*कराडचे स्वच्छतादुत बच्चन*
_विजय पांडुरंग वाटेगावकर..कराडचे स्वच्छतादुत बच्चन_
कराडच्या राजकारणात अनेक चेहरे आले, अनेक गेले; पण काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण होते. नाव घेताच डोळ्यासमोर एक दमदार, जनतेत मिसळणारा आणि कामाच्या जोरावर स्वतःची छाप निर्माण करणारा चेहरा उभा राहतो. जसं अग्निपथ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचं “विजय दीनानाथ चौहान” हे नाव दमदार वाटतं, तसंच कराड शहरात स्वच्छतेचं प्रतीक म्हणून “विजय पांडुरंग वाटेगावकर” हे नाव घेतलं जातं.
अनेक जण त्यांना प्रेमाने “गुंड्या भाऊ” म्हणून ओळखतात.नगरसेवक म्हणून त्यांचा दरारा आहेच; पण कराड शहराचं नाव राज्य आणि देशपातळीवर पोहोचवणारा लोकप्रतिनिधी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा, मैत्रीचा आणि प्रवासाचा हा विशेष उल्लेख.
माझी आणि विजय वाटेगावकर यांची मैत्री ही जवळपास वीस वर्षांची आहे. 2001 मध्ये मी ‘पुढारी’मध्ये वार्ताहर म्हणून काम सुरू केलं. त्यानंतरच्या 2006 च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शुक्रवार पेठ आणि सोमवार पेठ परिसरातून विजय वाटेगावकर प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्या काळात मी पत्रकार म्हणून त्या प्रभागाचा कानोसा घेत होतो. लोकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक वातावरण जाणवत होतं. निवडणुकीपूर्वीच मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं — “तुमचा विजय निश्चित आहे.”
मतमोजणीच्या दिवशी निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम विजयाची बातमी मीच त्यांना दिली. त्या दिवसापासून आमच्या मैत्रीचं नातं अधिक घट्ट होत गेलं. गेल्या दोन दशकांत आम्ही अनेक दौरे केले, अनेक सहली अनुभवल्या, असंख्य गाठीभेटी झाल्या; पण या काळात त्यांच्यातील एक गोष्ट कायम जाणवत राहिली — जनतेवर असलेलं नितांत प्रेम आणि कराड शहरासाठी काहीतरी वेगळं करण्याची तळमळ.
२०१७ सारी कराड नगरपालिकेत आरोग्य सभापतीपद त्यांच्याकडे आलं, तो काळ वेगळा होता. त्या पदाकडे फारसं महत्त्वाचं म्हणून पाहिलं जात नव्हतं. अनेकांना वाटत होतं की विजय वाटेगावकर बांधकाम सभापती होतील; पण राजकीय समीकरणांमुळे त्यांच्याकडे आरोग्य सभापतीपद आलं. त्यावेळी मी सहजच त्यांना म्हटलं होतं, “भाऊ, हे पद कशाला घेतलंत?” त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर आजही लक्षात आहे —
“मोरे साहेब, कोणतंही पद छोटं नसतं… त्या पदाची उंची आपण वाढवायची असते.”आणि त्यांनी ते शब्द अक्षरशः खरे करून दाखवले.
त्या काळात कराड शहर म्हणजे कचराकुंड्यांचं शहर अशी ओळख निर्माण झाली होती. प्रत्येक चौकात, गल्लीत, बाजारात कचऱ्याचे ढीग दिसत होते. विजय वाटेगावकर यांनी शहर कचराकुंडीमुक्त करण्याचा ध्यास घेतला. “कराडमध्ये एकही कचराकुंडी ठेवायची नाही,” असा निर्धार त्यांनी केला. सुरुवातीला अनेकांनी टीका केली. “कचराकुंडी नाही तर कचरा कुठे टाकायचा?” असे प्रश्न उपस्थित झाले. पण त्यांनी नियोजन केलं होतं.
घराघरातून कचरा संकलन करण्याची “घंटागाडी” संकल्पना त्यांनी पुढे आणली. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा उपक्रम सुरू झाला आणि हळूहळू कराड शहर स्वच्छतेच्या दिशेने पुढे जाऊ लागलं. लोकांनाही त्याची सवय लागली. पुढे नागरी स्वच्छता अभियानात कराडने देशपातळीवर मोठं यश मिळवलं. त्या यशामागे विजय वाटेगावकर यांच्या दूरदृष्टीचा मोठा वाटा होता. म्हणूनच जनतेने त्यांना “कराडचे आधुनिक संत गाडगेबाबा” ही उपाधी दिली.
