फॉलोअर

०२ जुलै २०२१

सह्याद्री साखर कारखाना

 निसर्गवारी २०२१

१ आणि २ जुलै
हरिनामाचा महिमा सांगणारी पंढरीची वारी आजपासून सुरू होत आहे. आळंदी ते पंढरपूर वारी प्रत्यक्षात निघणार नसली तरी आळंदी येथून आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखीचे प्रस्थान होणार आहे आणि पुढे एसटी बसमधून ही पालखी वाखरी येथे जाणार आहे. याहीवर्षी पंढरीला जाण्याचा योग येणार नाही,वारी करता येणार नाही,त्यामुळे निसर्गवारी करण्याचा मनोदय आम्ही व्यक्त केला होता.
काल १ जुलै २०२१ रोजी ज्येष्ठ नेते पी. डी.पाटील यांच्या जयंतीदिनी सह्याद्री साखर कारखाना पाठीमागे असणाऱ्या एका टेकडीवर निसर्गवारीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे चेअरमन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे,तहसीलदार अमरदीप वाकडे आणि आमचे पंढरीच्या वारीमधील सहकारी युवानेते जशराज पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि कारखान्याचे संचालक मान्यवर मॅनेजिंग डायरेक्टर उपस्थित होते.
नामदार पाटील यांनी आमच्या निसर्गवारीचे कौतुक केले, आपुलकीने त्यानी या संपूर्ण वारीची माहिती घेतली, पुढील 19 दिवसात कोण कोणत्या गावी जाणार आहात झाडे कोणती, लावणार आहे, झाडे कोण जगवणार आहे, याची माहिती घेऊन ना. बाळासाहेब पाटील यांनी आमच्या निसर्ग वारीला शुभेच्छा दिल्या.
आज दोन जुलै आज प्रत्यक्षात पंढरीच्या वारीला आळंदीतून सुरुवात होणार आहे,आज आमच्या निसर्ग वारीचा पहिला दिवस पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम च्या जयघोषात सुरू केला. साडेसहा वाजता रणजित पाटील, संदीप सुर्यवंशी आणि मी ठरल्याप्रमाणे ओगलेवाडी येथे पोहोचलो आणि सुरली घाटाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. हरिपाठ सुरू झाला 'हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी' हरिपाठ करत करत आम्ही वनवासमाची येथील श्रीकृष्ण ज्ञान मंदिर महिला आश्रम (महानुभाव) मध्ये पोहोचलो.
या आश्रमाची स्थापना 1971 तपस्विनी कमळाबाई अक्का लातूरकर यांनी केली होती. या आश्रमाचे आणि माझे अनेक वर्षापासून ऋणानुबंध आहेत.ओगलेवाडी येथे मी सय्यद सर यांच्या इंग्लिश च्या क्लासला जात होतो या क्लासमध्ये भगवान जाधव आणि तानाजी घार्गे हे दोन मित्र मला मिळाले तेथेच मला माझा लहानपणीचा मित्र श्रीधर नलवडे पंधरा वर्षानंतर भेटला होता. भगवान आणि तानाजी हे दोघे वनवासमाची येथील श्रीकृष्ण मंदिरामधील महानुभाव आश्रमात राहत होते. या आश्रमाच्या संचालिका लिलाताई लासूरकर या तानाजी आणि भगवान जाधव यांच्या मावशी होत. मुळ खटाव तालुक्यातील हे दोघे ही या गावात राहत होत. पुढे वेगवेगळ्या कारणाने या मंदिरात येणे-जाणे सुरू झाले. परीक्षा जवळ आल्या की आम्ही या मंदिरात अभ्यास करायला जात असे. गेल्या चाळीस वर्षात एखादीच श्रीकृष्णजन्माष्टमी सोडली तर प्रत्येक वेळी जन्माष्टमी ला या मंदिरात मी जात आहे. या दरम्यान महानुभाव पंथाची माहिती मिळू लागली. महानुभाव पंथाचे गाढे अभ्यासक डॉक्टर कन्हैया कुंदप यांची या मंदिरातील एका कार्यक्रमावेळी माझी भेट झाली. महानुभाव पंथाची स्थापना १३ व्या शतकात चक्रधर स्वामींनी केली,हा पंथ अतिशय जुना आहे.ज्ञानेश्वरां महाराजांच्या काही काळ अगोदर 'महानुभाव' संप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला. ‘महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावः’ या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो महानुभाव पंथ, असे म्हटले जाते. स्त्रियांना भक्तीमार्गात सहित प्रत्येक ठिकाणी महत्त्व देणारा आदराचे स्थान देणारा हा अतिशय पुरोगामी पंथ आहे, अतिशय त्यागी जीवन आणि तपश्चर्या आहे या महानुभाव पंथामध्ये.
