फॉलोअर

२१ जुलै २०२६

धुक्याच्या दुलईतील स्वर्ग....काठी-अवसरी

धुक्याच्या दुलईतील स्वर्ग....काठी-अवसरी  

– सतीश मोरे
सौंदर्य अनुभवण्यासाठी नेहमीच शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, असे नाही. कराडपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर पाटण तालुक्यात निसर्गाने असा एक स्वर्ग निर्माण केला आहे की, तो पाहिल्यानंतर आपण नकळत त्याच्या प्रेमात पडतो. या ठिकाणाचे नाव आहे – काठी टेक.

जुलै महिना सुरू झाला की काठी टेकचे रूपच पालटते. डोंगररांगा दाट धुक्याच्या चादरीत हरवून जातात. कधी रिमझिम, तर कधी मुसळधार पाऊस... त्यात अंगाला सुखावणारी गुलाबी थंडी... आणि चहूबाजूंनी पसरलेला हिरवागार निसर्ग. या सगळ्याचा अनुभव शब्दांत मांडणे कठीण आहे; तो प्रत्यक्ष तिथे गेल्यावरच अनुभवता येतो.
काठी टेकवर उभे राहिल्यावर निसर्गाने जणू हिरवाईचा गालिचाच अंथरला आहे, असे वाटते. डोंगरांच्या कुशीतून वाहणारे धुक्याचे लोट, पावसाच्या सरींनी नटलेली झाडे, वाऱ्याच्या झुळुकीबरोबर नाचणारे गवत आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट... प्रत्येक क्षण मनाला शांत करणारा असतो

निसर्गाने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यावर अक्षरशः सौंदर्याची उधळण केली आहे. या तालुक्यातील प्रत्येक डोंगर, प्रत्येक दरी, प्रत्येक घाट आणि प्रत्येक जलाशय एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यातून साकारल्यासारखा भासतो. मात्र हे सौंदर्य अनुभवण्यासाठी त्याचा शोध घेण्याची दृष्टी आणि मनाची ओढ असावी लागते. ज्याला हा शोध घेता येतो, तोच खऱ्या अर्थाने नशीबवान.
पाटण तालुक्यात निसर्गरम्य ठिकाणांची अक्षरशः खाण आहे. यापैकी अनेक ठिकाणे पाहण्याचे भाग्य मला लाभले, तर अजूनही अनेक ठिकाणे मला खुणावत आहेत. घाटमाथा, ढेबेवाडी, तारळे, कोयनानगर, नवजा, दिवशी घाट, तारळे, विहे घाट, सडा वाघापूर घाट, वाल्मिकी पठार, मराठवाडी धरण... कुठेही जा, निसर्ग आपले रूप नव्याने उलगडत राहतो.

या सर्व ठिकाणांमध्ये जर एखाद्या ठिकाणाला 'निसर्गाचा मुकुटमणी' म्हणायचे असेल, तर तो म्हणजे कोयनानगर. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे विशाल कोयना धरण, त्याचा तब्बल १०५ टीएमसी क्षमतेचा शिवसागर जलाशय आणि चारही बाजूंनी हिरवाईने नटलेले डोंगर – हे दृश्य शब्दांत मांडणे कठीण आहे. कोयनानगरपासून तापोळ्यापर्यंत पसरलेला हा जलाशय जणू निसर्गाने रंगवलेले एक भव्य चित्रच.

या जलाशयाच्या काठावर अनेक छोटी-छोटी गावे वसली आहेत. प्रत्येक गावाचे स्वतःचे वेगळे सौंदर्य आहे. त्यापैकी माझ्या मनात कायमचे घर करून राहिलेले गाव म्हणजे काठी-अवसरी.

काठी-अवसरी हे केवळ एक गाव नाही; तो निसर्गाने घडवलेला स्वर्गाचा एक कोपरा आहे. कोयनानगरचे उद्यान, धबधबे किंवा घाटमाथा अनेकांनी पाहिला असेल; पण शिवसागर जलाशयाच्या कुशीत विसावलेल्या काठी-अवसरीचे अप्रतिम सौंदर्य अनुभवण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते.

पाटणहून काठीकडे जाणारा रस्ता सुरू झाला की प्रवासाचा प्रत्येक क्षण आनंद देऊ लागतो. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भव्य पवनचक्क्या, हिरवाईने नटलेले डोंगर आणि वळणावळणाचा रस्ता मनाला भुरळ घालतो. गावात पोहोचून डोंगर उतरताना समोर अचानक उलगडणारा शिवसागर जलाशयाचा निळाशार विस्तार पाहून क्षणभर आपण स्वर्गात आल्याचा भास होतो.
मी यापूर्वी अनेकदा काठीला गेलो होतो; धैर्यशील पाटणकर यांच्या काठी हिल्स मध्ये उतरलो होतो. मात्र तो अनुभव प्रामुख्याने उन्हाळ्यातला होता. यंदा प्रथमच पावसाळ्यात तेथील निसर्ग अनुभवण्याचा योग आला आणि काठीचे खरे रूप माझ्यासमोर उलगडले. पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा – कोणताही ऋतू असो, काठीचे सौंदर्य प्रत्येक वेळी वेगळ्या रंगात खुलत राहते.

डोंगराच्या कड्यावर उभे राहून खाली दिसणारा अथांग जलाशय, त्यामध्ये तयार झालेली असंख्य छोटी बेटे आणि हिरव्या पर्वतरांगांच्या सान्निध्यात पसरलेले शांत पाणी... हे दृश्य डोळ्यांत साठवत राहावे असेच वाटते. कॅमेरा कितीही फोटो काढो, तरी त्या सौंदर्याचा पूर्ण आविष्कार त्यात टिपता येत नाही.
काठी-अवसरीच्या पर्यटन विकासामागे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची दूरदृष्टी महत्त्वाची ठरली. 'नवीन महाबळेश्वर' ही संकल्पना मांडताना त्यांनी या परिसरातील निसर्गसंपदेची क्षमता ओळखली. दुर्गम गावांपर्यंत रस्ते पोहोचवण्याचे प्रयत्न केले आणि या भागाकडे पर्यटकांचे लक्ष वेधले. त्यांच्या प्रयत्नांमुळे काठी-अवसरी आज अनेक निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

काठीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त. विशेषतः संध्याकाळी मावळणारा सूर्य शिवसागराच्या पाण्यावर सोनेरी रंगांची उधळण करतो. त्या क्षणी जणू सूर्य स्वतः आपल्या भेटीला आला आहे, अशी भावना मनात दाटून येते.

महाबळेश्वरचे सौंदर्य जगप्रसिद्ध आहे; मात्र निसर्गाच्या अस्सल रूपाचा अनुभव घ्यायचा असेल, तर पाटण तालुक्यातील काठी-अवसरीला एकदा तरी जरूर भेट द्या. तिथे पोहोचल्यानंतर निसर्ग म्हणजे काय, शांतता म्हणजे काय आणि स्वर्गीय सौंदर्य म्हणजे काय याचा खरा अर्थ उमगतो.

काठी-अवसरी... हा केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर निसर्गाच्या कुशीत स्वतःला हरवून पुन्हा नव्याने सापडण्याचा एक अविस्मरणीय अनुभव आहे.

हिवाळ्यातील काठी... धुक्याच्या दुलईतील स्वर्ग

मध्यंतरी हिवाळ्यात  एकदा काठी-उसरीला जाण्याचा योग आला होता. पावसाळ्यात हिरवाईने नटलेला हा परिसर पाहिला होता; पण हिवाळ्यातील काठी म्हणजे निसर्गाने धुक्याची शुभ्र शाल पांघरलेला एक वेगळाच स्वर्ग.

पहाटेच्या वेळी संपूर्ण परिसर दाट धुक्याने वेढलेला होता. डोंगरांची शिखरे धुक्याआड लपाछपी खेळत होती. सूर्य उगवू लागला आणि त्याची कोवळी किरणे धुक्याला भेदून बाहेर पडू लागली, तसा संपूर्ण परिसर सोनेरी प्रकाशाने उजळून निघाला. त्या क्षणी शब्द हरवून जातात आणि डोळे फक्त ते सौंदर्य साठवत राहतात.

डोंगरकड्यावर उभे राहून खाली दिसणारा शिवसागर जलाशय आरशासारखा शांत होता. त्यात पडलेले डोंगरांचे प्रतिबिंब इतके सुंदर दिसत होते की, क्षणभर वास्तव आणि प्रतिबिंब यातील फरकच कळेनासा झाला. जलाशयातील छोटी-छोटी बेटे धुक्यातून हळूहळू समोर येत होती. प्रत्येक क्षण नवा आणि प्रत्येक दृश्य वेगळे.

काठीमध्ये वेळ कसा जातो हे कळतही नाही. निसर्गाशी संवाद साधण्यासाठी, मनाला शांत करण्यासाठी आणि जीवनातील धावपळीपासून काही क्षण दूर जाण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. येथे आल्यावर मोबाईलपेक्षा डोळ्यांनी आणि कॅमेऱ्यापेक्षा मनाने निसर्ग टिपण्याचा मोह होतो.

आज पर्यटनासाठी अनेक जण दूरवरच्या ठिकाणांचा विचार करतात. मात्र आपल्या सातारा जिल्ह्यात, पाटण तालुक्यात असा हा स्वर्ग दडलेला आहे. त्याचे सौंदर्य एकदा अनुभवले की पुन्हा पुन्हा येथे यावेसे वाटते.

काठी-अवसरी म्हणजे फक्त एक गाव नाही; ती निसर्गाची जपून ठेवलेली एक अमूल्य भेट आहे. ती प्रत्येक निसर्गप्रेमीने आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवायलाच हवी

पर्यटकांसाठी उपयुक्त माहिती¢

✓काठी-अवसरीला जायचे कसे?

कराडहून :
कराड–पाटण मार्गाने पाटण शहरात पोहोचावे. पाटण एसटी स्थानक ओलांडल्यानंतर लगेच उजवीकडे वळा . पाटण चाळकेवाडी रोड वरून सरळ पुढे जा. पुढे दातेगडाकडे जाणारा फाटा येतो. तिकडे न जाता सरळ पुढे जावे. हा परिसर पार केल्यानंतर वळणावळणाचा घाट सुरू होतो. पुढे विशाल पवनचक्क्यांचे साम्राज्य दिसू लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या शेकडो पवनचक्क्या पाहताना जणू एखाद्या वेगळ्याच जगात प्रवेश केल्याचा अनुभव येतो. पुढे 'काठी टेक' या फाट्यावर डावीकडे वळल्यानंतर काही अंतरावर काठी गाव गाठता येते.

https://maps.app.goo.gl/RRaWQ6A1xPRE7nNE6

साताराहून :
साताराहून येणाऱ्या पर्यटकांनी ठोसेघर धबधबा परिसर पार करून चाळकेवाडी कडे यावे. सातारा ते काठी हे अंतर सुमारे ५० किलोमीटर असून, कराडहूनही जवळपास तेवढेच अंतर आहे. दोन्ही बाजूंनी चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध आहेत.

https://maps.app.goo.gl/V76ncKktktSWTVg96?g_st=ac

✓राहण्याची सोय

गेल्या काही वर्षांत काठी मध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक सुंदर रिसॉर्ट आणि होमस्टे सुरू झाले आहेत. धैर्यशील पाटणकर यांचे काठी हिल्स रिसॉर्ट सर्वात जुने आणि प्रसिद्ध आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे बॅक वाॅटर केबिन रिसॉर्ट, तसेच स्थानिकांनी सुरू केलेली अनेक घरगुती निवासस्थाने पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. पर्यटन हंगामात गर्दी असल्याने आगाऊ ऑनलाइन किंवा फोनद्वारे बुकिंग करणे अधिक सोयीचे ठरते.

Windy Hill's agro tourism 
दिलीप जोगळेकर 9421252222

Kathi Hill's 
Dhairyashil Patankar 
8975764243

Nature Next
Satish Pawar 
7798933940

Back Water Cabin
विक्रम जाधवराव
9822110141

मानस agri tourism 
अमर जाधवराव
901152742

✓खाण्याची सोय

येथे शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची व्यवस्था उपलब्ध आहे. मात्र अचानक पोहोचण्यापेक्षा आगाऊ फोन करून आपल्या जेवणाची ऑर्डर दिल्यास आपल्या आवडीप्रमाणे ताजे जेवण तयार करून ठेवले जाते.

✓भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ

काठीला वर्षातील कोणत्याही ऋतूत भेट देता येते. मात्र पावसाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू या परिसराचे खरे सौंदर्य अनुभवण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. पावसाळ्यात धुक्याने वेढलेले डोंगर, हिरवाईचा गालिचा आणि कोसळणारा पाऊस, तर हिवाळ्यातील बोचरी थंडी, स्वच्छ हवा आणि मन मोहून टाकणारे सूर्योदय-सूर्यास्त हे अनुभव आयुष्यभर लक्षात राहतात.

वाहतुकीची सुविधा

काठी-अवसरीपर्यंत नियमित एसटी बस सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे स्वतःची दुचाकी, चारचाकी किंवा मित्र-परिवारासोबत खासगी वाहनाने जाणे अधिक सोयीचे ठरते. संपूर्ण मार्गावर चांगल्या दर्जाचे रस्ते असल्याने प्रवास सुखकर आणि आनंददायी होतो.

निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवायचे असतील, तर पाटण तालुक्यातील काठी-अवसरी हा नक्कीच एकदा अनुभवावा असा स्वर्गीय पर्यटनस्थळ आहे.

महत्त्वाच्या सूचना

काठी टेकला जाण्यापूर्वी काही गोष्टींची तयारी करूनच निघा. त्यामुळे तुमचा प्रवास अधिक सुखद आणि सुरक्षित होईल.

- रेनकोट किंवा पावसाळी कपडे सोबत अवश्य ठेवा. काठी टेक परिसरात पावसाचा जोर कधीही वाढू शकतो. फक्त छत्रीवर अवलंबून राहू नका. छोटी छत्री सोबत असली तरी उत्तम; मात्र रेनकोट अधिक उपयोगी ठरतो.

- उबदार कपडे सोबत घ्या. जुलै असो, हिवाळा असो किंवा इतर कोणताही ऋतू, काठी टेकवर नेहमीच गारवा जाणवतो. कोयना धरणाच्या परिसरातून येणारे थंड वारे अंगावर काटा आणतात. त्यामुळे स्वेटर, जॅकेट किंवा उबदार शाल सोबत ठेवणे नेहमीच फायदेशीर ठरते.

- चांगली पकड असलेले बूट किंवा शूज वापरा. पावसामुळे रस्ते व माती घसरडी होऊ शकते.

- निसर्गाचा आनंद घ्या, पण त्याचे जतनही करा. प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या किंवा इतर कचरा परिसरात टाकू नका. स्वच्छता राखणे ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे.

