फॉलोअर

२५ ऑगस्ट २०२१

केबीसी सेटवर अमिताभ बच्चन यांची मुलाखत

*अमिताभ बच्चन यांची मुलाखत* 
*आयुष्यातील अविस्मरणीय क्षण* 


3 ऑक्टोबर 2018 रोजी अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या भेटीची जी उत्सुकता होती, तीच उत्सुकता किंबहुना त्याहून अधिक उत्सुकता 4 सप्टेंबर रोजी 2019 रोजी होती. आपल्या आवडत्या हिरोला,आदर्श व्यक्तीला भेटण्याचा,त्याच्या सोबत फोटो काढण्याचं,त्याला जवळून पाहण्याचं स्वप्न या अगोदर दोन वेळा साकार झाले आहे. सोनी टीव्हीवरील 'कौन बनेगा करोडपती' या शोमधील काही मान्यवरांशी, अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या लोकांशी गेल्या दोन वर्षात झालेली जवळीक तसेच त्यांनी आम्हा 'अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप'चे पाहिलेले उपक्रम आणि आमचे अमिताभ बच्चन यांच्यावर असलेले प्रेम पाहून याही वर्षी त्यांनी पुन्हा एकदा मला 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर तिसर्‍यांदा यायची संधी दिली. 


2019 साली आम्ही 50 अमिताभ बच्चन प्रेमी एकाच दिवशी अमिताभ बच्चन यांना भेटायला गेलो होतो, यावर्षी आम्ही पंचवीस अमिताभ बच्चन प्रेमी मुंबईला निघालो.15 ऑगस्ट 2021 रोजी आम्ही मुंबईला अंधेरी येथे पोहोचलो. तेथे मुक्काम करून 16 ऑगस्टला सकाळी सात वाजता 'कौन बनेगा करोडपती'च्या फिल्म सिटी गोरेगाव येथील सोळा नंबर स्टुडिओमध्ये पोहोचलो.

'कौन बनेगा करोडपती' 21 व्या सीजनचे शूटींग 12 ऑगस्टला सुरू झाले होते. 12, 13 आणि 14 ऑगस्ट तीन दिवस शूटिंग झाले. आज 16 तारखेला सोळा शूटिंगचा तिसरा दिवस होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला आम्हा 25 जणांची ऑंटीजन टेस्ट करण्यात आली. सर्व प्रक्रिया पूर्ण करून आम्हाला भरपेट नाश्ता देण्यात आला. मोबाईल,पर्स यासह इतर सर्व साहित्य लॉकरमध्ये जमा करून कडक तपासणी झाल्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास आम्हाला सेटवर प्रवेश देण्यात आला.सेटवरील भव्यता, लाईट, झगमगाट पाहून आमच्या सर्वांचे डोळे दिपून गेले. 

आम्हा सर्व जणांना एकत्रित जवळजवळ बसवण्यात आले. अमिताभजी ज्या सीटवर बसणार होते त्यांच्या पाठी बाजूस आम्ही बसलो होतो. अमिताभ बच्चन पुढे बसल्यानंतर मला त्यांची पाठ आम्हाला दिसणार होती. पण शूटिंगमध्ये कॅमेरा फ्रेममध्ये आम्ही जास्त येणार आहे, असे आम्हाला सांगण्यात आले. साडेनऊच्या सुमारास सर्वांना जागेवर बसवल्यानंतर लाईट कॅमेरा ॲक्शन 1 2 3 टेस्टिंग करण्यात आले.शुटिंग दरम्यान आम्ही कसे वागायचे, वैद्यकीय अडचण आली तर काय करायचे, याची माहिती आम्हाला देण्यात आली. 

अचानक गडबड सुरू झाली. 'सर आ गये' आणि सेटवर शांतता पसरली. बरोबर पावणे दहा वाजता अचानकपणे सर्वांचे लाडके अमिताभ बच्चन यांची सेटवर इंट्री झाली. ज्यांना पाहण्यासाठी आयुष्यभर वाट पाहीली होती, त्यांना पहिल्यांदाच  प्रत्यक्ष पाहून  अनेकांची हृदयाची धडधड वाढू लागली. सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडात अमिताभजींना सलामी दिली. अमिताभ यांनी तेवढ्याच नम्रतेने सर्वांना नमस्कार करून विनम्रपणे खाली बसण्याची सूचना केली. पुन्हा अमिताभजी बाहेर गेले, काही वेळाने पुन्हा सेटवर आल्यानंतर सेट वरील सर्वांनी टाळ्यांच्या गजरात  स्वागत केले.

