फॉलोअर

२६ जुलै २०१९

Unब्लॉक and Bloक Friends

 Unब्लॉक and Bloक Friends

सर्व लोकांचे व्हाट्सअँप DP
बघण्याइतका रिकामा नक्कीच नाही मी !
पण आज जरा वेळ मिळाला, तेव्हा तुमचा नंबर डीपी पहायला गेलो.
DP बघत बसलोय अन् तुमच्या नावावर क्लिक करणार नाही हे शक्य तरी आहे का ?
काहीश्या कारणाने
किंवा
आपल्या मतभेदाने,
कुणीतरी काडी टाकल्यामुळे,
तुम्ही ब्लॉक केलेला
माझा नंबर
तुमच्याकडे सेव्ह आहे,
हे मी दुसऱ्या नंबरवरून मेसेज टाकला
म्हणून माझ्या लक्षात आले.
मग मी आपला सहलीचा
एक वर्ष जुना फोटो तुम्हाला टाकला.
(Google photoने आठवण करून दिली)
तुमचा DP बघुन तुम्ही बदलला आहे
असं नक्कीच वाटतंय. पण छान दिसत आहात.
असो बदल हा निसर्गाचा नियम आहे.
नातं तोडलं,भेटणं टाळलं
तरीही तुम्ही माझ्या आवडी-निवडी
अजुनही जपता.
अधून मधुन माझी आठवण काढता !
चार चौघात काहीतरी छानसं बोलता !
मला पाहून न पाहिल्यासारखे करत दुर जाता !
अनोळखी व्यक्ती दिसल्यासारखा चेहरा करता! खुप बरं वाटतं ना तुम्हाला !
तरीही हे बघुन
माझ्या नाजूक मनाला दिलासा मिळतो,
धन्यवाद!
मला 'ब्लॉक' करावं आणि
मी तुम्हाला कधीही मॅसेज करू नये,
इतका कठोर मी आजवर कधीच बोललो नाही.
असो.
व्यवहार आणि वैयक्तिक नातं वेगळं असावे,
हे तुम्हीच सांगीतले होते,
ते मी जपतोय,जपणार!
आजही रोज एक मेसेज तुम्हाला पाठवतो.
तुम्हाला दिसत नाही
कारण मला ब्लाँक केलंय ना तुम्ही!
पण मला समाधान वाटते,
तुम्हाला मेसेज पाठवण्याचा!
तुम्ही मला कायम अनब्लॉकं ठेवावं,
अशी माझी कधीच इच्छा नाही,नसेल.
अनब्लॉक नकोय मला !
मला तुमच्या-माझ्या नात्यातली
स्पेस कायम जपायची आहे.
मात्र जेव्हा वाटेल तेव्हा जवळ या,
घट्ट मिठी मारू !
वरवरंचं प्रेम मला कधीच रुचत नाही,
जे करायचं ते खुलं तुम्हीच शिकवलं आहे.
तुमची इच्छा असेल तर
असु दे ब्लाँक !
ब्लॉक असताना निर्माण होणारी
ती प्रेमाची ओढ मला अनुभवायला आवडेल.
चला तर मग...
करा block...
भेटू आठवणींत रोजंच !
©सतिताभ

१३ जुलै २०१९



कृतज्ञता हाच खरा देव

धन्यवाद वाचक माऊलींनो

एकादशी दिवशी झालेल्या तृप्तमय विठ्ठल दर्शनामुळे खूप खुश होतो.पहाटे सहाला भक्त निवास येथे आल्यानंतर आराम केला,बारा वाजता तयार झालो त्यानंतर पंढरीचा फेरफटका मारण्यासाठी पुन्हा बाहेर पडलो. पुन्हा एकदा विठ्ठल मंदिर प्रदक्षिणा घातली. दरम्यान नगर प्रदक्षिणा घालण्यासाठी सर्व पालख्यातील दिंड्या पंढरपुरात आल्या होत्या.नगरप्रदक्षिणा हा पालखी सोहळाचा सर्वात शेवटचा भाग असतो,ती झाल्यानंतर हा पालखी सोहळा पहिला टप्पा संपतो. त्यानंतर प्रत्येक दिंडीतील प्रमुख काही लोकांना विठ्ठल रुक्मिणी समितीच्यावतीने विठ्ठल दर्शनाचा लाभ दिला जातो,थेट प्रवेश दिला जातो.नगरप्रदक्षिणा वेळेला अनेक दिंड्या आणि एकादशीला लाखो वारकरी असल्यामुळे रस्ते तुडुंब भरले होते. सोलापूर जिल्हा पोलिसांनी वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याचा खूप चांगला प्रयत्न केला मात्र त्यांनाही शेवटी मर्यादा होत्या. त्यामुळे काही ठिकाणी विशेषता विठ्ठल मंदिराच्या समोरील चंद्रभागा घाटा समोरील भागात थोडीशी ढकलाढकली झाली. काही वारकऱ्यांना दम लागला, त्यातच अडकून पडल्यामुळे अनेक जण घामाघूम झाले.मात्र कोणतीही दुर्घटना घडली नाही, हे माऊलींचे वारकऱ्यांवरील प्रेम म्हणावे लागेल.

चंद्रभागा तीरावर लाखो वैष्णवांचा मेळा भरला होता, डोळ्यात साठवून हा सोहळा घेतला. आज एकादशी होती त्यामुळे उपवास होता, चहापाणी घेतले. त्यानंतर पुढारीच्या पंढरपूर कार्यालयात गेलो. सिद्धार्थ ढवळे हे अनेक वर्षापासून पुढारीचे पंढरपूर ते कार्यालय प्रमुख आहेत अतिशय चांगला माणूस असून पंढरपुरात पुढारी वाढवण्यासाठी ढवळे यांनी घेतलेले कष्ट उल्लेखनीय आहे. त्यांना नवनाथ पोरे यांची चांगली साथ लाभली आहे. पुढारी कार्यालयात बसून चहापाणी घेतला. वारीची चर्चा केली. त्यानंतर बाजारपेठेत येऊन प्रसाद  खेळणी वगैरे खरेदी केली.  या दरम्यान अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचे पंढरपूरचे सदस्य विजय जगताप भेटले.

दोन वाजता वेदांत भक्त निवासवर पोहोचलो.आता परतीचे वेध लागले होते. बॅगा भरल्या आणि साडेतीन वाजता पंढरपूर सोडले. खरंतर पंढरपूर आणि माऊलींचा सोहळा सोडून जायची अजिबात इच्छा नव्हती.वारीत असेच चालावे ,आपण या भक्ती सोहळ्यामध्ये समरस होऊन जावे, सोहळा संपूच नये, असे वाटत होते. मात्र कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात. माऊली सोहळा एक टॉनिक आहे.हे टॉनिक वर्षभरासाठी पुरते, हे टॉनिक घेऊन आता आपल्या कामाला लागायचे होते,घरी जायचे होते. येताना वारी मार्गावरूनच नातेपुतेपर्यंत आलो होतो उलटा प्रवास केला. वाखरी, भंडीशेगाव ,वेळापूर, माळशिरस, नातेपुते आणि परत सातारा जिल्ह्यात प्रवेश करून शिंगणापूर,दहिवडी, वडूज मार्ग कराडला पोहचलो. लेकीने घट्ट मिठी मारून पप्पांचे स्वागत केले.


पंढरीची वारी यावेळची खरंच वेगळी होती,खूप आनंद देऊन गेली.या वारीदरम्यान दिवसभर घडलेले सर्व प्रसंग, आलेले अनुभव,पाहिलेली मंदिरे असो वा भेटलेले लोक असो,सर्वांच्या बाबत जेवढं लिहिता येईल तेवढे लिहिले आहे. आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.आपण हे सर्व अतिशय मनापासून वाचलं ,मला प्रतिक्रिया दिल्या. आपण जे चांगलं पाहिलं ते दुसऱ्याला सांगावं, आपण जे चांगले ऐकले ते दुसऱ्याला सांगावं,आपल्याला माऊली कृपेने जे ज्ञान मिळते , ते दुसऱ्यांनाही सांगावं. ज्ञान देण्यानं वाढते. कोणतीही चांगली गोष्ट द्यायला पाहिजे. मी ते शेअर केले. मला जे पाहायला मिळाले ते मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला. आपणही ते मनापासून पाहिलं, वाचलं, ऐकलं. मी तुमचा खूप खूप आभारी आहे. असेच प्रेम माझ्यावर राहू द्या.

यावर्षी वारीमध्ये दैनिक पुढारी मधून सलग 19 दिवस 'देव माझा विठू सावळा' या मालिकेतून लिखाण केले आहे. यामध्ये वेगळे विषय मांडण्याचा माझ्या परिने प्रयत्न केला आहे. आपण पुढारीमध्ये याचे वाचन केले, मला प्रतिक्रिया पाठवून दिल्या. मी आपला ऋणी आहे. या मालिकेसाठी कराड अर्बन बँकेने प्रायोजकत्व स्वीकारल्याबद्दल मी मी बँकेचे कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, अध्यक्ष सुभाषराव एरम आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांचाही ऋणी आहे.



दैनिक पुढारीने यावर्षी मला एक वेगळी जबाबदारी दिली होती. सध्याचा जमाना ऑनलाईनचा आहे, फेसबुक व्हाट्सअपचा आहे. लोकांना घडलेल्या बातम्या लगेच पहायच्या असतात, ऐकायचं असतं याचा विचार करून पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे चिरंजीव पुढारी चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी पुढारी ऑनलाइन वेब पोर्टल मोठ्या दिमाखाने ॲक्टिव केले आहे. पुढारी ऑनलाइन चॅनेल युट्युब आणि फेसबुकच्या माध्यमातून अतिशय लोकप्रिय झाला आहे. युट्युबवर पुढारीचे 84 हजार सदस्य आहेत. फेसबुक वर सुद्धा पुढारी वेब पेज अतिशय लोकप्रिय आहे. पुढारीच्या बातम्या लिंकच्या माध्यमातून ताज्या बातम्या लगेच वाचकांच्या पर्यंत मोबाईल वरून पाठवल्या जातात. याचाच भाग म्हणून पंढरीची वारी पुढारीच्या वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी समुह सरव्यवस्थापक अनिल  पाटील आणि  एजीएम राजेंद्र मांडवकर यांनी या वर्षी माझ्याकडे वेगळी जबाबदारी दिली होती. मी ऑनलाईन, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये नवीन आहे ,पहिल्यांदाच बुम माईक हातात घेतला.

सुरवातीचे दोन-तीन दिवस चुका झाल्या. हळूहळू सुधारणा होत गेली.याकामी आमच्या वेबचे प्रमुख अभ्युदय रेळेकर यांनी चांगले मार्गदर्शन केले, ऑनलाइन टीम मधील अनेकांनी वेळेवेळी फोन करून माईक कसा धरायचा, सुरुवातीला काय बोलायचे, शेवट कसा करायचा  व्हिडिओ कसा करायचा याबाबत सूचना दिल्या. त्यामुळे हळूहळू सुधारणा होत गेल्या आणि आपल्यापर्यंत चांगले व्हिडिओ चांगले विषय पोहचवू शकलो. गेल्या 18 दिवसात 50 वेगवेगळ्या स्टोरी आपल्यापर्यंत पुढारी ऑनलाइनच्या माध्यमातून पोहोचल्या आहेत. या सर्व स्टोरी व्हिडिओ तयार करताना माझ्या सोबत असणारे वारकरी रणजीत पाटील, विजय शेलार, प्रकाश पाटील आणि माणिक पाटील यांनी वेळोवेळी खूप सहकार्य केले, मी त्यांचा ऋणी आहे. वेगवेगळ्या विषयावर 50 नवीन व्हिडिओ स्टोरी देताना पंढरीच्या वारीतील वैशिष्ट्य मांडण्याचा प्रयत्न केला, आपणास तो आवडला असेल ! कॅमेरा समोर आणि माईक हातात घेऊन बोलण्याची फार सवय नव्हती मात्र माऊली कृपेने सर्व होत गेले. या स्टोरी फेसबुक आणि यू ट्यूब ऑनलाइन वरती अतिशय हिट झाल्या आहेत. तरडगाव मधील एका स्टोरीला 8000 हून अधिक लोकांनी पाहिले आहे. प्रत्येक स्टोरी किमान पाचशे लोकांनी पाहिले आहे. हे पुढारीच्या लोकप्रियतेचे यश आहे,माऊली नामाची जादू आहे, पंढरीच्या वारीचा महिमा आहे !

