फॉलोअर

३१ मार्च २०१६

तु तिथं मी, तु आणि मी

ज्याचे लग्न झाले नाही त्याला लग्न कधी होणार याची काळजी, उत्सुकता लागलेली असते, तर लग्न झालेले कशाला यात पडलो, लग्न झाले नव्हते तेव्हा सुखी होतो असा विचार करतात.


खरं तर लग्न हे हवंहवंस बंधन असते. एक क्षण भाळण्याचा, बाकीचे क्षण सांभाळण्यासाठी असतात. एकमेकांची मने राखणे म्हणजे प्रेम, ही प्रेमाची खुप वेगळी आणि वस्तुनिष्ठ व्याख्या मला जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये ऐकायला मिळाली.
सदगुरू वामनराव पै यांनी स्त्री हा कुटुंबातील महत्वाचा कणा असून नवरा बायकोनी घर घर टाकून एकमेकांच्या मनात घर करणे म्हणजे संसार, हा दिव्य विचार दिला आहे. पती आणि पत्नी हे जगातील सर्वात पवित्र असे नाते आहे.
दोघे परस्पर पुरक आहेत, दोघेही एकमेकांसाठी  बनलेले आहेत .
संसार सुखाचा करायचा असेल तर दोघांनीही बदललं पाहिजे.असं म्हणतात,
If you want to change the world, start from yourselves.
पतीला पत्नीकडून खुप अपेक्षा असतात .पत्नीलाही पतीकडून भल्या मोठ्या  अपेक्षा असतात. दोघेही बरोबर आहेत. पण यासाठी दोघांनीही बदलले पाहिजे.
Everybody is number 1 @ his own place,
But he should know his place.

संसाराचे प्रश्न विचारायला, अडचणी सोडवायला लोक
संसार न केलेल्या किंवा संसार सोडून पळून आलेल्या
संन्यास्याकडे जातात, हा एक विनोद आहे.
सदगुरू आणि माई यांनी अतिशय सुंदर असा संसार केला. स्वःत शिकत राहीले,
शिकवत राहीले,  मुलांना उच्च शिक्षण दिले, स्वःत सुखी संसार केला, लाखो लोकांचा संसार फुलवला, त्यामुळेच सदगुरू हे आत्मविश्वासाने हे सगळे सांगू शकतात.

संसारातील आपल्या समस्या आपणच निर्माण केलेल्या असतात त्यामुळे आपणच 
त्या सोडवू शकतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 
संसारात प्राधान्य कशाला द्यायचे हे ठरवायला हवे. समाधान हे फार मोठे धन आहे. 
जगायला पैसे फार कमी लागतात, मजा करायला जास्त लागतात .
कठीण प्रसंगात, एखाद्या विषयावर वादविवाद करून कटुता निर्माण होत असेल तर माघार घ्यायला हवी.
माघार घेण्यात कमीपणा नसतो,
एखाद्याला कमीपणा करण्यात, कमी लेखण्यात दुःख असते.

अपेक्षा, उपेक्षा आणि आग्रह ही अहंकाराची रूपे आहेत.
आपण इतराबद्दल अपेक्षा करतो,
इतरांना सुद्धा आपल्या कडून तशाच अपेक्षा असतात, याचा सहज विसर पडतो.
Attitude of gratitude हवा. नवर्‍याला जसे वाटते मी घरी आल्यावर बायकोने पाणी आणून दिले पाहिजे तसे नोकरी करून आलेल्या, मंडईमधून दोन हातात पिशव्या घेऊन आलेल्या बायकोला पण वाटत असेल ना !

एक अतिशय सुंदर उखाणा ऐकला
मी या कौटुंबिक सौख्य कोर्स मध्ये

           विद्याचा आणि माझा संसार होईल सुंदर
           जेव्हा मी चिरेन भाजी अन् ती लावेल कुकर!

जर तुम्हाला आपल्या बायकोमध्ये, नवर्‍यात जे चांगले गुण आहेत ,
ते लिहून काढायला सांगितले तर एक चिटोरी कागद पण पुरेल.
याउलट तिच्यातील- त्याच्यातील अवगुण लिहायचे तर वही पुरणार नाही !

आपण पार्टनरचे गुण पहा, स्वःतचे अवगुण शोधा .
पार्टनरच्या गुणाचे कौतुक करा, स्वःतमधील अवगुण हळूहळू कमी करा.


पती पत्नीनी एखादा विषय किती ताणावा याला मर्यादा असावी.
दुराव्याला expiry date असावी.डोक्यावर बर्फ, तोंडात बर्फी हे सुत्र हवे.
शब्दाने शब्द वाढतो,बोलण्याने समस्या वाढतात,बोलण्यानेच संपतात.
काही वेळा गप्प बसणे महत्वाचे, त्यामुळेही प्रश्न सुटतात .
रागात धार असते ती नाती कापते. प्रेमात आधार असतो, तो नाती जोडतो.
जीभेने केलेली जखम कधी बरी होत नाही, झाली तरी व्रण राहतो.
म्हणून पती पत्नीनी एकमेकांशी बोलताना, वागताना शब्द जपून वापरावेत. 


  नात्यांमधे विश्वास हवा !
आपल्या जोडीदाराबाबत,  कोणत्याही नात्याबाबत
काहीही बरेवाईट  ऐकायला मिळाले की ....

SOCRETIS चा हा RULE  पहावा , आचरणात आणावा.

समोरच्याला विचारा,
तुम्ही जे मला जे सागणार आहे ते तुम्ही स्वःत ऐकले आहे का?
जे मला सांगणार आहे ते चांगले आहे का ?
यात माझे काय हित आहे का ?
या प्रश्नाची उत्तरे नाही अशीच मिळणार आहेत,
मग कशाला नात्यात अविश्वास, दुरावा, संशय निर्माण होईल , होय ना?

तु तिथं मी,
तु आणि मी
तुझं माझं नाही
आपल्या दोघांचं
आपल्या सगळ्यांचं
घरटं विश्वासाचं

नाती जपत, प्रेम वाढवंत
सर्वाना आनंद देत
आम्ही फुलवणार
घर आणि संसार
जय सदगुरू, जय जीवनविद्या!



             (उत्तरार्ध)

३० मार्च २०१६

सासु सुनेचे सुख


परवा म्हणजे रविवारी 27 मार्च रोजी विश्वसंत सदगुरू वामनराव पै यांनी निर्माण केलेल्या कर्जत येथील जीवनविद्या ज्ञानपीठामध्ये दुसर्‍यादा जाण्याचा योग आला. दोन महिन्यांपुर्वी बेसिक कोर्स केला. परवा कौटुंबिक सौख्य हा कोर्स पत्नी सोबत केला. खुप छान ठिकाण आहे हे.

ज्ञान , ज्ञान आणि केवळ ज्ञानच हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ही संस्था साठ वर्षे झटत आहे. अंधश्रद्धेवर प्रहार करून तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे सतत हॅमरिंग करत ही संस्था लोकांना शहाणे करत आहे. तुम्ही ज्ञानी व्हा,  हुशार व्हा, बुद्धीमान व्हा, असे सांगून केवळ तत्वज्ञान नव्हे तर जीवनविद्या शिकवणारे सदगुरू हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या विचारवंतापैकी एक आहेत.


अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी हे ज्ञानपीठ आहे. मला मठ निर्माण करायचा नाही, मठात अहंकार वाढून सारेच मठ्ठ होतात,  असे सदगुरू म्हणायचे. त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार हे ज्ञानपीठ उभे राहिले आहे. एक वेळ तरी भेट दिली पाहिजे असे हे ज्ञानपीठ आहे.

स्त्री आणि पुरूष  एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, रथाची दोन चाके आहेत, ऐवढेच नव्हे तर स्त्रीयांना फक्त समानता नव्हे सन्मानाची वागणुक द्या. ज्या घरात स्रीयांचा छळ होतो तेथे दुःख, दैन्य वास करते, असा दिव्य संदेश सदगुरूनी दिला आहे. कौटुंबिक सौख्य हा कोर्स करताना मला पुन्हा एकदा सदगुरूच्या सहवासाची जाणीव झाली.

अस्मिता सामंत, अनघा देशपांडे आणि चंद्रकांत निंबाळकर यांनी कुटुंबाचे कल्याण कशात हे सौदाहर्णासहीत उपस्थिताच्या मनात, ह्दयात उतरवले. माझ्या  ज्ञानात भर पडली.

कुटुंब म्हणजे फक्त नवरा बायको आणि मुलं नव्हे तर सासू सासरे, नणंद, भावजय, दिर सारे आहेत.  कुटुंब सुखी व्हायचे असेल तर या सर्व नात्यांमधे संवाद हवा,  गोडवा हवा, एकमेकांना समजून घ्यायला हवे, हा दिव्य विचार मी अनेकदा ऐकला आहे.  रविवारी हाच विचार वेगळ्याच अॅगलने ऐकला,भावला,  नवं खुप  काही कानावर पडलं.  एक दोन नव्हे सात तास न कंटाळता बसण्याची उर्जा येथे मिळाली.

इतरांना समजून घेण्याची कला Art of understanding other people नावाचा एक सुंदर धडा मी बारावीत शिकलो होतो. त्यामधील  एक सुंदर वाक्य मला आठवते.
 
तुम्ही इतरांविषयी कोणत्याही प्रकारची
वाईट प्रतिक्रिया व्यक्त करताना थोडं थांबा
आणि हा विचार करा की
मी त्याच्या जागी असतो तर काय केले असते.

सासू सून या नात्यात गोडवा का नसतो, याचे उत्तर वरिल वाक्यात आहे. कोर्स मध्ये मला हेच ऐकायला मिळाल.  सासु सुनेविषयी किंवा सुनेने सासू विषयी बोलताना, वागताना याचा विचार करायला हवा. सास भी कभी बहू थी या नावाची एक सिरीयल होती, बहू कभी तो सास होनेवाली है या नावाची सिरियल सुरू केली पाहिजे.

सासुबाई तिला झालेल्या त्रास, छळ याचा बदला घेण्यासाठी सुनेला पहिल्या दिवसापासून कात्रीत पकडते, टोचून बोलते,  मुलाचे कान भरते, पुढे जाऊन आणखी बरेच काही करते.
दुसरीकडे सासू नेहमी वाईटच असते, असे माहेरहून ( आईकडून ) शिकून आलेली सुन पहिल्यापासून  माझा पती म्हणजे माझा संसार , बाकी नाती नगण्य ऐवढेच डोक्यात ठेवून वाटचाल सुरू करते. तिला सासू व्हिलन वाटते. अशा परिस्थितीत कोण कोणाला समजून घेत नाही आणि सारे कुटुंब दुःखी होते.


