फॉलोअर

११ फेब्रुवारी २०२१

उत्साहाचा उस्फुर्त झरा... खासदार श्रीनिवास पाटील




उत्साहाचा उस्फुर्त झरा

खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांचा आज वाढदिवस. मारूल हवेलीकर, पुणे कलेक्टर, कराड लोकसभा मतदार संघाचे खासदार, सिक्कीमचे राज्यपाल ते आज सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या विनम्र स्वभावामुळे श्रीनिवास पाटील साहेब सातारा सांगली कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील अनेकांच्या हृदयात आहेत. 


प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती होऊन त्यांचे मित्र खासदार शरद पवार यांच्या आग्रहाखातर ते राजकारणात आले आणि त्यांनी राजकारणात सुद्धा प्रशासकीय कामातील अनुभवाच्या शिदोरीवर प्रचंड कामे करत एक खासदार काय करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण बनले आहेत. कराड लोकसभेचे खासदार म्हणून ते १९९९ साली निवडणूक जिंकले. खासदार म्हणून निवडून दिल्यानंतर त्याने कामाचा सपाटाच लावला. मी २००१ पासून त्यांना ओळखतो. तेव्हा निवास पाटील यांच्या कार्यालयात सतत जाणे आणि व्हायचे. तत्पूर्वी रेल्वे रिझर्वेशन कन्फर्म होण्याचे करण्यासाठी खासदार ऑफिसमध्ये पत्र घेण्यासाठी माझ्यासारखे अनेक जण त्यांच्या कार्यालयात जात. खासदारांचे पत्र मिळाल्यानंतर रेल्वेचे रिझर्वेशन कन्फर्म होते हे याअगोदर कुणालाच माहीत नव्हते.


 वेगवेळ्या कारणासाठी श्रीनिवास पाटील यांच्याशी झालेली भेट यातूनच आमची ओळख घट्ट होत गेली. श्रीनिवास  पाटील यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक नाना खामकर यांच्या माध्यमातून मला श्रीनिवास पाटील यांच्याकडे यांच्यासोबत गप्पा मारायचा योग यायचा. कामाचा किती व्याप असला तरी श्रीनिवास पाटील पत्रकारांसाठी स्वतंत्र वेळ द्यायचे. 


केंद्र सरकारच्या माध्यमातून कराड भागातील कामे करण्यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा असायचा. त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा अधून मधून प्रयत्न होत असे.अशी परिस्थिती निर्माण झाली तर खासदार कार्यालयातून आम्हाला पाटील यांनी केंद्रीय मंत्र्यासोबत केलेल्या पत्रव्यवहाराचे कागदपत्रे तात्काळ पोहोच होती. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याची सवय श्रीनिवास पाटील यांना कधी नव्हती, हे या पत्रातून आम्हाला अनेकदा समजून यायचे.


कोणतेही काम करायचे असेल तर ते कसे करायचे, त्यासाठी कोणाला पत्र लिहायचे, कुठल्या नियमांत बसवायचे, त्याचे प्रशासकीय मंजुरी कशी घ्यायची,  खासदार फंडात जर एखादी गोष्ट बसत नसेल तर वेगळ्या फंडात बसवून कसा पैसा आणायचा, केंद्रीय  पातळीवर कसा पाठपुरावा करायचा, दिल्लीला गेल्यानंतर कोणाला भेटायचे, कुणाला भेटल्यावर काय सांगायचे, आपली कामे कशी मंजूर करून घ्यायची, खासदार शरद पवार साहेब यांचे नाव कुठे घ्यायचे, कधी घ्यायचे यांचे त्यांना चांगले भान होते किंबहुना याबाबत श्रीनिवास पाटील यांचा हात कोणी धरु शकत नाही. त्यामुळेच सलग दोन टर्म कराड लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून काम करताना त्यांनी शिराळा, वाळवा, कराड, सातारा, तसेच पाटण आणि जावळी खोऱ्यात पुलांचे जाळे उभे केले. निसरेपूल असो किंवा कराडचा कृष्णा नदीवरील नवीन पूल असो हे पूल निवास पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच मंजूर झाले आहेत.


