फॉलोअर

Saswad लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Saswad लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२९ जून २०१९


राम कृष्ण हरी,

पुण्यातील दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सकाळी आम्ही सासवडच्या दिशेने चालायला निघालो. (त्यामुळे दोन दिवस ब्लाँग नव्हता ) पुणे ते सासवड हे अंतर सुमारे बत्तीस किलोमीटर आहे. एका दिवसात हे अंतर पार करणे म्हणजे खूप अवघड काम असते. माऊली पालखी सोहळ्यात सहभागी असणाऱ्या पूर्णवेळ वारकऱ्यांना हे अंतर काहीच वाटत नाही मात्र आमच्यासारख्या मोकळा समाजात फिरणाऱ्या वारकऱ्यांना हे आव्हानच असते, हाच विचार करून नवा रस्ता पेठ ते दिवे घाट हे अंतर आम्ही कालच रात्री परवा चालून पूर्ण केले होते.

आज दिवेघाटात सकाळी दहाच्या सुमारास पोचलो आणि चालावयास सुरुवात केली. रस्त्यावर दुतर्फा मोकळा समाजातील वारकऱ्यांची आणि छोट्या-मोठ्या दिंडी यातील वारकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी होती. घाटाच्या पायथ्याशीच आम्हाला पुढारी ऑनलाइनच्या वृत्तांसाठी एक ज्येष्ठ वारकरी भेटले, गळ्यात तुळशीच्या अनेक माळा, फक्त धोतर नेसलेले हे वारकरी पुढारीचा बूम माईक पाहून माझ्याकडे धावत आले.त्यांना विचारले वारीतून तुम्हाला काय मिळते तर ते बोलू लागले ,मी नाशिकहुन आलो आहे,गेली अनेक वर्षे मला डॉक्टरांनी रक्तात साखर जास्त असल्याचे सांगितले आहे, मात्र मी एक गोळी खात नाही,प्रत्येक वर्षी पंढरीची वारी करतो. या वारीतून मला पुढील वर्षभर नामाचे टॉनिक मिळते आणि पूर्ण खडखडीत बरा होतो,असे ते म्हणाले. अशा प्रकारच्या वारकऱ्यांच्या भावना असतात या वारकऱ्यांचा निरोप घेऊन आम्ही दिवेघाट चारावयास सुरुवात केली.



ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा यादरम्यान हडपसर च्या पाठीमागे होता मात्र सोहळ्याच्या पुढे चालणारे मोकळ्या समाजातील अनेक वारकरी दिवेघाटात पोहोचले होते, सोहळ्यातील प्रमुख दिंड्यांचे साहित्य घेऊन जाणारे ट्रक तसेच मोकळ्या समाजातील दिंड्यांचे ट्रक घाटाच्या उजव्या बाजूने वर जात होते तर वारकरी डाव्या बाजूने घाटात चालत होते. वारकऱ्यांचा उत्साह हळूहळू वाढत होता. खुल्या समाजातील वारकऱ्यांना स्वतःचे साहित्य वाहून नेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे साधन नसते, त्यामुळे ते त्यांचे साहित्य डोक्यावर घेऊनच पुढे चालत असतात. डोक्यावर मोठी बॅग घेऊन चालणाऱ्या महिला वारकरी त्यांच्यासोबत असलेले पुरुष वारकरी आणि अशा प्रकारच्या दिंड्या मध्ये असणारे एक वेगळी व्यवस्था पहावयास मिळाली. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी मराठी भाषा बोलतात मात्र त्यांच्या बोलण्यावरून ते कोणत्या भागातून आले असतील याचा अंदाज येतो.त्यांच्या सोबत गप्पा मारत घाटावरील वळणावर थांबत थांबत आम्ही दिवे घाट चढत होतो .रस्त्याच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक पाण्याचे टँकर उभे होते या टँकरमध्ये वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. टँकरमधील पाणी व्यवस्थित न पिता अनेक वारकरी पाणी वाया घालवत होते, हे पाहून रणजीत पाटील यांनी वारकऱ्यांना चढ्या आवाजात सुनावले, 'जे पाणी वाया घालवणार त्यांना माऊली नाही भेटणार',असा गोड दम देऊन  नाना पुढे चालत होते. घाटाच्या कट्ट्यावर काही वारकरी बिड्या ओढत निवांत बसले होते ,काहीजण तंबाखू खात होते. यांना पाहूनआम्हाला तुमच्या बिडीचा त्रास होत आहे  तुम्ही धूम्रपान करू नका. 'जो वारीत बिडी ओढणार त्याला माऊली वरचा रस्ता दाखवणार',अशा प्रकारचा दुसरा एक गोड दम देऊन आम्ही पुढे चालू लागलो.