पन्नास वर्षे पडद्यावर पाहणाऱ्या अमिताभला आज प्रत्यक्ष पाहण्याची अनेकांची ही पहिलीच संधी आली होती. माझ्यासाठी ही तिसरी संधी असली तरी अमिताभ माझ्यासाठी आदर्श असल्यामुळे त्यांना कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही. त्यांच्या पहिल्या भेटी वेळची उत्सुकता आणि आज तिसऱ्या भेटीतील उत्सुकता यामध्ये काहीच फरक नव्हता. हृदय धडधडत होतं ,पुढे उभे राहून ते नमस्कार करत होते, आम्ही टाळ्या वाजवत होतो. एक दोनदा त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि मग मी आनंदाने उड्या मारू लागलो. 

पुढील साडेतीन तास सेटवर फक्त अमिताभ आणि अमिताभ आणि अमिताभ यांचीच जादू होती. हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकांना अमिताभ बच्चन प्रश्न विचारत होते, आधार देत होते, त्यांच्यातील कलागुणांची माहिती घेत होते, त्यांना हसवत होते, मधूनच त्यांना गोड धक्का देत होते, पुन्हा त्याला सावरत होते. पुढे बसलेला स्पर्धक आपले सर्व टेंन्शन सोडून अमिताभ बच्चन यांच्या पुढे बसून प्रश्नांची उत्तरे देत होते. खरंतर हॉट सीटवर बसण्याची संधी मिळणे हे फार मोठे नशिब असते, सात करोड रुपये बक्षीस मिळवणे हे स्वप्न जरी असले तरी अनेकांचे स्वप्न हॉट सीटवर बसून अमिताभ बच्चन यांच्याशी गप्पा मारणे हेच असते, हे आजही आम्हाला जाणवले. समोर बसलेला स्पर्धक अमिताभजींना पाहून बेभान होऊन जात होते, प्रश्नाचे उत्तर देत होते, आपल्या आयुष्यात आलेले क्षण अमिताभ यांच्यासमोर उलगडत होते, स्पर्धेचा आनंद घेत होते आणि आपले स्वप्न साकारत होते. 

कौन बनेगा करोडपती च्या 21 व्या सीझनचच्या शूटिंगचा हा चौथा दिवस होता. अजूनही सेटवरील मंडळी सेट झालेली नव्हती,अनेकदा तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र अमिताभजी या सर्वांना सांभाळून घेत शांतपणे सेटवर बसून होते. अमिताभ बच्चन यांचा विनोदी स्वभाव सर्वांनाच माहिती आहे. तांत्रिक अडचणी आल्यानंतर जेव्हा सेटवर शांतता पसरत होती तेव्हा अमिताभजी समयसुचक विनोद करून सर्वांना हसवत होते. 

तांत्रिक अडचणीमुळे निर्माण झालेल्या 'ब्रेक'चा आम्हाला फार मोठा फायदा झाला. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानंतर आम्ही अमितजीनीं आमच्याकडे पाठीमागे वळून पाहिले. 'क्षमा करे मै आपकी तरफ पीठ करके बैठा हूं' असे म्हणत त्यांनी आमच्याशी संवाद सुरू केला. सागर बर्गे यांनी अमिताभ यांच्याशी बोलताना 'सर  आप हमारे लिए भगवान हो, भगवानका दर्शन किधरसे भी लिया तो कोई प्रॉब्लेम नही' असे म्हणून सिक्सर टाकला. 'अरे मै भगवान नही' असे विनम्रपणे बोलत अमिताभजी यांनी गप्पा सुरू केल्या. एकदा बोलायला सुरुवात केल्यानंतर गप्प बसू ते कराडकर कसले? आलेल्या, मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा  घेत आम्ही आमच्या 'अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपची,कराड शहराची सारी माहिती त्यांना सांगितली. त्यांनीही ती शांतपणे ऐकून घेतली. आमच्या गप्पा फुलल्या.

या अगोदर दोन वेळा मी अमिताभ बच्चन यांना भेटलो तेव्हा मी त्यांच्याशी मोजकेच शब्द बोललो होतो. पहिल्या भेटीत अमिताभजी यांना आमच्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचे माहिती पत्रक देऊन आमच्या ग्रुपची माहिती सांगितली होती. त्या माहिती पत्रकावर अमिताभ बच्चन यांचा ऑटोग्राफ आणला होता. दुसऱ्या भेटीवेळी आमच्या बच्चन ग्रुप सोबत अमिताभजीनी ग्रुप फोटो दिला होता. यावेळी अमिताभ बच्चन यांनी माझ्या हातात हात देऊन माझ्या मांडीवर हात ठेवला होता. या दोन्ही भेटी माझ्या स्मरणात आहेतच. मात्र आजच्या या तिसऱ्या भेटीत अमिताभ बच्चन यांच्यासोबत सेटवर मला खूप बोलता आले. याबाबतची बातमी 'पुढारी'मध्ये 17  आँगस्ट रोजी प्रसिद्ध केली होती. अमिताभ बच्चन यांचा तो एक इंटरव्ह्यू होता. अमिताभ बच्चन यांची मुलाखत घेण्याचा, त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आलेला योग हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असा प्रसंग आहे.


दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी जशीच्या तशी पुढीलप्रमाणे 


... ......  

 *चाहत्यांचे प्रेम हीच माझी ताकद: अमिताभ बच्चन* 

मुंबई  (विशेष प्रतिनिधी ) 

माझे चाहते हीच माझी ताकद आहे, माझ्या चाहत्यांचं प्रेम आहे म्हणूनच मी जिवंत आहे, असे भावनाविवश उद्गार सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केबीसी सेटवर चाहत्यांशी बोलताना काढले. 

'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय मालिकेच्या 21व्या सिझनचे चित्रीकरण मुंबई येथे सुरू झाले आहे. 23 ऑगस्ट पासून ही मालिका सोनी टीव्हीवर सुरू होणार आहे. या मालिकेत प्रेक्षक म्हणून भाग घेण्यासाठी कराड येथील अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या 25 सदस्यांची निवड झाली होती. या सदस्यांनी अमिताभ बच्चन यांच्या समवेत केबीसी चित्रीकरणामुळे भाग घेतला. शेवटच्या टप्प्यात चित्रीकरण संपल्यानंतर सर्व उपस्थित प्रेक्षकांनी 'सर आमच्या सोबत फोटो काढा' अशी विनंती केल्यावर नंतर  'मुझे इतके साथ मुझे फोटो लेना है, उसके प्यार के कारण ही तो मै जिंदा हू' असे म्हणून काही अंतरावरून अमिताभ बच्चन यांनी चाहत्या सोबत फोटो काढले. 

चित्रीकरणादरम्यान मधल्या काळात अमिताभ बच्चन यांनी अतिशय नम्रपणे  चौकशी करत मीपण तुमच्यातलाच एक आहे असे नम्र पूर्वक सांगितले.

 या दरम्यान या एबीपी सदस्यांशी संवाद साधताना अमिताभ बच्चन यांनी सातारा जिल्हा आणि कराड शहराची माहिती जाणून घेतली. सातारा जिल्हा स्वातंत्र्यसैनिकांचा जिल्हा आहे तर कराड शहर देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे गाव आहे. या गावात ज्येष्ठ नेते पी डी पाटील हे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले 41 वर्षे नगराध्यक्ष असणारे नगराध्यक्ष होऊन गेले. त्यांच्या सुनबाई सुवर्णा पाटील आज या चित्रीकरणात सहभागी आहेत. कराडात कृष्णा कोयना प्रितिसंगंम आहे. भारत सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण या स्पर्धेत सलग दोन वर्षे कराड शहराने देशात पहिल्या क्रमांक मिळवला आहे अशी माहिती देत आपण एकदा कराड शहराला यावे असे निमंत्रण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सतीश मोरे यांनी यावेळी अमिताभ बच्चन यांना दिले.


बच्चन प्रेमी ग्रुप सदस्य या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन यांचा लोगो असणारे मास्क तोंडावर बांधून सहभागी झाले होते.अक्षरगुरु जगन पुरोहित यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा मास्क तोंडावर लावला होता. सर्व सदस्यांनी एकाच प्रकारचे बांधलेले हे मास्क पाहून अमिताभ बच्चन यांनीही या ग्रुपची माहिती घेतली.माझा फेस मास्क लोक बनवून आणतात. तुम्ही माऊथ मास्क मास्क बनवला आहे, तो कुठे बनवला याबाबत माहिती घेऊन हा मास्क आवडला, माझ्यासाठी एक ठेऊन जा,असे गोड मागणी त्यांनी यावेळी केली. चित्रिकरण झाल्यानंतर एबीपी ग्रुपच्या वतीने अमिताभ बच्चन यांचे सोबत दोन वर्षांपूर्वी केबीसी सेटवर काढलेला फोटो भेट देण्यात आला. या चित्रीकरणात दीपक अरबुणे, डॉ. नितीन जाधव, सागर बर्गे, विनायक उर्फ बंडा पाटील,सुधाकर बेडके, संजय शिंदे, दिपक रैनाक,राजेश शहा, प्रकाश सोनवणे,गौरव परदेशी मिलिंद रैनाक, डॉ.डी जे जोशी आदी सहकुटुंब सहभागी झाले होते.