सासू सुनेच्या नात्यात गोडवा येण्यासाठी जीवनविद्येचे ज्ञान आवश्यक आहे.
सदगुरू माऊलींचा मला एक विचार खुप खुप भावला.

सुनेच्या सुखातच मुलाचे सुख दडले आहे
                   आणि
सासुच्या सुखातच नवर्‍याचे सुख लपलेले आहे.

प्रत्येक सासुने, सुनेने हा विचार मनावर सतत बिंबवला तर काही समस्या उद्भवणार नाहीत.

सासुने सुनेची काळजी घ्यायलाच हवी. सुन म्हणून आलेली ती वीस बाबीस वर्षाची मुलगी आई वडील ही सर्व नाती सोडून फक्त माझ्या मुलासाठी आली आहे, तिला आनंद दिला, सुखी ठेवले तर तर आपलाच मुलगा सुखी होईल, हे प्रत्येक सासूआईने ध्यानात ठेवले पाहिजे.

दुसरीकडे सुनेने सासुमध्ये आई पहायला पाहिजे. आपला देखणा, कतृत्ववान नवरा आपल्या सासुमुळेच मिळाला आहे. तो काय  आभाळातून पडलेला नाही.  त्याच्या आईने पण त्याला पंचवीस वर्षे लहानाचा मोठ्ठा केला आहे. नवर्‍याचे आईवर प्रेम आहे, असतेच. त्याची आई म्हणजे आपली सासू सुखी तर आपला नवरा सुखी हे प्रत्येक सुनेने ध्यानात ठेवले पाहिजे.  

सासु सुनेने एकमेकींना समजून घेण्यातच दोघींचे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे सुख समाधान सामावले आहे.

                                                                   (  पुर्वार्ध )
                                       ...........सतीश मोरे

२९ मार्च २०१६

पत्रकारांबद्दल खडे फोडणारांना पत्र


आज ब्लॉग पोस्ट forwarded आहे.



        कुणी लिहिले आहे माहीत नाही,
       पण पत्रकाराच्या मनातलं आहे.
       हे विचार माझे नाहीत पण
       माझ्या सारख्या फिल्ड वर काम करणाऱ्या
       बातमीदारांचे,वार्ताहर,फोटोग्राफर, स्ट्रीजर ,
       संपादक, कार्यकारी संपादक ,न्युज ब्युरो चिफ,
       मेडीया मित्रांची खदखद आहे.


      पत्रकारांबद्दल हजारो शंका, कुत्सीक प्रतिक्रिया
      घेऊन जगणार्‍या तथाकथित मंडळींना एक खुले पत्र....

महोदय,

पत्रकार, म्हटले की अंगावर झुरळ पडल्यागत
कपडे झटकणार्‍यांची जमात आपली.
‘पत्रकार म्हणजे साले एकजात सारे सारखेच’,
‘त्याने निवडणूकीत गब्बर पैसा कमावला असणार’,
’पत्रकार नसते तर फार बरे झाले असते’,
‘किती फीडबॅक घेतात हे पत्रकार? यांना फक्त पैसा पाहिजे’
अशा कितीतरी प्रतिक्रिया पत्रकार म्हटल्यावर उमटतात.

चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि पुण्यापासून ठाण्यापर्यंत या सार्‍या प्रतिक्रिया सारख्याच. मात्र खरेच पत्रकार असा आहे का? पत्रकार किंवा आजची माध्यमं नसती तर खरेच आपले जीवन आजच्यापेक्षा अधिक सुसह्य झाले असते का? 

जरा शांतपणे आपल्या मनाला हा प्रश्‍न विचारून बघा, जरा आपली आतली गाठ सैल करून पत्रकारांकडे बघा. आपण त्याच्या तोंडावर त्याला ‘या प्रतापराव’ असे म्हणता आणि त्याच्यामागे त्यालाच शिव्या हसडतात, तेव्हा त्याला त्या कळत नाही असे वाटते का तुम्हाला? 

अरे ज्याचा प्रांतच इन्व्हेस्टिगेशनचा आहे, त्याच्याबद्दल तुमच्या मनात काय आकस आहे हे त्याला कळणार नाही का? तरीही तो शांत असतो. तुमच्याबरोबरची लाख दुष्मनी असू देत तरीही वर्तमानपत्रात तुमच्याबद्दल कौतूकाचे शब्द लिहितांना त्याचा हात कचरत नाही. सांगा मग मनाचा मोठेपणा तुम्ही दाखवता का तो?

तुमच्या एका प्रतिक्रियेसाठी तो तुम्हाला १० वेळा फोन करतो हा त्याचा गुन्हा आहे का? आणि या बदल्यात काय देता तुम्ही त्याला पाच-दहा हजारांची एक जाहिरात? त्या जाहिरातीपोटी मिळणार्‍या हजार रुपड्यांच्या कमिशनसाठी तो तुमच्याशी संबंध ठेवतोय असे म्हणायचेय का तुम्हाला? 

एखाद्या ठिकाणी अपघात झाला, आग लागली, दुर्दैवी घटना घडली तर तो कोणताही विचार न करता असेल त्या अवस्थेत घटनास्थळी पोहोचतो, पोलिसांना इन्फॉर्म करतो, मदत करू लागतो, त्याची बातमी करतो, आवृत्ती थांबवायला लावतो हा त्याचा गुन्हा आहे का?

तुमच्या नळाला पाणी येत नाही, शेजारी पाजारी कचरा साचलाय, तेव्हा प्रशासनाला जाग आणन्यासाठी त्याची लेखणी सज्ज होते, हा नेमका कोणता गुन्हा आहे? खरेतर तो तुमच्या बुडाजवळ आग लावतोंना म्हणून त्याचे अस्तित्व तुम्हाला सहन होत नाही. हे सारे करण्यासाठी वर्तमानपत्राकडून काय मिळते हे एकदा विचारा त्याला? 

आयुष्याचं अर्धशतक पत्रकारीतेत घातल्यानंतर अवघे दोन-पाच हजार मानधन मिळवणारे हजारो पत्रकार आज ग्रामीण महाराष्ट्रात आहे. चौदाशे-पंधराशे मानधनात आजही ग्रामीण महाराष्ट्रातली तरुण पत्रकारांची पिढी काम करते. 
अनेकांना तर मानधनही मिळत नाही, शहरात राहणारा पूर्णवेळ पत्रकार दहा-पंधरा हजार पगाराच्या वर कमवत नाही, हे वास्तव एकदा जाणून घ्या. मग त्याच्याबाबतीत पैशांच्या गप्पा मारा, त्याच्यावर टीकेची झोड उठवा.

डेस्कवर काम करणार्‍या लाखो पत्रकारांच्या नशिबी ती रम्य संध्याकाळ आणि नितांत सुंदर पहाट नसते याचा अंदाज तुम्ही कधी केलाय का? एका सुटीसाठी किती भांडावे लागते, दिवाळीत त्याला एखादी सुटी मिळते तेव्हा कुठे जाते तुम्हा सोफेस्टिकेटेड मंडळींचे शहाणपण, स्वत:च्याच लग्नाला दोन दिवसांची कशीबशी रजा मंजूर होते तेव्हा का नाही वाटत तुम्हाला त्याच्याबद्दल कळकळ. जगण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो ते एकदा त्याला विचारा, बायको-मुलांची हेळसांड या एका शब्दाचा अर्थ तो तुमच्यापेक्षा अधिक जाणतो.


वर्तमानपत्र, मिडिया हाऊस यांच्या मुख्य कार्यालयात काम करणार्‍या पत्रकारांना एकदा विचारून बघा त्यांची व्यथा? दररोज डेडलाईनची टांगती तलवार घेऊन काम करतांना मन कधी कठोर झालं हे ते देखील विसरलेले असतात.

स्वतंत्र केबीनमध्ये बसणार्‍या संपादकांबद्दल का कोण जाणे मात्र आपल्या मनात प्रचंड आकस घेऊन आपण जगतो. संपादक होण्याचा अर्थ ठाऊक आहे का आपल्याला? चिरीमिरी देऊन तो संपादक झालेला नाही, कोणाच्या तरी चिठ्ठीवरनं त्याला संपादक पदी बसविलेलं नाही, आयुष्याची कितीतरी वर्षे त्यांने लेखनी प्रज्वलीत ठेवली आहे. दिवस-रात्र तो लिहिता राहिला, ज्या वयात आपला अभ्यास संपतो त्या वयात त्यांने पुस्तकांशी मैत्री केली. तळहातावर शीर घेऊन तो भिडला, लढला, रांगडेपणा दाखवत अनेकांना वठणीवर आणले, मला नाही वाटत हा त्यांचा गुन्हा आहे. 

हो कालौघात संपादकीय केबीनमध्ये व्यवसाय घुसला, टार्गेट्‌स आले. मात्र १० रुपये छपाई खर्च असलेला अंक तुम्हाला दोन रुपयात द्यायचा असेल तर त्यांना ते करणे भाग आहे.
असो, बोलता आम्हालाही येतं, लोकांच्या व्यथा मांडतांना आम्हीही आमची व्यथा तुमच्या डोळ्यात पाणी येऊस्तोवर मांडू शकतो, पण खरे सांगतो ‘कि घेतले न व्रत हे आम्ही अंधतेंने’, ठरवून पत्रकार झालोय, ठरवून आम्ही आमची बांधिलकी निभावतो. हो, आणि महत्वाचं म्हणजे ठरवून आम्ही समाजाच्या भल्यासाठी एखाद्याचा गेमही करतो.


तुम्ही पत्रकारांना पुरस्कार नाही दिले तरी चालतील, हार तुरे देऊन त्यांचे सत्कार नाही केले तरी चालतील, मात्र मनाचा सच्चेपणा दाखवत त्यांचा सन्मान करा, त्यांना प्रतिष्ठा द्या. 

कारण एक सत्य डोळे आणि कान उघडे ठेऊन ऐका, ज्या समाजात पत्रकाराला सन्मानाची वागणूक मिळते त्याच समाजाला सन्मानाने जगता येते. 

तो लिहितो म्हणून तुमचे जगणे सुरक्षित आहे, 
त्याच्या लेखनीवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करू नका, 
त्याच्यावर हल्ले करून त्याला रोखण्याचा प्रयत्न करू नका, 
पत्रकारांवर हल्ला करणार्‍यांना पाठीशी घालू नका 
नाहीतर, समाज म्हणून आपल्या जगण्याची राख-रांगोळी व्हायला वेळ लागणार नाही.

          -तुमचाच एक पत्रकार

२८ मार्च २०१६

जलधारा जपून वापरा

सोशल प्रितिसंगम
आज पुढारी 28 मार्च  पान 11

पाणी वाचवा ब्लॉगचा काही भाग पुनःप्रकाशित

जलधारा जपून वापरा !

