फॉलोअर

०७ जून २०२६

अक्षरांचा जादूगार : अक्षरगुरू राहुल (जगन) पुरोहित

अक्षरांचा जादूगार : अक्षरगुरू राहुल (जगन) पुरोहित

"अक्षर म्हणजे विचारांना मिळालेले अमरत्व." या एका वाक्यात अक्षराचे संपूर्ण महत्त्व सामावलेले आहे. अक्षराविषयी आपण कितीही बोललो तरी ते कमीच आहे. अक्षर हा केवळ शब्द लिहिण्याचा मार्ग नाही, तर तो व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे. सुंदर, सुवाच्य आणि रेखीव अक्षर माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच उंची प्रदान करते. अक्षर हा खरोखरच आयुष्याला लाभलेला एक अनमोल दागिना आहे.

संस्कृतमध्ये म्हटले आहे, "अक्षरं न क्षरति इति अक्षरम्" — जे कधी नष्ट होत नाही ते अक्षर. माणूस नश्वर असला तरी त्याचे विचार, त्याचे ज्ञान आणि त्याची ओळख अक्षरांच्या रूपाने कायम जिवंत राहते.

परंतु या अनमोल दागिन्याची जपणूक करण्यासाठी, अक्षर अधिक सुंदर आणि प्रभावी करण्यासाठी आपल्यापैकी किती जण प्रयत्न करतात? अक्षर सुधारण्यासाठी किती जणांनी सातत्याने मेहनत घेतली आहे? आणि अशा प्रयत्नांना योग्य दिशा देणारा एखादा शिक्षक, मार्गदर्शक किंवा गुरू आपल्याला भेटला आहे का?

याचे उत्तर आहे – होय! असे एक व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य अक्षराच्या साधनेसाठी अर्पण केले. ते म्हणजे कराड येथील अक्षरगुरू राहुल उर्फ जगन पुरोहित.

साधारण दहा वर्षांपूर्वी त्यांनी "अक्षरसंस्कार" या नावाने एक संस्था सुरू केली. सुरुवातीला अनेकांना आश्चर्य वाटले. "अक्षर सुधारण्याचाही क्लास असतो?" असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. परंतु राहुल पुरोहित यांनी केवळ अक्षर सुधारण्याचे प्रशिक्षण दिले नाही, तर अक्षराच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास, अभ्यासातील प्रगती आणि यशाचा मार्ग विद्यार्थ्यांसमोर उघडून दाखवला.

"तलवारीपेक्षा अक्षराची ताकद अधिक असते," असे म्हटले जाते. कारण तलवार शरीर जिंकू शकते, पण अक्षर मन जिंकते. राहुल पुरोहित यांनी हीच ताकद विद्यार्थ्यांच्या हातात देण्याचा संकल्प केला.
अक्षरातील वेलांट्या, उभ्या-आडव्या रेषा, अनुस्वार, मात्रांचे सौंदर्य आणि अक्षरातील शिस्त यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांनी स्वतःची एक वेगळी लेखनशैली विकसित केली. त्यांचा उद्देश केवळ स्वतःचे अक्षर सुंदर बनवणे नव्हता, तर प्रत्येक विद्यार्थ्याला सुंदर अक्षराचा हा दागिना मिळवून देणे हा होता.

आज "अक्षरसंस्कार" ही संस्था कराड तालुक्यातील अनेक गावांमध्ये कार्यरत आहे. सातारा, सांगली, पुणे यांसारख्या शहरांत तिचा विस्तार झाला असून लवकरच मुंबईतही तिची वाटचाल सुरू होत आहे.

राहुल पुरोहित हे माझे 2001 पासूनचे मित्र. त्यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. त्यांचे वडील कराड येथील रॉयल चित्रपटगृहात व्यवस्थापक होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राहुल यांनीही त्याच चित्रपटगृहात व्यवस्थापक म्हणून काम केले. मात्र त्यांच्या मनातील शिक्षक, संशोधक आणि अक्षरप्रेमी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.अखेरीस त्यांनी नोकरीचा मार्ग सोडून शिक्षण आणि अक्षरसंवर्धनाचा मार्ग निवडला. 

सोमवार पेठ, कराड येथे त्यांनी स्वतःचा क्लास सुरू केला. त्या काळात अक्षर सुधारणा या विषयाबाबत फारशी जागृती नव्हती. तरीही त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि विद्यार्थ्यांमध्ये सुंदर अक्षराचे महत्त्व रुजवले.

कोरोना काळात त्यांनी ऑनलाइन प्रशिक्षणाची अभिनव संकल्पना राबवली. अक्षर सुधारण्यासाठी विशेष अभ्यासक्रम तयार करून त्यांनी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. आजवर दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला आहे.

या विद्यार्थ्यांचे अक्षर सुधारले, त्यांचा आत्मविश्वास वाढला, स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. शिक्षक आणि मित्रांमध्ये त्यांचा सन्मान वाढला. काही विद्यार्थी शाळेच्या फळ्यावर सुविचार लिहू लागले, तर काहींना परीक्षांमध्ये अधिक चांगले गुण मिळू लागले.

याच संदर्भात संत तुकाराम महाराजांचे शब्द आठवतात —
"आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने."

शब्द आणि अक्षरांचे हे रत्न विद्यार्थ्यांच्या जीवनात झळकू लागले की त्यांचे व्यक्तिमत्त्वही उजळून निघते. राहुल पुरोहित यांनी हजारो विद्यार्थ्यांना हेच रत्न प्राप्त करून दिले आहे.सुंदर अक्षराचा प्रभाव केवळ लेखनापुरता मर्यादित राहत नाही. स्वच्छ, सुवाच्य उत्तरपत्रिका परीक्षकावर सकारात्मक छाप पाडते. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये अक्षराचाही मोठा वाटा असतो, हे राहुल पुरोहित यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या अनुभवातून सिद्ध केले आहे.

संस्कृत सुभाषितात म्हटले आहे —
"विद्याधनं सर्वधनप्रधानम्"
विद्येचे धन हे सर्वश्रेष्ठ धन आहे. परंतु त्या विद्येला आकार देणारे माध्यम म्हणजे अक्षर. म्हणूनच "अक्षर हे संस्कृतीचे जिवंत स्मारक आहे" असे म्हणतात.

अक्षरासोबतच राहुल पुरोहित सरांनी  सुंदर आणि प्रभावी स्वाक्षरी यावर प्रशिक्षणही सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि युवकांना स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करता येत आहे.


आज गावोगावी, शाळाशाळांत जाऊन ते विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या कार्यात पत्नी आणि मुलाचीही मोलाची साथ लाभत आहे. भविष्यात "अक्षरसंस्कार" ही संकल्पना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

अक्षरगुरू राहुल उर्फ जगन पुरोहित यांनी केवळ अक्षरे सुधारली नाहीत; त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि भविष्य घडवले आहे. त्यामुळे भविष्यात "अक्षरगुरू" हे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आदराने घेतले जाईल, याबद्दल कोणतीही शंका नाही.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते —
"अक्षरांची पूजा म्हणजे ज्ञानाची साधना."
ही साधना आयुष्यभर करणाऱ्या, अक्षरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन घडवणाऱ्या अक्षरगुरू राहुल उर्फ जगन पुरोहित यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!


सतीश मोरे सतिताभ 
९८८११९१३०२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...