.....     .....   

साडेतीन तास केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना आम्ही पाहत होतो, त्यांना डोळ्यात सामावून घेत होतो. 79 वर्षाच्या या तरुणाचा उत्साह खरंच आम्हाला प्रेरणा देणारा होता. न थांबता अखंड हा माणूस कसा काम करत राहतो,हे एक न उलगडणारं कोडं आहे. सलग एकवीस वर्षे टीव्हीवर एखादा शो करणे आणि त्या शो ची लोकप्रियता टिकवून ठेवणे, हे काम फक्त अमिताभ बच्चन हे एकटेच करू शकतात. अमिताभनां उगाच महानायक म्हणत नाहीत. 'ना तू रुकेगा कभी, ना तू थमेगा कभी' हे अग्निपथ या कवितेतील वाक्य अमिताभ बच्चन यांना तंतोतंत लागू पडते. 


अमिताभ बच्चन यांची ही तिसरी भेट खरंच हृदयात साठवून ठेवण्यासारखी आहे. बच्चन प्रेमी पत्रकार म्हणून अमिताभ बच्चन यांची सेटवर हसत-खेळत घेतलेली मुलाखत आणि त्यांच्याशी साधलेला संवाद मला आणि कराडच्या अवधूत कुलबर्गी फोटो लॅबमध्ये  तयार केलेला, अमिताभ बच्चन यांना भेट दिलेला ABP मास्क  लक्षात राहील.


आज 9 वाजता प्रक्षेपण 

 *26 तारखेला म्हणजे आज या भागाचे प्रक्षेपण सोनी चैनल वरती होणार आहे. आज आपण आम्हाला या शो मध्ये अवश पहा.*

१४ ऑगस्ट २०२१

कायम...

सखी सख्याची !

परवा सखी अचानक आली.
थोडीशी घाबरलेली,
थोडीशी विस्कळीत,
थोडीशी हरवलेली !
डोळ्यात अश्रू दाटलेले !

जवळ आली अन बिलगली.
आज तिच्या डोळ्यात
वेगळाच भाव होता !
मनात विचाराचे काहूर होते ,
खूप काही सांगायचे होते ,
स्वतःला सावरायचे होते.

बिलगलेल्या सखीला
मी सावरायचा प्रयत्न केला.
बिलगलेल्या सखीला,
मी सावरायचा प्रयत्न केला.
मग ती अधिकच बिलगली.

अन् म्हणाली ,
आजपासून आपण थांबू या,
एकमेकापासून थोडे दूर राहु या ,
फार जवळ यायचं नाही ,
थोडंसं अंतर ठेऊ या !

सखीचं हे अजब रूप 
मी पहिल्यांदाच पहात होतो.
तिच्या मनात खोल काहूर होतं,
ज्यानं मला निशब्ध केलं होतं !

डबडबलेले ते डोळे
मला प्रश्नावत होते !
माझ्या डोळ्यात
तिला शोधत होतो !

मग मीही सावरलो,
मग मीही सावरलो.
तिलाही सावरलं .
अन् मग तिला सुनावलं.

सखी आपलं नातं वेगळ आहे ,
सखी आपलं नातं वेगळ आहे !
तुझ्यासाठी मला सर्वमान्य आहे,
तुझ्यासाठी मला सर्वमान्य आहे !

कुठेही राहिलीस
तरी तु माझी आहे,
माझ्या जवळ नसली
तरीही तु माझी सावली आहे !

तुझ्या सुखात मी अद्ष्य आहे,
दुःखात तर मी हाजीर आहे !
तू सुखी राहा,
यापेक्षा मला काही नको आहे.

जिथे जाशील,
तिथे तू माझ्यातच आहे !
मी तर तुझ्या
रोमारोमात आहे !

आपण दोघे कधी वेगळे नव्हतो,
आपण दोघे कधी वेगळे नव्हतो,
चार हात दूर राहिलो,
म्हणून वेगळे होणारच नव्हतो !

तुझ्या प्रत्येक श्वासात
मी असणार आहे.
माझा श्वास तर
तर तुझ्याविना गुदमरला आहे!

तू जिथे असशील
तिथे मी आहे .
तू जिथे स्मरशील
तिथे मी उमटणार आहे.

फक्त भेटणं म्हणजे
प्रेम आहे का?
भेटलो नाही म्हणून,
तुझे स्मरण होणार नाही का ?

माझ्या अखेरच्या
क्षणापर्यंत तू असणार आहेस !
तुझ्या रोमारोमात
मीच वास करणार आहे !

