फॉलोअर

०३ जुलै २०२१

सुर्लीच्या घाटांमधील जानाई मंदिरा

 निसर्गवारी*

संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा!
3 जुलै 2021
राम कृष्ण हरी माऊली
काल सुर्लीच्या घाटांमधील जानाई मंदिरासमोर वृक्षारोपण केल्यानंतर आज आमचा संकल्प शामगाव घाट परिसरात जाण्याचा होता. त्यानुसार जाण्यासाठी पावणेसहा वाजता कराडच्या कृष्णा नाक्यावर जमलो. आज आमच्या वारीमध्ये सौरभ पाटील तात्या, विजय वाटेगावकर भाऊ, प्रमोद वेर्णेकर, गौतम करपे वाय.के. जाधव, मिलिंद डुबल हे सहभागी झाले होते. सहाच्या सुमारास आमची वाहने करवडी गावात आमच्या घरासमोर उभी करून आम्ही शामगावाच्या दिशेने चालायला सुरुवात केली.
सहा वाजून दहा मिनिटे झाली होती, थंड हवा वहात होती.वातावरण अतिशय प्रसन्न होते. राम कृष्ण हरी चा जप करत आमची पावले पडू चालु लागली . करवडी गाव सोडल्यानंतर दोन्ही बाजूला असणारी झाडे, हिरवागार निसर्ग, फुललेली शेती पहात आम्ही पुढे आलो. आरफळ कॅनॉल पार करून पुढे आलो. मोबाईलवर बाबा महाराज सातारकर यांचा हरिपाठ सुरू होता. कीर्तन सुरू होते. चिंचमळा परिसरापासून पुढे मोरांचे आवाज आम्हाला ऐकू येऊ लागले.खूप उत्साह येत होता. अंतवडी खिंडीपर्यंत पोचलो, एव्हाना सात वाजले होते. पुढे जात असताना वळणे, उंच डोंगर आम्हाला खुणावत होते. या रस्त्याने वाहनातून अनेकदा गेलो, मात्र चालत जाण्याचा प्रसंग पहिल्यांदाच आल. घाटाच्या सुरुवातीला आणि इकडे रस्त्याला काही लिंबू लिंबू पडलेली होत. ही लिंबे कशासाठी टाकली टाकली जातात हे मला माहित होते. करवडीमध्ये माझा जन्म झाला, माझं संपूर्ण बालपण गेलं. 2001 पर्यंत करवडीत राहायला होतो. गावातील कोणतेही लग्नाचं वराड शामगाव घाटातून पुसेसावळी, मसूर दिशेला जाणार असेल, नवीन नवरा नवरी देवदर्शनासाठी या घाटातून जाणार असेल तर या घाटाच्या अगोदर एका ठिकाणी लिंबू फेकले जाते, नारळ फोडला जातो. असे केले तर पुढील प्रवास सुरक्षित होतो, या ठिकाणी असणारी, कुठलीतरी शक्ती तुम्हाला त्रास देत नाही असा ग्रामस्थांचा समज असत. हे नारळ फोडल्यानंतर नारळाचे बक्कल खाण्यासाठी ट्रॅक्टर किंवा ट्रक मधील मुलं खाली उतरत आणि पटकन भक्कल खायचे. या आठवणी माझ्या स्मरणात ताज्या आहेत.
आता रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोरांचे आवाज येऊ लागले, शामगाव घाट परिसर हा मोरांसाठी नंदनवनच आहे. या परिसरात आहे या अगोदर अनेक वेळा मोरांचे थवे मी पाहिलेले आहेत. आज आमच्या डोक्यावरून एक मोर रस्तावरून उंच उडत जाताना मी पाहिला. मोर पक्षाला एवढ्या उंचावर उडता येतं ते पहिल्यांदाच पाहिलं. सकाळच्या वेळी निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर खूप चांगले अनुभव येतात, त्यापैकी हा अनुभव. याच दरम्यान निसर्गप्रेमी फोटोग्राफर सौरव पाटील यांनी त्यांच्या झूम कॅमेरा वरून अनेक फोटो टिपले.
