधे सहभागी 2 ते अडीच लाख वारकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या वाहनांपेक्षा दुपटीने वाहने सहभागी होत असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.
काही दिंड्यांमध्ये तर 30 ते 40 वाहने आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी वाहनांची गरज आहेच. मात्र दिंडी चालक-मालक आणि दिंडीसाठी आर्थिक पुरवठा करणारे दानशूर व्यक्तिंसाठी किंबहुना स्टेटससाठी आणलेली वाहने वाढत आहेत. मुख्य पालखी सोहळ्यातील या दिंड्यांच्या सेवेसाठी ढोबळमानाने विचार केला तर सुमारे 3000 वाहनांची गरज असताना दुप्पट वाहने सहभागी होत असल्याचे लक्षात आले आहे.





वाहनांची वाढणारी संख्या आणि त्यामुळे विस्कळीत होत असलेली वाहतूक व्यवस्था हा एक भाग आहे. याचा ताण पोलिस यंत्रणेवर पडतो. पालखी सोहळ्यासाठी कार्यरत अत्यावश्यक असणारी वाहने पहाटे 4 ते 5.30 दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणावरून निघतात. मुक्कामाच्या ठिकाणी उभारलेले तंबू काढण्याचे काम पहाटे 3 च्या सुमारास सुरू होते. वारकऱ्यांची लगबग याच दरम्यान असल्यामुळे त्यांच्या मुलभूत सोयीसाठी उभे असलेले पाणी टँकरवर गर्दी होते. वारकऱ्यांचे साहित्य, गाठोडी, तंबू साहित्य घेवून जाणारा ट्रक आणि धान्य वाहून नेणारा टेम्पो अथवा जीप चारच्या दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणाहून पुढील ठिकाणी जायला निघतो. टाकीतले पाणी संपल्यानंतर पाणी टँकर पाचच्या दरम्यान पाणी भरण्यासाठी नेमूण दिलेल्या ठिकाणाकडे मार्गस्थ होतात. तेथे पाणी भरून हे टँकर पुढे दुपारच्या भोजन व्यवस्थेच्या ठिकाणी जाऊन थांबतात.
स्वयंपाकाचे साहित्य (शेगडी, गॅस, भांडी, पातेली, ताट-वाट्या आदी.) घेवून जाणारे वाहनसुद्धा याच दरम्यान निघून दुपारच्या भोजन व्यवस्थेसाठी नियोजित  ठिकाणाकडे मार्गस्थ होतात. या वाहनांची संख्या फार मोठी असल्यामुळे पहाटे 4 ते 6 या दरम्यान पालखी मुक्कामाच्या ठिकाणी फार मोठी लगबग सुरू असते. ही वाहने रस्त्याला लागतात. त्या दरम्यान मोकळ्या समाजातील वारकरी पहाटेच्यावेळी चालणे कमी त्रासदायक असल्यामुळे बाहेर पडलेले असतात. या वारकरी लोकांची संख्या पालखीच्या पुढे मागे  असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांपेक्षा अधिक असते. हा आकडा 2 ते अडीच लाखाचा  असतो. पहाटे  अंधारात पुढच्या वारकऱ्याकडे पाहत अंदाजे हे वारकरी मार्गक्रमण करीत असतात. डाव्या बाजूला वारकऱ्यांची मोठी संख्या आणि उजव्या बाजूला धावणारी वाहने असे चित्र असते. पहाटेच्यावेळी स्वच्छ हवा आणि ताजेतवाने शरीर यामुळे अंतर उरकण्यासाठी बाहेर पडलेला मोकळा समाज या वाहनांतून पडणाऱ्या विषारी धुरामुळे पुरता बेजार होऊन जातो. या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य असल्यामुळे वाहन कच्च्या रस्त्यावर उतरले की खूप धूळ उडते. या धुराचा आणि धुुळीचा सामना करीत वारकरी पुढे जात असतात. उजव्या बाजूला वाहने असल्यामुळे वारकरी तिकडे जात नाहीत. मात्र चालण्याचा वेग जास्त असणारे वारकरी पुढे जाण्यासाठी (ओव्हर टेक) उजवीकडील वाहनांच्या मार्गावर येतात आणि त्यामुळे वाहनांचा वेग कमी होतो.
धूळ आणि धूर या दोन कारणांमुळेच वारकऱ्यांना त्रास होतो. माऊली हरिनाम घोषात उन्ह, वारा-पावसात चाललेले अंतर वारकऱ्यांना काहीच वाटत नाही. याचा त्रासही होत नाही. मात्र वाहनांतून बाहेर पडणारा कार्बन मोनॉक्साईडसारखा विषारी घटक आरोग्यास हानीकारक आहे. यामुळे वारीत खोकणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढत आहे. धूळ आणि धुरामुळे वारकरी त्रस्त होतात. काहींना खोकला होतो. उपचारासाठी मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध असतात. मात्र वाहनांची संख्या कमी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा प्रयत्न करीत असल्याचे दिसत नाही.
पंढरीची वारी वाढत आहे, फुलत आहे. ही वारी अधिक शिस्तबद्ध होण्यासाठी प्रशासन झटत आहे. मात्र आरोग्यदायी आणि स्वच्छ वारी करण्यासाठी शासकीय यंत्रणा करीत असलेले प्रयत्न कमी पडत आहेत. वास्तविक वारी ही चालत करायची असते.  अत्यावश्यक वाहनांची गरज आहेच मात्र मोठेपणा दाखविण्यासाठी येणारी दिंडी चालक- मालकांची वाहने कमी होण्याची गरज आहे.



