फॉलोअर

first meet with amitabh लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
first meet with amitabh लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

०६ नोव्हेंबर २०१८

सतिताभची ‘अमिताभ स्वप्नपूर्ती’



सतिताभची अमिताभ स्वप्नपूर्ती’


             अभिनयाच्या देवाला भेटायचं म्हटलं तर देवाच्या आवडीचं काम करायचं असतं. देवाला भेटायची इच्छादेखील तेवढीच तीव्र असावी लागते. तसा योग पण यावा लागतो आणि सुदैवाने तो योग जुळून आलादेखील. कराडमध्ये अमिताभ बच्चनप्रेमी समूहाने स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून केलेले सामाजिक कार्य,  अमिताभ बच्चनप्रेमी ग्रुपचा उद्देश, उद्दिष्ट याबाबत आम्ही तयार केलेली पुस्तिका अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत व्हॉटस् अॅपवर पोहोचली. ती पुस्तिका तयार करताना त्यामध्ये आम्ही केलेल्या कामांबरोबरच आम्ही अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम का करतो? आम्ही फक्त अमिताभ बच्चन यांचे फॅन नसून त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे अनुयायी आहोत. पडद्यावरील आणि पडद्याबाहेरील अमिताभ सुद्धा आम्हाला आवडतो. याबाबत सविस्तर माहिती आम्ही मांडली होती.

                 ही पुस्तिका पंकज चव्हाण यांच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर मी आणि दीपक प्रभावळकर त्या क्षणाची वाट पाहत होतो, तिथे जाण्याचा रस्ता खुला झाला.सातारा येथील गेट-टुगेदर झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची सर्व तयारी झाली होती. शेवटी अभिनयाच्या या देवापर्यंत निरोप पोहोचला आणि देवाचा सांगावा आला. 26 ऑ्नटोबर 2018 रोजी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर अमिताभ बच्चन यांना भेटावयास आपली वेळ दिली आहे, असा निरोप आम्हास मिळाला. आम्ही हवेतच तरंगू लागलो. ज्याची इतक्या वर्षांपासून उत्सुकतेने वाट बघत होतो, तो क्षण जवळ आलेला पाहून आमच्या आनंदाला पारावर उरला नाही.

      
        आता चर्चा सुरु झाली की, अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं? अमिताभ बच्चन कसे दिसतील? पडद्यावर, टिव्हीवर त्यांना अनेकदा पाहिलंय. प्रत्यक्ष ते कसे आहेत? त्यांना सप्रेम भेट काय द्यायची ? काय बोलायचं? असे अनेक विचार मनात येऊ लागले. अमिताभ बच्चनप्रेमी ग्रुपची माहिती पुस्तिका आम्ही तयार केली होती. या पुस्तिकेमध्ये दोन पानांवर बच्चनप्रेमी समूहाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे फोटो घेतले होते. या ठिकाणी एक फोटो छोटा करून तेथे अमिताभ बच्चन यांची ऑटोग्राफ घ्यायला जागा ठेवावी, असा विचार मनात आला. प्रत्यक्ष भेटल्यानंतर ही पुस्तिका अमिताभ बच्चन यांना द्यायची आणि त्याच जागेवर अमिताभ बच्चन यांनी सही करावी, अशी विनंती करायची असा विचार मनात आला. दीपक प्रभावळकर यांनी अमिताभ बच्चन यांना छत्रपतींची शिवमुद्रा भेट द्यावी, असे सुचवले त्यानुसार  विहे (ता.पाटण) येथील विक्रमसिंह पाटील यांच्याकडून त्यांनी शिवमुद्रा तयार करून घेतली. साताऱ्याहून येणाऱ्या पंकज चव्हाण आणि त्यांच्या इतर मित्रांनी सुद्धा अमिताभ बच्चन यांना द्यावयाची गिफ्ट घेण्याचे ठरवले. त्यानुसार सर्व तयारी झाली. पंचवीस तारखेला मुंबईला जायला आम्ही निघालो.
               
                      प्रभावळकर अगोदरच मुंबईमध्ये मुक्कामी होते. प्रवासात अमिताभ बच्चन हा एकच विचार डो्नयात होता. आजपर्यंत अनेक वेळा मुंबईला गेलेलो आहे. खाजगी कामासाठी, कार्यालयीन कामासाठी मात्र आज एका वेगळ्याच उद्देशाने मुंबईला निघालेलो आहे. होय..! अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी निघालेलो आहे. त्यांना भेटण्यासाठी 35 हून अधिक वर्षे वाट पाहिली. तो दिवस आज उजाडला आहे. तो क्षण आता काही तासांवर येऊन ठेपला होता. रात्री अकरा वाजता मुंबईत पोहोचलो. बांद्रामध्ये एका हॉटेलवर मुक्काम केला. रात्री झोपण्याचा प्रयत्न केला, मात्र भेटीच्या विचाराने लवकर झोप लागली नाही. अमिताभ बच्चन यांच्याशी काय बोलायचं? याची तयारी केली असल्यामुळे झोपेतून उठून बसलो आणि त्याची पुन्हा उजळणी केली. सकाळी नऊ वाजता गोरेगाव फिल्म सिटी येथे पोहोचायचे होते. सहा वाजताच उठून सर्व तयारी करून साडेसात वाजता गोरेगावच्या दिशेने निघालो.

             पाऊणे नऊ वाजता गोरेगाव फिल्म सिटीमध्ये प्रवेश केला. चित्रपटमहर्षि दादासाहेब फाळके फिल्म सिटीचा बोर्ड पाहून फार आनंद झाला. रस्त्याला अनेक बोर्ड लावले होते. टीव्ही सिरीयल्स्चे शूटिंग ज्या ठिकाणी चालते हीच ती जागा. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ बोर्ड पाहून मुलांची आठवण झाली. अनेक चित्रपटाचे, सिरियल्स्चे शूटिंग होते हीच ती जागा. ज्या सिरीयलचे शुटींग सुरू असते त्या शूटिंगचा बोर्ड बाहेर लावलेला असतो. असे अनेक फलक रस्त्याकडेला पहायला मिळाले. ‘कौन बनेगा करोडपती’चे शूटिंग स्टुडिओ नंबर पंधरामध्ये होते. 15 नंबर स्टुडिओच्या दारात पोहोचलो आणि समोर अमिताभ बच्चन यांचे मोठे पोस्टर पाहून आनंदाला पारावर उरला नाही.