काठी टेक हे केवळ पर्यटनस्थळ नाही, तर निसर्गाने मनमुराद उधळलेले सौंदर्य आहे. त्याचा आनंद घ्या आणि ते सौंदर्य पुढील पिढ्यांसाठीही जपून ठेवा.

सतीश मोरे सतिताभ 
9881191302

#kathihills
#koynanagar  
#naturelovers

१८ जुलै २०२६

रोज रोज आँखो तले

रोज़ रोज़ आँखों तले… प्यार के मीठे ख़्वाबों की सुरमयी दास्तान


आशा भोसले, अमित कुमार और आर. डी. बर्मन का नाम आते ही जीवा फ़िल्म का अमर गीत "रोज़ रोज़ आँखों तले, एक ही सपना चले..." बरबस याद आ जाता है। प्रेम, विरह, इंतज़ार और यादों को जितनी ख़ूबसूरती से इस गीत में शब्दों और सुरों के माध्यम से व्यक्त किया गया है, वैसी मिसाल हिंदी फ़िल्म संगीत में बहुत कम मिलती है।

"रोज़ रोज़ आँखों तले, एक ही सपना चले…
रात भर काजल जले, आँख में जिस तरह ख़्वाब का दिया जले…"

इस मुखड़े का भाव बहुत गहरा है। हर इंसान की आँखों में अनेक सपने होते हैं, लेकिन उनमें एक सपना ऐसा भी होता है जो सिर्फ़ एक ही व्यक्ति के इर्द-गिर्द घूमता है। जब वह व्यक्ति हमारे जीवन में आता है, तो दिनभर उसी का ख़याल मन में रहता है और रातभर उसी की यादें आँखों में जागती रहती हैं। "रात भर काजल जले" का अर्थ है कि आँखों में नींद नहीं है, क्योंकि वहाँ तो प्रिय के ख़्वाबों का दीपक जल रहा है।

आगे गीत कहता है—

"जबसे तुम्हारे नाम की मिसरी होंठ से लगायी है…"

'मिसरी' यानी मिठास। जिस दिन से प्रिय का नाम होंठों पर आया, उसी दिन से जीवन में एक अनोखी मिठास घुल गई। लेकिन उसी मिठास के साथ एक मीठा-सा ग़म और एक मीठी-सी तन्हाई भी आ गई। मिलने की ख़ुशी और बिछड़ने की कसक—दोनों ही प्रेम की सबसे सुंदर अनुभूतियाँ बन जाती हैं। इसलिए गीत में "मीठा सा ग़म" और "मीठी सी तन्हाई" जैसे शब्द प्रेम की गहराई को बेहद ख़ूबसूरती से व्यक्त करते हैं।

फिर गीत की अगली पंक्ति आती है—

"छोटी सी दिल की उलझन है, ये सुलझा दो तुम…"

प्रेम में पड़े हर दिल में कुछ सवाल होते हैं। भविष्य की उम्मीदें, रिश्ते की चिंता और साथ निभाने का विश्वास—इन सबकी एक छोटी-सी उलझन मन में रहती है। इसलिए वह अपने प्रिय से कहती है, "मेरे दिल की यह छोटी-सी उलझन तुम ही सुलझा दो।"

और फिर यह पंक्ति—

"जीना तो सीखा है मरके, मरना सिखा दो तुम."

इसका अर्थ यह है कि तुम्हारे प्रेम में मैंने अपने अहंकार को भुलाकर जीना सीख लिया है। अब जीवन का हर पल तुम्हारे साथ बिताना ही मेरी सबसे बड़ी इच्छा है।

इसके बाद नायक अपनी भावनाएँ व्यक्त करता है—

"आँखों पर कुछ ऐसे तुमने ज़ुल्फ़ गिरा दी है, बेचारे से कुछ ख़्वाबों की नींद उड़ा दी है."

तुम्हारी एक अदा, तुम्हारी ज़ुल्फ़ों की एक लट और तुम्हारी एक नज़र ने मेरे सारे ख़्वाबों को जगा दिया है। अब हर सपना तुम्हीं से जुड़ गया है और तुम्हारे ख़यालों ने मेरी नींद ही उड़ा दी है।

इस गीत के बोल जितने सुंदर हैं, उतना ही अद्भुत इसका संगीत है। आर. डी. बर्मन ने इसकी धुन इस तरह रची है कि पहला सुर सुनते ही मन उसी लय में बहने लगता है और गीत समाप्त होने तक श्रोता उस जादू से बाहर नहीं निकल पाता।

आशा भोसले ने हर शब्द को जिस नज़ाकत, मिठास और भावपूर्ण अंदाज़ में गाया है, वह इस गीत की सबसे बड़ी ताक़त है। उनकी आवाज़ में प्रेम की कोमलता, विरह की टीस और भावनाओं की गहराई एक साथ सुनाई देती है।

और फिर आते हैं अमित कुमार। उनकी सहज गायकी, मासूमियत और भावनाओं की सच्चाई इस गीत को एक अलग ही ऊँचाई पर ले जाती है। व्यक्तिगत रूप से मुझे लगता है कि यह उनके करियर के सबसे मधुर और यादगार गीतों में से एक है।

इस गीत का फ़िल्मांकन भी उतना ही मनमोहक है। संजय दत्त और मंदाकिनी की जोड़ी, हल्की रोशनी का इस्तेमाल, चेहरों पर पड़ती प्रकाश की किरणें, आँखों की ख़ामोश बातें और प्राकृतिक पृष्ठभूमि—ये सब मिलकर इस गीत को एक दृश्यात्मक कविता बना देते हैं।

यह गीत चाहे रेडियो पर सुनिए या यूट्यूब पर देखिए, दोनों अनुभव अलग हैं लेकिन दोनों ही समान रूप से मोहक हैं। संगीत कानों को सुकून देता है और चित्रांकन आँखों को बाँध लेता है।

मेरे लिए "रोज़ रोज़ आँखों तले…" केवल एक प्रेमगीत नहीं, बल्कि प्रेम की मिठास, विरह की कसक और यादों के दीप से रोशन एक अनमोल एहसास है। यही वजह है कि यह गीत आज भी मेरे सबसे प्रिय हिंदी फ़िल्मी गीतों में शामिल है।

.....................

रोज रोज आँखों तले... प्रेमाच्या गोड स्वप्नांची सुरेल कहाणी

आशा भोसले, अमित कुमार आणि आर. डी. बर्मन यांचे सुरेल कॉम्बिनेशन म्हटले की, जीवा चित्रपटातील "रोज रोज आँखों तले, एक ही सपना चले..." हे गीत हमखास आठवते. प्रेम, विरह, ओढ आणि आठवणी यांना इतक्या सुरेख शब्दांत आणि सुरांत व्यक्त करणारी गाणी हिंदी चित्रपटसृष्टीत फारच मोजकी आहेत.

"रोज रोज आँखों तले, एक ही सपना चले... रात भर काजल जले, आँख में जिस तरह ख़्वाब का दिया जले..."
या मुखड्याचा अर्थ खूप सुंदर आहे. 

प्रत्येकाच्या मनात अनेक स्वप्ने असतात; पण त्यापैकी एक स्वप्न असे असते, जे फक्त एका व्यक्तीभोवती फिरत असते. ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आली की, दिवसभर तिचाच विचार मनात असतो आणि रात्री तिच्याच आठवणी डोळ्यांत जागत राहतात. "रातभर काजळ जळत राहते" ही उपमा म्हणजे डोळ्यांत झोप नसते, कारण तिथे प्रिय व्यक्तीच्या स्वप्नांचा दिवा तेवत असतो.

पुढे गीतात येते—
"जबसे तुम्हारे नाम की मिसरी होंठ से लगायी है..."
'मिसरी' म्हणजे गोडवा. प्रिय व्यक्तीचे नाव ओठांवर आले आणि आयुष्यालाच गोडवा लाभला. त्या गोडव्याबरोबरच एक गोड विरह, एक हळवी तन्हाईही आली. भेटीचा आनंद आणि न भेटण्याची हुरहूर—या दोन्ही भावना प्रेमात सारख्याच गोड वाटतात. म्हणूनच गीतात "मीठा सा ग़म" आणि "मीठी सी तन्हाई" असे विलक्षण सुंदर शब्द आले आहेत.

त्यानंतरची ओळ—
"छोटी सी दिल की उलझन है, ये सुलझा दो तुम..."
प्रेमात पडलेल्या प्रत्येक मनात काही प्रश्न असतात. भविष्याबद्दलची स्वप्ने, नात्याबद्दलच्या अपेक्षा आणि एकमेकांना समजून घेण्याची धडपड असते. म्हणूनच ती आपल्या प्रियकराला म्हणते, "माझ्या मनातील ही छोटीशी गुंतागुंत तूच सोडव." आणि पुढची ओळ तर प्रेमाचा कळसच आहे—
"जीना तो सीखा है मरके, मरना सिखा दो तुम."
तुझ्या प्रेमात स्वतःला विसरून जगायला शिकले आहे; आता आयुष्याच्या प्रत्येक क्षणात तुझीच साथ हवी आहे, अशी ती भावना व्यक्त करते.

यानंतर प्रियकराच्या भावना व्यक्त होतात—
"आँखों पर कुछ ऐसे तुमने ज़ुल्फ़ गिरा दी है, बेचारे से कुछ ख़्वाबों की नींद उड़ा दी है."
तुझ्या एका कटाक्षाने, केसांच्या एका झुळुकीने माझी सारी स्वप्ने जागी झाली आहेत. आता तुझ्या विचारांशिवाय झोप लागत नाही. प्रत्येक स्वप्नात तूच आहेस, प्रत्येक श्वासात तूच आहेस.

या गीताचा अर्थ जितका सुंदर आहे, तितकेच त्याचे संगीत अप्रतिम आहे. आर. डी. बर्मन यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अशी धून बांधली आहे की, गाणे संपेपर्यंत मन त्या तालात हरवून जाते.

आशा भोसले यांनी प्रत्येक शब्द इतक्या नजाकतीने आणि भावपूर्ण पद्धतीने गायला आहे की, त्या शब्दांमधून नायिकेचे मन अक्षरशः जिवंत होते. त्यांच्या आवाजातील कोमलता, हुरहूर आणि प्रेमाची मिठास या गाण्याला अजरामर बनवते.
आणि मग येतो अमित कुमार यांचा आवाज. त्यांच्या गायकीतली सहजता, प्रेमातील व्याकुळता आणि भावनांची खोली मनाला स्पर्शून जाते. माझ्या मते, अमितकुमार यांच्या कारकिर्दीतील हे सर्वांत गोड आणि प्रभावी गीतांपैकी एक आहे.

या गाण्याचे चित्रिकरणही तितकेच सुंदर आहे. मंदाकिनी आणि संजय दत्त यांची जोडी, मंद प्रकाशाचा वापर, चेहऱ्यांवरील प्रकाशछटा, डोळ्यांतील भाव, केसांवर पडणारा प्रकाश आणि शांत पार्श्वभूमी—हे सर्व मिळून या गाण्याला एक वेगळीच दृश्यात्मक उंची देतात.

हे गाणे तुम्ही फक्त रेडिओवर ऐका किंवा यूट्यूबवर पाहा—दोन्ही अनुभव वेगळे आहेत; पण दोन्ही तितकेच मोहक आहेत. संगीत कानाला भुरळ घालते, तर चित्रिकरण डोळ्यांना मंत्रमुग्ध करते.
माझ्यासाठी "रोज रोज आँखों तले..." हे केवळ एक प्रेमगीत नाही; तर प्रेमातील गोड वेदना, विरहातील मिठास आणि आठवणींच्या दिव्याने उजळलेल्या मनाचा एक अविस्मरणीय प्रवास आहे.

 म्हणूनच हे गीत माझ्या सर्वाधिक आवडत्या हिंदी चित्रपटगीतांपैकी एक आहे.

https://youtu.be/0mZjBBQ3Dnc?si=t7ACPr8diMEoyoUd

या गाण्याची youtube लिंक

सतीश मोरे सतिताभ 
९८८११९१३०२

#rojrojankho #jeeva 
#rdburmanmusic #ashabhosle #amitkumar

१६ जुलै २०२६

संयम, निष्ठा आणि स्वतःला घडवण्याचा प्रवास

संयम, निष्ठा आणि स्वतःला घडवण्याचा प्रवास
आपल्याला हवं तेव्हा आपला आवडता माणूस आपल्या मनासारखंच वागेल, हा एक मोठा गैरसमज आहे. आपण एखाद्याच्या अपेक्षा सतत पूर्ण करत राहिलो की, त्याच्या अपेक्षा वाढतच जातात. आणि जेव्हा एखाद्या क्षणी आपण "नाही" म्हणतो किंवा त्याच्या मनाविरुद्ध निर्णय घेतो, तेव्हा त्याच व्यक्तीच्या वागण्यात बदल होऊ शकतो.

जशी पक्षनिष्ठा महत्त्वाची असते, तशीच व्यक्तीनिष्ठाही तितकीच महत्त्वाची असते. पण या दोन्ही निष्ठांमध्ये एक समान धागा असतो—अपेक्षा. एखादी व्यक्ती दिवसभर तुमच्याशी गोड बोलत असेल, तुमच्या प्रत्येक मताला दुजोरा देत असेल, तरीही एक दिवस तुम्ही तिच्या मनासारखं वागला नाहीत, तर तीच व्यक्ती तुमच्याविरोधात उभी राहू शकते. आयुष्यभर ज्याच्यासाठी आपण वेळ दिला, कष्ट घेतले, त्याच्या सुख-दुःखात सहभागी झालो, त्याच व्यक्तीच्या तोंडून एक दिवस हा प्रश्न ऐकावा लागू शकतो—"तुम्ही माझ्यासाठी काय केलं?" ही आयुष्याची कटू, पण वास्तव शिकवण आहे.

म्हणूनच आयुष्यात तडजोड करणे, वेळप्रसंगी माघार घेणे, चार पावले मागे येणे आणि परिस्थिती ओळखून योग्य निर्णय घेणे या गोष्टी आवश्यक असतात. ज्याला हे जमते, त्यालाच खऱ्या अर्थाने समाधानाची भेट मिळते.

आज दिवसभरात अनेक व्यक्तींना भेटण्याचा योग आला. त्यांच्या चर्चांमधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—कोणी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहे, तर कोणी नवीन राजकीय समीकरणे मांडत आहे. कोणी कोणाला सोडून जात आहे तर कोणी आर्थिक विश्वासघात करत आहे.अशा वातावरणात तत्त्वनिष्ठ राहणे, तत्त्वांवर बोलणे आणि तत्त्वांनुसार वागणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.

