फॉलोअर

२४ जानेवारी २०१९

Community of 99 people

*अंतरंग*

अतिशय सुंदर गोष्ट आहे ,
वाचा,आपणास नक्की आवडेल!

*मी बारावीमध्ये असताना इंग्लिश पुस्तकात शिकलेला नंतर यादव मोरे क्लासेसमध्ये अनेकदा शिकवलेला एक धडा. मला लेखक आठवत नाही.*

*९९ लोकांची एक जमात*
*Community of 99 People*

एक गाव होतं. डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं, त्या गावात ९९ स्त्री पुरुष रहात होते. सारे लोक अतिशय अतिशय कष्टाळू होते. दिवसभर काम करत. खाऊन पिऊन सुखी होते सारे. *त्या ९९ लोकांमध्ये एक अतिशय हुशार व्यक्ती होता.*

गावातील लोक रोज सकाळी पाणी आणण्यासाठी खुप लांब पायपीट करीत उंचावर असलेल्या झर्‍याजवळ जायचे. या कामासाठी त्यांचे रोज सकाळचे तीन चार तास खर्ची पडायचे. हे सर्व लोक हे काम पूर्ण झाल्यानंतर इतर कामाला लागायचे. त्या हुशार माणसाने याचा अभ्यास केला, माहिती घेतली,पाण्याचा प्रवाह कसा आहे याचे निरीक्षण केले आणि हे पाणी गावात कसे आणता येईल याचे नियोजन सुरू केले.

रात्रंदिवस काम केले, झरा ते गावापर्यंत पाणी प्रवाहाने आणण्यासाठी चर खोदायला त्याने सुरुवात केली. अनेक दिवस काम केले.शेवटी ते पाणी गावात आले,लोक खुश झाले.आता गावातच पाणी मिळणार, पाण्यासाठी चार तास घालवावे लागणार नाहीत, याचा सर्वानाच आनंद झाला.

आता मात्र त्या हुशार व्यक्तीने लोकांना पाणी देण्यासाठी एक  अट घातली. *मी तुम्हाला पाणी देईन मात्र त्या बदल्यात तुम्हाला मला तुमचा वेळ द्यावा लागेल. आज पर्यंत तुम्ही पाणी आणायला रोज चार तास घालवत होता,आता एका तासात तुमचे पाणी भरण्याचे काम होणार आहे, त्यामुळे तुमचे चार तास वाचतील. त्यापैकी ३ तास तुम्ही मला द्यायचे,अशी अट त्याने घातली.*

रोज पाणी आणायला लागणार्‍या वेळेच्या बदल्यात दोन तास त्या व्यक्तीला देऊन आपलेही दोन तास उरतात, हा व्यवहार इतर सर्वांना पटला. वाचलेला  वेळ हुशार व्यक्तीला द्यायची अट सर्वानी मान्य केली.

सर्व ९८ लोक हुशार व्यक्तीच्या घरी रोज २ तास कामाला येऊ लागले. घरातील स्वच्छता, शेती मशागत, कपडे धुणे, झोपडी बांधणे,जनावरांची काळजी घेणे, दुध काढणे आदी अनेक प्रकारची कामे हे  लोक करू लागले.

ही कामे करत असताना त्या हुशार व्यक्तीने अनेक लोकांना हेरले. त्याच्या असे लक्षात आले की 'म' नावाची व्यक्ती फळे फुले याची काळजी योग्य प्रकारे घेतोय, त्याला यात रस आहे. मग त्याने 'म' ने इतर सर्व लोकांच्या घरातील, शेतातील फळाफुलांची काळजी, मशागतीची कामे करायची. त्या बदल्यात इतर सर्व व्यक्तींनी त्याची इतर कामे करायची, असा निर्णय घेतला. पुढे ती व्यक्ती 'माळी' म्हणू लागले.

त्या हुशार व्यक्तीने प्रत्येक  लोकांमधील एक एक गुण हेरला.  पुढे त्याच्यातील सर्वोत्तम गुणाचे ते काम त्याला दिले, त्या बदलात इतर लोकांनी त्याला वेळ दिला. पुढे वेळेच्या जागेवर वस्तू आल्या आणि पुढे कामावर आधारीत व्यवस्था त्या गावात निर्माण झाली. 

चांगली कपडे शिवणारा शिंपी झाला, चांगले पशुसंवर्धन करणारा गवळी झाला. चांगली मातीची भांडी तयार करणारा कुंभार झाला. न्हावी,चर्मकार, लोहार, शेतकरी, गवंडी, गायक, वादक, धोबी असे अनेक *'कर्मकार'* झाले.

