फॉलोअर

करवडी शाळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
करवडी शाळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१९ डिसेंबर २०२३

जीवन शिक्षण विद्या मंदिर @ करवडी'


*जीवन शिक्षण विद्या मंदिर @करवडी* 

करवडी गावातील दिवस खुप रम्य होते. बालपणीचे, शालेय जीवनातील दिवस तर त्याहून वेगळे होते. एसटी स्टँड पाठीमागे माझी प्राथमिक शाळा होती,आहे. *शाळेला 'जीवन शिक्षण विद्या मंदिर, करवडी' असे नाव होते. खरंच जीवन शिक्षण विद्यामंदिर हे नाव किती सार्थ आहे हे त्या सरकारी शाळेत शिकलेले आहे त्यांनाच कळू शकेल*. या चारही शब्दाची आपण जर फोड केली तर आज शाळेत काय काय शिकलं, शिकले पाहिजे आणि काय शिकवलं जातं शिकवायला हवं, हे उमगेल.

जीवन शिक्षण...जीवन जगण्याचं शिक्षण देणारं केंद्र म्हणजे ही शाळा. शिक्षण म्हणजे काय.क्षणाक्षणाला शिकले पाहिजे, काहीतरी नवीन आत्मसात केले पाहिजे, हे शिकवणारे केंद्र म्हणजे माझी शाळा. विद्या मंदिर.. विद्या एखाद्या क्षेत्रात, विषयात पारंगत होणे आणि ती विद्या देणारी ही शाळा. एखाद्या विषयाचा खोल अभ्यास करणे, सतत अभ्यास करत राहणं आणि हे देणारं केंद्र म्हणजे शाळा. शेवटचा शब्द आहे मंदिर. खरंच हे शाळा एक मंदिर असतं. जिथे ज्ञानाची पूजा केली जाते, ज्ञान हा देव असतो.शिक्षक गुरु असतात. शाळेची इमारत सुधारणा मंदिर असते. आपण देवाच्या मंदिरात कशासाठी जातो शांतता मिळवण्यासाठी, काहीतरी मागण्यासाठी. शाळा रुपी मंदिरात आपण ज्ञानार्जन करण्यासाठी जातो आणि हे मिळवलेले ज्ञान पुढच्या आयुष्यात आपल्याला खूप उपयोगी पडते. देवाच्या मंदिरात शांतता मिळते आणि देवाचा आशीर्वाद मिळतो आणि आपण देवाला काहीतरी मागतो. शाळा रुपी मंदिरात जे ज्ञान मिळते हे ज्ञान मिळून आपण शहाणे होतो, पुढे पारंगत होतो, नोकरीला लागून पैसे मिळवतो, सुखी होतो आणि पुढच्या पिढीला हे ज्ञान देतो. 

*२००० सालच्या दरम्यान कुणा अतिहुशार अधिकाऱ्याच्या कि शिक्षण मंत्र्यांच्या डोक्यात काय आलं कुणास ठाउक! त्यानं जीवन शिक्षण विद्या मंदिर हे नाव बदलून प्राथमिक शाळा असं केलं. कदाचित काही पुरोगामी लोकांच्या लोकांना 'मंदिर' हे नाव नको असेल म्हणून त्यांनी हे नाव बदलून टाकलं. असो..कालाय तस्मै नमः* 