तरीही माझा अनुभव सांगतो की, संयम आणि प्रामाणिकपणा कधीच वाया जात नाही. कदाचित यश उशिरा मिळेल, पण ते नक्की मिळते. मात्र संयमाचा अर्थ कमजोरी नसतो. अनेकदा समोरचा माणूस तुमच्या शांततेला भीती, अकार्यक्षमता किंवा दुबळेपणा समजू लागतो. अशा वेळी त्याला योग्य वेळी योग्य मर्यादा दाखवणंही आवश्यक असतं. कारण वेळेवर घेतलेला ठाम निर्णय भविष्यातील मोठे संघर्ष टाळू शकतो.

आजच्या काळात पक्षनिष्ठा, व्यक्तीनिष्ठा आणि बदलत्या परिस्थितीतून खूप काही शिकायला मिळत आहे. प्रत्येक अनुभव माणसाला अधिक सक्षम आणि परिपक्व बनवत असतो. स्वतःला मजबूत करणं आणि जगाला आत्मविश्वासाने सामोरं जाणं, यापेक्षा मोठं समाधान दुसरं नाही.

या सर्व धावपळीत मात्र एक गोष्ट कधीही विसरू नये—स्वतःचं शरीर. "शरीर हाच परमेश्वर" असं आपल्या संस्कृतीत म्हटलं आहे. म्हणून दिवसातील किमान एक तास आपल्या शरीरासाठी राखून ठेवला पाहिजे. व्यायाम, चालणे, योग किंवा कोणताही शारीरिक व्यायाम शरीरात नवी ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा केवळ शरीरालाच नाही, तर मनालाही बळ देते आणि प्रत्येक आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद देते.

शेवटी, आयुष्य आपल्याला एकच धडा शिकवतं—निष्ठा ठेवा, पण स्वतःला हरवू नका. संयम ठेवा, पण स्वाभिमान गमावू नका. तडजोड करा, पण तत्त्वांशी तडजोड करू नका. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, दुसऱ्यांना जिंकण्यापेक्षा आधी स्वतःला जिंका. कारण खरा विजय हा बाहेरच्या जगावर नसतो, तर स्वतःच्या मनावर, विचारांवर आणि कृतीवर असतो.

@सतीश मोरे सतिताभ

१४ जुलै २०२६

​विलासराव पाटील उंडाळकर : निष्ठा, विकास आणि लोकसंग्रहाचा अजातशत्रू नेता

​विलासराव पाटील उंडाळकर : निष्ठा, विकास आणि लोकसंग्रहाचा अजातशत्रू नेता

​सतीश मोरे 
संपादक,दैनिक पुढारी कराड 

​सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा काही नावे सुवर्णाक्षरांनी रेखाटावी लागतील. त्यामध्ये स्वर्गीय विलासराव पाटील-उंडाळकर (विलास काका) यांचे नाव अत्यंत अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांनी केवळ निवडणुका जिंकल्या नाहीत, तर माणसे जिंकली; सत्ता केवळ उपभोगली नाही, तर तिचा उपयोग समाजाच्या तळागाळातील विकासासाठी केला. आजच्या राजकारणात पक्ष बदलणे आणि तत्त्वांशी तडजोड करणे सामान्य झाले असताना, आयुष्यभर निष्ठा, शब्द आणि विचार यांवर ठाम राहणारे विलास काका त्या दुर्मिळ परंपरेतील शेवटच्या पिढीतील नेते होते.

​उंडाळे ते विधानभवन : एका लोकनेत्याचा जन्म

​उंडाळे या छोट्याशा गावात स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांच्या पोटी विलास काकांचा जन्म झाला. घरातूनच लाभलेले स्वातंत्र्यलढ्याचे संस्कार, समाजकारणाची प्रेरणा आणि जनतेसाठी झटण्याची वृत्ती यामुळे राजकारण हे त्यांच्यासाठी सत्ता मिळवण्याचे साधन नव्हते, तर समाजपरिवर्तनाचे माध्यम होते. लहानपणापासूनच गावागावातील लोकांशी मिसळण्याची आणि प्रत्येकाच्या अडचणीत धावून जाण्याची त्यांची वृत्ती पुढे त्यांच्या राजकीय यशाचा सर्वात मोठा पाया ठरली.

​सार्वजनिक जीवनाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून करणाऱ्या काकांना आबासाहेब वीर यांचे राजकीय मार्गदर्शन लाभले. दरम्यान, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात झालेल्या बदलामुळे काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. एखाद्या लाटेत एकदा-दोनदा निवडून येणे सोपे असते, पण सलग सात वेळा एकाच मतदारसंघातून निवडून येणे ही केवळ राजकीय कामगिरी नसते; ती जनतेने त्यांच्या विकासाभिमुख राजकारणाला दिलेली सर्वोच्च मान्यता असते. यामागे कोणताही पैशाचा खेळ किंवा जातीय समीकरणे नव्हती, तर होता त्यांचा प्रचंड लोकसंपर्क!

​कराड दक्षिणचा विकास आणि सहकारातील आदर्श

​विलास काका आमदार झाले, तेव्हा कराड दक्षिण मतदारसंघ विकासाच्या बाबतीत मागे होता. काकांनी हा प्रश्न केवळ निवडणुकीचा मुद्दा न बनवता आयुष्याचे ध्येय बनवले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे गावागावांत डांबरी रस्ते, समाजमंदिरे, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि सिंचनासाठी पाझर तलाव, बंधारे उभे राहिले. उंडाळे परिसर आणि डोंगरपट्टीतील एकेकाळी दुष्काळी असलेला भाग शेतकऱ्यांच्या कष्टाने आणि काकांच्या प्रयत्नाने हिरवागार झाला.

​मंत्रालयात त्यांच्या शब्दाला कमालीचे वजन होते. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा वापर त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी कधीच केला नाही, तर मतदारसंघासाठी कोट्यवधींचा निधी आणण्यासाठी केला. राजकारणासोबतच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सलग अनेक वर्षे नेतृत्व करताना त्यांनी आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेचा एक आदर्श निर्माण केला. सहकार क्षेत्रावर अनेकदा आरोप होतात, पण काकांच्या कारकीर्दीवर असा डाग कधीच लागला नाही.

​स्मरणातील विलासकाका : माणूस म्हणून अधिक मोठे

​विलास काकांच्या राजकीय कारकिर्दीचे विश्लेषण अनेकांनी केले असेल, पण मला लाभलेले त्यांचे सान्निध्य हे एका पत्रकाराच्या नात्याने नव्हे, तर एका माणसाच्या नात्याने अधिक समृद्ध करणारे ठरले. खरे सांगायचे तर, आमच्या संबंधांची सुरुवात फारशी गोड नव्हती. काही गैरसमजांमुळे सुरुवातीला माझ्यात आणि काकांमध्ये एक अंतर होते. पण काळ पुढे सरकला, गैरसमज विरघळले आणि त्यातून निर्माण झालेले नाते आयुष्यभर स्मरणात राहील असे बनले.

​"मोरेना बोलवा..."
एकदा अलंकार हॉटेलमधील एका गर्दीच्या कार्यक्रमात काकांनी सहज विचारले, "मोरे आले नाहीत का? मोरेना बोलवा..." तो क्षण माझ्यासाठी अनपेक्षित होता. त्यानंतर आमच्यातील अंतर पूर्णपणे संपले. कराडच्या बंगल्यावर ते आले की अनेकदा निरोप यायचा आणि मग चहाच्या कपावर राजकारण, सहकार, पत्रकारिता ते दिल्लीतील घडामोडींपर्यंत मनमोकळ्या गप्पा रंगायच्या.
​"मायलेज वाढवा..." – पत्रकारांसाठी गुरुमंत्र

काका पत्रकारांना केवळ बातमी देणारे लोक मानत नसत, तर समाजाचे अभ्यासक मानत. मला त्यांनी दिलेला सल्ला आजही तंतोतंत आठवतो:
​"मोरे, फक्त कराडमध्ये अडकून राहू नका. मायलेज वाढवा, पुस्तके वाचा, अभ्यास करा. पत्रकाराला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा आल्या पाहिजेत. उद्या राहुल गांधी किंवा इतर राज्याचे मोठे नेते आले, तर तुम्ही त्यांच्याशी कोणत्या भाषेत संवाद साधणार? अभ्यासाशिवाय दर्जेदार पत्रकारिता होत नाही." असे त्यांचे मत होते. मला प्रत्येक महिन्याला चांगली पेन्शन येते.‌ कराडचे पत्रकार येऊन जर अभ्यासासाठी ग्रंथालय काढणार असतील तर या पेन्शन मधून पत्रकारांसाठी वाटेल तेवढी पुस्तके मी तुम्हाला द्यायला तयार आहे, असं त्यांनी सर्वांना आवाहन केलं होतं.

​कार्यकर्त्यांशी जिव्हाळा आणि पियूषचा प्रसंग

काकांच्या भाषेत राग असायचा, पण मनात अपार माया होती. कार्यकर्ता सामने आला की "अरे मूर्ख... कशाला आलास?" अशी प्रेमाची शिवी हासडण्याची त्यांची वेगळीच शैली होती. एकदा मी माझा मुलगा पियूषला त्यांना भेटायला घेऊन गेलो. त्याची कृश तब्येत पाहून काका मला हक्काने रागावले, "हा तुमचा मुलगा एवढा बारीक का? मोरे हे अजिबात बरोबर नाही.मुलाच्या तब्येतीकडेही लक्ष द्या." त्यांच्या या प्रेमळ रागामुळे पियूषने व्यायाम सुरू केला. वर्ष-दीड वर्षाने जेव्हा आम्ही पुन्हा गेलो, तेव्हा त्याच्या सुधारलेल्या तब्येतीवर काकांनी पाठीवर मारलेली कौतुकाची थाप त्यांच्यातील संवेदनशील पालकाची साक्ष देणारी होती.


​कोरोनाचा काळ आणि 'वडीलकीचा' फोन

कोरोनाचा तो भीषण कालखंड आपल्या सर्वांसाठीच अत्यंत वाईट होता. अहोरात्र जनतेच्या गराड्यात राहणाऱ्या विलास काकांसाठी हा काळ सर्वात मोठा आघात होता. त्यांचा जनतेशी असलेला थेट संपर्क तुटला आणि त्यांना घरात राहावे लागले. लोकांना भेटता न आल्यामुळे त्यांचे जणू 'टॉनिक' किंवा 'ऑक्सिजनच' कमी झाला होता. मीही त्या काळात त्यांना भेटू शकलो नाही.
​मात्र, या विलगतेच्या काळात मला काकांचा एक थक्क करणारा अनुभव आला. त्या संपूर्ण टाळेबंदीच्या काळात काकांचे मला जवळजवळ ६ ते ७ वेळा फोन आले! फोन आला की त्यांचा पहिला प्रश्न असायचा— "मोरे, कुठे आहात? तब्येतीची काळजी घ्या. कुठेही विनाकारण फिरू नका. पत्रकारिता नक्की करा, पण कोरोनाची काळजी घ्या, आजारी पडू नका."

​त्या संकटाच्या काळात कदाचित माझ्या सख्ख्या नातेवाईकांनीही मला इतक्या वेळा फोन करून माझी चौकशी केली नसेल, जेवढी काळजी काकांनी घेतली. काकांना घरात बसून जगातील सर्व बातम्या मिळत होत्या; पण या बातम्या गोळा करण्यासाठी गावोगावी फिरणाऱ्या पत्रकाराला कोणाची तरी साथ हवी, त्याची काळजी घेणारे कोणीतरी हवे, या भावनेतून एका हक्काच्या 'वडीलकीच्या नात्याने' ते मला फोन करायचे. हा प्रसंग माझ्या आयुष्यात कधीही न विसरता येणारा आहे.

​'भगीरथ' आणि शेवटची मुलाखत

​विलास काकांचे आयुष्य लोकांसमोर आणणाऱ्या 'भगीरथ' या पुस्तकाच्या संपादनाच्या निमित्ताने मला शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांच्या कुटुंबीयांसह राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या मुलाखती घेण्याची आणि काकांचा राज्यव्यापी प्रभाव जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. यादरम्यान काका किती मोठे आहेत हे मोठ्या विभूतींच्या तोंडून ऐकावयास मिळाले.

​मी सातारा येथे त्यांच्या निवासस्थानी घेतलेली त्यांची सविस्तर मुलाखत 'दैनिक पुढारी'मध्ये प्रसिद्ध झाली आणि ती प्रचंड गाजली. दुर्दैवाने, त्यानंतर काहीच दिवसांत त्यांची प्रकृती खालावली आणि ते आपल्यातून निघून गेले. ती मुलाखत त्यांच्या आयुष्यातील शेवटची प्रमुख मुलाखत ठरेल, अशी कल्पनाही मी केली नव्हती. ही जाणीव आजही मनाला अस्वस्थ करते.

​आजच्या राजकारणासाठी एक आदर्श
​२०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट न मिळाल्यामुळे भाजपसह अनेक पक्षांनी त्यांना ऑफर्स दिल्या. पण काकांनी स्पष्ट सांगितले, "ज्या काँग्रेसमुळे मी मोठा झालो, तो पक्ष सोडणार नाही." त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, पण निष्ठा ढळू दिली नाही.

​आज सत्ता, पैसा आणि पदे असणारे अनेक नेते मिळतील; पण प्रत्येक गावात स्वतःचे हक्काचे माणूस उभे करणारा, कार्यकर्त्याला नावाने ओळखणारा आणि पक्षापेक्षा तत्त्वांना मोठे मानणारा विलासराव पाटील उंडाळकर  यांच्यासारखा अजातशत्रू नेता पुन्हा होणे कठीण आहे. ते केवळ एक राजकारणी नव्हते, तर सातारा जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीचे एक पर्व होते.

विलासकाकांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय आणि सामाजिक वारशाची धुरा त्यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी सांभाळली आहे. आज ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून जनतेची सेवा करत आहेत, काकांनी स्थापन केलेल्या, वाढवलेल्या संस्था सांभाळत आहेत. आजचे राजकारण हे विलास काकांच्या काळापेक्षा अधिक गुंतागुंतीचे, स्पर्धात्मक आणि बदलत्या समीकरणांचे झाले आहे. अशा विपरीत परिस्थितीत आपल्या वडिलांचा आणि स्वातंत्र्यसैनिक आजोबा दादासाहेब उंडाळकर यांच्या विचारांचा वारसा जपणे ही निश्चितच सोपी गोष्ट नाही.तरीही उदयसिंह पाटील-उंडाळकर हे आपल्या वडिलांनी घालून दिलेल्या लोकसंपर्क, विकासाभिमुखता, कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा आणि पक्षनिष्ठेच्या मार्गावर चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतात. 

काळ बदलला, राजकारण बदलले, काम करण्याच्या पद्धती बदलल्या; तरीही आपल्या घराण्याचा सामाजिक आणि राजकीय वारसा जपण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. विलास काकांसारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा घडणे कठीण असले, तरी त्यांच्या विचारांची ज्योत पुढील पिढीने तेवत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे,हीच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल.