शुक्रवार पेठ आणि सोमवार पेठ हा त्यांचा मतदारसंघ. पण प्रत्यक्षात संपूर्ण कराड शहरच त्यांचं कुटुंब आहे. एखाद्याच्या घरात पाणी नाही, कचरागाडी आली नाही, नाले तुंबले आहेत, कुणाला फी भरण्यासाठी मदत हवी, कुणाच्या मुलाच्या प्रवेशाचा प्रश्न आहे, कुठे कचरा साचला आहे — अशा प्रत्येक समस्येसाठी विजय वाटेगावकर तत्पर असतात.
त्यांची निवडणूक लढवण्याची पद्धतही वेगळी आहे. अनेक जण निवडणुकीच्या काळात पैशांचा पाऊस पाडतात; पण विजय वाटेगावकर पाच वर्षे जनतेत राहून काम करतात आणि निवडणुकीच्या वेळी फक्त मत मागतात. कारण जनतेला माहिती असतं — हा माणूस आपल्या सुखदुःखात कायम सोबत उभा राहतो. म्हणूनच जनता त्यांना पुन्हा पुन्हा निवडून देते.
कोणतीही नवी कल्पना असो, सामाजिक उपक्रम असो किंवा कराड शहराच्या विकासासाठी एखादं वेगळं काम उभं करायचं असो — विजय वाटेगावकर हे नेहमी पहिल्यांदा पुढे उभे राहणारे व्यक्तिमत्त्व आहे. “हे शक्य आहे का?” यापेक्षा “हे कसं शक्य करता येईल?” यावर त्यांचा कायम भर असतो. कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या मनात असंख्य योजना आहेत. शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक कसं होईल यासाठी ते सतत विचारमग्न असतात. नगरपालिकेतील प्रत्येक विभागाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, बांधकाम, प्रशासन किंवा नागरिकांच्या मूलभूत समस्या — प्रत्येक विषयावर त्यांची पकड आणि अनुभव जाणवतो.
विजय वाटेगावकर यांच्यासोबत मला अनेक ठिकाणी फिरण्याचा योग आला. त्या प्रवासांमध्ये त्यांच्यातील एक वेगळी बाजू अनुभवायला मिळाली — ती म्हणजे त्यांच्यातील रसिकता आणि अध्यात्मिक ओढ. फक्त राजकारण किंवा समाजकारण यापुरतं त्यांचं व्यक्तिमत्त्व मर्यादित नाही, तर संस्कृती, परंपरा आणि श्रद्धास्थानांविषयीही त्यांना विशेष आकर्षण आहे. त्यांच्या सहवासामुळे मला मायाक्का चिंचणी, बाळूमामा यांच्यासह धनगर समाजातील अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळाली. या यात्रांमधून त्यांच्या मनातील श्रद्धा, साधेपणा आणि समाजाशी असलेलं नातं अधिक जवळून अनुभवता आलं.
विजय वाटेगावकर यांच्यातील आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांचा मैत्रीपूर्ण आणि दिलखुलास स्वभाव. ते आमच्या “अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप”चे अत्यंत सक्रिय सदस्य आहेत. अमिताभ बच्चन यांच्याविषयी त्यांना विशेष आकर्षण आहे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास, शैली आणि जनसंपर्काची छाप विजय वाटेगावकर यांच्या स्वभावातही अनेकदा जाणवते. मित्रांमध्ये रमणारा, गप्पांमध्ये रंगणारा आणि प्रत्येक क्षण उत्साहाने जगणारा हा माणूस म्हणूनच सर्वांना आपलासा वाटतो.
सध्या ते कराड नगरपालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करत आहेत आणि तेही अत्यंत प्रभावीपणे. त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासू स्वभावाचा प्रत्यय पालिकेच्या सभांमध्ये वारंवार येतो. पुढील काळात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांना जिल्हा किंवा राज्य स्तरावर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कारण विजय वाटेगावकर हे केवळ राजकारणी नाहीत, तर कामातून स्वतःची ओळख निर्माण करणारे जनसेवक आहेत.
अशा या कराडच्या स्वच्छता दूताला, जनतेच्या माणसाला, माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
*सतीश मोरे सतिताभ*