 श्रीनिवास पाटील खासदार होण्याअगोदर कराड आणि सातारा लोकसभा मतदारसंघाने अनेक खासदार पाहिले होते. मात्र दिल्लीचा निधी गल्लीत आणणारा खासदार मतदारसंघाने श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून १९९९ ते २००९ या कालावधीमध्ये पाहिला. खा.पाटील यांच्या वैयक्तिक कामाबाबत किंवा कामकाजपद्धती बाबत बोलायला खरंच शब्द कमी पडतील. हा माणूस समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जिंकतो, समोर आलेल्या कुठल्याही व्यक्तीला मोकळ्या हाताने परत पाठवत नाही, समोरच्या व्यक्तीचे काम होते किंवा न होते मात्र त्या संबंधित लागणारी सगळे कागदपत्रे,पाठपुरावा श्रीनिवास पाटील लगेच करतात. प्रशासकीय अधिकारी असताना राज्यभरातील वरिष्ठ शासकीय, निमशासकीय,खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांशी खा.पाटील यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते,आहेत. राज्यातील कोणत्याही ठिकाणचे काम घेऊन गेले तर खा. पाटील त्या व्यक्तीसाठी थेट त्या अधिकाऱ्याला फोन लावतात, हे मी अनेकदा पाहिले आहे.  पुण्या मुंबईतील अनेक कंपन्यांच्या मालकांना, एच आर विभागातील प्रमुखांना फोन करून अनेक युवकांना त्यांनी नोकर्‍या मिळवून दिल्या आहेत. कसलेही काम असेल तरच खा. पाटील यांच्याकडे जावा असे कराडकर मोठ्या आनंदाने किंवा विश्वासाने म्हणतात.त्यांच्याकडे गेल्यानंतर काम होतेच,याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. कराड रेल्वे स्थानकावर अनेक नवीन गाड्या थांबत नव्हत्या, अशा काळात निवास पाटील यांनी रेल्वेमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून केलेली कामे कराडकरांनी पाहिलेली आहेत.


 वैयक्तिक पातळीवर हा माणूस खूप हळवा आहे, त्यांना कुटुंबासोबत रहायला खूप आवडते. श्रीनिवास पाटील यांच्या थोरल्या मुलाला एक असाध्य आजार होता. त्या मुलाच्या आजारपणात लाडक्या मुलाची खासदार बापाने केली सेवा अनेक जणांनी पाहिली आहे. मुलाच्या अखेरच्या काळात मुलासाठी सर्व काही करणारा बाप पाहिल्यानंतर असा बाप सर्वांनाच मिळावा, असे मला काही क्षणभर वाटले होते.


 मध्यंतरी एकदा कराडातील एका कार्यक्रमासाठी तात्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव कराडला आले होते. त्यांच्या जेवणाची सोय खा. पाटील यांच्या गोटे येथील घरी केली होती. त्यावेळी लालूप्रसाद यांच्याशी बोलताना बिहारी भाषेत बोलणारे पाटील पाहून लालूजी सुद्धा खूश झाले होते. कुठेही कोणीही भेटला तरी त्याला वाहनांच्या खिडकीतून हात करणारे, त्यासाठी क्षणभर थांबणारे आपले खासदार अशी त्यांची ओळख आहे. सातारा जिल्ह्यातील जनतेच्या हृदयात ते स्थान करून राहिले आहेत याचे कारण त्यांचे तळागाळातील लोकांशी असणारे संबंध. समोरच्या व्यक्तीला नावानिशी ओळखणारे, वाढदिवसाला फोन करणारे, पुरस्कार मिळाला तर स्वतःहून अभिनंदन करणारे, छोट्या मुलांना कौतुकाने गोष्ट सांगणारे, प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करणारे,घरात दुःखद घटना घडली तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा वडिलकीचा आधार देणारे आणि यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या मार्गावरुन चालणारे श्रीनिवास पाटील हे कराड लोकसभा मतदार संघाची शान होते व आहेतच.  


बदलत्या परिस्थितीनुसार त्यांना अचानक सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली आणि ते मोठ्या मताने सातारा लोकसभेवर निवडून गेले. लोकसभा निवडणूक काळातील निवास पाटील यांची भाषणे, कठीण परिस्थितीत समोरच्या संकटाना तोंड देण्याची तयारी, वेळ प्रसंगी संयम तर काही वेळा जशास तसे उत्तर देऊन समोरच्यांना गप्प बसणणारे उमेदवार श्रीनिवास पाटील या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाले होते.


खासदार शरद पवार यांचे ते जवळचे मित्र. मात्र शरद पवार यांच्या नावाचा वापर ते खूप कमी काम करतात. आम्ही अनेकदा त्यांना भेटतो तेव्हा निवास पाटील यांनी शरद पवार यांच्या सोबतच्या कॉलेजवयीन किस्से सांगतात.मात्र पवार साहेबांचे नाव सांगून या व्यक्तीने सार्वजनिक जीवनात कोणताही लाभ घेतलेले नाहीत. मैत्री वेगळे आणि राजकारण वेगळे हा मंत्र त्यांनी आयुष्यभर जपला आहे त्यामुळेच खासदार श्रीनिवास पाटील आणि शरद पवार यांच्या मैत्रीचे अनेक जण नाव घेतात. 