१० जुलै २०२६

दुःख हे सुखरूप" — संत तुकाराम महाराज आणि "दुःखको अपने गले लगा ले"

"दुःख हे सुखरूप" — संत तुकाराम महाराज 
आणि "दुःखको अपने गले लगा ले"

पंढरीच्या वारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेला पाऊस,पूर आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि या परिस्थितीवर मात करून पुढे जाणारा वारकरी आणि अशाच वेळी पुण्यातील काही नोकरदार आयटीचे लोक या पावसाला कंटाळलेले दिसले. यावर कार्टूनिस्ट आलोक यांनी आज सुंदर कार्टून काढले आहे. ते आज फेसबुक वर पाहायला मिळाले. त्यामध्ये संत तुकाराम महाराजांचा खालील अभंग आहे.

संत तुकाराम महाराज म्हणतात,
"कष्ट करितां नाम घेतां ।
सुख होते अंतरी ।।
तुका म्हणे विठ्ठला ।
दुःख हे सुखरूप ।।"

हा अभंग वाचल्यानंतर त्याचा अर्थ जाणून घ्यायचा, समजावून घेण्याचा आणि तो त्याचे विवेचन करण्याचा प्रयत्न केला.

या अभंगातील "दुःख हे सुखरूप" ही ओळ प्रथमदर्शनी विरोधाभासी वाटते. दुःख आणि सुख हे एकमेकांच्या विरुद्ध असताना संत तुकाराम महाराज दुःखाला सुखरूप का म्हणतात?

याचे उत्तर त्यांच्या जीवनदृष्टीत आहे. माणसाच्या आयुष्यात दुःख, संकटे, अपयश आणि वेदना अपरिहार्य आहेत. त्यापासून कोणीही पळू शकत नाही. पण या दुःखाकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो, यावर आपले जीवन ठरते. जेव्हा मन विठ्ठलाच्या नामस्मरणात स्थिर होते, तेव्हा दुःखाचा भार कमी वाटू लागतो. दुःख नाहीसे होत नाही, पण ते सहन करण्याची शक्ती वाढते. त्या क्षणी दुःख हेच माणसाला घडवणारे साधन बनते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात—"दुःख हे सुखरूप."

याच विचाराची आठवण अमिताभ बच्चन यांच्या मुकद्दर का सिकंदर चित्रपटातील एक संवाद करून देतो.

"दुःख को गले लगा ले... तक़दीर तेरे कदमों में होगी, और तू मुकद्दर का बादशाह बनेगा."

या एका वाक्यात जीवनाचे मोठे तत्त्वज्ञान दडले आहे. दुःखापासून पळत राहिलो, त्याच्यावर रडत बसलो, तर ते आपल्याला कमकुवत करते. पण दुःखाचा स्वीकार केला, त्याला मिठी मारली, संकटांशी दोन हात केले, तर तेच दुःख आपली सर्वात मोठी ताकद बनते.

याच चित्रपटातील प्रसिद्ध ओळीही हेच सांगतात—
"रोते हुए आते हैं सब, हँसता हुआ जो जाएगा, वही मुकद्दर का सिकंदर कहलाएगा."

जन्मताना प्रत्येकजण रडत या जगात येतो. पण आयुष्यभर आलेल्या संकटांवर मात करत, चेहऱ्यावर हास्य ठेवून जगणारा माणूसच खऱ्या अर्थाने जीवनाचा सिकंदर ठरतो.

संत तुकाराम महाराजांचा अध्यात्म आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील जीवनदर्शन या दोन्हींचा गाभा एकच आहे. दुःख हे शाप नाही; ते आपल्या व्यक्तिमत्त्वाला घडवणारे विद्यापीठ आहे. जो दुःखाचा स्वीकार करतो, तो त्यातून अधिक सक्षम, अधिक परिपक्व आणि अधिक शांत बनतो.

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण सुखाच्या शोधात धावत आहे; पण खरी गोष्ट अशी आहे की सुखाचा मार्ग अनेकदा दुःखातूनच जातो. दुःखाला शत्रू न मानता त्याचा स्वीकार केला, त्यातून शिकत राहिलो, तर एक दिवस तेच दुःख आपल्या यशाचा पाया बनते.

म्हणूनच संत तुकाराम महाराजांचे "दुःख हे सुखरूप" आणि अमिताभ बच्चन यांचे "दुःख को गले लगा ले" हे दोन वेगवेगळ्या काळातील संदेश नसून, एकाच शाश्वत जीवनसत्याच्या दोन अभिव्यक्ती आहेत. 

एक अध्यात्माच्या भाषेत सांगतो, तर दुसरा चित्रपटाच्या माध्यमातून; पण दोघेही आपल्याला एकच शिकवण देतात—

दुःखापासून पळू नका. त्याचा स्वीकार करा. कारण दुःखच माणसाला मजबूत बनवते, आणि त्याच दुःखातून जीवन घडते.


०९ जुलै २०२६

कराडपासून अवघ्या ११ किलोमीटरवर... 'X' आकाराचा स्वर्ग! Ex आठवणीसाठी

कराडपासून अवघ्या ११ किलोमीटरवर... 
'X' आकाराचा स्वर्ग! Ex आठवणीसाठी!

मेरवेवाडी पाझर तलाव आणि पाचुंदचा घाट – प्रति महाबळेश्वराचा अविस्मरणीय अनुभव

सौंदर्य पाहण्यासाठी नेहमीच शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, असे नाही. अनेकदा निसर्गाचे सर्वात सुंदर रूप आपल्या अगदी जवळच असते. फक्त ते पाहण्याची दृष्टी आणि अनुभवण्याची संवेदनशीलता आपल्याकडे असावी लागते.

आपण महाबळेश्वर, कास पठार, कुंभरली घाट किंवा इतर पर्यटनस्थळांच्या शोधात भटकत असतो; पण कराडपासून अवघ्या बारा किलोमीटरवर निसर्गाने जपून ठेवलेला एक असा अद्भुत खजिना आहे, ज्याला "प्रति महाबळेश्वर" म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या सीमेवरील डोंगररांगांमध्ये वसलेला मेरवेवाडी पाझर तलाव आणि पाचुंदचा घाट हा परिसर प्रत्येक निसर्गप्रेमीने आयुष्यात एकदा तरी अनुभवावाच.

मी या भागातील असल्याने हे ठिकाण माझ्यासाठी नवीन नाही. मात्र गेल्या काही वर्षांत या ठिकाणाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू लागली आणि पर्यटकांची पावलेही या दिशेने वळू लागली. जे एकेकाळी स्थानिकांपुरते मर्यादित होते, ते आज कराड परिसरातील एक आकर्षक पर्यटनस्थळ बनत आहे.

कराडहून ओगलेवाडी, करवडी, वाघेरी मार्गे पुढे गेल्यावर मेरवेवाडी गाव लागते. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या या गावाजवळ जिल्हा परिषदेने १९७२ च्या सुमारास पिण्याच्या पाण्यासाठी पाझर तलाव उभारला. मेरवेवाडी, वाघेरी, पाचुंद, सुरली आणि परिसरातील गावांना जीवनदायी ठरलेला हा तलाव आज निसर्गप्रेमींसाठी आनंदाचा झरा बनला आहे. आजही त्या काळातील पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन या तलावाच्या इतिहासाची साक्ष देताना दिसतात.


तलावाच्या पायथ्याशी असलेले दत्त मंदिर वातावरणाला अधिकच पावित्र्य देते. तलावाच्या काठाने फेरफटका मारणे, पाण्यात पाय सोडून निवांत बसणे, मासेमारीचा आनंद घेणे किंवा सांडव्याच्या भिंतीवर बसून शांतपणे निसर्ग न्याहाळणे... प्रत्येक क्षण मनाला वेगळाच आनंद देऊन जातो.

पण या तलावाचे खरे सौंदर्य अनुभवायचे असेल, 
तर पाचुंदच्या घाटात जायलाच हवे.

मेरवेवाडी गावाच्या डावीकडून सुरू होणारा नागमोडी घाट चढत असताना प्रत्येक वळणावर निसर्गाचे रूप अधिक खुलत जाते. घाटाच्या माथ्यावर एका ठिकाणी वाहन थांबवून खाली नजर टाकली की हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत विसावलेला हा तलाव इंग्रजी अक्षर 'X' च्या आकारात दिसतो. त्या क्षणी आपण कराडजवळ नसून एखाद्या प्रसिद्ध हिल स्टेशनवर उभे असल्याचा भास होतो.

मी गंमतीने एकदा म्हटले होते, "आपल्या 'Ex' आठवणींना उजाळा द्यायचा असेल, तर या 'X' आकाराच्या तलावाला एकदा नक्की भेट द्या." पण खरं सांगायचं तर हा तलाव फक्त जुन्या आठवणी जागवण्यासाठी नाही, तर नव्या उमेदीने जगायला शिकवण्यासाठी आहे.

दोन दिवसांपूर्वी शेताकडे जाताना सहज या ठिकाणी जाण्याचा योग आला. मुसळधार पावसात घाट चढत वर गेलो. खाली तलाव, समोर हिरव्यागार दऱ्या, डोंगरांवरून कोसळणारे असंख्य धबधबे आणि पावसाच्या सरींनी भारावलेला परिसर... निसर्गाने त्या दिवशी अक्षरशः मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली होती.

थोड्याच वेळात पाऊस थांबला. संध्याकाळचे सावट दाटू लागले आणि क्षणार्धात संपूर्ण परिसर दाट धुक्याच्या शुभ्र दुलईत हरवून गेला. इतके धुके पडले की समोरचे काहीच दिसेनासे झाले. त्या निसर्गरम्य क्षणांना डोळ्यांत साठवत मी आणि माझा मित्र संजय शिंदे बराच वेळ तिथे निवांत बसून राहिलो.

त्या क्षणी एकच विचार मनात आला—अशा शांततेचा अनुभव घेण्यासाठी आपण महाबळेश्वर, कास किंवा कुंभरली घाट गाठतो; पण हाच अनुभव कराडपासून अवघ्या बारा किलोमीटरवर मिळू शकतो.

मात्र त्यासाठी एक छोटीशी अट आहे. संध्याकाळची वेळ असावी... आणि तुमच्या नशिबाने नुकताच पाऊस पडलेला असावा. पावसानंतर पाचुंदच्या घाटातून दिसणारा मेरवेवाडीचा पाझर तलाव म्हणजे निसर्गाने रंगवलेले एक जिवंत चित्रच वाटते.

आठवणी सुखाच्या असोत किंवा दुःखाच्या... मन थकलेले असो किंवा नव्या ऊर्जेच्या शोधात असो... स्वतःशी काही क्षण संवाद साधण्यासाठी, निसर्गाचा निखळ आनंद लुटण्यासाठी आणि मनाला नवसंजीवनी देण्यासाठी मेरवेवाडीचा हा 'X' आकाराचा पाझर तलाव सर्वोत्तम ठिकाण आहे.

#कसे जाल?

✓कराड – ओगलेवाडी – करवडी – वाघेरी – मेरवेवाडी असा मार्ग या ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्वात सोयीचा आहे.

#खाण्यापिण्याची व्यवस्था

✓या परिसरात हॉटेल्स नाहीत. त्यामुळे आवश्यक खाण्यापिण्याचे साहित्य सोबत घेऊन जाणे उत्तम. ओगलेवाडी किंवा करवडी येथे आवश्यक वस्तू, खाद्यपदार्थ सहज उपलब्ध होतात.

#भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ

✓वर्षभर येथे जाता येते. मात्र पावसाळा आणि हिवाळा हा या परिसराचा सुवर्णकाळ आहे. पावसाळ्यात धुके, हिरवाई आणि धबधबे या ठिकाणाला स्वर्गीय रूप देतात.

कराडच्या आसपास अशी अनेक सुंदर पर्यटनस्थळे आहेत. त्यांना अधिक प्रसिद्धी आणि विकास मिळायला हवा. मेरवेवाडीचा पाझर तलाव हे त्यातीलच एक अनमोल रत्न आहे.

मग... कधी निघताय?
कराडपासून अवघ्या १२ किलोमीटरवर असलेल्या या निसर्गस्वर्गाकडे...

'X' आकाराच्या तलावाकडे...

स्वतःला पुन्हा एकदा भेटण्यासाठी...

आठवणींना उजाळा देण्यासाठी...

आणि निसर्गाच्या कुशीत काही क्षण मनःशांती अनुभवण्यासाठी.

*सतीश मोरे सतिताभ*
९८८११९१३०२ 

#मेरवेवाडी
#पाचुंद
#निसर्ग
#सतिताभ

०६ जुलै २०२६

कोयना घाटमाथा पावसातल्या साम्राज्यातील अविस्मरणीय प्रवास


कराड ते घाटमाथा... पावसाच्या साम्राज्यातला एक अविस्मरणीय प्रवास
पावसाळा सुरू झाला की माझे पाय आपसूकच कोयनानगरकडे वळतात. प्रत्येक वर्षी किमान एक-दोन वेळा तरी कोयनानगरला जाणे हा माझ्यासाठी एक आनंदसोहळाच असतो. कधी पुढारीच्या बातमीच्या निमित्ताने, कधी निसर्ग अनुभवण्यासाठी, तर कधी मनावरील ताण झटकण्यासाठी. कारण कोयना धरण आणि त्याचा परिसर म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण. येथे घालवलेला एक दिवस मनाला नवसंजीवनी देऊन जातो.

गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने जोर धरला होता. रविवारी सकाळी अचानक मित्रांसोबत कोयनानगरला जाण्याचा बेत ठरला. माझे मित्र सतीश पाटील, जितेंद्र डुबल आणि मी असा आमचा छोटासा प्रवासाचा चमू तयार झाला. मात्र सगळ्यांच्या वेळा जुळवता जुळवता कराडमधून निघायला दुपारचा एक वाजला.

गाडी चालवण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. कराड सोडताना पाऊस हलकासा होता; पण तांबव्याच्या पुढे गेल्यावर त्याने आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली. मुसळधार पाऊस, कारच्या काचांवरून झरझर वाहणारे थेंब आणि आवडीची गाणी... अशा वातावरणात गाडी चालवण्याचा आनंद शब्दांत मांडता येत नाही. मला पावसात ड्राइव्ह करायला नेहमीच आवडते. बाहेर कोसळणारा पाऊस आणि आत सुरू असलेली गाणी... यापेक्षा सुंदर संगत दुसरी कोणती असू शकते?

विहेघाट, मळ्हारपेठ, नव्या रस्त्याने आम्ही पाटणला पोहोचलो. पाटणची बाजारपेठ नेहमीप्रमाणे गजबजलेली होती. नव्या सिमेंट रस्त्यामुळे पूर्वीसारखी वाहतूक कोंडी जाणवत नव्हती. तेथे गाडी बाजूला लावून आम्ही मंडईत गेलो आणि ताजे मासे विकत घेतले. हे मासे कोयनानगरमध्ये एका हॉटेलमध्ये शिजवण्यासाठी देण्याचा आमचा आधीच बेत होता.