स्टिकर आणि फ्लेक्स लावा आणि  घुसा
पालखी सोहळ्यातील दिंड्या सकाळी 7 ते 8 या दरम्यान निघतात. या दरम्यान काही अंतरावर पुढे सोहळ्यातील दिंडी चालक-मालक यांची वाहने 6 च्या दरम्यान मार्गक्रमण करतात. या वाहनांची संख्या गेल्या काही वर्षांत खूप वाढली आहे. परवाना नसलेली वाहने घुसतात. काही दिंडी मालक स्वत: वाहनांवर स्टिकर लावतात. मोठ्या वाहनावर पालखी सोहळा नावाचे फ्लेक्स लावले जातात. हौस म्हणून  काही जण चारचाकी वाहने घेऊन वारी सोहळ्यात सहभागी होतात. पालखी मालकांकडून पालखी सोहळ्यादरम्यान धावणाऱ्या वाहनांसाठी परवाना दिला जातो. मात्र परवान्यापेक्षा अनधिकृत वाहने अधिक असतात, असे आढळून आले आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची? असा प्रश्न पालखी मालकांबरोबरच पोलिस यंत्रणेला पडलेला आहे. गरज नसताना सोहळ्यामध्ये सहभागी होणारी दिंडी चालक-मालकांची वाढती वाहने शोभेसाठी असतात. या वाहनांत एखादा दुसरा व्यक्ती असतो. बाकी वाहने रिकामीच धावत असतात. ही वाहने कमी झाली तर धुराचे प्रमाण कमी होऊ शकते.

