फॉलोअर

१७ जुलै २०२१

रेठरे बुद्रुक आणि रेठरे खुर्द

 *निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !

१७ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आज पंढरीची वारी असती तर वेळापूरला येऊन पोहोचली असती. आज वेळापूर उद्या भंडीशेगाव परवा सोमवारी वाखरी आणि मंगळवारी पंढरपूर . मात्र प्रत्यक्षात यंदा वारी होणार नाही. मात्र आमची निसर्ग वारी आज पोहोचली आहे सहकार पंढरीमध्ये! सहकार पंढरी रेठरे बुद्रुक गावांमध्ये जाण्यासाठी सकाळी साडेसहा वाजता वाठार येथील पेट्रोल पंपावर वाहन उभे करून हरिपाठ म्हणत चालू लागलो. वाठार गाव पास करून आम्ही पुढे आल्यानंतर रस्त्याकडेला शेतामध्ये पाणी साचलेले पाहायला मिळाले. गेल्या दोन महिन्यात मुसळधार पाऊस झाला आहे त्या पावसामुळे महामार्गावरील अनेक शेतांमध्ये पाणी अजूनही साचलेले आहे. वाठार ते रेठरे दरम्यान अशाच प्रकारे शेतात असलेले पाणी पाहायला मिळाले.
रेठरे खुर्द येथे पोहचलो. रेठरे बुद्रुक आणि रेठरे खुर्द ही दोन गावे कृष्णाकाठची अतिशय सुंदर गावे आहेत. या गावात आल्यानंतर ओळखीचे काही ग्रामस्थ भेटले. आम्ही इतक्या लांब चालत आलेले आहेत हे ऐकून त्यांना अप्रुव वाटलं. त्यांना निसर्ग वारीची कल्पना सांगून राम कृष्ण हरी करत आम्ही पुढे निघालो.
रेठरे खुर्द गाव पार केल्यानंतर रस्त्याकडेला राधाकृष्ण मंदिर आहे तेथे आम्ही थांबलो. या मंदिरात अतिशय सुंदर देखणी अशी मूर्ती आहे. हे मंदिर एका मोठ्या झाडाखाली आहे. प्रथमदर्शनी हे झाड वडासारखे वाटले मात्र आज आमच्या सोबत सहभागी झालेले वाठार येथील माझे स्नेही प्रभाकर पाटील यांनी या झाडाबाबतची माहिती दिली. या झाडाला कळंब किंवा कदंबचे झाड म्हणतात. हा वृक्ष अनेक वर्षे जगतो, तो वडा सारखा उंच असतो. सातारा जिल्ह्यात फक्त एकमेव रेठरे खुर्द येथेच कळंब वृक्ष आहे. या वृक्षाच्या परिसरात राधाकृष्णाचं वास्तव्य असते.
भागवत पुराणात श्रीकृष्ण आणि कदंब यांचे अद्वैत ठायी ठायी निदर्शनास येते. 'बाळकृष्णा'च्या गोकुळातील सर्व लीलांचा कदंब साक्षीदार आहे. कालिया मर्दनाच्या वेळी याच झाडावरून 'देवकीनंदना'ने डोहात उडी घेतली, याच्याच फांद्यांमध्ये दडून गोपिकांची वस्त्र पळवली आणि याच झाडावर लपवून ठेवली. कर्णफुले म्हणून उपयोग करतानाच याची चेंडूसारखी कठीण फुले गोपाळांबरोबर खेळण्यासाठीही वापरली.
हे झाड धनंजय मारूती पाटील (तात्या) यांच्या शेतात आहे.या वृक्षाची माहीती समोर आल्यानंतर या वृक्षाखाली श्रीकृष्णाचे मंदिर बांधावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. धनंजय पाटील यांच्या पत्नीने या ठिकाणी एक नवस बोलला,त्यानुसार त्यांचा मुलगा उच्च पदावर जाऊन पोहचला आणि त्यानंतर या अमेरिकास्थित मुलाने पाठवलेल्या द्रव्यातून हे मंदिर उभे केले. या कदंब वृक्षाला आणि राधा कृष्णाला नमस्कार करून आम्ही पुढे आलो.
डाव्या बाजूला भारती विद्यापीठाचे जाई मोहिते हायस्कूल होते. तिथून पुढे आल्यानंतर कृष्णा नदीला समांतर असणारा रस्ता, या रस्त्याच्या बाजूलाअसणारी विस्तीर्ण शेती आणि उजव्या बाजूला कृष्णा नदी पाहून मन प्रफुल्लित झाले. या ठिकाणी पुढे असणाऱ्या एका कट्ट्यावरती यशवंतराव मोहिते भाऊ हे आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत असतं .राजकिय निवृत्तीनंतर भाऊ रोज संध्याकाळी या रस्त्यावर चालायला येत आणि या ठिकाणी बसत, या ठिकाणाला पुढे पेन्शनर चा कट्टा म्हणून नाव पडलं.