पंढरीची वारी आळंदी पासून सुरू झाली आणि पंढरपुरात संपली. या भक्तीच्या सागरात अनेक जण भेटले. अनेकात देव दिसला, वारी यशस्वी पूर्ण होण्यासाठी अनेकांनी हात पुढे केला, सहकार्य केले. या सर्वांचा मी ऋणी आहे. 👏

भेटू लवकरच😌
तोपर्यंत राम कृष्ण हरी !







karawadikarad.blogspot.com

माऊली सतीश मोरे

११ जुलै २०१९

मोगरा फुलला..



राम कृष्ण हरी,

मोगरा फुलला..!
आनंदी आनंद गडे,
जिकडे तिकडे चोहीकडे.!
किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदीआनंद झाहला.!

हे काहीच नाही, ह्यापेक्षा अजून अनेक अलंकार, विशेषणं, रुपक वापरून काव्यातून आजचा आनंद व्यक्त करता येईल. मात्र तरीही आज मला जो आनंद झाला आहे,आज मी जे अनुभवले आहे ते सांगायला माझ्याकडे शब्द अपुरे पडणार आहेत. आज पंढरीची वारी पूर्ण झाली. गेली सोळा दिवस आळंदी ते पंढरपुर पायी चालत असताना विठ्ठलाचा शोध घेता घेता विठ्ठलमय होऊन गेल्यावर मला आलेले अनुभव सांगावे तेवढे कमीच आहेत. गेले तीन वर्षे वारी केली मात्र वारीनंतर पंढरपूर  विठुरायाचे दर्शन झाले नाही, केवळ कळसाचे दर्शन घेऊन मला बारशीच्या दिवशी घरी येत होते. पण यावर्षी आज सर्व काही शक्य झालं. विठ्ठलाच्या पूजेचा मान ज्यांच्याकडे होता ते विठ्ठल-रुक्‍मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्याबरोबर मला थेट मंदिरात जाता आले. विठ्ठल पूजा पाहता आली, विठ्ठलाला डोळे भरून पाहता आले. हा आनंद कसा वर्णावा हेच मला कळत नाही.



आज दिवस उजाडला  पंढरपुरातील वारकऱ्यांच्या जयघोषाने. विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कमिटीने भव्य  भक्तनिवास उभे केले आहे या भक्तनिवासाशेजारीच वेदान्त भक्त निवास मध्ये आमची राहण्याची सोय होती. दहा वाजता तयार झालो, नाश्ता केला, पंढरपुरात काही रस्त्यावर फेरफटका मारला. पुन्हा रूमवर आलो. दुपारी जेवायला एका ठिकाणी बसलो तेव्हा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्ष ना.नरेंद्र पाटील यांची भेट झाली. नरेंद्र पाटील यांनी आपले अनुभव कथन करताना आषाढी एकादशी दिवशी  पहिल्यांदाच पंढरीत आलो आहे असे सांगितले. या अगोदर अनेकदा पंढरीला आलो आहे. मात्र या दरम्यान आलेला अनुभव एक वेगळाच आहे. पंढरपूर खूप बदलत आहे पूर्वीचे पंढरपूर आत्ताचे पंढरपूर याचा विचार केला असता स्वच्छ पंढरपुरचे स्वप्न आता साकार होऊ लागले आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी माझ्याशी बोलताना व्यक्त केली. या  दरम्यान लेकीचा देवयानीचा फोन आला. त्यांच्या शाळेमध्ये आज पंढरीची वारी निघाली होती डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन देवयानी वारकरी बनवून त्या दिंडीमध्ये सहभागी झाली होती. तीने पाठवलेला फोटो पाहून खूप आनंदलो.



पुन्हा एकदा विश्रांती घेऊन घेण्यासाठी वेदांत निवास मध्ये गेलो दरम्यान देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांच्याशी फोनवर बोलून सायंकाळी किती वाजता मंदिरात जायचे याबाबत निश्चित केले.अतुल भोसले यांच्या हस्ते देवस्थान समितीच्या वतीने मानाची पुजा बारा वाजता होणार होती. त्यामुळे अकरा वाजता नवीन भक्त निवास मध्ये भेटण्याचे ठरले. त्यानंतर आराम केला पाच वाजता पंढरपूरचे दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण बाहेर पडलो. चौफाळा चौकात आलो. अनेक वारकरी येत होते.चौफाळा येथे श्रीकृष्ण मंदिरात दर्शन घेऊन वारकरी पुढे विठ्ठल मंदिराकडे जात होते, दर्शन लाईन फार दूर पर्यंत गेली होती. त्यामुळे अनेक जण मुखदर्शन तिकडे जात होते. मुखदर्शनाची लाइन सुद्धा गोपाळपुरापर्यंत गेलेली होती. अनेक वारकऱ्यांनी कळसाचे दर्शन घेतले त्या अगोदर नामदेव पायरी पाशी जाऊन नमस्कार केला, कोणी फुगड्या खेळल्या ,वैष्णव नाचू लागले. अनेकांनी चंद्रभागा तीरावर जाऊन पुंडलिकाचे दर्शन घेतले. चंद्रभागेमध्ये स्नान केले ,काहींनी फक्त हात पाय धुतले. चंद्रभागेच्या पलीकडे मोठी जत्रा भरली होती त्या जत्रेत जाण्यासाठी नावेची सोय करण्यात आली होती. काही भाविक नावेतून पलीकडे जात होते.

चंद्रभागा तीरावर विश्वशांती केंद्र आळंदी आणि एमआयटी पुणे यांच्यावतीने नमामी चंद्रभागा आरतीचा उपक्रम सुरू होता.चंद्रभागा नदी स्वच्छ आहे.आणखी स्वच्छ व्हावी गंगानदीच्या धर्तीवर चंद्रभागेचे सुद्धा स्वच्छता व्हावी,चंद्रभागेत गेल्यानंतर तिचे पाणी पिण्याची इच्छा व्हावी, इतपत स्वच्छ व्हावी, याची सुरुवात आपल्यापासून करावी. नद्या स्वच्छ ठेवाव्यात नद्या ह्या उद्याचे भविष्य आहे असा संदेश देत प्राध्यापक विश्वनाथ कराड यांनी हा उपक्रम हाती घेतला होता .डॉ. विश्वनाथ कराड यांच्याशी संवाद साधला, त्यांची मुलाखत घेतली. विश्वनाथ कराड यांनी मीडियाच्या माध्यमातून नमामी चंद्रभागा हा संदेश सर्वत्र जाऊ शकतो अशी इच्छा व्यक्त करून मीडियामुळे देश बदलत आहे मीडियाने जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली .त्यानंतर माझ्यासहित रणजीत पाटील यांचा डॉ.कराड यांनी सत्कार केला. तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते पुन्हा विठ्ठल मंदिर चौकात आलो कळसाचे दर्शन घेतले पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आलो.आता भूक लागली होती खानावळीमध्ये जायचा निर्णय घेतला. यात्रेमुळे खानावळी मध्ये खूप गर्दी होती .जेवण झाल्यानंतर पुन्हा वेदांत भक्ती निवास मध्ये आलो. अतुल बाबांचे सहाय्यक प्रदीप आणि धनाजी पाटील पुणेकर यांचा मेसेज आला बाबांनी अकरा वाजेपर्यंत बोलवले आहे. फ्रेश होऊन पुन्हा भक्त निवास मध्ये गेलो भक्तनिवास हा पंढरपुरातील सर्वात मोठा पायलट प्रोजेक्ट आहे. येथे बाराशे वारकऱ्यांना राहण्याची सोय करण्यात आली आहे .हे भक्त निवास इतर भक्त निवास प्रमाणे वाटत नाही तर एक पंचतारांकित हॉटेल वाटते. या ठिकाणी साडेसहा वाजता आम्ही फोटोसेशन केले.माझ्या सहकाऱ्यांना पंढरीची वारी काय अनुभव आला यांच्या मुलाखतीही घेतल्या .


रात्री सव्वाअकरा वाजता भक्त निवास मध्ये डॉक्टर अतुल भोसले यांची मुलाखत घेण्यासाठी गेलो आम्हाला एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बसले असा भास होत होता पण हे हॉटेल नसून महाराष्ट्र शासनाच्या मालकीचे पंढरपूर देवस्थान समितीच्या मालकीचे भक्त निवास होते. कॉन्फरन्स हॉलमध्ये बसून अतुल बाबांचे मुलाखत घेतली. यावेळी शिर्डी देवस्थान समितीचे अध्यक्ष हे सहकुटुंब त्या ठिकाणी आले होते बाबांच्या सोबत गप्पा मारताना स्वच्छ पंढरपूर हे स्वप्न सत्यात उतरले आहे याचा आनंद वाटला. कराडकर माणूस कोणत्याही ठिकाणी गेला तर वेगळेपण करून दाखवतो ,कराडचे नाव उंच होतो हे पाहून खूप आनंद झाला. वारी करत असताना प्रत्येक वेळी पंढरपुरात येतो,  अधुनमधुन सुद्धा येत असतो. प्रत्येक वर्षी पंढरपूर अधिकाधिक स्वच्छ होत गेले होते,पंढरपूरमध्ये बदल होत गेले होते हे बदल स्वतः डोळ्यांनी पाहिलेले असल्यामुळे कराडच्या माणूस मंदिर समितीचा अध्यक्ष असल्याचा खूप अभिमान वाटला. आता पावणेबारा वाजले होते अतुल भोसले यांच्या हस्ते साडेबारा वाजता देवस्थान समितीच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणी पुजा होणार होती, तिकडे आम्ही निघालो. अतुलबाबांनी स्वतः विचारपूस करून तुम्ही कोणत्या गाडीत बसत आहे, याची काळजी घेतली. त्यांचा समवेतच कँन्ववाँय मधून विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे निघालो. मंदिराकडे जाणारे रस्ते गर्दीने फुलले होते, या रस्त्यावर उभे राहायलाही जागा नव्हती.मात्र पोलिस बंदोबस्तात आमची वाहने हळू पुढे जात होती एक वेगळा अनुभव होता. पंढरी मध्ये एवढ्या  मान-सन्मानात विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जाण्याची संधी मला मिळाली होती. हा सर्व सन्मान दैनिक पुढारीचा होता, माझ्यातील वारकर्‍याचा होता. गेली चार वर्षे वारी करत असल्यामुळे वारकऱ्यांसाठी विठ्ठलाने पायघड्या टाकूनच माझ्यावर  कृपा केली होती.



