फॉलोअर

०९ डिसेंबर २०२२

पियुष ... क्षितिज तुझी वाट पाहत आहे.!

# *पियुष* ...

हे सारं लिहीत असताना डोळ्यातून आनंदाश्रू वाहत आहेत. अश्रू खारट असतात खरं, पण दुःखाचे अश्रू आणि आनंदाचे अश्रू यात एक फरक असतो. दुःखाचे अश्रू वाहतात, आनंदाचे अश्रू टपकतात, एक एक करून हळूच बाहेर पडतात. मन भरून आनंदाला उधाण आणतात, हर्षवायूला वाट मोकळी करून देतात. आज हेच आनंदाश्रू तरळले आहेत माझ्या डोळ्यात !

तु अमेरिकेला निघाला आहेस, शिकायला, शिकत शिकत कमवायला. हा आमच्या समस्त मोरे कुटुंबियासाठी, करवडी गावातील मोरे भावकीसाठी गर्वाचा क्षण आहे. अमेरिकेत जाऊन तु खुप शिकावं, तुझ्या क्षेत्रातील नवीन कला हस्तगत करून स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करावीस, अशा तुला खुप खुप शुभेच्छा !

पत्रकारांचा मुलगा पत्रकार व्हावा असं खुप कमी लोकांना वाटते. सुरूवातीला मलाही तसंच वाटलं होते. पुढे इतरांप्रमाणे मलाही तु डाक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ व्हावंसं वाटलं. पण अकरावी वेळी माझ्या बाबतीत जी चुक झाली होती ती तुझी होऊ नये असं वाटलं. *"ज्या क्षेत्रात ज्याला रस आहे तिथेच त्याला नोकरी किंवा काम मिळाले, तेच त्यांचे करियर झाले तर त्यासारखा सुखी या जगात कोणीही नसतो,"* या आशयाचे एक सुवचन मी बारावीच्या पुस्तकात शिकले,वाचले होते. तु तुझा मार्ग स्वतः निवडावा, त्या क्षेत्रात तु शिकावं,असा सल्ला मी दिल्यानंतर तु तुझी वेगळी वाट निवडली. हाँटेल मॅनेजमेंटच करायचे ठरवून पुण्यात ताथवडे येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात प्रवेश घेतला. चार वर्षे डिग्री पुर्ण करुन तु आता पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला निघाला आहेस, हा अतिशय सुंदर असा क्षण आहे.

 *तुझ्या सोबत मी कायम आहे,असणार आहे* जसे माझ्यासोबत माझे दादा आहेत. बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही असे म्हणतात, पण बापाच्या हृदयात मुलांसाठी फार मोठी जागा असते, कदाचित आईपेक्षाही अधिक, हे तितकेच खरं. भावनेच्या बांधात बांधून मी तुला गुंतवून ठेवणार नाही पण एवढंच सांगेन *तु निवडलेलं क्षितीज फार मोठ्ठं आहे. तुला त्या कक्षेत तुझी जागा निर्माण करायची आहे.* अशक्य असं काहीच नाही कारण तुझी आवड तुला खुणावत राहणार आहे, गप्प बसू देणार नाही.

नव्या देशात,नव्या प्रांतात तु निघाला आहेस. तिथं नवीन शिकताना तुला अनेकदा अपमानाला, रागाला, नावडत्या गोष्टीला तोंड द्यावे लागेल, सामोरं जावं लागेल. पण ती एक परिक्षा असणार आहे आणि त्यात तु नक्किच यशस्वी होशील.

मला सर्व काही समजते, मी सर्वश्रेष्ठ आहे असं न म्हणता आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहीलं की नवीन शिकताना त्रास होत नाही. महानायक अमिताभ बच्चन अजूनही त्यांच्यापेक्षा निम्म्या वयाच्या दिग्दर्शकांचं ऐकतात. ते म्हणतात, 'मला काहीतरी नवीन करायचं आहे, मला काम द्या.' तुलाही शिकायला खुप संधी मिळणार आहेत. तु शिकत रहा. तुझ्या क्षेत्रात पुर्ण रस घेऊन त्यात प्राविण्य मिळवं. 

बाप्पा मोरया, कुलस्वामी शिखर शिंगणापूर, ग्रामदैवत जानुबाई आणि अखंड कृष्णामाई यांची कृपा तुझ्यावर आहेच,राहील.‌ सद्गुरू वामनराव पै यांच्या विचारांची शिदोरी तुला प्रेरणा देत राहील.

आणि हो.. *महत्वाचे माझ्या कडून अपेक्षांचं कसलंही ओझं तुझ्यावर असणार नाही.* एक चांगला माणूस म्हणून तु यशस्वी होशील, ही खात्री आहे . लव यु बेटा !

Success is achieved and maintained by thse who try and keep on trying with The Positive Mental Attitude.  Best of luck 👍

@..... *पप्पा* 

२.३० मध्यरात्री.
१०.१२.२०२२ मुंबई.

०७ डिसेंबर २०२२

लोहार माझा गुरू

_लोहार...माझा गुरू !_ 

गुरुदेव श्री दत्तात्रेयांनी चोवीस गुरू केले असे म्हणतात. त्यातील एक गुरु लोहार होता. श्री दत्तात्रयानां एकदा एक विलक्षण दृष्य दिसले. लोहाराचे काम करणारा एक माणूस अत्यंत तल्लीन होऊन काम करण्यात इतका रंगून गेला होता की, त्याच्या जवळून एक मिरवणूक वाजत गाजत गेली तरीसुद्धा त्या लोहाराचे लक्ष त्या मिरवणुकीकडे गेलेच नाही किंवा त्या आवाजाने त्यामुळे लोहाराचे चित्त जरा सुद्धा विचलित झाली नाही. लोहाराची ती एकाग्रता व काम करण्यातील तल्लीनता पाहून तो लोहार गुरु करण्यास योग्य आहे, असे श्री दत्तात्रयांना वाटले.

तल्लीन होऊन काम करणाऱ्या त्या लोहाराची लागलेली कर्मसमाधी ही गुहेत बसून किंवा जंगलात बसून योगसमाधी लावणाऱ्या योग्यापेक्षा सहस्त्रपटीने श्रेष्ठ होय, असा *सद्गुरू वामनराव पै* आणि जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. 

 *श्री दत्तात्रय जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !*

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...