थोर विचारवंत यशवंतराव मोहिते भाऊ यांच्या आठवणी या निमित्ताने जाग्या झाल्या.रेठरे बुद्रुक या गावाचे नाव संपूर्ण राज्यभर आहे ते यशवंतराव मोहिते यांच्या विचारांमुळे. भाऊंसारखा ज्येष्ठ विचारवंत, समाजवादी व्यक्ती रेठरे बुद्रुक या गावात जन्माला आला,कराड तालुक्याला भाऊंचा सहवास लाभला आहे, हे आपल्या तालुक्याचे मोठे भाग्यच आहे. यशवंतराव मोहिते यांच्या विधानसभेतील अभ्यासू भाषणांचा विक्रम आजही अबाधित आहे. त्यांनी सामान्य जनतेसाठी राबवलेल्या योजनाची फळे आज आपण चाखत आहोत. सहकारातील उत्तुंग मनोरे यशवंतराव मोहिते आणि त्यांचे बंधू जयवंतराव भोसले यांचे गाव म्हणून रेठरे बुद्रुक या गावाला देशभर ओळख मिळाली आहे.
2002/3 च्या दरम्यान यशवंतराव मोहिते भाऊ यांची मुलाखत घेण्यासाठी प्रकाश देसाई यांच्यासमवेत मी रेठरे बुद्रुक येथील निवासस्थानी गेले होतो. भाऊंची मुलाखत आम्ही तीन भागात पुढारीमध्ये छापली होती. सुमारे तीन तास ही मुलाखत चालली होती. भाऊ बोलत होते आणि तेव्हा माझ्यासारख्या नवीन वार्ताहर हे सर्व ऐकत होता,भारावून गेला होता. भाऊंच्या मुलाखतीची टिपणे घेण्यासाठी आम्ही एक सोबत डायरी (पॅड) घेऊन गेलो होतो. त्या डायरीची सर्व पाने संपली तरी भाऊंची मुलाखत संपत नव्हती. भांऊचे विचार संपत नव्हते, भाऊ मनापासून, अंतःकरणापासून बोलत होते, एक वेगळा विचार मांडत होते आणि आम्ही तो टिपून घेत होतो. माझ्या आयुष्यातील भाऊंची मुलाखत ही एक सुंदर आठवण आहे.
माननीय जयवंतराव भोसले(आप्पा ) यांच्यासोबत माझ्या खूप आठवणी आहेत. आमचे बाबरमाची येथील काका दामू अण्णा पाटील यांच्या समवेत मी पहिल्यांदा जयवंतराव भोसले आप्पा यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. 98 साली माझ्या पत्नीला कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नोकरी मिळावी म्हणून मी आप्पांना भेटायला गेलो होतो. दामू आण्णा हे ओगले काच कारखान्याचे प्रसिद्ध कामगार नेते. दामू अण्णा यांचे जयवंतराव आप्पा यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. आप्पांच्या आणि अण्णांच्या शिफारशीवर माझ्या पत्नीला कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 1998 साली सहा नोकरी मिळाली होती. पुढे बीएडला ॲडमिशन मिळाल्यानंतर तीला ही नोकरी सोडावी लागली.आप्पांच्या समवेत झालेली माझी ही पहिली अतिशय सुखद अशी भेट.
2001 झाली पुढारीमध्ये काम सुरू केल्यानंतर जयवंतराव भोसले आप्पा यांच्या अनेक प्रेस कॉन्फरन्सला मी ट्रस्टवर गेलो होतो. माझ्यासोबत कराडचे निवडक चार पाच पत्रकार असायचे. प्रेस कॉन्फरन्सचा विषय फक्त पंधरा-वीस मिनिटांचा असायचा मात्र त्यानंतर जयवंतराव आप्पा यांच्या समवेत आमच्या तासभर गप्पा रंगायच्या. यादरम्यान कृष्णा ट्रस्ट निर्मितीमध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील याचे योगदान, अत्यंत कमी कालावधीत उभारलेलली कृष्णा हॉस्पिटलची इमारत, ग्रामीण भागात मेडिकल कॉलेज देताना पुण्या-मुंबईतील उच्चभ्रू लोकांनी दिलेला त्रास याबातच्या आठवणी आप्पा दिलखुलासपणे सांगत.
