*आक्रमक नेतृत्वातून अध्यात्माच्या वाटेवर…*
*भीमराव डांगे यांचा प्रेरणादायी प्रवास*
कराड पंचायत समितीचे माजी सदस्य भीमराव डांगे आणि माझी मैत्री ही २००२ सालापासूनची. २००१ ते २००५ हा पंचायत समितीच्या राजकारणातील एक वेगळाच काळ होता. त्या काळातील सदस्य हे अभ्यासू, आक्रमक आणि जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारे होते. भीमराव धोंडी पाटील, अशोकराव थोरात, कोर्टीचे थोरात आणि भीमराव डांगे यांसारख्या अनेक मान्यवरांनी त्या काळात पंचायत समितीच्या सभागृहात सामान्य माणसाचे प्रश्न ताकदीने मांडले. पत्रकार म्हणून त्या काळात जुळलेली मैत्री आजही कायम आहे.
परवा भीमराव डांगे यांची त्यांच्या शेतात भेट झाली आणि अनेक जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. खरं तर शामगावचा एक आक्रमक चेहरा म्हणून भीमराव डांगे यांच्याकडे पाहिले जाते. कऱ्हाड तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेले हे गाव… कायम दुष्काळाच्या छायेत राहिलेलं गाव. आंतवडी, सुर्ली, कामथीसह हा संपूर्ण परिसर डोंगरी आणि पाणीटंचाईग्रस्त. मात्र शासनाच्या नोंदीत या गावांचा डोंगरी भागात समावेश नव्हता. या गावांना न्याय मिळावा म्हणून भीमराव डांगे यांनी मोठा संघर्ष उभारला.
पाणीटंचाईचा प्रश्न असो, दुष्काळी छावण्यांचा विषय असो किंवा शामगावच्या पाणी योजनेचा मुद्दा असो, डांगे नेहमीच आक्रमकपणे लढत राहिले. गेली वीस वर्षे त्यांनी पाण्यासाठी केलेला संघर्ष शामगावकरांच्या कायम स्मरणात राहील. राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांशी त्यांच्याशी असलेली मैत्री अनेक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली. नंतरच्या काळात ते भाजप नेते जयकुमार गोरे यांच्या संपर्कात आले आणि शामगावच्या पाणी प्रश्नासाठी त्यांनी नव्या पातळीवर प्रयत्न सुरू ठेवले. त्या लढ्याला लवकरच यश मिळेल, अशी आशा आजही आहे.
मात्र आजच्या भेटीत मला सर्वात जास्त आश्चर्य वाटलं ते बदललेल्या भीमराव डांगे यांचं.गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी सक्रिय राजकारण आणि समाजकारणातून जवळपास संन्यास घेतला आहे. आता ते वारकरी आणि माळकरी बनले आहेत. आयुष्याचा उर्वरित काळ अध्यात्म, संस्कृती आणि भक्तीमार्गासाठी वाहून घेण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे.
शामगाव येथील त्यांच्या वस्तीवर गेल्यावर हा अनुभव अधिक गहिरा झाला. त्यांच्या घरामागील शेतात त्यांनी जवळपास दोनशे आंब्याची झाडे लावलेली आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी, माझे मित्र किशोर पाटील आणि देवयानी सोबत आंबे आणण्यासाठी तिथे गेलो होतो. बागेत फेरफटका मारला, आंबे घेतले आणि नंतर सुरू झाली अध्यात्मावर चर्चा.
मला अक्षरशः धक्का बसला.सभागृहात प्रश्नांवर आक्रमकपणे बोलणारे भीमराव डांगे आता ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि वारकरी संप्रदायावर इतक्या अभ्यासपूर्ण पद्धतीने बोलत होते की मी भारावून गेलो. पंधरा-वीस मिनिटे आमच्यात ज्ञानेश्वरी, पंढरीची वारी, भक्ती, समाधान आणि आयुष्याच्या अंतिम सत्यावर मनमोकळी चर्चा झाली.बदललेले भीमराव डांगे पाहून मनापासून आनंद झाला.
राजकारणातील संघर्ष अनुभवलेला हा माणूस आता अध्यात्माच्या शांत वाटेवरून चालत आहे. सक्रिय राजकारणातून बाजूला होत त्यांनी थेट भक्तीमार्ग स्वीकारला आहे. दरवर्षी गावात एक महिना ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह आयोजित करण्याचा त्यांनी निश्चय व्यक्त केला. हा निर्णय म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर नव्या पिढीला संस्कार आणि अध्यात्माशी जोडण्याचा प्रयत्न आहे.
आक्रमक नेतृत्वातून अध्यात्माकडे झालेला भीमराव डांगे यांचा हा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे.
त्यांच्या या आध्यात्मिक कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा!
सतीश मोरे सतिताभ
९८८११९१३०२