फॉलोअर

२८ सप्टेंबर २०१६

ब्लाॅग वाचकसंख्या 10000 झाली. धन्यवाद वाचक माऊली हो !






माझेकरवडीकराड
नमस्कार,

11 मार्च 2016 रोजी या भावनेने माझे करवडीकराड हा ब्लॉग मी सुरू केला. तसं पाहिलं तर ब्लॉग लिखाण ही कल्पना आपल्या भागात नवी होती.  ब्लॉग कसा वाचायचा, लिंक कशी ओपन करायची याची काही कल्पना नसल्याने सुरू केल्यावर सुरूवातीला कमी प्रतिसाद मिळाला.  पुढे लोकांना माहिती दिली, झाली. गेल्या सहा महिन्यांत बरेच विषय शेअर केले. ऑफीस कामातील व्यस्ततेमुळे रोज लिहता आले नाही.  तरीही आज अखेर 86 दिवस ब्लॉग लिखाण केले आहे.

आता ब्लॉग वाचन करणारांची संख्या वाढत चालली आहे. सोशल मीडिया वर मी ब्लॉग विषयक थोडी माहिती आणि लिंक टाकतो. लोक वाचतात, पुढे शेअर करतात.  पंढरीची वारी करताना ब्लॉग वर दैनंदिनी मांडली होती. त्याला तुमच्या सारख्या वाचकांनी डोक्यावर घेतले. हळूहळू सातारा ,सांगली, कोल्हापूर जिल्ह्याबरोबर पुणे जिल्ह्यातून ब्लॉग वाचन होऊ लागला. नंतर राज्य भर माझ्या ब्लॉगची लिंक गेली.  लोक वाचतात म्हटल्यावर माझापण उत्साह वाढला.  ब्लॉगची मी पुढे जाऊन माहिती घेतली असता भारताबाहेर अमेरिका, युएई ,फ्रान्स, जर्मनी, चीन, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आदी देशांत मराठी भारतीय  सुद्धा माझे करवडीकराड ब्लॉग वाचन करतात. ( खालील चार्ट पहा )


सहा महिन्यात आज अखेर 86 ब्लॉग  पोस्ट केल्या,
या पोस्ट 10000 वाचकांनी पाहिल्या, वाचल्या.
हा  आकडा फार मोठा आहे.  मला प्रेरणा, स्फूर्ती  देणारा आहे.

मी आपल्या सर्व ब्लॉग वाचकांचे आभार मानतो, धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो.

यापुढील काळात प्रत्येक महिन्यात किमान 15 दिवस तरी लिखाण करण्याचा विचार आहे.


                          माऊली, आपले आशिर्वाद राहोत.

                                            आपलाच
                                            सतीश मोरे

                            9765566202       9881191302

                           आपल्या प्रतिक्रियेची वाट पहात आहे.
        वाचक संख्या ब्लॉग स्किनवर पाहण्याची सोय उपलब्ध केली आहे.




                                  आज पुन्हा एकदा आपल्या साठी सर्वात पहिला ब्लॉग टाकत आहे.




Friday, March 11, 2016

माणसापेक्षा मांजरेच जास्त  आडवी येतात



बिचारं मांजर आडवे आले की आपण त्याला दोष देतो, आता आपले काम होणार नाही ,
अशी अटकळ बांधतो, पुढची कामे सोडून देतो.
पण आयुष्यात आलेल्या अनुभवाचा, लागलेल्या ठेचांचा विचार केला तर
मांजरापेक्षा माणसेच आपल्या आडवी आली होती,
हे आपल्याला लक्षात येईल.

मांजर आडवे गेले की आपण थांबतो, कुणीतरी रस्ता ओलांडून पुढे जाण्याची वाट पाहतो
किंवा दोन पाऊले मागे येऊन पुन्हा चालायला सुरुवात करतो.
असे करून आपल्याला समाधान मिळते व पुढे जाऊन आपण कामाला लागतो. अंधश्रद्धा ठेऊन पुन्हा श्रद्धेने कामाला लागतो.