"जीवन शिक्षण विद्या मंदिर करवडी" ही माझी शाळा खरंच संस्काराचं केंद्र होती, एक मंदिर होतं, आनंददायी ठिकाण होतं. माझं पहिली ते चौथी शिक्षण या शाळेत झालं. सुहास पिसाळ, रमेश पिसाळ, अरविंद पिसाळ, अनिल बनसोडे, रवि सुतार हे माझे वर्गमित्र. मला आठवतंय या शाळेत जाताना आम्हाला खूप आनंद व्हायचा. शाळा दहा वाजता असली तरी आम्ही मित्र साडेनऊ वाजता शाळेत जाऊन बसायचो. दप्तर कोपऱ्यात ठेवून मग आमचे खेळ सुरू व्हायचे. गुरुजी आल्यानंतर वर्ग उघडायचे. *माझ्यासहित सर्व विद्यार्थ्यांना पहीलं एकच काम असायचं शाळेचा परिसर स्वच्छ करणे*. शाळा स्वच्छ करण्यासारखी मजा खरंच कुठे नसेल.खराटे तिथे नसायचे मग आसपासच परिसरातील निरगुडी शोधायची. निरगुडी तोडायची आणि खराटा तयार करायचा. काही जणांकडे वर्ग स्वच्छ करण्याचे काम असायचे. कोपऱ्यात केरसुणी ठेवलेली असायची, ती घेऊन काही मुले मुली वर्ग स्वच्छ करायचे. त्याकाळी वर्गामध्ये थोड्याच फरश्या होत्या? साधी शेणाने सारवलेली खडबडीत जमीन. प्रत्येक शनिवारी आम्हाला वर्ग सारवायचे वेगळं काम असायचं. आसपास रस्त्यावर पडलेलं शेण गोळा करायचं आणि शाळा सारवायची. आपली शाळा आणि वर्ग स्वच्छ ठेवणे, सारवणे हे शिक्षण एवढ्या छोट्या वयात मिळालं होतं. म्हणून तर म्हणलं ना ही शाळा म्हणजे जीवन कसं जगायचं हे शिकवणारे एक मंदिर आहे. हे सारं करून मग प्रार्थनेसाठी उन्हात उभं रहायचं.  

सुर्यवंशी बाईंचा मी लाडका विद्यार्थी. मधल्या सुट्टीत मी घरी जेवायला गेलो की भाजलेले शेंगदाणे घेऊन यायचो आणि बाईना द्यायचो. बाईंनी माझ्या कडून पाढे छडी लागेने पाठ करवून होते.माझ्या शाळेतील पहिली ते चौथीचे वर्ग मला आजही आठवतात. आता ती शाळा काही अंशी पाडली आहे, जुन्या शाळेचा काही भाग अजून शिल्लक आहे. या शाळेने आम्हाला खूप काही दिलें आहे. आजही या शाळेत जायला मला फार आवडते. घरासमोरच शाळा असल्यामुळे शाळा सुटल्यानंतर शाळेचे पटांगण म्हणजे आमच्यासाठी सारं काही असायचे. क्रिकेट हा तसा त्याकाळी थोडा महागडा खेळ होता. मग या शाळेच्या पटांगणावर सुरपाट्या, कबड्डीचे ग्राउंड आखले जायचे. रात्रीच्या अकरा बारा पर्यंत इथे खेळ चालायचे. विट्टी दांडू आणि गट्टया तर आवडते खेळ. या खेळात आम्ही इतकं रमायचे की घरची आठवण येत नसे. काही मित्रांची आई टिकारणं घेऊन यायची तेव्हा आमचा खेळ संपायचा. 

शाळेच्या परिसरात अनेक झाडे होती.आमच्या घरासमोरच शाळेच्या कंपाऊंड लगत एक वड आणि दोन बाभळीची झाडं होती. ही तिन्ही झाडे आता अस्तित्वात नाहीत. पण या झाडाखाली आम्ही खेळलेले खेळ, दुपारच्या सुट्टीत मारलेल्या गप्पा आजही आठवतात. या झाडाखाली बसून उन्हाच्या सुट्टीत खाल्लेले गारीगार आणि त्याची चव आजही जिभेवर रेगाळत आहे. कधी कधी माकडवाला यायचा, मग माकडाचे खेळ या झाडाखालीच व्हायचे. चौथीला मला या शाळेत 74 टक्के मार्क मिळाले माझा वर्गात दुसरा नंबर आला होता. पहिला नंबर अनिल बनसोडे किंवा रवी सुतारचा आला असेल. एवढे चांगले मार्क मिळाल्यानंतर माझ्या वडिलांच्या तीव्र इच्छेनुसार पाचवीला मला १९८२ साली कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. टिळक हायस्कूलचा प्रवास खूप सुंदर आहे, त्यावर लिहीनच पुढे कधी तरी. मात्र करवडी येथील प्राथमिक शाळेतील या आठवणी हृदयावर कोरलेल्या आहेत. माणूस कितीही मोठा झाला तरी आपली पहिली शाळा विसरू शकत नाही. जीवन शिक्षण विद्या देणारी माझी शाळा आणि त्या शाळेतील सर्व शिक्षकांना वंदन !

लेखन @कृष्णा विद्यापीठ कॅम्पस सेन्ट्रल गार्डन 

*सतीश वसंतराव मोरे*
सतिताभ 
9881191302

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...