गेल्या अनेक वर्षापासून तपस्वीनी लीलाताई लासूरकर प पु प महंत कमळाकर बाबा या महिला आश्रम चालवत आहेत. दोन वर्षांपूर्वी या श्रीकृष्ण मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, अतिशय सुंदर असे भव्यदिव्य मंदिर सदाशिव गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वनवासमाची येथे बांधण्यात आले आहे. या मंदिरात सर्वांना प्रवेश असतो,आपण ज्ञानी वाचकांनी या मंदिराला अवश्य भेट द्यावी. आमच्या पंढरीच्या वारीची, निसर्ग वारीची सुरुवात श्रीकृष्ण मंदिरात गुरुवर्य लिलाताई यांचे दर्शन घेऊन झाली. या मंदिरातील श्री कृष्णाची मूर्ती अतिशय सुंदर आहे मंदिराचा गाभारा फार मोठा आहे. या आश्रमात सुमारे 25 महिला उपासिका अभ्यास करतात, श्रीकृष्णभक्ति करतात. महानुभाव पंथ आणि श्रीकृष्णभक्ती याबाबतचा स्वतंत्र लिहावं लागेल इतका मोठा इतिहास आहे.
श्रीकृष्ण माऊलीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे चालू लागलो. सव्वा सातच्या सुमारास आम्ही सुरली घाटामध्ये पोचलो. यादरम्यान रस्त्यावरून चालत असताना गेल्यावर्षीच्या पंढरीच्या वारीची मन मंदिर वारीची आठवण झाली. गेल्यावर्षी हा रस्ता करण्याचे काम चालू होते आणि आम्ही या रस्त्यावरून चालत गेलो होतो. त्यावेळी अक्षरशः रस्त्यावर चिखल होता,भरपूर पाऊस पडत होता मात्र तरीही आम्ही थांबलो नव्हतो. यावर्षी मात्र बरोबर उलटी परिस्थिती होती. सातच्या सुमारास सूर्याची किरणे डोळ्यावर येत होती,आकाश मोकळे होते. सुली च्या घाटात पोहोचल्यानंतर सागर हाके यांच्या नर्सरीमधून अगोदर ठरल्याप्रमाणे वडाची काही झाडे विकत घेतली. परत जानाई देवी मंदिरामध्ये आलो. सुली घाटाच्या पायथ्याशी असणारे जानाईदेवी मंदिर हे ओगलेवाडी पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थांचे दैवत आहे, श्रद्धेचे स्थान आहे. आमच्या करवडीची जानाईदेवी हे ग्रामदैवत आहे, या मंदिरातून प्रत्येक वर्षे यात्रेदिवशी आमच्या गावात पालखी आणण्यात येते. मंदिरात पूजाअर्चा करणारे दत्तात्रेय खोचरे हे आमचे भाऊबंद आहेत. या मंदिराची जागा सूर्यभान माने आणि त्यांचे बंधू भाऊ माने यांच्या मालकीचे आहे. अगोदर ठरल्याप्रमाणे मंदिराचे पुजारी दत्ता माऊलीनी मंदिराच्या समोरच एक खड्डा काढून ठेवलेला होता. यादरम्यान ट्रेकिंग साठी सायकलवरून आलेले आमचे कराडचे मित्र तिथे आम्हाला भेटले.त्यांनी या खड्ड्यात माती टाकण्यास आम्हाला मदत केली. मानेभाऊ आणि मान्यवरांच्या हस्ते मंदिराच्या समोर डाव्या बाजूला एक वडाचे झाड आम्ही लावले आणि पुन्हा एकदा पुंडलिक वरदे हरी विठ्ठलचा जयघोष केला. जानुबाईच्या नावाने चांगभलं असा गजर करत आम्ही जानुबाई चे दर्शन घेतले. त्या ठिकाणी चहा घेतला आणि आमचा परतीचा प्रवास कारमधून सुरू झाला.
वनवासमाची गावात पुन्हा एकदा आमच्या आत्याच्या घरी थांबलो. आमच्या आत्याचा मुलगा अशोक पवार हा दिव्यांग आहे. मध्यंतरी एका अपघातात त्याच्या दोन्ही पायाचे स्नायू दुखावले आणि तो पूर्ण अपंग झाला. गेल्या दहा वर्षांपासून तो व्हिल खुर्चीवर बसून काम करत आहे. अशोक पवार यांची इच्छाशक्ती प्रचंड आहे. चालता फिरता येत नसतानाही गावच्या विकासासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतातच तर दुसरीकडे आपल्यासारख्या असणाऱ्या दिव्यांगांच्या मदतीसाठी अशोक सतत धावून जात असतो. कुठेही भेटला तरी मला दाजी म्हणून हाक मारणाऱ्या चार-पाच लोकांपैकी आमचा अशोक आहे .अशोकच्या घरी कांदेपोहे करून घेऊन आम्ही पुन्हा कराडला परतलो.
अशा पद्धतीने आमच्या निसर्गवारीचा पहिला दिवस आज पूर्ण झाला, पाच किलोमीटर चालणं झालं, निसर्ग वारीतील दुसरे वडाचे झाड लावले. माऊलींच्या कृपेने पुढील काही दिवसात आमचा संकल्प पूर्ण होईल. हा संकल्प पूर्ण होण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे.आपणास शक्य असेल तर वडाची काही झाडे आम्हाला दान करावीत. ही झाडे आम्ही कराड परिसरात लावणार आहोत. धन्यवाद.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*
Ashok Mohane, Satish More Satitabh and 91 others
5 comments
1 share
Like
Comment
Share

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...