*निसर्गवारी*
_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१६ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
निसर्गवारी आज होती कालवडे गावात. आम्ही नेहमीप्रमाणे एकत्र आलो आणि वाठार गाव सोडून पुढे कालवडे फाट्यावर आमची वाहने पार्क केली. आज आमच्या सोबत सुधीर एकांडे हे माऊली सहभागी झाले होते, त्याचबरोबर सुनील शेवाळे उंडाळेहुन खास आमच्या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. साडेसहाच्या सुमारास आम्ही येथून चालावयास सुरुवात केले. जरा पुढे गेल्यानंतर आमचे वाहन पुढे नेण्यासाठी त्या ठिकाणी माझे सहकारी बालीश थोरात आले. ते वाहून गेल्यानंतर मी पुन्हा एकदा गावाच्या दिशेने चालायला सुरुवात केली.
कालवडेला जाणारा रस्त्याच्या दोन्ही कडेला उसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. ऊसाला पाणी पाजण्यासाठी अनेक मोटारी सुरू होत्या, हा परिसर भाजीपाला पिकासाठी (माळवे )प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी टोमॅटो दोडका मिरची याचे प्लाॅट दिसले. महामार्गापासून कालवडे पर्यंत तीन किलोमीटर अंतर आम्ही अर्धा तासातच पार केले. गावात प्रवेश केला गावातून चालत असताना लोक आम्हाला भेटले, अनेक जुने वाडे पाहायला मिळाले तसेच एका जुन्या वाड्यात असलेले सुंदर राम मंदिर पाहायला मिळाले. कालवडे गावातून बाहेर पडल्यानंतर नांदगावला जो रस्ता जातो त्या रस्त्याने आम्ही चालू लागलो. आज पहिल्यांदाच या रस्त्याने जात होतो. हा रस्ता पुढे नांदगावला जातो.
कालवडे गाव हे अतिशय समृद्ध आहे. या गावात कल्याणी समूहाची सुमारे चारशे एकर जमीन आहे. या जमिनीवर अत्याधुनिक शेती प्रयोग केले जातात, त्यांचा पोल्ट्री उद्योग आहे, नारळाच्या बागा आहेत. गावाबाहेर आल्यानंतर आता चढाचा रस्ता सुरू झाला. पुढे डोंगर होता आणि या डोंगरावरील महादेवाचे मंदिर आम्हाला लांबून दिसत होते आणि त्या डोंगरावरच आम्हाला जायचे होते. या रस्त्यावरून चालताना दोन्ही बाजूला डोंगराच्या कडेला ऊस शेती खरंच पाहण्यासारखी आहे. डोंगरावर सामाजिक वनीकरणाने मोठ्या प्रमाणात झाडे लावल्यामुळे हा परिसरात अतिशय सुंदर दिसतो. या झाडावर मोरांची वस्ती आहे. पुढे तीन किलोमीटर आल्यानंतर आम्हाला उंचावर उंडाळे प्रादेशिक योजनेची पाण्याची टाकी दिसली. आम्ही त्या डोंगराच्या पायथ्याशी आलो आणि उजवीकडे वळून पुढे चालू लागलो. येथे आम्हाला एक मंदिर पहावयास मिळाले. या मंदिरातील देवी गाईवर बसलेली होती, गाईवर बसलेली ती रुक्मिणी माता होती. अशा प्रकारचे मंदिर पहिल्यांदाच पाहायला मिळाले. त्या माउलीला नमस्कार करून पुढे आम्ही डोंगराकडे चालू लागलो.पावणे आठच्या सुमारास आम्ही या डोंगरावर पोहोचलो.