पाटण ते कोयनानगरचा रस्ता आता अतिशय चांगला झाला आहे. मध्ये दोन-तीन ठिकाणी एकेरी वाहतूक असल्याने थोडा वेळ लागतो; पण जेसीबी, सुरक्षा कर्मचारी आणि वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी सतत कार्यरत असल्याने फारशी अडचण जाणवत नाही. हा कालचा अनुभव होता.

कोयनानगरमध्ये पोहोचल्यावर एसटी स्टँडजवळील एका हॉटेलमध्ये मासे शिजवण्यासाठी दिले आणि आम्ही फेरफटका मारायला बाहेर पडलो. कोयना एसटी स्टँड परिसरात प्रचंड गर्दी होती. धुवांधार पावसात पुलावर उभे राहून धरणातून बाहेर पडणाऱ्या कोयना नदीचे विशाल पात्र पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. गरमागरम चहाचा कप हातात घेऊन बराच वेळ आम्ही त्या दृश्यात हरवून गेलो.

यावेळी नेहमीप्रमाणे नवजा धबधबा किंवा कोयना गार्डनला न जाता घाटमाथ्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. कोयनानगर ते घाटमाथा हा पूर्वी खराब असलेला रस्ता आता अतिशय उत्तम झाला आहे. नागमोडी वळणे, धुक्याची चादर आणि मुसळधार पाऊस... प्रत्येक वळण नवा निसर्गदृश्यांचा देखावा उलगडत होते.

घाटमाथ्याच्या अलीकडे असलेल्या छोट्या धबधब्यांजवळ आम्ही थांबलो. गरमागरम कणीस खात धबधब्यांचा आवाज ऐकण्यातही एक वेगळीच मजा असते. पुढे घाटमाथ्यावर पोहोचलो. सातारा जिल्हा संपून रत्नागिरी जिल्ह्याची हद्द सुरू होते त्या ठिकाणी पूर्वी असलेले हॉटेल आता बंद झाले आहे. तेथे तैनात असलेल्या पोलिसांशी काही गप्पा मारल्या आणि मग कुंभारली घाटाच्या दिशेने पुढे निघालो.

हा निर्णय त्या दिवसातील सर्वात सुंदर निर्णय ठरला. घाट उतरताना अवघ्या दोन-तीन किलोमीटरच्या अंतरात असंख्य धबधबे रस्त्याच्या कडेला कोसळताना दिसत होते. काही धबधबे तर इतके जवळ होते की हात पुढे केला तरी त्यांचे पाणी अंगावर उडत होते. सुरक्षित जागी गाडी थांबवून आम्ही एका धबधब्याजवळ गेलो. मनसोक्त भिजलो, त्या निर्मळ पाण्याचा आस्वाद घेतला, भरपूर फोटो आणि व्हिडिओ काढले. त्या क्षणी वेळ, काम, जबाबदाऱ्या... सगळे काही विसरून गेलो होतो.

परत घाटमाथ्यावर येऊन 'हनुमान हॉटेल'मध्ये थांबलो. एका मावशींना गरमागरम कांद्याच्या भजींची ऑर्डर दिली. बाहेर मुसळधार पाऊस, समोर धुक्यात हरवलेला कुंभारली घाट आणि हातात गरमागरम चहा व भजी... अशा क्षणांसाठीच माणूस पुन्हा पुन्हा निसर्गाकडे धावत असतो.

त्या धुक्यात हरवलेल्या घाटाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ काढले. काही क्षण मन इतके भरून आले की नकळत काही कविता जन्माला आल्या. काही भावना शब्दांत उतरल्या.

सायंकाळी पुन्हा कोयनानगरला परतलो. हॉटेलमध्ये आमचे मासे आणि जेवण तयार होते. दिवसभराच्या भटकंतीनंतर त्या ताज्या माशांच्या जेवणाची चव अविस्मरणीय होती. रात्री आठच्या सुमारास कोयनानगरमधून परतीचा प्रवास सुरू केला आणि सावधपणे, पावसातून मार्ग काढत साडेनऊच्या सुमारास कराडला पोहोचलो.

कोयना धरण, नवजा धबधबा, कोयना गार्डन आणि विश्रामगृह या ठिकाणी मी अनेकदा गेलो आहे. पण यावेळी कराड ते घाटमाथा हा अवघा सत्तर किलोमीटरचा प्रवास मनात कायमचा घर करून गेला. घाटमाथ्यावरून पाहिलेला मुसळधार पाऊस, धुक्यात हरवलेले डोंगर, धबधब्यांची अखंड गाणी आणि मित्रांसोबत घालवलेले काही तास... आयुष्यभर आठवणीत राहतील.

या संपूर्ण प्रवासात निसर्गाइतकाच आनंद आमच्या गप्पांमध्येही होता. आमच्या तिघांच्या सहलीचा एक अलिखित नियम आहे. आम्ही तिघेही करवडी गावचे असल्यामुळे गावातील विषय काढायचा नाही, राजकारणावर बोलायचे नाही, कोणाची टीका-टिप्पणी करायची नाही. प्रवास हा केवळ आनंदासाठी असतो, हीच आमची भूमिका.
म्हणून आमच्या गप्पांचा विषय असतो तो आयुष्य, मैत्री, जुन्या आठवणी, आवडती गाणी, चित्रपट, नवीन पाहिलेली ठिकाणे, वाचलेली पुस्तके, कधी एखादा विनोद, तर कधी एखादा जीवनानुभव. या गप्पांमधून मन मोकळं होतं, हसू उमलतं आणि प्रवास आणखी सुंदर बनतो.

खरं तर प्रत्येक सहलीत आम्ही निसर्गाइतकाच आनंद एकमेकांच्या सहवासात शोधत असतो. मोबाईल, राजकारण आणि दैनंदिन ताणतणाव यापासून काही तास दूर राहून फक्त त्या क्षणात जगायचं... हीच आमच्या मैत्रीची खरी ताकद आहे. म्हणूनच प्रत्येक कोयनानगरची सहल आमच्यासाठी केवळ पर्यटन राहत नाही, तर ती आयुष्याला नव्याने जगण्याची ऊर्जा देणारी एक सुंदर आठवण बनून जाते.

काही प्रवास हे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसतात; ते स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी असतात. कराड ते घाटमाथा हा प्रवास माझ्यासाठी तसाच ठरला.

सतीश मोरे सतिताभ 

०३ जुलै २०२६

ज्याचा सखा हरी...


ज्याचा सखा हरी... त्यावरी विश्व कृपा करी!

वारीत अनुभवलेला अभंग, श्रद्धा 
आणि ईश्वराच्या अदृश्य सहवासाची जाणीव..!

पंढरपूरची वारी हा केवळ पायी चालण्याचा प्रवास नसतो. तो आत्मशोधाचा, श्रद्धेचा आणि ईश्वराशी नातं अधिक दृढ करणारा अनुभव असतो. लाखो वारकऱ्यांसोबत चालताना प्रत्येकाच्या ओठांवर विठ्ठलाचं नाम असतं आणि मनात एकच विश्वास—"तो आहे... तो आपल्या पाठीशी आहे."

वारीत मलाही हा अनुभव अनेकदा आला. चालताना आम्ही मोबाईलवर सतत अभंग ऐकत होतो. त्यामध्ये एक अभंग वारंवार लावला जायचा आणि प्रत्येक वेळी तो मनाला नव्याने स्पर्श करून जायचा. तो म्हणजे संत जनाबाईंचा—

ज्याचा सखा हरी ।
त्यावरी विश्व कृपा करी ॥१॥
उणें पडों नेदी त्याचें ।
वारें सोसी आघाताचें ॥२॥
तयावीण क्षणभरी ।
कदा आपण पत्नी दुरी ॥३॥
आंगा आपुले ओढोनी ।
त्याला राखे जो निर्वाणीं ॥४॥
ते अंकित भक्तांसी ।
म्हणे नामाची दासी ॥५॥

हा अभंग आकाराने छोटा आहे; पण त्याचा आशय अफाट आहे. विशेष म्हणजे, पंडित भीमसेन जोशी यांच्या भारदस्त आणि भावपूर्ण आवाजात हा अभंग ऐकताना त्यातील गहराई अधिकाधिक जाणवत जाते. त्यांच्या गायकीने या अभंगाला केवळ सूर दिले नाहीत, तर एक विलक्षण आध्यात्मिक उंची दिली आहे. प्रत्येक ओळीतून भक्ती, करुणा, विश्वास आणि ईश्वराशी असलेलं सख्य जिवंत होतं.

वारीत चालताना हा अभंग कानावर पडला की पायातील थकवा नकळत कमी व्हायचा. उन्हाची तमा राहायची नाही. पुढचा रस्ता किती आहे, याचाही विचार मनात यायचा नाही. फक्त विठ्ठलाच्या नामात चालत राहावंसं वाटायचं. त्या क्षणी जाणवायचं—वारी फक्त पायांनी होत नाही; ती मनाने आणि श्रद्धेने होते.

या अभंगातील "हरी" हा केवळ श्रीकृष्ण  नाही. प्रत्येकाच्या श्रद्धेतील परमेश्वर आहे. तो विठ्ठल असो, राम असो, शंकर असो, देवी असो,दत्तगुरू असोत किंवा कोणत्याही रूपातील ईश्वर असो. ज्याच्या जीवनाचा तो सखा असतो, त्याला जगात कधीच एकटं वाटत नाही.
"उणें पडों नेदी त्याचें..." ही ओळ जीवनाचं मोठं सत्य सांगते. आपल्या आयुष्यात अनेकदा अशी माणसं भेटतात, जी अगदी योग्य वेळी मदतीला धावून येतात. एखादा शब्द, एखादा सल्ला, एखादी छोटी मदतही आयुष्याला नवी दिशा देऊन जाते. आपण त्याला योगायोग म्हणतो; पण श्रद्धाळू मनाला वाटतं—ही व्यक्ती देवानेच पाठवली आहे. देव प्रत्यक्ष येत नाही; तो माणसांच्या रूपाने आपल्याला आधार देतो.

वारीतही हे वारंवार दिसतं. एखाद्या वारकऱ्याला पाणी लागतं आणि दुसरा वारकरी न बोलता बाटली पुढे करतो. कोणाच्या पायाला गोळा येतो, तर अनोळखी माणूस थांबून त्याला उभं करतो. कोणाची चप्पल तुटते, तर दुसरा त्याची व्यवस्था करतो. कुणी कुणाला ओळखत नसतं, पण सगळे एकमेकांचे असतात. त्या क्षणी जाणवतं की ही फक्त माणसांची मदत नसते; ती विठ्ठलाचीच कृपा असते.

या अभंगातील "वारें सोसी आघाताचें" ही ओळ मनाला विशेष स्पर्शून जाते. भक्तावर येणाऱ्या संकटांचे आघात देव स्वतः झेलतो, अशी जनाबाईंची श्रद्धा आहे. कदाचित म्हणूनच संकटातून बाहेर पडल्यावर अनेक जण सहज म्हणतात—"देवाने वाचवलं."

वारी संपते पण हा अभंग अजूनही मनात घुमतो आहे. आजही पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात तो ऐकला की पंढरीचा रस्ता, दिंडी, टाळ-मृदंगाचा नाद, विठ्ठलाचा गजर आणि हजारो वारकऱ्यांमध्ये चालत असलेला तो क्षण पुन्हा डोळ्यांसमोर उभा राहतो.

संत जनाबाईंचा हा छोटासा अभंग आपल्याला एक मोठा संदेश देऊन जातो—जीवनात श्रद्धा असेल, ईश्वरावर नितांत विश्वास असेल, तर संकटं संपणार नाहीत; पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद नक्की मिळेल. कारण...

"ज्याचा सखा हरी, त्यावरी विश्व कृपा करी."

२८ जून २०२६

गाणे फक्त ऐकायचे नसते... ते गायकाच्या हृदयातून समजून घ्यायचे असते!

गाणे फक्त ऐकायचे नसते... 
ते हृदयातून समजून घ्यायचे असते!

गाणे ऐकणे म्हणजे केवळ सुरांचा आनंद घेणे नव्हे. त्या गाण्यामागचा संगीतकार कोण, गीतकार कोण, गायक-गायिका कोण, ते कोणत्या चित्रपटातील आहे, त्या शब्दांचा अर्थ काय आहे, हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा माझ्यामध्ये अगदी लहानपणापासून होती. याच इच्छेतून गाण्यांचे रसग्रहण करण्याचा छंद जडला.

महाविद्यालयीन काळात, अकरावी-बारावीमध्ये आम्ही मित्रमंडळी चित्रपट पाहायला जात असू. चित्रपट पाहून बाहेर पडल्यावर चर्चा केवळ कथानकावर नसायची. त्या चित्रपटाचा दिग्दर्शक कोण, निर्माता कोण, संगीतकार कोण, गीतकार कोण, संपादक कोण, गायक-गायिका कोण, यावर आमच्या गप्पा रंगायच्या. चित्रपटातील सर्व गाणी पाठ करणे, त्यांच्या कॅसेट्स विकत आणणे आणि त्यावरील प्रत्येक माहिती वाचून काढणे हा आमचा छंदच बनला होता.
आमच्या पाच-सहा मित्रांच्या ग्रुपमध्ये गाण्यांच्या अशा मैफिली रंगायच्या. एकजण निर्माता सांगायचा, दुसरा संगीतकार, तिसरा गायक, चौथा गीतकार... अशा खेळकर पद्धतीने आमचे चित्रपट आणि संगीताविषयीचे ज्ञान वाढत गेले. गाण्यांतील भाव, वेदना, आनंद, चाली आणि शब्द यांचा नकळत अभ्यास होत गेला.

गाण्याची आवड वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षापासून मनात रुजत गेली आणि कालांतराने ती अधिक प्रगल्भ होत गेली. मात्र, गाणे नेमके कसे ऐकावे? प्रत्येक शब्दाचा भाव गायक कसा पोहोचवतो? संगीतकार त्या शब्दांना सूरांचे कोंदण कसे चढवतो? एखादा शब्द फेकताना त्यामागील भावना कशा जिवंत होतात? एखादा कणस्वर हृदयातून उमटून श्रोत्यांच्या मनापर्यंत कसा पोहोचतो? याची खरी जाणीव मात्र मला नव्हती.ही उणीव भरून काढण्याचे काम प्रसिद्ध गायिका आणि गीतविश्लेषक मृदुला दाढे यांनी केले. त्यांच्या 'अमर लता' या कार्यक्रमाचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला.

