फॉलोअर

sikkim लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
sikkim लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१८ जून २०१६

सिक्किम सफर 7

रोप-वे आणि पॅराग्लायडिंगचा थरार , लोकल साईट सिंईग,गणेश टोक आणि खुप गंगटोक सिक्किमची राजधानी. सगळीकडे उंचच उंच इमारती. हिरवीगार झाडे. डोंगरकपारीत काढलेले नागमोडी रस्ते. अतिशय सुंदर, स्वच्छ ग्रीन सिटी. रस्त्यावर कोठेही कचरा पहायला मिळणार नाही. अतिक्रमण नाही.. पानपट्टी नाही. खोकं नाही, हातगाडा नाही. सर्व काही शिस्तीत नियमबद्ध. वाहतूक यंत्रणा तत्पर आणि विनम्र. वाहतूक पोलिस सज्ज, सजग आणि फुल टाईम कार्यरत. नो ट्राफिक जाम, नो गोंधळ. हे सर्व गंगटोकमध्ये पहायला मिळते. पर्यटन हाच मुख्य व्यवसाय असलेल्या गंगटोकमध्ये आणि आसपासच्या सर्व भागात लहान-मोठी हॉटेल्स,घरगुती निवास व्यवस्था अतिशय परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध आहेत. पर्यटनपूरक व्यवसाय आणि पर्यटन ठिकाणी राज्य शासनाने विशेष सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. महाराष्ट्रातून सिक्किमला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या गेल्या दोन वर्षांत खूप वाढली आहे. ती महामहिम राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यामुळे. महाराष्ट्रातला माणूस सिक्किमला जातो तेव्हा राज्यपाल मराठी आहेत हे ऐकताना, सांगताना त्याची छाती फुलून येते. राजभवन विश्रामगृह आणि राजभवनचा पाहुणचार यावर वेगळं लिहीणार आहेच. आम्ही राजभवनचे पाहुणे असल्यामुळे विश्रामगृहावर उतरलो होतो. दोन दिवस गंगटोक सिटी व लगतच्या गावांत पर्यटन ठिकाणे पाहण्यासाठी राखीव ठेवले होते. स्थानिक प्रवासासाठी चार व्यक्तींसाठी अल्टो,व्हेगनआर अशा कार 1800 ते 2500 रुपये भाड्याने दिवसभरासाठी मिळू शकतात

बौद्ध मंदिरे आणि घंटा

लोकल साईट पाहण्यासाठी आम्ही सकाळी लवकर निघालो. आमच्या दोन्ही वाहनांवर "गेस्ट ऑफ गव्हर्नर'  असे स्टिकर लावण्यात आले. त्यामुळे आमची छाती फुगली होती. बौद्ध धर्माचा प्रभाव असलेल्या या राज्यात अनेक ठिकाणी बौद्ध मंदिरे (मोनॅस्ट्री) आहेत. अशा एका प्राचीन मोनॅस्ट्रीला आम्ही भेट दिली. अतिशय देखणी अशी मोनॅस्ट्री गंगटोकमध्ये आहे. त्याठिकाणची शिस्त, स्वच्छता, शांतता आणि पावित्र्य याविषयी मी पहिल्या भागात लिहिलेलेच आहे. मोनॅस्ट्रीच्या आवारात गोल फिरणाऱ्या घंटा हमखास असतात. जीवन सतत गतीमान असले पाहिजे. चल वस्तु जीवंतपणाचे लक्षण आहे, असा संदेश या फिरणाऱ्या घंटा देतात. एका-एका मोनॅस्ट्रीमध्ये अशा अनेक घंटा प्रवेशद्वारापासूनच लावलेल्या असतात. त्या घंटा म्हणजे छोट्या-मोठ्यांचे आकर्षणाचे केंद्रच आहे. कोणताही बौद्ध भिक्षुक किंवा गुरू मोनॅस्ट्रीमध्ये बसलेला पहावयास मिळाला नाही. त्यांच्या प्रार्थना आणि ध्यानसाधनेचे वेळेतच ते येथे येतात, असे सांगण्यात आले. गंगटोकमधील प्राचीन मोनॅस्ट्रीसमोरच  फार जुने वस्तुसंग्रहालय आहे. या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्यातील सर्व प्रसंग लाकडावर, लोखंडावर कोरलेले पहावयस मिळाले. तिबेटियन पद्धतीच्या इमारतींमध्ये हे संग्रहालय आहे.