*काम चांगले करणारा कुशल कामगार तयार झाला,पुढे त्याची पत्नी, मुले, पुढची पिढी हेच काम करत राहीले व त्यानंतर त्याच नावाने, कामावरून त्यांना ओळखले जाऊ लागले. कामावर आधारित व्यवस्था, पुढे जाती व्यवस्था तयार झाली.*

© @ *सतिताभ*
सतीश वसंतराव मोरे

२४.०१.२०१९

karawadikarad.blogspot.com

१८ जानेवारी २०१९

फ्लेक्स बंदी निर्णय न ठरो वांझोटा



एक महिन्यापूर्वी सकाळी मंगळवार पेठेतील एका ब्राम्हण कुटुंबातून फोन आला होता. ‘पत्रकार,आमच्या भागात गुंडांचे खूप सारे फ्ले्नस लागले आहेत. आम्हाला घरात येणाऱ्या रस्त्यावरच हे फ्ले्नस लावले आहेत. कोणाला सांगायचे? नगरपालिकेला कळवायचे तर त्या फ्ले्नसवर एका नगरसेवकाच्या भावाचा फोटो आहे. पोलिसांना कळवायचे तर.. ते ही आमची जबाबदारी नाही, असे सांगून मोकळे होतात. असा या पूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे तुम्हीच यावर काहीतरी करा.!’ यानंतर ‘ आम्हाला त्या फ्ले्नस डॉनची आम्हाला भीती वाटते’ या आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती. फ्नत बातमी प्रसिद्ध करुन आम्ही थांबलो नाही तर कराडचे कारभारी जयवंतराव पाटील आणि राजेंद्रसिंह यादव यांना प्रत्यक्ष भेटून या गोष्टींची दाहकता स्पष्ट केली होती. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनाही भेटून आम्ही याबाबत कराड पालिकेने कडक कारवाई करण्याची गरज आहे. फ्ले्नस लावण्यासाठी त्या गुंडांच्या समर्थकांनी परवानगी घेतली होती हे जरी खरे असले तरी परवानगी घेऊन, पैसे भरून कोणाचेही, कसलेही फ्ले्नस लावायला केवळ उत्पन्नात भर पडते म्हणून पालिका परवनगी देणार असेल तर पालिका दुसरे धंदे का सुरु करीत नाही? असा खडा सवालही केला होता. पालिकेचे कारभारी आणि मुख्याधिकारी या दोघांनीही याबाबत एकमेकांकडे बोटे दाखविली. मात्र कराडमध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे उदात्तीकरण होत राहिले तर यशवंतनगरी ‘गुंडनगरी’ होईल आणि हेच गुंड पुढे जाऊन पालिकेच्या राजकारणात येतील. समाजसेवेचा बुरखा घातलेले शस्त्र बाळगणारे गुंड जर कराडच्या राजकारणात येऊ घातले तर कराडच्या विकासावर याचा फार मोठा परिणाम होईल, अशा प्रकारची विनंती पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना केल्यानंतर राजेंद्रसिंह यादव आणि जयवंतराव पाटील यांनी याबाबत लवकरच पालिकेच्या सभेत गंभीर दखल घेतली जाईल. प्रसंगी कराडात फ्ले्नस बंदीचा ठरावही घेतला जाईल, असे अभिवचन पुढारी प्रतिनिधींना दिले होते.



‘पुढारी’चे कराडच्या समाजकारणाशी गेल्या 30 वर्षांपासून बांधिलकी आहे. 1990 साली  पुढारी कराडात आला. तेव्हापासून कराड शहराच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैचारिक, शैक्षणिक आणि राजकीय जडण-घडणीत पुढारीने नेहमीच वाटा उचलला आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांची कर्मभूमी, पी.डी. पाटीलसाहेबांचे गाव आणि पुढे आता माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे गाव म्हणून कराडचा देशभर नावलौकिक आहे. तो यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील, यशवंतराव मोहिते, जयवंतराव भोसलेे, विलासकाका उंडाळकर, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या विकास महापुरुषांमुळेच! कराडचा नावलौकिक टिकविण्याची आणि वाढविण्याची जबाबदारी नागरिकांवर, राज्यकर्त्यांवर जितकी आहे तितकीच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून दैनिकांवरही आहे आणि याच भूमिकेतून आणि आम्हाला मिळालेल्या अधिकारातून ‘पुढारी’ने कराडच्या कारभाऱ्यांसमोर जी भूमिका मांडली, ती त्यांनी ऐकली, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन! आता यापुढे जबाबदारी आहे, केलेला ठराव, घेतलेला निर्णय प्रत्यक्षात उतरवण्याचा! 



स्वच्छ सर्व्हेक्षण या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत कराड पालिकेने नावलौकीक मिळवला आहे. दोन वर्षांपूर्वीचे कराड शहर आणि आताचे कराड शहर यात फार मोठा फरक झाला आहे. कराड शहरात कुठेही कचराकुंडी नाही हे सांगताना कराडकरांचा ऊर भरुन येतो. परवा मिडियामधील दिल्लीचे एक वरिष्ठ कराडात आले होते. कोल्हापूर ना्नयावर आल्यानंतर त्यांनी मला कराडची माहिती विचारायला सुरुवात केली. कराडची भौगोलिक व राजकीय माहिती सांगून झाल्यानंतर आमच्या शहरात कुठेही कचरा कुंडी नाही, हे मी त्यांना सांगितले. मात्र त्यांना ते पटलेच नाही. शेवटी मी त्यांना चॅलेंज केले. त्यांनी संपूर्ण शहराला फेरफटका मारला आणि कचरा कुंडी नसल्याचे पाहून ‘मैंने जिंदगी में पहली बार ऐसा सिटी देखा है’ असे कौतुक केले. 



