फॉलोअर

१६ जून २०२०

माझी व्हर्चुअल वारी 16 जुन


*माझी व्हर्चुअल वारी*
*सतीश वसंतराव मोरे

*
कराड सुरली घाट ते जानाई मंदीर 
दि. 16 जुन 2020
राम कृष्ण हरी माऊली
पंढरीच्या वारीतील आजचा दिवस हा अतिशय खडतर प्रवासाचा, थोडासा वेदनांचा मात्र तितकाच आनंदाचा असतो. पुणे शहरात दोन दिवस मुक्काम केल्यानंतर आजच्या दिवशी म्हणजे एकादशी दिवशी माऊलीचा सोहळा पुण्यनगरी ला भावपूर्ण निरोप देऊन संत सोपान महाराजांच्या सासवड नगरी पुढे मार्गक्रमण करतो. पुणे ते सासवड हे अंतर 32 किलोमीटर आहे. नाना पेठेत माऊलींची पालखी विसावलेले असते आणि पालखी समोरील 27 आणि पालखीच्या पाठीमागे असणाऱ्या अडीचशेहून अधिक दिंड्या आणि त्यामधील असणारे सुमारे अडीच लाख वारकरी दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामी असतात. मात्र सकाळी सात वाजता माऊलींची पालखी मार्गक्रमण करते. पुणे शहरातून बाहेर पडून हडपसरला सकाळी दहाच्या दरम्यान ही पालखी पोहोचते. ज्यांना दोन दिवस पुणे शहरात दर्शन घेता आले नाही ते पुणेकर हडपसर मध्ये पालखीचे दर्शन घेण्यासाठी येतात. दोन दिवस अतिशय प्रेमाने पुणेकर वारकऱ्यांची सेवा करतात आणि त्यांना निरोप देण्यासाठी हडपसर पर्यंत येतात.काही पुणेकर वारकरी तर दिवे घाटापर्यंत माऊलींच्या पालखी ला निरोप देण्यासाठी येतात. देवाची उरुळी येथे माऊलीचा दुपारचा विसावा संपल्यानंतर पालखी सोहळा पुन्हा सासवड कडे मार्गक्रमण होतो आणि सुरु होतो अवघड असा दिवे घाट.
या घाटात जणु वैष्णवांचा मेळा भरतो. पूर्ण घाटाचा रस्ता, वळणाचा चढाचा आणि अवघड असा आहे. मात्र या अवघड वाटेतुन वारकरी माऊली नामाचा जयघोष करत आनंदाने पुढे मार्गक्रमण करतात. माझ्या पाच वर्षाच्या वारीच्या अनुभवातील दिवे घाटातील अनुभव हा अतिशय सुखद आहे. या घाटात पालखीचे मार्गक्रमण होत असताना अनेकदा रिमझिम पाऊस सुरू होतो मात्र वारकरी थांबत नाहीत. खरंतर दमलेल्या, थकलेल्या वारकऱ्यांना गारवा देण्यासाठी या घाटात हमखास पाऊस येतोच. गेल्या वर्षी मात्र वरूणराजांचे प्रेम वारकऱ्यांच्या जास्तच बरसले होते. माऊलींचा पालखी सोहळा या घाटातून मार्गक्रमण करत असताना तुफान पाऊस सुरू झाला होता. वारकरी या पावसात भिजून चिंब झाले होते. मात्र मृदंग आणि टाळांच्या गजरात वारकरी चालतच राहिले होते, चालतच राहिले होते, चालतच राहिले होते. दिवे घाटातील हा अविस्मरणीय असा अनुभव वारकरी आयुष्यात कधी विसरत नाहीत. घाटाचा अवघड रस्ता संपल्यानंतर पुढे सपाट रस्ता सुरु होतो. घाटाचा अवघड रस्ता म्हणजे संसाराचा रस्ता आणि त्यानंतर असणारा रस्ता म्हणजे माऊली विठ्ठलाकडे जाण्याचा सुखद असा मार्ग असतो. घाट पार करून आल्यानंतर वारकरी सेवेसाठी अनेक सेवेकरी कार्यरत असतात. दिवेघाटाच्या टोकावर किंवा घाटमाथ्यावर अनेक सेवाभावी संस्था वारकरी सेवा देत असतात. यातील एक महत्त्वाची सेवा असते ते म्हणजे थकलेल्या, दमलेल्या वारकऱ्यांचे हात पाय तेलाने मालिश करायचे. या सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांच्या प्रेरणेने अनेक सेवा देणाऱ्या संस्था मी पाहिलेले आहेत. या सेवांचा आम्ही लाभ घेतलेला आहे. दिवेघाटात गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसानंतर पुढील प्रवासात कोणी आजारी पडल्याचे  कधी घडलेले नाही. कारण या वारकऱ्यांच्या पाठीशी सखाहरी विठ्ठलाची, माऊली ज्ञानेश्वरांची  कृपा असते. तसेच पुणे जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग हा सुद्धा या वारकऱ्यांच्या सेवेसाठी सतत कार्यरत असतो.

घाटातून वर आल्यानंतर भुकेलेल्या वारकऱ्यांसाठी चहापाणी नाश्ता  सोय केली जातेच. घाटमाथ्यावर उभा केलेली  विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर सारा थकवा निघून जातो. सुमारे 20 फुटाची विठ्ठलाची मूर्ती मी घाटमाथ्यावर असणाऱ्या त्या गावात दिवे गावात आहे.
दिवे घाटातील वारकऱ्यांच्या आनंदाविषयी आणि अनुभवाविषयी लिहिल तेवढे कमीच आहे. यावर्षी मात्र वारी नाही त्यामुळे हा आनंद नाही. मग आपण हा आनंद कसा लुटायचा असा विचार कालच माझ्या मनात आला होता. त्यामुळे आज माझ्या् वारीमध्ये मी कराड ते सुरली घाट असा मार्ग निवडला होता.


सुरली घाट माझ्यासाठी दिवेघाट होता. मी हा मार्ग निवडून आम्ही मंगळवारी म्हणजे आज सकाळी सव्वा पाच वाजताच कृष्णा नाक्यावर जमलो. सकाळी पावसाने थोडी उघडीप दिली होती. विजय वाटेगावकर, सुर्वे आप्पा आणि मी कृष्णा पुलावरून सैदापूर हद्दीत आलो. मात्र तिथे गेल्यानंतर रिमझिम पावसाची सुरुवात झाली. गेली दोन दिवस आमच्याकडून वारकरी संप्रदायातील सर्वात महत्त्वाचा असणारा हरिपाठ करावयाचा राहून गेला होता. मी माझ्या मोबाईलवर बाबा महाराज यांनी गायलेला संत नामदेव महाराज रचित हरिपाठ हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी प्ले केला. आम्ही तिघेजण हळूहळू ओगलेवाडी दिशेने मार्गक्रमण करू लागलो. गजानन सोसायटी कधी आली हे कळले नाही. पुढे मळावार्ड ,डुबल मळा मागे टाकत 45 मिनिटातच आम्ही रेल्वे पुलावर पोचलो. रेल्वे पुलावरून सदाशिव गडाच अतिशय सुंदर अशी दृश्य पाहून आमचा सर्व थकवा पळून गेला. थोडासा पाऊस पडत असल्यामुळे पुलावर थोडीशी चिकचिक झाली होती. रेल्वे पुलावर वाढलेले झुडपे काढण्याची बांधकाम विभाग करून अपेक्षा आहे.  रेल्वे सिग्नलचे दिवे या रिमझिम पावसात अतिशय सुंदर दिसत होते.



रेल्वे पुलावर व्यायामासाठी आलेल्या अनेक ओळखीच्या लोकांना आम्ही नमस्कार केला. पुलाच्या डाव्या बाजूला असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर हजारमाचीचे माजी सरपंच कल्याण डबल आणि माझ्या एका विद्यार्थ्याचे वडील माने मला भेटले. त्यांच्यासोबत इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या‌. पुढे रेल्वे पुलावर ही माझे क्लासचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक दिसले. एवढ्या सकाळी इकडे कुठे चाललात असा प्रश्न गेल्या चार दिवसापासून मला सतत ऐकायला येत आहे. थोडक्या शब्दात ही पंढरीची वारी सांगणे मला क्रमप्राप्त असते. आमच्या वेगळ्या वारीचे कौतुक मला भेटलेल्या सर्वांनीच केले आहे आणि त्यांच्या कौतुकाची थाप पाठीवर घेऊन आम्ही पुढे ओगलेवाडी गावात पोहोचलो.