    
नऊ वाजता फिल्म सिटीमध्ये रिपोर्टिंग आहे, असा निरोप होता. मात्र प्रत्यक्ष दहा वाजता स्टुडिओमध्ये प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती तिथे गेल्यानंतर मिळाली. आमच्याकडे अजून एक तास होता. इतकीवर्षे अमिताभ बच्चन यांना पाहण्याची वाट पाहत होतो. आता फ्नत आणखी एक तास वाट पहायची होती. तो एक तास मात्र लवकर जात नव्हता. अकरा वाजता प्रवेश पासाचे वाटप झाल्यानंतर मी स्टुडिओत प्रवेश केला. तिथे समजले अजून एक तासानंतर शूटिंग सुरू होणार आहे. सेटमॅ्नस वाहिनीच्यावतीने पाहुण्यांसाठी या दरम्यान चहा-पाणी, नाश्ता, जेवणाची सोय करण्यात आली होती.

          थोडं खाऊन घेतलं. साडे अकराच्या सुमारास सुरुवातीला स्पर्धकांचे नातेवाईक, त्यानंतर ऑनलाइन प्रवेश मिळालेले भाग्यवान लोक यांना टप्प्याटप्प्याने स्टुडिओत सोडण्यात आले. तत्पूर्वी या सर्वांचे मोबाईल, पर्स व इतर साहित्य जमा करुन घेतले. कडक तपासणी केल्यानंतरच त्यांना आत सोडण्यात आले. प्रत्येकाच्या हातावर तुम्ही कुणाच्या माध्यमातून आला आहात याबाबत लिहिण्यात आले होते. सर्वात शेवटी आमचा नंबर आला. आमच्या हातावर एस. जी. म्हणजे संजय गांधी यांचे खास निमंत्रित पाहुणे असा उल्लेख करण्यात आला होता. संजय गांधी हे ‘कौन बनेगा करोडपती’ या मालिकेचे निर्माते आहेत. खास निर्मात्यांच्या कोट्यातून आम्हाला या ठिकाणी प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे आमची छाती फुगली.
     
       सुमारे बाराच्या सुमारास आम्ही केबीसीच्या सेटवर प्रवेश केला आणि तो सेट पाहून आमचे डोळे दिपूू लागले. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम टिव्हीवर पाहत होतो. या कार्यक्रमाचा सेट फक्त टीव्हीमध्येच पाहिलेला होता. आज प्रत्यक्षात पाहायला मिळाला, पण आजचा सेट मात्र जरा वेगळाच वाटत होता. आम्ही ज्या दिवशी तिथे गेलो होतो, त्यादिवशी धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी प्रदर्शित केल्या जाणाऱ्या भागाचे चित्रीकरण करण्यात येणार होते. त्यामुळे सेटवर त्या दिवशीच दिवाळी साजरी करण्यात आली होती. .

           संपूर्ण सेट रांगोळीने सजवण्यात आलेला होता. आकाशकंदील, छोटे-छोटे दिवे आणि लाईटचा झगमगाट यामुळे पूर्ण सेट उजाळून गेला होता. होय..! तो दिवस आमच्यासाठी दिवाळीच होती. साधु संत येती घरा। तोची दिवाळी दसरा।। असे म्हटले जाते. आम्ही स्वत:हूनच साधु संतांच्या घरी पाहोचलो होतो. माझ्यासाठी गेल्या 35 वर्षांत वेगवेगळ्या प्रसंगात चित्रपटातील वेगवेगळ्या संवादाच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन करणारा साधू, संत आणि देव हा अमिताभच होता आणि आम्ही त्यांच्या भेटीला गेलो होतो. त्यांच्या घरी गेलो होतो. त्यामुळे त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी ही दिवाळीच होती.



                 ‘कौन बनेगा करोडपती’च्या सहनिर्माते, त्या ठिकाणी असणारा प्रशिक्षित टेक्निशियन स्टाफ यांनी सुरुवातीला आम्हाला काय करायचे आणि काय नाही यावर सूचना दिल्या. थोडीफार रंगीत तालीमही करुन घेतली. हे सर्व झाल्यानंतर अंधार होईल, अचानक लाईट जातील आणि समोरून अमिताभ बच्चन येतील अशी आमची भावना झाली होती. आम्ही अमिताभ बच्चन यांच्या एन्ट्रीच्या दिशेने नजर लावून वाट पाहत होतो, मात्र टेक्निकल स्टाफ आमच्याशी गप्पा मारत असतानाच अचानक अमिताभ बच्चन धावतच सेटवर आले. पंचाहत्तरी पार केलेला हा तरणाबांड सदाबहार महानायक सेटवर आला तोही धावत. आमचे तर हृदय बंद पडायची वेळ आली होती. समोरच अमिताभ बच्चन उभे होते सर्वांना हाय-हॅलो करत होते. माझे डोळे दिपून गेले होते. अतिशय नम्रपणे त्यांनी सर्वांना अभिवादन करताना बैठिए..बैठिए..असे सांगत स्टाफशी चर्चा सुरू केली.

                   काय बोलावं हे कळत नव्हतं, काय करावं हे सुचत नव्हतं. फक्त अमिताभ बच्चन यांना बघतच राहिलो... बघतच राहिलो...बघतच राहिलो. त्यांचा तो उत्साह त्यांचा ते जबरदस्त डॅशिंग पर्सनालिटी आणि आवाजातील धमक याने आम्हाला मोहून टाकलं. नंतरच्या साडेतीन तासांत दोन स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. त्यांना अमिताभजींनी प्रश्न विचारले. हा सर्व भाग 5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला आहेत. तो आपण पाहिला असेलच. त्यामुळे याविषयी काय सांगायचं.


                  अमिताभ बच्चन यांचा सेटवरील वावर अगदी सहज होता. ज्या महानायकाने 50 वर्षे भारतीय सिनेसृष्टीवर अखंड राज्य केले आहे. त्यामुळे निर्माण झालेले वलय आणि मोठेपण याचा लवशेषही त्यांच्या वागण्यात दिसून आला नाही. स्पर्धकांशी व उपस्थित लोकांशी अधूनमधून संपर्क करताना त्यांच्यामध्ये असलेला विनम्रपणा वारंवार दिसून आला. माणूस मोठा झाला की, त्याने अजून विनम्र व्हायचे असते तरंच त्याचे मोठेपण सिद्ध होते, हे अमिताभजी यांना पाहून या साडेतीन तासांत अनुभवायला आले. गुजरातच्या अहमदाबाद येथून आलेला यशराजसिंग या स्पर्धकाशी गप्पा मारताना किंवा राजस्थानच्या लखनसिंह यांच्याशी बोलताना अमिताभजी यांनी त्यांना सहज बोलावयाला भाग पाडलं.

