फॉलोअर

१६ जानेवारी २०१९

आवा चालली पंढरपूरला

*अंतरंग*

*परिसे गे सुनेबाई |*
*नको वेचू दूध दही ||१*
*आवा चालीली पंढरपुरा |*
*वेसींपासुन आली घरा ||२*
*ऐके गोष्टी सादर बाळे |*
*करि जतन फुटके पाळे ||३*
*माझा हातींचा कलवडू |*
*मज वाचुनी नको फोडूं ||४*
*वळवटक्षिरींचे लिंपन |*
*नको फोंडू मजवाचून ||५*
*उखळ मुसळ जाते |*
*माझे मनं गुंतले तेथे ||६*
*भिक्षुंक आल्या घरा |*
*सांग गेली पंढरपुरा ||७*
*भक्षी परिमित आहारु |*
*नको फारसी वरों सारू ||८*
*सुन म्हणे बहुत निके |*
*तुम्ही यात्रेची जांवे सुखे ||९*
*सासुबाई स्वहित जोडा |*
*सर्वमागील आशा सोडा ||१०*
*सुनमुखीचे वचन कानी |*
*ऐकोनी सासु विवंची मनी ||११*
*सवतीचे चाळे खोटे |*
*म्या जावेसे इला वाटे ||१२*
*आता कासया यात्रे जाऊ |*
*काय जाऊन तेथें पाहू ||१३*
*मुले लेकरे घर दार |*
*माझे येथेंचि पंढरपूर ||१४*
*तुका म्हणे ऐसे जन |*
*गोवियेलें मायेंकरून ||१५*

          *संत तुकाराम महाराज*

या अभंगावर आधारित निरूपण कीर्तन मी लहानपणी ऐकले होते. आज तो अभंग पुन्हा आठवायचे कारण दुपारी एक मित्र मला पंढरीच्या वारीबाबत विचारत होता.अठरा दिवस तुम्ही वारीला कसे जाता, इथलं सोडून तिथं कसं जमतं तुम्हाला ,असा सवाल त्याने मला केला. वारीला आला कि तुला हे सर्व कळेल ,तु चल तर वारीला असे बोलून त्याला मी या अभंगाच्या दोन ओळी ऐकवल्या. संसारातून पाय न निघणाऱ्या मानवाचे अतिशय सुंदर चित्रण संत तुकाराम महाराज यांनी अभंगातील खुमासदार गोष्टीतून वर्णन केले आहे.

आवा नावाची महिला पंढरीला यात्रेला चालली आहे. घरातून ती बाहेर पडते खरी पण तिला काहीतरी आठवते आणि ती वेशीपासूनच घरी परत येते. प्रपंचाच्या अनेक साधनामध्ये तिझे मन गुंतले आहे.तीला घरातील प्रत्येक वस्तूची काळजी वाटते. मी पंढरीला गेल्यावर त्याचे काय होणार या विवंचनेत ती परत येऊन सुनबाईला सांगते,या सगळ्यां वस्तुंची काळजी घे. कोणी भिक्षा मागायला आला तर त्यांना काही देऊ नको, तुझी सासू पंढरपूरला गेली असं सांग. सासुबाईंच्या एवढया सुचना व आदेश ऐकून शेवटी सुनबाई त्यांना सांगते, सासुबाई तुम्ही आरामात जावा , मी सर्व काळजी घेईन.पाठीमागील सर्व आशा सोडा असा सल्ला देत तुम्ही बिनधास्त पंढरपूरला जावा असे सुनबाईने सुनावल्यानंतर सासुबाई तापते आणि तिच्या उद्देशाबद्दल संशय घेऊन तिला सवतीची उपमा देते अन् म्हणते, मी इथून जावे असे हिला वाटतंय,पण मी जाणार नाही.कारण माझे घर-दार, माझी मुले- लेकरे हेच माझे पंढरपुर आहे असे सांगून पंढरपूरला जायचे रद्द करते.

*आपल्या समाधानासाठी घरदार मुले लेकरे यांनाच परमेश्वर आणि तिर्थक्षेत्र मानण्यापर्यंत या लोकांची मजल जाते कारण त्यांचा संसारातून पाय निघत नाही,असे तुकाराम महाराज म्हणतात.*

पंढरीच्या वारीला मी ह्या वर्षी नक्की येणार, मला तुमच्या बरोबर घेऊन जावा असे सांगणारे मला अनेक मित्र भेटले आहेत. न विसरता मी प्रत्येक वर्षी त्यांना आठवण करतो जून महिन्यात मात्र त्यांना त्यावेळेला बरोबर अडचणी येतात, हा अभंग हेच तर सांगतो.

माझ्या शिवाय जगाचे कसे होणार, मी जर गावात थांबलो नाही तर गावाचे कसे होणार ,माझ्या संसाराचे काय होणार ,माझ्या कामाचे काय होणार, माझ्या नोकरीचे काय होणार, माझ्या मुलाबाळांचे काय होणार, माझ्या व्यापाराचे काय होणार, नगराचे काय होणार याची चिंता करत बसलेल्या लोकांना देवाची आठवण येते खरी पण फक्त संकटातच. मोह ,माया,लोभ आणि विषयसुखाच्या आहारी गेलेल्या मानवाची अवस्था या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी मांडली आहे.

©@ सतीश वसंतराव मोरे
*सतिताभ*

१६.०१.२०१९

karawadikarad.blogspot.com

1 टिप्पणी:

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...