माझ्या ओगलेवाडी येथील यादव मोरे क्लासेसचे विद्यार्थ्यांचे पालक भेटल्यामुळे मी काही क्षण का होईना माझ्या क्लासच्या आठवणीत रमून गेलो होतो. ओगलेवाडीगच्या मुख्य चौकात आल्यानंतर माझ्यासोबतच्या दोन्ही वारकरी मित्रांना माझ्या क्लासेसची इमारत दाखवली. प्रसिद्ध उद्योगपती व्यापारी गोट्या पाटील तसेच व्श दीपक राजमाने आणि धनंजय राजमाने तसेच जयवंत उर्फ पिंट्या राजमाने यांच्या मालकीच्या तीन मोठ्या हॉलमध्ये माझे क्लासेस घेतले जात होते. हा काळ 1994 ते 2001 आहे. 94 च्या पूर्वी मी माझ्या करवडी गावात मोरे क्लासेस या नावाने शिकवण्या घेत होतो. 94 95 मध्ये यादव सरांच्या आग्रहाखातर मी ओगलेवाडीमध्ये त्यांना जॉईन झालो. अजित यादव सर हे गणिताचे अतिशय हुशार आणि हाडाचे शिक्षक होते.  गणिताची शिकवणी घेत असताना त्यांना इंग्लिश शिकवण्यासाठी कोणीतरी सहकार्याची गरज होती आणि 95 च्या दरम्यान आमच्या दोघांची मैत्री जमली. आम्ही एकत्र यादव मोरे क्लासेस सुरू केला. ओगलेवाडीमध्ये आमच्या क्लासचे फार मोठे नाव त्या काळात होते, आजही आहे. इयत्ता पाचवी ते दहावी इंग्लिश गणित आणि बारावी इंग्लिश असे आमचे क्लास होते.नववी दहावीच्या वर्गात पन्नास ते शंभर विद्यार्थी असायचे. खचाखच भरलेल्या क्लासमध्ये या परिसरातील प्रत्येक गावातले विद्यार्थी होते. हे विद्यार्थी आमचे लाडके होते, त्यांच्या कुटुंबीयांची आमचे स्नेहाचे संबंध होते या पाल्यांचे या विद्यार्थ्यांचे आई-वडील आम्हाला बसल्यानंतर बिनधास्तपणे आमच्या मुलाला पाहिजे तेवढे मारा पण त्याला गणित इंग्लिशमध्ये पास करा असे सांगायचे. पुढे आम्ही बनवडी कॉलनी येथेही एक शाखा सुरू केली. या शाखेत आम्ही संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत शिकवणी घेत असो तर सकाळी पावणे सात ते साडे अकरा या वेळेत ओगलेवाडी मध्ये क्लासेस घेत होतो. माझ्या क्लास च्या आठवणी विषयी व क्लासेस करिअर विषयी सविस्तर नंतर लिहिणार आहे.


ओगलेवाडी गावातून सकाळी साडे सातच्या सुमारास आम्ही बाहेर पडलो. करवडी फाट्यावर आलो आणि सुरलीच्या घाटाकडे आम्ही चालायला सुरुवात केली. त्यानंतर दीपाच्या ओढ्या पासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होते.दीपाच्या ओढ्यावर मोठा पूल बांधायचा असल्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली होती. तिथे खूप चिखल झाला होता. या चिखलातून वाट काढत आम्ही पुढे निघालो. आज पहाटे या भागात मोठा पाऊस झाला होता, त्यामुळे खूप चिखल झाला होता. मात्र तरीही पुढे रस्ता  चांगला आहे, फारसा चिखल नसेल असा मनाला समजवलं. 

चिखलाच्या रबडीतून वाट काढत पुढे जाऊ लागलो. मात्र सर्वच रस्ता चिखलमय झाला होता. आंतरराष्ट्रीय भूकंपकेंद्रासमोर रस्ता इतका घसरटा झाला होता की आमच्या समोर अनेक टु व्हिलर याठिकाणी घसरल्या. चिखलाचा रस्ता आमचा मार्ग थोडंच थांबवू शकत होता. हा चिखलाचा रस्ता पुढे थोडाच आहे अशी मनाची समजूत घालत होतो. त्या रस्त्यावरून चालताना आमचे शूज चिखलात रुतले, पॅंटला गुडघ्यापर्यंत चिखल उडला. महानुभाव श्रीकृष्ण मंदिराजवळ आलो, नंतर शूज रस्त्यावर आपटून स्वच्छ केले. समोरून पोलिसांची गाडी येताना दिसला यामधून राज्यमंत्री विश्वजीत कदम गेल्याचे पाहिले.पुढे वनवासमाचीच्या विठ्ठल मंदिरात जाऊन माऊलींचे दर्शन घेतले. वनवासमाची मध्ये आमच्या आत्यांच्या घरी चहा प्यायचा आमचा बेत होता. मात्र येताना घेऊ असा विचार करून आम्ही पुढे चालायला लागलो. राजमाची गावामध्ये रस्त्यालगतच असलेले गणेश मंदिर व त्या पाठीमागे असणाऱा सदाशिवगड धुक्यामध्ये झाकून गेले होते. हा अविस्मरणीय सुंदरसा देखावा पाहून आम्ही पुढे चालू लागलो. जरा पुढे गेल्यावर रस्ता चांगला आहे असे वाटले होते, मात्र रस्ता अधिकच खराब होत गेला होता. संपूर्ण चिखलमय रस्त्यातून कसेबसे वाट काढत आम्ही चालत होतो. मोकळं चालणे खूप सोपं आणि आनंददायी असतं. मात्र चिखलामध्ये खूप अवघड. बाहेर चिखलाचा लगदा बुटाला चिकट होत होता आणि त्यामुळे बुटाचे वजन वाढते होते. प्रत्येक वेळी बुट स्वच्छ करणे किंवा झाडणे  करणे शक्य नव्हते. माऊली आमची परीक्षा घेत होते. मात्र कुणाच्याही मनात परत करण्याचा विचार आला नाही. काही झालं तर सुरली घाट पार करायचाच असा मनाचा निश्चय केला होता. जरा पुढे आलो, लांबूनच सुरलीच्या घाटातील हिरवळ आणि सदाशिवगड मागचा भागातील झाडी खूप सुंदर होती.डाव्या बाजूला दादासाहेब मोकाशी कॉलेजची भव्य इमारत डोकावून आमच्याकडे पाहत होती. आम्ही पुढे चालत होतो. साडेपाचला चालावयास सुरुवात केल्यापासून आम्ही अजिबात थांबलेलं नव्हतो. सव्वा आठ वाजले होते. आता चहा किंवा काहीतरी नाश्ता केल्याशिवाय पर्याय नाही,थोडे विश्रांती घेतली पाहिजे असा विचार करून सुरलीच्या घाटाच्या अलीकडे असणाऱ्या जानुबाई मंदिरामध्ये आम्ही प्रवेश केला.
जानुबाई मंदिराचे परंपरागत पुजारी दत्ता खोचरे हे माझे अतिशय जवळचे मित्र आणि बंधू आहेत. मंदिरात बाहेर असणाऱ्या कठड्यावर बसून चिखलाने भरलेले शूज काढले काढले आणि त्यानंतर तिथे असणार्‍या बोअर खाली जाऊन चिखलाने भरलेले कपडे धुवून काढले. दरम्यान दत्ता महाराज माऊली यांना फोन केला. आम्ही मंदिरात आलो आहे या, येताना, चहाचे साहित्य घेऊन या असा त्यांना फोन केला .मात्र तोपर्यंत ते मंदिराच्या दारात पोचले होते. आमचा पाहुणचार करायचा म्हणून ते पुन्हा चहा साहित्य आणण्यासाठी राजमाचीत गेले आणि आम्ही मंदिरात आराम केला. 




पंधरा मिनिटांनी दत्ता माऊली आले,त्यांनी चूल पेटवली.  चुलीवर ठेवायचे चहाचे भांडे त्यांच्या वहिनीने मातीने लिपून दिले.चहाचा सुगंध येत होता चहा उकळत होता आणि आम्ही इकडे मंदिरात जानाई देवीचे दर्शन घेत होतो. याच दरम्यान कराडचे उद्योजक व खाण व्यावसायिक विकास पाटील त्या ठिकाणी आले. त्यांच्यासोबत आम्ही सर्वांनी चहा बिस्किटे खाऊन मंदिरातून पावणे नऊच्या सुमारास बाहेर पडतो.
आता पुढे जाऊन सुरली घाट चढायचा होता. चिखलात चाललेल्या रस्त्यापेक्षा सुरली घाट आता आम्हाला काहीच वाटत नव्हता. घाटातील रस्ता स्वच्छ होता. घाटामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले नसल्यामुळे रस्ता मोकळा होता. या रस्त्यावरून आम्ही चालायला सुरुवात केली. मला पुन्हा एकदा दिवे घाटाची आठवण झाली. दिवेघाटात माऊलींची पालखी आल्यानंतर पावसाला सुरुवात होते ही आठवण काढल्यानंतर सुर्ली घाटात सुद्धा बारीक पाऊस सुरु झाला. रिमझिम पावसात आम्ही घाट चढू लागलो. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हा जयघोष सुरू होता. माऊलींच्या नावाचा महिमा फार मोठा आहे. माऊलीचे नाम मुखी घेतल्यानंतर सर्व संकटे दूर होतात, हे अनेकदा मी अनुभवले आहे. पाय खूप दुखत असतानाही आणि सुरलीच्या घाटाचा चढाचा रस्ता असतानाही आम्हाला कुठून ताकद आली हेच कळले नाही. एका सुरात कुठेही न थांबता आनंदाने सुरलीचा घाट पार करून आम्ही घाट माथ्यावर पोहोचलो.
सकाळपासून 12 किलोमीटर अंतर चालून पूर्ण झाले होते. अजून दोन किलोमीटर  बाकी होते. सुरलीच्या घाटातून पुढे जाण्याऐवजी घाट पुन्हा खाली उतरावा असा आम्ही विचार केला. तत्पूर्वी घाट माथ्यावर असलेल्या पोलिस चौकीमध्ये जाऊन कराड तालुका पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस  कर्मचाऱ्यांना नमस्कार केला. रात्रीची ड्युटी करून हे दोघे कर्मचारी घरी जाण्याच्या तयारीत होते. कोरोणामुळे सातारा जिल्हा हद्दीवर पोलीस चौकी तयार करण्यात आली आहे. सुरलीच्या छोटेखानी एसटी पिकप स्टॅन्डचे रूपांतर चेक पोलिस चौकीत करण्यात आले आहे. गेली दोन महिने या एसटी स्टँडमध्ये हे कर्मचारी आपले कर्तव्य निभावत आहेत. मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून पाऊस सुरू झाल्यामुळे त्यांना पावसाचा आणि वाऱ्याचा त्रास होत आहे, हे आम्हाला दिसले. सुरली ग्रामस्थानी किंवा स्वयंसेवी संस्थांनी सुरली घाटातील या पोलीस चौकीसाठी ताडपत्री किंवा प्लास्टिकच्या कागदाची व्यवस्था करण्याची गरज आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांना धन्यवाद देत आम्ही परतीचा रस्ता सुरू केला.
ओगलेवाडी दीपाचा ओढा पासून सुरली घाटा पर्यंतचा रस्ता चढाचा होता आणि या रस्त्यात सर्व चिखल होता. आता  घाटातून खाली उतरण्याचा रस्ता उतरणीचा होता त्यामुळे पायावर थोडासा ताण येत होता.  मात्र आम्ही माऊलींचे नाम घेत चालत राहिलो. साडे नऊच्या सुमारास सुरली घाट उतरून खाली जानाई मंदीरासमोर आलो.