रोप वे मधून दिसणारे गंगटोक 


रोप वे चा निखळ आनंद

रोप-वेचा अतिशय सुंदर अनुभव गंगटोकमध्ये घेता येतो . एसटीडीसी मान्यताप्राप्त दोन ठिकाणी रोप-वे ची सोय आहे. शहरातच ही सोय असल्यामुळे कमी बजट असलेल्या लोकांना गंगटोकचा "एयर व्ह्यू' रोप-वे मधून घेता येतो. प्रति व्यक्ती 200 रुपये इतके तिकिट आहे. रोप-वे च्या केबिनमध्ये जाण्यासाठी लिफ्टमधून तिसऱ्या मजल्यावर नेले जाते. जाणारे आणि येणारे असे दोन मार्ग आहेत. दोन्ही केबिन रुममध्ये आठ ते दहा (वजनावर अवलंबून) प्रवासी बसल्यानंतर रोप-वे सुरू होतो. सुमारे 300 फुट उंचावरून हा आनंददायक प्रवास असतो. केबिनमधून गंगटोकचे विलोभनीय दर्शन होते. रस्त्यावर धावणारी वाहने, पर्वतरागांत उभ्या असलेल्या उंच-उंच इमारती पाहताना खूप मजा येते. वाहतूक व्यवस्था किती शिस्तबद्ध आहे याचे दर्शन मला पहिल्याच दिवशी रोप-वे मधून प्रत्यक्ष पहावयास मिळाले.


गणेश टोक आणि  हनुमान टोक

गंगटोक शहरामध्ये लष्कराच्या छावण्या आहेत. लष्कराच्या ताब्यात असलेल्या गणेशटोक आणि हनुमान टोक या उंच टेकड्यांवर जावून गंगटोकचा वेगळाच व्ह्यू पहावयास येतो. या दोन्ही ठिकाणी गणेश आणि हनुमान मूर्ती सिक्किमचे तत्कालीन गव्हर्नर औंधचे पंतप्रतिनिधी ............................ यांनी बसविलेल्या आहेत. अतिशय सुंदर मंदिरे आणि डोळ्याला भावणाऱ्या मूर्ती आहेत. हनुमान टोक मंदिरात भाविकांची खूप गर्दी असते. येथे पूजा व इतर विधी करण्यासाठी भारतीय जवान आहेत.
धबधबा गार्डन, रॉक गार्डन, स्डेडियम आदि ठिकाणे दाखवून साडेचार ते पाच वाजेपर्यंत पर्यटकांना महात्मा गांधी मार्केटच्या दारात सोडण्यात येते. सिक्किममध्ये दिवस पाच वाजता सुरू होतो. 8 वाजता सर्व व्यवहार सुरू होतात. मार्केटजवळ आल्यानंतर मुख्य विषय असतो खरेदी. सिक्किमला 8 ते 4.30 ही येथील कामाची वेळ आहे. 4.30 ते 5 वाजेपर्यंतच वाहन उपलब्ध होते. जास्त पैसे देवून, विनंती करून वेळ वाढवता येते.
महात्मा गांधी रोड मार्केट खास पर्यटकांसाठी विकसित केलेल्या ओपन महात्मा गांधी मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारच्या वाहनांना 24 तास प्रवेश बंद आहे. 30 फूटाचा भव्य मोठा रस्ता आणि दोन्ही बाजुला दुकाने, मोठ-मोठ्या कंपन्यांची शोरुम अतिशय सुंदरपणे सजविलेली दुकाने हे महात्मा गांधी मार्केटचे वैशिष्ट्‌य आहे. कोणत्याही दुकानातून बाहेर पडा.. नवीन दुकानात जा... खरेदी करा. वाहतुकीचे, रस्ता क्रॉस करण्याचे कसनेही टेन्शन नसते. सोबत मुले असतील तर ते रस्त्यावर निवांत खेळत बसतात. तुम्ही बिनधास्त शॉपिंग करायचे. असा या मार्केटचा कन्सेप्ट आहे. कूकरीपासून स्वेटरपर्यंत, शूजपासून ब्रॅन्डेड कपड्यापर्यंत आकर्षक क्रोकरीपासून  सजावट करणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तुंपर्यंत सगळ्या प्रकारचे साहित्य येथे उपलब्ध आहे. मुख्य मार्केटला मधूनच उतार असलेेल्या बोळात पायऱ्यांवरून खाली गेल्यानंतर याही ठिकाणी खूप दुकाने आहेत. गांधी मार्केटला गेल्यानंतर लगेच खरेदीच्या मागे न लागता अर्धा-पाऊणतास पूर्ण मार्केट फक्त पाहण्यात मजा असते. एकास-एक वस्तु असल्यामुळे उगीच त्या दुकानात घेतलं, इथे घ्यायला पाहिजे होेते असं नंतर वाटू शकतं.


पॅराग्लायडिंग ...अनबिटेबल

गंगटोकमधील आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे पॅराग्लायडिंग. पॅराशूटसारख्या रंगबेरंगी छत्रीतून स्वच्छंदपणे हवेतून बागडणे, फिरणे, निसर्गाचा आनंद घेणे म्हणजे पॅराग्लायडिंग. याराना या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांनी केलेलं पॅराग्लायडिंग सर्वांनाच आठवत असेल. शासनमान्य तीन ठिकाणी पॅराग्लायडिंगची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी सकाळी लवकर 10 ते 12 वाजेपर्यंत या केंद्रावर पोहोचावं लागतं. गर्दी खूप असते. प्रत्येकी 3 हजार रुपये आकारले जातात. 20 ते 80 किलो वजन असणाऱ्या व्यक्तिलाच पॅराग्लायडिंग करता येते.