आयुष्यात अनेकदा चांगले काम करताना वाईट विचाराची मांजररूपी माणसे आडवी येतात. आडवे येणे हा त्यांचा स्वभाव असतो. त्यांच्या आडव्या येण्यामागे तुमचे चांगले काम बंद पाडणे हा हेतू असतो. आडवे येणाऱ्याच्या आडवे जाऊन त्यामध्ये वेळ घालविण्याची चुक शहाणे लोक करत नाहीत. मांजर आडवे आल्यावर जे आपण करतो तसेच अशा वेळी करायला हवे.



दोन पाऊले मागे येऊन दोन मिनिटे विचार करायचा.समोरचा माणूस माझ्या आडवा येतोय याचाच अर्थ  मी त्याच्यापेक्षा काही तरी वेगळे करतोय, असे चांगले आणि वेगळे काम करतोय की जे त्या व्यक्तीला जमत नाही ! अशा वेळी त्या व्यक्तीला त्याचे काम करू देत.

माझे काम मी ठरवल्यानुसार पुर्ण करणारच ,असा दृढनिश्चय करून त्या मांजररूपी आडव्या आलेल्या व्यक्तीला तेथेच सोडून यायचे, डोक्यातून घरी आणू नका.

असे केले तरच आपण पुढे जाऊ शकतो. भारतीय वंशाचे थोर विचारवंत राॅबीनसिंग म्हणतात, तुम्ही जेव्हा डोक्यावर पाच दहा किलो वजनाची पाटी घेऊन चालता तेव्हा त्रास तुम्हाला होतो. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला डोक्यात घेऊन जगता तेव्हा त्रास तुम्हालाच होतो. तुमच्या विषयी वाईट विचार करणारे, तुम्हाला दुषणे देणारे किंवा आडवे येणाऱ्याना तुम्ही तुमच्या डोक्यावरून, डोक्यातून काढून टाका. बघा मग तुम्हाला कसे हलके हलके वाटते. लोक तुमच्यावर जळतात तेव्हा समजायचे की तुम्ही काही तरी चांगले काम करत आहात.

परवाच मी एक विचार वाचण्यात आला,
तुम्हाला जर शिखरावर पोहचायचे असेल तर
रस्त्यावर आडवे येणाऱ्या  प्रगती विरोधी भुंकणाऱ्या लोकांसाठी शक्ती वाया घालवू नका.
सोबत बिस्किटे ठेवा, त्याच्यापूढे फेका आणि पुढे चालायला लागा !


 मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात,हाण्यांनी थांबायचं नसतं,सतत पुढे चालत रहायचं असते !


                               



२५ सप्टेंबर २०१६

मला घडवणारी शाळा : माझे दादा


माझे दादा, माझ्या पाठीशी सतत 
मला  घडवणारी शाळा: माझे दादा

आयुष्य खुप सुंदर आहे, आणखी सुंदर बनण्यासाठी गरज आहे सकारात्मक विचारांची,  चांगल्या लोकांच्या संगतीची. असं म्हणतात तुम्ही काय खाता , पिता यापेक्षा ते कोणाबरोबर बसून खाता हे अधिक महत्वाच आहे. शाकाहार योग्य की मांसाहार हा वादाचा विषय आहे. पण हा आहार करताना तुमच्या बरोबर कोणत्या विचाराचे लोक आहेत,  तो आहार करताना तुम्ही काय चर्चा करता, काय बोलता, त्यावर बरंच काही अवलंबून असते. आपल्या सोबत  असणारे लोक आपल्या आयुष्यात खुप काही बरं वाईट घडवून, बिघडवून जातात. आपले आदर्श कोण असावेत याचा जाणीवपुर्वक विचार करत आपण वाटचाल करीत राहीलो तर त्याचा खुप मोठा परिणाम आपल्या जडणघडणीवर होत राहतो.  माझ्या आयुष्यात सर्वश्री माझे वडील, सर्वश्री अमिताभ बच्चन, सदगुरू वामनराव पै यांच्या विचाराचा माझ्यावर फार मोठा प्रभाव आहे. कोणतीही अडचण आली तर या तिघा महाविभुतींचा सल्ला, संवाद  आणि दिव्य विचार मला फक्त  तारतातच नव्हे तर पुन्हा उभारण्या साठी बळ देतात. आजचा ब्लॉग मध्ये माझ्या वडिलांसाठी !