विठ्ठल मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या  प्रवेशदारात सर्व आम्ही उतरलो. खूप गर्दी असल्यामुळे ढकलाढकली झाली. त्यातूनही मार्ग काढत डॉ. अतुल भोसले, गौरवीताई भोसले तसेच ना. शेखर चरेगावकर आत मध्ये गेले. प्रमुख लोकांच्या तसेच  पासधारकासोबत गर्दीमध्ये बाहेरील काही लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पोलिसांना कोण पासधारक आहे हे कळलं नाही,थोडी ढकलाढकली झाली मला पोलिसांनी बाजूला सारले, मी ओळखपत्र दाखवले मात्र थोडा वेळ थांबा पाच मिनिटात परिस्थिती आटोक्याखाली येईल मग तुम्हाला आज पाठवतो असे सांगून त्यांनी मला बाजूला उभे केले. या दरम्यान एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांने घातलेला गोंधळ पाहिला मी शांत बसून हे सर्व पाहत होतो. विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली होती आता प्रवेश मिळायला काही अडचण नव्हती,थोडावेळ संयमाने एका बाजूला उभा राहिलो.अचानक सोलापूर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची आठवण झाली.  मनोज पाटील यांना फोन लावला आणि तो फोन एका पोलिसांना जोडून दिला.त्यानंतर मंदिराच्या आतमध्ये मला आत सोडण्यासाठी एक  पोलीस आले. पोलिसांनी मला बाजूला सारले होते मात्र त्याच पोलिसांनी सन्मानाने मला परत आत मंदिरामध्ये आणून सोडले. खरे तर पोलिसांच्या या कृत्याचा मला जराही राग आलेला नव्हता, राग येण्याचे कारणच नव्हते, त्यांनी त्यांचे कर्तव्य केले होते.गेली सोळा दिवस पंढरीच्या वारीमध्ये तडजोड करण्याची सवय झाली आहे. त्यामुळे परिस्थितीला सामोरे जाणे आहे ती परिस्थिती स्वीकारणे, संयम ठेवणे हे चांगलेच उमगले होते. मागच्या तीन वाऱ्यात सुद्धा मला हाच अनुभव आला होता.

विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिराच्या आत डाव्या साईडला देवस्थान कमिटीचे ऑफिस आहे, तेथे अतुल भोसले यांचे सर्व सदस्य तसेच अनेक मान्यवर बसले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासमवेत शासकीय पूजा मान मिळालेल्या जोडपे तिथे उभे होते. त्यांची मुलाखत घेतली. दर्शन बारीमध्ये उभे राहिलेल्या एका दांपत्यास हा मान मिळतो,या दाम्पत्याचा सपत्नीक सत्कार करण्यात येतो तसेच त्यांना वर्षभर मोफत एसटी प्रवास पास दिला जातो.यावर्षी हा मान श्री विठ्ठल मारुती चव्हाण (वय 61)आणि सौ प्रयाग विठ्ठल चव्हाण ( वय 55) मु पो. सांगवी सुनेवाडी तांडा, ता. अहमदपूर जि. लातूर यांना मिळाला.विठ्ठलराव सांगवी सुनेवाडी तांडाचे 10 वर्षे सरपंच व सध्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष असून
1980 पासून सलग वारी करत आहेत. साडेबाराच्या सुमारास सोवळे नेसून ना.अतुल भोसले सपत्नीक आले, त्यांच्या पाठोपाठ आम्ही सर्वजण विठ्ठल मुर्ती कक्षात गेलो. तिथेही पुन्हा खूप गर्दी होती.गाभारा खुप छोटा आणि त्याबाहेर जागा छोटी आहे. देवस्थानच्या वतीने होणारी शासकीय पूजा अतुल भोसले आणि गौरवी भोसले यांच्या हस्ते सुरू झाली. यादरम्यान विठ्ठलाच्या मूर्ती पासून केवळ दहा पंधरा फुटाच्या अंतरावर ही महापुजा सलग अर्धा तास पाहण्याचा स्वर्गीय योग मला मिळाला.

सोळा दिवस पंढरीच्या वारीत आम्ही चालत होतो, वारकऱ्यांच्या सोबत आम्हाला आनंद मिळत होता.थोडा थकवा आला होता, पावसात भिजल्यामुळे थोडं आजारीपण पडलो होतो. मात्र हा सर्व थकवा  विठ्ठलाची सावळी सुंदर मुर्ती पाहून दूर झाला होता. या मुर्तीमधून बाहेर पडणारे तेज माझ्या डोळ्याला पेलवत नव्हते.डोळे मिटून विठ्ठलाचे दर्शन घेतले. विठ्ठल डोळे भरून पाहिल्यानंतर काय मागावे हेच कळत नव्हते. खूप वेळ देवाकडे पाहत होतो.मनात काहीतरी मागावी असे इच्छा होती,  मात्र काय मागावे हेच कळत नव्हते.विठ्ठलाचे दर्शन घेऊन मला मिळालेला आनंद या जगातील इतर सर्व वस्तु अथवा व्यक्तीरुपाने मिळणाऱ्या आनंदापेक्षा फार मोठा होता. याची अनुभूती मला आली होती. काय बोलावे काय करावे हेच सुचत नव्हते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन माझे डोळे तृप्त झाले होते. शेवटी आरती सुरू झाले घंटी वाजायला लागली तेव्हा थोडा भानावर आलो आणि विठ्ठलाकडे साकडे घातले. सर्वांचे कल्याण व्हावे अशी इच्छा केली,सर्व सुखी व्हावेत, सर्वांना त्यांच्या मनाप्रमाणे सर्व सुंदर मिळावे,अशी इच्छा व्यक्त करून खाली बसलो. डोळे भरून पुन्ह पुन्ह विठ्ठलाला पाहिले.

आजचा आनंद कसा सांगावा हेच मला कळेनासे झाले आहे. किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला अशी माझी परिस्थिती झाली होती. गेल्या अनेक महिन्यापासून माझ्या मोबाईलची डायलटोन मोगरा फुलला हे भक्तीगीत आहे. मोगरा फुलला हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग लतादीदीनीं गोड आवाजातून आणखी गोड केला आहे. हा अभंग कानावर पडल्यानंतर मनात आनंदाचा, प्रेमाचा, भक्तीचा ,वात्सल्याचा मोगरा फुलतो आणि ही रिंगटोन ऐकलं तर अनेकजण सुखावतात, मला बोलून दाखवतात.आज तोच मोगरा माझ्या रोमारोमात फुलला होता. शासकीय पुजा संपल्यानंतर विठ्ठल पददर्शन घेतले.त्यानंतर रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेलो.तेथे अतुल भोसले सपत्नीक उभे होते त्यांच्यासोबत फोटोसेशन केले,तीन वर्षे वारी केली मात्र विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही,तुमच्या सहकार्यामुळेच आज शक्य झाले, याबाबत अतुलबाबांकडे कृतज्ञता व्यक्त केली.पुन्हा सभामंडपात आलो. संजय पवार आप्पासोबत आनंद शेअर केला.याठिकाणी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम चार वाजता होणार होता,त्याची वाट पाहत बसलो.

चारच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा पार पडली आणि मुख्यमंत्री मंडपात कार्यक्रम ठिकाणी आले. त्यांच्यासोबत पालकमंत्री सुभाष देशमुख, विजय शिवतारे ,दीपक केसरकर सुरेश खाडे, रणजीत निंबाळकर, बबनराव लोणीकर तसेच ना.अतुल भोसले उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालखी सोहळ्यातील प्रमुख तीन दिंड्यांचा सर्वोत्कृष्ट दिंडी म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  मारुतीबुवा कराडकर दिंडी क्रमांक 12 ला एक लाख रुपये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. या कार्यक्रमात विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला स्वतंत्र बातमी देणार आहे, त्यामुळे रिपीटेशन करत नाही. पावणेपाच वाजता कार्यक्रम संपला.मंदिराच्या बाहेर पडण्यापूर्वी गेटवरच पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट झाली. त्यांनी चहा पाण्यासाठी साडेआठ वाजता येण्याचे निमंत्रण दिले. पाच वाजता वेदांत भक्त निवासाकडे निघालो. एकंदरीत आजचा दिवस आणि संपूर्ण वारी आनंदात गेली. गेल्या चार वर्षात वारी करताना जो लाभ झाला नाही तो विठ्ठल दर्शनाचा लाभ झाला.

सगळी माऊली कृपा! आई-वडिलांचे आशिर्वाद! तुमच्यासारख्या हितचिंतकांचे प्रेम आणि माझ्या कुटुंबाची साथ, दुसरं काय !


माऊली राम कृष्ण हरी ! असेच प्रेम राहू द्या !


 😌जय माऊली😌
माऊली सतीश मोरे

Also available at
karawadikarad.blogspot.com


🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

१० जुलै २०१९



राम कृष्ण हरी, 

बंडी शेगाव ते वाखरी पंढरीच्या वाटेतील शेवटचा टप्पा वाखरी ते पंढरपूर हा आणखीन एक शेवटचा टप्पा असता तरी वाखरी आणि पंढरपूर आता काही वेगळे राहिलेले नाही. बंडी शेगाव ते वाखरी फारसे अंतर नाही. त्यामुळे पालखी सोहळा सकाळी लवकर निघणार नव्हता आदल्या दिवशी समाज आरती दरम्यान चोपदारांनी बंडी शेगाव इथून पालखी दुपारी दीड वाजता निघेल असे अगोदरच सांगितले होते सकाळी सर्व वारकरी नेहमीपेक्षा निवांत होते लवकर उठून तयार होण्याची अंघोळ करण्याचे किंवा लगेच चालायला सुरुवात करण्याची गडबड नव्हती सर्व काही आटोक्यात आले होते. त्यामुळे सर्वजण साडेआठ नऊ वाजेपर्यंत तयार झाले.
 आज पालखीतळावर सकाळचे कीर्तन होणार होते. पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर दरम्यान दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तने होत असतात . ही कीर्तने सायंकाळी दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर होतात. मात्र सासवड, पुणे आणि भंडी शेगाव येथे सकाळ आणि संध्याकाळी कीर्तने होतात.


पंढरीच्या वारीत आळंदीपासून पालखी सोहळा वाखरी पर्यंत पोहचे पर्यंत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पालखी पोहोचल्यानंतर वेगवेगळ्या परंपरा आहेत .त्यापैकी एक महत्त्वाची परंपरा म्हणजे पालखीतळावर पोहोचल्यानंतर होणारी कीर्तन सेवा. गेल्या शेकडो वर्षापासून पालखीतळावर होणारे किर्तन कोणी करायचे हा प्रत्येक दिंडी सल्ल्याचा मान आहे. वाखरीपर्यंत 21 ठिकाणी कीर्तन सेवा होतात .या 21 ठिकाणी कोणाचे किर्तन होते हेही ठरलेले आहे. हा मान 21 दिंडी मालकांना मिळालेला   आहे. काय आहे ही परंपरा?  हे जाणून घेण्यासाठी मी पालखीतळा़र पोहचलो.भंडीशेगाव मध्ये रथासमोरील पंढरपूर येथील आजरेकर दिंडी क्रमांक 7 मालकाचे मानाचे कीर्तन होते. आजरेकर महाराजांच्या दिंडीवतीने कीर्तन झाले,या कीर्तनाचे मानकरी यांच्याबरोबर चर्चा केली.

इकडे आपल्या मारुतीबुवा कराडकर दिंडी क्रमांक 12 मध्ये भगवान भगवान मामा यांच्या पुण्यतिथीनिमित्त भजनाचा कार्यक्रम सुरू होता. साडेनऊ वाजता कार्यक्रम संपला. त्यानंतर जेवणाच्या पंगती झाल्या. वैकुंठ वाशी भगवान भगवान मामा यांना गुलाबजाम खूप आवडत होते त्यामुळे खास स्वयंपाक केला जातो .मामांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली होण्यासाठी कराडहून अनेक लोक आले होते, अनेकांनी मामांच्या त्याविषयी आणि त्यांनी कराडकर मठासाठी केलेल्या कामाचा, त्यागाला उजाळा दिला. याठिकाणी माळा विकणारी एक पंधरा सोळा वर्षाची मुलगी दिसली. काखेला कापडात गुंडाळून छोट्या बाळाला घेऊन ती आली होती. मुलगी पाहून समाजात अजूनही बाल विवाह होतात ह्याचे वाईट वाटले. परिस्थितीने गांजलेल्या या छोट्या मुलीकडे पाहून आणि तिच्या बाळाला  पाहून तिला थांबवले आणि तिला जेवायला बसवले. ती जेवताना तिच्या डोळ्यातील आनंद पाहून विठ्ठल दर्शन झाल्याचे सुख मिळाले.