 14 किलोमीटर अंतर पूर्ण झाले होते.त्याठिकाणी मंदिराचे पुजारी दत्ता खोचरे त्यांची कमांडर घेऊन थांबले होते. खरं तरं आमची आजची वारी पूर्ण झाल्यानंतर मंदिरापर्यंत आम्ही वाटेगावकर यांची कार मागून घेणार होतो. मात्र या चिखलाच्या रस्त्यात कार चालणार नव्हती. त्यामुळे दत्ता खोचरे यांना आम्ही विनंती केली त्यांनी त्यांच्या कमांडर 1612 मधून आम्हाला करवडी फाट्यापर्यंत लिफ्ट दिली. माऊली दत्ता यांच्यामुळे आज आम्हाला चहाची व्यवस्था झाली. परतीचा प्रवास पण त्यांच्यामुळे सुखद झाला होता. दत्ता अतिशय उमदा असा युवक आहे. अतिशय कष्टाने त्याने 1990 पासून कराड विटा वडाप व्यवसाय करून कुटुंब संभाळते आहे.हे करत असताना त्यांची आई मंदिरात देवीची सेवा करत होती. आईच्या निधनानंतर दत्ता यांचे बंधू देवीची सेवा करत असत. दरम्यान दत्ता यांचे बंधूंचे निधन झाल्यानंतर आता दत्ता माऊली व त्यांचे कुटुंब आणि वहिनी हे या मंदिरात सेवा करतात. दत्ता माऊली यांच्याशी बोलताना या वर्षी श्रावण महिन्यात देवीचा भंडारा होईल का नाही याबाबत चर्चा झाली. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी या मंदिरात फार मोठा यात्रा असते. परिसरातील 8,9 गावातील भाविक याठिकाणी येतात. गेल्यावर्षी 285 पायली इतका गव्हाची खीर याठिकाणी प्रसाद केली होती , असे दत्ता माऊली यांनी मला सांगितले.

करवडी फाट्यावर आल्यानंतर उमेश वाटेगावकर आम्हाला न्यावयास आले होते. लोगन कारमधून आम्ही कराडमध्ये आलो. एरम हॉस्पिटल समोर आमच्या टुविलर लावल्या होत्या. त्या घेण्यासाठी आम्ही गाडीतून उतरलो असता समोरून आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुभाष एरम येताना दिसले. डॉ.सुभाष एरम हे अतिशय नम्र आणि मितभाषी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा अनुभव या अगोदर मी अनेक वेळा घेतला आहे. आम्हाला पाहिल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला शारदा क्लिनिकमध्ये येण्याचा आग्रह केला. क्लिनिकच्या दारात गेल्यानंतर आम्ही आज कुठे गेलो होतो हे त्यांना सांगितले. पंढरीची वारी करणारे तुम्ही वारकरी आहात, तुमचे दर्शन घेतले पाहिजे म्हणून माऊली डॉक्टर स्वत: खाली आले आणि त्यांनी आम्हाला नमस्कार केला, आम्हीही त्यांना नमस्कार केला. त्यांचे चरण दर्शन घेतले. खरंच माऊलींच्या नामामुळे,माऊलींच्या सहवासामुळे, कितीही मोठा माणूस असो, तो नम्र होऊन जातो, हे आज पुन्हा पाहायला मिळाले. डॉक्टर सुभाष एरम हे किती मोठे आहेत,त्याची संपत्ती किती आहे, ते किती मोठ्या बँकेचे चेअरमन आहेत यापेक्षा ते किती नम्र आहेत हे आज पुन्हा अनुभवलं. दरम्यान डॉ. चिन्मय त्याठिकाणी आले. आम्ही पायी वारी करत आहोत हे त्यांना समजल्यानंतर चिन्मय सरांनी सुद्धा आमच्यातील माऊलींना नमस्कार केला. कराड मधील एक सेवाभावी व्यक्तिमत्व सलीम मुजावर आणि उद्योजक विजय चव्हाण हे त्या ठिकाणी भेटण्यासाठी आले होते. सलीम मुजावर मला पाहून खूप खुश झाले. मोरे साहेब तुम्हाला भेटायचं होते, तुम्ही इथे भेटला बरे झाले असे म्हणत ते खाली आले. हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असणारे आपण अनेकजण पाहिले असतील पण सलीम मुजावर सारखा सच्चा माणूस,सच्चा मुसलमान मी क्वचितच पाहिला आहे. सलीम मुजावर हे आधुनिक काळातील कर्ण आहेत, हे मी थोडेसे धाडसा आणि जबाबदारीने म्हणतो. राम कृष्ण हरी नामाचा जयघोष करून आम्ही त्यांचा निरोप घेतला.

आजचा दिवस खुप छान गेला. माऊलीच्या जयघोषात अवघड घाट आणि चिखलमय वाट कधी पार केली हे आम्हाला कळलेच नाही.
राम कृष्ण हरी.
karawadikarad.blogspot.com

१५ जून २०२०

माझी व्हर्चुअल वारी 15 जुन

*माझी व्हर्चुअल वारी*

*सतीश वसंतराव मोरे*

कराड वहागाव कराड

दि. 15 जुन 2020




पंढरीच्या वारीमध्ये आजचा दिवस खरंतर पुण्यामध्ये मुक्कामाचा आहे. काल रात्री उशिरा संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे शहरात पोहचली असती. काल पुण्यात मुक्काम होता. रात्री वारकरी आता आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी विसावले असते. काहीजण आपल्या नातेवाईकांच्या घरी गेले असते. दोन दिवस पुण्यात मुक्काम असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुण्यामध्ये आल्यानंतर अनेक वारकरी शहरातील नातेवाईकांच्या कडे मुक्कामाला जातात हा अनुभव आहे.

आज वारी पुण्यात मुक्काम असल्यामुळे आज प्रवास नव्हता. मात्र माझी वारी 18 दिवस रोज चालणार आहे. एकूण 240 किलोमीटर हे वारीचे अंतर मला अठरा दिवसात पार करून 30 जूनला मला पंढरपूर पोहोचायचे आहे. 240 किलोमीटर अंतराचा अंदाज घेऊन रोज 14 किलोमीटर चालायचेच असा संकल्प असल्यामुळे आज सकाळी पावणेसहा वाजता घराबाहेर पडलो.

आजच्या माझ्या वारीमध्ये कराड चे लोकप्रिय नगरसेवक माझे 2006 पासूनचे मित्र विजय वाटेगावकर गुंड्याभाऊ आणि माझे मित्र धनंजय राजमाने माझ्यासोबत सहभागी झाले होते. सहा वाजता पियुषने मला कोल्हापूर नाक्यावर सोडले तर राजमाने च्या गाडीवर बसुन वाटेगावकर गुंड्याभाऊ आम्ही सारेजण कोल्हापूर नाक्यावर पोहोचलो..दुचाकी वाहने तिथे पार्क केले. राष्ट्रीय महामार्गाला नमन करून चालायला सुरुवात केली. वारकरी जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जायला निघतात तेव्हा पहिल्यांदा ते धरती मातेच्या म्हणजेच जमिनीच्या पाया पडतात. एखाद्या शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा रस्त्याकडेला कुठेही बसतात, झोपतात आणि त्यानंतर पुन्हा चालायला  सुरुवात करतात तेव्हासुद्धा हे वारकरी धरणी मातेच्या पाया पडतात, नतमस्तक होतात. आज आम्ही वारीला चालायला सुरू केल्यानंतर धनंजय राजमाने यांना मी जमिनीच्या का पाया पडलो याचे थोडे अप्रूप वाटले म्हणून मी त्यांना चालता-चालता सांगावयाला सुरूवात केली.

 वारकरी संप्रदाय मध्ये कृतज्ञताभाव हा फार महत्वाचा आहे. ज्याने ज्याने तुमच्यासाठी मदत केली आहे, तुमच्या साठी वेळ दिला आहे, जागा उपलब्ध केली आहे किंवा कोणत्याही प्रकारची मदत केली आहे, त्याच्याविषयी कृतज्ञताभाव व्यक्त करावा,, त्याला नमस्कार करतात. त्याचा निरोप घेताना किंवा भेटताना राम कृष्ण हरी म्हणून बोलायला सुरुवात करणे असा वारकर्‍याचा नित्यनेम असतो. वारकरी जेव्हा चालावयास सुरुवात करतात तेव्हा ते धरणी मातेच्या पाया पडतात कारण त्या धरणीमातेच्या पोटावर, खांद्यावर, छातीवर आपण बसलेलो असतो. या धरणीमातेने आपल्याला बसावयास जागा दिलेली असते. म्हणून वारकरी त्या जमिनीच्या पाया पडतात. रस्त्यावरून चालायला सुरुवात करताना रस्त्याच्या पाया पडतात याचे कारण असे आहे की हा रस्ता त्यांना पंढरपूर पर्यंत घेऊन जाणार आहे, पंढरपूर मध्ये विठोबा विटेवरी उभा आहे. त्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी हा रस्ता मार्ग दाखवणार आहे, हाच रस्ता त्यांना सोबत देणार आहे, त्यामुळे वारकरी रस्त्याचाही पाया पडतात. एखाद्या शेतात बसून उठल्यानंतर प्रवास सुरू करताना त्या शेतकऱ्याला, त्या जमिनीच्या मालकाला कृतज्ञतेने नमस्कार करतात आणि मगच पुढे चालायला सुरुवात करतात. वारकरी संप्रदायामध्ये असणारा हा कृतज्ञताभाव मला या संप्रदायावर प्रेम करावयास किंवा या संप्रदायावर संप्रदायाच्या प्रेमात पडण्यास एक महत्त्वाचा घटक ठरला आहे.