आम्ही शामगावच्या घाटात पोहोचलो होतो. गर्द दाट झाडीतून जाणारा शामगाव घाटाचा रस्ता या अगोदर अनेकदा वाहनातून पाहिला होता. पण आज चालत जाताना पाहताना हा घाट आणि डोंगर किती उंच जाणवत होतं. घाटात रस्त्याकडेला निसर्ग विद्रुप करणाऱ्या काही लोकांनी दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या होत्या, आमच्यापैकी काही मित्रांनी त्या बाटल्या हटवल्या.घाटातून आता वाहतूक सुरू झाले होती.आमच्या अंतिम मुक्कामापर्यंत पोचलो होतो.
घाटातील दोन मोठ्ठी वळणे संपल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला शिवकालीन प्राचीन मंदिर नावाचा एक बोर्ड आहे. या मंदिराकडे जाण्यासाठी सिमेंटचा रस्ता अलिकडेच करण्यात आलेला आहे. हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. या मंदिराकडे आम्ही जायला सुरुवात केली, मंदिराच्या परिसरात अगोदरच बाळकृष्ण शिंदे हे लोकमतचे वार्ताहर मुलासमवेत पोहोचले होते. त्यांनी आणि मिलिंद डुबल यांनी या ठिकाणी दोन खड्डे काढून ठेवलेले होते. तिथे असलेल्या बोअरवर पाणी हापसून आम्ही हात पाय धुतले आणि झाडे गाडीतून आणलेली झाडे खाली उतरवली.
झाडे लावण्यासाठी सर्वांची लगबग सुरू होती. वाय. के. जाधव आणि माझे माळकरी बंधू हणमंत मोरे यांच्या हस्ते एक वड आणि पिंपळ असे दोन वृक्ष या ठिकाणी लावण्यात आले. ही झाडे लावल्यानंतर तिथे जनावरे येऊ नये म्हणून काट्याच्या कुंपन सर्व जणांनी तयार केले आणि आम्ही मंदिराच्या खाली जाण्यास निघालो.
मगाशी सांगितल्याप्रमाणे या मंदिराचे महात्म्य फार आहे, डोंगराच्या असणारे कुशीत असणारे मंदिराकडे जाण्यासाठी पूर्वी रस्ता नव्हता. सैदापूर येथील वारकरी कृष्णा यशवंतराव जाधव (वाय के जाधव यांचे वडील) यांना दृष्टांत झाला आणि 1997 च्या दरम्यान त्यांनी या ठिकाणी यावयास सुरवात केली. सुरुवातीला ते कराड पासून इथंपर्यंत चालत यायचे.शामगाव ग्रामस्थ, परिसरातील दानशूर यांच्या मदतीने 2001 साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि अतिशय सुंदर असे मंदिर उभे राहिले. या दुर्लक्षित मंदिराची बातमी 1997 साली मी लोकमत ओगलेवाडी वार्ताहर असताना प्रसिद्ध केली होती. ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर हे मंदिर प्रकाशात आले होते. याबाबतच्या आठवणींना आज उजाळा मिळाला.
या मंदिराकडे खाली जाताना अतिशय सुंदर मनोहरी दृश्य दिसत होते. एका बाजूला उंच डोंगर तर दुसर्या बाजूला छोटासा ओढा, छोटा धबधबा आम्हाला आनंद आणि स्फूर्ती देत होत.मंदिरात जाऊन आम्ही शंभू महादेवाचे दर्शन घेतले, पूजा केली आणि मंदिराशेजारी असलेल्या शेडमध्ये आराम केला. बाळकृष्ण शिंदे यांनी कांदेपोहे बनवून आणले होते. करवडी ते शामगाव घाट सुमारे सात किलोमीटर अंतर चालत आल्यामुळे थकवा भूक खूप लागली होती. सर्वांनी एकत्र बसून नाश्ता केला. शंभू महादेवाचा जप केला, पुंडलिक महाराज पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा जयघोष करत आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला.अशा पद्धतीने आजची निसर्गवारी अतिशय आनंदात, निसर्गाच्या सानिध्यात संपन्न झाली.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...