जेवण झाल्यानंतर तंबू काढण्यात आले. आता सर्वांना पुढे वाखरीला जाण्याची घाई झाली होती. आम्ही तिथून निघायची तयारी सुरू केली. बाजीराव विहीर येथे मोठ्ठे रिंगण होणार होते. या ठिकाणी होणाऱ्या रिंगण पाहण्यासाठी फार मोठी गर्दी होते, वाखरी मध्ये येणाऱ्या सर्व पालख्या व त्यामधील वारकऱ्यांची वाढती संख्या मोठी संख्या विचारात घेऊन बाजीराव विहिर येथूनच अनेक वाहने सातारा रोड बसला वळवली जातात, तेथ पोहचलो तेथेच दोन तास विश्रांती घेतली. अजून रिंगण सुरू व्हायला फार वेळ होता. साडेचार वाजता बाहेर पडलो अचानक जोरात पाऊस सुरू झाला. हजारोच्या संख्येने भाविक येत होते, बाजीराव विहीर येथे होणाऱ्या रिंगण पाहण्यासाठी मोठ्या पटांगणावर फार गर्दी झाली होती. अनेकांना रिंगण पहायचे होते मात्र तेवढी जागा उपलब्ध नव्हती. काहीजण लांबूनच रिंगण पाहण्यासाठी झाडावर चढले, कोणी ट्रकच्या टपावर , मिळेल तिथे बसले होते.जोरदार पाऊस झाल्यामुळे रस्त्यावर चिखल झाला होता. जेथे रिंगण होणार होते ती जागा आहे काळे रान असल्यामुळे चिखल झाला होता. लोकांची ये-जा झाल्यामुळे रस्त्यावर सर्वत्र चिखलाचा खच झाला. मात्र यातही वारकरी बेभान होऊन नाचत होते. चिखलाने आणि त्यांचे कपडे खराब झाले. पाचच्या सुमारास माऊलींची पालखी या ठिकाणी आली, उभे व गोल रिंगण झाले. नंतर आम्ही पुढे वाखरीकडे निघालो. वाखरी पासून एक किलोमीटर अंतरावर चहा पिण्यासाठी थांबलो आणि आम्ही ज्याची वाट पाहत होतो ती संत तुकाराम महाराजांची पालखी पालखी तेथे आली. तुकाराम महाराज यांच्या सोहळ्यातील वारकरी अचानक वाढल्यामुळे खूप गर्दी झाली.आम्ही जिथे थांबलो होतो तेथेच तुकाराम महाराजांच्या पालखीचे दुसरे उभे रिंगण होणार होते, खूप आनंद झाला.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला या सोहळ्यातील वारकरी दुतर्फा उभे राहिले, माऊलींचा अश्व दोन्ही दोन्ही दिशेने आला. वैष्णवांनी माऊली नामाचा जयघोष केला. हवेत गारवा होता वातावरण खूप चांगले होते. त्यामुळे वैष्णवांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता .वारकरी नाचत होते, महिला फुगड्या खेळत होत्या. अश्वाच्या पायाखालची माती कपाळाला लावण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. तुकाराम महाराज यांच्या दिंडी सोहळ्यातील शिस्त खरंच वेगळी होती. या सोहळ्यात महिलांची संख्या अधिक होती आणि महिला सक्रिय पण खूप होत्या हे पाहायला मिळाले. हे रिंगण पाहिल्यानंतर पुढे चालू लागलो. रस्त्यावर तुडुंब भरून वारकऱ्यांचा प्रवाह सुरू होता. माऊली सोहळ्यातील पद्धतीप्रमाणे हरिपाठ सुरू झाला. एका दिंडी वर चालत चालत हरिपाठ केला. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ करत करत वाखरी कधीआली हे समजलेच नाही. याच दरम्यान चिरंजीव पियुशचा फोन आला. तो खुप आनंदी होता, हॉटेल मॅनेजमेंटच्या पहिल्या वर्षाचा निकाल लागला होता तो डिस्टिंक्शन मध्ये पास झाल्याची गोड बातमी त्याचे तोडून ऐकली. खूप खूप दिवसांनी त्याचा आवाज ऐकला आनंद झाला, आनंदाश्रू वाहू लागले.

वाखरीत चौपदरी रस्त्याला सुरुवात झाली.राज्यभरातून आलेले सुमारे 2000 हून अधिक लहान-मोठ्या दिंड्या तसेच संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली ,चांगदेव महाराज, सोपान काका महाराज, मुक्ताई चांगवटेश्वर यासारख्या मोठ्या पालखी सोहळ्यातील वारकरी सर्व रात्री याच एका ठिकाणी मुक्कामाला येणार होते, काहीजण पोहचले होते. त्यामुळे वाखरीत वैष्णवांची मांदियाळी होती. या ठिकाणी आळंदीचे एक ज्ञानेश्वर भेटले. हो ज्ञानेश्वर महाराज नसून हाडवैद्य ज्ञानेश्वर काकडे आहेत. एका वेगळ्या पद्धतीने मसाज करून हातापायाची मणके बसवणारे, झाडाला उलटे टांगून मणक्यातील गॅप कमी करणारे ज्ञानेश्वर काकडे हे युट्युब वर  लोकप्रिय आहेत. पंढरपूर नगरपालिका, महाराष्ट्र शासन आणि ग्रामपंचायत यांच्यावतीने वाखरी मुक्काम तळावर सर्व सुखसुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आल्या होत्या. वाखरीत सुमारे पाचसहा लाख लोक एकाच वेळी आले होते,अजून पालखी सोहळ्यातील प्रमुख दिंड्या येणे बाकी होते. सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारची दुकाने थाटली  होती. थोडा फेरफटका मारून आराम करण्यासाठी कराडकर दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन बसलो.

नऊच्या सुमारास बहुतांश सर्व पालख्या वाखरीत  आल्याचे समजल्यानंतर आम्ही सर्वजण सर्व संताच्या पादुका दर्शनासाठी बाहेर पडलो. सुरुवातीला संत तुकाराम महाराज, त्यानंतर मुक्ताई, सोपान काका गाडगेनाथ महाराज कराडकर तसेच अनेक लहान-मोठ्या संताच्या पादुकांचे दर्शन घेतले.सर्वात शेवटी माऊलींच्या पालखी तळावर पोचलो तेव्हा तिथे समाज आरती सुरू होती. माऊलीच्या सोहळ्यातील ही शेवटची समाज आरती. त्यामुळे  सोहळा चांगल्या पद्धतीने पार पाडल्याबद्दल महसूल खाते,पोलीस खाते यांच्यासहित सर्व शासकीय विभागाचे, शासनाचे राजाभाऊ चोपदार यांनी आभार मानले. पालखी सोहळा दरम्यान गेल्या सोळा दिवसात निधन झाले त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कृतज्ञतेने वारकऱ्यांनी टाळ्या वाजवून शासनाच्या सर्व विभागाचे आभार मानले. पंढरीला येणाऱ्या सर्व प्रमुख संतांच्या पालख्यांचे दर्शन झाल्यामुळे मन तृप्त झाले होते. पुन्हा आपल्या दिंडीमध्ये आलो आणि जेवायला बसलो.

आता रात्रीचे दहा वाजले होते. वाखरीमध्ये मुक्काम करण्याऐवजी पुढे पंढरपूरला चालत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही सर्व चार सहकारी पंढरपूरच्या दिशेने चालायला सुरुवात केली. आमच्यासारखे अनेक वारकरी या रस्त्यावर चालत होते. वाखरी ते पंढरपूर हे ५ किलोमीटर अंतर मात्र या रस्त्याला सगळी दुकाने थाटलेली होती, रात्रभर वारकरी चालत होते. रात्रीच्या अकरा वाजता वाजल्या तरी नामसंकिर्तन आवाज ऐकू येत होते. बाराच्या सुमारास पंढरपुरला पोहोचलो. पंढरपूरच्या वेदान्त भक्त निवासमध्ये पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष ना.डॉ. अतुल बाबा भोसले यांच्या वतीने आमची निवासस्थानाची सोय करण्यात आली होती. या ठिकाणी रात्री साडेबारा वाजता पोहचलो.

एकंदरीत आजचा दिवस खुप छान गेला.
माऊली कृपा दुसरे काय !

जय माऊली
माऊली सतीश मोरे


Also available at
karawadikarad.blogspot.com

०९ जुलै २०१९

माझी वारी

राम कृष्ण हरी,

वेळापूर ते भंडीशेगाव असा महत्त्वाचा टप्पा पार करण्यासाठी माऊलींची पालखी सकाळी निघाली. वेळापूर हे अंतर 18 किलोमीटर आहे, हा टप्पा महत्त्वाचा यासाठी म्हटले आहे कारण या टप्प्यात वारकऱ्यांना 2 प्रमुख सोहळ्यातील अनेक वारकरी भेटतात, अनेक दिंड्या भेटतात. ज्ञानोबा माऊली तुकोबाराय सोपानदेव या तिन पालखी सोहळ्यातील दिंड्या आणि वारकरी एकत्र येण्याचा आजचा दिवस होता.

11 वाजण्याच्या सुमारास बोंडले येथे सोपानदेव काका यांची पालखी पोहोचले, त्यानंतर काही तास नंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी या मार्गावर आल्यानंतर हा मार्ग फुलून गेला. तत्पूर्वी माऊली पालखी सोहळ्यातील मोकळ्या समाजातील वारकरी या मार्गावर पुढे मार्गक्रमण करत होतेच. तोंडले-बोंडले येथे सोपानकाका आणि ज्ञानेश्वर माऊली या दोन रथ जवळून गेले,दोन बंधू एकमेकांना भेटले आणि हा क्षण टिपण्यासाठी वारकरी निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम असा जयघोष केला. मोठ्या आवाजात माऊली माऊली असा जयघोष झाला.

त्यानंतर आम्ही दुपारच्या भोजनासाठी विसाव्यासाठी आमच्या कराडकर दिंडी कडे मार्गक्रमण केले.पंढरीच्या वारीत ज्ञानेश्वर माऊली सोहळ्यात असणाऱ्या सर्व दिंड्या आणि या दिंड्यांचे मुक्कामाचे ठिकाण ठरलेले आहे.
प्रत्येक दिंड्यांचा दुपारच्या जेवणाचा विसावा कुठे असतो हे ठिकाणी ठरलेले आहे, एवढेच नव्हे तर दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळी जेवणात काय मेनू असावा हेही काही दिंड्यांमध्ये पद्धती ठरलेले आहेत. कराडकर दिंडी नंबर 12 येथे तोंडले-बोंडले याठिकाणी दुपारच्या जेवणावेळी गेल्या 36 वर्षांपासून चकुल्या हा पदार्थ केला जातो. चकुल्या हा महाराष्ट्रातला अतिशय आवडता पदार्थ आहे. वारकरी चुकल्याचा आस्वाद घेऊन तृप्त होतात. खूप दिवसानंतर आज चकुल्याचा स्वाद घेतला, भरपेट जेवलो.

तोंडले-बोंडले या गावापर्यंत आळंदी ते पंढरपूर हा जो महामार्ग आहे या मार्गाला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असे नाव आहे. मात्र तोंडले-बोंडले मध्ये संत तुकाराम महाराज यांची पालखी या महामार्गाला येऊन मिळते तिथे या महामार्गाचे नाव बदलते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी महामार्ग असे या महामार्गाचे नामकरण होते. हे पाहताना महाराष्ट्रातील हे दोन दिग्गज ज्ञान संत एकाच मार्गावरून चालत असल्याचा भास होतो.