मध्यंतरीच्या काळात त्यांना सिक्कीम राज्याचे राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी मिळाली. प्रशासकीय सेवेतील एक व्यक्ती खासदार झाल्यानंतर त्यांनी तो बदल स्वीकारलेला होता. मात्र कलेक्टर खासदार आणि पुन्हा राज्यपाल या पदावर काम करत करताना श्रीनिवास पाटील यांच्या कामाचा खऱ्या अर्थाने कस लागला. सिक्कीम या राज्याचे राज्यपालपद म्हणजे येड्या गबाळ्याचे काम नाही. अतिशय संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिक्कीम राज्याच्या सीमा पाहता या राज्याच्या राज्यपालपदी या अगोदर उच्चविद्याविभूषित, इंग्लिश हिंदी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या व्यक्तींचीच निवड झाली होती. श्रीनिवास पाटील आमच्याकडेही गुण होतेच, या गुणा बरोबरच त्यांचा प्रशासकीय अनुभव पाहून केंद्र सरकारने त्यांना या निवडले असावे. सिक्कीम राज्यात मिशीवाला गव्हर्नर म्हणून निवास पाटील यांनी गाजवलेली कारकीर्द सर्वांनाच ज्ञात आहे.  राज्यपाल झाल्यानंतर त्यांनी राज्यातील जनतेसाठी राजभवन खुले केले. या अगोदरचे राज्यपालाना भेटण्यासाठी खूप कष्ट पडायचे मात्र श्रीनिवास पाटील यांनी सिक्कीममध्ये काम करताना जनता , राज्य सरकार आणि राजभवन यांच्यामधील दूरी करण्याचा प्रयत्न केला. सिक्कीमला सेंद्रिय राज्य करण्यामध्ये निवास पाटील यांचा मोलाचा वाटा होता. सिक्कीम राज्यातील पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी वैयक्तिक पातळीवर खूप प्रयत्न केला .महाराष्ट्रातील ज्याठिकाणी त्यांनी काम केले आहे त्या जिल्ह्यातील अनेक पर्यटक या कालावधीमध्ये सिक्कीमला जाऊन आले, राजभवनावर राहिले. सिक्कीममधील वास्तव्यामध्ये राज पाहुणचार घेण्याचा मान माझ्यासहीत अनेकांनी घेतला आहे. सिक्किम मध्ये येण्याचे केवळ निमंत्रण न देता तेथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ देऊन त्याची खातीर करण्यामध्ये ती कुठेही कमी पडले नाहीत. राज्यभरातील सुमारे 25 हजार अधिक लोक श्रीनिवास पाटील यांच्या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये गंगटोकला जाऊन आले असावेत.


सातारचे खासदार म्हणून श्रीनिवास पाटील जेव्हा निवडणुकीला सामोरे गेले तेव्हा त्यांच्या वयावरून चर्चा झाली. मात्र निवडून गेल्यानंतर ७८ वर्षाच्या या योध्याने तरुणांना लाजवेल असा कामाचा धडाका लावला आहे. गेल्या दीड वर्षात ते नव्या जोमाने काम करत आहेत. कोरोनाच्या कालावधीमध्ये सामाजिक अंतर ठेवून श्रीनिवास पाटील यांनी केलेले काम जनतेला माहित आहे. मतदार संघातील गरजू आणि गोरगरिबांसाठी धान्याची पाकिटे पुरवली. आज खा. पाटील यांच्या कार्यालयामध्ये दिवसभर गर्दी असते याचे कारण इथे आल्यानंतर आपले काम होणार याची खात्री असते. आलेल्या प्रत्येक माणसाचे समाधान करण्याचा ते प्रयत्न करतात,सर्वांना वेळ देतात. ते समाजापासून, जनतेपासून, लोकांपासून दूर राहू शकत नाहीत.जनतेसाठी काम करत राहणे हेच खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासाठी टॉनिक आहे. कायम माणसात राहणारा हा खासदार आज ८० व्या वर्षात पदार्पण करत आहे. पुढील काळात त्यांच्या हातून सातारा जिल्ह्यातील जनतेची सेवा होवो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा पुढारी परिवाराच्या वतीने शुभेच्छा.

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...