२९ जून २०१६


माझी वारी

दिनांक 28 जुन
सतीश मोरे
मुक्काम  आळंदी

पंढरीची वारी आयुष्यात एकदा तरी करायचीच !  पण का करायची ? कशी करायची?    काय  उपयोग त्याचा?  कुठून करायची?  आदी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. माझी आज्जी चंन्दभागा पंढरीची वारी करायची.  आम्ही तिला थोरली आई म्हणायचो. ती वारीतून येताना प्रसाद, खेळणी , करदोडा करायचा काळा गोफ आणायची. वारीचा प्रसादातील चिरमूरे आणि सोबत मिळणारा बत्तासू मला खुप आवडायचा, मी तो शोधून काढत होतो.   वारीची ओढ मला शालेय जीवनात लागली होती.  आमच्या करवडी जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात दरवर्षी वारी यायची.  आमच्या गावाला तशी वारकरी संप्रदायाची फार मोठी परंपरा आहे. गावात 40  वर्षे पासून ज्ञानेश्वरी पारायण सुरू आहे. आठवी, नववी आणि आकरावी मध्ये  असताना या पारायणास मी बसलो होतो. त्यानंतर कराड शहरात झालेल्या तीन महापारायणास सुद्धा मी सहभागी होतो.
सांगण्याचा उद्देश मला वारी करायची खुप इच्छा होती. वारीची ओढ लागली होती .  सात आठ वर्षे पुर्वी कराडला सोनवणे नावाचे बीडीओ होते. ते एकदा मला फलटण येथे माऊली वारी
दर्शन करायला घेऊन गेले होते.  त्यानंतर  एक दोन वेळा फलटण जाण्याचा योग आला.  पुढे माझे कराड येथील मित्र राहुल खोचीकर त्याच्या आजोळी नातेपुते येथे माऊली सोहळा पहायला घेऊन गेले.  महा वारीचा महापसारा, वारकरी,  शिस्त यांचे मला कुतुहल निर्माण झाले.  पुढे दोन वेळा मी नातेपुते येथे जाऊन आलो.  या दरम्यान मला वारीची ओढ लागली.  आपण पण वारीला एकदा जायचे, वारी काय आहे ते पहायचे, अनुभवायाचे, वारीत कुठेतरी देव  असतो असे म्हणतात , तो देव शोधायचा,  वारकरी लोकांना  एवढा जोश कोठून येतो,  ते शोधायचे,  असे मला वाटू लागले.
वारीचे कुतुहल शांत बसू देत नव्हते.  शेवटी गेल्या वर्षी ठरवलेच आणि कोल्हापूर  ऑफीसमध्ये परवानगी मागितली.  समुह सरव्यवस्थापक अनिल पाटील सर, वरिष्ठ संपादक सुरेश पवार,  कार्यकारी संपादक दिलीप लोंढे यांनी माननीय संपादक साहेबाकडे शिफारस केली.  माझी इच्छा शक्ती  इतकी प्रचंड होती की मला साहेबांनी केवळ परवानगी दिली नाही, तर  ऑन ड्युटी जायला सांगितले, पुढारीमध्ये लिहायला सांगितले. आंधळा मागतो एक डोळा,  देव देतो दोन डोळे असे झाले. गत वर्षी खुप छान वारी झाली.  ते अनुभव गत वर्षी लिहले  आहेत, या वर्षी पण मला माझ्या संपादक साहेबांनी ऑन ड्युटी वारीला जायला परवानगी दिली आहे,  याही वर्षी माऊली कृपेने लिहायचा प्रयत्न करणार आहे.
आज सकाळी साडे सहा वाजता वारीला जाण्यासाठी निघालो. माझे पुढारी कराड कार्यालयातील सहकारी विकास पाटील,  अशोक मोहन,  वैभव पाटील, दिलीप धर्में, प्रवीण माळी तसेच तात्या पाटील मला आळंदी पर्यंत सोडायला आले  होते. तसेच वारीत सहभागी होण्यासाठी राजू मोरे कापीलकर हे पण होते. आम्ही बारा वाजता पोहचलो आळंदीत. एक किलोमीटर अंतरावर गाडी लावून चालत गेलो. रस्त्यावर जिकडे तिकडे फक्त वारकरी दिसत होते. सर्व सहकारी मित्रांना टोपी घ्यायला लावली. वारकरी माऊली आहोत, अशी भावना झाली. थेट मारूती बुवा कराडकर यांच्या मठात पोहचलो.  गेल्या वर्षी सोबतीला  असणारे वारकरी दिसले, शोधले . काय माऊली कधी आला, यंदा  आहे ना शेवटपर्यंत,  अशी चौकशी केली. माऊलींच्या पाया पडलो.  पंगत बसली होतीच, माने गुरूजी आणि सहकारी माऊलीनी प्रसाद घ्यायचा  आग्रह केला. भुक लागली होतीच, सारे बसलो, साडेबारा वाजता जेवण झाल्यावर पुन्हा सहकारी माऊली सोबत गप्पा मारल्या.
दोन वाजता सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ चोपदार माऊलीना फोन करून मंदीरात जायला निघालो.  आजोळ घरात बोलवले होते त्यांनी पास घ्यायला.  पण तिथे जाईपर्यंत पोलिसांनी सर्व रस्ते बंद केले होते.  ओळखीचेच पोलीस होते,  माझ्या कडे ओळख पत्र होते,  दाखवले. सारे थेट मंदीराच्या दारात गेलो.  तिथे एक दिंडी पोहचली होती.  मी आत गेलो,  इतरांना या दिंडीत सहभागी होऊन आत यायला सांगितले.  थोडी चुकामूक झाली, पण सारे आत आले. मंदिराच्या आवारात एक  एक दिंडी येऊ लागली, अचानक पाऊस सुरू झाला. पावसातही वारकर्याचा उत्साह ओसंडून वाहत होता.  याबाबत सविस्तर वाचा उद्याच्या पुढारीत.
साडे सहाला बाहेर पडताना जवळून दर्शन घेतले. आम्ही खुप फोटो काढले, फुगडी खेळलो. मंदीराबाहेर मित्र  DYSP मितेश घट्टे भेटले.  सहकारी मित्र परतीच्या प्रवासाला कराडला निघाले.  मी पुन्हा मारूती बुवा कराडकर मठात  आलो.  खुप थकलो होतो,  पावसात भिजलेले कपडे  वाळले होते पण  अंग  चिकट झाले होते.  फ्रेश होऊन ब्लॉग लिहायला बसलो.
माऊली कृपेने आजचा दिवस  आनंदात गेला.
वारकरी भेटले,  माऊली दर्शन झाले. 
आणखी काय हवे?
- सतीश मोरे, कराड 
   9881191302