संत तुकाराम महाराज आणि सोपान काका यासहित अनेक पालख्या तोंडले-बोंडले येथून पुढे गेल्यानंतर मगच ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या रस्त्यावरून पुढे जाते. संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सुमारे एक लाख तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात दिड लाख वारकरी सहभागी असतात या दोन्ही पालखी सोहळ्यात मिळून तितकेच खुल्या म्हणजेच मोकळ्या समाजातील वारकरी असतात असा मिळून हा आकडा साधारण साडेपाच सहा लाखांवर पोहोचला आहे.  त्यातच लहान-मोठ्या गावातून येणाऱ्या सातारा सांगली कोल्हापूर पुणे या जिल्ह्यातील पालख्या हळू या मार्गावर येतात आणि हा आकडा सात लाखांवर पोहचतो, त्यामुळे तोंडले-बोंडले नंतर पालखी महामार्ग म्हणजे ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज यांचा नामाचा महासागरच बनलाय असे चित्र आहे.

भंडीशेगाव येथे पालखी तळावर आज गर्दी फुललेली होती हवा वाहत होती, भंडी शेगाव ग्रामस्थांनी माउलींच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली होती. मात्र संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे जात नाही. तोपर्यंत माऊलींची पालखी येत नाही त्यामुळे रात्री उशिरापर्यंत माऊली येणार नाहीत अशी माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळे पालखीतळावर फेरफटका मारायला निघालो. पालखीतळावर गेल्या तीन वाजेदरम्यान एक हमखास व्यक्ती आम्हाला भेटते, ते म्हणजे पोलीस कीर्तनकार विठ्ठल माने. तळावर आत गेल्यानंतर पाहिले विठ्ठल माने यांचे कीर्तन सुरु होते.

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक आयपीएस मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या माऊलींच्या सोहळ्यांमध्ये वारी नारी शक्तीची  असा एक रथ तयार केला आहे. या रथामध्ये पोलीस कर्मचारी सहभागी झाले आहेत. दिंडीच्या मार्गावर हे पोलीस मार्गदर्शन करतात या पथकात कृष्णा चव्हाण सुरेश कांबळे रमेश ठोंबरे सुरेश माने अतुल सुरवणे हेही पोलीस सहभागी आहेत. या पथकामध्ये एक सेवानिवृत्त सहायक फौजदार विठ्ठल माने हे कीर्तनकार आहेत. पोलिसांच्या या किर्तनाला वारकरी फार प्रतिसाद देतात. एक पोलीस तोही किर्तन करतो याचे लोकांना अपूर्व वाटते. विठ्ठल माने यांना यांच्याशी  बातचीत केली.

माऊलींची पालखी रात्री सायंकाळी साडे आठ वाजता बंडीशेगाव येथे मुक्कामाला पोहचले तर संत तुकाराम महाराजांची पालखी सुरुली येथे मुक्कामाला पोहचली, खूप उशीर झाल्यामुळे रात्री दहापर्यंत रस्ते माऊलींच्या गर्दीने फुलून गेले होते. आता भंडी शेगाव येथे कराडकर यांच्या दिंडीमध्ये जेवायला थांबले तर मुक्कामाच्या ठिकाणी जायला आणखीन वेळ होईल म्हणून आम्ही पुढे चालायला निघालो.

आज आमचा मुक्काम भंडी शेगाव येथील एका मित्रांच्या शेतावर होता, अर्बन बँकेतील महेश शिंदे यांचे क्लासमेट मारुती गीते गिड्डे यांच्या शेतावर मी रात्री उशिरा मुक्कामाला पोहोचलो. हे फार्महाऊस म्हणजे चारी बाजूला डाळिंबीची बाग आणि मध्ये शेतातील घर. या घरात निसर्गाच्या सान्निध्यात माउलीने आमची व्यवस्था केली होती.

मुक्कामाला पोहचण्यापूर्वी आज जेवायचे कुठे हा प्रश्न होता. रस्त्याला कुठे  हाँटेलात झुणका-भाकर मिळते का याचा मी शोध सुरू केला. एका ठिकाणी झुणका-भाकर चे हॉटेल आहे समजून आम्ही गेलो तर ती बीडमधील एक दिंडीचा छोटा टेम्पो होता. त्यांना आम्ही जेवायला मिळेल का असे विचारले त्यावेळी त्यांनी अहो माऊली आमची दिंडी आहे, हाँटेलात नाही. तुम्ही आमच्याकडे जेवा असा आग्रह करून आम्हाला जेवायला वाढले. अतिशय आग्रहानी आम्हाला झुंणका भाकर खायला दिले. माऊलीच्या सोहळ्यातील कोणी उपाशी राहत नाही हे आम्हाला माहिती आहे. गेले
तीन वर्षे मी तो अनुभव घेतो आहे. मात्र मला स्वतःला कुठे जेवायला जाण्याचा अशी वेळ आली नव्हती.आजवर कराडकर यांच्या दिंडी मध्ये जेवणाची व्यवस्था होती.आज मात्र एक वेगळा अनुभव आला. माऊलींनी आमची व्यवस्था केली, आम्हाला पिठलं भाकरी खायची इच्छा झाली होती त्यासाठी आम्ही हॉटेल शोधत होतो मात्र एका दिंडीमध्ये माउलीने आम्हाला जेवणाची व्यवस्था केली,तिथेही आम्हाला खायला पिठले भाकरीच मिळाले .एक वेगळा योगायोग आणि अविस्मरणीय असा क्षण होता तो.

एकंदरीत आजचा दिवस खुप छान गेला.
माऊली माऊली!
😌जय माऊली😌
माऊली सतीश मोरे

Also available at
karawadikarad.blogspot.com

०८ जुलै २०१९



राम कृष्ण हरी,
पंढरीची वारी आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचली पोहोचली आहे. आज सोमवारी माऊलीचा मुक्काम वेळापूर येथे आहे. उद्या भंडीशेगाव, परवा वाखरी आणि त्यानंतर पंढरपूर. अजून तीन मुक्काम आणि पुन्हा विठ्ठलाच्या दर्शनासाठी माऊली पंढरपुरात पोहोचणार आहेत.

सोमवारी सकाळी माऊलींची पालखी माळशिरस चा मुक्काम वेळापूरला जायला निघाली. 5 कि. मी.  आल्यानंतर लगेच खुडूस नावाचे गाव आहे, याठिकाणी पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण झाले. त्या नंतर नेहमीप्रमाणे वारकर्‍यानी उडीचे खेळ खेळले.

आता वारकऱ्यांना वेध लागले आहेत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाचे! वारकरी चालत आहेत. विसाव्याच्या ठिकाणी बसल्यानंतर चर्चा रंगतात. किती मुक्काम झाले, किती राहिले, उद्या कुठे असणार परवा कुठे असणार याची चर्चा रंगू लागली आहे. लोणंद सोडल्यापासून वारकऱ्यांना उन्हाचा खुप त्रास होत आहे. पुणे ते लोणंद पाऊस होता. पावसाळी वातावरण होते त्यामुळे ऊन जाणवत नव्हते. थोडाफार त्रास झाला तो चिखलाचा मात्र लोणंद नंतर आता गेल्या आठ दिवसात ऊन पडले आहे. त्यातच रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचा धूराचाही त्रास होत आहे

माळशिरस सोडल्यानंतर कडक ऊन पडले होते, या उन्हात चालताना तहानभूक हरवलेले वारकरी माउलींच्या नामाचा जयघोष करत होते. मात्र  थकून काही वारकरी झाडाखाली आराम करत होते. खडूसचे रिंगण संपल्यानंतर दुपारच्या विसाव्यासाठी, जेवणासाठी थांबले. त्यावेळी अचानक वारा सुरू झाला, जोरदार हवा  येऊ लागली. धुळीचे कण वारकऱ्यांच्या ताटात येऊ लागले. जेवताना वारकऱ्यांचे चांगली दैना झाली. काही दिंडीमध्ये स्टील ताटाची सोय केलेली होती. ते वारकरी ताट घेऊन उचलून निवांत ठिकाणी गेले. मात्र पाऊस नव्हता केवळ वाराच होता. काहींच्या पत्रावळ्या उडून गेल्या. वारा आला मात्र पाऊस काय आला नाही.
पुन्हा पुढचा प्रवास सुरु झाला. आता वेळापूर जवळ आले होते. वेळापूरच्या अलीकडे दोन किलोमीटर अंतरावर धावा आहे. धावत जायची उताराची जागा.या उतारावरून चालत असताना तुकाराम महाराजांना विठ्ठलाचे मंदिराचे कळसाचे दर्शन झाले होते,अशी वारकऱ्यांची भावना आहे.
तुका म्हणे धावा I पुढे आहे विसावा II
असा एक अभंग प्रचलित आहे. तुम्ही धावत धावत विठ्ठलाकडे जा.लवकरच तुम्हाला विसावा मिळणार आहे म्हणजे  तुम्हाला विठ्ठलाचे दर्शन मिळणार आहे. विठ्ठलाचे दर्शन मिळाल्यानंतर तुमची तहान भूक, चालून चालून आलेला थकवा सर्व संपणार आहे, असे या अभंगातून तुकाराम महाराजांना सांगावयाचे असेल. वारकरी धावत होते, काहीजण त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होते. हा क्षण टिपण्यासाठी विविध चॅनलचे प्रतिनिधी रस्त्याकडेला उंचावर बसले होते. धावा संपल्यानंतर वेळापूर मध्ये रात्रीचा मुक्काम झाला.वेळापूरमध्ये रस्त्याकडेला एक प्राचीन तळे आहे.त्याला बकासुराचे तळे म्हणतात. भीमाने बकासुराचा वध वेळापूर नजीक एका गावात केला होता. ज्या बकासुराला रोज खायला गाडाभर अन्न लागायचे, बकासुर ते अन्न खाल्ल्यानंतर या तळ्यामध्ये पाणी प्यायचा, असे येथील लोकांनी सांगितले.



आजच्या प्रवासात खूप वारकरी भेटले. झाडाखाली बसलेले वारकरी गावाकडची चौकशी करत होते. पाऊस पडलाय का? पेरणी झाली का ?ऊस किती उगवला आहे? सारे ठीक आहे का ?आहे आई वडिल कसे आहेत? मुलं कशी आहेत ?याची माहिती घेत होते. वारी आता डिजिटल झाली आहे. मोबाईलवरून वारकरी गप्पा मारत आहेत. व्हिडीओ कॉलिंग लावून मुलाबाळांशी बोलणारे वारकरी पहायला मिळाले.
एकंदरीत आजचा दिवस खुप छान गेला.
माऊली माऊली ! माऊली माऊली !

Also available at
karawadikarad.blogspot.com

०६ जुलै २०१९

माऊलींच्या कृपेने पंढरीची वारी अतिशय सुंदर चालू आहे. पंढरीच्या वारीमध्ये सर्वात काय महत्वाचे असेल तर तडजोड. वारीमध्ये सर्व काही मिळते. वारीमध्ये फक्त आपला भाव चांगला असला की सर्व गोष्टी उपलब्ध होऊन जातात. माझी ही चौथी वारी आहे. वारीला जाताना करावयाची वस्तुची तयारी फार मोठी नसते. जाताना  फार सुख सुविधा घेऊन जाण्याची गरज नसते, घेऊन जायचे असतो ते फक्त शुद्ध आणि पवित्र मन. तिथे गेल्यावर सर्व गोष्टी आपोआप मिळत राहतात. खाण्यापिण्याची तर बिलकुल चिंता नसते. गरज असते फक्त तडजोडीची. जो कोणी तडजोड करू शकेल त्याला वारी सोपी असते. यावर्षी वारी करताना खूप गोष्टी सहज होत गेल्या आणि अधिकाधिक आनंद मिळत गेला. माऊलीची कृपा !