सुरुवातीपासून शेवटपर्यंत जवळपास तीन तास चाललेला हा कार्यक्रम म्हणजे स्वर, शब्द आणि भावनांचा अद्भुत संगम होता. यापूर्वी अनेक उत्कृष्ट गायक, वादक आणि संगीतकारांचे कार्यक्रम ऐकले होते. पण गाण्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ उलगडून सांगत, त्या शब्दातील भाव स्वतःच्या आवाजातून जिवंत करण्याची कला प्रथमच इतक्या जवळून अनुभवायला मिळाली.
लता मंगेशकर या केवळ महान गायिका नव्हत्या, तर प्रत्येक शब्दाला आत्मा देणाऱ्या कलाकार होत्या. किशोर कुमार, मोहम्मद रफी, मोहम्मद अजीज, सुरेश वाडकर यांसारख्या महान गायकांनी शब्दांना जी उंची दिली, ती कशी निर्माण होते, हे मृदुला दाढे यांनी अत्यंत प्रभावीपणे समजावून सांगितले.

माझा आवडता कलाकार अमिताभ बच्चन यांच्या 'त्रिशूल' चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले "मेरी बर्बादियों का अगर तू ज़िम्मेदार न हो..." हे गीत मी यापूर्वी अनेकदा ऐकले होते. त्याचा अर्थही माहिती होता. पण हेच गीत सादर करताना लतादीदींच्या कोमल आवाजात दडलेली आर्तता, संताप आणि वेदना मृदुला दाढे यांनी ज्या पद्धतीने उलगडून दाखवली, त्यामुळे त्या गाण्याचा नवा अर्थ माझ्यासमोर उभा राहिला.

आर. डी. बर्मन, मदन मोहन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांसारख्या संगीतकारांनी आणि शैलेंद्र, आनंद बक्षी, साहिर लुधियानवी यांसारख्या गीतकारांनी शब्दांना दिलेले संगीत आणि त्या शब्दांना लता मंगेशकर यांनी दिलेला आत्मा याचा अप्रतिम प्रवास या कार्यक्रमातून अनुभवता आला.

मृदुला दाढे यांचा आवाज ही ईश्वराने दिलेली अनमोल देणगी आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व जितके आकर्षक, त्याहून अधिक सुंदर त्यांचा स्वर आहे. सौंदर्य आणि स्वरसौंदर्य यांचा विलक्षण संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो. त्यांच्या गायकीत केवळ सूर नाहीत, तर अभ्यास, संवेदनशीलता आणि गीताविषयीची अपार श्रद्धा आहे.

तीन तासांचा हा कार्यक्रम कधी संपला हेच कळले नाही. उलट, स्वरांचा हा प्रवास आणखी काही काळ सुरू राहावा, अशीच मनापासून इच्छा होत होती. कार्यक्रमातील एकही क्षण असा नव्हता की, मन दुसरीकडे भटकले. प्रत्येक गाणे, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक विश्लेषण श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडत होते.

कराडमध्ये गेली काही वर्षे अभिजित कुलकर्णी आणि चित्रा कुलकर्णी हे दाम्पत्य गीत स्वर संस्कार या संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार संगीत कार्यक्रमांची अखंड परंपरा जपत आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक भव्य आणि उत्कृष्ट कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र यंदाचा अमृता दाढे यांचा 'अमर लता' हा कार्यक्रम सर्वार्थाने सर्वोत्तम ठरला.

हा कार्यक्रम केवळ गाण्यांचा नव्हता; तो संगीत समजून घेण्याचा, शब्दांच्या भावविश्वात डोकावण्याचा आणि लता मंगेशकर यांच्या गायकीचा आत्मा अनुभवण्याचा एक अद्वितीय प्रवास होता. या कार्यक्रमाने कराडच्या संगीतप्रेमींना एका वेगळ्याच सांगीतिक उंचीवर नेऊन ठेवले.

आजच्या धकाधकीच्या काळात अशी दर्जेदार सांगीतिक पर्वणी रसिकांसाठी खऱ्या अर्थाने सांस्कृतिक मेजवानी ठरते. कराडमध्ये अशा दर्जेदार कार्यक्रमांची परंपरा जपणाऱ्या अभिजित कुलकर्णी आणि चित्रा कुलकर्णी या दाम्पत्याचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. त्यांनी उभारलेली स्वर संस्कार ही संस्था केवळ कार्यक्रमांचे आयोजन करत नाही, तर संगीत समजून घेणारे आणि त्यावर प्रेम करणारे रसिक घडवत आहे. अशीच स्वरांची अविस्मरणीय मैफल भविष्यातही कराडकरांना अनुभवायला मिळो, हीच मनापासून इच्छा.

सतीश मोरे सतिताभ 

१९ जून २०२६

एक स्वप्न निघालंय प्रवासाला

एक स्वप्न निघालंय प्रवासाला !

"बचपन से मुझे शादी का बहुत शौक है..."
‘जब वी मेट’ चित्रपटातील गीतचा हा संवाद अनेकांना आवडतो. माझी मुलगी देवयानी हीचा हा आवडता चित्रपट .पण तीने हाच संवाद 'बचपन से मुझे घूमने का बहुत शौक है' असा वेगळा केला आहे.

लहानपणापासूनच तिला जग पाहण्याची, नवीन ठिकाणे अनुभवण्याची, वेगवेगळ्या लोकांना भेटण्याची आणि त्यांच्या कथा जाणून घेण्याची प्रचंड आवड आहे. एखादा डोंगर, एखादं छोटंसं गाव, एखादा निसर्गरम्य रस्ता किंवा अनोळखी माणूस – तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट ही शिकण्याची आणि अनुभवण्याची संधी असते.

प्रवास करताना तिची एक सवय मला नेहमी आश्चर्यचकित करते. कराड, सातारा, कोल्हापूर किंवा कुठेही बसने जात असताना ती शेजारी बसलेल्या व्यक्तीशी ओळख करून घेते. विशेषतः वयस्कर लोकांशी गप्पा मारते, त्यांच्या अनुभवांमधून शिकते आणि परत आल्यानंतर त्या प्रवासात भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीची कथा मला सांगते. तिच्यासाठी प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नसून, तो माणसांना समजून घेण्याचा आणि जग जाणून घेण्याचा मार्ग आहे.

साधारण तीन वर्षांपूर्वी पुढारी कस्तुरी क्लबच्या महिलांची जम्मू-काश्मीर सहल आयोजित करण्यात आली होती. तेव्हा दहावीत असलेल्या देवयानीला मी त्या सहलीला एकटीला पाठवले होते. तिच्या ओळखीच्या महिला त्यात होत्या, त्यामुळे तिला पूर्णपणे सोलो ट्रिप म्हणता येणार नाही. पण त्या प्रवासातही तिचा वेगळेपणा जाणवला. इतर महिला बसमध्ये मागे बसल्या असताना ती ड्रायव्हरच्या शेजारी बसून काश्मीरची माहिती विचारायची, स्थानिक संस्कृती जाणून घ्यायची आणि नवीन गोष्टी शिकायची. परत आल्यानंतर तिने सांगितलेल्या कथा ऐकून मला तिच्या निरीक्षणशक्तीचे कौतुक वाटले.
तेव्हाच तिने मला एक वचन घ्यायला लावले होते – "पप्पा, बारावी झाल्यानंतर मला एक खरी सोलो ट्रिप करायची आहे."

आज तो दिवस आला आहे.
बारावीचा निकाल लागला. सीईटीची प्रक्रिया पूर्ण झाली. आणि तिच्या स्वप्नातील पहिल्या खऱ्या सोलो ट्रिपसाठी ती आज निघाली आहे.

स्वतः मोबाईलवर माहिती शोधून तिने हिमाचल प्रदेशातील मनालीजवळील Hampta Pass Trek निवडला. साधारण २२ किलोमीटरचा हा ट्रेक. जंगल, डोंगर, नद्या, बर्फाच्छादित परिसर, निसर्गाच्या कुशीत सहा दिवसांचा प्रवास आणि स्वतःला नव्याने शोधण्याची संधी.

आज तिला रेल्वेत बसवण्यासाठी मी पुणे रेल्वे स्टेशनवर गेलो होतो. तिला ट्रेनमध्ये बसवल्यानंतर शुभेच्छा देताना मनात अनेक भावना दाटून आल्या. ट्रेन दिल्लीला जाईल, तिथून पुढे मनालीला. मनालीत एक दिवस मुक्काम करून तिच्या आयुष्यातील पहिल्या मोठ्या सोलो अॅडव्हेंचरची सुरुवात होईल.

या प्रवासाला निघण्यापूर्वी तिने आजी-आजोबा, काका-काकू आणि घरातील सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. मला सर्वांत जास्त आनंद याचा वाटतो की तिच्यातील धाडसाला आम्ही बळ दिले. पालक म्हणून भीती वाटतेच, पण त्याहून मोठा विश्वास तिच्यावर आहे.

खरं तर प्रवासाची आवड माझ्याकडेही आहे. महाविद्यालयीन काळात मी मित्रांसोबत सायकलवर आणि टू विलर वरून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे फिरलो आहे. जोतिबा, पन्हाळा, शिर्डी, शनीशिंगणापूर, नाशिक, मुंबई, पुणे, कोकण, बेळगाव, तुळजापूर, सोलापूर आणि असंख्य गावं पाहिली आहेत. त्या प्रवासांनी मला खूप काही शिकवलं. मात्र त्या सोलो ट्रिप नव्हत्या.

आज देवयानी जे अनुभवण्यासाठी निघाली आहे, तो अनुभव वेगळाच आहे. स्वतःच्या बळावर जग पाहण्याचा, निर्णय घेण्याचा, नवीन मित्र जोडण्याचा आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा.
मला खात्री आहे की या प्रवासातून ती फक्त २२ किलोमीटरचा ट्रेक पूर्ण करून परत येणार नाही, तर अनुभवांचे, आठवणींचे आणि आत्मविश्वासाचे एक मोठे भांडार घेऊन परत येईल.

देवयानी, तुझ्या या पहिल्या खऱ्या सोलो ट्रिपसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
जग पाहा, माणसं जोडा, अनुभव गोळा करा आणि सुरक्षितपणे परत या.

तुझ्या पुढच्या प्रवासकथेची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत...

सतीश मोरे (पप्पा)

०७ जून २०२६

अक्षरांचा जादूगार : अक्षरगुरू राहुल (जगन) पुरोहित

अक्षरांचा जादूगार : अक्षरगुरू राहुल (जगन) पुरोहित

"अक्षर म्हणजे विचारांना मिळालेले अमरत्व." या एका वाक्यात अक्षराचे संपूर्ण महत्त्व सामावलेले आहे. अक्षराविषयी आपण कितीही बोललो तरी ते कमीच आहे. अक्षर हा केवळ शब्द लिहिण्याचा मार्ग नाही, तर तो व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे. सुंदर, सुवाच्य आणि रेखीव अक्षर माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच उंची प्रदान करते. अक्षर हा खरोखरच आयुष्याला लाभलेला एक अनमोल दागिना आहे.

संस्कृतमध्ये म्हटले आहे, "अक्षरं न क्षरति इति अक्षरम्" — जे कधी नष्ट होत नाही ते अक्षर. माणूस नश्वर असला तरी त्याचे विचार, त्याचे ज्ञान आणि त्याची ओळख अक्षरांच्या रूपाने कायम जिवंत राहते.

परंतु या अनमोल दागिन्याची जपणूक करण्यासाठी, अक्षर अधिक सुंदर आणि प्रभावी करण्यासाठी आपल्यापैकी किती जण प्रयत्न करतात? अक्षर सुधारण्यासाठी किती जणांनी सातत्याने मेहनत घेतली आहे? आणि अशा प्रयत्नांना योग्य दिशा देणारा एखादा शिक्षक, मार्गदर्शक किंवा गुरू आपल्याला भेटला आहे का?

याचे उत्तर आहे – होय! असे एक व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य अक्षराच्या साधनेसाठी अर्पण केले. ते म्हणजे कराड येथील अक्षरगुरू राहुल उर्फ जगन पुरोहित.

साधारण  १३ वर्षांपूर्वी १९ एप्रिल २०१३ वर्षांपूर्वी त्यांनी "अक्षरसंस्कार" या नावाने एक संस्था सुरू केली. सुरुवातीला अनेकांना आश्चर्य वाटले. "अक्षर सुधारण्याचाही क्लास असतो?" असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. परंतु राहुल पुरोहित यांनी केवळ अक्षर सुधारण्याचे प्रशिक्षण दिले नाही, तर अक्षराच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास, अभ्यासातील प्रगती आणि यशाचा मार्ग विद्यार्थ्यांसमोर उघडून दाखवला.

"तलवारीपेक्षा अक्षराची ताकद अधिक असते," असे म्हटले जाते. कारण तलवार शरीर जिंकू शकते, पण अक्षर मन जिंकते. राहुल पुरोहित यांनी हीच ताकद विद्यार्थ्यांच्या हातात देण्याचा संकल्प केला.
अक्षरातील वेलांट्या, उभ्या-आडव्या रेषा, अनुस्वार, मात्रांचे सौंदर्य आणि अक्षरातील शिस्त यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांनी स्वतःची एक वेगळी लेखनशैली विकसित केली. त्यांचा उद्देश केवळ स्वतःचे अक्षर सुंदर बनवणे नव्हता, तर प्रत्येक विद्यार्थ्याला सुंदर अक्षराचा हा दागिना मिळवून देणे हा होता.

आज "अक्षरसंस्कार" ही संस्था कराड तालुक्यातील अनेक गावांमध्ये कार्यरत आहे. सातारा, सांगली, पुणे यांसारख्या शहरांत तिचा विस्तार झाला असून लवकरच मुंबईतही तिची वाटचाल सुरू होत आहे.

राहुल पुरोहित हे माझे 2001 पासूनचे मित्र. त्यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय राहिला आहे. त्यांचे वडील कराड येथील रॉयल चित्रपटगृहात व्यवस्थापक होते.
वयाच्या १५ वर्षांपासून राॅयल थिएटर मध्ये सहायक लिपीक ते थिएटर मॅनेजर म्हणून काम केले. मात्र त्यांच्या मनातील शिक्षक, संशोधक आणि अक्षरप्रेमी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.अखेरीस त्यांनी नोकरीचा मार्ग सोडून शिक्षण आणि अक्षरसंवर्धनाचा मार्ग निवडला. 

सोमवार पेठ, कराड येथे त्यांनी स्वतःचा क्लास सुरू केला. त्या काळात अक्षर सुधारणा या विषयाबाबत फारशी जागृती नव्हती. तरीही त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि विद्यार्थ्यांमध्ये सुंदर अक्षराचे महत्त्व रुजवले.

कोरोना काळात त्यांनी ऑनलाइन प्रशिक्षणाची अभिनव संकल्पना राबवली. अक्षर सुधारण्यासाठी विशेष अभ्यासक्रम तयार करून त्यांनी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. आजवर दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला आहे. ९० हजार + हून अधिक देशातील,परदेशातील विद्यार्थींना offline आणि online माध्यमातून मार्गदर्शन केले आहे.