🚩  माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩
⛳   karawadikarad.blogspot.in ⛳


सहा वाजता नेट बंद पडले, 
त्यामुळे फोटो व वारी अपडेट वेळेत देता आल्या नाही. 
आज पहाटे सुरू झाले.    
माऊली माऊली

टाळ मृदंगाचा जोश ; त्यात पावसाची संगत



टाळ मृदंगाचा जोश ; त्यात पावसाची संगत
पाऊसात न्हाहून माऊली निघाले पंढरीला

आळंदी
यात्रे अलंकापुरा येती ते आवडी विठ्ठला 
पांडुरंगे प्रसन्नपणे । दिधले देणे हे ज्ञाना 
भुवैकंठ पंढरपुर । त्याहुनी थोर महिमा या 
निळा म्हणे जाणोनि संत । धावत येती प्रतिवर्षी

पंढरीच्या सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी अवघ्या राज्यातून आलेले संत मंडळी अलंकापुरीमध्ये जमलेले झाले. पंढरीची वारी आळंदीपासून सुरूवात झाली. ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात वैष्णवांचा मेळा जमला , निवृत्ती, नामदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या जयघोषाने आळंदीनगरी दुमदुमून गेली . तीन च्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली अन्य वारकर्यचा जोश आणखी वाढला. भर पावसात ज्ञानोबा माऊलीचा जल्लोश करत वैष्णवानी ताल धरला . तिकडे मंदीरात माऊलींच्या पादुकांची पूजा करण्यात आली. आरती ज्ञानदेवा... सौख्यदाता विधाता.. अन् माऊली पंढरीला निघाली. वैष्णवजन पताका, झेंडे नाचवत मंदिरासमोर खेळू लागले. टाळ- मृदुंगाच्या जयघोषात पावसात न्हाहून माऊली पंढरीला निघाले. वैष्णवांच्या मेळ्यामुळे अगोदरच पवित्र असलेली अलंकापूरी अधिकच उजळली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरातून वारकरी आलेले आहेत. पालखी सोहळ्यात सहभागी असणाऱ्या सर्व दिंड्या सोमवारीच आळंदीमध्ये येऊन विसावल्या होत्या. ट्रक, ट्रॅक्टर, टेम्पो, जीप, एस.टी. बस, रेल्वे अशा मिळेल त्या वाहनाने वारकरी  आळंदीत पोहोचले . मंगळवारी पालखी प्रस्थानाचा दिवस असल्यामुळे ज्ञानेश्वर माऊली मंदिर आकर्षक रंगरंगोटी, फुले आणि लाईटस्‌ यांनी सजवलेले आहे. पाडुरंगाच्या भेटीला जायला माऊली आसुसलेले  आहेत. पंढरीची वारी सुरू करताना पहीले दर्शन झानेश्वर माऊलींचे घेऊन मगच वारी सुरू होते. सकाळपासून मंदीराबाहेर लांब रांगा लागल्या होत्या.  दिंड्याचे आगमन होत होते.      