पाणी किती महत्वाचे आहे हे आम्हाला कुणी सांगायची गरज नाही. आम्ही पाणस्थळ खोर्‍यात जन्माला आलो आहे. आमच्या कराड तालुक्यातून कृष्णा कोयना नद्या वाहतात. आमच्या येथे भरपूर पाणी आहे.  आम्ही पाणी कसे पण वापरणार, आम्हाला काय करायचे आहे दुसर्‍याचे ? आम्हाला पाणी मिळतेय ना पाहीजे तेव्हा, पाहिजे तेवढे ! अहो पाणी आमच्या उशाला आहे. आम्ही  कृष्णा काठावरील गावात जन्माला आलो, हे आपले भाग्य आहे. रोज सकाळी कृष्णा घाटावर, पुलावर जातो , कृष्णाबाई नदीचं दर्शन घेतो आम्ही. पाणीच पाणी.  कराड पालिका रोज दोन वेळा पाणी सोडते. शुद्ध करून, कशाला आमची तहान भागवायला नव्हे सकाळी भरलेलं पाणी संध्याकाळी  ओतून टाकायला. आम्ही खूप बुद्धीवान आहोत. आम्ही शुद्ध पाणी गटारात ओतणार, शुद्ध पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी करणार, पाणी रस्त्यावर मारणार .आम्ही कराडकर, आम्हाला काय कुणाची भिती !

पुण्यवान कराड शहरवासिय आणि  महापुण्यवंत कृष्णा काठावरील ग्रामस्थ हो. आहेना तुम्ही याच धुंदीत, याच अविर्भावात . तुम्हाला हेच वाटतंय ना? पाणी पुरवठा योजना कृष्णा काठावरील गावागावात आहेत  कराडात रोज दोन टाईम पाणी येते. पाणी भरपूर आहे,  आपल्याला काळजीचं कामच नाही, असे अनेकांना वाटत आहे.  आणि हो मला काय करायच  आहे दुसऱ्याच,  मला मिळतंय ना बस झालं. मी एकटा पाणी बचत करून काय साध्य होणार आहे? माझ्या नशिबात आहे म्हणून मी कृष्णा काठी जन्माला आलोय.
 
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले
म्हणोणी करहाटक नगरी जन्मलो

२६ मार्च २०१६

तेरी बिंदीया




🔴बिंदी आणि कुंकू🔴
🔸टिकली आणि गंध🔸

भारतीय संस्कृती आणि परंपरा फार प्राचीन आहेत .
स्त्रीयांना आपल्या संस्कृतीत फार मोठे स्थान आहे. 
स्त्रीला महिशासुर मर्दीनी, मर्दानी, अर्धांगिनी, सुवासिनी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. स्त्रीयांचे सौंदर्य खुलते तिच्यातील नम्रतेमुळे, 
इतरांची काळजी घेण्याच्या उपजत गुणामुळे
आणि अलंकारामुळे !

स्त्रीयांचे अनेक अलंकार आहेत, ते अलंकार फार मौल्यवान  आहेत. 
काही अलंकार मिळण्यासाठी, घेण्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागते. 
मात्र लग्न झाल्यावर तिला मिळणारा, टिकणारा अलंकार म्हणजे 
तिचं सौभाग्याचे प्रतिक, तिचं कुंकू.  
सर्वात महत्त्वाचा आणि मला आवडणारा हा अलंकार आहे. गळ्यात दागिना नसला तरी चालेल पण कपाळावर बिंदी, कुंकू असले की बस. तिची उंची वाढते. 
मोकळ्या कपाळाची स्त्री क्वचितच छान दिसते. 

मला आठवतय लहानपणी माझ्या बहिणींना टिकली किंवा गंध लावणे अत्यावश्यक होते. 
गंध लावला नाही तर त्याना टोचून बोलले जायचं. टिकली असो वा गंध, ती लावली की आपल्या भगिनी, आई, ताई, माई, सौभाग्यवतीच्या सौंदर्यात भरच पडते. 
माझ्या क्लासेस मध्ये तर मी मुलींना टिकली लावणे सक्तीचे केले होते.
सांगण्याचा उद्देश हा आहे की हे करून आपण आपल्या संस्कृतीचे जतन करत आलो आहे .

विवाहित स्त्रीच्या डोक्यावर भांगातील सिंदूर आणि कपाळावरील बिंदी
कुंकू हे तर तिच्या सौभाग्याचे प्रतिकच असते. 
अलिकडे उत्तर भारतातील स्त्रीयांप्रमाणे केसाच्या भांगात कुंकू लावले जाते. 
कुंकू गेले गंध आला,  तो ही मागे पडला ,आता टिकली आली. 
पण ते लावण्यामागची भावना, आदर  आणि उद्देश तोच आहे . 
ही बिंदी किंवा टिकली पाहीली की त्या स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो,
 विवाहित मुली बाबत आदर निर्माण होतो. 
नवीन लग्न झालेल्या मुलीचा बाप मुलीच्या डोक्यावरील कुंकू, टिकली पाहून आणखी सुखावतो. ज्याची मुलगी उपवर झाली आहे तो पिता जेव्हा एखाद्या नवविवाहितेकडे पाहतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर त्याची मुलगी उभी राहते .
अभिमान मधील तेरी बिंदीया रे हे गाणे मला खुप आवडते.





सौंदर्यात भर घालणारी ही बिंदी मी जेव्हा माझ्या सौ च्या कपाळावर पाहतो 
तेव्हा मला जे सुचलं ते मला तुमच्या सोबत शेअर करायला नक्की आवडेल .

आज शनिवार कविता डे..... 
आजची कविता
                                      
तिच्या बिंदीसाठी




तुझी  बिंदी
तुझी बिंदी, तुझं हसणं
माझं भान विसरून जातं

तुझी बिंदी सन्मानाचे प्रतिक
तुझी बिंदी नात्यातील बंध
तुझी बिंदी भावनांचा प्रवास
तुझी बिंदी तुझं सर्वस्व
तुझी बिंदी माझं अस्तित्व
तुझी बिंदी आपला अंतर्नाद

तुझी बिंदी माझं मन
तुझी बिंदी माझं नाव
तुझी बिंदी तुझं सौंदर्य
तुझी बिंदी माझा श्वास
तुझी बिंदी माझं स्मरण
तुझी बिंदी माझं जगणं

तुझी बिंदी,तुझं वावरणं
मला वेड लावून जातं
                 
तुझी बिंदी, तुझं मुरडणं
मला तुझ्याकडे खुणावतं

तुझी बिंदी, तुझी नजर
मला बेभान करतं

.....................सतीश  मोरे

२५ मार्च २०१६

बेमिसाल सखी

सखी कशासाठी? कोण आहे ही सखी ?




 सखी आणि सखा, 
तसे खुप छोटे शब्द. 
मात्र अर्थविश्व फार मोठ्ठे !
कृष्ण सखा म्हणून द्रौपदीच्या पाठी उभा होता,
राधेचा तर तो प्राणसखा होता.
सखी आणि सखा नातं
अतुट प्रेमाचे, मैत्रीचे, विश्वासाचं,
मार्गदर्शकाचं, मानसिक आधाराचं,
                                                           एकमेकांना समजून घ्यायचं 
                                                               अव्यक्त व्यक्त होण्याचं,  
                                                     घेण्याचं नव्हे देण्याचं आणि त्यागाचंही !



             सखी
              हा शब्द माझ्या कानावर अनेकदा पडला होता,
              अजुनही पडतो.
               तुमच्याही पडत असेल.
                मला तो भावला फक्त
                 बेमिसाल मधील सुधीरच्या मुखातून  पडलेला......
                    सखी, सखे......!


1990 च्या दशकात हा सिनेमा पाहिला होता.
मी अमिताभ बच्चन यांचा जन्मजात फॅन. आकरावी बारावीत असताना हा सिनेमा पाहिला.
रूषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला हा अमिताभ बच्चन अभिनित शेवटचा सिनेमा.
 या अगोदर अमिताभ बच्चन यांना घेऊन मुखर्जी यांनी आनंद, अभिमान, गुड्डी , मिलि, चुपके चुपके आदी आकरा चित्रपट केले आहेत .

ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित बेमिसाल हा चित्रपट १९८२ साली प्रदर्शित झाला .हा चित्रपट अभिनेता उत्तमकुमार यांचा बंगाली चित्रपट अमी से ओ सखा या चित्रपटावर आधारीत होता. काश्मीरचे खुप खुप छान फोटोसेशन आहे यामध्ये.
एक वेगळीच कथा आहे. प्रेम असुनही सखी पुढे व्यक्त न करणारा सुधीर.
डाॅक्टर म्हणून अमिताभ बच्चन यांची ही वेगळी भुमिका.
मी हा चित्रपट अनेकदा पाहीला आहे. यामध्ये राखी ही सुधीरची सखी होती.


माझ्या मनात सखी हे पात्र हा चित्रपट पाहून बसले आहे. सखी खरंच खुप वेगळी असते.  सुधीरची सखी इतकी एकरूप होती की तिने त्याला जवळचा मानले, ही सखी त्या सख्यासाठी सर्वस्व होती, मैत्रेयी होती. सख्याचे सखीवरील प्रेम, समर्पण, त्याग म्हणजे बेमिसाल. हा चित्रपट पाहून सखी हे पात्र इतकं खोल मनात बसले की गत वर्षी माझ्या मनात सखी नावाची माझी पहिली कविता उमटली.


ही कविता प्रसिद्ध झाली, अनेकांना खुप आवडली, काहींना कळली, काहीजणाच्या डोक्यावरून गेली.
सखी म्हणजे काय असे त्यांनी मला विचारले. एकदा फ्रेंडस ग्रुपमध्ये तर दोन तास यावर चर्चा झाली. 


प्रत्येकांनी त्याच्या त्याच्या दृष्टीतून सखीची व्याख्या सांगीतली. कोणाला ती मैत्रीण,शेजारीण वाटली, कोणाला पहीलं प्रेम, कोणी सल्लागार म्हटलं तर कोणी लफडं म्हटलं. याहून वेगळी यापैकी काही, खुप काही अशी सखी माझ्या मनात होती, आहे, राहील. अनेकांच्या मनात ती सखी असेल. मला फक्त बेमिसाल मधील सखी दिसते .

खरंच कोण आहे ही सखी?


