फॉलोअर

०७ ऑगस्ट २०२३

डोक्यावर कितीही ओझं असू दे मित्र किंवा मैत्रीण भेटली पाहीजे




डोक्यावर कितीही ओझं असू दे, 
फक्त मित्र किंवा मैत्रीण भेटली पाहीजे. 
सारं ओझं हलकं होतं. 
समस्या पुर्ण कधीच संपत नाहीत 
पण मित्र भेटला की मार्ग मात्र नक्की निघतो.

तुमच्यापैकी अनेकांना हा अनुभव आला असेल. मी तर अनेकदा या अनुभवातून जातो. सोबत दिलेला फोटो पहा दोघी मैत्रिणी भेटल्या आहेत, दोघींच्याही डोक्यावर ओझं आहे मात्र यांच्या काय गप्पा रंगल्या आहेत. ओझं असुनही गप्पा काही संपत नाहीत. कारण मैत्रीण भेटल्यानंतर आपल्या डोक्यावर असलेले वजन ओझं वाटतच नाही.

परवा माझा शिकवणीमधला मित्र भगवान भेटला होता. दोघांनी करवडीजवळ मावळा धाबा येथे जेवण केलं, खूप गप्पा मारल्या. दरम्यान दुसरा एक मित्र श्रीधरला फोन लावला, स्पीकर लावून जवळजवळ आम्ही दिड तास बोललो .दोघे समोरासमोर होतो तर तिसरा सातारा मध्ये होता. मात्र ज्या गप्पा झाल्या त्यातून आनंद तर मिळालाच, उर्जाही मिळाली.

आम्ही तिघांनी आता पन्नासी गाठली आहे, तिघांचं कामाचं स्वरूप क्षेत्र वेगवेगळे आहे. तिघांच्या अडचणी आणि समस्याही वेगवेगळ्या आहेत. माझ्या व्यवसायातील समस्या ते सोडवू शकत नाहीत, त्यांच्या मी सोडवू शकत नाही. मात्र आम्ही भेटल्यानंतर या समस्यावर, मुला मुलींच्या शिक्षणावर चर्चा करतो आणि काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करतो. 

मित्रासोबत बोलल्यानंतर आनंद मिळतो, मन मोकळं होतं. मित्र असतातच रिलीज होण्यासाठी ! ज्याला चांगले मित्र आहेत तो कधीही डिप्रेशन मध्ये जाऊ शकत नाही, वाईट काम करू शकत नाही, संकटाला खचून जाऊन आत्महत्या करू शकत नाही. किंबहुना तशी वेळ येऊ नये म्हणून सतत मित्रांच्या सोबत राहत जा. मित्र भेटले की त्याच्याजवळ रिलीज व्हा. जे चाललंय ते सांगा, जे हवं आहे ते सांगा. काय मार्ग निघतोय का बघा. मित्र नक्की मार्ग काढतात. आपल्या डोक्यावरचे ओझं हलकं झालं की खूप बरं वाटतं. आणि हो फक्त अडचणी आणि कामाचीच चर्चा करू नका. जरा आठवणीच्या हिंदोळ्यावर जा. शाळा कॉलेजमधल्या एखाद्या मित्रमैत्रिणीचा विषय काढा, लहानपणी केलेल्या खोड्यांना उजाळा द्या, शाळा बुडवून केलेल्या करामतीचा विषय काढा. बालपणीचा काळ अजूनही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे,असतो. मित्र सोबत असला की सारं काही मिळवता येतो, गेलेलं सुद्धा पुन्हा मिळवता येते. 

आज मैत्री दिनाच्या निमित्ताने मिरज, वडूज, सातारा येथून तिघेजण एकत्र आलो आहे. चौघांनी मिळून घरात स्वयंपाक केला आहे, आता जेवायला बसणार आहे. जेवण झाल्यावर भांडीही चौघेच घासणार आहे. ऐसी खुशी और कहा ! मेरी दोस्ती मेरा प्यार!

जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा !

सतीश वसंतराव मोरे सतिताभ
०६.०८.२०२३

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...