पालखी प्रस्थानाची वेळ चार वाजता होती. नित्य परंपराप्रमाणे पालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी मंदिरामध्ये धार्मिक विधी होतात. प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मंदिराच्या आवारात येण्यास पालखीपुढील 27 आणि पालखी मागच्या 20  अशा 47 दिंड्यांनाच प्रवेश असतो. तीन वाजल्यापासूनच मंदिर परिसर या दिंड्यांच्या लगबगीने फुलून गेला होता. सर्वांत पुढे दिंडी क्रमांकाचा फलक घेतलेला वारकरी त्याच्या मागे चार-चार च्या ओळींत भगव्या पताका घेतलेले झेंडेकरी, त्याच्या मागे तुळस आणि पाण्याचा हंडा घेतलेल्या महिला आणि त्याच्या मागे ओळीप्रमाणे टाळकरी. टाळकऱ्यांच्या मध्यभागी पखवाज वादक. टाळकऱ्यांच्या शेवटी विणेकरी आणि त्या मागे महिला वारकरी,असा दिंडीतील वारकऱ्यांचा क्रम असतो. 
पालखीपुढे असणाऱ्या 27 दिंड्यांमध्ये  आळंदी, पुणे, पंढरपूर या प्रमुख दिंड्यांबरोबरच सोपानकाका कराडकर, मारुतीबुवा कराडकर, घोरपडे सातारकर, रोकडोबाची दिंडी (रासेकर), चोखा मेळा दिंडी- परळी वैजनाथ, भोपळे दिंडी- मरकळकर, नांदेडकर दिंडी, चाकणकर दिंडी, भोरकर दिंडी, वडगांवकर दिंडी (माळशिरस) यांचा समावेश आहे. तर पालखीच्या पाठीमागे सुमारे 201 नोंदणीकृत दिंड्या आहेत.
47 दिंड्यांमधील सहभागी असणारे 3000 हून अधिक वारकरी, टाळकरी एकामागोमाग एक मंदिराच्या आवारात येत होते. माऊली... माऊलीचा जयघोष सुरू होता. पावसाने सुरुवात केली. मात्र पावसात भिजायला घाबरणारे थोडेच होते. हे वारकरी! ज्या पावसाची वारकरी,  शेतकरी सारेच जण चातक पक्षाप्रमाणे वाट पहात होते तो पाऊस माऊलीच्या दारात आला.  मग सुरू झाला माऊलीचा जयघोष. सारे  पावसात न्हाऊन निघाले.   वैष्णवांच्या उत्साहाला आता उधाण आले. 
मंदिरातील वीणा मंडपात चांदीची पालखी सजविलेली होती. पालखी सोहळ्याचे मालक आरफळकर यांच्या हस्ते विधीवत पूजा झाल्यानंतर माऊलींच्या पादुका या पालखीत ठेवण्यात आल्या. यादरम्यान हैबतबाबा यांच्यातर्फे पंच व मानकऱ्यांना श्रीफळ प्रसाद देण्यात आला. आरती झाल्यानंतर पुंडलिलक वरदा... हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ! चा जयघोष होऊन पालखी निघाली. विठूरायाला भेटण्यासाठी माऊली पंढरीस निघाली पालखीसमोर अश्व, दिंड्या चौघडा उभ्या होत्या. पालखीसोबत जरीचे एक निशाण, सुंदर अब्दागिरी, जरीचे सुंदर छत्र, चांदीची चवरी असते. हे माऊलींचे वैभव आहे. 


पालखीने मंदिरास आतून प्रदक्षिणा घातली. माऊली...माऊली...माऊलीचा जयघोष आणखी वाढला. प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी महाद्वारातून बाहेर पडली.
मंदिरापासून जवळच ज्ञानेश्वर माऊलींचे आजोळघर असलेल्या गांधीवाड्याकडे पालखी निघाली. गांधीवाडा ही आता त्यांच्या मूळ मालकाकडून संस्थानने घेतली आहे. या बदल्यात मूळ मालकांना दुसरी जागा देण्यात आलेली आहे. याठिकाणी पालखी मुक्कामाला असल्यामुळे रात्रभर वारकऱ्यांची दर्शनासाठी गर्दी झाली होती .  नगरप्रदक्षिणा करीत पालखी गांधीवाड्यात रात्री पोहोचली. या ठिकाणी आरती होऊन साखरपान-विडा वाटण्यात आला. चोपदारांनी पुढील दिवसाचा कार्यक्रम तयार केला. "आता महाराज उद्या ज्येष्ठ नवमीस पुण्यास जाण्यासाठी सकाळी 6 वाजता निघणार आहेत ...हो!'
आल्याड पल्याड पताकांचे भार ।
मध्यें मनोहर इंद्रायणी ।।
पिवळ्या पारव्या आणिक हिरव्या ।
नीळवर्ण साऱ्या लखलखीत ।।
जरी जर्तारी झाल्या रानभरी ।
विजा त्यावरी खेळताती ।।
सर्पाकार दंड तारांगणावाणी ।
पताका तिकोणी दाटताती ।।
नामा म्हणे तेथे पताकांचा भार ।
केव्हडे भाग्य थोर ज्ञानोबाचे ।।