आपल्या सर्वांना जवळिकीची, प्रेमाची भुक असते. भावनाशील माणसाची ती गरज असते.
अनुदिनी अनुतापांनी तापलेल्या, दमलेल्या-भागलेल्या माणसाला अशी एक कुस हवीच असते
की जेथे आपण हक्काने विरघळून जाऊ शकू. सगळे काही विसरून त्या सावलीत शांतनिवांत पहुडू शकू.

सर्जनशील माणसाला तर अशा सखीची नितांत आवश्यकता असते.
त्याची गृहीणी त्याची सखी असेल तर प्रश्नच मिटतो .खरं तर पत्नी इतकी जवळची सखी कोणी असूच शकत नाही.
पण सत्यभामा सखी होऊ शकत नसेल तर रूक्मिनीचा शोध सुरू होतो. (आजची मस्तानी नव्हे )
अर्थात हे समजण्यासाठी पाशवी मनोविकारातून बाहेर यावे लागेल हा भाग वेगळा !


कायिक व्यापातून सुटका मिळविली तरी
मनाचा प्रश्न उरतोच. त्याच्या गरजा वेगळ्या असतात.
त्याला एका ह्रदयीचे गुज ओळखणारे ह्रदय हवे असते , मनोवेदनांवर फुंकर घालणारे ओठ हवे असतात ,
विशिष्ट बौद्धिक पातळीवरून
केला जाणारा संवाद हवा असतो ,
वैचारिक सख्यत्व हवे असते.
म्हणूनच त्याला एक सखी हवी असते.

जिच्या कडे सर्व काही मन मोकळे करायचे आहे अशी ती सखी !
जिच्या पुढे सर्व बंधने तुटतात, आडपडदा रहात नाही ती सखी !
जिच्या अस्तित्वात माझे सर्वस्व असेल, मी माझा नसेल ती सखी !
जिच्या मनात आहे तेच ओठांवर असते अशी ती सखी !
जिच्या भेटीची हुरहुर मज निशदिनी अशी ती सखी !
प्रेम, समर्पण, शरीर , त्याग, आदर याच्याही पुढे अशी ती सखी !

अशी सखी सर्वांना मिळो.
सखी मनात कायम असते,
जवळ असो वा नसो.
तिच्याबाबत अनेक विचार,
भावना, स्पंदन, लहरी उमटतात.
आणि हे शब्द बाहेर पडतात.


सखी,
तु जसं म्हणशील तसं...
पण मला तु हवी आहेस.



तुझं ते माझं, माझंही तुझं
तुझ्यासाठी हेही अन् तेही
तुझ्या असण्याचाच आधार मला
भेटली नाहीस तरी चालेल पण
मला तु हवी आहेस.



तुझ्या भेटीत सर्व मिळतं मला
तुझ्या स्पर्शाची अन् सोबतीची
सतत ओढ असते मला
वाट पाहीन जन्मभर त्या क्षणाची पण
मला तु हवी आहेस.


मैत्रीचे,विश्वासाचं नातं आपलं
टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी

सर्व मान्य 
पण
सखी,
मला तु हवी आहेस.



              




   ...........सतीश मोरे

२४ मार्च २०१६

सिलसिला. ...रंग बरसे


सिलसिला,  ग्रेट मुव्ही
 इन  इंडियन सिनेमा.


भारतीय चित्रपट सृष्टीने सुरूवाती पासून तत्वे जपली आहेत. विवाह बाह्य संबंध भारतीय संस्कृतीला कधीच मान्य नाहीत. प्रेमभंग झाला म्हणून,  प्रियकर, प्रेयसीने दुसर्‍या सोबत लग्न केले म्हणून कोणी लग्न झालेल्या प्रेमिकेला परत आणणे,तिच्या सोबत  लग्न करणे, हे भारतीय संस्कृतीत कधीच मान्य नव्हते. विवाहाअगोदर असणारे नाते किंवा  प्रेम एकदा एखाद्या बरोबर लग्न झाले की संपते. पती आणि पत्नीचे नाते सर्वाधिक घट्ट असते. ते नाते कोणत्याही परिस्थितीत तुटत नाही, विवाहबाह्य संबंध जास्त काळ टिकत नाहीत. हा आज अखेरचा इतिहास आहे. हे सबंध किती ग्रेट असतात, हेच या चित्रपटात दाखवले होते. यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला यांनी चित्रपटाचा शेवट सुचवला होता.

अमिताभ आणि रेखा पळून जातात, सरदार मित्राकडे रहायला येतात. तेव्हा त्याचा मित्र सुद्धा हे मान्य करत नाही. गुरूवाणी सुरू असताना रेखा आणि अमिताभ यांना सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. चुकीची जाणीव होते. दरम्यान अपघात घडला अशी बातमी येते. विमान अपघातातून प्रेयसीच्या पतीला अमित वाचवतो. जया त्यावेळी पोटात असणाऱ्या बाळाची शपथ घालतात आणि तो क्षण चित्रपट वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. 
अमिताभ आणि रेखा यांचे प्रेम प्रकरण खुप गाजले होते. अशा वेळी या सत्य घटनेवर कथेचा चित्रपट स्वीकारणे जया बच्चन यांच्या मुळे अमिताभ बच्चन यांना शक्य झाले. जया बच्चनजी, सलाम तुम्हाला!
चित्रपट संपतो तेव्हा
Love is faith, faith is forever
असा संदेश दिला आहे.
म्हणूनच सिलसिला is Great.
Hats up to यश चोप्रा,  अमिताभ बच्चन आणि जयाजी, रेखाजी.
रंगपंचमी सुरू झाली आहे. 
होळी सणाच्या निमित्ताने  सध्या सिलसिला मधील
रंग बरसे भिगी चुनरवाली रंग बरसे गाणे वाजत आहे.
मला परवा खालील पोस्ट आली, ती शेअर करायला हवीच.

एक काळ होता जेंव्हा बच्चन रेखाच्या तथाकथीत प्रेमप्रकरणाच्या कथांनी मासिके, पेपर्सचे रकानेच्या रकाने भरून जात असत. पर्पल पैच मध्ये होते अस म्हंटल तरी हरकत नाही आणि त्याच दरम्यान यश चोप्रा साहेबांनी सिलसिला नावाचा चित्रपट काढला. त्या काळात गाजलेला आणि आजची फ्रेश वाटणारा हा अफाट सिनेमा. प्रदर्शीत झाला तेंव्हा अनेकांना ह्या चित्रपटाबद्दल एक वेगळीक हुरहूर होती. नेमके काय दाखवणार, बायोपिक असेल का, शेवट काय होणार, जया कशी रीअक्ट झाली असेल, बच्चन आपल्या भावना लपवू शकेल का असे अनेक प्रश्न लोकांच्या डोक्यात भुंगा करत होते. बच्चन रेखात काय होते हे कदाचित फक्त बच्चन रेखाच सांगू शकतील पण सिनेमा म्हणून हा मास्टरपीस आहे.

अमिताभ बच्चन, रेखा, संजीवकुमार, शशीकपूर, कुलभूषण खरबंदा, देवेन आणि दि ग्रेट  जया अशी अफाट स्टारकास्ट आणि काश्मीरच बेफाट लोकेशन. एकाहून एक सरस अशी जवळपास दहा गाणी आणि त्या काळात रिबेल वाटावी अशी कथा. बच्चन रेखा एकत्र येतात असा शेवट केला असता तर अजूनच अफाट झाला असता तर वादळ उठले असते.

एका पाठोपाठ येणारी अप्रतिम गाणी या चित्रपटाची जान पण हा चित्रपट आहे
फक्त  रेखा बच्चनचाच. बाकी सगळे कसे या दोघांभोवती फिरत असतात. शशी कपूरजींनी छोट्याश्या रोल मध्ये जीव ओतला आहे. भाई मै साबुन नही उठाउंगा असो किंवा नीचे पान की दुकान  उपर गोरी का मकान असो.
प्रेम करावे आणि खुलवावे तर पहिल्या पार्ट मध्ये बच्चन रेखा सारखे. शोला है शोला, शोलो से डरना गाण्यात रेखुडी काय अफाट दिसाली आहे. सलवार कमीज मध्ये संपूर्ण कपड्यात टोटल मादक. देवेन आणि सुषमाच्या मार्फत आपले प्रेम रेखापर्यंत पोहोचवणारा बच्चन पण खास. टेप वर बच्चन रेखाला हाल ए दिल सांगत असतो आणि त्यावर रेखा जी लाजली आहे त्याला तोड नाही. देखा एक ख्वाब हे गाणे म्हणजे समस्त प्रेमवीरांची आरतीच कि हो देवा. गाणे आणि लोकेशन अफाट आणि त्यात रेखा बच्चनचा जिवंत अभिनय . सुभान अल्लाह !!!
सगळ सुरळीत सुरु असते आणि बच्चनला टिवी फोडावा लागतो. शशीने केलेल्या पराक्रमाची किंमत चुकवण्याची वेळ बच्चनवर येते आणि इथून हा चित्रपट अजूनच वेगळी उंची गाठतो. बच्चनच्या आवाजाला इथून खरा न्याय मिळतो आणि रेखाच्या अभिनय क्षमतेला.
नीला आसमां सो गया
आसूओं में चाँद डूबा, रात मुरझाई
जिन्दगी में दूर तक, फ़ैली है तनहाई
जो गुजरे हम पे वो कम है, तुम्हारे ग़म का मौसम है

याद की वादी में गूंजे बीते अफसाने
हमसफ़र जो कल थे, अब ठहरे वो बेगाने 
मोहब्बत आज प्यासी है, बड़ी गहरी उदासी है

हे गाणे लताबाई गायल्या आहेत पण रेखा अक्षरशः हे गाणे जगली आहे. खरच आयुष्यात असाच क्षण आला असावा इतका खरा वाटणारा अभिनय.
मग बारी येते बच्चनच्या मनातले वादळ दाखवण्याची.
ते दोघे परत भेटतात चुकून आणि एका जगाला नको असलेल्या कथेचा पुनर्जन्म होतो. दोघांचेही लग्न झालेले पण दोघांचाही जीव एकमेकात अडकलेला. "ये कहां आ गये हम" हे अजून एक सुंदर गाण आहे. लताच्या आवाजात असलेल्या या गाण्यात बच्चननी आपला पार्ट अक्षरशः जीव तोडून गायला आहे.




मजबूर ये हालात, इधर भी है, उधर भी
तनहाई की एक रात, इधर भी है, उधर भी
कहने को बहोत कुछ हैं मगर किस से कहे हम
कब तक यूँ ही खामोश रहे हम और सहे हम
दिल कहता है दुनिया की हर एक रस्म उठा दे
दीवार जो हम दोनों में है, आज गिरा दे
क्यों दिल में सुलगते रहे, लोगों को बता दे
हां हम को मोहब्बत है, मोहब्बत है, मोहब्बत
अब दिल में यही बात, इधर भी है, उधर भी

' दिल कहता है दुनिया की हर एक रस्म उठा दे '
हे ऐकले कि आजही छातीत कुठे तरी चमक उठते.