तू आणि मी एकच आहोत,
एकच राहणार आहोत !
पुढच्या जन्मात तर आपण,
एकच होऊन येणार आहोत !

०५ ऑगस्ट २०२१

मी आणि योगेश ३३ वर्षानंतर एका टेबलावर

 मी आणि योगेश ३३ वर्षानंतर

एका टेबलावर
योगेश सुभाष शहा,कमलवाडी शनिवार पेठ कराड. माझा टिळक हायस्कूलचा इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचा क्लासमेट. पाचवी ते सातवी माझा आवडता वर्ग म्हणजे तुकडी क. पाचवी क मध्ये प्रवेश घेतल्यानंतर दीपक तडक, दीपक काकडे, योगेश शहा,सागर जोशी,मिलिंद नवाळे, हिरा भंडारी, सुनील पाटील, डायालाल खंडेलवाल ,शेख, इनामदार, विनायक गरूड, राजेश कुंभार, निलेश काणे, हेमंत जाधव, प्रशांत पाटील आदी माझे क्लासमेट होते.
योगेश शहा आणि माझी 1982 पासूनची मैत्री आहे.मी करवडी येथून रोज कराडला एसटीने शाळेला येत होतो. वर्गात आमच्या असणारे बहुतांश मुले ग्रामीण भागातली होती, योगेश सारखी काही शहरातलीही होती. योगेश आणि मी मधल्या सुट्टीत एकत्र जेवायला बसत होतो. खेड्यातून आणलेला डबा योगेशला खूप आवडायचा तर त्याने आणलेले जैन पद्धतीचे जेवण, खाकरा, ढोकळा मला खूप आवडायचे. एका डब्यात एका बेंचवर आम्ही अनेकदा जेवलो आहे. कधीकधी दुपारच्या वेळेला डबा घेऊन दीपक काकडेच्या घरातही आम्ही जात असू. एका डब्यात मित्रांसमवेत बसून जेवण्याचा आनंद फार मोठा आहे, हे भाग्य मित्रासोबतच लाभते.
आज हे सांगायचं कारण आज खुप दिवसानंतर योगेश आणि मी एकत्र एका टेबलावर बसून जेवलो. शाळा सोडल्यानंतर योगेश आणि माझी कराड शहरात अनेकदा भेट झालेली आहे, होत राहते. गणपती मंदिरा समोरील त्याच्या दुकानात मी अधूनमधून जातो. दुकानात गेल्यानंतर योगेश काजू, बदाम, पिस्ता, खारीकच्या भरण्यांची टोपण उघडतो आणि एका प्लेट मध्ये सर्व ड्रायफूट समोर ठेवतो. मला खायला लावतो,स्वत खातो. त्याच्या दुकानात गेलो आणि ड्रायफूट खाल्ले नाही असा एकही दिवस गेला नाही. दुकानात गप्पा मारताना योगेश समोर असलेल्या लोकांना 'हा सतीश माझा शाळेतला मित्र, वर्गातील हुशार विद्यार्थी. आमच्या वर्गाचा सेक्रेटरी'अशी ओळख करून देतो.
शाळा सोडल्यानंतर आम्ही पुन्हा कधीच एकत्र जेवले नव्हतो, तसा योगच आलेला नव्हता. आज ऑफिस मधून परत येताना योगेश मला भेटला. चल माझ्यासोबत, आज खानावळीमध्ये जेवायला जायचं आहे, असे म्हणून त्याने मला बळजबरीने आत नेले. दिवेकर बेकरीसमोरच्या ओंकार लंच होममध्ये आम्ही दोघं एकत्र बसून जेवलो.
1988 साली मी दहावी पास आऊट झालो आहे. हा कालावधी विचारात घेतला तर 33 वर्षानंतर मी आणि योगेश आज एकत्र एका टेबलावर जेवलो. शाळेत एका डब्यात बेंचवर बसून जेवल्याच्या आठवणी आज जाग्या झाल्या. वर्गमित्र वर्गशिक्षक, शाळेतील गंमती जमती याविषयी आम्ही खूप गप्पा मारल्या. शाळेतील मित्र आणि शाळेतील आठवणी या खरंच रम्य असतात. पुन्हा असं वाटतं की लहान व्हावं आणि शाळेत जाऊन त्याच बेंचवर बसावं आणि पुन्हा तेच मित्र भेटावेत. असा योग लवकरच येवो.
*सतीश वसंतराव मोरे*
०४.०८.२०२१
May be an image of 2 people, including Satish More Satitabh and food
You, Dhanaji Chavan, Ashok Mohane and 251 others
34 comments
Like
Comment
Share

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...