संजीवन समाधी ;  अन् चेतनामय पाऊस
ज्ञानेश्वरांची समाधी हे आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर आळंदीचे प्रवेशद्वार मानले जाते. अमृतानुभव लिहुन झाल्यानंतर ज्ञानेश्वरांनी काही काळ आळंदी येथील एका गुहेत व्यतीत केला. नंतर याच गुहेत त्यांनी संजीवन समाधी घेतली. शके 1218 मध्ये कार्तीक पक्षाच्या त्रयोदशी दिवशी ज्ञानेश्वरांनी समाधी अवस्थेत प्रवेश केला. माऊली आजही त्या ठिकाणी आहेत, अशी भक्तांची भावना आहे. माऊलीच्या या संजीवन समाधी मंदिरात पहिल्यादा प्रवेश केला रथामागील 11 नंबरच्या दिंडीने अन रिमझिम पाऊस सुरू झाला.  त्यापाठोपाठ एकामागून एक दिंड्या येऊ लागल्या आणि पावसाचा जोर वाढला. आला पाऊस , वारकरी झाले भावुक अशी स्थिती निर्माण झाली.  पावसाने माऊलींच्या दारात  सुरूवात केली,  आता पुर्ण वारीत पाऊस येणार,  चालू वर्षी खुप पाऊस पडणार,  अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. 

२८ जून २०१६

माऊली चालले पंढरीला आळंदी

वरुणा, अलका, कणिका, आनंद, सिद्धक्षेत्र, अलंकापूरी आणि आळंदी

पंढरीची वारी म्हणजे आनंदाचा प्रवास. आनंद वाटत-वाटत लुटण्याचा प्रवास. शेकडो वर्षांपासून पंढरीची ही वारी अखंडपणे सुरू आहे. महाराष्ट्र, कनार्टक, गोवा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यांतील 5 ते 6 लाख लोक वारीमध्ये सहभागी होतात. माऊली... माऊली..चा जयघोष करीत आनंदाचा हा प्रवास सलग चौदा दिवस सुरू असतो.

आळंदी ते पंढरपूर हा पालखी मार्ग सुमारे पाऊणेतीनशे किलोमीटर अंतराचा आहे. भक्तीच्या या प्रवासात गतवर्षीप्रमाणेच "पुढारी'सुद्धा सहभागी होणार आहे. पुढारी वाचकांच्या सेवेसाठी पुढारी प्रतिनिधी वारीत सहभागी होवून रोज लिखाण करणार आहेत. आमच्या वाचकांसाठी ही भक्तीपर्वणीच आहे. आजपासून रोज पुढारीमध्ये "माऊली चालले पंढरीला' या विषेश सदरात सहभागी व्हा.
                                                                                             सतीश मोरे

आळंदी
चला आळंदीला जाऊ ।
ज्ञानदेवे डोळा पाहु ।।
होतील संतांच्या भेटी ।
सांगू सुखाच्या गोष्टी ।।
ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर।
सुखी म्हणता चुकतील फेरे ।।
जन्म नाही रे आणखी ।
तुका म्हणे माझी भाक ।।

आळंदी हे महाराष्ट्राच्या धार्मिक भावनांचे केंद्रबिंदु आहे. आळंदीचे नाव  ऐकले की, ज्ञानेश्वर माऊलींची वात्सल्य प्रेमाने ओसंडून जात असलेली दयाघन ज्ञानमूर्ती डोळ्यांपुढे उभी राहते. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या या भुमीचे वारकरी सांप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. माउलींच्या समाधीबरोबरच येथे असणारे विविध मठ, मंदिरे यामुळे या तीर्थस्थानाला एक वेगळेच पावित्र्य लाभले आहे. अलंकापुरीतून आजपासून पालखी सोहळा सुरू होणार आहे.  आळंदी गावचा इतिहास फार जूना आहे. स्कंद पुराणात या गावाचा उल्लेख आहे.

आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा 28 जून रोजी सुरू होऊन 14 जुलै रोजी पंढरपूरला पालखी पोहोचणार आहे. ज्ञानेश्वर माऊली यांचे वडील पंढरीची वारी करीत, असा संदर्भ आहे. माऊलींनी ही वारी पुढे नेली. वाढवली. आता या वारीला महाकाय स्वरूप प्राप्त झाले आहे. वारीची सुरूवात आळंदीतून होते. या पवित्र गावात पाहण्यासारखं खूप काही आहे. माऊलींचे वास्तव्य लाभलेल्या या गावात  वारकरी येतात आणि माऊलीमय होऊन जातात.

शुभमंगला इंद्रायणी नदीच्या काठी बसलेले गाव म्हणजे आळंदी. सुमारे 725 वर्षापूर्वी इथे एक दिव्य-चरित्र घडले. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा दिव्य अवतार व चरित्र घडले ते याच परम पावन क्षेत्रांत. त्याच्यां खाणाखुणा या गावाने अजून जपून ठेवल्या आहेत. आळंदी हे गाव इंद्रायणी नदीच्या काठी खेडच्या (राजगुरुनगर) दक्षिणेस वसले आहे. इंद्राने पृथ्वीवर येऊन यज्ञयाग केले, त्यावरून इंद्रायणी हे नाव पडले. कुबेरगंगा असेही नाव होते. कुबेराने इंद्रायणीच्या काठी धन पुरून ठेवले होते. ज्ञानदेवांच्या पासून पुढे देहूला श्री तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठी राहिले. त्यामुळे ज्ञानोबा तुकारामाची "इंद्रायणी' म्हणून आबालवृद्धांच्या तोंडी बसले. साधु हे तीर्थांना तीर्थत्व प्राप्त करून देतात. ज्ञानदेवांचा स्पर्श या मुळच्या पवित्र नदीला झाल्यामुळे ती आता परम पवित्र झाली आहे.

आळंदी हे गावही ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. ताम्रपटात 'आळंदीस' म्हणून जे उल्लेख सापडतात ते मात्र या आळंदीचे नाहीत. ते थेऊरच्या पूर्वेस असणाऱ्या दुसऱ्या आळंदीचे आहे. तिला चोरांची आळंदी म्हणतात. ही देवाची आळंदी म्हणून प्रसिद्ध आहे. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडाच्या 64 व्या अध्यायात आळंदीची वरुणा, अलका, कणिका, आनंद व सिद्ध क्षेत्र अशी नावे आली आहे. मराठी संतांनी तिला अलंकापुरी म्हटले आहे. ज्ञानदेवांच्या जन्मापूर्वीही सिद्धेश्वर हे शंकराचे स्थान प्रसिद्ध होते. म्हणून या आळंदीस "सिद्धेश्वर' म्हटले असावे.

ज्ञानेश्वर महाराजांच्या देवळाला लागून पश्चिमेस हरिहरेंद्र ह्या नाथपंथीय स्वामींची समाधी आहे. तेथे त्यानंतर देऊळही बांधले आहे.तेथे स्वामींचे पूर्वज गुरुंच्या आणखी समाधी आहेत. त्यापैकी एका समाधीवर यादव काळातील काही पुसट उल्लेख आढळतात. या समाधीवर चंद्र-सूर्य ही काढले आहेत. सूर्य व चंद्र ही नाथपंथीय चिन्हे आहेत. इतिहासकार यांनी जे संशोधन केले आहे, त्यावरून आळंदी हे गाव मध्ययुगीन ठरते. अलिकडील काळातील उल्लेख सांगायचा म्हटले म्हणजे शिवाजी महाराजांनी एका सनदेद्वारा आळंदी येथील सव्वा दीडशे  वारखे  याजिराफ  शेताचे  खंडी  मण धान्य श्री ज्ञानदेवांकडे देऊन टाकले आहे.