सहा वाजता कोल्हापूर नाक्यावरून उंब्रजच्या दिशेने चालायला सुरुवात केली. आज आमच्या शेवटचे टोक वहागाव होतं. या गावाला जायचं होतं. पावसाची रिमझिम सुरू होती. खरं तर सकाळी घराबाहेर पडताना हा पाऊस आपल्याला घराबाहेर न पडण्यासाठी येतो की रस्त्यावरून चालताना गारवा निर्माण करण्यासाठी येतो असा मला प्रश्न पडला होता. मात्र निसर्ग कधीही वाईट करत नाही. निसर्गाच्या मनात नेहमी चांगलंच असतं हे मला समजावलं. त्यामुळे पावसात ही आम्ही तिघांनी चालावयास सुरुवात केली. कोयना पुलावर गेल्यानंतर कोयना नदीचे विशाल पात्र आणि सुंदर रूप पाहून खूप आनंद झाला. सव्वा सहा वाजले होते, पुर्ण उजाडले होते. आता पुला वरून जाणारी वाहने आमच्या अंगावर पावसाचे पाणी उडवित होते. मात्र याचाही आम्ही आनंद घेतला. कोयना पूल पार करून वारुंजी फाट्यावर आल्यानंतर आम्ही सर्विस रोडचा आधार घेतला. सर्विस रोड वरून पुढे चालायला सुरुवात केली. गोटे गाव पार करून पुढे आल्यानंतर पावसाने आणखीनच वेग घेतला होता. जोरात पाऊस सुरू होता. फर्न हॉटेल क्रॉस करून पुढे आल्यानंतर रस्त्याकडेला सर्विस अनेक युवक जोर-बैठका मारत असल्याचे लांबूनच दिसले.भरपावसात युवा पिढी इतक्या आनंदाने आणि जोशात सकाळी सकाळी व्यायाम करताना पाहून मलाही माझे गावातील व्यायामाचे दिवस आठवले. माझा मित्र हनुमान काशीद रोज मला करवडी कॉलनीच्या रस्त्यावरून पळत कॉलनीपर्यंत व्यायामाला न्यायचा. कॉलनी मध्ये जाऊन आम्ही पहाटे व्यायाम करत असू. गोटे गावातील हे युवक मिलिट्री भरतीला जाण्यासाठी तयारी करत होते. भर पावसात या मुलांचा व्यायाम पाहून मोबाईल बाहेर काढून शुट केलं. युवकांचे रक्त सळसळत असतं आणि ते कधीच थांबू शकत नाही, हेच खरं. मुलांसोबत गप्पा मारल्या फोटो काढले आणि पुढे चालायला सुरुवात केली.

 खोडशी पर्यंत पोहोचेपर्यंत पाऊस थांबला होता. मात्र थंड हवा वाहत होती. याच वेळेला लतादीदीनी गायलेला भेटी लागे जीवा लागलीसे आस हा अभंग मोबाइलवर लावला आणि या अभंगाचे संपूर्ण विवेचन करायला सुरुवात केली.

 खरे तर वारकरी संप्रदायाचा आमच्या घराचा फार जुना वारसा आहे. माझी आजी माळकरी होती. दरवर्षी पंढरीला जायची. आजीसोबत गावातल्या विठ्ठल रुक्माई च्या मंदिरात किंवा हनुमान मंदिरात गेल्यानंतर तिथे सुरू असलेला हरिपाठ अजूनही मला आठवतो. करवडी गावातील अखंड ज्ञानेश्वरी सप्ताहात मी अनेकदा सहभागी झालो आहे. शालेय जीवनात चार-पाच वेळा ज्ञानेश्वरी वाचन झाले आहे. कराडच्या कृष्णा घाटावर झालेल्या भव्य ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्यातही तीन वेळा मी सहभाग घेतला होता. वारकरी संप्रदाय, कीर्तन, प्रवचन याची मला सुरुवाती पासूनच गोडी आहे. कीर्तनामध्ये ऐकलेले अभंग विवेचन, प्रवचनामधील चिंतन मी अनेकदा माझ्या मित्रांसोबत शेअर  केले आहे. मात्र मला सर्वात आवडत असलेली संत तुकाराम महाराजांचा अभंग वाणी भेटी लागी जीवा, लागलीची आस ही आम्हाला अकरावी बारावीच्या पुस्तकात कविता होती. ही कविता प्रा. लता पाटील मॅडमनी अतिशय सुंदरपणे शिकवली होती. त्यामुळे त्याचा प्रत्येक शब्दाने शब्द मुखद्गत आहे आणि त्याचा अर्थही. आता भेटी लागे जीवा या अभंगाचे विवेचन करण्याचा मी थोडासा प्रयत्न केला. आपला वारी मध्ये केवळ चालणे हा उद्देश नाही. राम कृष्ण हरी चा जप तर झालाच पाहिजे. आणि संतवाणीवर चर्चा झाली पाहिजे.अभंगाचा अर्थ समजून घेतला पाहिजे, संतांचे विचार समजून घेतले पाहिजेत,असा वारीला जाण्याचा माझा पहिल्यापासूनच हट्ट आहे आणि होता. त्यामुळे आम्ही या अभंगाचा अर्थ चालत  सांगत राहिलो. दिवाळीच्या तोंडावर आपला बाप सणाला न्यायला येईल यासाठी बापाची आतुरतेने वाट पाहणारी नवविवाहिता, फक्त पावसाचे पाणी पिणारा चातक पक्षी आणि या पावसाची वाट पाहणारा हा चातक पक्षी, भूक लागल्यानंतर रडून आईला बोलावणारा बाळ आणि आईचीच वाट पाहणारा बाळ आणि विठ्ठलाची वाट पाहणारे संत तुकाराम महाराज,  त्यांच्या मनात असणारी घालमेल एकच प्रकारचे होती, असा काही अर्थ असणारी ही अभंगवाणी आहे. विठ्ठलाचे वाट पाहणार्या, आस लागलेल्या आणि विठ्ठल दर्शनासाठी आतुर झालेल्या संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे.




पुढे चालत राहिलो वनवासमाची जवळ आल्यानंतर या गावात असलेल्या लोकांनी कोरोणाच्या महाराक्षसाला पळवून लावण्यासाठी ज्या पद्धतीने तोंड दिले त्याचा अभिमान वाटला. आम्ही सर्वांनी वनवासमाची करांच्या दिशेने तोंड करून या गावकऱ्यांचे कौतुक केले. आदर्श मिलिटरी ऍकॅडमी चालवणारा वहागाव  येथील एक युवक वनवासमाचीच्या पुढे एका ठिकाणी मिलिटरी भरतीसाठी रस्त्याकडेला युवक-युवतींना प्रशिक्षण देत असलेला आम्हाला पहावयास मिळाला. या युवकासोबत चर्चा केली. त्यांच्या सोबत असणारे मुले मुलींना भरतीसाठी शुभेच्छा दिल्या आणि पुढे निघालो.



आता वहागाव जवळ आले होते.वहागाव येथे कराडचे नगरसेवक आनंदराव लादे यांनी होटेल अशोका चालवावयास घेतले आहे. त्या ठिकाणी आम्ही पोहचलो‌. आठ किलोमीटर अंतर पूर्ण झाले होते. आता परत मागे फिरायचे आहे असा विचार करून अशोका हॉटेलच्या दारात दहा मिनिटं आराम केला. त्या ठिकाणी बसून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला आणि पुन्हा कराडच्या दिशेने चालायला सुरुवात केली.

मगाशी जाताना वनवासमाची नजीक दोन महिला हायवेच्या शेजारी काहीतरी ग़ळा करताना पाहिल्या होत्या. मी त्यावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आता येताना त्या महिला काहीतरी वेचत आहेत हे पाहिल्यानंतर मला राहावले नाही. तुम्ही काय करत आहात माउली असा प्रश्‍न विचारल्यानंतर आम्ही करंज्या गोळा करत आहोत असे त्यांनी सांगितले. महामार्गालगत करंजीची झाडे अनेक आहेत. या झाडाच्या लागलेल्या करंज्या आता खाली पडलेल्या आहेत. त्या वेचण्यासाठी या महिला काम करत होत्या. मला राहवलं नाही आणि मी त्यांना त्यांचं गाव विचारलं. उंब्रजच्या बेघर वस्तीतील ह्या दोन महिला होत्या. त्यांची मुलं भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करतात तर नवरा एकीचा नवरा केस गोळा करण्याचे काम करतो. लॉक डाऊन मुळे गेल्या दोन अडीच महिने या कुटुंबाला कसलेच काम मिळाले नव्हते. शासनाने रेशनची व्यवस्था केली होती मात्र घरातील इतर वस्तू विकत आणण्यासाठी ह्या लोकांच्या कडे पैसे नव्हते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून पोलिसांचे व इतरांचे लक्ष चुकून या दोन्ही महिला करंज्या गोळा करत होत्या. दहा रुपये किलो दराने या करंज्या विकून त्यांना पन्नास शंभर रुपये मिळतात. या शंभर रुपयासाठी पाच ते सहा तास या माऊली कष्ट करतात, अडचणीत कुठेही जातात, कपारी मध्ये हात घालतात, दगडांमध्ये चालतात. या महिलांचे कष्ट पाहून  त्यांच्याकष्टाला सलाम करावासा वाटला.या महिलांची एक मुलाखत घेतली आणि परत चालायला सुरुवात केली.