1982 साली 76% मार्क्स मिळून चौथी पास झालो. त्यावेळी हे गुण फार मोठे होते. माझ्या वडिलांनी करवडी जिल्हा परिषद शाळेतून कराडच्या टिळक हायस्कूल मध्ये मला प्रवेश घेतला.  त्यावेळी या शाळेत प्रवेश मिळणे अवघड काम होते.  माझ्या वडलांचे ओगले काच कारखान्यातील जुने मित्र विठ्ठल पाटील यांच्या शिफारसीने मला प्रवेश मिळाला. मला चांगले  आठवतंय मला प्रवेश दिला म्हणून शाळेतील  एका क्लर्कना आमच्या गावी जेवायला बोलवले होते,  असो.  टिळक हायस्कूल मध्ये मला घालण्याचा निर्णय  दादांनी खुप विचार करून घेतला होता. त्यावेळी ब्राह्मणाची शाळा, हुशार मुलांची शाळा म्हणून प्रसिद्ध होती. या शाळेत मला चांगल्या विचारांचा, बुद्धिमान मुलाची साथ आणि  आदर्श शिक्षकाकडून उच्च शिक्षणाचे डोस मिळातील, असा माझ्या वडिलांना विश्वास होता. ओगले ग्लास कंपनीत फोअरमन म्हणून काम करणाऱ्या मात्र बाबांचे सर्व मित्र ब्राह्मण, गुजर मारवाडी आणि सुशिक्षित लोक होते.  त्याच्या संगतीतच ते मोठे झाले. या संगतीमुळेच मी माझ्या वडलांच्या तोंडात कधी शिवी ऐकली नाही. माळ न घालता ते आजन्म शाकाहारी आहेत. शाकाहारी विचाराच्या लोकांची संगत आणि शाकाहार यामुळे आज वयाच्या 83 व्या वर्षी ते ठणठणीत आहेत, आजही कराडात येतात, चालत पेठेत फिरतात.


आपल्या पेक्षा किमान पाच दहा टक्के जास्त गुण असलेल्या मुलाबरोबर मैत्री ठेव, रोज नवीन काहीतरी शिकायला मिळते, शिकत जा, चार  ओळी तरी वाचत रहा, लिहित रहा , या त्यांच्या  चार सुत्रांनी मला घडवले. टिळक हायस्कूल मध्ये मला मिळालेला प्रवेश, या शाळेत भेटलेले सवंगडी, डाॅ. रा. गो. प्रभुणे, शेडबाळकर,  कणबरकर, बल्लाळ, भिंगारदेवे, रोटीथोर, पांढरपट्टे, भिंगारदेवे,  पी. एच. शिंदे यांच्या सारखे कडक शिस्तीचे शिक्षक यांच्यामुळे माझ्या आयुष्याला दिशा मिळू शकली.  टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण मिळाले हे माझे खरं तर नशीब आहे आणि हे सगळे शक्य झाले माझ्या वडलांमुळे.




स्वावलंबनाचा मंत्र दादांनी मला लहानपणापासूनच दिला, करवून घेतला. कमवा आणि शिका हा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दिलेला नारा दादानी स्वत अंगीकारला होता. अतिशय खडतर परिस्थितीत कष्ट करत त्यांनी मॅट्रिक परिक्षा दिली, पास झाले. खरं तर हे शिक्षण त्याकाळी फार मोठे होते.  त्यांच्या बरोबर शिक्षण घेतलेल्या करवडी गावातील सर्वाना शिक्षकाची नोकरी लगेच मिळाली होती. मात्र राजकीय ओळख, शिफारस नसल्याने आणि गावातील प्रमुख भावकीतील काहीनी खोडा घातल्याने त्याना ती नोकरी मिळाली नाही.