            समोर अमिताभ बच्चन बसल्यानंतर बोलताना कोणताही तणाव येऊ नये म्हणून अमिताभजी यांनी स्वत:हून त्यांची काळजी घेतली. हॉट सीटवर बसवताना त्या स्पर्धकाचा केलेला सन्मान आपण सारेजण पाहतोच पण अधूनमधून त्या स्पर्धकाला तहान लागली आहे का? पाणी हवे आहे का? असे विचारून अमिताभजी यांनी भारतीय संस्कृतीत आदरातिथ्य काय असते, हे दाखवून दिले.

                        स्पर्धेच्या सुरुवातीलाच हा भाग धनत्रयोदशी दिवशी प्रसारित होणार असल्याने आयुष्यात धन आणि संपत्तीची माणसाला गरज आहे, मात्र संपत्ती ही सर्वश्रेष्ठ नाही. ‘धन जीवन की गती है.. धन जीवन का इंधल है’ असे सांगताना ‘ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे’ आणि ‘ज्ञानाच्या माध्यमातून यशस्वी होण्यासाठी बुद्धी हा लॉगिन वर्ड आहे तर बुद्धीमत्ता ही पासवर्ड आहे’ हे ही सांगायला ते विसरले नाहीत.
कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी स्पर्धकांची माहिती व इतर स्क्रिप्ट निर्मात्याकडून येते. तेच अमिताभ वाचून दाखवतात. मात्र प्रश्नोत्तरानंतर मधल्या काळात ज्या गप्पा होतात. त्यातून अमिताभजी यांचं साधंपण आणि मोठेपण खरंच दिसून आलं. मारुती सुझुकी कंपनीची मारुती 800 ही गाडी एकेकाळी भारतात लोकप्रिय होती.

           या वाहनाच्या संदर्भात एक प्रश्न आल्यानंतर अमिताभजींनी यशराजसिंग या युवकाला तुम्ही कधी ही गाडी चालविली आहे का? असा प्रश्न विचारला आणि स्वत:चाही अनुभव सांगितला. राजेश खन्ना सुपरस्टार असताना ते  स्टँडर्ड हेल नावाच्या आलिशान गाडीतून येत असत. त्यांच्या गाडीकडे पाहून मलाही त्या गाडीत बसावेसे वाटत असे. माझी परिस्थिती चांगली झाल्यानंतर मी सुरुवातीला मारुती 800 गाडीच घेतली होती. पण जेव्हा परिस्थिती बिघडली तेव्हा ती गाडी विकावी लागली. हे सुद्धा अमिताभजींनी तितत्याच सहजतेने सांगितले.
                
            मारुती 800 कारमध्ये बसण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात कोण बसलंय याकडे फारसे कोणी पाहत नाही आणि कोणी तुम्हाला ओळखत नाही, असा चिमटाही त्यांनी घेतला. अतिउच्च पदावर गेलेला कोणताही व्य्नती आपल्यावर वाईट दिवस आले होते, मी रस्त्यावर आलो होतो, दिवाळखोर झालो होते हे सांगायला कचरतो. मात्र अमिताभ बच्चन यांनी आयुष्यातील वाईट प्रसंग आणि वाईट काळ खूप काही शिकवून जातो असा संदेशच जणू या उदाहरणातून दिला.


सध्या आरोग्यविषयक जागरुकता वाढली आहे. स्पर्धक यशराजसिंह याने 102 किलो वजन कमी करून 70 पर्यंत कसे आणले? हे त्याच्याच तोंडून काढून घेताना अमिताभजींनी सकाळचा नाश्ता किंवा जेवण एकट्याने बसून करायचं असतं. दुपारचं जेवण सोबतीला एक माणूस घेऊन करायचं असतं तर रात्री जेवायचंच नसतं, असा संदेश देताना आपल्या प्रकृतीचे रहस्यही उलगडले.
अमिताभ बच्चन यांची निरीक्षण कला किती उंच आहे याचा अनुभव जेव्हा लाईफलाईनसाठी नियु्नत तज्ञ व्य्नती पत्रकार मुकेश यांना व्हिडीओ कॉल केला तेव्हा अनुभवला.

              मुकेश यांच्या पाठीशी एक मंदिराचे चित्र होते. हे चित्र नेपाळ येथील पशुपतीनाथ मंदिराचे आहे काय? असा सवाल अमिताभजी यांनी मुकेश यांना केल्यानंतर त्यांनी होय..!, असे उत्तर देताना आमचे वृत्तवाहिनीचे आशिया विभागीय कार्यालय असल्याने हा फोटो येथे लावल्याचे त्यांनी सांगितले. याच ठिकाणी महान या चित्रपटातील ‘प्यार में दिल पे मांर दे गोली’ या गाण्याचे शुटींग झाले असल्याचे सांगत अमिताभजी यांनी नेपाळला अनेकदा गेल्याचे सांगितले.

                 समोरच्या व्य्नतीचा आदर कसा करायचा? हे खरंच अमिताभजी यांच्याकडून शिकावं. राजस्थान येथील लखन सोलुंकी नावाचा युवक स्पर्धक म्हणून हॉट सिटवर आल्यानंतर त्याच्या नावाचे स्पेलिंग पाहून मी तुम्हाला ‘लखन’ नावाने हाक मारु  की ‘लाखन’ नावाने हाक मारु, हे अमिताभजींनी ज्या नम्रतेने विचारले, ते पाहून एखाद्याचे नाव चुकीच्या पद्धतीने उच्चारल्यास तो दुखाऊ शकतो, याची किती काळजी अमिताभजी घेतात हे मला अनुभवण्यास मिळाले. कमी शिक्षण झालेल्या लखन सोलंकी दबकत-दबकत प्रश्नांची उत्तरे देत असल्याने त्याला मनमोकळा करण्यासाठी अमिताभजींनी त्यांच्या नोकरीशी संबंधित माहिती विचारून खुलं केलं. वनविभागात काम करणाऱ्या लखनने 70 हजार झाडे लावली आहेत. हे सांगितल्यानंतर इतकी झाडे लावल्याबद्दल अमिताभजींनी त्यांचे ज्या शब्दांत केले, असे कौतुक त्याने क्वचितच कधीतरी अनुभवले असेल.