जयवंतराव भोसले आप्पा यांनी लिहिलेल्या जीवनयात्री या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या अगोदर आम्ही त्यांना भेटलो होतो. या पुस्तकामध्ये आप्पांनी जीवन मृत्यू,कर्तव्य, व्यवसाय,अध्यात्म, लोक, देश,परदेश आदी विषयावर प्रकाश टाकला आहे, हे पुस्तक संग्रही असे आहे. यशवंतराव मोहिते आणि जयवंतराव भोसले यांच्या सहकार क्षेत्रातील कार्याबाबत मी काय लिहीणार? त्यांचे कार्य फार मोठे आहे. या दोन्ही महामानवांचा सहवास मला लाभला हे माझे भाग्य आहे.
बावीस डिसेंबर या आप्पांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आप्पांची पुढारीसाठी घेतलेली एक मुलाखत मला आठवते. या मुलाखती दरम्यान त्यांनी एक विचार बोलून दाखवला होता, तो आजही माझ्या स्मरणात आहे. आप्पा म्हणाले होते, 'तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, कोणतेही काम करा. पण ते काम करताना तुम्ही ते करिअर म्हणून करा, वेळ घालवण्यासाठी, टाईमपास करण्यासाठी करू नका. शेती असो किंवा राजकारण असो, ते काम करताना जशी तुम्ही नोकरी करता तसा तुम्ही शेतीसाठी खूप पूर्ण वेळ दिला पाहिजे. तुम्ही जर राजकारण करत असाल तर राजकारणाकडे तुम्ही करिअर म्हणून पाहिले. तुम्ही जर सहकार क्षेत्रात काम करत असाल तर तुम्ही सहकार क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहिले पाहिजे. आपल्या नोकरी अथवा व्यवसायाकडे करिअर म्हणून पाहतात ते नक्कीच यशस्वी होतात' असे आप्पां मुलाखती दरम्यान बोलले होते.
जयवंतराव भोसले आप्पा आणि यशवंतराव मोहिते यांच्या आठवणीच्या प्रवासात चालत चालत आम्ही पुढे कृष्णा नदी पुलावर पोहचलो. या पुलावरून रेठरे बुद्रुक गावाचे अतिशय सुंदर असे चित्र दिसते. या परिसरात कृष्णा नदीचे पात्र विस्तीर्ण असे आहे. हा पुल रेठरे बुद्रुक आणि रेठरे खुर्द या गावांना जोडणारा आहे. हा पुल नव्हता तेव्हा कायलीतून प्रवास केला जायचा. अशा प्रकारची काईल नदीमध्ये आम्हाला पाहायला मिळाली. या पुलावरून पुढे जात असताना अनेक ओळखीचे भेटले, त्यांना नमस्कार केला, फोटो आठवणी टिपल्या आणि आम्ही सहकार महर्षी जयवंतराव भोसले स्वागत कमानी मधून रेठरे बुद्रुक गावात प्रवेश केला. या ठिकाणी रेठरे बुद्रुक येथील वार्ताहर दिलीप धर्म आणि त्यांचे सहकारी आमची वाट पाहत होते. रेठरे बुद्रुकच्या सरपंच सौ. सुवर्णा कापूरकर आणि मान्यवरांच्या उपस्थितांच्या समवेत आम्ही कापूरकर स्मारकाशेजारी एक वडाचे झाड लावले. त्यानंतर स्वर्गीय मारुती रावजी कापूरकर यांच्या समाधीचे दर्शन घेतले. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठलचा जयघोष केला. या ठिकाणी ज्योतिर्लिंग मंदिराचा ग्रामस्थांच्या सहकार्याने विनायक भोसले यांनी पुढाकार घेऊन नुकताच जीर्णोद्धार केला आहे. पूर्वीचे ज्योतिर्लिंग मंदिर आणि आत्ताचा परिसर पाहिला तर पटणार नाही इतका मोठा बदल झाला आहे. अतिशय नियोजनपूर्वक या मंदिराचा परिसर फुलवण्यात आलेला आहे. मंदिराच्या खाली लाॅन तयार करून बाग तयार केली आहे, आकर्षक पद्धतीने मंदिराची सजावट केली आहे. खुप दिवसानंतर या मंदिरात आज जाण्याचा योग आला. यापूर्वी जेव्हा या मंदिरात गेलो होतो तेव्हा वरती जायचा रस्ता साधा होता. मात्र आज पायरी वरून आम्ही वरती जात होतो. दोन्ही बाजूला हिरवळ तसेच वेगळ्या प्रकारची फुले झाडे आणि आकर्षक बाग पाहून खूप आनंद झाला. ज्योतिर्लिंग देवाचे मनोभावे दर्शन घेतले आणि या मंदिराच्या परिसरात काही थांबलो. रेठरे गावचा परिसर मंदिराच्या उंचावरून पाहिला.अतिशय सुंदर असा हा नजारा होता. त्यानंतर सहकार महर्षी आबासाहेब मोहिते घाट कमानीतून खाली येऊन स्मशानभूमी परिसरात आम्ही वडाची चार झाडे लावली.अतिशय भावभक्तीपूर्ण वातावरणात कृष्णा काठावर आम्ही ही वडाची झाडे लावली. यावेळी स्मशानभूमी परिसरात पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामचा आवाज घुमला. सर्व ग्रामस्थांना आम्ही धन्यवाद दिले आणि आमचा परतीचा प्रवास सुरु केला.