पाय नसलेला एक वारकरी पांगुळगाड्यावरून घाट चढत होता. दोन्ही हाताने तो गाडा ढकलत होता, त्याच्या मदतीला अनेक वारकरी गाडा ढकलण्यासाठी पुढे येत होते तर काही जण त्याच्या मदतीसाठी डब्यामध्ये पैसे टाकत होते. अपघातांमध्ये पाय गेल्यानंतर माऊलींच्या दर्शनासाठी केलेला संकल्प पूर्ण पाडण्यासाठी मी वारी सुरू केली गेली, अनेक वर्षे वारी करतोय असे त्या दिव्यांग वारकर्‍यांने सांगितले.

आम्ही पुढे चालत होतो घाटाच्या शेवटच्या दोन वळणावर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या ओबी व्हॅन उभ्या होत्या, या कॅमेरासमोर येऊन काहीतरी वेगळे दाखवण्याचा प्रयत्न काही दिंडीतील वारकरी करत होते. दिवे घाट जिथे संपतो त्या अगोदर एक छोटीशी गुहा आहे आणि त्याच्या शेजारीच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. त्या गुहेमध्ये बसून फोटो काढण्याचा मोह अनेकांना होतो,आम्हीही तो पूर्ण करून घेतला. शेजारच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये वारकऱ्यांसाठी मोफत चहा वाटप सुरू होते तर समोर सेवाभावी कार्यकर्ते अक्षरशः वारकऱ्यांना थांबवून,विनंती करुन त्यांना चहा देत होते. थंड हवा वाहत होती, पाऊस येण्याची शक्यता होती त्यामुळे आम्ही पुढे लवकर निघालो.



घाट माथ्यावर असलेल्या झेंडेवाडी गावात ग्रामस्थांनी,परिसरातील सेवाभावी संस्था आणि पुण्यातील अनेक मंडळांनी अनेक मदतीचे स्टॉल उभे केले होते .पुण्यातील सालासर हनुमान चालिसा मंडळाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी एक कक्ष उभारला होता. या ठिकाणी आलेल्या वारकऱ्यांचे पहिल्यांदा गरम पाण्याने हात-पाय धुतले जात होते, त्यानंतर त्यांच्या पायाला, बोटांना, गुडघ्यांना मॉलिश करून त्या वारकर्यांचे वेदना कमी करण्याचा हे लोक प्रयत्न करत होते. यामध्ये महिलांचाही सक्रिय सहभाग होता. पुण्याच्या योग विद्या संवर्धन मंडळाने आदरणीय डॉ. पी. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारचा कक्ष उभारला होता. आलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी या कक्षांमधील अनेक सेवेकरी हृदयापासून काम करत होते.

घाट माथ्यावर वारकऱ्यांसाठी चहापाणी,फराळ ,केळी,आम्रस  लिंबू सरबत,जेवण या सर्व सुविधांची रेलचेल होती.सेवा भावी संस्थांचे कार्यकर्ते वारकऱ्यांना आदरातिथ्याने खाऊच्या वस्तू घेण्यासाठी विनंती करत होते. यामध्ये तरुणांचा सहभाग नोंदणीय होता. झेंडेवाडीत एक तास आराम केल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास सुरु केला, तत्पूर्वी कुठे जेवण मिळते का याचा शोध घेऊ लागलो.मात्र त्याच वेळी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला.आम्ही आडोसा शोधत एक छोटस हॉटेल गाठलं.अचानक जोरात पाऊस झाल्यामुळे वारकरी भांबावून गेले. आम्ही तिथेच बसून राहिलो पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता, भूक खूप लागली होती शेवटी तिथेच मिसळपाव खाऊन घेतला.तिथून हळूच बाहेर येऊन पावसात भिजत नाम नामामध्ये चिंब झालेल्या वारकऱ्यांचा व्हिडिओ आणि फोटो काढले.दिवेघाटात जाऊन काही फोटो काढले,वारकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या.घाटात वर येणारी वाहने आणि वारकरी यांची झालेली गर्दी त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. मात्र पोलिस यंत्रणेने अतिशय चांगल्या पद्धतीने वारकऱ्यांना रस्ता मोकळा करून दिला. या संपूर्ण वारीत पोलिसांचे सहकार्य खरंच वाखाणण्यासारखी असते. एरव्ही डोळे वटारुन थांबवणारे पोलीस या वारीत वारकऱ्यांना  'माऊली' नावाशिवाय बोलवत नाहीत.