स्वच्छता अभियानात कराडने केलेली कामगिरी, त्या माध्यमातून वाढविलेला लौकिक आणखी वाढविण्याची गरज आहे. या स्पर्धेत अजून खूप काही करायचे आहे. कराडला देशात नं.1 वर न्यायचे आहे. कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या सोबतीने विजय वाटेगांवकर, प्रियांका यादव यांच्यासारख्या स्वच्छतेसाठी वाहून घेतलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे आणि नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कराड नंबर 1 होईल याची खात्री आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेने शहर प्लास्टिक मु्नत करण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावर कुठेही कचरा पडणार नाही यासाठी पालिकेचे आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस झटत असतात. (या स्वच्छतेच्या शिलेदारांचा ‘पुढारी’ने वर्धापनदिनी सत्कारही केला होता.) सायंकाळी 6 वाजता बाजारपेठेत पडलेला कागद, उच्चभू्र लोकांनी रस्त्यावर टाकलेले वेफर्सचे रॅपर, चॉकलेट कॅडबरीचे कागद उचलताना या स्वच्छताकर्मींना पाहिले की, हेच कराडचे खरे ‘गाडगेबाबा’ आहेत, अशी खात्री पटते. कराड शहर आणखी सुंदर दिसण्यासाठी पालिकेने घेतलेला फ्ले्नस बंदीचा ठराव याचाच एक भाग आहे.  



मिसरुडही न फुटलेले आणि कर्तृत्व दीड फूटही नसलेले काही युवक  शहरात कुठेही दहा फुटी फ्ले्नस लावतात. त्याखाली डॉन, बादशाह, किंगमेकर, राडा, साहेब, भावड्या, नाद नाय करायचा.., आमचा कराल नाद.. तर व्हाल बाद, आमच्याशी वाकडं... त्याची नदीवर लाकडं.. , अशी वा्नये टाकून काय साध्य करतात, हे त्यांचं त्यांनाच माहित! हे फ्ले्नस बघून शाळेतली पोरं आणखी बिघडायला लागली आहेत. आईचे बोट धरुन चालणारा मुलगा भले मोठ्ठे फ्ले्नस बघून ‘आई, हा कोण आहे?’ असा प्रश्न विचारतो तेव्हा कोणत्या तोंडाने आणि काय याचे वर्णन करु असा प्रश्न आईला पडतो.  


विशी-तिशीतले हे युवक बिघडले खरे. मात्र त्यांना बिघडवणारे आणि त्यांना पाठींबा देऊन लाव फ्ले्नस.. तुला कोण काय करतंय? असे म्हणणारे, त्यांना पाठिंबा देणारे कराडचे काही मेहेरबानच आहेत. आता या मेहेरबानांनीच फ्ले्नस बंदीचा ठराव घेतला आहे. धन्यवाद! कोणत्याही परिस्थितीत कराडमध्ये यापुढे कुठेही फ्ले्नस यापुढे लागता कामा नये. कायदेशीर बाबींचा विचार करुन, परवानगी घेऊन खासगी ठिकाणी किंवा नगरपालिकेच्या मालकीच्या जागेत काही मुख्य चौकात फ्ले्नस किंवा बोर्ड लावण्याचे स्पॉट डेव्हलप करण्याची गरज आहे. मात्र याठिकाणी लावावयाचे बोर्ड फ्नत प्रेरणादायी असले पाहिजेत. मात्र कसल्याही परिस्थिती शहरात कुठेही, कसेही फ्ले्नस लागता कामा नयेत. मागे विनायक औंधकर यांनी याबाबतचा प्रयोग केला होता. मात्र फ्ले्नस बहाद्दर मेहेरबानांनी त्यांना पळवून लावले. आता डांगे यांनी सत्ताधाऱ्यांना फ्ले्नस बंदीचा ठराव केल्यामुळे कराड पालिकेचा कसा फायदा होणार आहे आणि स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये कराडचे नाव कसे उंचावणार आहे हे पटवून देण्याची गरज आहे. पालिकेत बसलेले कारभारी कुणाही गुंडाचा किंवा कोपऱ्यावरील युवा नेत्याचा बोर्ड लावण्यासाठी दबाव टाकत असतील तर त्यांची नावे मुख्याधिकाऱ्यांनी मिडियाकडे जाहीर करावीत. कायदेशीर फ्ले्नस, होर्डिंग्जला परवानगी देताना त्यातील मजकूर, फोटो तपासून घ्यावे लागतील. पालिकेच्या परवानगीबरोबरच पोलिसांच्या परवानगीशिवाय फ्ले्नस लावता येणार नाही, असा दंडक करण्याची गरज आहे. 