जावेदनी पण हे गाणे लिहितांना कुठे तरी दोन प्रेमी लपून बघितले असावे.
पण या चित्रपटाच उत्तुंग शिखर आहे होळीचे गाणे. गाणेआहे रेखा बच्चनचे
पण संजीव जयानी जी जीवाची घालमेल दाखवली आहे त्याला तोड नाही. 

सोने की थारी में जोना परोसा
सोने की थारी में जोना परोसा
अरे सोने की थाली में 

हाँ सोने की थारी में जोना परोसा

अरे खाए गोरी का यार
बलम तरसे रंग बरसे

अरे लौंगा इलाची का बीड़ा लगाया

लौंगा इलाची का बीड़ा लगाया

अरे लौंगा इलाची का ,हाँ लौंगा इलाची का बीड़ा लगाया
अरे चाबे गोरी का यार बलम तरसे रंग बरसे

अरे बेला चमेली का.. सेज बिछाया

अरे बेला चमेली का.. सेज बिछाया

बेला चमेली का.. सेज बिछाया
बेला चमेली का.. सेज बिछाया
अरे बेला चमेली का
हाँ बेला चमेली का.. सेज बिछाया
सोए गोरी का, सोए गोरी का यार, 
बलम तरसे रंग बरसे
होली है...

हरिवंशराय साहेबांनी लिहिलेल्या ह्या अफाट गाण्याला आपल्या खास आवाजांनी आणि अभिनयानी बच्चननी अजरामर केले. १९८१ नंतर किती धुळवडी आल्या आणि गेल्या पण हे गाणे वाजले नाही असे होतच नाही. बच्चन आणि रेखा या चित्रपटात अफाट दिसले आहेत. दोघांचेही तारुण्य पिकवर होते आणि त्याला साज चढवला तो चोप्रा साहेबांनी. उगाच नाही सिलसिला लागला आणि रेखुडी दिसली कि बापू हिटलर बनून रिमोट आपल्या ताब्यात घेत.
आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे सकाळपासून समोरच्या मैदानावर वाजत असलेली होळीची गाणी. पण डीजेनी सुरुवात केली ती " रंग बरसे " पासूनच. 
आजही अनेक लोकांना प्रश्न असेल कि खरंच काही सिलसिला होता का ?
ही कहाणी सफल झाली असती तर काय झाले असते. पण जे होते ते चांगलेच होते असे आपण म्हणतो तेच खरे. जयानी बच्चन नावाच्या वादळाला नुसते सांभाळलेच नाही तर दिशा हि दिली !!!
अशी ही सिलसिला बाबतची वरील सविस्तर पोस्ट मला खुप आवडली. लेखक कोण आहे माहित नाही. पण त्यांनी सुद्धा सिलसिला  अनुभवला आहे, असे दिसतंय. हॅट्स ऑफ टू  हिम.



मी हा चित्रपट किमान पन्नास वेळा पाहीला आहे. आजही पाहतो. मी अमिताभ बच्चन यांचा खुळा फॅन आहे. बच्चन प्रेम यावर लिहायला आवडेल. त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी कुठे कुठे गेलो, कसा गेलो,  बच्चन का आवडतो, त्यांना पाहण्यासाठी पुण्याला कसा गेलो हे मी सांगणार आहेच. आज होळी स्पेशल ऐवढेच.





                 
                                          ...........................सतीश मोरे

२३ मार्च २०१६

पाणी वाचवूया भाग 2





पाणी कसं वाचवता येईल ?


२२ मार्च – जागतिक जलदिन विशेष 





२२ मार्च हा दिवस दर वर्षी जगभर जागतिक जल दिन म्हणून पाळला जातो. पण पाण्याचे महत्त्व कोणाला समजावून सांगायची आवश्यकता आहे का? ते आधीच सर्वांना ठाऊक आहे. पाणी ही तर सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे. पण इतर सजीवांत आणि मानवात मोठा फरक हा की, मानव पाण्याचा अपव्यय करतो
जागांच्या कमतरतेमुळे जेथे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही तेथे घर बांधणे, शेती करणे, व्यवसाय कारखाने उभारने भाग पडते म्हणून.....

पाण्याचे नियोजन करा,
पाणी काटकसरीने वापरा,
पाणी साठवा,
पाणी जिरवा.

माणसाला चांगला निवारा नसला तरी तो कसाबसा जगू शकतो. अन्नाशिवाय तो काही दिवस काढू शकतो. पाण्याविना मात्र तो फार वेळ टिकाव धरू शकत नाही. जसे माणसाच्या शरीराला पाणी मिळणे आवश्यक आहे. पाणी हे जीवन आहे..!!!
भविष्यासाठी पाणी वाचवा.विजेनंतर घरात सर्वाधिक वापरली जाणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे पाणी. खरं तर विजेइतकंच पाणीदेखील आपण अतिशय बेजबाबदारपणे वापरत असतो, ज्याची बचत करणं आजच्या काळात अधिक गरजेचं आहे. घरातला पाणीवापर कसा आटोक्यात ठेवता येईल त्यावर प्रकाश टाकूया.

असं म्हटलं जातं की जगात तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यावरूनच होईल. आता जागतिक युद्धाचं राहू द्यात पण पाण्यावरून गल्ली-मोहल्ल्यात कितीतरी भांडणं होताना आपण रोजच पाहत असतो. 
पाणीटंचाई केवळ ग्रामीण भागातच जाणवते असं नाही तर तिची तीव्रता शहरी भागातदेखील तेवढीच आहे. शहरात फक्त घराघरात हाताशी धो धो पाणी वाहणारे नळ असतात, त्यामुळे ही तीव्रता तेवढय़ा गंभीरतेनं जाणवत नाही एवढंच. पण शहरातही कित्येकदा अचानक बोअरिंग वेलचा पंप बंद पडल्यानंतर किंवा नगरपालिकेनं पाणीकपात जाहीर केल्यावर नळाचंच नव्हे तर आपल्याही तोंडचं पाणी पळतं व त्रेधा उडते. परंतु अशी वेळ येण्यापूर्वीच आपण पाण्याची बचत केली तर चांगलं नाही का..

घरातच पाणी वापर जादा

👉घरात आपण दहा टक्के पाण्याचा वापर हा एकटय़ा किचनमध्ये करत असतो. शिवाय कपडे-भांडी धुणं, स्वयंपाक आणि इतर कामांसाठीही करत असतो. त्याव्यतिरिक्त पाणी अंघोळीसाठी, शौचालयात व साठवण्याच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणावर वापरलं जातं. आता हे प्रमाण आपल्याला नियंत्रणात कसं ठेवता येईल ते पाहू.

👉पाण्याचा जास्त वापर स्वयंपाकासाठी केला जातो. तिथं पाण्याचा वापर कमी होतो आहे असं वाटलं तरी ते बरेचदा फुकट जात असतं.

👉भाज्या, तांदूळ, डाळ धुतलेलं पाणी शक्यतो साठवून ठेवावं आणि इतर ठिकाणी वापरात आणावं. उदाहरणार्थ हेच पाणी तुम्ही कुकरमध्ये तळाला घालू शकता.

👉डिप फ्रिझरमधून वस्तू काही तास आधीच काढून ठेवाव्यात, त्या नॉर्मल तापमानाला आणण्यासाठी पाण्यानं धुऊ नयेत.
👉अन्नपदार्थ उकडण्यासाठी पाण्याऐवजी शक्यतो वाफेचा वापर करावा.

👉किचनमधील भाज्यांसारखे पदार्थ किंवा वस्तू धुण्यासाठी एकाच मोठय़ा भांडय़ात पाणी घेऊन त्यातच धुवा, वाहत्या नळाचा वापर करू नका.

👉आज भरून ठेवलेलं पाणी उद्या फेकून देण्याची चूक कधीही करू नका. साठवणीच्या पाण्याच्या बाबतीतही अनेक जण बेपर्वाईनं वागत असतात. अनेकांच्या घरी एक किंवा दोन पाण्याच्या टाक्या असतात. त्यामुळे पाणीपुरवठा बंद असला तरी अशी माणसं पर्वा करत नाहीत. टाकी साफ करायची वेळ येईल तेव्हा शक्यतो पाणी कामांसाठीच वापरून टाकी रिकामी करा, नंतरच ती साफ करायला घ्या.

👉बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये आपण घरातल्या ७५ टक्के पाण्याचा वापर करतो. यात सर्वाधिक पाणी फुकट जातं ते शॉवरखाली अंघोळ केल्यामुळे किंवा वाहत्या नळाखाली भांडी घासणं, कपडे धुणं या प्रकारांमुळे. त्याऐवजी मोठय़ा टबात आवश्यक तेवढंच पाणी साठवून ही कामं केली तर पाण्याची खूप बचत होईल.

👉झाडांना पाणी घालताना शक्यतो ऋतुमानानुसार पाण्याची गरज ओळखूनच झाडांना पाणी घालावं. उन्हाळ्यात ठिबक सिंचनाचा वापर करावा.

👉घरातील नळांची गळती अजिबात होऊ देऊ नये. थेंब थेंब गळणाऱ्या नळातून दिवसाला ३० ते ४० लिटर पाणी वाया जाते याचे भान राखणे महत्त्वाचे आहे. त्वरित उपाययोजना करून ही गळती थांबवावी.

👉इमारतींच्या गच्चीवर पावसाचे पाणी पडते त्याला वाट करून देऊन ते जमिनीत मुरविले तर पुढचे ६-७ महिने तेच पाणी नलिकाकूप विहिरीतून वापरता येईल. इमारतीची गच्ची ४० मी. ४० मी. असेल तर मुंबईच्या पावसात चार महिन्यांत ३२ लाख लिटर पाणी जमिनीत मुरवता येईल!

👉दात घासताना किंवा दाढी करताना नळ चालू ठेवू नका. भाज्या किंवा फळे धुताना नळाखाली न धुता जर त्यासाठी परात किंवा भांडय़ाचा वापर केला तर ते पाणी फेकून न देता झाडांसाठी वापरता येईल. इमारतीच्या आवारातील झाडे तेथे वास्तव्य करणाऱ्या सदस्यांनी दत्तक घ्यावीत व त्यासाठी पाण्याचा असा उपयोग करावा. कुकरमधील पाण्याचा वापरदेखील असाच करता येईल. तांदूळ धुतल्यानंतरचे पाणी वनस्पतींना पोषक असते म्हणून ते त्यासाठीच वापरा.