                  निसर्गाविषयी अमिताभ बच्चन यांचे असलेले प्रेम यातून दिसलेच. यापुढे जाऊन झाडे ही सजीव आहेत. प्रत्येकाने झाड लावले पाहिजे. आपण झाड लावल्यानंतर त्या झाडाला मुलाप्रमाणे नावही दिले पाहिजे, असे सांगत झाडाचे नाव लखन ठेवा असे त्यांनी लखन यांना सुचवले. साडेतीन तासांच्या या शुटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांच्याकडून एकही चूक झाली नाही. एकदाही रिटेक घ्यावा लागला नाही. टे्निनकल टीमकडून झालेल्या चुकांमुळे दोन सीन पुन्हा चित्रित करण्यात आले. मात्र 77 वर्षीय अभिनयाची कार्यशाळा असलेल्या अमिताभजी यांच्याकडून एकही चूक झाली नाही. यावरून अमिताभजी किती परिपूर्ण व परिप्नव आहेत याचा आम्हाला अनुभव आला. अमिताभजी यांचे मेकअपमन व इतर टे्निनकल स्टाफ  अधूनमधून त्यांच्याकडे यायचा. त्यांनाही अमिताभजींनी चिमटे घेतले. ‘खाली.. पिली बीच में आते हैं.. मैं अच्छा दिख रहा हुं’ असे सांगताना त्यांची विनोदबुद्धी सेटवर हास्य उमटवून गेली.

            तीन तास शुटींग झाल्यानंतर वुटरचा आवाज आला. शुटींग संपलं आणि सर्वांनीच सुस्कारा सोडला. आता अमिताभजी यांना भेटायचं. शुटिंगच्या सेटवर पाऊणेदोनशे लोक होते. या सर्वांच्या जवळ जाऊन अमिताभजी यांनी त्यांची चौकशी केली. त्यांच्यासोबत फोटो काढले. प्रत्येकाला अमिताभजी यांच्यासोबत फोटो काढायचा होता. मात्र या सर्वांसोबत फोटो काढताना अमिताभजी यांच्या चेहऱ्यावर कसलाही राग दिसला नाही.. दिसली ती फ्नत नम्रता. ‘ना तू थकेगा कभी.. ना तु रुकेगा कभी’ ही पं्नती अमिताभजी यांना तंतोतंत लागू पडते. एकेकाकडे फोटो काढून अमिताभजी आमच्या बाजूला आले. खुर्चीवर बसून आम्ही सेटवरील नियमाप्रमाणे सामुहिक फोटो काढून घेतले. आता वेळ आली होती अमिताभजी यांच्याशी बोलण्याची..

                   श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांच्यावतीने सातारा भूषण या पुरस्काराची प्रतिकृती देण्यासाठी पंकज चव्हाण यांनी अमिताभजी यांच्याशी चर्चा केली. यावेळी अमिताभजी यांचा चेहरा एकदम खुलला. मी साताऱ्याला येऊ शकलो नाही. मला साताऱ्याला यायला आवडले असते. ‘मुझे छत्रपती उदयनराजें से बहुत स्नेह हैं’ असे नम्रपणे सांगत त्यांनी हा पुरस्कार स्विकारला. समोर असलेल्या कॅमेरामनने याचे फोटो काढा आणि मला द्या, असे सांगितले. अमिताभजींचे हे वा्नय ऐकून आमची छाती अजून फुलली. हे सन्मानचिन्ह देताना अमिताभजींच्या खांद्याला खांदा लाऊन मी उभा होतो. आमच्यासोबत सातारचे काही मित्र आणि दीपक प्रभावळकरही होते. त्यानंतर सातारच्या मित्रमंडळी परिवाराच्यावतीने छत्रपती शिवरायांची मूर्तीही अमिताभजी यांना भेट देण्यात आली.

                छत्रपतींची मूर्ती पाहून अमिताभजींनी ‘यह बहुत सन्मानी राजा थे’ अशी प्रतिक्रिया दिली. याही वेळेला अमिताभजी यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी मी सोडली नाही. आता माझा नंबर आला होता. अमिताभ बच्चनप्रेमी ग्रुपच्यावतीने तयार केलेली माहिती पुस्तिका मी अमिताभजी यांच्या हातात दिली. या पुस्तिकेतील सर्व पाने अमिताभजींनी उघडून पाहिली. या दरम्यान आमचा ग्रुप काय करतो? कराड शहरात आम्ही स्वच्छता अभियान कसे राबवले हे मी अमिताभजींना सांगितले.  फोटो असलेल्या एका ठिकाणी आम्ही रिकामी जागा ठेवली आहे, त्या ठिकाणी आपण आपला अॅटोग्राफ द्यावा, अशी विनंती मी अमिताभजी यांना केली. त्यांनीही पुस्तिका हातात ठेऊन घेतली. माझे मित्र दीपक प्रभावळकर यांनी अमिताभजी यांना शिवमुद्रा भेट दिली. या शिवमुद्रेविषयी सविस्तर माहिती घ्यायला अमिताभजी विसरले नाहीत.

                  
 आपल्या पप्पांचे अमिताभजी बच्चन यांना भेटण्याचे स्वप्न साकार होणार आहे, हे पाहून माझी मुलगी देवयानी हीने वहीच्या कागदावर शुभेच्छा लिहून दिल्या होत्या. तो कागद मी अमिताभजी यांच्या हातात दिला. अमिताभ बच्चनप्रेमी ग्रुपने तयार केलेला 786 बॅचसुद्धा त्यांनी अतिशय नम्रपणे स्विकारला. मी इच्छा व्य्नत केल्याप्रमाणे त्या माहितीपुस्तिकेवर त्याच ठिकाणी अॅटोग्राफ करुन ती पुस्तिका मला परत मिळाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे देवयानीने दिलेल्या शुभेच्छा संदेशावरही अॅटोग्राफ देऊन तो कागद मला परत मिळाला. खरंच ही माझ्यासाठी फार मोठी भेट होती.



            अमिताभ बच्चन यांना फ्नत पाहण्याची इच्छा होती. ती पूर्ण व्हायला 35 वर्षे लागली. मात्र एवढी वर्षे वाट पाहिल्याचे फळ मिळाले ते म्हणजे अमिताभजींसोबत साडेतीन तास थांबता आले. इच्छा होती काही क्षण डोळे भरुन पाहण्याची. पण पूर्ण झाली साडेतीन तास निवांतपणे पाहण्याची. त्या सोबतीला अमिताभजी यांना जवळून पाहता आले. त्यांच्याशी बोलता आले. त्यांच्याशेजारी उभे राहून  फोटो काढता आले. त्यांना हात लावता आला. त्यांची अॅटोग्राफही मिळाली. आमच्या बच्चनप्रेमी ग्रुपला आपणास भेटावयाचे आहे, अशी इच्छाही मी त्यांच्यासमोर बोलून दाखवली. त्यास त्यांनी हसून प्रतिसादही दिला.