सुदैवाने कराडचे पोलिस याबाबत सकारात्मक आहेत. कराडातील गुंड आणि गुंडगिरी संपविण्यासाठी पोलिसांनी गेल्या चार वर्षांत ठोक कारवाई केली आहे. पालिकेने सहकार्य केले तर फ्ले्नसद्वारे गुंडाचे होणारे उदात्तीकरण संपविण्यासाठी पोलिसही चार पावले पुढे टाकतील यात शंकाच नाही. शेवटचा एकच सल्ला... घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. निर्णय घेणे सोपे असते. मात्र त्याची कार्यवाही करणे फार अवघड असते. पालिकेच्या पाठिशी कराडकर आहेतच! त्यामुळे निर्णय प्रभावीपणे राबवा. ‘पुढारी’ तुमच्यासोबत आहेच!


http://www.pudhari.news/news/Satara/Flexbandi-decision-does-not-end-up-in-Wanjhota/m/

१७ जानेवारी २०१९

ना बोलना जरूरी है

*अंतरंग*

*'ना बोलना बहुत जरुरी है'*

अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच्यासमोर बसलेत. कमिशनर गायतोंडे विजयला सांगतात, ज्याच्यासाठी तू काम करतोस त्यांना नाही.ऐकायला आवडत नाही आणि तु तर त्यांना नाही म्हणतो आहेस . यावर अमिताभ बच्चन (विजय)म्हणतो,

*'इस दुनिया मे तरक्की करने के लिए ना बोलना बहुत जरुरी है कमिशनर'*

खरंच बरच काही सांगून जातो हा संवाद ! आपल्या आयुष्यात अनेकदा आपल्याला 'नाही' म्हणण्याचे प्रसंग येतात. अगदी समोरच्या व्यक्तीने चहा घ्या म्हटल्यानंतर 'नाही' कसा म्हणू तिथंपासून एखाद्या व्यक्तीसोबत दिवसभर फिरायला जाऊन आपला चार पाच तास त्याच्या सोबत वाया घालवण्यास 'नाही' म्हणण्यापर्यंत!

आपण अयोग्य गोष्टीला 'नाही' म्हणू शकत नाही तेव्हा आपला वेळ,श्रम आणि शक्ती वाया जाते. काही गोष्टीना 'नाही' न म्हणल्यामुळे आजारपण ओढावते, संकटे येतात,मनस्ताप होतो. हे टाळायला शिकवणारा आणि या सर्वावर मात करायला शिकवणारा अमिताभ बच्चन यांचा 'ना बोलना बहोत जरूरी है' हा डायलॉग मला खूप आवडतो .

खरंच योग्य ठिकाणी जर आपण नाही म्हणायला शिकलो तर पुढील अनेक अनर्थ टळतात. एकदा नाही म्हणलं तर समोरच्या व्यक्तीला एक वेळ राग येईल, दोनदा नाही म्हणले तर आणखीन राग येईल आणि तिसऱ्यांदा तो तुम्हाला त्या गोष्टीसाठी फोर्स करणार नाही.

कोणत्या कोणत्या गोष्टीला नाही म्हणालं शिकले पाहिजे? जी गोष्ट केल्यामुळे आपल्या शरीराचे नुकसान होणार आहे ,जी गोष्ट केल्यामुळे आपला कोणताही फायदा होणार नाही,आपला वेळ वाया जाणार आहे,आपल्याला ती गोष्ट घडल्यानंतर मनस्ताप करावा लागणार आहे, आपल्याला त्या गोष्टीतून फक्त वेदनाच होणार आहेत, ज्या गोष्टी केल्याची आपणास, आपल्या कुटुंबाला लाज वाटेल,अशा कोणत्याही गोष्टीला आपण 'नाही' म्हणायला पाहिजे.

   *नाही कशी म्हणू तुला*
 
खूप वेळा असं होत की "नाही" कसं म्हणावं या संकोचामुळे आपण बळजबरीने आपल्याच मनाला मारत "हो" म्हणतो. मग नंतर पश्चाताप होतो. या प्रश्नांवर एकचं उत्तर म्हणजे 'नाही' म्हणा पण अतिशय नम्रपणे.

"नाही" म्हणायच्या काही खास पद्धती आहेत. ज्या तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील...