👉पाण्याच्या बाटल्या अर्धवट पिऊन तशाच टाकून देऊ नका. निसर्गाची ती एक मोठी प्रतारणा आपण करीत आहे व म्हणूच तो अक्षम्य गुन्हा आहे. पाणी संपणार नसेल तर आजूबाजूच्या झाडांना घाला व त्यांचा दुवा मिळवा. कपडे धुण्यासाठी धुलाई यंत्र वापरत असाल तर त्याचा वापर पूर्ण क्षमतेनेच करा. आठवडय़ातून दोन-तीन दिवसच त्याचा वापर तारतम्याने केला तर ऊर्जा व पाणी या दोन्हीची चांगली बचत होऊ शकते.

👉न्हाणीघरातील व स्वयंपाकघरातील पाणी ऑक्सिडेशन करून बागेसाठी व शौचालयाच्या टाक्यांसाठी वापरता येईल. यासाठी तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध आहे.

👉इमारतींच्या आवारात जर बाग वाढविली असेल तर दिवसा त्यावर एका विशिष्ट जातीचे प्लास्टिक अंथरून पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो. अर्थात त्यासाठी सदस्यांना थोडे कष्ट करावे लागतील अथवा माळ्याला उचलून पसे द्यावे लागतील. आवारातील झाडांना ठिबक पद्धतीने (पाण्याच्या बाटलीला छोटेसे छिद्र पाडून) पाणी दिले तर पाण्याची बचत होईल. झाडाच्या बुंध्याजवळ जर नारळाच्या शेंडय़ा किंवा मॉस ठेवले तर पाणी कमी वापरावे लागेल.


एकूणच वाहत्या नळाखाली काम करणं टाळलंत तर बरीच मोठी पाणीबचत होईल. शेवटी पाण्याची बचत म्हणजे आपल्या भविष्यासाठीचीच बचत या दृष्टीनं आजच पाण्याचा योग्य तितकाच सांभाळून वापर करायला सुरुवात करा.

................सतीश मोरे

२२ मार्च २०१६

पाणी वाचवा भाग 1

🙏🏽 पुढारी परिवाराच्यावतीने आवाहन 🙏🏽

कराडकरांनो रोज पाणी वाचवुया

जागतिक जल दिन विशेष भाग 1

पाणी किती महत्वाचे आहे हे सांगायला नको. कराड तालुक्यातून कृष्णा नदी वाहते,आपण कृष्णा काठावरील गावात जन्माला आलो, हे आपले भाग्य आहे. नव्हे आपण खरंच पुण्यवान आहोत. कराड शहरवासिय तर महापुण्यवंत आहेत.
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले 
म्हणोणी करहाटक नगरी जन्मलो

पाणी टंचाई, पाणी संकट, पाणी कपात किंवा आज पाणी येणार नाही, असे शब्द कराडवासियांनी गेल्या साठ सत्तर वर्षात कधीच ऐकले नाहीत. पाणीआमच्या उशाला आहे. ज्येष्ठ नेते स्वर्गीय पी डी पाटील यांच्या दुरदृष्टीमुळे शहरात पाणीपुरवठा योजना राबविण्यात  आल्या, आणि आजही त्या सुरळीत सुरू आहेत.

पंचवीस तीस वर्षे पुर्वीचा म्हणजे 1985-90 चा काळ आठवला तर कराड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. दहा वीस गावे सोडली तर कोणत्याही गावात पाणी योजना नव्हत्या. गावात एखादी विहीर, आड असायचा. तेथून सारा गाव पाणी भरायचा. आम्ही करवडी गावकरी पाणी आणायसाठी रानामाळात भटकायचो. एका खाजगी विहीरीतून पाणी पाईपलाईन मधून करवडी स्टॅन्ड मागे बांधलेल्या टाकीत साठवले जायचे.  तिथे पाणी भरायला सारा गाव यायचा. पाणी भरणे हे घरातील पुरुष मंडळी, तरूणाचे दिवसभरातील महत्वाचे काम असायचे.

संपूर्ण आयुष्यभर आमच्या गावचे माजी सरपंच कै शंकरराव काशिद यांनी गावाला पाणी पाजण्याचे  काम केले. पहाटे चार पाच वाजता उठून मोटर सुरू करायचे ते. इकडे पाण्याच्या टाकीपुढे नंबर लागायचे. लांबलचक लाईन असे. टाकी पासून आमचे घर जवळ होते, त्यामुळे मोठी घागर नंबरला लावायचे ( नावडते ) काम माझ्या कडे असायचे. पाणी माझे वडील आणि थोरले बंधू आण्णा भरायचे. टाकीवर सकाळी पाणी बाणी असायची, खुप गर्दी व्हायची. कोणीतरी मध्ये घुसला की भांडणे पण व्हायची. स्टॅन्ड वर एक जिजाबा पवार यांचे हाॅटेल होते. जेज्याचे हाॅटेल म्हणून ते प्रसिद्ध होते. हाॅटेलात पाणी टाकीतून डायरेक्ट प्लॅस्टिक पाईप टाकून पाणी नेले होते.  सारे गाव, शाळेची पोरं, वाटसरू, प्रवासी तिथे पाणी प्यायचे म्हणून जेज्याला दिलेले ते मोफत कनेक्शन गावाला मान्य होते. कधीकधी टाकी पाणी भरून वाहू लागले की विहीरीवर जाऊन मोटर बंद करेपर्यंत ओव्हर फ्लो पाण्यात पोरं आंघोळ करायची, पाणी वाचवायसाठी . कठीण काळ होता तो.



 त्या टाकीवर एक वाक्य कोरले होते. ते वाक्य आम्ही पोरं वाचायचो,अर्थ समजून घ्यायचो. ते वाक्य खरंच पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या अडाणी शहाण्या गावकरी लोकांच्या सुपीक डोक्यातून तिथे लिहले गेले होते. आजही ते वाक्य तिथे आहे.
               ' सार्वजनिक जलधारा जपून वापरा '
हे वाक्य पाणी बचतीचा संदेश देत होते. एवढ्या कष्टाने पाणी घरी नेल्यावर कोणी त्याचा अपव्यय करेल का? तरीही माझ्या गावातील विचारवंत मंडळींनी टाकी बांधकाम सुरू असताना ते कोरले होते. मला खरंच दाद द्यावी वाटते, नतमस्तक व्हायला आवडेल त्याच्यासमोर. किती मोठ्ठा विचार होता तो. पाणी वाचवा,जलधारा जपून वापरा, पाणी मौल्यवान आहे, हे समजून, पटवून  देणारा !




आज माझ्या गावात सगळीकडे पाणी खळखळतंय फक्त आरफळ कालव्यामुळे. काळ बदलला, पाणी आलं, समृद्धी आली, सारा गाव, भाग पाणस्थळ झाला आहे.  कराड  परिसरातील सर्व गावात पाणी पुरवठा योजना आहेत. सार्वजनिक नळ बंद झाले, कमी झाले आता घरोघरी नळ आले आहेत. अनेक गावांमध्ये, कराड शहरात सकाळी, संध्याकाळी पाणी येतं. सकाळी पाणी आलं की संध्याकाळी भरलेले पाणी ओतून टाकायचं आणि संध्याकाळी पाणी आले की सकाळी भरलेले पाणी ओतून टाकायचे, हे सुरू झाले आहे. पाणी भरपूर आहे, साठा खुप आहे, काय करायचे पाणी ठेऊन, पाणी शिळं झाले आहे, अशी खुळी समजुत, हुशारी असणारी आपण कृष्णाकाठची विद्वान मंडळी पाणी फेकून देत आहोत. मुर्खपणाचा कळस गाठला आहे आपण. हे बरोबर नाही. पाणी जीवन आहे. पण हेच पाणी थोडं वास यायला लागला की आजार पण आहे. पाणी नाल्यात, गटारात ओतून दिल्यावर ते कुठे जाते याचा विचार केला आहे आपण कधी ? 
2004ली प्रीतीसंगमावरून काॅलममध्ये कराडकरांनो पाणी वाचवा,  असा लेख मी लिहला होता.  तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती वेगळी नाही. पाणी लुटणारे, उधळपट्टी करणारे कराडकर तसेच आहेत. त्याच्या  मनोवृत्तीमध्ये काही फरक पडला नाही. पण आता शहाणे व्हायची वेळ आली आहे. कोयना धरणात पाणी साठा खुप कमी आहे. अजून एप्रिल, मे, जून पर्यंत पाणी पुरवायचे आहे.लवकरच कराडात पाणी एकवेळ मिळण्याची शक्यता आहे.  अजून गंभीर परिस्थिती झाली तर  एकआड दिवस  होऊ शकतो. टेंभू योजना पाणी साठवल्यामुळे आपल्याला संगमावर पाणी दिसतंय. किमान पाणी पहायला मिळतंय हे पण आपले नशीबच आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी नगरपालिका मोठा खर्च करते. आपल्याला घरपोच पाणी पुरवते आणि त्या शुद्ध पाण्याने आपण वाहने धुतो, रस्त्यावर पाणी मारतो, ते पाणी  ओतून टाकतो, याला शहाणपणा म्हणता येईल का? स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत असे शहाणे रहातात, हे इतरांना कळले तर साहेबांचे नाव खराब होईल. चला तर मग  आज शपथ घेऊ या, प्रत्यक्ष  आचरणात आणू या. 



आज आंतरराष्ट्रीय जल दिन
यानिमित्ताने आजपासून संकल्प करूया....!


☝मी पाणी वाचवणार.
☝मी पाणी गटारात ओतणार नाही .
☝पाणी शिळे होत नसते, त्यामुळे मी पाणी फेकणार नाही.
☝मी रस्त्यावर पाणी मारणार नाही .
☝मी वाहन धुवायला पाणी वाया घालवणार नाही .
☝मी मला हवं तेवढं पाणी घेणार.
☝उरलेलं पाणी पुन्हा वापरणार, फेकणार नाही.
☝मी घरातले नळ, व्हाॅल्व्ह दुरूस्त करणार.
☝मी पाणी संपत्ती  प्रमाणे वापरणार, एक एक थेंब वाचवणार.

          आम्ही पाणी वाचवणार, शहाणे कराडकर बनणार!

                  कृष्णाबाईच्या नावानं चांगभलं
                         ..............................सतीश मोरे




..............सतीश मोरे.