बुकिंग झाल्यानंतर दिलेल्या वेळेत नेमून दिलेल्या ठिकाणी पोहोचावे लागते. स्वच्छ हवा, शुभ्र प्रकाश व अनुकूल नैसर्गिक परिसिथती असेल तरच पॅराग्लायडिंग करता येते. पाऊस असेल तर कोणत्याही परिस्थितीत केले जात नाही. उंच ठिकाणावर गंगटोक दूरदर्शन केंद्राच्या टॉवरनजिक पॅराग्लायडिंग स्टार्ट-अप सेंटर आहेत. याठिकाणी जाण्यासाठी अतिशय चढाचा, अवघड वळणदार रस्ता 5-6 किलोमीटर पार केल्यानंतर येथे पाहोचतो. पायलट नियम समजावून सांगतो. आपल्या शरीरावर जॅकेट व पॅराग्लायडिंग किट बांधले जाते. हातात सेल्फी स्टिक व कॅमेरा दिला जातो. सुरूवात करताना उताराच्या रस्त्याने खूप जोरात पळत जावे लागते. संपूर्ण किट दोन्ही बाजूला उंच धरून दोन सहाय्यक आपल्यासोबत धावतात. हवा शिरल्यानंतर पॅराग्लायडिंग पॅराशूट फुलतो व अचानक आपण उचललो जातो.



पॅराग्लायडिंग स्टार्ट-अप खूप रिस्की आहे. मात्र लॅन्डिंग अतिशय आनंददायक असते. फुटबॉल स्टेडियमवर पॅराग्लायडिंग लॅडिंग होताना आपले नातेवाईक फोटो काढण्यासाठी आतुरलेले असतात. मात्र स्टार्ट-अपच्या वेळेला कोणीही नसते. हा आनंद घेतलाच पाहीजे असा आहे. 15 ते 20 मिनीटे हवेमध्ये तरंगणे खरंच स्वर्गीय सुख असते. हातातील सेल्फी कॅमेऱ्याने खालून-वरुन निसर्गाची रुपे टिपली जातात. खाली उतरल्यानंतर हे व्हिडिओ शुटिंग सीडी किंवा मोबाईलमध्ये 500 रुपये आकारून लोड करून दिले जाते. हा सर्व आनंद एकदा तरी घेतलाच पाहिजे असा आहे.

बर्थडे सेलिब्रेशन हेलिकॅप्टरम्ध्ये

रेडी टू राईड  इन हेलिकॅप्टर


पॅराग्लायडिंगपेक्षा कमी दरात 15 मिनीटांची हॅलिकॅप्टर राईड गंगटोकमध्ये उपलब्ध आहे. महात्मा गांधी मार्केट चौकातच एसटीडीसीच्या ऑफिसमध्ये आदल्या  दिवशी बुकिंग करावे लागते. 5 व्यक्तींसाठी 15 मिनीटांसाठी 9500 रुपये काढले जातात. 1  2 व्यक्ती असेल तरीही तेवढेच पैसे आकारले जातात.
माझ्या लग्नाचा 19 वा वाढदिवस 22 मे . हा दिवस आम्ही वेगळ्या प्रकारे एन्जॉय केला. कुटुंबातील चार सदस्यांसाठी स्वतंत्र हेलिकॅप्टर बूक केले होते. वास्तविक हेलिकॅप्टरमध्ये कॅमेऱ्याशिवाय कोणत्याही वस्तु नेण्यास परवानगी नाही. तरीही विनंती करून आम्ही केक घेतला होता. अतिशय रुबाबदारपणे आम्ही चॉपरमध्ये जावून बसलो. सरदार पायलटने दोन मिनीटांत सूचना केल्या, सीटबेल्ट लावला आणि चॉपर हवेत उडाले. हेलिकॅप्टरमधून गंगटोक शहराचे विलोभनीय दर्शन झाले. पटापट फोटो काढले, सेल्फी काढले. पाच मिनीटांनंतर चिरंजीव पियुष, लेक देवयानी यांच्या समोर आम्ही दोघांनी हेलिकॅप्टरमध्ये बर्थडे केक कापला. एकमेकांना शुभेच्छा दिल्या. लेकीने आणि पियुषने सर्वांना केक भरवला.


लग्नाचा वाढदिवस विमान किंवा हेलिकॅप्टरमध्ये केला किंवा लग्नच विमानात केले अशा मोठ्या लोकांच्या बातम्या मी वाचल्या, पाहिल्या होत्या. पण स्वत:च्या लग्नाचा वाढदिवस हेलिकॅप्टरमध्ये करण्याचा दूर्मिळ दूग्धशर्करा योग मला गंगटोकमध्ये अनुभवायला आला. हा दिवस आयुष्यातील संस्मरणीय राहील यात शंकाच नाही.








Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...