 परतीच्या प्रवासात राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी आम्ही सर्वांनी सुरू ठेवला होता. राम कृष्ण हरीच्या या जयघोष यामुळे अंतर कसे पार होत गेले हे आम्हाला कळलेच नाही. गोटे गावाजवळ आलो. या गावात प्रकाश पवार नाना यांनी फोन करून मी तुमच्या गावातील विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी येत आहोत असे कळवले होते. नऊच्या सुमारास गोटे गावातील मंदिरात आम्ही तिघेही पोहोचलो. गावाच्या मध्यभागी ग्रामस्थांनी दहा वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून हे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बांधले आहे. गोटे मुळगाव नदीकाठाला आहे, मात्र या गावाचे पुनर्वसन झाले आहे. त्यामुळे नवीन गावात विठ्ठल-रुक्मिणीचे जुने मंदिर आहे. मात्र तिकडे जाणे सर्वांना शक्य होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी नवीन गोटे गावात विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर बांधले आहे. या मंदिराच्या सभागृहात आम्ही प्रवेश केला. विठ्ठल-रुक्मिणीचे डोळे भरून दर्शन घेतले आणि थोडा आराम केला. प्रकाशनानानीं आमच्यासाठी कांदेपोह्यांचा नाश्ता केला होता. या मंदिरात देवाची सेवा करणारे तसेच वारकरी, भजन करणारी मंडळी तसेच नित्यनियमाने हरिपाठ करणारे काही ज्येष्ठ नागरिक आमच्या स्वागतासाठी, आमच्या भेटी साठी थांबले होते. या नागरिकांसोबत आम्ही गप्पा मारल्या. आमच्या पंढरीच्या वारी बाबत त्यांना खूप अप्रूप वाटले. या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या चरणी दंडवत करून आम्ही साडेनऊ वाजता तिथून निघालो.

गोटेगाव ते कराड हा दोन अडीच किलोमीटरचा शेवटचा टप्पा आला. खरं तर खूप कष्टाचा टप्पा होता. कारण पाय खूप दुखत होते. असंच होतं शेवटचा टप्पा आला कि पाय दुखतात. मुक्कामाचं गाव जवळ आले आहे असं वाटतं. मात्र गाव जवळ आलेलं नसतं. शेवटच्या टप्प्यातील गाव लांबून जवळ दिसतं मात्र अजून चालायला पुढे जायला काही वेळ जाणार असतो. या अडीच किलोमीटरच्या अंतरात लांबून गाव दिसत असलं तरी तिथे पोहोचायला अजून किलोमीटर चालावं लागणार आहे हे मनाला समजावून सांगावं लागत होतं.  माणसाचं पण असंच होतं. त्याला सुख जवळ आहे असं वाटतं. मात्र तो सुखा जवळ गेला की त्याच्या पासून सुख आणखीन दूर जात. सुखाचा शोध घेत बसला तर ते कधीच मिळत नाही. काम करत रहा, चालत रहा ,सुख नक्की मिळेल,हेच खर आहे. त्यामुळे पुढे चालत राहिलो. वारुंजी फाट्यावर अनेक ओळखीचे लोक भेटले. विजय वाटेगावकर, मी आणि धनंजय राजमाने आम्ही तिघेही चालत का कराडला निघालो आहे असे अनेकांनी विचारले. कोयना पुलावर आलो आता कोल्हापूर नाक्यावर आलो की आपला आजचा वारीचा प्रवास संपणार याचा खूप आनंद झाला. दहा वाजता पुढारी कार्यालयासमोर पोहोचलो. धनंजय राजमाने विजय वाटेगावकर यांना घेऊन घराकडे गेले आणि मी माझ्या ऑफिसच्या कामासाठी कार्यालयात हजर राहिलो.

अशा पद्धतीने आजची पंढरीची वारी अतिशय सुंदर पद्धतीने पार पडली. आज सुद्धा 16 किलोमीटर अंतर कसे आनंदाने पार पडले हे जाणवलेच नाही, सर्व काही माऊलींची कृपा!



राम कृष्ण हरी


karawadikarad.blogspot.com

वारी नव्हे मेनेजमेंट गुरु


वारी नव्हे ‘मॅनेजमेंट गुरु’





पंढरीचा वारकरी । वारी चुकोनेदी हरी ॥
पंढरीची वारी कशी सुरू होते.. कशी चालते, वारकर्‍यांना कोण निमंत्रण पाठवतं? लाखो वारकर्‍यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय कोण करतं? कसं चालतं हे सगळं..!  कोणी मोठा नाही.. कोणी लहान नाही. सगळे एकाच ध्यासाने, एका दिशेने ऊन, वारा, पाऊस याची कदर न करता कसे चालतात. त्यांना ही शक्ती कोठून मिळते? हे न उलगडणारं कोडं आहे !

 जगातील कोणत्याही देशात.. कोणत्याही धर्मात अशा प्रकाची सतत 18 दिवस चालणारी धार्मिक यात्रा नाही. वारकरी हे कसं घडवून करतात? हा सर्व संशोधनाचा विषय आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आणि जगतगुरु तुकोबा महाराज पालखी सोहळा या दोन प्रमुख पालख्यांबरोबरच राज्यभरातील शंभरहून अधिक गावांतून येणार्‍या  विविध संतांच्या नावाच्या पालख्या आणि सुमारे 5000 गावांतून येणार्‍या लहान-मोठ्या दिंड्या यांचे नियोजन हा अवघ्या जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. हे सर्व घडवून आणणारा वारकरी माऊली हा सर्वश्रेष्ठ मॅनेजमेंट गुरु’ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.


संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आळंदी येथून तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहु येथून सुरू होतो. या सोहळ्यात राज्यभरातून अनेक दिंड्या सहभागी होतात. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात रथापुढे 27 तर रथामागे  सुमारे 300 नोंदणीकृत दिंड्या तसेच नोंदणी नसलेल्या सुमारे 200 दिंड्या आहेत. तुकोबा माऊली पालखी सोहळ्यात नोंदणीकृत 325 तर नोंदणी नसलेल्या 100 हून अधिक दिंड्या आहेत. या दोन्ही सोहळ्यामध्ये सुमारे 1 हजार दिंड्या असल्याची नोंद आहे. एका दिंडीमध्ये 50 ते एक हजार वारकरी असतात. यामध्ये  झेंडेकरी, वीणेकरी, टाळकरी, चोपदार, पाणी सेवा देणारे तसेच इतर सेवेकरी यांचा समावेश असतो. प्रस्थानाअगोदर दोन-तीन महिने दिंडी प्रमुखाच्या नेतृत्चाखाली तयारी सुरु होते. दिंडीत सहभागी वारकर्‍यांच्या संख्येनुसार राहण्याची सोय, तंबू, भोजन,  वाहतूक याची तयारी केली जाते. सर्व संच एकत्र करून वारकर्‍यांना घेऊन  वाहने  आळंदी, देहुत पोहोचतात. प्रस्थानाच्या आदल्या दिवशी  या दिंड्यांतील वारकरी आळंदी, देहुतील मठामध्ये किंवा खासगी जागेत कुठेही मुक्काम करतात. ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असतो. पुण्यनगरीत माऊली भक्तांच्या सेवेसाठी महानगरातील अनेक सेवाभावी संस्था, मंडळे कार्यरत असतात. पुण्यात वारकर्‍यांच्या निवासाची सोय शाळा, महाविद्यालये, धर्मशाळा येथे केली जाते. अनेक वारकरी  मिळेल तेथे  निवास करतात. अलिकडे पुणे, पिंपरी-चिंचवड येथील अनेक अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये वारकर्‍यांच्या निवासाची सोय केली जाते. पुणे शहर सोडून या दोन्ही पालख्या वेगवेगळ्या दिशेने पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. सासवड आणि लोणी काळभोर येथील मुक्कामाच्या ठिकाणापासून खर्‍या अर्थाने  वारीचे अचूक मॅनेजमेंट पहायला मिळते.

पालखी सोहळा सकाळी सातच्या सुमारास मार्गस्थ होतो आणि सायंकाळी सहाच्या दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो. साधारण 6 ते 8 किलोमीटर अंतर पार पडल्यानंतर पहिला विसावा घेतला जातो. पहिल्या विसाव्यानंतर पुढे तेवढेच अंतर पार पडल्यानंतर  दुपारी 12 च्या सुमारास जेवणासाठी सोहळा विसावतो. तासाभरानंतर पुन्हा सोहळा मार्गस्थ होतो. सायंकाळी चारच्या सुमारास आणखी एका ठिकाणी विसावा घेतला जातो. त्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी सोहळा पोहोचतो. वारकरी सकाळी 7 वाजता चालावयास सुरुवात करतात. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम’, ‘राम कृष्ण हरी..’ च्या जयघोषात, भजनाच्या तालावर टाळ वाजवत वारकरी चालत असतात. प्रत्येक दिंडीच्या सुरुवातीला झेंडेकरी, त्या पाठोपाठ वीणेकरी. सोबत तुलशी वृंदावन आणि पाण्याचा हंडा घेतलेली महिला वारकरी अन् त्यांच्या पाठोपाठ तीन किंवा चारच्या ओळीत टाळकरी, आणि शेवटी  चोपदार अशी प्रत्येक दिंडीतील व्यवस्था असते. शिस्तबद्ध सोहळ्यातील वारकरी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडत नाहीत. एकदा चालावयास सुरुवात केल्यानंतर जोपर्यंत माऊलींचा रथ थांबत नाही तोपर्यंत कोणतीही दिंडी मध्ये थांबत नाही.