२१ मार्च २०१६

काम हिच जात

           'कामावरून जात नव्हे काम हीच जात'


सध्या सोशल नेटवर्किंगचा जमाना आहे. फेसबुक, ट्विटर, हाईक, व्हाॅटसअप आदी मेडीयावर तरूण पिढी तुटून पडलेली असते. आपल्याकडे  whatapp सध्या जोरात आहे. फोन बुक मध्ये सेव्ह नंबर पैकी 90 %लोकांकडे हे अॅप आहे. त्यामध्ये ग्रुपची मोठ्ठी चलती आहे. ग्रुप तयार करणे खुप सोपे असल्या कारणाने अॅडमीन सरांनी त्या कामात सपाटा लावला आहे. मित्रांचा ग्रुप, शेजारी, गाववाले, शाळा, कॉलेज, ऑफिस, बिल्डिंग, शेजाशेजारी,फॅन्स आदी प्रकारचे शेकडो ग्रुप रोज तयार होत आहेत. कोणाची इच्छा असो वा नसो त्याला ग्रुपमध्ये घेतले जाते. या ग्रुपवर दिवसभर मेसेजेस येत राहतात. रात्री उशिरा पर्यंत चॅटिंग सुरू असते.

एकच मेसेज, इमेज अनेक ग्रुपवर पुन्हा पुन्हा येत राहते. आपल्याला काय वाटते,  या इमेजचा, फोटोचा अर्थ काय याची जराही खात्री न करता, माहिती न घेता मेसेज पुढे पाठवले जातात. मी स्वतः पन्नास ग्रुपमध्ये आहे.  अशाच एका ग्रुपमध्ये परवा व्हाॅटस अपवर मला एक फोटो आला होता. देशपांडे बिर्याणी हाऊस नावाची. कोकणातील एका हाॅटेल किंवा धाब्याचा फोटो होता तो. या फोटोखाली एक कमेंट होती, 'येवढेच बघायचे राहिले होते ' देशपांडे नावाची ब्राह्मण व्यक्ती बिर्याणी हाउस काढते, ब्राह्मण लोक मटणाचे हाॅटेल काढतात, चिकन, मटण डिश विकतात , हे बरोबर नाही, मटण न खाणारे ब्राह्मण मटण विकायला लागले, खायला लागले, असे त्या संबंधित व्यक्तीला कमेंटमध्ये म्हणायचे होते.


देशपांडे बिर्याणी हाऊसचा हा फोटो, त्याबाबतची प्रतिक्रिया पाहून मला पंढरीच्या वारीत भेटलेले अनेक हिंदु मुस्लिम विक्रेते डोळ्यासमोर उभे राहिले. कोणते काम कोणी करायचे हा शोध आणि नियम कुणी लावला, ब्राह्मणांनी हाॅटेल सुरू करायची नाहीत का? ब्राह्मणानी कोणते उद्योग करायचे आणि करायचे नाहीत ही नियमावली कुणी व कधी लावली ?

हिंदुनी, मुस्लिमांनी काय काम  करायचे आणि करायचे नाही?  काम कशासाठी करायचे असते? लोक काम का करतात? कोणत्या जातीच्या लोकांनी कोणते काम करायचे असा काही नियम आहे का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले. माझ्या आसपास, कराडात, जिल्ह्य़ात कोण कोण काय कामे करतो याची माहिती घेतली. या दरम्यान मला बारावीच्या इंग्रजी पुस्तकात वाचलेली, शिकलेली आणि शिकवलेली  एक गोष्ट मला आठवली. ती गोष्ट मला सांगावाशी वाटते.

गोष्टीचे नाव होत शंभर लोकांची एक जमात.
Community of People.

एक गाव होतं.  डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं, त्या गावात 100 स्त्री पुरुष रहात होते. सारे लोक अतिशय अतिशय कष्टाळू होते. दिवसभर काम करून खाऊन पिऊन सुखी होते सारे. त्या शंभर लोकांमध्ये एक अतिशय हुशार, वेगळ्या विचाराचा एक प्रज्ञावंत, विचारवंत होता. गावातील लोक रोज सकाळी पाणी आणण्यासाठी खुप लांब पायपीट करीत उंचावर असलेल्या झर्‍या जवळ जायचे. या कामासाठी सकाळचे तीन चार तास खर्ची पडायचे.  हे सर्व लोक हे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या कामाला लागायचे. त्या हुशार माणसाने याचा अभ्यास केला,  माहिती घेतली,  पाणी प्रवाह कसा आहे याचे निरीक्षण केले आणि हे पाणी गावात कसे आणता येईल याचे नियोजन सुरू केले. 

रात्रंदिवस काम केले, तो झरा ते गाव पाणी प्रवाहाने आणण्यासाठी चर खोदायला त्याने सुरुवात केली. शेवटी ते पाणी गावात आले, लोक खुश झाले. आता गावातील चौकात पाणी मिळणार, पाण्यासाठी चार तास घालवावे लागणार नाहीत, याचा सर्वानाच आनंद झाला. मात्र त्या हुशार व्यक्तीने लोकांना पाणी देण्यासाठी  एक  अट घातली. मी तुम्हाला पाणी देईन मात्र त्या बदल्यात तुम्हाला मला तुमचा वेळ द्यावा लागेल, आज पर्यंत तुम्ही पाणी आणायला रोज चार तास घालवत होता,आता एका तासात तुमचे पाणी भरण्याचे काम होणार आहे, त्यामुळे तुमचे तीन तास वाचतील. ते तीन तास तुम्ही मला द्यायचे, अशी अट त्याने घातली.

रोज पाणी आणायला लागणार्‍या वेळेच्या बदल्यात वाचलेला तोच वेळ हुशार व्यक्तीला दयायची अट सर्वानी मान्य केली. सर्व 99 लोक हुषार व्यक्तीचा घरी रोज तीन तास कामाला येऊ लागले. घरातील स्वच्छता, शेती मशागत, कपडे धुणे, झोपडी बांधणे,जनावरांची काळजी घेणे, दुध काढणे आदी अनेक प्रकारची कामे लोक करू लागले.  ही कामे करत  असताना त्या हुशार व्यक्तीने अनेक लोकांना हेरले. त्याच्या असे लक्षात आले की अ नावाची व्यक्ती फळे फुले याची काळजी योग्य प्रकारे घेतोय, त्याला यात रस आहे. मग त्याने अ ला इतर सर्व लोकांच्या घरातील, शेतातील फळाफुलांची कामे करायची. त्या बदल्यात  इतर सर्व व्यक्तींनी त्याचे इतर कामे करायची. पुढे ती व्यक्ति गावातील माळी म्हणून उदयास आला. 


त्या हुशार व्यक्तीने इतर सर्व लोकांमधील एक एक गुण हेरला.  पुढे त्याच्यातील सर्वोत्तम गुणाचे ते काम दिले आणि कामावर आधारीत व्यवस्था निर्माण झाली.  चांगली कपडे शिवणारा शिंपी झाला, चांगले पशु संवर्धन करणारा गवळी झाला. चांगली मातीची भांडी तयार करणारा कुंभार झाला, न्हावी,चर्मकार, लोहार, शेतकरी, गवंडी, गायक, वादक, धोबी  असे अनेक कर्मकार झाले. काम चांगले करणारा कुशल कामगार तयार झाला, पुढे त्याची पत्नी, मुले, पुढची पिढी हेच काम करत राहीले व त्यानंतर त्याच नावाने, कामाने त्यांना ओळखले जाऊ लागले. कामावर आधारित व्यवस्था, पुढे जाती पडल्या. अशा आशयाची ती गोष्ट होती

.
ही गोष्ट मला पटते. जो चांगले काम करत होता त्या पद्धतीने त्याचा व्यवसाय वाढला. ज्याला जी गोष्ट आवडते, करू वाटते त्याने ती मन लावून करायची, त्याच क्षेत्रात पुढे जायचे, शिकावे, मोठ्ठे व्हायला हवे.  जात व्यवस्था कामावरून तयार झाली तो काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे. आजचे कलियुग नसून कलायुग आहे. आज कोणतीही व्यक्ती कोणतेही काम करू शकते, नव्हे करत आहे! सोमवार पेठेत एक रेखाताई नावाची मराठा समाजाची महिला आहे. ती गेल्या दहा वर्षापासून अपार्टमेंट स्वच्छता काम करते. रोज सकाळी पाच ते दहा तिचे काम चालले. पंधरा ते वीस अपार्टमेंट बाहेरून झाडायचे, प्रत्येक फ्लॅट मालकाचा कचरा एकत्र करायचा, सर्व कचरा पालिकेच्या गाडीत टाकायचा. खुप कष्टाचे काम आहे, यातून या महिलेने सोमवार पेठेत स्वतःचे दोन मजली घर बांधले आहे. मराठ्यांनी हे काम करायचे का? असे म्हणत बसली असती तर रेखाताई आज मोठय़ा घराची मालकीण झाली नसती.

देशपांडे बिर्याणी हाऊसचे नावाने खडे फोडणारे लोकांनी घाटावरच्या सिद्धिविनायक आणि कृष्णाबाई मंदीरासमोर दुर्वा, फुले, नारळ विकणारे मुस्लिम लोक पहायला यायला हवे. पंढरपुरात तर विठ्ठलचा प्रसाद, फोटो,  बुक्का विकणारे शेकडो मुस्लिम लोक पहायला मिळतात. मी स्वतः अफसाना चाची कडून प्रसाद विकत घेतला होता.

आज कोणत्याही व्यवसायात कोणीही पडू लागले आहे.  राज्य व राष्ट्रीय पातळीवर माहिती घेतली तर लाखो उदाहरणे पहायला मिळतील. पण ती पहायला जावी लागतील. येथे आपल्या परिसरातच असे अनेक लोक आहेत. कराडच्या संगम हाॅटेलचे मालक ब्राह्मणच आहेत, गेली चाळीस वर्षे मटण डिश खाऊ घालत आहेत. मटणाची, चिकनची दुकाने आज हिंदु लोकांनी पण टाकली आहेत.  सातारच्या गोडोली नाक्यावर साईबाबा मंदिरासमोर  काल मी गणेश चिकन सेंटर नावाचे दुकान पाहिले. हा बोर्ड वाचून आपण काय म्हणणार?

आज खानदानी घरातील अनेक महीलांनी ब्युटी पार्लर थाटली आहेत. केस कापणे हे काम फक्त नाभिक समाजाचे राहीलेले नाही. मारवाडी, मराठा समाजातील युवकांनी चपल्याची दुकाने सुरू केली आहेत. अनेक जाती जमातीचे लोक सुवर्ण व्यवसायात दिसतील की जे काम पुर्वी गावातील सोनार करायचा. परंपरागत काम करणारे सुतार, लोहार यांची जागा उत्तर भारतातून आलेल्या पोटार्थी कामगारांनी घेतली आहे.  रोजगार ही त्यांची जात नसून गरज झाली आहे.


