फॉलोअर

mahabalipum mamalapuram लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
mahabalipum mamalapuram लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१५ मे २०२४

महाबलीपूरम...मम्मलपूरम. ...अद्भुत, अमोघ, अद्वितीय, अमाप..दगडामध्ये कोरलेली मंदिरे...!



महाबलीपूरम...मम्मलपूरम. ...
अद्भुत, अमोघ, अद्वितीय, अमाप..
दगडामध्ये कोरलेली मंदिरे...!

दीड दिवसाचा पाॅन्डेचरी येथील मुक्काम आटोपून पुढील प्रवासाला निघालो. आमचा पुढचं डेस्टिनेशन होतं महाबलीपुरम. पांडेचरी ते चेन्नई यादरम्यान महाबलीपुरम हे प्राचीन नगर वसलेले आहे. निवन बस बुक केली, एसी बस मधून अडीच तासात महाबलीपुरम येथे पोहोचलो. बसचा प्रवास अतिशय सुखद होता. संपूर्ण किनारपट्टीवरून पांडिचेरी टू चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग जातो. या रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. दुपारी तीनच्या दरम्यान आम्ही महाबलीपुरमला पोहोचलो. रामकृष्ण हॉटेल येथे रूम बुक केलेली होती. भर दुपारी उन्हाचा तडाका फार होता. त्यामुळे रूमवर जाऊन दोन तास विश्रांती घेतली.

इंटरनेटवर माहिती घेतले असता महाबलीपूरम  संरक्षित स्मारक आणि मंदिर सहा वाजता बंद होते असे कळल्यानंतर आज ऐवजी उद्या सकाळी जायचे ठरवले. मग सायंकाळी सत्रात करायचे काय असा विचार करून हॉटेल मॅनेजरला विचारले. त्यांनी हॉटेलच्या शेजारीच भव्य बीच असल्याचे सांगितले. मग काय सहाच्या दरम्यान बीचवर गेलो. अतिशय सुंदर लोभक वातावरण होते. मद्रास, पांडिचेरी किंवा कन्याकुमारीचा समुद्र यापूर्वी पाहिलेला आहे. आज महाबलीपुरम येथील समुद्र पाहत होतो. या समुद्राचा बाबत एक वेगळं सांगावं लागेल ते म्हणजे या समुद्रकिनारावर भव्य असे दगड आहेत, भव्य असे पाषाण आहेत, जे आपल्या कोकणात पाहायला मिळत नाहीत किंवा कमी पाहायला मिळतात. महाबलीपुरम येथील समुद्र किनारा अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. या किनाऱ्यावर दगडावर जाऊन खडकावर जाऊन फोटो काढले, वाळूमध्ये चाललो. सायंकाळी समुद्र काठावरच असलेल्या एका सुंदर हॉटेलमध्ये जेवण केले. या हॉटेलमध्ये पुण्यामधील ध्रुव नावाचा एक मुलगा भेटला, जो या ठिकाणी मॅनेजर चे काम करत होता. एवढ्या दूर भागात मराठी बोलणारा माणूस दोन-तीन दिवसानंतर भेटल्यामुळे खूप आनंद झाला. त्याच्याशी गप्पा मारल्या परत रूमवर आलो आणि लवकर झोपी गेलो.

आज मंगळवार सकाळी लवकर महाबलीपूरम येथील मंदिर पहायला जायचं होतं. पहाटे पाचला उठलो आणि सहा वाजता तयार झालो. हॉटेलच्या बाहेरच आल्यानंतर एक रिक्षावाला भेटला त्यांनी संपूर्ण ठिकाणी पाहण्यासाठी सातशे रुपये घेतो असे सांगितले, आम्ही सहाशे रुपये व्यवहार ठरवला आणि महाबलीपुरम येथील संरक्षित स्मारक मंदिराकडे गेलो. सकाळी सव्वा सहा वाजताची वेळ होती. सूर्य अजून उगवला नव्हता मात्र तरीही पावसाळी वातावरण निर्माण झालं असल्यामुळे आद्रता खूप वाढली होती. आम्ही तिथे पोचलो होतो.

ममल्लापुरम महाबलीपुरम म्हणूनही ओळखले जाते. हे आग्नेय भारतातील तमिळनाडू राज्यातील चेंगलपट्टू जिल्ह्यातील एक शहर आहे , जे महाबलीपुरम येथील 7व्या आणि 8व्या शतकातील हिंदू स्मारकांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी प्रसिद्ध आहे . हे भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणाचे प्राचीन नाव थिरुकादलमल्लई आहे. 