           जे मागावं ते मिळतंच.. फ्नत ते मनापासून मागावं लागतं. स्वप्न ही पहायचीच असतात. स्वप्ने पाहिली तरच पूर्ण होतात. अमिताभ भेट ही माझ्यासाठी स्वप्नवत होती. या भेटीत मिळालेला आनंद ही माझ्यासाठी सर्वोत्तम पारितोषिक होते. हा ठेवा माझ्यासाठी आयुष्यभर जपून ठेवावा असाच आहे. सेटवरून बाहेर पडल्यानंतर मी फ्नत माझ्या जवळच्या घरच्या दोन व्य्नितंशी बोललो. त्यानंतर मला बोलताच येत नव्हतं. इतका हर्षवायू माझ्यात ओसंडून वाहत होता. अमिताभ बच्चन यांच्या भेटीविषयी अजून कितीही लिहीलं तरी शब्द कमीच पडणार आहेत.
(उत्तरार्ध)
सतीश वसंतराव मोरे, कराड.
सतिताभ
+ 91 98 8119 1302, + 91 97 6556 6202

०५ नोव्हेंबर २०१८

व्हेन 'सतिताभ' मिटस् 'अमिताभ !'




व्हेन 'सतिताभ' मिटस् 'अमिताभ !'


‘अमिताभ बच्चन’
अगदी लहानपणापासूनच म्हणजे कळायला लागल्यापासूनच अमिताभ बच्चन हे नाव ऐकतोय...पाहतोय.  त्यांच्या चित्रपटाचा आनंद लुटतोय. नव्हे.. अमिताभ बच्चन यांचेे चित्रपट पाहतच मी लहानाचा मोठा झालो. हे चित्रपट पाहत असताना त्या काळात फक्त निखळ आनंद, मज्जा, एंटरटेंटमेंट एवढाच मुख्य उद्देश असायचा.
होय..! ते वयंच तसं होतं. शालेय जीवनात गाणी, फायटिंग आणि झाडामागे पळणारे हिरो-हिरोइन एवढेच सर्वांना कळायचे. शालेय जीवन संपवून कॉलेजला प्रवेश केला. त्यानंतर मात्र अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे रसग्रहण करायला आम्ही शिकलो. कोणता चित्रपट, त्याचा दिग्दर्शक कोण? निर्माता कोण? कोणतं प्रोड्नशन? अमिताभवर चित्रित गाणी कोणी गायलीत? संगीतकार कोण? त्या गाण्याचं शुटिंग कुठे झालं? इथपर्यंतचा सुक्ष्म अभ्यास बच्चन यांचे चित्रपट पाहताना हळूहळू होत राहिला. 


कराडच्या रॉयल, प्रभात, नटराज आणि राजमहल या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचे चित्रपट  हमखास लागायचे. रॉयल आणि प्रभातमध्ये सर्वाधिक चित्रपट लागायचे. अमिताभ बच्चन यांचा कोणताही चित्रपट आला की शुक्रवारी किंवा शनिवारी पिक्चर बघायला जायचेच असा जणू  अलिखित नियमच झाला होता.  अधुनमधून इस्लामपूरच्या माणकेश्वर, विट्याच्या भैरवनाथ थिएटरमध्येही नातेकवाईकांकडे गेले की प्निचर पहायला जातच होतो. आजोळी रेठरे बुद्रुकला गेल्यानंतर तेथील टुरिंग टॉकिजमध्ये अमिताभ बच्चन यांचा चित्रपट असेल तर मामाशी गोड बोलून रोज प्निच बघायला जाण्याचा हट्ट करीत होतो. 
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून होणाऱ्या मनोरंजनाबरोबरच त्यांचे एक -एक डायलॉग मनात घर करुन जात होते. 

अमिताभ बच्चन यांच्या क्रांतीकारी संवादाने मला सन्मानानं कसं उभा रहायचं हे शिकवलं. ‘मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता’ असं म्हणणारा दीवारमधला विजय कष्टाचे चीज जाणणारा,  स्वाभिमानाने रहायला शिकविणारा होता. तो मला भावला होता. अगदी अलिकडचा अग्निपथ घ्या ना! ‘जिंदगी में तर्नकी करना है, तो ना बोलना बहुत जरुरी है’. ‘हवा तेज है दिनकरराव टोपी संभालो उड जायेगा’ असं म्हणणारा अमिताभ आयुष्यात काही गोष्टींना नाही म्हणायला पाहिजे हे शिकवतो. हाच अमिताभ जेव्हा वातावरण विरोधात असतं तेव्हा माणसानं झुकलं पाहिजे, आपल्या टोपीला हात लाऊन ती सांभाळली पाहिजे, अन्यथा अनर्थ होईल, असे शिकवतो. अमिताभ बच्चन यांच्या वेगवेगळ्या संवादावर अजूनही खूप काही लिहिता येईल, मात्र पुन्हा कधीतरी.

हे सर्व सांगण्याचा उद्देश असा अमिताभ बच्चन यांना पहात पहात मोठे होत असताना अमिताभ बच्चन यांना कधीतरी प्रत्यक्ष भेटायचं, अशी माझी प्रबळ इच्छा होती. अनेकदा अमिताभ बच्चन यांचे ‘मायापुरी’ व चित्रलेखा समुहाच्या ‘जी’  या सिनेमासिकांत आलेले फोटो कटिंग करून ठेवले होते. त्या मासिकात आलेल्या पत्त्यावर अमिताभ बच्चन यांना पोस्टकार्डदेखील पाठवलं होतं. अमिताभ बच्चन यांना भेटायची इच्छा हळूहळू दृढ होत गेली. एखाद्याला भेटण्याची आस लागल्यानंतर जी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती माझीही  झाली होती.