ओगले काच कारखान्यात नोकरी मिळाली. तिथेही त्यानी ज्ञानाची भुक भागवण्यासाठी ग्रंथालय चळवळीत सहभागी झाले.  तिथे त्यांनी ब्राह्मण  आणि मारवाडी समाजाचे मित्र जोडले. यासंगती मुळे त्याचेवर झालेले संस्कार झाले. एकत्र कुटुंब पद्धतीत आम्ही वाढलो. 13 जणांचे आमचे कुटुंब. आमचे दादा थोरले. आम्ही पाच भावंडे, आई, दादा तसेच आज्जी, चुलते, दोन काकू, चुलत भाऊ, बहीण अशा मोठ्या कुटुंबात खुप चांगले संस्कार मिळाले. 1979 साली ओगले काच कारखाना  पहिल्यांदा बंद  पडला आणि तेथून पुढे आमच्या कुटुंबाची झालेली परवड, आत्महत्या करावी अशी झालेली  परिस्थिती आणि या सर्व परिस्थितीत माझ्या दादाचे झालेले हाल मी पाहिले आहेत.  काही गोष्टी मला चांगल्याच आठवतात. याच दरम्यान आमच्या एकत्रित कुटुंबातील वाटण्या झाल्या. लग्नाच्या वयाची पदवीधर  मोठी मुलगी, नंतर भाऊ आण्णा, तिच्यापाठीवर आणखी एक मुलगी, आणखी एक मुलगी आणि सर्वात लहान मी. असे कुटुंब कसे चालवायचे, कारखाना बंद पडला होता, घरात लग्नाला आलेली मुलगी,सहकार्य करायला कोणीनाही, अशा परिस्थितीत दादांनी धीराने तोंड दिले.  1980 साली ताईचं  लग्न झाले. 1982 मध्ये काच कारखाना दुसर्‍यांदा बंद पडला, त्यानंतर दादानी गावात  किराणा दुकान सुरू केले. चौदा पंधरा  तास काम करून घर चालवले. पुढे गावातील दुकान आण्णा पाहू लागला.



नंतरच्या काळात करवडी काॅलनी येथे आणखी एक दुकान सुरू केले. उधारी, घरगुती अडचणी यामुळे दुकानात तोटा झाला.  दुसरी मुलगी लग्नाला आली होती . स्थळ पहायला सुरू झाली होती.  मात्र लग्नाला पैसे कोठून आणायचे?  कसे लग्न होणार या विवंचनेत दादांना रात्री झोप लागत नव्हती. पहाटेच्या वेळी उठून बसलेले दादा मी अनेकदा पाहीले आहेत.   पाहुण्यातीलच  एक स्थळ आले . बिजवर स्थळ शोधले म्हणून घरातले सारे नाराज होते. दादांच्या वर रागावले होते. पण पर्याय नव्हता. 1983 साली दारातच लग्न झाले. या लग्नाला सारे दुकान रिकामे झाले होते. कर्जे वाढली,   1985 साली  दुकान बंद पडले. कर्ज खुप झाले होते, कामाच्या शोधात दादा तळेगाव दाभाडे येथे गेले. लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या पैसाफंड काच कारखान्यात स्क्रिन पेंटींग काॅन्ट्रॅक्ट मिळाले. नंतर तिथेच  ईगल फ्लास्क कंपनीत पण ठेका मिळाला. या काळात दादा एकटे तिथे रहायचे. स्वत स्वयंपाक करून खायचे. पुढे आण्णाचे लग्न झाले, तो पण सहकुटुंब तिकडे गेला. यावेळी मी आणि आई दोघेच करवडीत रहात होतो. किराणा दुकान बंद पडले असले तरी शासनमान्य केरोसिन दुकान सुरू होते. मी आणि आई हे दुकान चालवायचो. महिन्यातून एकदा राॅकेलचा टॅन्कर   यायचा. मी पावती करत होतो, आई कॅन मध्ये तेल भरायची. माझे काॅलेज आणि क्लासेस सुरू होते. दादा तळेगाव वरून पैसे पाठवायचे. यावेळी दादांनी मला लिहीलेली पत्रे आजही मला आठवतात. पुढे तीन नंबरच्या मुलीचे लग्न झाले . 1994 -95 मध्ये कर्ज कमी झाले,  गहाण ठेवलेली राने सोडवली. 1996 मध्ये सारे जण आले. 