आळंदी ही त्यावेळी चाकण प्रांतात समाविष्ट होती. या जमिनीचे व्यवस्थापक रामचंद्र गोसावी हे होते. शके  1613 मध्ये आळंदी चे कुलकर्णी मोरो भास्कर यांच्या विनंतीवरून राजाराम महाराजांनी समाधीच्या बाबतीत ज्या व्यवस्था केल्या त्या पुढे चालविण्याबद्दल बाळाजी नारायण यांना आज्ञा केली आहे.शके  1619 मध्ये बाळाजी जाधव यांनी आळंदी यात्रा केल्याचा उल्लेख आहे शके  1661 साली श्रीमंत पेशवे यांनी श्रींचे पूजा नैवद्यनंदादीपाचा खर्च अपुरा पडतो म्हणून आळंदी गाव श्रींकडे इनाम करून दिले आहे.देवळासमोर गरुड पाराजवळ एक दीप माल आहे त्यावरील शिलालेख पुसलेला आहे. परंतु त्याचा उल्लेख 'कान्होजी आंग्रे' यांच्यापत्नी लक्ष्मिबाई यांनी ती दीपमाळ शके  1665 मध्ये बांधली आहे.

पेशवे सरकार शके  1672 व 1675 मध्ये कार्तिक यात्रेस आले होते. पेशवे सरकारांनी हे गाव ज्ञानेश्वर महाराज संस्थानाला इनाम दिले आहे. त्यातील वसुलापैकी  रुपये समाधीसाठी खर्च करावा, असे म्हटले आहे. शके 1681, 1696  मध्ये पेशवे सरकारांनी यात्रेत रखवालीसाठी माणसे पाठवण्याबद्दल दिलेले हुकुम आढळतात.

आळंदीनजीक केळगाव येथील रानात श्री पांडूरंगाश्रम स्वामी यांनी देवालय बांधले व गोपाळकाला करू लागले. तेव्हा गोपाळपुराची वस्ती झाली. हा काळ शके 1670 चे सुमाराचा आहे.आळंदीत प्रवेश करतांना जो दगडी पूल आहे, तो पुण्याच्या ठाकूरदास अग्रवाल नावाच्या श्रीमंत सावकाराने  मध्ये बांधला त्यास  80 हजार रुपये खर्च आला. आता या नदीवर नवीन पूलही बांधला गेला आहे. या पुलावर आल्यावर गावातील देवळांची शिखरे दिसतात.यात्रेकरुंच्या मुखातून 'श्री ज्ञानेश्वर महाराज की जय' असे म्हणून नामाचा गजर होतो. दोन्ही हात जोडले जातात आणि मस्तक शिखराच्या दिशेकडे झुकून विनम्र होते.

।। अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र,
जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ।।

श्री ज्ञानदेवांनी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतल्याने, ह्या गावाचे महत्व अमर होऊन गेले आहे. गेल्या 700 वर्षात अनेक संतांच्या आणि ऐतिहासिक घटनांच्या पाऊलखुणा येथे उमटलेल्या आहेत. पौराणिक काळापासून हे गाव प्रसिध्द आहे. इतिहासकार राजवाडे यांच्या मते आळंदी हे गाव मध्ययुगातले आहे. इ. स. 768  च्या कृष्णराज राष्ट्रकूटांच्या तळेगाव ताम्रपटात आळंदी गावाचा उल्लेख आढळ्तो. इंद्राने पृथ्वीवर येऊन महायाग केला तो इथेच.

स्कंद पुराणातील सहयाद्रि खंडाच्या 64  व्या अध्यायात या गावाची वारुणा, अलका, कर्णीका, आनंद व सिध्दक्षेत्र अशी नावे आली आहेत. मराठी संतांनी या गावाचे नाव लडीवाळ्पणे अलंकापुरी ठेवले आहे. हरिहरेंद्र स्वामींच्या समाधीवर यादव काळातील उल्लेख सापडतात. श्री शिवाजी महाराजांनी एका शेताचे उत्पन्न श्री ज्ञानदेवांच्या समाधी स्थानास दिले होते. त्यानंतर राजाराम महाराज, बाळाजी बाजीराव पेशवे, पहिले बाजीराव वगैरेंनी आळंदी गावाकडे लक्ष पुरविले आणि आळंदीला गावपण दिले. क्षेत्राच्या सौदर्यांत भर पडली. त्यानंतर अनेक धनिकांनी या गावातील वास्तू बांधल्या. इ. स. 1867 साली येथे नगरपालिका स्थापन झाली.

          .......सतीश मोरे
                988191302

      satishmore302@yahoo.co.in

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...