ममल्लापुरम हे पल्लव साम्राज्यातील दोन प्रमुख बंदर शहरांपैकी एक होते . या शहराचे नाव पल्लव राजा नरसिंहवर्मन  याच्या नावावरून ठेवण्यात आले होते , ज्यांना ममल्ला म्हणूनही ओळखले जात असे. आर्थिक समृद्धीबरोबरच, हे शाही स्मारकांच्या समूहाचे ठिकाण बनले, अनेक जिवंत खडकातून कोरलेले. हे 7व्या आणि 8व्या शतकातील आहेत: रथ (रथांच्या रूपातील मंदिरे), मंडप (गुहा अभयारण्य), गंगेच्या अवतरणाला आराम देणारा विशाल मोकळा खडक आणि शिवाला समर्पित किनारा मंदिर .तमिळनाडू राज्याची राजधानी चेन्नई. याच चेन्नईपासून सुमारे 55 कि.मी. अंतरावर आहे सुप्रसिद्ध महाबलीपूरम् मंदिर. पूर्वी याच मंदिराच्या आवाराला माम्मलापुराम असे नाव होते. काळाच्या ओघात त्या नावाचा अपभ्रंश होत गेला आणि महाबलीपूरम् रूढ झाले. अर्थात महाबलीपूरम् हे निव्वळ एक मंदिर नसून हे आवार आहे.यात 100 हून अधिक वेगवेगळी मंदिरे आहेत, असे मानले जाते. तमिळनाडूमधील अनेक भव्य आवारांपैकी हे एक प्राचीन स्थान मानले जाते. सागर तटावर हे मूळ मंदिर बांधलेले आहे.
 
सातव्या शतकामध्ये ही पल्लव राजाची राजधानी होती. द्रविड वास्तुकलेच्या दृष्टीने पाहिल्यास या मंदिराचे स्थापत्यशास्त्र अग्रणी स्थानावर होते. समुद्र तटावरील या मंदिरामध्ये अनेक शिवमूर्ती आणि लहान लहान मंदिरे दिसून येतात.
 
पुरातन काळात शिवसंकल्पनेमागे काय विचार होते, ते कसे विस्तारित केले गेले हे या मंदिराच्या शिल्पकलेतून आपणास अभ्यासता येऊ शकते. ‘चित्रभाषा’ हे या आवाराचे वैशिष्टय़ आहे. म्हणजेच मंदिराचा इतिहास लिखित स्वरूपात न कोरता आकृत्याच त्या गोष्टीरूपात मांडलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही भाषेची गरज न भासता कोणीही या मंदिराचा इतिहास समजून घेऊ शकतो. भारतातील प्राचीनपैकी खूप कमी मंदिरांबाबत हा असा विचार झाला आहे.
 
येथील लोकप्रिय रथ मंदिराच्या दक्षिणेला स्थित आहे. महाभारतातील पाच पांडवांच्या नावाने त्याला पांडव रथ म्हणतात. महाबलीपूरममधील प्रवेशाकडील भागातील दगडाच भव्य शिला फोडून कृष्ण मंडप उभारला गेला आहे.
या मंडपाच्या प्रवेशद्वारावर तेथील ग्रामीण जीवनावर आधारित कथा कोरलेल्या आहेत.भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत एका बोटावर उचलल्याचा प्रसंग तर अप्रतिम म्हणावासा चित्रबद्ध केला गेला आहे.
 
मंदिरावरील कोरीव काम हे अतीव कोरीव असे आता राहिलेले नाही. कारण इतक्या शतकानंतर वातावरणाचा परिणाम कलाकृतींवर झालेला आहे. तरीही साधेपणा आणि सौंदर्य यांचा उत्तम मिलाफ या सर्व मंदिरांमध्ये दिसून येतो. या मंदिराभोवती अनेक भव्य पिवळसर रंगाच्या  शिळा आहेत. या दगडाचे वैशिष्टय़ म्हणजे कितीही उन्हाचा मारा असला तरी हा दगड विशेष तापत नाही. वराह येथील गुहा प्रसिद्ध आहेत .या गुहा इतिहास अभ्यासकांतही नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहेत.