नातेपुते मुक्कामी आल्यानंतर राहण्याची उत्तम सुविधा झाली गेली. गेली चार वर्षे नातेपुते मुक्काम सोय राहुल खोचीकरांचे मामेभाऊ मंगेश दीक्षित यांच्या घरी होते. दीक्षित कुटुंबासारखी प्रत्येक गावात अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांच्या घरी वारकरी मुक्कामाला असतात.काही घरांमधील वारकरी ठरलेले आहेत,गेली अनेक वर्षे त्यांच्याच घरात उतरतात . काही वारकरी एखाद्याच्या घराच्या बाहेर जाऊन, माऊली आजची रात्र येथे काढू का अशी विनंती करतात. बहुतांशी हे वारकरी समाजातील असतात.दारात आलेल्या वारकऱ्याला कोणीही बाजूला जा असं सांगत नाही. अशा अनेक वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी त्यांना त्यांना निवारा देण्यासाठी वारी मार्गावरील गावात भक्तिभाव फुलून वाहत असतो. वारीचा मुक्काम जेव्हा एखाद्या गावात असतो त्या अगोदरचा दिवस आणि तो दिवस ही गावे भक्तिभावाने फुलत असतात. कुणाच्या घरात त्यांना येऊ नका असे म्हटले जात नाही. घराच्या दारात, पार्किंग मध्ये, अंगणात कुठेही जागा मिळेल तिथे वारकरी विसावतात, ती रात्र काढतात आणि पहाटे निघून जातात.  संबंधित जागा मालकाच्या कोणत्याही वस्तूची मोडतोड केली जात नाही अथवा कुठलीही वस्तू कोणी न विचारता हात लावत नाही. वारकरी फक्त बाथरूम पाणी आणि ती जागा वापरतात. जाताना ती जागा स्वच्छ करून जातात. सेवा करण्यात दीक्षित यांच्या कुटुंबासारख्या अनेकांना खूप आनंद वाटतो. वारकऱ्यांच्या सेवेसाठी काही कुटुंबे चहापाणी देतात, काहीजण जेवणाची व्यवस्था करतात .मोकळ्या समाजातील अनेक वारकऱ्यांच्या सेवेसाठी अशी कुटुंबे आहेत म्हणून माऊली सोहळ्यातील दिंड्यांमधील वारकरीपेक्षा अधिक संख्येने असलेल्या मोकळा समाजातील वारकऱ्यांसाठी वारी सुसह्य होत जाते. दीक्षित कुटुंबीयांनी आमचे अतिशय सुंदर व्यवस्था केली. नातेपुते येथे भेटायला अमोल चव्हाण सहकुटुंब आले होते, सोबत आमच्या सौ. आणि लेक देवयानी आली होती. देवयानीने मला भेटल्यानंतर कडकडून मिठी मारली. रात्री जाताना तिला मला सोडवत नव्हते, मला तिला सोडवत नव्हते. खूप वेळ पप्पांच्या  मिठीत सामावली होती ती! तिच्यासाठी नातेपुते यात्रेत छोटीशी खरेदी केली.  छोटीशी खरेदी केल्यानंतरही देवयानीच्या डोळ्यात वाहणारा आनंद खूप मोठा आनंद होता.

नातेपुते गावात अतिशय प्राचीन हेमाडपंती गिरिजात्मक शिव शंकर महादेव मंदिर आहे. हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्तम असा नमुना आहे. या मंदिराविषयी  लिहिता येईल थोडी कमी आहे. उंचावर असलेले अतिविशाल असे हे हे मंदिर सुद्धा शिखर शिंगणापूर प्रमाणे श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या मालकीचे आहे. मंदिराच्या शेजारी बळी मंदिर आहे बळी मंदिराच्या समोरच शनी मंदिर आहे. याबाबत पुढारी ऑनलाईन साठी स्वतंत्र व्हिडिओ तयार केला आहे, आपण अवश्य पहा. हे मंदिर पाहिल्यानंतर आम्ही माळशिरस दिशेने मार्गक्रमण केले. माळशिरसच्या  रस्त्याच्या दुतर्फा हिरवेगार वडाची, पिंपळाची झाडे आहेत, या झाडाखाली वारकरी आराम करतात. ही झाडे म्हणजे अनेक वर्षापासून वारकऱ्यांसाठी निवारा आहेत .नातेपुतेत कराड तहसिलमध्ये  काम केलेल्या रमा जोशी भेटल्या. रमा जोशी आत्ता  ग्रामीण सोलापूर मध्ये तहसिलदार आहेत. त्यांच्याकडे वारीचा चार वर्षाचा अनुभव आहे. प्रशासकीय सेवेतील लोकांना माऊली मुक्कामाच्या ठिकाणी येणे अगोदरचे 10 दिवस फार काम करावे लागते. हे काम हे अधिकारी सेवा म्हणून करतात. महसूल, जिल्हा परिषद ,आरोग्य, वीज कंपनी, पोलीस आदी अनेक खात्यातील लोक  वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी रात्र दिवस झटत असतात. वरिष्ठ अधिकार्‍यांपासून कनिष्ठ कर्मचा-यांपर्यंत सर्वजण झटून काम करतात. माऊलीचे काम करतात .वारकऱ्यांची सेवा म्हणजे आईवडिलांची सेवा म्हणून हे लोक काम करतात. त्यांच्या  मनातील सेवाभाव भरून वाहत असतो.  संबंधित गावात 2 दिवस दोन ते तीन लाख लोक येतात ,त्यांची राहण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अंघोळीच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय विज, पार्किंग आधी सर्व विषयावर  सरपंच आणि ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातून काम होत असते. गेल्या काही वर्षात वारी मार्गावरील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या वतीने वारीसाठी वेगळा निधी दिला जातो. विविध खात्यातील 24 तास झटणाऱ्या या शासकीय कर्मचारी, अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रयत्नामुळे वारी सहज होत जाते हे सुखद सत्य आहे.रमा जोशी यांनी केलेल्या मनोभावे सेवेमुळे त्यांना यावर्षी सदाशिवनगर पुरूंदावडे रिंगण, खडूस रिंगण आणि वाखरी रिंगण तसेच पालखी तळाची विशेष जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्याशी गप्पा मारल्या.

नातेपुते ते माळशिरस दरम्यान सदाशिवनगर येथे होणारे या सोहळ्यातील पहिले गोल रिंगण असते. हे रिंगण पाहण्यासाठी सोहळ्यातील वारकऱ्यांनाबरोबरच स्थानिक भाविक खूप गर्दी करतात. खरेतर रिंगण हा सोहळा फक्त पाच मिनिटाचा असतो मात्र त्याची तयारी फार मोठी असते. पुन्हा ही सर्व जबाबदारी पोलीस खात्यावर येऊन पडते. एकाच ठिकाणी हजारो लोक येणार, त्यांची सोय आणि त्यांची सुरक्षा याचा विचार करून पोलीस खाते संबंधित ग्रामपंचायतीच्या सहकार्याने खूप प्रयत्न करत असते.गेली अनेक वर्षे सदाशिवनगर येथील कारखान्याच्या ग्राउंड वर हे रिंगण होत होते. त्यामुळे सदाशिवनगरचे गोल रिंगण या नावाने ते प्रसिद्ध होते. कारखान्याच्या आसपासच्या इमारती वाढत गेल्या आणि वारकऱ्यांची संख्या ही हजारावरुन लाखावर पोहचली,त्यामुळे कारखान्याची जागा अपुरी पडू लागली. दोन-तीन वर्षांपूर्वी ही जागा बदलून कारखान्यापासून पुढेच पुरंदावडे या गावात गोल रिंगण होते. हे रिंगण पाहण्याचा आनंद आम्ही लुटला.एका अश्वावरती माऊली बसलेले असतात आणि दुसऱ्यावरत शितोळे सरकारचा प्रतिनिधी बसलेला असतो. माऊलींचा घोडा आणि शितोळे सरकार यांचा अश्व गोल धावतात आणि जेव्हा माऊलींचा अश्वाबरोबर सरकारांचा अश्व धावतो तेव्हा  रिंगण पूर्ण होते.  रिंगणानंतर ज्या मार्गावरून अश्व धावला आहे त्याच्या पायाखालची माती कपाळावर लावण्यासाठी वारकरी पुढे येतात, वारकरी एकमेकांच्या पाया पडतात. तत्पूर्वी रिंगण संपल्यानंतर उडीचे खेळ खेळले जातात. हे खेळ पाहण्याचा एक वेगळा आनंद आणि अनुभव असतो. माऊलींची पालखी रिंगण स्थळावर मध्यभागी ठिकाणी ठेवली जाते. या पालखीच्या गोलाकार वारकरी एका रांगेत बसतात आणि सुरु होतो राम कृष्ण हरी नामाचा जप. सोबत ताल मृदुंग यांचा नाद! या वारकऱ्यांच्या मधोमध चोपदार उभे राहून सुचना देतात. चअर्धा तास हा खेळ चालू असतो. उड्या मारण्याचा  खेळ हा झाला याचा साधा सोपा अर्थ !थकलेल्या, दमलेल्या वारकऱ्यांना मनोरंजन होण्याच्या दृष्टीने हे खेळ खेळले जातात. विणेकरी टाळकरी  या खेळात सहभागी होतात. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन जाणाऱ्या माऊली या खेळात गोल धावतात तेव्हा सारेजण माऊली माऊली माऊली माऊली असा जयघोष करतात. वेगळाच आनंद असतो या खेळामध्ये.

पुरंदावडे रिंगण आटपून आम्ही पुढे निघालो.  माळशिरस च्या अलीकडे एका ठिकाणी माझी बहीण दाजी सहकुटुंब आले होते,  माझे वडील दादापण आले होते, त्यांना भेटलो. माळशिरसच्या चौकात कराडच्या तेली गणपती चौकातील कार्यकर्ते वारकऱ्यांना लाडू वाटत होते. आपल्या कराडमधील अनेकजण भेटल्यामुळे खूप आनंद झाला. जगन पुरोहित यांनी कडकडून मिठी मारली. रात्रीचा मुक्काम माळशिरस येथील भाजपचे माजी तालुका अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य पांडुरंग वाघमोडे यांच्या घरी होता.वारीतील आमचे तीन मुक्काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचओळखीच्या काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आहेत.  जेजुरीत संघाच्या संघाच्या एका स्वयंसेवकांच्या  पेशवे यांच्या घरी होतो, पुढे अशाच एका स्वयं संलकावतीने  माळशिरस येथे आमची सोय करण्यात आले होती.माळशिरसच्या अहिल्यादेवी चौकात आल्यानंतर आम्ही वाघमोडे यांना फोन केला.चौकातच त्यांचे छोटेखानी ऑफिस आहे तेथे त्यांना भेटलो. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. वास्तविक वाघमोडे आणि आमची कसलीही ओळख नाही. आमच्या मुक्कामाची व्यवस्था त्यांच्या घरी ज्यानी केली आहे त्यांचीही कसली ओळख नव्हती.काही पत्रकार मित्र तुमच्याकडे मुक्कामी येणार आहेत त्यांची सोय करा, असा त्यांना फोन आला. एका फोनवर कसलीही ओळख नसताना आमची राहण्याची सोय  करण्यासाठी पांडुरंग वाघमोडे तयार झाले होते. कारण यामागे होती भाजप पक्षाची निष्ठा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेटवर्क. या नेटवर्क बाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहीत अनेकानी कौतुक केले आहे,त्यामुळे मी केलेले लिखाण कोणीही राजकीय समजू नये, ही कृतज्ञता व्यक्त आहे.