डोंगरावर सुळागिरी महादेव मंदिर आहे. हे अतिशय जुने मंदिर असून गावातील युवकांच्या प्रयत्नातून त्याचा जिर्णोद्धार अतिशय प्रयत्नपूर्वक सुरू आहे. मंदिर छोटेखानीअसलले तरी परीसर सुंदर आहे. या डोंगरावरून कराड आणि वाळवा तालुक्यातील कासेगाव, वाठार, बेलवडे, कालवडे, काले या गावांचे दर्शन होते. समोर मच्छिंद्रगड आणि चौरंगीनाथचा डोंगर दिसतो. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे हा.या मंदिरात पोहोचल्यानंतर उपस्थित सर्व शिवभक्तांच्या मदतीने या ठिकाणी आम्ही पाच वडाची झाडे लावली.
सुळागिरी महादेव मंदिराचा उल्लेख पांडवप्रताप या ग्रंथामध्ये आहे. शंकराला प्रसन्न करुन शिवभक्त रावणाने शिवलिंग मिळवले होते. ते शिवलिंग गणपतीने बालक रूपातून रावणाच्या हातातून काढून घेतले आणि जेव्हा रावण लघुशंकेला गेला तेव्हा ते शिवलिंग जेथे ठेवले ते गोकर्ण महाबळेश्वर.या घटनेनंतर संतप्त झालेला रावण वणवण फिरू लागला आणि तो कालवडे परिसरात आलेला होता. त्याच्या हातातील मळापासून शिवलिंग तयार झाले आहे अशी अख्यायिका आहे.
गेल्या काही वर्षापासून कालवडे ग्रामस्थ, शिवभक्त आणि युवकांच्या मदतीने या मंदिराच्या परिसरात जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तसेच वर्गणीतून येथे अनेक कामे झाली आहेत. या मंदिरापासून पुढे काही अंतरावर निळागिरी मंदिर असून मंदिराकडे जाण्यासाठी पाऊलवाट आहे. सुळागिरी मंदिर आणि निळागिरी मंदिर ही दोन्ही ठिकाणी अतिशय सुंदर आहेत. कराडपासून जवळ पाहण्यासाठी हीअतिशय निसर्गरम्य ठिकाणे आहेत. आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी झाडे लावली आणि परत आमचा प्रवास सुरु केला.
गावात आल्यानंतर गावातील विठ्ठल रुक्माई मंदिर तसेच चिलाई देवीचे दर्शन घेतले. पुरातनपासून धार्मिकतेचा वसा जपणाऱ्या कालवडे नगरीमध्ये अनेक देव-देवतांची मंदिरे पूर्वजांनी सुसज्ज अशी बांधलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक जागृत देवस्थाने आहेत त्यामध्ये कालवडे गावच्या चिलाई देवी या जागृत देवस्थानचा उल्लेख केला जातो. म्हणून या देवस्थानचे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न कालवडेकर करत आहेत. कालवडे गावातील ग्रामस्थ व सासरी गेलेल्या माहेरवाशिणी तेवढ्यात धार्मिकतने या जागृत देवस्थानचा वसा जपत आहेत.
गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चौरस आकार असणाऱ्या दगडाच्या विहिरीमध्ये उत्तरेच्या बाजूस ईशान्य कोपऱ्यामध्ये विहिरीत सुमारे दहा फूट खोलीवर चिलाई देवी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. तर बाजूला सात दोऱ्या आहेत यामध्ये सात सुवासिनींची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. सुमारे ५० फुट खोल असणाऱ्या चौरस आकाराच्या पारंपारिक विहिरीची कलात्मक बांधणी भाविकांना परंपरेचे दर्शन घडवते. विहिरीत उतरण्यासाठी रुंद दगडी पायर्या व बाजूचे बांधकाम कित्येक पिढ्यानी पाहिले आहे. ते बांधकाम आज अखेर तसेच आहे. सुमारे सात फूट रुंद व 50 फूट लांब विहिरीच्या तिन्ही बाजूनी तिन्ही बाजूने कार्यक्रम पाहण्यासाठी चबुतरा तयार करणे केला आहे.