माझे दादा हे माझ्या साठी कायम आदर्श राहिले आहेत. त्यांनी मला केलेले उपदेश,सतत दिलेले प्रोत्साहन खुप प्रेरणादायी होते. मला आठवतंय मी पाचवी सहावीला असेन ,घरासमोर पडद्यावर मराठी सिनेमा आला होता. जानकी सिनेमा होता. दिवसभर स्पिकर लागला होता,  जाहिरात सुरू होती.  मला पिक्चर पहायला जायचे होते. दिवसभर दादाच्या मागे लागलो होतो. दादानी नकार दिला, पण मी पिच्छा सोडला नाही. शेवटी त्यांनी एका अटीवर मला परवानगी दिली. दिवसभर दुकानात बसायचे, काम करायचे, पुड्या बांधायच्या. मी ही अट मान्य केली.  संध्याकाळी मला एक रूपया मिळाला, पहिल्या कमाईचा! सिनेमा पहायला मिळाला.  स्वावलंबनाचा तो पहिला धडा होता. सॅल्युट टू दादा! आणखी एक गोष्ट लक्षात  आहे माझ्या. 1984 ची घटना असेल.  गावातीलच मंगला बनसोडे यांचा गावात तंबूत तमाशा होता. मोठ्ठी क्रेझ होती ती त्यावेळी. मला तमाशा पहायला जायचं होते. मी दादांना विचारले , मी तमाशा सुरू  असताना लेमन गोळ्या विकायला घेऊन जातो.  त्यांनी होकार दिला.  लेमन गोळ्या पुडा घेतला , तमाशा तिकीट काढले ,आत गेलो . डोक्याला रूमाल बांधून  'अरे लेमन गोळ्या ' असे ओरडत गोळयाचा पुडा विकला. मला माझा तो गेट अप अजुनही आठवतोय.

काम करताना लाजू नका, पैसा मिळतोच पण त्याबरोबर अनुभव सुद्धा मिळतो, असे दादांचे सुत्र होते.  तु ज्या क्षेत्रात काम करतोस त्या ठिकाणी सर्वोच्च काम करून दाखव, असा सल्ला मला दादाचा नेहमी असायचा,आजही असतो.

मी सहावीची परिक्षा दिली तेव्हाची गोष्ट. आमचे किराणा दुकान सुरू होते. दुकानात काम करत होतोच पण दादा किंवा आण्णा जेवायला जात तेव्हाच. त्यामुळे सुट्टीत काय करणार, असा प्रश्न होता. दादांनी मला ओगलेवाडी येथे कामाला लागले.  मेन रोडवर लोकमान्य मेडिकल आणि जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे,  त्याचे मालक यशवंतराव उर्फ  पाटील हे माझ्या दादाचे मित्र होते.  या दुकानात मी कामाला जाऊ लागलो. सकाळी दहा ते सहा या वेळेत मी तिथे काम करायचो. खुप मजा यायची. नवीन शिकायला मिळाले. वस्तुचे दर कळले, ज्ञानात भर पडायची, नवे मित्र, लोक ओळखीचे झाले.  शाळा सुरू होईपर्यंत 10 जुन पर्यंत साधारण दिड महिना  तिथे काम करत होतो.  मालक विश्वास  आणि अशोक पाटील यांच्या घरातील लोक मला आपलाच म्हणत. कौतुक करत. शाळा सुरू होताना या दुकानातून  सर्व वह्या ,पुस्तके, दप्तर, पेन, पेन्सिल, खोड रबर  आणि गाईडस घेऊन जायचे, हाच  माझा पगार. सलग दोन वर्षे या दुकानात सुट्टीत मी काम केले आहे. स्वतःच्या कमाईतून घेतलेली पुस्तके, वह्या घेऊन शाळेत जाताना जो आनंद मिळाला तो क्वचितच  कुणाला मिळाला असेल!  ही कार्यशाळा माझ्या आयुष्यात कायम स्मरणात राहील अशी आहे.o

दादा माझ्या साठी खूप मोठ्ठे आहेत आणि राहतील.