# *मी नाही म्हणण्याने माझ्या पेक्षा तुमचाच फायदा होणार आहे*

# *-"मला मदत करायला खुपच आवडले असते. पण मी बांधील असलेल्या इतर काही कामांमुळे तुमचे काम मला योग्य वेळेत पूर्ण करणे शक्य होणार नाही..."*-

# *"क्षमा करा पण सध्या मी ज़रा व्यस्त असल्याने मला तुमच्या कामासाठी ही वेळ योग्य वाटत नाही. पुढील महिन्यात केले तर नाही का चालणार? "*

# *"तुमची योजना खरंच चांगली आहे. पण तरीही मला विचार करायला काही अवधी लागेल. मी तुम्हाला अमुक एक दिवसांनंतर संपर्क केला तर चालेल का?"*

# *" 'अमुक अमुक' कारणामुळे मला ताबडतोब निर्णय देणे शक्य नाही. तरीही कृपया मला विचार करायला ज़रा वेळ दयाल का?"*

# *"मला असे वाटते की 'अमुक अमुक' कारणामुळे मी यासाठी योग्य व्यक्ती नाही. तुम्ही 'अमुक अमुक' व्यक्तिशी का नाही बोलत?"*

# *माफ़ करा पण मला यावेळी खर्च करणे शक्य नाही.मी तुम्हाला मदत करू शकत नाही*

# *हे माझ्या तत्त्वात बसत नाही मी हे केले तर माझं मन मला माफ करणार नाही*

एवढं करूनही समोरची व्यक्ती फारच आग्रही असल्यास कोणतेही कारण देण्याच्या फंदात न पड़ता त्या व्यक्तिला  स्पष्ट 'नाही' म्हणा. शेवटी *एखादया कामाला 'हो' किंवा 'नाही' म्हणणे हे पूर्णतः वैयक्तिक इच्छेवर अवलंबून असते*. त्यामुळे कोणाला काय वाटेल याचा फारसा विचार न करता अत्यंत नम्रपणे आणि आत्मविश्वासाने स्पष्ट बोलणे अधिक योग्य !

©@ सतीश वसंतराव मोरे
*सतिताभ*

१७.०१.२०१९

karawadikarad.blogspot.com

१६ जानेवारी २०१९

आवा चालली पंढरपूरला

*अंतरंग*

*परिसे गे सुनेबाई |*
*नको वेचू दूध दही ||१*
*आवा चालीली पंढरपुरा |*
*वेसींपासुन आली घरा ||२*
*ऐके गोष्टी सादर बाळे |*
*करि जतन फुटके पाळे ||३*
*माझा हातींचा कलवडू |*
*मज वाचुनी नको फोडूं ||४*
*वळवटक्षिरींचे लिंपन |*
*नको फोंडू मजवाचून ||५*
*उखळ मुसळ जाते |*
*माझे मनं गुंतले तेथे ||६*
*भिक्षुंक आल्या घरा |*
*सांग गेली पंढरपुरा ||७*
*भक्षी परिमित आहारु |*
*नको फारसी वरों सारू ||८*
*सुन म्हणे बहुत निके |*
*तुम्ही यात्रेची जांवे सुखे ||९*
*सासुबाई स्वहित जोडा |*
*सर्वमागील आशा सोडा ||१०*
*सुनमुखीचे वचन कानी |*
*ऐकोनी सासु विवंची मनी ||११*
*सवतीचे चाळे खोटे |*
*म्या जावेसे इला वाटे ||१२*
*आता कासया यात्रे जाऊ |*
*काय जाऊन तेथें पाहू ||१३*
*मुले लेकरे घर दार |*
*माझे येथेंचि पंढरपूर ||१४*
*तुका म्हणे ऐसे जन |*
*गोवियेलें मायेंकरून ||१५*

          *संत तुकाराम महाराज*

या अभंगावर आधारित निरूपण कीर्तन मी लहानपणी ऐकले होते. आज तो अभंग पुन्हा आठवायचे कारण दुपारी एक मित्र मला पंढरीच्या वारीबाबत विचारत होता.अठरा दिवस तुम्ही वारीला कसे जाता, इथलं सोडून तिथं कसं जमतं तुम्हाला ,असा सवाल त्याने मला केला. वारीला आला कि तुला हे सर्व कळेल ,तु चल तर वारीला असे बोलून त्याला मी या अभंगाच्या दोन ओळी ऐकवल्या. संसारातून पाय न निघणाऱ्या मानवाचे अतिशय सुंदर चित्रण संत तुकाराम महाराज यांनी अभंगातील खुमासदार गोष्टीतून वर्णन केले आहे.

आवा नावाची महिला पंढरीला यात्रेला चालली आहे. घरातून ती बाहेर पडते खरी पण तिला काहीतरी आठवते आणि ती वेशीपासूनच घरी परत येते. प्रपंचाच्या अनेक साधनामध्ये तिझे मन गुंतले आहे.तीला घरातील प्रत्येक वस्तूची काळजी वाटते. मी पंढरीला गेल्यावर त्याचे काय होणार या विवंचनेत ती परत येऊन सुनबाईला सांगते,या सगळ्यां वस्तुंची काळजी घे. कोणी भिक्षा मागायला आला तर त्यांना काही देऊ नको, तुझी सासू पंढरपूरला गेली असं सांग. सासुबाईंच्या एवढया सुचना व आदेश ऐकून शेवटी सुनबाई त्यांना सांगते, सासुबाई तुम्ही आरामात जावा , मी सर्व काळजी घेईन.पाठीमागील सर्व आशा सोडा असा सल्ला देत तुम्ही बिनधास्त पंढरपूरला जावा असे सुनबाईने सुनावल्यानंतर सासुबाई तापते आणि तिच्या उद्देशाबद्दल संशय घेऊन तिला सवतीची उपमा देते अन् म्हणते, मी इथून जावे असे हिला वाटतंय,पण मी जाणार नाही.कारण माझे घर-दार, माझी मुले- लेकरे हेच माझे पंढरपुर आहे असे सांगून पंढरपूरला जायचे रद्द करते.