रेठरे बुद्रुक हे माझे आजोळ असल्यामुळे या गावात मी अनेकदा गेलेलो आहे. पूर्वी कृष्णा नदीवर पूल नव्हता. तेव्हा आम्ही शेणोली मार्गे रेठरेला जायचो. उन्हाळ्याची किंवा दिवाळीची सुट्टी लागली की माझे वडील मला कराड स्टॅंडवर कराड रेठरे बुद्रुक एसटीमध्ये बसवायचे, बस मधून या गावात जाण्याचा आनंद काही औरच होता. बसमधून दिसणारी शेतं, झाडं, कधीकधी झुकझुक गाडी, कृष्णा कारखाना पाहताना खूप मजा यायची.
माझ्या शालेय जीवनातील अनेक गोड आठवणी रेठरे बुद्रुक येथील आहेत. 1982 च्या दरम्यान अमिताभ बच्चन यांचा कुली चित्रपटपटाच्या सेटवर झालेला अपघात आणि त्यानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडताना अमिताभ बच्चन यांनी केलेला संघर्ष वृत्तपत्रांमध्ये छापून येत होता. अमिताभ बच्चन लवकर बरे होण्यासाठी अनेकांनी नवस केले होते, मी रेठरे बुद्रुक या गावातील मंदिरात जाऊन अमिताभ बच्चन लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना केली होती. यावेळी मी रेठरे बुद्रुक येथे आजोळी मुक्कामी होतो. आमच्या मामाची मुले हा पेपर मला दाखवत. अमिताभ बच्चन मला लहानपणापासूनच आवडतो. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या अपघाताची वाचलेली बातमी मला अजूनही आठवते.
या गावांमध्ये सुट्टीमध्ये जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्या ठिकाणी असणारी टुरिंग टॉकीज. माझ्या मामाच्या मुलीचा मुलगा रवींद्र शिंदे आणि मी सुट्टीत रेठरे गावात नक्की असायचो. आमच्या दोघांचा एक नित्यक्रम असायचा, रोज रात्री दहा वाजता रेठर्याच्या टूरिंग टाॅकिजमध्ये जाऊन चित्रपट पाहायचा. चित्रपट पहायला कधी मामाला विचारून तर कधी न विचारता जायचो.चित्रपट पाहायला न सांगता गेलो तर रात्री एक वाजता परत आल्यानंतर मामांच्या घराच्या पाठीमागील दारावरून वरती चढायला एक वाट होती, त्या वाटेतून आम्ही वर यायचं आणि शेजारच्या दुसऱ्या मामांचा टेरेस वरती जाऊन झोपायचं,अशा या माझ्या रेठरे बुद्रुक गावच्या आठवणी आहेत.
या गावात माघ पौर्णिमेला एक वेगळी लिंबाची यात्रा असते. घरातील ज्येष्ठ पुरुष लिंब नेसतात.लिंबाचा पाला शरीराभोवती गुंडाळून देवाची पूजा केली जायची. माझ्या मामाला लिंब नेसलेले मी पाहिले आहे. या यात्रेच्या निमित्ताने रेठरे बुद्रुकला देवाला नारळ द्यायला जायचे जाणे व्हायचे.
आजची वारी आठवणींच्या हिंदोळ्यावर होती. मामा- मामीने माझ्यावर केलेले निखळ प्रेम,आजोळी केलेली मज्जा, मामीच्या हातची खाल्लेली तूप रोटी अजूनही आठवते. पूर्वी आमच्या घरात कधीतरी भात खायला असायचा. पण रेठरे बुद्रुक येथे गेल्यानंतर दोन्ही वेळेला भात खायला मिळायचा. या भातामध्ये दोन-तीन चमचे तूप वाढणारी माझी मामी मला अजूनही आठवते. आजच्या मुलांना आजोळी राहायचे सुख मिळते का ? आपण खुप नशीबवान आहोत ना?
झुक झुक झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया!
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...