माळशिरसच्या पुढे दोन किलोमीटर असलेल्या 60 वस्ती चौकात वाघमोडे यांचे घर आहे. या ठिकाणी वाघमोडेंची वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे. 60 वस्ती हे नाव कसे पडले याचा इतिहास त्यांनी सांगितला. ब्रिटिश कालीन बंधाऱ्यातून माळशिरस तालुक्याला पाणी आले आहे .या बंधाऱ्याचे छोटे पोटपाट अनेक गावातून गेले आहेत. 58 नंबरचा पोट पाट माळशिरसया प्रवेशद्वाराला गावातून जातो. 59 नंबर चा पंटपाट सध्या जिथे माऊली पालखीतळ आहे तिथून जातो. 60 नंबरचा पोटपाट माळशिरसपासून दोन किलोमीटर वाघमोडे वस्ती इथून जातो. या साठ नंबरच्या पोट पाटामुळे या चौकाला अहिल्यादेवी 60 वस्ती चौक असे नाव पडले आहे. पांडुरंग वाघमोडे यांच्या सोबत एक पत्रकार या नात्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाबाबत चर्चा केलीच त्यांनीही आमच्याकडून सातारा जिल्ह्यात राजकारणाची माहिती घेतली. यांच्या कुटुंबीयांनी आमचे राहण्याची चांगली सोय केली.खुप दिवसानंतर त्यांच्या घरी शेवग्याची शेंग आणि आणि बाजरी भाकरी कुस्करून खाल्ली. 
एकंदरीत आजचा दिवस खुप छान गेला. माऊली माऊली



 
राम कृष्ण हरी !
😌 जय माऊली 😌
माऊली सतीश मोरे

Also available at

०५ जुलै २०१९

🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

*सतीश मोरे*

karawadikarad.blogspot.com

  *फलटण,बरड*

  *०४/०७/२०१९*
*०५/०७/२०१९*

राम कृष्ण हरी,

फलटण ते नातेपुते (शिंगणापूर फाटा) हा 30 किलोमीटरचा प्रवास एकाच दिवशी म्हणजे काल गुरूवारी माऊलीच्या जयघोषात पालखीच्या पुढे जाऊन आम्ही पूर्ण केला होता. आमच्या एका सहकार्याला घरगुती कामासाठी कराडला जावे लागणार असल्यामुळे
दोन मुक्कामाचे अंतर एकाच दिवशी चालायचे असे ठरवून आम्ही काल दिवसभर सकाळी दहा ते रात्री नऊ तीस किलोमीटर प्रवास पूर्ण केला. माऊलींचे नाम घेताना हा प्रवास कसा पार पडला हे आम्हाला समजलेच नाही मात्र रात्री थोडा त्रास झाला.



फलटणच्या विश्रामगृहावर रात्री उशीरा रात्री उशिरा पोहोचलो पुढारीचे फलटण तालुका प्रतिनिधी हरीश पाटणे यांचा शिलेदार यशवंत खलाटे यांनी आम्हा सर्व वारकऱ्यांचा खूप चांगला पाहुणचार केला. एक वेगळा व्यक्ती एक चांगला माणूस आम्हाला भेटल्याचा आनंद झाला. फलटणमधील पत्रकार खरे तर  वारकऱ्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा करतात. यशवंत खलाटे आणि त्याच्या सर्व सहकार्याने माझा मोठा भाऊ म्हणून केलेल्या आदरातिथ्य आणि दिलेला सन्मान खरच लक्षात राहील. रात्री उशिरा विश्रामग्रहावर पोहोचल्यानंतर पाय खूप दुखत असल्यामुळे आणि शरीराने साथ न दिल्यामुळे कालच काहीच लिहू शकलो नाही. मात्र माऊलीचे नाम आणि माऊलींचा आशीर्वाद सोबत असल्यामुळे एवढे विशेष त्रास जाणवले नाही.

काल रात्री वारीमध्ये चालत असताना फार मोठी प्रश्न उद्भवला. ही समस्या किंवा अडचण वैयक्तिक स्वरूपाची असल्यामुळे मी सांगू इच्छित नाही. मात्र  न केलेल्या चुकीचा  त्रास झाला. सुरुवातीपासूनच माझा सकारात्मक विचारांवर आणि कर्मावर विश्वास आहे. Success through Positive Mental Attitude या पुस्तकाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे .1996 सालु हे पुस्तक मी वाचले होते. मुळ इंग्रजी पुस्तकाच्या मी मराठीमध्ये नोट्स काढल्या होत्या. चुकीचे काही केले नसेल तर आपल्याला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही, आपली दिशा योग्य असेल तर कधीही अपयश येत नाही. आसा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे हा त्रास झाल्यानंतर काही क्षण वाईट वाटले. मात्र त्याच क्षणी पंढरपूरच्या दिशेने तोंड करून *विठ्ठला* असा मोठ्या आवाजात टाहो फोडला. काही अंतर या विचारातच आणि विठ्ठल नाम घेत चालत राहिलो.

विठ्ठल नामाचा महिमा काय असतो आणि सत्याच्या बाजूने कायम परमेश्वर उभा असतो, याचा प्रत्यय मला फक्त पाचच मिनिटात आला. पाच मिनिटानंतर महामाऊलींचा मला फोन आला आणि त्यांनी माझी सर्व बाजू उचलून धरली आणि तुम्ही असेच पुढे काम करत राहा. तुमची कोणतीही चूक नाही,काम करत रहा मी तुझ्या पाठीशी आहे, असा आशीर्वाद दिला आणि माझे डोके हलके झाले.


विठ्ठलाने फक्त पाच मिनिटात सकारात्मक विचाराचा, सत्कृत्याचा, सत्कर्माचा रिझल्ट दाखवला होता, मी खूप आनंदी झालो. पंढरीच्या वारीत असे अनेक सुखद प्रसंग ऐकायला, पाहायला, अनुभवायला मिळतात त्यातून मी कसा अपवाद असेन !

राम कृष्ण हरी

आज शुक्रवार सकाळी पुढे फार काही चालवायचे नसल्यामुळे आम्ही सर्व सहकारी उशिरा उठलो. आमच्या सहकार्याचे  कराडला जाणे रद्द झाले होते. आम्ही तशी विठ्ठलाकडे विनवणी केली होती.  दिवसभर काय करायचं शेवटी शिंगणापूरला जायचा निर्णय घेतला. गाडी तयार होऊन बसलो तेवढ्यात विश्रामगृहावर पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे माऊली यांची भेट झाली. 1990 पासून भिसे माऊली पंढरीची वारी करत आहेत. अनेक खस्ता खात, सर्व परिस्थितीवर मात करत यांनी आजपर्यंत पंढरीची वारी कव्हर केली आहे. वारी जगापर्यंत पोचवण्यासाठी मिडीयाचे फार मोठे योगदान आहे असे भिसे माऊली यांनी माझ्याशी बोलताना सांगितले. बदलती वारी, वारीमधील बदलती पत्रकारिता याविषयी आम्ही बराच वेळ चर्चा केली. त्यानंतर आम्ही सर्वजण शिंगणापूरला जायला निघालो.

माऊलींचा मुक्काम आज बरडला होता. बरड पासून शिंगणापूर हे अंतर पंधरा किलोमीटर आहे त्यामुळे वारकऱ्यांचा ओढा  शिगणापूर कडे खूप होता शिंगणापूर गावात जिकडेतिकडे वारकरी दिसत होते.विदर्भ मराठवाडामधील वारकरी शिंगणापूरला फार गर्दी करतात .शिंगणापूर हा आमचा कुलस्वामी, तेथे गेल्यानंतर आमचे परंपरागत बडवे संतोष बडवे यांना भेटलो. रणजित पाटील यांनी मोहन बडवेंना फोन करून बोलावून घेतले.खूप गर्दी असूनही व्यवस्थित दर्शन घेतले, शिंगणापूर ची सर्व माहिती घेतली,व्हिडिओ तयार केला आणि परतीच्या प्रवासाला बरडकडे निघालो.
*See Pudhari online link*



बरडला जाण्यासाठी जवळचा रस्ता पकडला. या रस्त्यावर सगळीकडे भकास भकास होते. जावळीमध्ये जनावरांची छावणी दिसली, छावणीमध्ये जनावरांची संख्या कमी असली तरी या भागात अजिबात पाऊस झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची ओढ लागली होती आणि मशागती करताना शेतकरी दिसले.

जुलै महिना आला तरी पावसाचा पत्ता नाही. माण खटाव फलटण तालुक्यात भीषण परिस्थिती आहे हे वास्तव आजच्या प्रवासात पाहायला मिळाले. एका गावातून जात असताना रस्त्याच्या कडेला प्रत्येक ठिकाणी प्लॅस्टिकचे बॅरेल कळशी हंडे ठेवलेले दिसले .जरा पुढे गेलो तर एका ठिकाणी टँकर मधील पाणी या बॅरलमध्ये भरले जात होते. ग्रामस्थांची भेट घेतली. हे पाणी पाहून धक्का बसला. टँकरमधून गावागावात अस्वच्छ, दुषीत पाणी पोहचवले जात होते, हे या भागातील लोकांना समजत नव्हते असे नाही. पण पाण्यासाठी टाहो करणाऱ्या या नागरिकांना , ग्रामस्थांना मिळेल ते पदरात पडले असे समजून ते पाणी स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता.

कराड साताराचे लोक पाण्याचा किती अपव्यव करतात, शुद्ध पाणी गाड्या धुण्यासाठी, शौचालयासाठी वापरतात. सकाळचा भरलेले पाणी शिळं झालं म्हणून संध्याकाळी ओतून टाकतात,अशी स्थिती जिल्ह्याच्या एका टोकाला असताना दुसऱ्या टोकावर माण फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण करावे लागत आह,पाण्याच्या टँकरची वाट पाहावी लागते हे विदारक चित्र पाहून खूप वाईट वाटले.

टॅंकर मालकाने पुढारी ऑनलाईन बुम पाहून थोडेसे त-त-प-प केलं. आम्ही आठ टॅंकर फलटण नगरपालिकेत भरून आणतो असे त्यांनी सांगितले .मात्र फलटणमध्ये असेच पाणी दिले जात असेल याचा विचार केला नक्की दिले जात नसेल .म्हणजेच टँकर मालक खोटे बोलत आहेत, अस्वच्छ पाणी भरून ग्रामस्थांना वाटत आहेत, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही हे जाणवले.

साडेचार वाजता बरडला पालखी तळावर पोहोचलो. बारा नंबर दिंडी मध्ये जाऊन वारकरी सहकार्याने गप्पा मारल्या.थोडा वेळ ट्रकमध्ये बसून आराम केला. या पालखी तळा शेजारीच एक दर्गाह आहे या दर्ग्याच्या परिसरात मुस्लिम समाजाचे कब्रस्तान आहे. याच परिसरात अनेक वारकऱ्यांनी आपले तंबू उभारले होते.अनेक वारकर्याने त्या दर्गा च्या समोरील शेडमध्ये आपले अंथरून टाकून जागा धरली होती. ही मुस्लिम समाजाची जागा आहे,येथे कसे झोपावे झोपावे असे त्यांना काहीच वाटले नव्हते. या लोकांची भेट घेऊन त्यांची प्रतिक्रिया घेतली. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितले आहे,जगातील सर्वांच्या कल्याणाची काळजी घेतली आहे, सर्वधर्मसमभाव हा वारकरी संप्रदायाचा मूळ पाया आहे,असे त्यांनी बोलून दाखवले.या लोकांची मुलाखत घेऊन पुढे गेलो.
*See Pudhari online link*

माऊली पालखी सोहळा अतिशय महत्वाचा क्षण म्हणजे समाज आरती सोहळा. सोहळ्याचे मालक हरफळकर यांच्या मालकीच्या ट्रक वर उभा राहून हा सोहळा पहिला, फोटो काढले. व्हिडिओ तयार केले बातमी पाठवली. त्यानंतर ट्रकच्या केबिन वर बसून तेथे उपस्थित वारकऱ्यांची गप्पा मारल्या.
*See Pudhari online link*

 तिकडे बारा नंबर दिंडीमध्ये साडेसात वाजेपर्यंत स्वयंपाक तयार झाला होता. लायन्स क्लबचे माझे सहकारी विराज जांभळे मला भेटायला तेथे आले होते, त्यांच्यासोबतच जेवण घेतले.