 दरम्यान, 1998 साली शिवउद्योग सेनेच्या वतीने अमिताभ बच्चन यांचा पुणे येथील गणेश कला क्रीडा मंदिर येथे एक कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती पुणे पेपरमध्ये वाचण्यात आली. या कार्यक्रमाला जायचंच असा निश्चय करून माझे मित्र आणि आमच्या यादव- मोरे क्लासेसचे माझे सहकारी अजित यादव यांना गाडीवर बसवलं आणि बॉक्सर सिटी हंड्रेड दुचाकीवरून आम्ही पुणे गाठले. 11 नोव्हेंबर 1998 सायंकाळी सहाच्या दरम्यान कार्यक्रम होता. तिथं माझा बालमित्र हणमंत काशिद अगोदरच पोहचला होता. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत सर्व हॉल गच्च भरून वाहत होता. बाहेरही खूप गर्दी झाली होती. आत जायला जागाच उरली नव्हती. साडेपाच सहाच्या दरम्यान आमचे लाडके अमिताभ बच्चन आलिशान गाडीतून  उतरले आणि थेट हॉलमध्ये गेले. मी त्यांना  पाठमोरे पाहू शकलो. त्यांची ती पाठमोरी छबी आजही माझ्या नजरेत साठवली आहे. कार्यक्रम सुरू झाला. अमिताभ बच्चन यांनी मै ओर मेरी तनहाई सादर केली. तसेच आयुष्यात घडलेले काही प्रसंग सांगताना सदैव पुढे चालत रहा असा संदेश देऊन उपस्थित युवकांना उर्जा दिली. बाहेर उभा राहून स्पिकरवरुन आम्ही कार्यक्रम ऐकला. त्या दिवशी पुण्यात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमाची बातमी पेपरमध्ये येणारच याची खात्री होती. त्यामुळे स्वारगेट स्टँडवर जाऊन पुढारी घेतला आणि तो अंक आजही माझ्या संग्रही आहे. पुढारीमध्ये अमिताभ बच्चन यांचे भाषण आले होते, जे मी ऐकले होते . काय होते त्या भाषणात? 



‘मन का हो तो अच्छा, नहीं हो तो और भी अच्छा’ अमिताभ बच्चन यांनी  त्यांचे वडिल हरिवंशराय बच्चन यांच्या तोंडून ऐकलेला हा दिव्य विचार मला खूप भावला. जर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली तर ते खरंच चांगलं असतं पण दुर्दैवानं आपल्या मनासारखे झालं नाही तर ते त्याहुन अधिक चांगलं असतं. कारण जे आपल्या मनासारखं होत नाही, ते ईश्वराच्या मनासारखं असतं आणि ईश्वर कधीही कुणाचं वाईट करुचशकत नाही. बच्चन यांच्या वडिलांचा खुद्द बच्चन यांच्या तोंडून ऐकलेला हा विचार माझ्या मनावर त्या दिवसापासूनच इतका भिनला आहे, की कधीही मला कोणत्याही अडचणी आल्या, कार्यालयीन, सामाजिक, वैयक्तिक असो किंवा कौटुंबिक असो मी हे वाक्य डोळ्यासमोर घेतो आणि मला प्रश्नांची उत्तरे मिळतात.

1998 साली अमिताभ बच्चन यांना पुण्यात भेटू शकलो नाही, मात्र त्यांना दुरुनच पाहिलं होतं. तरीही मनाचं समाधान झालं नव्हतं. बच्चन साहेबांना एक दिवस भेटायचंच हा माझा पक्का इरादा होता. अमिताभ बच्चन मला भेटणारच. याचा मला पूर्ण विश्वास होता.  असं म्हणतात एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं तर तीही व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते. अमिताभ बच्चन यांच्यावर कलाकार म्हणून असलेलं प्रेम मला कधीच झोपू देत नव्हतं. अमिताभ बच्चन यांचा चित्रपट पाहून आल्यानंतर या चित्रपटात असलेली भूमिका घेऊन तशाच प्रकारची वेशभूषा असलेले अमिताभ माझ्या घरी येऊन गेलेले आहेत. होय.. खरंच! ही स्वप्नातली गोष्ट असली तरी अमिताभ बच्चन यांच्या स्वप्नातल्या भेटीचा पण आनंद औरच आहे.




 मला आठवतंय 1988 च्या दरम्यान अमिताभ बच्चन यांचा ‘शहेनशाह’ हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट त्यावेळी चित्रपट गृहांबरोबरच व्हिडिओ सेंटरमध्येही रिलीज होत होता. काही कारणांमुळे हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी विरोध होत होता. त्याकाळी अमिताभ बच्चन यांच्या मदतीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे धावून आले होते आणि त्यानंतर हा चित्रपट रिलीज झाला.प्रभात थिएटरच्या शेजारी असलेल्या ‘फन अँड फूड व्हिडिओ सेंटर’मध्ये बाकड्यावर बसून पाहिलेला ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ आजही स्मरणात आहे. त्याच रात्री ‘शहेनशहा’ची वेषभुषा धारण करुन बच्चनजी आमच्या घरी आले होते. असो ..असं म्हणतात ज्याला भेटावयास तुम्हाला खूप ओढ लागली आहे... आस लागली आहे... ती आस जर खरी असेल तर, तुमचं प्रेम जर खरं असेल.. तर त्या लहरी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि तुम्हाला त्या व्यक्तीपर्यंत जाण्यासाठीच्या अनेक वाटा दिसू लागतात. अशीच एक वाट मलादेखील सापडली. व्हाटस् अॅप सुरू झाल्यानंतर.
व्हाटस् अॅप हे सोशल अॅप सुरू झाल्यानंतर त्यावरील प्रोफाइल फोटो लावण्याची पद्धत सुरू झाली. पहिल्या दिवशीपासून आजअखेर व्हाटस् अॅपच्या प्रोफाइलवर फक्त अमिताभ बच्चन यांचाच फोटो मी ठेवलेला आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत असल्याने अनेक मित्रांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माझ्या अमिताभ बच्चन यांच्या प्रोफाइल्सचे कौतुक करतानाच तुम्हाला हे फोटो कुठून मिळतात? असा प्रश्न सुरुवातीच्या काळात केला होता. हळूहळू  माझी ‘अमिताभ बच्चनप्रेमी’ अशी ओळख तयार झाली आणि त्यातूनच अमिताभ बच्चन यांच्या नावाचा अमिताभ बच्चनप्रेमी नावाचा ग्रुप मी सुरू केला. या ग्रुप मध्ये माझ्या जवळचे अमिताभ बच्चनप्रेमींना  अॅड करून आम्ही सर्व कराड, सातारचे बच्चनप्रेमी एकत्र आलो. हळूहळू या ग्रुपवर येण्यासाठी जिल्हाभरातून मागणी होऊ लागली.एका हिरोच्या नावाने सातारा जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी सुरु झालेला ‘अमिताभ बच्चनप्रेमी’ हा आमचा पहिलाच ग्रुप असावा. या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाविषयी चर्चा करू लागलो. गाणी, व्हिडिओ, फोटो शेअर करू लागलो आणि अल्पावधीतच आमचा ग्रुप अतिशय लोकप्रिय झाला.