*आपल्या समाधानासाठी घरदार मुले लेकरे यांनाच परमेश्वर आणि तिर्थक्षेत्र मानण्यापर्यंत या लोकांची मजल जाते कारण त्यांचा संसारातून पाय निघत नाही,असे तुकाराम महाराज म्हणतात.*

पंढरीच्या वारीला मी ह्या वर्षी नक्की येणार, मला तुमच्या बरोबर घेऊन जावा असे सांगणारे मला अनेक मित्र भेटले आहेत. न विसरता मी प्रत्येक वर्षी त्यांना आठवण करतो जून महिन्यात मात्र त्यांना त्यावेळेला बरोबर अडचणी येतात, हा अभंग हेच तर सांगतो.

माझ्या शिवाय जगाचे कसे होणार, मी जर गावात थांबलो नाही तर गावाचे कसे होणार ,माझ्या संसाराचे काय होणार ,माझ्या कामाचे काय होणार, माझ्या नोकरीचे काय होणार, माझ्या मुलाबाळांचे काय होणार, माझ्या व्यापाराचे काय होणार, नगराचे काय होणार याची चिंता करत बसलेल्या लोकांना देवाची आठवण येते खरी पण फक्त संकटातच. मोह ,माया,लोभ आणि विषयसुखाच्या आहारी गेलेल्या मानवाची अवस्था या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी मांडली आहे.

©@ सतीश वसंतराव मोरे
*सतिताभ*

१६.०१.२०१९

karawadikarad.blogspot.com

१५ जानेवारी २०१९

रोजच गोड बोलुया

*अंतरंग*

*तिळगुळ घ्या आणि आदराने बोला*

आज मकर संक्रांतीदिनी आपणास गोड शुभेच्छा !

karawadikarad.blogspot.com

खरंतरं तिळगुळ देऊन गोड बोलणे हा फक्त एकाच दिवशी करण्याचा सण नाही, रोजचाच दिवस गोड बोलण्याचा दिवस आहे. या जगात सर्व काही गोष्टी ज्या शक्य आहेत त्या गोड बोलण्याने होऊ शकतात. मग एकच दिवस का गोड बोलायचे ?

*तुम्ही कुठेही जाल तिथे सभ्यतेने, तेथील नियमाप्रमाणे,शिस्तीप्रमाणे राहिला,वागलात आणि गोड बोलला तर तुमची कामे सहज होतात.*(याला काही शासकीय किंवा सार्वजनिक कार्यालये अपवाद असू शकतील).मात्र कुठल्याही ठिकाणी वावरताना आपली भाषा जर योग्य, सभ्य आणि आदराची असेल तर समोरच्यांची भाषा आपोआप सभ्य आणि मृदू होते हा माझा अनुभव आहे.

1990 च्या दरम्यान बारावीपास झाल्यानंतर मी करवडीत दहावीचे क्लासेस सुरू केले. तेव्हा अजित  यादव सर यांचे ओगलेवाडी येथे गणित विषयाचे क्लासेस सुरू होते. त्यांना इंग्लिश विषयासाठी पार्टनर हवा असल्याने आणि माझ्याकडे शिकणाऱ्या मुलांनी त्यांना माझ्याविषयी कल्पना दिल्यानंतर आम्ही ओगलेवाडीला एकत्र क्लासेस सुरू केले. करवडीमधील मोरे क्लासेस ओगलेवाडीला गेल्यानंतर यादव मोरे क्लासेस असे नामांतर झाले. अजित यादव हे कडेपूरचे.  खानदानी कुटुंबातील यादव हे सनातन पद्धतीचे,परंपरा मानणारे होते. यादव सरांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता. त्यांच्या सोबतीने क्लास सुरू केल्यानंतर त्यांच्यातला एक गुण मला खूप आवडला,तो म्हणजे इतरांना आदर द्यायचा !

कितीही छोटा,कितीही मोठा मनुष्य समोर आला तर ते त्याच्याशी आदराने,प्रेमाने आणि अहो जावो बोलवायचे. कोणाशीही एकेरी भाषेत बोलायचे नाहीत.त्यांच्या या सवयीची मी कॉपी केली आणि त्याचे अनेक फायदे होत गेले.

इयत्ता पाचवीमधील दहा वर्षाच्या मुलापासून अगदी बारावीमध्ये शिकणाऱ्या सतरा वर्षाच्या मुलांना मी 'आहो जाहो' बोलायला लागलो.ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हायस्कूलमधील शिक्षक एकेरी ,गावरान आणि शिवराळ भाषेत बोलत होते, त्यांचा अपमान करत होते त्या विद्यार्थ्यांना आम्ही आदराने बोलवतो, हे विद्यार्थ्यांना पटत नव्हते.