या विहिरीतील पाण्याचे महत्व सांगावयाचे म्हटले तर पावसाळ्यामध्ये कितीही पाऊस पडला तरी देवी चिलाई देवी मातीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंतच पाणी भरले जाते. मूर्तीपासून वरती सुमारे दहा फूट उंच विहीर असून सुद्धा पाणी मूर्तीच्या गळ्यापासून वर आज आखेर आलेले नाही.
चिलाई देवीच्या जागृत देवस्थान विहिरीचे महात्म्य परंपरेपासून आजही अत्यंत काटेकोरपणे पाळले जात आहे. म्हणूनच गावातील प्रत्येक कुटुंबातील व सासरवासिनी यांना होणारे पहिले अपत्य या विहिरीत पाण्यावरती पाळण्यामध्ये बसवून फेऱ्या काढून सोडण्याचा कार्यक्रम केला जातो. ही परंपरा गावातील प्रत्येक कुटुंब अखंडितपणे जपत आहेत. ही परंपरा जपताना होणाऱ्या आर्थिक खर्चाचा विचार न करता आपल्या हातून होणाऱ्या अन्नदानाचा विचार करून हजारोंच्या संख्येने नातेवाईक मित्रमंडळी ग्रामस्थ यांना स्नेहभोजन देतात.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला व मामांना ही नवीन वस्त्रे तसेच सात सुवासिनींची परिस्थितीनुसार खणा-नारळाने ओटी भरली जाते. पाळण्यात सोडण्याच्या कार्यक्रमाच्या प्रथेप्रमाणे पहाटे चिलाई देवीच्या मूर्तीला पाणी घालून साडीचोळी अर्पण केली जाते. सकाळी नऊ वाजता सात सुवासिनींना पान विडा व हळदीकुंकू देऊन भोजनाचे निमंत्रण दिले जाते. सकाळी दहा वाजता कार्यक्रम केला जातो . त्यानंतर सकाळी 11 वाजता सात सुवासिनींची मंडपामध्ये पूजा केली जाते. कुटुंबातील सर्वजण या नवीन वस्त्रे परिधान करतात या कार्यक्रमासाठी त्याचे आई-वडील आपत्ती व सात सुवासनी आदल्या रात्री बारा वाजल्यापासून ते सोडण्याचा कार्यक्रम होऊन पाद्यपूजन होईल तोपर्यंत पाणी सुद्धा ग्रहण करत नाहीत. ज्या कुटुंबामध्ये कार्यक्रम आहे ते कुटुंब व सुवासिनी पायात चप्पल घालत नाही. त्या सर्व कार्यक्रमांमध्ये देवीचे पूजन व भोजन याला फार महत्त्व आहे, जोपर्यंत सात सवासनी भोजन करत नाही तोपर्यंत कोणीही भोजन करत नाही. त्यानंतर मात्र सर्वजण भोजन करतात.
चिलाई देवी आणि विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला आणि कराडात पोहचलो.आजच्या निसर्ग वारीमध्ये नवीन ठिकाण पाहायला मिळाले. सुळागिरी आणि निळागिरी या देवस्थान ला जाण्यासाठी एक दिवसाची छोटी सहल अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आपण नक्की जा.
सामाजिक कामासाठी आज एका ठिकाणी जावे लागले, या कामाबाबत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आलेल्या अनुभवाबाबत मी लवकरच स्वतंत्र लिहिणार आहे. ज्या ठिकाणी गेलो होतो तिथेही मी आणि रणजीत पाटील यांनी पाच वडाची झाडे लावली, हा एक आनंदाचा क्षण तुम्हाला शेअर करावासा वाटतो. यामुळे आजचा ब्लॉग झाला उशीर झाला आणि सविस्तर लिहू शकलो नाही उद्या सविस्तर देत आहे.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*
Best casinos near me - DrmCD
उत्तर द्याहटवाLooking 청주 출장마사지 for 충청북도 출장안마 the best casinos 안산 출장마사지 near me - 고양 출장샵 DrmCD 보령 출장샵