खरं तर व्हाटस् अॅपवरती अनेक मेसेज येत असल्याने लोक खूप कंटाळतात. तरीही फक्त अमिताभ बच्चन यांचीच गाणी, व्हिडिओ, फोटो, बातम्या एवढेच टाकायचे. इतर काही टाकल्यास दोन चुका माफ.. तिसऱ्यावेळी ग्रुपमधून बाहेर. असा अतिशय कडक नियम असलेला आमचा ग्रुप चांगल्या पद्धतीने वाढत होता. आमच्या ग्रुपची गेल्या वर्षी एक बैठक झाली. या बैठकीत अमिताभ बच्चन यांचा 75 वा वाढदिवस कराडच्या विश्रामगृहावर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच दिवशी दैनिक पुढारीने अमिताभ बच्चन यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पुरणीचे पूर्ण पान प्रसिद्ध केले होते. त्याचे प्रकाशन आम्ही केले. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांना भेटायला जाण्यासाठी काय करता येईल? याबाबत चर्चा झाली. अमिताभजींना भेटण्याची माझ्या एकट्याची इच्छा आता आमच्या समूहाची झाली. आमच्या समूहाने अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी काहीतरी करावे तिथपर्यंत पोहोचावे असा संकल्प केला. या कार्यक्रमात बोलताना मी एक निश्चय व्यक्त केला होता अमिताभ बच्चन यांना आपण भेटणारच. अमिताभ बच्चन यांना आपण फक्त भेटणार नाही तर त्यांच्याशी हस्तालोंदनही करणार. अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करणारे आपण प्रेमी आहोत. प्रेमी आहोत म्हणून बच्चन यांचं महत्त्व आहे आणि अमिताभ बच्चन आपल्याला भेटणारच, असा अतिशय सकारात्मक संकल्प करून आम्ही वाटचाल सुरु केली. (11 ऑ्कटोबर 2017)


आमचा अमिताभ बच्चनप्रेमी ग्रुप कराडात कार्यरत आहे. त्याहून फार मोठा ग्रुप कोल्हापूरमध्ये गेल्या चार पाच वर्षांपासून काम करत आहे. ‘बच्चनवेडे कोल्हापुरी’ नावाचा हा ग्रुप सुरू झाल्यानंतर माझे पत्रकार मित्र संभाजी थोरात यांच्याकडून मला  या ग्रुपची माहिती मिळाली. या ग्रुपचे मुख्य अॅडमिन सुधर्म वाझे यांच्याशी संपर्क करून मीही त्या ग्रुपमध्ये सहभागी झालो. कोल्हापूरकरांच्या बच्चनवेडाला खरंच तोड नाही. गेले चार वर्षे हा बच्चनवेडे कोल्हापुरी ग्रुप धूम धडाक्यात सुरू आहे, असं म्हणण्याचं कारण की, जसे अमिताभ बच्चन यांचे चित्रपट रजत, सुवर्ण, अमृत महोत्सव साजरा करतात, थांबत नाहीत. तसाच बच्चनवेडे कोल्हापुरी हा ग्रुप 24 बाय 7 सुरु असतो. एका दिवसात या ग्रुपवर किमान तीनशे पोस्ट पडतात. रोज रात्री 9 ते 12 अमिताभ बच्चन यांच्या गाण्याची मैफिल सुरु असते. या ग्रुपमध्ये मी सहभागी झाल्यानंतर माझ्याकडे असलेली काही माहिती मला त्या ग्रुपवर शेअर करता आली. त्याहून कितीतरी पटीने नवीन माहिती मला मिळत गेली. या ग्रुपचे अनेकदा गेट-टुगेदर होतात.  त्यातल्या दोन कार्यक्रमांना मला जाता आले. कोल्हापूरकरांनी मला इतके प्रेम दिले की मलाही कोल्हापूरवासिय व्हावे, अशी इच्छा झाली. दोन महिन्यापूर्वी या अमिताभ बच्चनवेडे कोल्हापुरी ग्रुपला कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर जाण्याची संधी मिळाली. या ग्रुपचे तब्बल 50 सदस्य केबीसीच्या सेटवर गेले होते. या सर्वांनी अमिताभ बच्चनरुपी अभिनय देवाला प्रत्यक्ष डोळे भरून पाहिले. याचे वर्णन मी ग्रुपवर वाचत होतो आणि इकडे माझी इच्छा तीव्र अजूनच होत होती. माझे सातारचे बच्चनप्रेमी मित्र दीपक प्रभावळकर आणि मी अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी आणखी काय करता येईल यावर सविस्तर चर्चा सुरू केली.


कराडमधील अनेक राजकीय लोकांशी माझे जवळचे संबंध आहेत. या राजकीय लोकांना भेटल्यानंतर मी कधीही वैयक्तिक काम त्यांना सांगितले नव्हते. सांगणारही नाही.. पण सध्याच्या मुख्यमंत्र्यांजवळ वजन असलेल्या दोन-तीन प्रमुख दिग्गजांना, माजी मुख्यमंत्र्यांजवळ ‘मला अमिताभ बच्चन यांना भेटायचे आहे. तुम्ही काय करू शकता?’ अशी विनंती केली होती. आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावतीने अमिताभ बच्चन यांना सातारा येथे ‘सातारा भूषण’ पुरस्कार देण्याचा निर्णय सत्कार समितीने घेतला. या समितीमध्ये माझे मित्र हरिष पाटणे आणि दीपक प्रभावळकर यांचा समावेश होता. याबाबत त्या दोघांनाही मी अनेकदा फोन करून भेटेल तेव्हा ‘सातारा येथे अमिताभ बच्चन आल्यानंतर मला त्यांना भेटायचे आहे, आमच्या बच्चनप्रेमी ग्रुपला अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी वेगळा वेळ मागा. तुम्ही काहीतरी कराच,’ असा मी सतत आग्रह केला होता. हरिष पाटणे आणि दीपक प्रभावळकर या दोघांनीही आपण बच्चन यांना भेटायचेच, असे सांगत मला सकारात्मक ऊर्जा दिली. 