अनेक विद्यार्थ्यांनी आम्हाला तुम्ही आम्हाला एकेरी बोलवत जा,अशी विनंती केली. मात्र आम्ही आमची सवय सोडली नाही आणि त्याचा फायदा आम्हाला होत गेला. जे विद्यार्थी शाळेतील शिक्षकाविषयी बाहेर वाईट बोलायचे,आमचे सर वर्गात काही शिकवत नाहीत फक्त टाईमपास करतात असे सांगायचे, तेच विद्यार्थी कधीही आमच्या विषयी किंवा क्लासेस विषयी वाईट बोलले नाहीत.आमचा निकालही चांगला होता, शिकवण्याची पद्धत सोपी आणि सहज होती आणि आमची इतरांसोबत बोलण्याची सवय आदराची होती.त्यामुळे आमचा क्लास ओगलेवाडी पंचक्रोशीत खूप लोकप्रिय झाला. दहावीच्या परिक्षेत वनिता रामुगडे ही मुलगी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत आली, पुढे आम्ही बनवडी कॉलनीमध्ये तशाखा काढली.

हे सर्व सांगण्याचे कारण समोरच्या आलेल्या कोणत्याही व्यक्तीला 'एकेरी' बोलवायचे नाही याचा मला खूप फायदा झाला आहे. *व्यक्ती भले मोठा असो लहान असो किंवा पदाने तुमच्या पेक्षा खुप लहान असो,समोरच्या माणसाला आदराने बोलावले तर तो आपोआप तुमच्याशी आदराने बोलतो.* तुम्ही त्याचे आडनाव घ्या किंवा त्याला नावाने बोलवा मात्र कधीही एकेरी भाषेत बोलू नका.बघा काय परिणाम होतो त्याचा !

माझ्यापेक्षा वयाने लहान असो वा मोठ्ठया पत्रकारांना, व्यक्तिंना मी एकेरी भाषेत बोलायचे मी टाळतोच.आदर दिल्याशिवाय आदर मिळत नाही. गोड बोलले की आपोआप पुढचा माणूस तुमच्याशी गोडंच बोलतो आणि आपले काम पूर्ण होते.

परवा एका ठिकाणी एक पाटी वाचली.
*'कृपया आत येताना आपल्या चपला आणि इगो बाहेर ठेवून या'*

खरं आहे हे. *आपण जेव्हा नवीन ठिकाणी जातो तेव्हा जाताना आपल्या मनात आपल्या पदाचा, बुद्धीमत्तेचा इगो झालेला असतो. मी मोठा पत्रकार ! मी शाळेचा मुख्याध्यापक  ! मी बँकेचा मॅनेजर, चेअरमन ! जिल्हा परिषद सदस्य ! अमुक कंपनीचा मालक, बिल्डर ! मी मोठा राजकारणी ! मी कराडचा मोठा मेहरबान ! स्वतःसोबत घातलेले इगोचे असे मोठे  आवरण घालून आपण समाजात वावरत असतो.*

समोरच्या व्यक्तीला तुम्ही मला ओळखले नाही का? मी कोण आहे तुला माहिती आहे का?  असे मोठ्या ताठरपणाने विचारतो. *खरं तर समोरच्या व्यक्तीला भेटल्यानंतर त्याला आपली ओळख सांगणे हे आपले कर्तव्य असते*.कारण तुमच्या चेहऱ्यावर, शर्टावर कुठेही तुम्ही मोठे नगरसेवक आहात,मोठे राजकारणी किंवा पत्रकार आहात असे लेबल लावलेले नसते. नवख्या ठिकाणी गेल्यानंतर आपण आपली ओळख सांगताना समोरच्या व्यक्तीला आणि त्याच्या खुर्चीला मान देऊन जर त्याला आपले काम सांगितले तर ते नक्की पूर्ण होऊ शकते, नव्हे होतेच हा माझा अनुभव आहे !

गोड बोलण्याची आपणास सवय लागली पाहिजे. मला आयुष्यात कोणत्याही ठिकाणी कसलीही अडचण आलेली नाही. *कोठेही गेल्यानंतर आपली ओळख सांगण्याबरोबरच आपला स्वभाव , समोरच्यांशी बोलण्याची आपली पद्धत ,त्याच्याकडून माहिती काढण्याची कौशल्य, आपण दाखवलेली नम्रता महत्त्वाची भूमिका निभावते. या गुणावरून समोरचि तोच माणूस शेवटी तुम्हाला मी तुमच्या साठी काय करतो असे नम्रपणे विचारतो.*

टेलिफोन एक्सचेंज असो बँक असो अथवा शासकीय कार्यालय असो,आपण एखाद्या व्यक्तीसमोर गेल्यानंतर त्याच्याशी गोड आणि आदराने बोलले पाहिजे.आपले काम थोडक्यात सांगितले पाहिजे, हे काम सांगितल्यानंतर त्याच्याकडून नक्की सकारात्मक प्रतिसाद मिळतोच !

