फॉलोअर

निरोप पंढरीचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निरोप पंढरीचा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

११ जुलै २०२२

पंढरीची वारी 10 जुलै

🚩 *माझी पंढरीची वारी* 🚩
   पंढरपूर,१० जुलै २०२२
 *_सतीश मोरे _* 

याचसाठी केला होता अट्टाहास,
शेवटचा दीनु गोड व्हावा !

आज आषाढी एकादशी. पांडुरंगाला भेटण्यासाठी राज्यभरातून सुमारे दहा लाख भाविक आणि वारकरी पंढरपुरात दाखल झाले होते. पांडुरंगाच्या कृपेने आमची वारी सफल झाली. काल रात्री पांडुरंगाचे दर्शन झाले होते. 'याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिनू गोड व्हावा' अशी मनाची स्थिती झाली होती. पावसाने थोडीशी आमच्यावर कृपा केली, त्यामुळे गर्दी थोडीफार कमी होती, त्याचा फायदा आम्हाला झाला आणि विठ्ठलाचे दर्शन लवकर झाले. पंढरीची वारी मी या अगोदर सहा वेळा केली आहे. यापैकी यापूर्वी मला फक्त एकदा पांडुरंगाचे दर्शन झाले आहे. यावेळी सातव्या वारीच्या दरम्यान पांडुरंगाच्या कृपेने पांडुरंगाचे दर्शन झाले, हे मी माझे भाग्य समजतो.


आज आषाढी एकादशी, वारकऱ्याला एकादशी उपवास करावीच लागतो. जो एकादशी करतो, जो रोज हरिपाठ करतो, जो आषाढी, कार्तिकी माघु आणि चैत्री या चारी वाऱ्या करतो त्याला खरा वारकरी म्हणतात. आम्हाला फक्त एकच वारी करता येते. मात्र हेही नसे थोडके. आषाढी एकादशी असल्यामुळे आज पंढरीत जिकडे तिकडे माऊलीमय वातावरण होते. विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास मधून तयार होऊन बाहेर पडलो, चेकआउट केले आणि थेट आम्ही आमच्या मारुती बुवा कराडकर मठामध्ये गेलो. या मठापर्यंत जाईपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांचा महापूर वाहत होता. आमच्याकडे चार चाकी वाहनाचा पास असल्यामुळे आम्हाला जाणे शक्य झाले अन्यथा वाहनांना परवानगीच नव्हती. सुदैवाने आज सकाळी पावसाने पूर्ण उघडीप दिली होती. वातावरण पावसाळी होते मात्र पाऊस पूर्ण थांबला होता. मारुती बुवा मठात गेल्यानंतर अनेक वारकरी भेटले, सर्वांना वारकरी नमस्कार केला. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत नगरप्रदक्षिणासाठी आमची बारा नंबर दिंडी पुढे गेलेली होती, त्यामुळे आम्ही तात्काळ या दिंडीच्या पाठोपाठ जायचा निर्णय घेतला. एकादशी दिवशी नगरप्रलचना झाल्याशिवाय पंढरीची वारी पूर्ण होत नाही. मारुती बुवा कराडकर मठ झेंडे गल्लीत आहे इथून पुढे चौकात पंढरपूर को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्यालय आहे. तेथून आम्ही नगरप्रदक्षिणा सुरुवात केली. पंढरीच्या वारीला येणारा वारकरी एकादशी दिवशी संपूर्ण पंढरी नगरीला प्रदर्शना घालतो, चंद्रभागेला जाऊन नमस्कार करतो, तत्पूर्वी चंद्रभागेत स्नान करतो. 

आम्ही प्रदक्षिणा सुरू केली, एक एक रस्ता, चौक, गल्ली करत पुढे जात राहिलो. पुढे आल्यानंतर चंद्रभागा काठावर आलो. चंद्रभागा काठावर वारकऱ्यांचा आणि वैष्णवांचा मेळावा भरलेला होता. जिकडे पाहील तिकडे फक्त वारकरी दिसत होते. पावसाने उघडीप दिल्यामुळे अनेक वारकऱ्यांनी चंद्रभागा नदीमध्ये जाऊन स्नान करणे पसंत केले. चंद्रभागा नदीवरील पुलापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील घाटापर्यंत सगळीकडे फक्त वारकरीच दिसत होते. चंद्रभागा नदीमध्ये अनेक बोटी मधून वारकरी पलीकडच्या बाजूला जात होते. इस्कॉनने चंद्रभागाच्या पलीकडच्या बाजूला मोठा घाट आणि मठ बांधलेला आहे. हा घाट अतिशय सुंदर दिसत होता. आम्ही चंद्रभागेमध्ये जाऊन पाणी डोक्यावर घेऊन नदीला नमस्कार केला. यावर्षी चंद्रभागा नदीचे पाणी अतिशय स्वच्छ होते, याचे कारण दोन दिवसापासून पडणारा पाऊस. चंद्रभागाला नमस्कार करून पुन्हा आम्ही नगरप्रदक्षिणा सुरू केली. अनेक दिंड्या या ठिकाणी आम्हाला भेटल्या. पंढरीच्या वारीला आलेल्या सर्व सोहळ्यातील दिंड्या नगरप्रदक्षणा घालतात. छोट्या-मोठ्या अनेक दिंड्या मला या ठिकाणी भेटल्या. या दिंड्यातील वारकरी चंद्रभागा काठी भजन करत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद भरून वाहत होता. सर्वांची वारी पूर्ण झाली होती. आज एकादशी होती यापैकी काहीजणांचं पांडुरंगाचे दर्शन झाले होते तर काहीजणांनी फक्त कळसाचे दर्शन घेतले होते. तरीही या सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. सर्वांचं स्वप्न साकार झाले होते.