या विद्यार्थ्यांचे अक्षर सुधारले, त्यांचा आत्मविश्वास वाढला, स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. शिक्षक आणि मित्रांमध्ये त्यांचा सन्मान वाढला. काही विद्यार्थी शाळेच्या फळ्यावर सुविचार लिहू लागले, तर काहींना परीक्षांमध्ये अधिक चांगले गुण मिळू लागले.

याच संदर्भात संत तुकाराम महाराजांचे शब्द आठवतात —
"आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने."

शब्द आणि अक्षरांचे हे रत्न विद्यार्थ्यांच्या जीवनात झळकू लागले की त्यांचे व्यक्तिमत्त्वही उजळून निघते. राहुल पुरोहित यांनी हजारो विद्यार्थ्यांना हेच रत्न प्राप्त करून दिले आहे.सुंदर अक्षराचा प्रभाव केवळ लेखनापुरता मर्यादित राहत नाही. स्वच्छ, सुवाच्य उत्तरपत्रिका परीक्षकावर सकारात्मक छाप पाडते. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये अक्षराचाही मोठा वाटा असतो, हे राहुल पुरोहित यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या अनुभवातून सिद्ध केले आहे.

संस्कृत सुभाषितात म्हटले आहे —
"विद्याधनं सर्वधनप्रधानम्"
विद्येचे धन हे सर्वश्रेष्ठ धन आहे. परंतु त्या विद्येला आकार देणारे माध्यम म्हणजे अक्षर. म्हणूनच "अक्षर हे संस्कृतीचे जिवंत स्मारक आहे" असे म्हणतात.

अक्षरासोबतच राहुल पुरोहित सरांनी  सुंदर आणि प्रभावी स्वाक्षरी यावर प्रशिक्षणही सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि युवकांना स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करता येत आहे.


आज गावोगावी, शाळाशाळांत जाऊन ते विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या कार्यात पत्नी आणि मुलाचीही मोलाची साथ लाभत आहे. भविष्यात "अक्षरसंस्कार" ही संकल्पना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे त्यांचे स्वप्न आहे.


कॅलिग्राफी (Calligraphy) म्हणजे अक्षरलेखनाची एक सुंदर आणि कलात्मक पद्धत. साध्या अक्षरांना आकर्षक, देखणे आणि कलात्मक स्वरूप देण्याच्या कलेला कॅलिग्राफी असे म्हणतात. अक्षरांचे सौंदर्य वृद्धिंगत करण्यासाठी विविध प्रकारचे पेन, ब्रश, शाई आणि लेखनसाधनांचा वापर केला जातो. शुभेच्छापत्रे, निमंत्रणपत्रिका, पोस्टर्स, लोगो, सुविचार, धार्मिक ग्रंथ तसेच कलात्मक सजावटीसाठी कॅलिग्राफीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. या कलेमध्ये प्रत्येक अक्षराला स्वतंत्र आणि आकर्षक आकार दिला जातो.

अक्षरगुरू राहुल पुरोहित यांनी कॅलिग्राफीचा विषय अतिशय प्रभावीपणे विकसित केला आहे. त्यांनी आपल्या कलात्मक अक्षरलेखनाच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून अक्षरांची सौंदर्यदृष्टी आणि लेखनकलेचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यांच्या प्रशिक्षणातून अनेक विद्यार्थी कॅलिग्राफीच्या क्षेत्रात प्रगल्भ झाले आहेत.

विशेष म्हणजे, अक्षरगुरू राहुल पुरोहित यांनी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांसाठी स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण फॉन्ट शैली विकसित केल्या आहेत. त्यांच्या या कार्यामुळे अक्षरकलेला नवी दिशा मिळाली असून कॅलिग्राफीच्या विश्वात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अक्षरांची सौंदर्यपर परंपरा जपत नव्या पिढीला प्रेरणा देणारे त्यांचे कार्य ही अक्षरप्रेमींसाठी एक अनमोल देणगी ठरली आहे.

अक्षरगुरू राहुल उर्फ जगन पुरोहित यांनी केवळ अक्षरे सुधारली नाहीत; त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि भविष्य घडवले आहे. त्यामुळे भविष्यात "अक्षरगुरू" हे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आदराने घेतले जाईल, याबद्दल कोणतीही शंका नाही.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते —
"अक्षरांची पूजा म्हणजे ज्ञानाची साधना."
ही साधना आयुष्यभर करणाऱ्या, अक्षरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन घडवणाऱ्या अक्षरगुरू राहुल उर्फ जगन पुरोहित यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !





सतीश मोरे सतिताभ 
९८८११९१३०२

०५ जून २०२६

घामाचा सुगंध

घामाचा सुगंध

मुलांना त्यांच्या आवडीचं काम करू द्यावं, त्यांचे छंद जोपासू द्यावेत, त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांना मोकळं आकाश द्यावं, अशी आजच्या काळातील प्रत्येक बापाची इच्छा असते.

पूर्वीचा काळ वेगळा होता. वडिलांनी ठरवलं की मुलगा डॉक्टर व्हायचा, इंजिनिअर व्हायचा किंवा शिक्षक व्हायचा, तर मुलंही त्याच मार्गाने चालायची. त्या मुलाची स्वतःची इच्छा काय आहे, त्याला कोणत्या क्षेत्रात रस आहे, याचा फारसा विचार होत नसे. मुलं वडिलांची स्वप्नं पूर्ण करायची.
पण काळ बदलला आहे. आता प्रत्येक पालकाला वाटतं की मुलांनी स्वतःच्या आवडीचं क्षेत्र निवडावं आणि त्यात यशस्वी व्हावं.

माझ्याबाबतीत मात्र तसं झालं नाही. मी आर्ट्सचा विद्यार्थी होतो. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये मला उत्तम गुण मिळायचे. भाषेवर माझं चांगलं प्रभुत्व होतं. पण नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या सल्ल्यामुळे मी सायन्सला गेलो. बी.एस्सी. बॉटनी पूर्ण केलं. आज मागे वळून पाहताना वाटतं, त्या शिक्षणाचा माझ्या आयुष्यात फारसा उपयोग झाला नाही. मी जे क्षेत्र मनापासून निवडलं असतं, कदाचित त्यात अधिक समाधान मिळालं असतं.
म्हणूनच माझ्या मुलाबाबत मी वेगळा निर्णय घेतला.

पियुषला जगभर फिरायचं होतं. वेगवेगळे देश पाहायचे होते. त्यासाठी त्याने हॉटेल मॅनेजमेंट हे क्षेत्र निवडलं. बारावीनंतर तो पुण्यात हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणासाठी गेला. चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुट्टीत कराडला आला.

मी त्याला सांगितलं, "पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष अनुभवही महत्त्वाचा असतो. एखाद्या हॉटेलमध्ये काम कर."माझे मित्र आशीष पाटील यांच्या ग्रीनलँड हॉटेलमध्ये तो कामाला जाऊ लागला.

एक दिवस घरी आल्यावर त्याने मला एक प्रसंग सांगितला.हॉटेलमध्ये काही तरुण जेवायला आले होते. ऑर्डर देण्यात थोडा उशीर झाला आणि त्यांनी पियुषवर राग काढला. त्याला सुनावलं. पण हॉटेल व्यवसायाचं एक तत्त्व असतं – ग्राहकावर रागवायचं नाही.पियुष शांतपणे सगळं ऐकत राहिला.

रात्री हॉटेल बंद झाल्यावर तो बाहेर आला. त्याच्या बुलेटजवळ गेला. त्या तरुणांनी त्याला ओळखलं."अरे, ही तर सतीश मोरेंची गाडी आहे!"पियुष म्हणाला, "हो, सतीश मोरे माझे पप्पा आहेत."हे ऐकताच त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी पियुषची माफी मागितली.

त्यावर पियुषचं उत्तर मला आजही आठवतं –"माझे पप्पा मोठे असतील, पण हॉटेलमध्ये मी एक वेटर होतो. तुम्ही ग्राहक होतात. तुमचं बोलणं ऐकणं हे माझं काम होतं."त्या दिवशी मला माझ्या मुलाचा खूप अभिमान वाटला.


आज पियुष न्यूझीलंडमध्ये आहे. तो हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पुढील शिक्षण घेत आहे आणि त्याचबरोबर नोकरीही करतो आहे.

न्यूझीलंडला जाताना मी त्याला एकच गोष्ट सांगितली होती –"तू कोणतंही काम कर. पण कामाची कधी लाज बाळगू नकोस. कारण कोणतंच काम छोटं नसतं."

आज दुपारी मी त्याला फोन केला.
तो म्हणाला, "पप्पा, आज मी तीन ठिकाणी काम केलं. त्यापैकी एका ठिकाणी इतकं कष्टाचं काम होतं की मी खूप कंटाळलो आहे."हे ऐकताना माझ्या डोळ्यांत पाणी आलं.
मी त्याला फक्त एवढंच म्हणालो "बाळा, तू न्यूझीलंडमध्ये घाम गाळतोयस, पण त्या घामाचा सुगंध मला इथं कराडात बसूनही जाणवतो आहे. तुझ्या कष्टांचा मला अभिमान आहे."

मित्रांनो,
मुलं स्वतःच्या पायावर उभी राहतात, स्वतःच्या मेहनतीने आयुष्य घडवतात, तेव्हा बापाच्या आनंदाला पारावार राहत नाही.माझ्या वडिलांनी मला लहानपणापासून स्वावलंबनाचे धडे दिले. स्वतःचं काम स्वतः करण्याची सवय लावली. आज पियुषही त्याच मार्गाने चालतो आहे.

वेलिंग्टनमध्ये गाळलेला त्याचा घाम आज हजारो किलोमीटर दूर माझ्या मनाला सुगंध देतो आहे.

पियुष, तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.कष्ट करत राहा. संघर्ष करत राहा.कारण कोणतंच काम वाईट नसतं.वाईट असतो तो फक्त संघर्षाला घाबरणारा दृष्टिकोन आणि लक्षात ठेव ,"कष्टाच्या घामाला नेहमी यशाचा सुगंध असतो."

@पप्पा

३० मे २०२६

सहकारातील दिग्गजांचे वारसदार... नेमके कसे चुकले?

पुढारी 
प्रितीसंगमावरून 

सहकारातील दिग्गजांचे वारसदार... नेमके कसे चुकले?

कराड तालुका हा विचारवंतांचा, सहकारमहर्षिंचा आणि राज्याला दिशा देणाऱ्या नेतृत्वाचा तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. कराडच्या भूमीने राज्याला आणि देशाला अनेक दिग्गज नेते दिले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, पी. डी. पाटील, विलासराव पाटील उंडाळकर, जयवंतराव भोसले यासारख्या नेतृत्वाने कराडचे नाव राज्याच्या राजकारणात, सहकारात आणि शिक्षण क्षेत्रात उंचावले. मात्र काळ बदलला, पिढ्या बदलल्या आणि या दिग्गजांच्या वारसदारांसमोरच आता स्वतःची ओळख निर्माण करण्याचे किंबहुना टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

यशवंतराव मोहिते यांचे योगदान महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही. विधानसभेतील त्यांची अभ्यासू भूमिका, सहकार क्षेत्रातील दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांनी मांडलेली, राबवलेली अनेक धोरणे अशी होती की ज्यांचा प्रभाव पुढे केंद्र सरकारच्या निर्णयांवरही दिसून आला. मात्र आज त्यांच्या वारशाकडे पाहताना एक वेगळीच परिस्थिती दिसते. त्यांचे वारसदार डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्याकडे बुद्धिमत्ता, अभ्यास आणि राजकीय जाण यांची कमतरता नाही. परंतु व्यवहारातील राजकारण, संघटन उभारणी आणि सहकार क्षेत्रातील बदलत्या समीकरणांमध्ये ते अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत, अशी चर्चा सहकार क्षेत्रात होताना दिसते.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केले. यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रात एक मजबूत संस्था उभी करण्याचा प्रयत्न केला. एके काळी ही संस्था कृष्णा कारखान्याशी जोडली गेल्यामुळे भक्कमपणे उभी राहिली. मात्र कारखान्यातील सत्तांतरानंतर परिस्थिती बदलत गेली. गेल्या काही वर्षांत पतसंस्थेची स्थिती गंभीर बनत गेली. ठेवीदारांचे प्रश्न वाढले, लोकांचा विश्वास डळमळीत झाला आणि “ज्यांच्या घराण्याने राज्याला दिशा दिली, त्यांच्याच वारसांना संस्था सावरणे कठीण गेले,” अशी टीका सुरू झाली. या परिस्थितीत डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्यावर राजकीय आणि मानसिक दबाव वाढत गेला, हेही वास्तव नाकारता येणार नाही.

अलीकडील पत्रकार परिषदेत त्यांनी सहकार पॅनेलला दिलेला पाठिंबा हा केवळ राजकीय निर्णय नव्हता, तर त्यामागे एक प्रकारची विवशता जाणवत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण, शब्दांमधील संयम आणि परिस्थितीशी केलेली तडजोड स्पष्ट दिसत होती. त्यांनी हा पाठिंबा “सशर्त” असल्याचे सांगितले असले तरी त्यांच्या स्वभावातील बंडखोरपणा कुठेतरी मवाळ झाल्याचे जाणवत होते. त्यांच्यातील आत्मविश्वास ढळल्याचे जाणवले. 

सहकार, बँकिंग, दूध संघ, साखर कारखाने आणि जिल्हा बँक राजकारण या सर्व क्षेत्रांमध्ये विलासराव पाटील- उंडाळकर यांनी उभा केलेला प्रभाव आजही अनेकांसाठी अभ्यासाचा विषय आहे. सातारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावर काकांचा मजबूत होल्ड होता. निर्णय क्षमता, संघटन कौशल्य आणि व्यवहारातील पकड यामुळे त्यांनी सहकारात एक वेगळं स्थान निर्माण केलं. मात्र आज त्यांच्या वारशाकडे पाहताना परिस्थिती बदललेली दिसते. त्यांचे चिरंजीव ॲड. उदयसिंह पाटील यांनी सहकार आणि राजकारणात सक्रिय भूमिका घेतली असली, तरी वडिलांप्रमाणे व्यापक प्रभाव निर्माण करण्यात त्यांना आजवर अपेक्षित यश मिळालं नाही, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. रयत सहकारी साखर कारखाना अनेक वर्षांपासून खासगी पद्धतीने चालवला जात आहे. त्याचबरोबर ॲड. उदयसिंह पाटील यांनी स्वतःचा खासगी कारखाना उभारला. सध्या त्यांच्या नियंत्रणाखाली कोयना संघ, कोयना बॅंक, कराड शेती उत्पन्न बाजार समिती आणि खरेदी-विक्री संघ या संस्था आहेत. मात्र सहकारातील बदलती राजकीय समीकरणे आणि नेतृत्वातील बदल याचा परिणाम त्यांच्या राजकीय ताकदीवर झालेला दिसतो.
राष्ट्रीय काँग्रेसमधून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातातील निधन, जिल्हा परिषदेतील संघर्ष आणि सातारा जिल्ह्यात अजित पवार गटाला सक्षम नेतृत्वाची कमतरता यामुळे ॲड. उदयसिंह पाटील यांची राजकीय पकड थोडी कमजोर झाल्याचे चित्र दिसते. 