सुरुवातीला आम्ही एका ठिकाणी गेल्यानंतर  आश्चर्यचकित झालो. मगाशी चांगल्या प्रमाणे महाबलीपुरम येथे भव्य , दणकट, विशाल पाषाण खूप आहेत. अशाच पाषाणावर कोरलेली पाच मंदिरे आम्हाला पाहायला मिळाली .खरंतर याला पांडवरथ असे म्हटले जाते. उंच पाषाणात खालून कामकाज करून टप्प्याटप्प्याने वर जात कोरलेली ही पाच मंदिरे पाहून डोळ्याचे पारणे फिटले. युधिष्ठिर रथ, भीम रथ अर्जुन रथ, नकुल आणि सहदेव रथ असे पाच मंदिर आणि त्यासमोर दगडामध्ये कोरलेला उंच हत्ती असे हे भव्य चित्र होते. त्यानंतर आम्ही लगेच पुढे गेलो. श्रीकृष्ण मंडपम आणि अर्जुन मंडप जवळ भव्य अशा शिळेवर कोरलेला हा मंडप, हे मंदिर पाहून कलाकाराने हे कसं काढलं असेल याचं कोडं खरं सुटत नाही. श्रीकृष्ण मंडपामध्ये रासलीला गोपाळकाला असे अनेक प्रसंग मांडलेले आहेत. त्या शेजारीच अर्जुन मंडप आहे. अर्जुनाने केलेला पश्चाताप असे या चित्राचे वर्णन केले जाते. भव्य शिळेवर कोरलेले  प्रसंग आपल्याला महाभारताची आठवण करून देतात. या दोन्ही मंडपाच्या शेजारी भव्य असा एक दगड आहे. खरं तर हा दगड काम सुरू असताना निखळून आलेला असावा असे वाटते. मात्र स्थानिक लोकांनी याला श्रीकृष्णाचा लाडू असं नाव दिले आहे. या दगडा शेजारी फोटो काढण्यासाठी लोक खूप गर्दी करतात.पुढे पाषाणात कोरलेलं महाकाली आणि शिवाचं भव्य मंदिर आहे, हेही मंदिर खूप उंचावर आहे. सुमारे पन्नास फुटाचे हे मंदिर कसे कोरले असेल याचे कोडे समजत नाही. या मंदिराशेजारी एक दीपस्तंभ उभा करण्यात आलेला आहे मात्र तो अलीकडच्या काळातील आहेत.

समुद्र काठावर आणखीन तीन मंदिर आहेत. या मंदिरासमोर भव्य असे गार्डन तयार करण्यात आले आहे. मंदिराचा फेरफटका करताना समुद्राचे दर्शन होते.  ही तीन मंदिरे पाहून आम्ही मुख्य चौकातील नारायण मंदिरात आलो. या मंदिराचेही काम खूप प्राचीन आहे हे मंदिर पुरातत्व खात्याच्या ताब्यात नसले तरी  मंदिर खूप जुनं आहे. या ठिकाणी निद्रा करत असलेले विष्णू भगवान आणि त्यासमोर प्रभू रामचंद्र सीता आणि लक्ष्मणाची मूर्ती आहे. दक्षिणेतील मंदिरातील वैशिष्ट्य म्हणजे तिथे देवाच्या सजावटीसाठी फार मोठी तयारी केली जाते. यासाठी असलेले सर्व साहित्य पाहिल्यानंतर हे लक्षात येते.

सकाळी सहा ते नऊ असे तीन तास आम्ही हा मंदिराचा परिसर फिरत होतो, अक्षरक्ष घामाची आंघोळ झाली होती. वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही रिक्षा केली होती. तरीही आम्हाला पाहायला तीन तास लागले. खरं तर या परिसरात ही सर्व मंदिरे पाहण्यासाठी पूर्ण दिवसही पुरणार नाही. मात्र त्यासाठी हिवाळा ऋतू योग्य आहे. अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी महाबलीपुरम येथील ही दगडी पाषाणात कोरलेले मंदिरे एक गुढ आहेत. दगडात कोरलेली ही मंदिरे पाहून मन तृप्त झाल्यानंतर आम्ही दहा वाजता पुन्हा हॉटेलवर आलो आणि विश्रांती केली घेतली. बारानंतर आम्हाला कांचीपुरमकडे जायचे होते.

*उद्या वाचा कांचीपुरम*..

*सतीश वसंतराव मोरे* __ 
सतिताभ 9881191302.

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...