दरम्यान, राजस्थान येथे ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपटाचे शुटिंग सुरु असताना अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याने आणि यानंतर पुढील शुटींगसाठी सलग तारखा असल्याने त्यांना सातारा येथे पुरस्कार स्विकारण्यासाठी येता येऊ शकले नाही. छत्रपती उदयनराजे भोसले यांना साताऱ्यामध्ये आणणारच, अशी शिवप्रतिज्ञा करत या कामासाठी त्यांच्या जवळच्या काही मित्रांना अमिताभ बच्चन यांच्या संपर्कात राहण्यासाठी वाटा दाखवून दिल्या. सातारा येथे अमिताभ बच्चन यांचा होणारा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. मी काहीसा नाराज झालो असलो तरी बच्चन आम्हाला भेटणारंच. आता तरी बच्चनजींना भेटल्याशिवाय मी सोडणारच नाही, असा संकल्प आणखीन दृढ झाला. 


दरम्यान, आमचा कराडचा बच्चनप्रेमी ग्रुप आता अधिकच कार्यतत्पर झाला होता. अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबरला वाढदिवस असतो. या  दिवशी काहीतरी वेगळं करण्याचा संकल्प आम्ही केला. बच्चन यांचा वाढदिवस तर सगळेच लोक करतात, मग आपण अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त वेगळं काय करू शकतो? असा विचार पुढे आल्यानंतर बच्चनप्रेमी राहुल खोचीकर यांनी समाजासाठी काहीतरी करावे, असे सुचविले. अमिताभ बच्चन हे भारत सरकारच्या स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानाचे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत, तर मग वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांनी सांगितलेला मार्ग स्वीकारत आपण कराड शहरात स्वच्छता अभियान राबवावे, असा विचार केला. 

11 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी साडेसहा वाजता आम्ही कराडच्या कोल्हापूर नाका परिसरात जमलो. महात्मा गांधी पुतळा परिसर, पोपटभाई पेट्रोेल पंप परिसर, पंकज हॉटेल परिसर या ठिकाणची स्वच्छता केली. सुमारे चार टन कचरा गोळा केला. कधी घरात झाडूही उचलून न ठेवणारे आमच्यातील बच्चनप्रेमी लोक त्यादिवशी हिरीरीने स्वच्छता करीत होते. आमच्यात बच्चनप्रेमाचा उत्साह संचारला होता. आमच्यात अनेक सामान्य नागरिकांबरोबरच डॉक्टर, इंजिनिअर, राजकीय नेते, पत्रकार, नगरसेवक, उद्योगपती ते करोडपती असे बच्चनप्रेमी आहेत, मात्र आमच्या सर्वांचा दुआ फक्त बच्चन हा आहे. ‘आमचा श्वास... आमचा ध्यास.. अमिताभ.. अमिताभ!’ हे आमच्या बच्चनप्रेमी ग्रुपचे ब्रीदवा्नयच आहे. बच्चन प्रेमाने भारावलेल्या आम्ही 50 जणांनी स्वच्छता अभियान राबवून आनंद लुटला. दुपारी आम्ही कराडच्या चावडी चौकात जिलेबी वाटप केले आणि सायंकाळी सर्वांनी एकत्र बसून ‘मुकद्दर का सिकंदर’ हा चित्रपट पाहिला. केक कापला.. मजा केली. या कार्यक्रमात बोलताना पुन्हा एकदा सर्वांनी ‘अमिताभ बच्चन यांना कधी भेटायचे, काहीतरी करा’ असा नारा केला. या कार्यक्रमासाठी सातारहून आलेल्या दीपक प्रभावळकर यांनी कराडमध्ये बच्चनप्रेमींचे गेट-टुगेदर झाले, अगदी तसेच सातारमध्येही करूया, असा विचार मांडला.  यानंतर लगेचच 22 ऑक्टोबरला सातारा येथील 30 बच्चनप्रेमींच्या सोबतीने आम्ही कराडचे चाळीस बच्चनप्रेमींनी सातारमध्ये अमिताभ बच्चन यांचा ‘शराबी’ चित्रपट एकत्रपणे पाहिला. केक कापला.. धमाल केली.इथेही पुन्हा अमिताभ बच्चन यांना कधी भेटायचे असा विचार सर्वांनीच मांडला.अमिताभ बच्चन यांना अनेकदा भेटलेले, छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय सातारचे पंकज चव्हाण या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या भेटी दरम्यान व्यक्त केलेल्या अनेक अनुभवांतून आमच्या डोळ्यांसमोर बच्चनजी उभे राहत होते आणि बच्चनभेटीची इच्छा आणखीनच तीव्र होत होती.

सातारचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आपल्या ग्रुपच्या सर्व उपक्रमाची माहिती एकत्र करून याबातचे एक माहिती पत्रक तयार करण्याचा विचार प्रभावळकर यांनी मांडला. हे माहिती पत्रक अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत कसे पोहोचेल? कसे पोहोचवता येईल? यासाठी पंकज चव्हाण यांनी पुढाकार घेण्याचे मान्य केले. दोन दिवस विचार करून एक वेगळ्या प्रकारचे माहितीपत्रक विशाल देशमुख यांच्या मदतीने तयार करून घेतले. विशालने हे माहिती पत्रक अतिशय आकर्षक होण्यासाठी त्याचे सर्व स्किल वापरले. हे माहिती पत्रक तयार करताना यामध्ये अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचे नाविण्यपूर्ण उपक्रम आणि या ग्रुपचा मूळ उद्देश आम्ही मांडला. ग्रुपची माहितीचा संक्षिप्त शब्दांत मराठीमध्ये मजकूर मी तयार केला. मात्र अमिताभ बच्चन यांना मराठी वाचता येणार नाही. त्यामुळे याचे इंग्लिश भाषांतर केले पाहिजे. हे इंग्लिश भाषांतर अतिशय मोजक्या आणि प्रभावी  शब्दांत करण्यासाठी कराडचे दुभाषक आणि पत्रकार दीपक पाटील यांनी मला मोलाची मदत केली. हे माहितीपत्रक तयार झाल्यानंतर पंकज चव्हाण यांच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत याची पीडीएफ फाईल पाठवण्यात आली. अमिताभ बच्चन यांनी ती फाईल पाहिली.. आणि पुढे चमत्कार झाला.


छत्रपती उदयनराजे भोसले यांचे अमिताभ बच्चन यांच्यासोबत असणारे दृढ संबंध आणि पंकज चव्हाण यांच्यामुळे अखेर अमिताभ बच्चन यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आलाच. वाचा उद्याचा भाग काय झालं या भेटीत.

(पूर्वार्ध)


सतीश वसंतराव मोरे, कराड.
सतिताभ
+91 988 1191 302, +91 976 5566 202.

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...