( पुर्वार्ध )
                                                            सतीश वसंतराव मोरे




१७ सप्टेंबर २०१६

पी डी पाटील जयंती विशेष पुन्रप्रकाशित


न पाहिलेले साहेब

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी मातृछत्र हरवलेला एक छोटा मुलगा धैर्याने उभा राहतो.  परिस्थितीशी झुंजत ध्येय गाठायचेच अशा दृढनिश्चयाने स्वत:ला झोकून देतो, प्रसंगी उपाशीपोटी झोपतो, टिळक हायस्कूल मधील मित्र भानुदास पागणीस यांचे सोबत स्वावलंबनाचे धडे  गिरवतो. अखेर तोच जिंकतो! शिकतो, मोठ्ठा होतो, अढळ स्थान निर्माण करतो ...  पी. डी. पाटील होतो !

जगाच्या  इतिहासात कराडचे नाव नेहमीच उंचावर राहीले आहे. कराडचे नाव साता समुद्रापार नेणारी निवडक रत्ने कृष्णामाईच्या काठावर जन्माला आली. त्यात पाडुरंग दादासाहेब पाटील उर्फ पी.डी. पाटील यांचे नाव निश्चित सर्वोच्च आणि आदरणीय आहे.  पी.डी.पाटील यांच्या आयुष्यातील अनेक घटना, प्रसंग अनुभव यापूर्वी अनेकांच्या आयुष्यात आलेले असतील पण त्या अनुभवातून स्वतःला सिद्ध करण्याची किमया फक्त साहेबांनीच साधली. तत्कालीन परिस्थितीचा स्वतःवर जरादेखील परिणाम होऊ न देता साहेब त्याला तोंड देत गेले.  कधी पुढे जाऊन कधी एक पाऊल मागे घेत पुन्हा गनिमी कावा करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलाने गेले. सभोवतालची सामाजिक परिस्थिती पाहून मन हेलावले गेले. त्यावेळी भगवान गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाकडे ओढले गेले. कधी जैन मुनीजनाच्या विचाराने प्रभावीत झाले. सर्व धर्मात सांगितलेली तत्वे आपल्या नजरेतून पाहताना टीकात्मक लेखन वाचण्यावर त्यांचा भर होता. साहेबांच्या घरातील वैयक्तिक ग्रंथालयात असलेली पुस्तके याचीच साक्ष देतात.


साहेबांच्या राजकीय आयुष्यात त्यांना काही चढ उतारांना, स्वकियांनी दिलेल्या आकस्मिक धक्क्यांना तोंड द्यावे लागले. धुरंधर समाजकारणी, राजकारणी असलेल्या साहेबांनी संयम ढळू दिला नाही. ज्या कामात आनंद मिळाला, मिळतो तेच काम करत राहिले. यशवंतराव चव्हाण 1962 साली दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाले. त्यानंतर त्याच वर्षी पी.डी.पाटील यांनी कराड  उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या बैलजोडी चिन्हावर निवडणूक जिंकली आणि ते पहिल्यांदा आमदार झाले. हा त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता. त्यानंतरच्या तीन विधानसभा निवडणुकीत साहेबांनी उत्तर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले नाही, परंतु या तिन्हीही निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली. त्यानंतर 1980 साली पुन्हा वेगळ्या परिस्थितीत साहेब पुन्हा एकदा कराड उत्तरचे आमदार झाले.

1985 मध्ये झालेल्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला. जवळच्या लोकांनी सहकार्य न केल्याने, दगाबाजी केल्याने झालेला हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. अशा परिस्थितीत बरोबरच्या लोकांनी साहेबाकडे जाऊन पराभवाला जबाबदार असलेल्या लोकांना सोडू नका, वगैरे सल्ले दिले.  मात्र त्यांनी संयमाने हा पराभव स्वीकारला.  लगेच दुसऱ्या दिवशी  कामाला सुरूवात केली. आपल्या जवळचे कोण याचे आत्मचिंतन करतानाच त्यांनी पुढच्या म्हणजे 1990 च्या विधानसभा निवडणुकीत शामराव अष्टेकर यांच्यासाठीच तिकीट
मागितले. त्याचांच प्रचार केला, निवडून पण आणले. 1985 च्या निवडणुकीत जवळ राहून उलटे काम करणारांना उघडेे पाडले. योग्य वेळी योग्य निर्णय घेताना साहेबांनी या निमित्ताने ज्यानी त्यांना पाडले त्यानांच उघडे पाडले.