या दरम्यान संत ज्ञानेश्वर माऊली पालखी या ठिकाणी दाखल झाली. नगर प्रदक्षिणा घालण्यासाठी माऊलींची पालखी प्रमुख दिंड्यासोबत या ठिकाणी आली होती. या पालखी समोरील दोन्ही अश्वाना नमस्कार केला, फोटो काढले. आमचे खरंच नशीब चांगले होते.  मी माऊली सोबत चाललो, माऊलींचे दर्शन आम्हाला पुन्हा एकदा चंद्रभागा काठी झाले होते. माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा पुढे चालायला लागलो. चंद्रभागा  घाट आला, नदी काठावरील जुन्या धर्मशाळा, मठ, होळकर, शिंदे , छत्रपतींच्या काळातील बांधकामे पंढरपूरचे महात्म्य साक्ष देत होती.  

चंद्रभागा घाटातून आम्ही वरती आलो. या ठिकाणी दर्शनाची भली मोठी लाईन होती.पांडुरंगाच्या दर्शनासाठी 14 ते 18 तास लाईन होती तर मुखदर्शनासाठी सहा ते सात तास लाईन होती. या लाईन मधील सर्व वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागली होती. पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर काय आनंद होतो याची अनुभूती आम्ही कालच घेतलेली होती. 14 ते 18 तास लाईन मध्ये उभं राहण्याची ताकद या वारकऱ्यांना पांडुरंग देतो. एवढा वेळ लाईन मध्ये उभा राहून शेवटी पांडुरंगाचे दर्शन झाल्यानंतर सारा कंटाळा निघून जातो. या लाईन मध्ये कोणी घुसू नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. तिथून पुढे आम्ही गोपाळपूर येथे आलो. रस्त्यावर सर्व बाजूला भाविक उभे होते तर अनेक दिंड्या संपूर्ण रस्त्यावरून पांडुरंगा माऊलीच्या नावाचा जयघोष करत होत्या.आम्ही प्रत्येक दिंडीचे दर्शन घेऊन शेवटी चौकातील श्रीकृष्ण मंदिरात आलो. येथून विठ्ठल मंदिराला नमस्कार केला, पुन्हा एकदा शिखराचे दर्शन घेतले. पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील चौकात येऊन शेवट झेंडे चौकात नगरप्रदक्षिणा मी सांगता केली. 

त्यानंतर मारुतीबुवा कराडकर मठाकडे जाताना संपतराव चव्हाण कुंभारगावकर वकील यांच्या निवासस्थानी थांबलो. त्यांच्या घराचे नाव त्यांच्या वारकरी संप्रदायात मानाने घेतले जाते. पूर्वसंचित असे नाव असणाऱ्या वकीलांच्या घरामध्ये अनेक वारकरी उतरले होते. एडवोकेट संपतराव चव्हाण यांच्याकडून अतिशय महत्त्वाची माहिती घेतली, याबाबत मी लवकरच वेगळे लिखाण करणार आहे. त्यांच्या घरी फराळ करून पुन्हा आम्ही मारुती बुवा कराडकर मठामध्ये गेलो. या ठिकाणी सर्व वारकऱ्यांची भेट घेतली, सर्वाना नमस्कार केला. मठातील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. अनेक वारकऱ्यांना पुढच्या वर्षी भेटू असे सांगून निरोप घेतला. त्यानंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. बारा वाजता आम्ही आमच्या गाडीमध्ये बसून कराड कडे निघालो. येताना म्हसवड गोंदवले या तीर्थक्षेत्राला भेट झाली.सहा वाजता कराडला पोहचलो.

कराडकडे येताना पंढरीची वारी पूर्ण झाल्याचा आनंद तर होताच मात्र आमच्या सारे लक्ष, ध्यान पंढरपुरात होतं. गेल्या तीन दोन दिवसात पंढरपुरातील गर्दी, पाऊस, या पावसामध्ये चिंब होऊन नाचलेले वारकरी, माऊली पालखी सोहळा, मंदीरासमोरील गर्दी, विद्युत रोषणाई डोळ्यासमोर येत होती. गेल्या 21 दिवसात पंढरीची वारी करताना भेटलेले अनेक माऊली, छोट्या मोठ्या मदतीला धावून आलेले अनेक लोक, ऊन वारा पावसात चालणारे वारकरी, वारकऱ्यांच्या पडलेल्या पंगती, दिवेघाटात झालेला पाऊस, सासवड मध्ये झालेला पाहुणचार, वाल्याच्या डोंगरावरून पाहिलेला वारकऱ्यांचा मेळावा या गोष्टी डोळ्यासमोरून जात होत्या. आमचे नशीब चांगले म्हणून आम्ही पंढरी वारीत सहभागी होत आहे. पंढरीची वारी नशिबवान लोकांच्या नशीबातच असते, असे म्हणतात. पंढरीची वारी पुन्हा पुन्हा करण्याचे भाग्य आम्हाला मिळो, अशी माऊली चरणी प्रार्थना!

धन्य झालो हो संसारी । आम्ही देखीली पंढरी ।                                     चंद्रभागे करुनी स्नान । घेतले पुंडलीकाचे दर्शन ।                                          केली क्षेत्र प्रदक्षिणा। भेटलो संत ,सज्जना ।                                      उभे राहुनि गरूडपारी । डोळे भरुनी पाहीला पांडुरंग । 



राम कृष्ण हरी..

 *_सतीश मोरे सतीताभ_*
  ९८८११९१३०२

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...