काम आणि पोटाचा जवळचा संबंध आहे. कामाला, व्यवसायाला कोणती जात नसते. काम पोटासाठी असते. व्यवसायासाठी, कुटुंबातील सदस्याच्या उदरनिर्वाहासाठी , प्रगतीसाठी आणि  मोठ्ठे होण्यासाठी तसेच समाज आणि स्वतःच्या भल्यासाठी काम, व्यवसाय  असतो, ऐवढेच म्हणावे लागेल. चांगले काम करणारा , सेवा देणारा,सातत्य राखणारा आणि ग्राहक देवो भव म्हणणाराच यापुढे टिकणार आहे. जात पाहून दुकानात जाणारे, जातीभेद करण्यात धन्यता मानत राजकीय पोळी मागणारे काळाच्या ओघात संपले आहेत, संपणार आहेत.
                                                             .............सतीश मोरे

सोशल प्रीतिसंगम.....प्रत्येक सोमवारी पुढारी मध्ये वाचा

२० मार्च २०१६

शनिवार कविता डे

शनिवार कविता डे  
रविवार सुट्टी

ब्लॉग वर रोज लिखाण करणार आहेच.  
अलीकडे आतून  कविता बाहेर पडू लागली आहे 
सुचू लागली म्हणणार नाही. कारण रोज काहीही सुचतं. 
पण ते कृतीत उतरत नाही.  
कविता आतून येते असं म्हणतात. 
बघुया काय काय आहे 'आत'  
करतो शेअर प्रत्येक शनिवारी.
लोभ आहेच, वृद्धिंगत व्हावा 😑

8 मार्च रोजी महिला  दिन झाला. 
तसा रोज त्याचाच दिवस  असतो, 
कामाचा, लढण्याचा, झटण्याचा आणि कष्टाचा.
द ची वेलांटी चुकली की सारा अर्थ उलटा.
त्यामुळे हा महिला सन्मान दिन असे मी समजतो.
रोज नवीन नवीन आव्हाने स्वीकारणारी, 
नवे नवे देणारी, घेणारी, 
पुनर्नवा म्हणजे 
आजची स्त्री 
तिला ही कविता समर्पित. ..


🙆पुनर्नवा🙆


तुला मी कोणत्या नावाने हाक मारू?
वादळ म्हणू की वादळवेल म्हणू
नारी म्हणू की दिव्यनारी म्हणू
वैदेही म्हणू की सरस्वती म्हणू
राधा म्हणू की मीरा म्हणू
तुला मी कोणत्या नावाने हाक मारू?

सखी म्हणू की हरिप्रिया म्हणू
अबला म्हणू की सहस्रबला म्हणू
स्रीशक्ती म्हणू की सहनशक्ती म्हणू
प्रज्योती म्हणू की आरती म्हणू
तुला मी कोणत्या नावाने हाक मारू?

नदी म्हणू की प्रेमसागर म्हणू 
साधना म्हणू की प्रेरणा म्हणू
देवी म्हणू की दिव्यशक्ती म्हणू 
शांताई म्हणू की विठाई म्हणू
तुला मी कोणत्या नावाने हाक मारू?

राधिका म्हणू की सेविका म्हणू
श्वास म्हणू की प्राणवायू म्हणू 
गीत म्हणू की संगीत म्हणू
साद म्हणू की सुसंवाद म्हणू
तुला मी कोणत्या नावाने हाक मारू?

विद्या म्हणू की ज्ञानदा म्हणू
साथी म्हणू की अस्मिता म्हणू
अर्पिता म्हणू की समर्पिता म्हणू
देवयानी म्हणू की शर्मिष्ठा म्हणू
तुला मी कोणत्या नावाने हाक मारू?

तुझा जन्म 
फक्त देण्यासाठी,
इतरांसाठी , झगडण्यासाठी
वात्सल्यासाठी, करूणेसाठी
त्यागासाठी, शिकण्यासाठी
रोज नवनवीन शिकवण्यासाठी
आई,   ताई,  अर्धांगिनी, कन्याकुमारी 
तुला लाख लाख सलाम 🙏🙏

            ...........सतीश मोरे

Dedicated to all women 
who know only to give, strive and love. 
My wife, sister, daughter  and mother !

१९ मार्च २०१६

सोळावं वरीस मोक्याचं

सोळावं वरीस मोक्याचं
आकरावीचे काॅलेज सुरू झाल्यानंतर महीना दिड महिन्यात मला आलेला अनुभव मी काल शेअर केला. जवानीत गाढवीण सुद्धा सुंदर दिसते, आपण तिच्या मागे लागायचे नसते.  योग्य वेळी योग्य गोष्टी करायला हव्यात, करायच्या असतात. या शब्दरूपी शस्रानी मला समजून सांगणारे, बरं करणारे गुरू मला भेटले म्हणून आयुष्यातील तो दिवस माझ्या साठी टर्निंग पाॅईंट ठरला. थोरात मॅडम यांनी मला मंत्र दिला,  इथे ज्या कामासाठी आला आहे तेच करा. ते काम कोणते तर अभ्यास करायचे, शिकायचे, चांगल्या मार्काने पास व्हायचे, करियर करायचे, स्वतःच्या पायावर उभे रहायचे. हे सर्व करण्यासाठी आपण आपले लक्ष या गोष्टीवर  केंद्रित केले पाहिजे. जी गोष्ट अनेकांनी सांगून मी मनावर घेतली नसती ती एका अनुभवाने, तेजस्वी सल्ल्याने मला शक्य झाली.

तेरा ते एकोणीस Thirteen To Nineteen ही सात वर्षे  नाजुक असतात.  मानसशास्त्रज्ञ याला  TEEN AGE असे म्हणतात. आमचे ओगलेवाडीचे सय्यद सर म्हणायचे, ' या टीन वयात ज्याने संयम ठेवला, लक्क्ष्यावर लक्ष केंद्रित केले तो आयुष्याच्या परिक्षेत कधीच फेल होणार नाही '  काय काय शक्य असते या वयात असा प्रश्न कोणी विचारला तर मी म्हणेन काय  काय शक्य नाही या वयात. आपल्याकडच्या शिक्षण पद्धती नुसार या वयात आठवी ते बारावी हा महत्त्वाचा काळ असतो.  या दरम्यान दहावी  आणि बारावी  अशा दोन महत्वाच्या परिक्षांना आपण सामोरे जात असतो. आठवी नववीचे कोवळे वय काही तरी नवीन शोधत असते . घरातील व्यक्तीं पेक्षा बाहेरच्या लोकाचे, मित्रमंडळीचे बरे वाटते आणि नवनवीन शोध करण्याचे वेध लागतात. एकटे बाहेर जाऊ वाटते,  शारीरिक बदल होतात,  काही गोष्टी समजत नाहीत. समजून सांगणारे चांगले मित्र,  सल्लागार भेटले नाहीत तर 'बालक पालक' मधील पोरांसारखी अवस्था होते. माझ्या काळात बरीच माहिती आम्हाला मिळाली नव्हती, कोण सांगत पण नव्हते, मात्र आजची ANDROID परिस्थिती खुप वेगळी आणि गंभीर आहे. मला खुप चांगले मित्र आणि आईवडिलांचे संस्कार मिळाले , करवडी सारख्या अध्यात्मिक वातावरण असलेल्या गावांमध्ये रहाण्याचे भाग्य लाभले.

पंधरा किंवा सोळाव्या वर्षी दहावीचे महत्वाचे वर्ष असते. सोळाव्या वर्षी खुप मोठ्ठे कार्य करणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भुमित महाराष्ट्रात आपण रहातो, हे काय कमी आहे ! ज्या वयात नवे नवे अंकुर फुटत असतात, नवी क्षितिजे खुणावत असतात त्याच मार्गावर  आपण जायला हवे.  ही क्षितिजे ( टेकड्या नव्हे) खुप विस्तीर्ण  आहेत, असतात . त्या दिशेने वाटचाल केली तर आयुष्य सुंदर होऊ शकते, याची जाणीव झाली पाहिजे. आपल्याकडे सोळावं वरीस धोक्याचं असे म्हणतात. चांगले मित्र, चांगले सहकारी, चांगले विचार, चांगले साहित्य, चांगले शिक्षक या काळात मिळाले नाहीत तर खरंच हे वय धोकादायक आहे.  वहात जाणार्‍या पाण्यात चांगले वाईट सर्व काही मिसळते. आपली धारा, धारणा , ध्यान योग्य दिशेने असली की चुकीचे काम होणारच नाही. असे म्हणतात आपण कोणतीही चुकीची गोष्ट, काम,  विचार करत  असतो तेव्हा आतून एक आवाज येतो. तो आवाज सांगतो तू जे करतो आहे ते बरोबर नाही. ज्यांना हा आवाज  ऐकू येतो,  पटतो तो कधीच वाईट मार्गाने जात नाही. मात्र हा  आवाज  ऐकू येऊ नये म्हणून भुलवणारे अनेक भोवरे तुमच्या कानाभोवती भुंग भुंग करत  असतात. त्यांना बाजूला काढून टाका. ते करण्यासाठी चांगले साहित्य वाचायला हवे.  मला माझ्या आयुष्याच्या या कठीण काळात आकरावी-बारावीत ययाती आणि मृत्युंजय या दोन महान कलाकृती वाचायला मिळाल्या.  या कादंबरीचे वाचन करताना मी नोटस् काढल्या होत्या.  त्यामधील दिव्य विचार आणि सकस, समृद्ध विचाराचे सोबती, सल्लागार, भाऊ,  अध्यात्मिक गुरू यामुळे मी नेहमी रूळावर राहीलो.

सोळाव्या वर्षी खुप काही करता येत. या काळात करवडी मध्ये माझी दोन ज्ञानेश्वरी पारायणे झाली होती. वाचन केले होते, समजले किती माहिती नाही, पण ज्ञान काय असते याचा स्पर्श  होऊन गेला होता. पसायदानाचे आकर्षण लागले. आकरावी मध्ये चांगले मार्क मिळाले. बारावीच्या परीक्षेत चांगले यश मिळाले. काही वाईट वळणे लागली नाहीत. एक चहा आणि एक क्रिमरोल चौघात शेअर करणारे मित्र लाभले .काल मी जो अनुभव कथन केला त्यावरून  अनेक मित्रांचे फोन आले , काही पालकांनी पण फोन केला.  त्यांनी ही गोष्ट त्याच्या  आकरावी बारावी मधील मुलांना दाखवली. मुलांना कसे सांगणार असा प्रश्न पडलेल्या एका पालकांनी माझे आभार मानले. आपल्याला आलेले अनुभव शेअर करणे, त्यातून दुसर्‍याचा फायदा होणे यासाठीच तर हा खटाटोप!


                                                                                                                              सतीश मोरे


Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...