हवा उलटी असताना खाली बसले की संकट निघून जाते, याची जाणीव असलेल्या साहेबांनी नंतरच्या काळात विरोधकांचे अस्तित्व, नाव पूर्ण संपवलेच शिवाय कराड उत्तर मध्ये आपली पाळेमुळे आणखी घट्ट रोवली. त्याचा फायदा त्यांना 1995 साली झालेल्या निवडणुकीत झाला. या निवडणुकीत कॉंग्रेसने उमेदवारी नाकारली आणि बंडखोरी करून साहेब अपक्ष उभे राहिले. तिसऱ्यांदा आमदार झाले. ही निवडणूक चुरशीची झाली, राष्ट्रीय कॉंग्रेसच्या आनंदराव पाटील यांचा त्यांनी पराभव केला आणि हीच निवडणूक त्यांना आणि त्यांचा मुलगा बाळासाहेब पाटील यांच्यासाठी खऱ्या अर्थाने माईल स्टोन ठरली.


1999 साली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी पहिल्याच दिवशी शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहणारे राज्यातील ते पहिले आमदार होते.  हीच योग्य वेळ साधून साहेबांनी बाळासाहेब पाटील यांना रिंगणात उतरवले. उत्तर मधील परंपरागत राजकीय विरोधकांची ताकद ओळखून साहेबांनी पाऊले टाकली. या निवडणुकीत बाळासाहेब पाटील जिंकले.  आपल्या राजकीय वारसदाराला योग्य वेळी राजकारणात सक्रिय करण्याची साहेबांनी दाखवलेली चातुर्य बुद्धी खरंच वाखाणण्यासारखी आहे. साहेबांच्या परिपक्वतेची ती पावती आहे. पराभवातून कसे उभे रहायचे याचे ते मूर्तीमंत उदाहरण होत.

कराड शहरात, तालुक्यात साहेब गावागावांत जात. कराड  उत्तर मधील एखादेच गाव असेल जिथे साहेब गेले नसतील. साधेपणा त्यांना आवडत होता. प्रियजणांच्या घरी जाऊन ते  जेवत.  ज्यांच्या घरी पाहुणचार घेतला त्या घराची काळजी त्यांनी कायम घेतली.  त्या घरातील एका तरी व्यक्तीला रोजगारपण दिला. दूर्दैवाने व्यसनाच्या आहारी गेलेला एक पालिका कर्मचारी साहेबांना कधीही, कुठेही, रस्त्यावर थांबवून, साहेब काय काम होईल का ?असे म्हणत मदत मागायचा. साहेब सुद्धा सर्वासमोर त्याला मदत करायचे. यावेळी  साहेब त्याला मदत का करतात असा प्रश्न  अनेकांना पडे. कराड मधील एका सच्च्या स्वातंत्र सैनिकाचा तो मुलगा होता. स्वातंत्र्यानंतर त्यांनी कसल्याही प्रकारची मदत, पेन्शन, ताम्रपट स्वीकारला नाही.  मी जे केले ते देश सेवेसाठी, मग पेन्शन कशासाठी घ्यायची? अशा विचाराचे ते पोलादी स्वातंत्र सैनिक होते. स्वातंत्र चळवळीत फारसा सहभाग घेता आला नाही याची हुरहुर असलेल्या पी. डी. साहेबांनी या स्वातंत्र सैनिकाच्या मुलाला पालिकेत नोकरी दिली. त्याचा पगार प्रत्येक महिन्याला त्याच्या पत्नीच्या हातात नेऊन दिला. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याची काळजी घेतली. स्वातंत्र्य सैनिकाच्या घराची इतकी काळजी घेणारा असा लोकप्रतिनिधी दुर्मिळच म्हणावा लागेल.