माझे एक मुंबईचे जवळचे पत्रकार गुरू आहेत,उदय तानपाठक. मुंबईला गेल्यानंतर त्यांच्यासोबत मी अनेकदा  हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो आहे. उदय तानपाठक हे मुंबईतील नव्हे तर राज्यभर पत्रकारिता क्षेत्रातील फार मोठे नाव आहे. अतिशय मनमिळावू स्वभावाचा हा माणूस कुठेही गेल्यानंतर पुढच्या व्यक्तीला जिंकतोच. प्रेस क्लब आँफ मुंबईच्या बिल्डींग मधील एका हॉटेलमध्ये मी त्यांच्यासोबत अनेकदा जेवायला गेलेलो आहे. तिथे गेल्यानंतर तानपाठक हे हॉटेलमधील वेटरशी कसे  प्रेमाने बोलतात हे मी पाहिले आहे . अनेकदा तिथे गेल्यामुळे त्यांना तेथील वेटरची नावेही पाठ आहेत. त्यांना नावानिशी बोलल्यानंतर ते पहिल्यांदा त्या वेटरच्या खिशामध्ये पन्नास शंभर रुपयाची नोट ठेवतात आणि आज काय चांगलं आहे, काय फ्रेश आहे हे तूच सांग आणि तूच घेऊन ये,असा प्रेमळ आदेश त्याला देतात. (वेटरला जेवणाअगोदर बक्षीस देणारी मी पाहिलेली ही पहिली व्यक्ती) खरंतर वेटरला ए बारक्या, ए पिंट्या, ए पोरा इकडे ये,असे एकेरी नावाने हाक मारणे आपण सगळी कडे पाहिले आहे. पण *हॉटेलमधील वेटरची ओळख करून ,त्याचे नाव गाव विचारून आणि त्यापुढे जाऊन त्याला नावाने हाक मारली तर तो तुमच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने वागतोच शिवाय तुम्हाला चांगली सेवाही देतो.* कारण त्याला त्याच्या नावाने हाक मारणारे फक्त त्याचे काही जवळचे मित्र, घरचे लोक असतात. तुम्हीही त्याला नावाने हाक मारली, त्याच्याशी थोडेसे प्रेमाने बोलला तर तुमची अनेक कामे चांगली होतील, तुम्हाला चांगली सेवा होईल आणि तुम्ही जेव्हा त्या हॉटेलमध्ये जाल तेव्हा तुम्हाला तो लक्षात ठेवेल ,आदर देईल.

जगातील प्रत्येक व्यक्तीला मान सन्मान आहे.प्रत्येक व्यक्ती ही अप्रतिम,वेगळी,असामान्य आहे, असाधारणआहे.त्याच्यामध्ये असणारे गुण तुम्हाला इतरत्र कुठेही मिळणार नाही, इतर कोणामध्येही मिळणार नाहीत.म्हणून प्रत्येक व्यक्तीशी आपण सन्मानाने बोलले पाहिजे आणि यातच आपले खरे सुख आणि सौख्य सामावले आहे.

आजपासून आपण सर्वांशी आदराने बोलूया. तुमच्या समोर आलेल्या कोणाही व्यक्तीला एकेरी नावाने बोलवू नका.अहो जाहो म्हणजेच आदराने बोलवा. बघा काय चमत्कार घडतात ! समोरचा माणूस तुमच्यामध्ये झालेला बदल पाहून तुमच्या प्रेमात पडेल आणि तुमची कामे होत जातील !

घरातील, काही जवळचे नातेवाईक, शाळेतील मित्र मैत्रिणी यांना एकेरी बोलणं हा झाला प्रेमाचा भाग. मात्र तोच मित्र, ती मैत्रीण, नातेवाईक मोठ्या पदावर असतील तर त्याच्याशी सार्वजनिक ठिकाणी बोलताना आदरानेच बोलले पाहिजे. अमकातमका माझा क्लासमेट आहे, मामेभाऊ आहे, तो किती ... आहे मला माहिती आहे ! त्याचे पराक्रम मला माहित आहेत, त्याला साधी पॅन्टही नीट बांधता येत नव्हती,अशाप्रकारे बोलून ओळख दाखवण्याच्या नादात त्याचा अपमान करू नका. तुम्ही दोघेच जेव्हा एकत्र येता तेव्हा तुम्ही त्याच्याशी एकेरी बोला मात्र *आपल्या उच्चपदस्थ मित्रांशी पब्लिक ठिकाणी आदरानेच बोलले पाहिजे.*

मकर संक्रांती दिनी आजपासून सर्वांशी गोड बोलण्याबरोबरच आदराने ही बोलायला शिकूया ! बघूया पुढच्या मकर संक्रातीपर्यंत तुम्ही किती लोकप्रिय होता ते !

©@ सतीश वसंतराव मोरे
*सतिताभ*

१५.०१.२०१९

karawadikarad.blogspot.com

Click here to visit my blog👆

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...