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी घेतलेली माघार अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली. विशेषतः त्यांनी कोणत्या राजकीय, सहकारी किंवा ‌‘इतर‌’ गणितातून डॉक्टर सुरेश भोसले यांना पाठिंबा दिला, हा प्रश्न अद्याप चर्चेचा विषय आहे. हा पाठिंबा “बिनशर्त” असल्याच्या चर्चा रंगत असल्या तरी त्यामागे भविष्यातील राजकीय समीकरणे, आगामी निवडणुका आणि सहकारातील नवीन आघाड्या यांचे गणित असू शकते, असे जाणकारांचे मत आहे. तथापि, या निवडणुकीत घेतलेली सपशेल माघार ही सहकार क्षेत्रातील त्यांच्या प्रतिमेला धक्का देणारी ठरल्याचे बोलले जात आहे. 
सहकार क्षेत्रातील एका मोठ्या घराण्याच्या वारसदाराला निवडणुकीत माघार घ्यावी लागणे किंवा तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागणे, हे केवळ वैयक्तिक अपयश नाही, तर बदलत्या सहकार राजकारणाचेही प्रतिबिंब आहे.कराडच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात आजही मोठी परंपरा आहे, मोठी नावे आहेत. मात्र त्या परंपरेचा वारसा टिकवण्यासाठी केवळ नाव पुरेसे नसते. त्यासाठी संघटन, जनसंपर्क, व्यवहार कौशल्य आणि काळानुसार बदल स्वीकारण्याची क्षमता आवश्यक असते आणि कदाचित याच ठिकाणी जुन्या व नव्या पिढीतील फरक अधोरेखित होताना दिसतो.

डॉ. इंद्रजीत मोहिते आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत घेतलेली भूमिका ही त्यांच्या राजकीय सोयीची, भविष्यातील समीकरणांची किंवा काही राजकीय तडजोडींचा भाग असू शकते. प्रत्येक निर्णयामागे काही ना काही गणित असते, हे वास्तव जरी मान्य केले तरी या भूमिकांना सर्वसामान्य सभासद आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांची अपेक्षित मान्यता मिळालेली दिसत नाही. विशेषतः सहकाराच्या विचारातून घडलेल्या आणि तत्त्वनिष्ठ नेतृत्वाचा वारसा लाभलेल्या घराण्यांकडून सभासदांच्या अपेक्षा अधिक मोठ्या असतात. त्यामुळे या वारसदारांनी घेतलेल्या भूमिकांबाबत जनतेमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे. “सहकाराच्या तत्त्वांपेक्षा राजकीय सोयी महत्त्वाच्या ठरत आहेत का?” असा प्रश्नही अनेकजण उपस्थित करत आहेत.

तिसरा विषय कृष्णा कारखाना संदर्भात नसला तरी सहकारात भव्य कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या सह्याद्री कारखान्याचा आहे.

सह्याद्री साखर कारखाना हा केवळ एक उद्योग नाही, तर कराड परिसराच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार चळवळीच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारातून आणि सहकाराच्या तत्त्वातून उभ्या राहिलेल्या या चळवळीने ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांना आधार दिला. आबासाहेब पार्लेकर यांचा अल्पकाळ, कालावधी सोडला तर पी. डी. साहेब सह्याद्रीचे तहयात चेअरमन होते. त्यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर कारखान्याची धुरा बाळासाहेब पाटील यांच्या हातात आली. अभ्यासू आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. पंधरा महिन्यापूर्वी कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब पाटील यांनी सभासदांना मोफत साखर देण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीतील भव्य यशानंतर गेल्या वर्षभरात सह्याद्री कारखान्याने सभासदांना मोफत साखर दिलीही. मात्र अचानकपणे 1 एप्रिलपासून ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोफत साखर बंद तर केलीच पण पूर्वी सात रुपये किलो दराने मिळणारी साखर आता पंधरा रुपये किलो दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सभासदांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे.

प्रश्न केवळ मोफत साखरेचा नाही, प्रश्न आहे तो निर्णय प्रक्रियेचा. सभासदांनी त्यांच्यावर मोफत साखर द्यावा असा दबाव आणलेला होता का किंवा मागणी केली होती का? मोफत साखर देण्याचा निर्णय घेताना पुढील आर्थिक परिणामांचा विचार झाला होता का? साखर उद्योगातील एक अभ्यासू नेतृत्व म्हणून बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाहिले जाते, मग त्यांनी मोफत साखरेचा निर्णय घेतलाच कसा? आणि आता जर परिस्थिती बदलली असेल, तर सभासदांना विश्वासात घेऊन निर्णय का सांगितला गेला नाही? सहकार म्हणजे केवळ कारखाना चालवणे नाही, तर सभासदांच्या भावनांचा आदर राखणेही तितकेच महत्त्वाचे असते. बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाकडून सभासदांना अधिक स्पष्टता आणि संवादाची अपेक्षा होती. मोफत साखर योजना सुरू करताना ज्या पद्धतीने तिचं स्वागत झालं, त्याच पद्धतीने ती अचानक बंद झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. 

कारखान्याच्या भविष्यासाठी आर्थिक शिस्त आणि व्यवहार्य निर्णय आवश्यक असतात, हे जरी खरे असले तरी सभासदांचा विश्वास टिकवणे त्याहून अधिक महत्त्वाचे असते. आज सह्याद्री कारखान्यासमोर केवळ आर्थिक नव्हे, तर विश्वासार्हतेचेही मोठे आव्हान उभे आहे. आगामी काळात कारखाना सक्षमपणे चालवणे, सभासदांचा विश्वास परत मिळवणे आणि सहकाराची परंपरा जपणे हे मोठे शिवधनुष्य बाळासाहेब पाटील यांच्या खांद्यावर असणार आहे.

सतीश मोरे 
9881191302

२६ मे २०२६

शिस्त लावण्यासाठी संस्कार


आजची पिढी खूप वेगळी आहे. त्यांचे विचार, त्यांची जगण्याची पद्धत आणि गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळाच आहे. म्हणूनच अनेकदा मोठ्यांनी सांगितलेल्या साध्या गोष्टीही त्यांना लगेच पटत नाहीत.

घरातील लाईट चालू ठेवू नयेत, झोपताना सर्व बटणे बंद करावीत, घर स्वच्छ ठेवावं, जेवल्यानंतर ताट बेसिनमध्ये ठेवताना त्यातील उरलेले अन्न आधी बाजूला काढावं, वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात… अशा छोट्या-छोट्या सवयी घराला संस्कार देतात. पण अलीकडच्या पिढीत या गोष्टींकडे दुर्लक्ष होताना दिसतं आणि ते पाहून मन नकळत खिन्न होतं.

किती वेळा सांगायचं, किती वेळा समजवायचं हा प्रश्न पडतो. आपण केवळ नियम शिकवत नसतो, तर आयुष्य जगण्याची शिस्त आणि संवेदनशीलता शिकवत असतो.


कधी कधी मनात निराशा येते, आपले शब्द वाया जात आहेत असं वाटतं. पण तरीही एक विश्वास कायम असतो — आपले विचार प्रामाणिक आणि सकारात्मक असतील, तर त्याचा परिणाम कधीतरी नक्की होतो.

ही “Gen Z” पिढी आहे… त्यांना आदेश नको असतात, संवाद हवा असतो. त्यांना फक्त सांगून चालत नाही, तर समजून घेत जवळ करावं लागतं. काळ बदलला आहे, पद्धती बदलल्या आहेत; पण संस्कारांची किंमत आजही तितकीच मोठी आहे.

@पप्पा🥹

१९ मे २०२६

भेटी लागे जीवा लागलीसे आस


भेटी लागे जीवा… विठ्ठल भेटीची तळमळ 

संत तुकाराम यांचे अभंग म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर ते जीवनाचे अनुभव आहेत. संसारातील दुःख, संकट, उपासमार, अपमान, संघर्ष आणि त्यातून मिळालेली परमेश्वराची अनुभूती या सर्व गोष्टी त्यांच्या अभंगातून व्यक्त होतात. म्हणूनच तुकोबांचे शब्द हे थेट मनाला भिडतात.

मी दहावीला असताना कुमारभारती अर्थात मराठीच्या पुस्तकात शिकवला जाणारा “भेटी लागे जीवा लागलीसे आस…” हा अभंग माझ्या मनाला लहानपणापासून स्पर्श करून गेला. काळ बदलला, आयुष्य पुढे सरकलं, अनेक गोष्टी बदलल्या; पण हा अभंग ऐकला की मन पुन्हा भक्तीच्या त्या शांत विश्वात जाऊन पोहोचतं. अनेकदा हा अभंग मी टीव्हीवर किंवा मोबाईलवर लावतो आणि डोळे बंद करून या अभंगाचे प्रत्येक शब्दाचे अर्थ जाणून घेतो 

खरंचदेव असो,

एखादी व्यक्ती असो किंवा आपलं एखादं ध्येय असो त्याची आपण वाट ज्या पद्धतीने पाहतो ती वाट किती कष्टदायी असते याची मला या अभंगातून अनुभूती येते.

अभंग

भेटी लागे जीवा लागलीसे आस ।

पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥

पूर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन ।

तैसे माझे मन वाट पाहे ॥

दिवाळीच्या मूळा लेकी आसावली ।

पाहतसे वाटुली पंढरीची ॥

भुकेलिया बाळ अति शोक करी ।

वाट पाहे परी माउलीची ॥

तुका म्हणे मज लागलीसे भूक ।

धावूनि श्रीमुख दावी देवा ॥


अभंगातील भक्तीची तळमळ

संत तुकाराम महाराजांचा हा अभंग म्हणजे परमेश्वराच्या भेटीसाठी तळमळणाऱ्या भक्ताच्या मनाचा आवाज आहे.

“भेटी लागे जीवा लागलीसे आस…” या पहिल्याच ओळीत तुकोबा सांगतात की, माझ्या जीवाला आता तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी दिवस-रात्र फक्त तुझीच वाट पाहतो आहे.ही केवळ भक्ती नाही; ही भक्ताच्या अंतःकरणातून निघालेली हाक आहे.

चकोर आणि पावसाची प्रतीक्षा

तुकाराम महाराजांनी चकोर पक्ष्याचे उदाहरण दिले आहे. लोकमान्य समजुतीनुसार चकोर हा पक्षी पावसाच्या थेंबांची वाट पाहतो. त्याच्यासाठी तो पाऊस म्हणजे जीवन असतं.

त्याचप्रमाणे तुकोबांचं मन विठ्ठलाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेलं आहे.ज्याप्रमाणे चकोराला पावसाशिवाय चैन पडत नाही, त्याचप्रमाणे भक्ताला देवाशिवाय समाधान मिळत नाही.

माहेराची वाट पाहणारी लेक

“दिवाळीच्या मूळा लेकी आसावली…” ही ओळ मनाला फार स्पर्शून जाते. लग्न झालेली मुलगी दिवाळीत माहेरी जाण्यासाठी जशी आपल्या वडिलांची वाट पाहते, तशीच अवस्था भक्ताची असते.“माझे बाबा मला न्यायला येतील…” या आशेवर ती दिवस मोजत असते.तुकाराम महाराज म्हणतात —देवा, मीही तुझी तितक्याच आतुरतेने वाट पाहतो आहे.

आईची वाट पाहणारं भुकेलेलं बाळ

भुकेलेलं लहान मूल आईशिवाय शांत होत नाही. बाकी कुणीही काही समजावून सांगितलं तरी ते बाळ गप्प बसत नाही.आई येईपर्यंत त्याचं रडणं थांबत नाही. कारण त्याला माहीत असतं की, माझं समाधान फक्त आईजवळच आहे.तुकाराम महाराजांनी हाच भाव देवासाठी व्यक्त केला आहे.“देवा, तुझ्या दर्शनाशिवाय माझं मन शांत होणार नाही.”

संत तुकारामांचे जीवन आणि भक्ती

संत तुकाराम यांनी आयुष्यात अनेक संकटं पाहिली. दुष्काळ, कर्ज, संसारातील दुःख, समाजाचा विरोध — या सर्व गोष्टी त्यांनी अनुभवल्या. पण या संकटांमध्येही त्यांनी विठ्ठलाचं नाम सोडलं नाही.त्यांच्यासाठी विठ्ठल ही केवळ देवाची मूर्ती नव्हती; तर तो त्यांचा मित्र, आधार, आई-वडील आणि सर्वस्व होता.त्यामुळे त्यांच्या अभंगात कृत्रिमता नाही.जे अनुभवलं, जे जगलं, तेच त्यांनी शब्दांत उतरवलं.


हा अभंग आजही का भावतो?

आजच्या धावपळीच्या जगात माणूस खूप काही मिळवतो; पण मनःशांती हरवतो. अशा वेळी तुकोबांचे अभंग मनाला शांत करतात.“भेटी लागे जीवा…” हा अभंग आपल्याला सांगतो की —ज्याप्रमाणे माणूस आपल्या जवळच्या व्यक्तीची आतुरतेने वाट पाहतो, त्याचप्रमाणे भक्ताने देवावर प्रेम करावं.ही भक्ती भीतीची नाही, तर प्रेमाची आहे.

तुकाराम महाराजांचा हा अभंग मी जेव्हा जेव्हा ऐकतो, तेव्हा मन भक्तीने भरून येतं. लतादीदींच्या आवाजात हा अभंग ऐकताना हृदय दाटून  येतं. डोळ्यातून अक्षरशः अश्रूच्या धारा वाहू लागतात. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या विरहात आपण जेव्हा हा अभंग ऐकत राहतो तेव्हा त्या अभंगाची खरी खोली आणि उंची आपल्याला जाणवते. हा अभंग केवळ शब्दांचा नाही; तर भक्ताच्या हृदयातील तळमळीचा आहे.देव भेटावा, त्याचं दर्शन व्हावं, त्याच्याशी मन मोकळं करावं — ही जी ओढ आहे, तीच या अभंगात प्रत्येक ओळीतून प्रकट होते.

आणि म्हणूनच —“भेटी लागे जीवा लागलीसे आस…”

हा अभंग काळ बदलला तरी मनातून कधीही जात नाही.



सतीश मोरे सतिताभ 

9881191302

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...