तीनच्या सुमारास पाऊस कमी झाला आणि पुढचा प्रवास सुरु केला,माऊलींची पालखी अजून उरळीकांचन मध्ये होती. त्यामुळे आम्ही पुढे चालू लागलो. भिजलेले वारकरी रस्त्याकडेला थांबून कपडे सुकवण्याचा प्रयत्न करत होते. काहीजण ट्रक खाली बसून जेवण करत होते, तर काही जण रस्त्यावर पडलेला कचरा केळीच्या साली,चहाचे कप उचलत होते. पुण्याच्या रिँबिंनहूड या संस्थेच्या युवा कार्यकर्त्यांचे मला चांगलेच अप्रुव वाटले, हे कार्यकर्ते वारकऱ्यांना लिंबू सरबत देत होते त्याच वेळी वारकऱ्यांनी रस्त्यावर टाकलेले कप व इतर कचरा ते गोळा करत होते.अधिक माहिती घेतली असता ही संस्था पुण्यातील हॉटेलमध्ये शिल्लक राहिलेले अन्न गोळा करून रोज झोपडपट्टीमध्ये पोहच करतात, अशी माहिती मिळाली. या कार्यकर्त्यांना कौतुकाची थाप देऊन पुढे निघालो. रस्त्याकडेला असणाऱ्या अनेक घरांमध्ये वारकरीही विसावले होते. स्थानिक ग्रामस्थ त्यांना चहा पाणी विचारपुस करत होते  यामध्ये छोटी मुलेही कमी नव्हती. आईने तयार करून दिलेला चहा रस्त्यावर आणून वारकऱ्यांच्या वाटणाऱ्या दोन छोट्या चिमुकल्यांचं मला फार कौतुक वाटलं.लेकीची आठवणी झाली. राम कृष्ण हरी !


अजून सासवड सहा किलोमीटर होते.सासवडच्या परिसरात असणाऱ्या बोराच्या सीताफळाच्या बागा पाहत पाहत गप्पा मारत ,माऊलींचे नाम घेत आणि मधूनच वेगळे फोटो काढत आमचा प्रवास सुरू होता. भिजलेले कपडे आता अंगावरच पूर्ण सुकले होते. सासवडला कधी पोहोचणार याचे वेध लागले होते. थंडीमुळे,भिजल्यामुळे पाय खूप दुखत होते मात्र बसायला कुठे जागाच नव्हती. सगळीकडे चिखल आणि ओलसर जागा होती,त्यामुळे चालतच राहिलो.

साडेपाचच्या सुमारास सासवडमध्ये शाळा नंबर 4 मध्ये बारा नंबर दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. कारमध्ये बसून वेगळी बातमी आणि ब्लॉग तयार केला. सासवड मध्ये गेले चार दिवस पाणीपुरवठा आला नव्हता, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाणी येते अशी माहिती मिळाली. मात्र प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी,वारकऱ्यांच्या सेवेसाठी दमदार तयारी केली असल्याचे सांगण्यात आले. थोडा आराम करून शेजारीच असलेल्या सोपानकाकांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. या ठिकाणी चर्चा करताना खरात माऊली यांनी हातात शस्त्र नसणारे तीन देव आहेत आणि हे देवच जगाला शांतीचा मार्ग दाखवतील असे सांगितले.पंढरपुरचा विठ्ठल ,भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर या तिघांच्या हातात कसल्याही प्रकारचे शस्त्र नाही. विनाशस्त्र या तिन्ही देवांनी भक्तीचा वेगळा मार्ग सांगितला आहे, ही एक वेगळीच माहिती आज ऐकावयास मिळाली. पंढरीच्या वारीत खूप काही शिकायला मिळते,आजही मिळाले.

बारा नंबर दिंडीमध्ये असणारे तंबू मध्ये आपले साहित्य घेऊन ठेवून पुन्हा लिहित बसलो,पावसाची पिरपिर चालू होती,आज रात्रभर असाच पाऊस राहिला तर थोडे वारकऱ्यांची गैरसोय होणार आहे.मात्र सासवडमध्ये असणाऱ्या सुमारे तीन लाख वारकऱ्यांची काळजी माऊली घेणार आहेत.त्यामुळे कसलीच अडचण येणार नाही.

राम कृष्ण हरी माऊली !

 😌जय माऊली😌

माऊली सतीश मोरे

Also available at
👇karawadikarad.blogspot.com

👇
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2463181780404657&id=100001385769226

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...