रात्री उशिरा नातेपुते मुक्कामी पोहोचलो. नातेपुते हे माझे मित्र राहून खोचीकर यांचे आजोळ. गेली तीन वर्षे खोचीकर यांच्या आजोळी आम्ही वारकरी उतरतो रात्री उशिरा त्यांचे मामेभाऊ मंगेश यांच्या सोबत गप्पा मारत बसलो.

एकंदरीत आजचा दिवस खुप छान मात्र इमोशनल गेला.

माऊली माऊली !




माऊली माऊली !

Also available at

👇karawadikarad.blogspot.com



🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩


०४ जुलै २०१९

🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

*सतीश मोरे*

karawadikarad.blogspot.com

  *वाल्हे*
  *०३/०७/२०१९*

राम कृष्ण हरी,

तरडगाव चांदोबा लिंब

लोणंदचा दीड दिवसाचा मुक्काम आटोपून माऊली तरडगाव मुक्कामाला निघाले. तरडगाव ते लोणंद अंतर फक्त नऊ किलोमीटर आहे, त्यामुळे दुपारी साडेबाराच्या सुमारास माऊलीची पालखी तरडगावकडे निघाली. सातारा जिल्ह्यात लोणंदमध्ये पालखी दीड दिवस थांबत असल्यामुळे  काल सायंकाळपासूनच माऊलींच्या दर्शनासाठी लोणंद मध्ये माऊली भक्तांचा महापूर उसळला होता.  लोणंद ते तरडगाव हे अंतर खूप कमी असल्यामुळे माऊलींच्या पालखीसोबत चालणाऱ्या सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील भक्तांची संख्या येथे वाढते, माऊलींच्या पालखीसोबत हे वारकरी चालतात.



लोणंदला भाविक जास्त  येण्याचे का आणखी एक कारण आहे. लोणंदमध्ये पालखी दुपारी निघते आणि त्यानंतर पाच किलोमीटर अंतरावर चांदोबाचा लिंब येथे भरणारे  पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण ! चांदोबाचा लिंब येथे होणारे पहिले रिंगण हे पाहण्यासारखे असते. रिंगण पाहून पुढे तीन किलोमीटर अंतरावर माऊलींच्या पालखीतळावर जाऊन समाज आरतीचा पाहण्याचा आनंद लुटायचा हेही एक लोणंद ते तरडगाव चालणे मागचे खास कारण असते.


दुपारी साडेबाराच्या दरम्यान माऊलींचा सोहळा लोणंद मधून निघाला, माऊलींना वेशीपर्यंत सोडण्यासाठी लोणंदकर आले होते .कापडगाव पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकरी भक्तांचा जणू मेळावा भरला होता.जिकडे पाहावे तिकडे फक्त वारकरी दिसत होते, वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी रस्त्यावर येत होते.

इकडे चांदोबाचा लिंब येथे रिंगण पाहण्यासाठी पुढे येऊन अनेक भाविकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. चांदोबाचा लिंब हे मंदिर बरोबर रस्त्याच्या एका बाजूला मात्र रस्त्यातच आहे. लोणंद फलटण हा मार्ग चौपदरी करण्यात आला आहे . रुंदीकरणात हे मंदिर जाऊ शकते. मात्र श्रद्धेचा व भावनेचा भाग तसेच न्यायालयीन बाब असल्यामुळे हे मंदिर अजूनही रस्त्यातून हटवण्यात आले नाही. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होणार हे लक्षात घेऊन सातारा पोलिसांनी योग्य नियोजन करणे गरजेचे होते.माऊलींची पालखी लिंब येथे पोहोचणे अगोदरच येथे हजारो भाविक माऊलींची वाट पाहत होते. चारच्या सुमारास माऊलींची पालखी रिंगणाच्या ठिकाणी आली



सातारा पोलिसांच्या बेफिकीरपणा आणि स्थानिक युवा कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी यामुळे पालखी चांदोबाचा लिंब येथे आल्यानंतर ढकलाढकली सुरू झाली. वास्तविक या ठिकाणी किती लोक उभे राहू शकतात याची काळजी व माहिती पोलिसांनी घ्यायला हवी होती. मात्र ती न घेतल्यामुळे दिंडी सोबत आलेले वारकरी ,स्थानिक ग्रामस्थ आणि अगोदरच येऊन बसलेले वारकरी यांची एकच गर्दी रिंगणाच्या परिसरात झाली. माऊलींच्या अश्वाला धावत येण्यासाठी तीन फुटाचा रुंदीचा रस्ता करणे गरजेचे असते,हा करण्यासाठी  रथाच्या शेजारी असणाऱ्या जागेत लोकांना मागे ढकलल्यास सुरवात केली. मात्र या लोकांना माझ्या सरकायला जागाच नव्हती, त्यामुळे अनेकजण रेलिंगला धडकले, रेलिंगच्या पाठीमागेच पोलिसांची व्हॅन उभी होती या व्हॅनवर स्वतः पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उभ्या होत्या. त्या उघड्या डोळ्यांनी हा प्रकार पाहत होत्या. मात्र काही करू शकत नव्हत्या. त्यांनी नेमलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोबाजी दाखवण्याच्या नादामध्ये वारकऱ्यांना आणि भाविकांना ढककले. यातून पत्रकार सुद्धा सुटू शकले नाहीत. काहींचे मोबाईल, कँमेरे खाली पडले,काहीजण खाली पडले. थोडी चेंगराचेंगरी झाली. पाच मिनिटात रिंगणाला सुरूवात झाली. माउलींच्या अश्वाच्या पाठीमागे दुसरा घोडेस्वार धावत आला. माऊली माऊली माऊली चा जयघोष झाला आणि पाच मिनिटात रिंगण संपले, माऊलींची पालखी पुढे निघाली.

सातारा पोलिसांचा नियोजन किती ढिसाळ होते याचा प्रत्यय रिंगण झाल्यानंतर आला. रिंगण स्थळावर वाहतूक ठप्प झाली होती. रिंगण संपल्यानंतर माऊली पुढे गेल्यावर ही वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा होती. मात्र चांदोबाचा लिंब ते तरडगाव तीन किलोमीटरचे अंतर पाया पडायला अनेकांना अडीच तासाचा कालावधी गेला. वाहतूक खूप ठप्प झाली होती. चौपदरी रस्ता असूनही एवढा वेळ वाहतूक ठप्प झाली याचे आश्चर्य वाटले.( *वाल्हे घाटातला अरुंद रस्ता, दिवेघाटात भर पावसात अरुंद रस्त्यावरून झालेली वाहतूक एवढे असूनही पुणे जिल्हा पोलिसांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे वाहतूक विस्कळीत झाली नव्हती*)


एका बाजूला वारकरी पुढे चालत होते  दुसर्‍या बाजूला मुंगीच्या पावलाने चार चाकी वाहतूक सुरू होती रिंगणाच्या ठिकाणी व्यवस्थित बंदोबस्त लावायला सातारा पोलीस कमी पडले हे यातून सिद्ध झाले.

दरम्यान चांदोबाचा लिंब येथे रिंगण झाल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली आणि त्यांच्या कानावर हा सर्व प्रकार घातला. सातपूते मॅडम यांचे पहिली ओळख फोनवरून झाली होती. कराड कोल्हापुर नाका येथे वाहतुकीची होत असलेली कोंडी आणि आणि कराड पोलीसांचे दुर्लक्ष याबाबत याबाबत पुढारी सह अनेक दैनिके छापलेल्या बातम्याची माहिती सातपूते मॅडमना गेल्या महिन्यात मोबाईल वरून दिली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मॅडमनी एडिशनल एसपीना कराडला पाठवले होते आणि हा प्रश्न निकाली काढला होता,याबाबत मॅडम ना धन्यवाद दिले.


रिंगण पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीच्या कोंडीतून बाहेर पडत फलटणला मुक्कामी जाण्याचा निर्णय घेतला. लोणंद ते तरडगाव ते निंबोरे हे अंतर काल रात्री आम्ही चालून पूर्ण केले होते. गाडीने निंभोरे येथे आलो. आठ वाजता फलटण च्या दिशेने चालायला सुरुवात केली. यादरम्यान आमदार बाळासाहेब पाटील यांचा फोन आला. तरडगाव येथे माऊलींचे दर्शन घेऊन आणि आ. दीपक चव्हाण यांच्यासोबत भोजन आटोपून आमदार बाळासाहेब पाटील कराडला निघाले होते. आम्ही चालत आहोत हे समजल्यानंतर त्यांनी आमचे लोकेशन्स विचारले आणि त्याठिकाणी आम्हाला भेटावयास आले. आमच्या प्रकृतीची चौकशी केली. आ बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज पाटील हे सुद्धा गेल्या चार वर्षापासून पंढरीची वारी पायी करतात. आमच्या समोरच त्यांनी जशराज यांना फोन लावला, खुशाली विचारली. थोड्या थोड्या गप्पा मारल्या आणि आम्हाला पुढील प्रवासाच्या शुभेच्छा देत ते निघून गेले.


रात्री साडेआठ ते 10.30 वाजेपर्यंत केवळ दोन थांबे घेत फलटणला पोचलो, माझे जवळचे मित्र डॉ. प्रसन्ना पतंगे यांचे फलटण हे मूळ गाव. दुपारी त्यांनी सहज मेसेज पाठवला होता ,'मी उद्या फलटणला येत आहे आमच्या गावी आमच्या घरी या.'  यावरआजच तुमच्या घरी येत आहे असे मी कळवले होते. डॉक्टर पतंगे यांनी आपल्या घरी आईला फोन करून आमच्या भोजनाची तयारी करण्याचे कळवले होते. साडेदहा वाजता डॉक्टर पतंगे यांची आई घराबाहेर रस्त्यावरच  उभे राहून आमची वाटच पाहत बसल्या होत्या. माऊलींनी आग्रहाने जेवणास घातले. डॉक्टर पतंगे यांचे बंधू जितेंद्र पतंगे हे संगीतकार आणि गायक आहेत. कराडच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये बीई झाले आहेत. जितेंद्र पतंगे यांच्या स्टुडिओ मध्ये बसून संगीत या विषयावर चर्चा करताना अमिताभ बच्चन यांच्या गाण्यावर चर्चा झाली. जितेंद्र पतंगे यांनी कंपोस्ट केलेली गाणी पाहिली आणि ऐकली. खूप आनंद झाला. रात्री उशिरा 12 वाजता फलटण विश्रामगृहावर मुक्कामाला पोहोचलो. फलटण विश्रामगृहाची अवस्था आणि दुरावस्था याच्यावर वेगळे भरपूर लिहावे लागेल.असो.रात्र घालवण्यासाठी येथे जागा मिळाली हेही नसे थोडके!

एकंदरीत आजचा दिवस खूप आनंदाचा गेला. एक वाजता ब्लॉग लिहून सर्वांना पाठवले आणि झोपी गेलो.

माऊली माऊली !

Also available at

👇karawadikarad.blogspot.com




🚩🚩🚩माझी वारी  🚩🚩🚩

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...