१४ जून २०२०

माझी वर्चुअल भारी 13 आणि 14 जुन


*माझी व्हर्चुअल वारी*
*सतीश मोरे*


कराड करवडी कराड,कराड ते मसूर
दि.13आणि 14 जुन 2020
राम कृष्ण हरी
*माऊली यंदा पंढरीची वारी नाही, यंदा वारकऱ्यांचे दर्शन नाही, यंदा वारीचा आनंद नाही, यंदा वारीला जायला मिळणार नाही, यंदा पालखी निघणार नाही, यंदा राज्यभरातून कोठूनही वारकरी आळंदीवरून पंढरपूरला जाणार नाहीत. मात्र मनाने वारकरी वारीला जाणार आहेत. आज वारी असती तर काय झालं असतं? आज मी कुठे पोहचलो असतो, आज पालखी कुठल्या गावात मुक्कामाला गेलेल्या असत्या, आज कुठल्या गावात पंगत झाली असती, याची चर्चा गावागावातील वारकरी आता घरात बसून पुढचे काही दिवस करणार आहेत. यंदा वारी नाही म्हणून गप्प न बसता आपण काय करू शकतो असा प्रश्न माझ्या मनात आला आणि मी स्वतः ठरवले आपण वारीला जायचं. आपल्या सोबत वारकरी नसतील, काही हरकत नाही. पण आपण वारीला जायचं सकाळी उठून पंढरपूरच्या दिशेला तोंड करून विठ्ठलाला नमस्कार करायचा आणि वारीला जायला बाहेर पडायचं. आपल्या मनामध्ये माउलीला मन भरून साठवून ठेवायचं आणि चालत राहायचं. माऊलीचा जयघोष करायचा रोज किमान 14 किलोमीटर कराड परिसरात चालायचं आणि 18 दिवसात 240 किमी वारीचा हा टप्पा पूर्ण करायचा,असा मी मनोमन निश्चय केला आणि माझ्या निश्चयाला माझ्या जवळच्या मित्रांनी आणि कुटुंबानेही पाठिंबा दिला*.


काल १३ जुन शनिवारी ज्ञानेश्वर माऊलीं पालखी सोहळा सुरू झाला. संध्याकाळी पाच वाजता आळंदी मध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम, राम कृष्ण हरी, विठोबा रुक्माई या हरिनामाचा जयघोष झाला. केवळ 50 वारकऱ्यांच्या उपस्थित ही वारी सुरू झाली. हा सोहळा सुरू झाला. सोहळ्याचे मालक यांनी माऊलींच्या पादुका हातात घेतल्या, चोपदारांनी आवाज दिला. माऊलींच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली त्यानंतर नगर प्रदक्षिणा करून माऊलींच्या पादुका त्यांच्या आजोळी वाड्यात मुक्कामाला आल्या. हा सर्व सोहळा पुढारी फेसबुक लाईव्ह मी पाहिला.


प्रत्येक वर्षी आळंदीमध्ये हा सोहळा पाहताना सुमारे तीन चार तास वारकरी बेफान होऊन नाचलेले मी  पाहिले आहेत. तो आनंद या वर्षी पाहायला मिळाला नसला तरी मनात ही चित्रे डोळ्यासमोर उभी राहिली होती. माऊलींच्या मंदिरात खचाखच गर्दी झाली होती, प्रमुख दिंडी मालक, टाळकरी, विणेकरी, झेंडेकरी माळकरी, झेंडेकरी तसेच मृदंग वादक आणि डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला वारकरी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात नाचत होत्या. हे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले, खरंच मी तो आनंद कराडात घरात बसून सुटला आणि मग ठरलं चला आपण आता जाऊ या वारीला!  खरंतर प्रत्येक वर्षी आळंदीच्या मंदीरातील हा सोहळा संपल्यानंतर माझ्या सोबत असणारे रणजीत नाना पाटील किंवा वेळोवेळी पुण्यापर्यंत पालखी सोबत चालायला आलेले माझे पुढारी चे सहकारी, प्रमोद पाटील आम्ही सारेजण माऊलीच्या पादुका आजोळ घरी विसावल्या नंतर आम्ही पुण्याला जायला निघतो. पुणे टू आळंदी हे अंतर 28 किलोमीटर आहे. पालखी कसबा पेठ पर्यंत पोहोचेपर्यंत हे अंतर तीस बत्तीस किलोमीटर पर्यंत पोहोचते. पहिल्याच दिवशी हे अंतर कापायचे असल्यामुळे खूप त्रास होतो म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी पालखीसोबत न  चालता  सात आठ वाजताच पुण्याला जायला निघतो.आजही जर मी आळंदीत असतो तर चालायला सुरुवात केली असती. खरं तर मी  मोबाईलवर माऊलीचा सोहळा पाहत होतो. हा सोहळा पाहिल्यानंतर मनाची तयारी केली आणि कराडला आळंदी समजले आम्ही पुण्याला जायला निघालो.


माझ्या आईवडिलांचे दर्शन घेऊन वारीचा आजचा पहिला दिवस सुरु करावा असा निश्चय करत मी घराबाहेर पडलो. सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांनी वारीची सर्व तयारी करत कुटुंबातील सर्वांनी एकमेकाचे दर्शन घेऊन सोमवार पेठतून निघालो आणि थेट एकटाच करवडीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. कानात हेडफोन लावले होते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हा संत अभंग लतादीदींच्या स्वरात ऐकण्यात जी मजा आहे तो स्वर्गीय आनंद जगात कुठेच नाही. लतादीदी यांनी गायलेला भेटी लागे जीवा हा तुकाराम महाराजांचा अभंग मला फार आवडतो. तो ऐकत तसेच भक्तीगीते ऐकत राम कृष्ण हरी नामाचा जयघोष करत आठच्या ओगलेवाडी रेल्वे पुलावर पोचलो. 

दिपक मेडिकल चे धनंजय राजमाने माझे मित्र आहेत त्यांना फोन करून दुकानासमोर पाणी घेउन यायला सांगितले. दरम्यान पेठेत आल्यानंतर सदा माऊली फोटोग्राफर यांना फोन करून घराच्या बाहेर बोलावले, त्यांचे दर्शन घेतले. त्यांना माझी वारी ची कल्पना खुप आवडली. पाणी पिऊन पुन्हा करवडीच्या दिशेने निघालो. नऊच्या सुमारास गावी पोहचलो, स्टॅंडवर बाळू तात्या आणि हनुमंत कुंभार यांची भेट झाली. घरात आई-वडील, वहिनी आणि अण्णा यांचे दर्शन घेऊन जेवण केले आणि पुन्हा 09:25 च्या सुमारास कराडला यायला निघालो.


खूप वेगळा आनंद झाला होता.दरम्यान करवडी ओगलेवाडी दरम्यान काही ठिकाणी अंधारअसल्यामुळे सागरला गाडी घेऊन मदनेवस्ती परत यायला सांगितले. राम कृष्ण हरी जयघोष करत चालत होतो. पुढे  पंडित भीमसेन जोशी यांची अभंगवाणी ऐकत एकटा रस्ताने कराडच्या दिशेने निघालो होतो. ज्याचा सखा हरी अवघे विश्व त्यावरी कृपा करी, हा संत जनाबाई यांचा अभंग पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात ऐकताना खूप गहिवरून आले. माझ्या सोबतही माझा हरी आहे, मला रस्त्याला काही अडचण येणार नाही, कुणी रस्त्यात माझ्या आडवे येणार नाही मी रात्रीच्या अंधारातही सुखरूप घरी पोहोचणार याची मनोमन खात्री पटली.  रस्त्यावर अनेक कुत्री होती मात्र एकही कुत्रं माझ्या मागे लागलं नाही. ज्याचा सखा हरी हा अभंग काल रात्री मी प्रत्यक्ष अनुभवला.
10.40 च्या सुमारास कृष्णा नाक्यावर पोहोचलो. धर्मवीर संभाजी चौकात कृष्णा सर्कलवर रणजीत पाटील आणि बापू डुबल  पाणी बाटली घेऊन आले होते. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. सुमारे साडेचार तासात करवडी कराड ते करवडी ते असे पंधरा किलोमीटर अंतर माऊलींच्या कृपेमुळे पूर्ण झाले होते.


दरम्यान नामदार बाळासाहेब पाटील यांची गाडी आम्हाला क्रोस करून गेली. त्यामुळे त्यांना मी स्वतः फोन लावला आणि माझ्यावर  वारी विषयी थोडीशी माहिती दिली. नामदार बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज पाटील हे सुद्धा प्रत्येक वर्षी वारीला जातात, पायी वारी करतात. गत वर्षी त्यांची फलटण नजीक माझी भेट झाली होती. जशराज पाटील यांची मुलाखत घेतली होती. जशराज पाटील यांनाही फोन करून या आठवणींना उजाळा दिला. रात्री अकराच्या सुमारास माझ्या शेजारी विराग जांभळे यांच्यासोबत गप्पा मारत सोमवार पेठेत पोचलो.पाय खूप दुखत होते, सर्वांनी माझे स्वागत केले. बाराच्या दरम्यान झोपी गेलो झोपताना उद्या सकाळी पाच वाजता उठायचे आहे असा संकल्प करून अंतर्मनाला तशा सूचना दिल्या.

*१४ जुन २०२०*
सकाळी पाच वाजता जाग आली, खरंतर उठायची अजिबात इच्छा होत नव्हती. काही क्षण राहुदे जायचं आज, असं वाटलं. आळंदी ते पुणे या दरम्यान कंटाळा आल्यानंतर आम्ही एखाद्या ठिकाणी रस्त्याकडेला, फुटपाथ वर कुठेतरी झोपत असतो. आज तिथे असतो तर आपल्याला उठावे लागले असते आणि आपण उठलोच असतो आणि पुण्याला सकाळ पर्यंत पोहोचलो असतो, असे मनात आले. त्यामुळे झोपेचा पराभव करून जागो झालो. फ्रेश होऊन तयार झालो. हॉटेल साईराजचे सुर्वे आप्पा आणि अशोक मोहने यांचे फोन झाले. आता आज मसूरला वारीला जायचं होतं. सव्वा पाच वाजता सुर्वे आप्पांचा फोन आला, पाऊस पडतोय काय करायचं. मात्र पाऊस आपल्याला काय करतोय, आपण वारकरी आहोत अशी त्यांना सांगितले, त्यांना घरापर्यंत द्यायला सांगितले.
साडेपाच वाजता आप्पा आणि मी चालायला सुरुवात केली. 