1995 साली कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून साहेब अपक्ष विजयी झाले. 43 अपक्ष आमदार विजयी झाले आणि त्यांच्या पाठींब्यावर  युती सरकार आले. सरकारला पाठिंबा द्या, सत्तेत सहभागी व्हा अशा प्रकारचे निरोप  वेगवेगळया माध्यमातून त्यांना आले. तत्कालीन मंत्री दौलतराव आहेर यांनी कराडातील एका डॉक्टरांच्या  मार्फत निरोप देऊन साहेबांना मंत्रीपदाची ऑफर दिली. काही दिवस मुख्यमंत्र्यांनी सहकार खाते पी. डी. पाटील यांना द्यायचे म्हणून स्वतः कडेच ठेवले होते. मात्र साहेब शेवटपर्यंत तत्वावर कायम राहिले आणि नकार कळवला.  तत्वाशी तडजोड स्वीकारून साहेबांनी त्यावेळी मंत्रीपद स्वीकारले असते तर राज्याला सर्वोत्तम सहकार मंत्री मिळाला असता.

याच कालावधीत महाराष्ट्रातून निवडून द्यायच्या राज्यसभा सदस्यपदासाठी शरद पवार यांनी एका उद्योगपतीना संधी दिली होती. तीस आमदारांचा मताचा कोटा होता. मतदारांना फार मोठे अमिष दाखवले गेले. सर्व प्रकारची अमिषे धुडकावून लावून साहेब तत्वावर ठाम राहिले. मतदानादिवशी साहेब मुंबईला गेले. त्यावेळी अमिष न स्वीकारणारा आमदार कोण आहे हे पहायला ते उमेदवार आले होते .शरद पवार यांच्याकडून खात्री करून घेऊन साहेबांनी मतदान करून साहेब थेट कराडला आले. पैसा, मोठ्ठेपणा,डामडौल यांच्या मोहापासून कित्येक मैल दूर राहिलेल्या साहेबांनी आमदार पेन्शन कधीच घरच्या कामाला वापरली नाही. पेन्शन जमा झाली की सहाय्यका करवी ते पैसे गरजू, अपंग यांना पोहचवले जात होते. आमदार कोट्यातून  मुंबईत मोक्याच्या ठिकाणी त्याना शासनाने फ्लॅट दिला होता. 2007 साली हा फ्लॅट विकून काही रक्कम लाडक्या नातवाना दिली आणि उर्वरित मोठी रक्कम गरीब गरजू लोक, होतकरू संस्थाना वाटून टाकली. ही रक्कम पोहचल्यावर काही लोक त्यांच्याकडे  आभार मानायला आले. तुमच्यामुळे आम्हाला मदत झाली, आम्ही तुमचे  उपकार कधी विसरणार नाही, अशी कृतज्ञता लोकांनी साहेबाप्रती व्यक्त केली. यावेळी "मी तुम्हाला जे काही दिले आहे, ते मी विसरून गेलो आहे, तुम्ही पण विसरून जा' असे नम्रपणे सांगत साहेबांनी दान कसे करावे हे दाखवून दिले. उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला पण कळले नाही पाहिजे, असे सारेच जण बोलतात. पण साहेबांनी हा विचार कृतीत उतरविला.


सर्व धर्म विचारसरणी साहेबांनी अंगीकारली, जगली. हिंदू धर्मात सांगीतल्याप्रमाणे फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहीले. बौद्ध धर्माच्या संयम या शिकवणीमुळे ते अनेक संकटात तग धरून राहिले. इस्लामचा भाईचारा आयुष्य भर जपल्याने सर्वाचे झाले. आपले कार्य संपल्यावर पृथ्वीतलावर राहतात ते सामान्य लोक. जैन धर्मियाचा "क्षमा'मंत्र आयुष्यभर जपताना जैन मुनीप्रमाणे प्रायोपोवेशन करून देह ठेवला आणि दैवत्वाकडे पोहचले.

 दिव्य विभुती पी. डी. साहेबांना अभिवादन! 

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...