कानात अभंगवाणी सुरुवात होती.भर पावसात आम्ही चालत राहिलो, पाऊस आम्हाला काहीच करू शकत नव्हता. सोबत छत्री घेतली होती, मात्र तरीही पाऊस लागत होता. आम्ही चालत कृष्णा पुलावर आलो.आता उजाडलं होतं. रस्त्यावर चालणारांची संख्या खूप होती, व्यायाम करणारे सुद्धा काही लोक दिसले. पुढे आलो आमच्या सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज समोर अतिशय सुंदर असा नजराणा होता. माझं कॉलेज अधिकच सुंदर दिसत होतं. वरून पाऊस पडत होता. कॉलेजसमोर फोटो काढला.


बनवडी फाट्यावर अशोक मोहने आमची वाट बघत होते.  त्यांना घेऊन पुढे मार्गक्रमण केले, कोपर्डे हवेलीमध्ये सातच्या दरम्यान आम्ही पोचलो होतो. पाऊस थांबला असल्यामुळे सोबत आणलेला रेनकोट आणि छत्र्या एका माऊलींच्या घरात ठेवल्या. सिद्धनाथ मंदिराचे दारात जाऊन दर्शन घेतले आणि पुढे चालत राहिलो. कोपर्डे गावातील अनेक लोक भेटले. रेल्वे लाईन च्या अलीकडे रस्त्याच्या डाव्या बाजूला निकम यांची एक फार जुनी विहीर आहे. ही विहीर अतिशय देखणी आहे. सुमारे साठ वर्षांपूर्वी बांधलेली ही विहीर पाहून तिथे जाण्याचा मोह आम्ही रोखू शकलो नाही. विहिरीचे पाणी वापरले जात नव्हते, उपसा बंद होता मात्र या विहिरीने एकेकाळी पंधरा एकर जमीन भिजवली होती, असे निकम यांनी मला सांगितले. त्यांचा निरोप घेऊन पुढे आलो. 

शिरवडे रेल्वे फाटकाजवळ पोचलो. मालगाडी येणार असल्यामुळे फाटक बंद होते. माणूस कितीही मोठा झाला तरी रेल्वे गाडी पाहिल्या नंतर जो आनंद त्याला मिळतो तो वेगळाच असतो. अगदी लहानपणापासून मी तो आनंद घेत आहे. करवंडी वरून कराडला शाळेत येताना आमचे साडेदहाची करवडी कराड एसटी बस पार्ले मार्गे जायची. ही बस विरवडे रेल्वे फाटकाजवळ आली की हमखास पावणे अकराच्या सुमारास कोयना एक्स्प्रेस आणि महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्यांचे क्रॉसिंग व्हायचे आणि ते गेट अनेकदा बंद असायचे. एसटी रेल्वे गेट समोर थांबली की आम्हाला झुक झुक गाडी पाहण्याचा खूप आनंद होत असे. रेल्वे निघून झाल्यानंतर ते गेट उघडण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी गोल हात फिरवून ते गेट कसे उघडायचे हे आम्ही पाहत होतो. आज मला त्या क्षणाची पुन्हा आठवण झाली. आता शिरवडे रेल्वे गेट वर मालगाडी पाहून खूप आनंद झाला. 

पुढे निघालो साडेआठच्या सुमारास सह्याद्री कारखाना वर पोहचलो. कारखान्याच्या शेजारी डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या आदरणीय स्वर्गीय पी.डी. पाटील साहेब यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आणि पुढे चालू लागलो. सुर्वे यांच्या ओळखीचे गजरे नावाचे एक वकील कारखान्याच्या पेट्रोल पंपाचे राहतात, त्यांच्या घरी चहासाठी थांबलो. त्यांनी स्वतःच चहा करून दिला. सकाळपासून पोटात काही नव्हते मात्र त्यामुळे चहा पिऊन खूप तरतरी आली.वकील साहेबांचा निरोप घेऊन मसूरच्या दिशेने चालू लागलो. साखर कारखाना पासून मसूर चार किलोमीटर अंतरावर राहिले होते. मात्र हे चार किलोमीटर आता खूप लांब वाटत होते. सलग दोन दिवस चालणे झाल्यामुळे पाय खूप दुखत होते. पाय वर उचलत नव्हता. मात्र माउली नामाचा गजर करत असल्यामुळे पुन्हा ताकद आली आणि नऊच्या सुमारास मसुरचे एसटी स्टँड दिसू लागले. आनंदाला पारावर उरला नाही.


आमचे मसूरचे पुढारीचे प्रतिनिधी दिलीप माने तिथे आमची वाटच पाहत होते. त्यांच्या घरी जाण्याचा नियोजन होते. दरम्यान रस्त्याकडेला घिसाडी समाजातील हे कुटुंब काम करताना पहावयास मिळाले. ऐरणीवर तापलेला लोखंडाचा गोळा ठेवून त्याला कुराडीचा आकार देण्याचे काम सुरू होते. एक भाऊ हातात सांडशी घेऊन दाराच्या आत ठेवलेल्या लोखंडाचा तुकडा बाहेर काढतो, तो ऐरणीवर ठेवतो.दुसरा भाऊ घनाने त्यावर जोरात धाव मारत होता. त्याच वेळेला त्यांची 60 ते 65 वर्षाचे आई त्यांच्या मदतीला आल्या आणि सर्वांनी मिळून हे काम सुरू ठेवले. या लोकांचे कष्ट पाहून मला खूप प्रेरणा मिळाली.कष्टाशिवाय यश नाही आणि कष्टाला पर्याय नाही हे ही जाणवले. आमच्याकडे करवडी मधील घराशेजारी मी दहावी अकरावीला असताना अशाच प्रकारचे एक कुटुंब झाडाखाली राहायला आले होते. दिवसभर हे कुटुंब काम करत असे. कुराडी, खुरपी अशी शेतकऱ्यांना आवश्यक असणारे हत्यारे हे लोक करून देत असत. या कुटुंबात एक गर्भवती महिला होती. ती गर्भवती महिला पोटात बाळ असूनही दिवसभर लोखंडी घन उचलून तो मारत असे. ह्या महिलेला ती ताकद कशी मिळत असेल याची मला त्यावेळी सुद्धा अप्रूप वाटले होते. खरंतर गर्भवती महिलांनी काम करायचे नसते मात्र ही महिला अतिशय अवघड असे काम करत होती. दिवसभर त्या महिलेला काम करताना मी पाहिले होते दुसऱ्या दिवशी ही महिला बाळंतीन झाली होती. तिने एका बाळाला जन्म दिला होता. म्हणजेच मुलाला जन्म देण्याच्या आदल्या दिवसापर्यंत या माउलीने केलेले कष्ट मी स्वतः डोळ्याने पाहिले होते. तो क्षण मला आज आठवला.


माने सरांच्या घरी गेल्यानंतर त्यांचे कुटुंबाने आमचे प्रेमाने स्वागत केले. माने सर यांच्या कुटुंबाशी माझा अतिशय जुना ऋणानुबंध आहे. सरांच्या लेकीने आमच्यासाठी अतिशय सुंदर असा व्हेज कटलेट ही डिश तयार केली होती तर माने वहिनी यानी नंतर साजूक तुपातला शिरा करून आम्हाला खायला घातला. मन तृप्त झाले आणि पोटही भरले. माने सरांच्या घरात पोहोचल्यानंतर खूप आनंद झाला. त्यांच्या घरी खूप वर्षानंतर पोहोचलो गेलो होतो, गप्पा मारल्या. सरांच्या दारात घराच्या दारात आंब्याचे एक झाड लावायचे होते, हे झाड माऊलींच्या हस्ते लावले लावावे अशी त्यांनी शेवटी केली. माने सरांनीअगोदरच काढून ठेवलेल्या खड्ड्यात मी वृक्षारोपण केले तर सूर्वेआप्पानी माती घातली आणि अशोक मोहने यांनी पाणी घातले. पंढरीच्या वारीच्या पहिल्या दिवशीची वृक्षारोपणाची ही आठवण माझ्या आयुष्यभर लक्षात राहील.
अन्नदाता सुखी भव असे मनातून भावना आले आणि त्यानंतर माने सरांच्या घरातून बाहेर पडलो.

 मसूर मधल्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. परत यायला निघालो तर जिल्हा परिषद सभापती मानसिंगराव जगदाळे त्यांच्या ऑफिसात बसल्याचे पाहून पाहून थांबावे लागले. जगदाळे साहेबांचे आणि माझे संबंध प्रेमाचे आहेत. त्यांच्यासोबत चहा घेतला, गप्पा मारल्या. मसूर ते कराड हा प्रवास आमचा कार मधून होणार होता..माने सर आम्हाला कार मधून सोडायला कराडला आले.आज 14 किलोमीटर एवढे कराड ते मसूर अंतर चालून पूर्ण झाले होते. काल करवडी,कराड पंधरा किलोमीटर अंतर झाले होते. माऊलीच्या आळंदी ते पुणे असे तीस किलोमीटर अंतर दोन दिवसात पूर्ण झाले माझी वारी चा पहिला दिवस अशा पद्धतीने अतिशय आनंदात पार पडला.
*राम कृष्ण हरी.*
Karawadikarad.blogspot.com

१३ जून २०२०

Virtual Wari 1

इंद्रायणी काठी देवाची आळंदी



आळंदी ते पंढरपूर अशी पंढरीची वारी आणि पालखी सोहळा सुमारे पाऊणेतीनशे किलोमीटर अंतराचा आहे. याया वर्षी करण्याच्या पार्श्वभूमीवर पंढरीची वारी निघणार नाही मात्र वारी मधील अनुभव आणि वारी वारी च्या परंपरा याविषयी सलग अठरा दिवस आपण या ब्लॉगच्या माध्यमातून भेट देणार आहोत. भक्तीच्या या महासागरात ‘पुढारी’सुद्धा सहभागी होणार आहे.  आमच्या वाचकांसाठी ही भक्तीपर्वणीच आहे. आजपासून रोज पुढारीमध्ये ‘देव माझा विठू सावळा’ हे विशेष सदर वाचकांच्या भेटीला येत आहे.


वरुणा, अलका, कणिका,
आनंद, सिद्धक्षेत्र, अलंकापूरी आणि आळंदी
पंढरीची वारी म्हणजे आनंदाचा प्रवास. आनंद वाटत-वाटत माणसांमधील ईश्वराला भेटण्याचा प्रवास. शेकडो वर्षांपासून पंढरीची ही वारी अखंडपणे सुरू आहे.
महाराष्ट्र, कनार्टक, गोवा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यांतील 5 ते 6 लाख लोक या वारीमध्ये सहभागी होत असतात. ‘माऊलीऽऽ... माऊलीऽऽ’ चा जयघोष करीत आनंद वाटत-वाटत लुटण्याचा हा प्रवास  13 जून ते 1 जुलैपर्यंत चालणार आहे.
चला आळंदीला जाऊ । ज्ञानदेवे डोळा पाहु ॥
होतील संतांच्या भेटी । सांगू सुखाच्या गोष्टी ॥
ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर । सुखी म्हणता चुकतील फेरे ॥
जन्म नाही रे आणखी । तुका म्हणे माझी भाक ॥
आळंदी म्हणजे महाराष्ट्राच्या धार्मिक भावनांचे केंद्रबिंदु. आळंदीचे नाव  ऐकले की, ज्ञानेश्वर माऊलींची वात्सल्याने ओसंडून वहात असलेली दयाघन ज्ञानमूर्ती डोळ्यांपुढे उभी राहते. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या या भूमीचे वारकरी सांप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. माउलींच्या समाधीबरोबरच येथे असणारे विविध मठ, मंदिरे यामुळे या तीर्थस्थानाला एक वेगळेच पावित्र्य लाभले आहे. अशा या अलंकापुरीत आजपासून पालखी सोहळा सुरुहोत आहे. 
आळंदी गावचा इतिहास फार जूना आहे. स्कंद पुराणात या गावाचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे वडील पंढरीची वारी करीत, असा संदर्भ आहे. माऊलींनी ही वारी पुढे चालु ठेवली. आता या वारीला महाकाय स्वरुप प्राप्त झाले आहे. वारीची सुरूवात आळंदीतून होते. माऊलींचे वास्तव्य लाभलेल्या अलंकापुरीत वारकरी येतात आणि माऊलीमय होऊन जातात. शुभमंगला इंद्रायणी नदीच्या काठी बसलेले गाव म्हणजे आळंदी. सुमारे 725 वर्षापूर्वी इथे एक दिव्य-चरित्र घडले. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा दिव्य अवतार व चरित्र घडले ते याच परम पावन क्षेत्री! त्यांच्या खाणाखुणा या गावाने अजून जपून ठेवल्या आहेत. इंद्राने पृथ्वीवर येऊन यज्ञयाग केले, त्यावरून इंद्रायणी हे नाव पडले. कुबेरगंगा असेही नाव पूर्वी प्रचलित होते.
ज्ञानदेवांनंतर पुढे देहूला श्री तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठी राहिले. त्यामुळे ज्ञानोबा तुकारामाची इंद्रायणी’ असे आबालवृद्धांच्या तोंडी बसले. साधु हे तीर्थांना तीर्थत्व प्राप्त करून देतात. ज्ञानदेवांचा स्पर्श या मुळच्या पवित्र नदीला झाल्यामुळे ती आता परम पवित्र झाली आहे. आळंदी हे गावही ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडाच्या 64 व्या अध्यायात आळंदीची वरुणा, अलका, कणिका, आनंद व सिद्ध क्षेत्र अशी नावे आली आहेत. मराठी संतांनी तिला अलंकापुरी म्हटले आहे.
॥ अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ॥
श्री ज्ञानदेवांनी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतल्याने, हे गाव अजरामर झाले आहे. गेल्या 700 वर्षात अनेक संतांच्या आणि ऐतिहासिक घटनांच्या पाऊलखुणा येथे उमटलेल्या आहेत. पौराणिक काळापासून हे गाव प्रसिध्द आहे. इतिहासकार राजवाडे यांच्या मते आळंदी हे गाव मध्ययुगातले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका शेताचे उत्पन्न श्री ज्ञानदेवांच्या समाधी स्थानास दिले होते. त्यानंतर राजाराम महाराज, बाळाजी बाजीराव पेशवे, पहिले बाजीराव वगैरेंनी आळंदी गावाकडे लक्ष पुरविले आणि आळंदीला गावपण दिले.

Virtual vari 1

इंद्रायणी काठी देवाची आळंदी



आळंदी ते पंढरपूर अशी पंढरीची वारी आणि पालखी सोहळा सुमारे पाऊणेतीनशे किलोमीटर अंतराचा आहे. याया वर्षी करण्याच्या पार्श्वभूमीवर पंढरीची वारी निघणार नाही मात्र वारी मधील अनुभव आणि वारी वारी च्या परंपरा याविषयी सलग अठरा दिवस आपण या ब्लॉगच्या माध्यमातून भेट देणार आहोत. भक्तीच्या या महासागरात ‘पुढारी’सुद्धा सहभागी होणार आहे.  आमच्या वाचकांसाठी ही भक्तीपर्वणीच आहे. आजपासून रोज पुढारीमध्ये ‘देव माझा विठू सावळा’ हे विशेष सदर वाचकांच्या भेटीला येत आहे.


वरुणा, अलका, कणिका,
आनंद, सिद्धक्षेत्र, अलंकापूरी आणि आळंदी
पंढरीची वारी म्हणजे आनंदाचा प्रवास. आनंद वाटत-वाटत माणसांमधील ईश्वराला भेटण्याचा प्रवास. शेकडो वर्षांपासून पंढरीची ही वारी अखंडपणे सुरू आहे.
महाराष्ट्र, कनार्टक, गोवा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यांतील 5 ते 6 लाख लोक या वारीमध्ये सहभागी होत असतात. ‘माऊलीऽऽ... माऊलीऽऽ’ चा जयघोष करीत आनंद वाटत-वाटत लुटण्याचा हा प्रवास  13 जून ते 1 जुलैपर्यंत चालणार आहे.
चला आळंदीला जाऊ । ज्ञानदेवे डोळा पाहु ॥
होतील संतांच्या भेटी । सांगू सुखाच्या गोष्टी ॥
ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर । सुखी म्हणता चुकतील फेरे ॥
जन्म नाही रे आणखी । तुका म्हणे माझी भाक ॥
आळंदी म्हणजे महाराष्ट्राच्या धार्मिक भावनांचे केंद्रबिंदु. आळंदीचे नाव  ऐकले की, ज्ञानेश्वर माऊलींची वात्सल्याने ओसंडून वहात असलेली दयाघन ज्ञानमूर्ती डोळ्यांपुढे उभी राहते. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या या भूमीचे वारकरी सांप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. माउलींच्या समाधीबरोबरच येथे असणारे विविध मठ, मंदिरे यामुळे या तीर्थस्थानाला एक वेगळेच पावित्र्य लाभले आहे. अशा या अलंकापुरीत आजपासून पालखी सोहळा सुरुहोत आहे. 
आळंदी गावचा इतिहास फार जूना आहे. स्कंद पुराणात या गावाचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे वडील पंढरीची वारी करीत, असा संदर्भ आहे. माऊलींनी ही वारी पुढे चालु ठेवली. आता या वारीला महाकाय स्वरुप प्राप्त झाले आहे. वारीची सुरूवात आळंदीतून होते. माऊलींचे वास्तव्य लाभलेल्या अलंकापुरीत वारकरी येतात आणि माऊलीमय होऊन जातात. शुभमंगला इंद्रायणी नदीच्या काठी बसलेले गाव म्हणजे आळंदी. सुमारे 725 वर्षापूर्वी इथे एक दिव्य-चरित्र घडले. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा दिव्य अवतार व चरित्र घडले ते याच परम पावन क्षेत्री! त्यांच्या खाणाखुणा या गावाने अजून जपून ठेवल्या आहेत. इंद्राने पृथ्वीवर येऊन यज्ञयाग केले, त्यावरून इंद्रायणी हे नाव पडले. कुबेरगंगा असेही नाव पूर्वी प्रचलित होते.
ज्ञानदेवांनंतर पुढे देहूला श्री तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठी राहिले. त्यामुळे ज्ञानोबा तुकारामाची इंद्रायणी’ असे आबालवृद्धांच्या तोंडी बसले. साधु हे तीर्थांना तीर्थत्व प्राप्त करून देतात. ज्ञानदेवांचा स्पर्श या मुळच्या पवित्र नदीला झाल्यामुळे ती आता परम पवित्र झाली आहे. आळंदी हे गावही ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडाच्या 64 व्या अध्यायात आळंदीची वरुणा, अलका, कणिका, आनंद व सिद्ध क्षेत्र अशी नावे आली आहेत. मराठी संतांनी तिला अलंकापुरी म्हटले आहे.
॥ अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ॥
श्री ज्ञानदेवांनी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतल्याने, हे गाव अजरामर झाले आहे. गेल्या 700 वर्षात अनेक संतांच्या आणि ऐतिहासिक घटनांच्या पाऊलखुणा येथे उमटलेल्या आहेत. पौराणिक काळापासून हे गाव प्रसिध्द आहे. इतिहासकार राजवाडे यांच्या मते आळंदी हे गाव मध्ययुगातले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका शेताचे उत्पन्न श्री ज्ञानदेवांच्या समाधी स्थानास दिले होते. त्यानंतर राजाराम महाराज, बाळाजी बाजीराव पेशवे, पहिले बाजीराव वगैरेंनी आळंदी गावाकडे लक्ष पुरविले आणि आळंदीला गावपण दिले.

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...