फॉलोअर

२५ मे २०२०

अनौपचारिक गोष्टी व्हायरल करणे कुठल्या तत्त्वात बसते?*








अनौपचारिक गोष्टी व्हायरल करणे कुठल्या तत्त्वात बसते?*

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत एका व्यक्तीचं फोन संभाषण आणि यादरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या त्या तथाकथित वक्तव्यावरून दिवसभर चर्चा सुरू आहेत. मात्र अशा प्रकारच्या चर्चा आणि माननीय पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या ऑडिओ मध्ये खाजगीत व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या अपरोक्ष रेकॉर्डिंग करणे आणि त्या व्हायरल करणे, या दोन्ही प्रवृत्तीचा निषेध करण्याची गरज आहे.


पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. वास्तविक राजकारणी म्हणून ते खूप कमी ओळखले जातात. एक अभ्यासू  प्रशासक म्हणून त्यांना ओळखले जाते. सर्वसामान्यांशी त्यांचे नाळ वाढली आहेच शिवाय देशाच्या नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यातील विद्वान मंडळीशी पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट संबंध आहे.मध्यंतरी ते केंद्रीय पंतप्रधान कार्यालयीन राज्यमंत्री होते. त्याकाळात पृथ्वीराज बाबा कराडला आल्यानंतर आम्ही पत्रकार त्यांना भेटायला जात होतो. या बैठकी दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांना कोणते प्रश्न विचारायचे याबाबत आम्ही प्रमुख पत्रकारांची रंगीत तालीम व्हायची.आम्ही कोणता राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय प्रश्न विचारायचा याची तयारी करत होतो. तरीही स्थानिक प्रश्नावर इंटरेस्ट असलेले आमच्यापैकी काही पत्रकार पृथ्वीराज चव्हाण यांना विलासराव पाटील उंडाळकर, कराड दक्षिण, कराड शहराचे राजकारण यावर प्रश्न विचारायचे. लोकल विषयावर विचारलेल्या प्रश्नाला बगल देऊन पृथ्वीराजबाबा पुढे जायचे. एक दिवस पृथ्वीराज बाबांना खासगी मध्ये याबाबत मी विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी मला सल्ला दिला होता. पत्रकारांनी कोणाला कोणते प्रश्न विचारायचे याचे तारतम्य बाळगले पाहिजेच शिवाय अगोदर तयारी करून यायला हवे. जगातील सर्व देशांमध्ये असणाऱ्या समस्या आणि तसेच पंतप्रधानांची नावे, परराष्ट्र धोरण याबाबत मला तुम्ही विचारू शकता,कारण मी त्या खात्याचा मंत्री आहे,अभ्यास करत आहे किंवा त्यासंदर्भातील खाते माझ्याकडे आहे, असे पृथ्वीराज चव्हाण मला बोलले होते. हा विषय सांगण्याचं किंवा आठवण्याचं कारण असे आहे की पृथ्वीराज चव्हाण हे कधीही खालच्या लेव्हलवर किंवा स्थानिक विषयावर बोलत नाहीत. हत्ती चले अपनी चाल या उक्तीप्रमाणे ते नेहमी मार्गग्रमण करतक असतात.

पृथ्वीराज चव्हाण यांना एका कार्यकर्त्यांनी  फोन करून त्यांना स्थानिक विषयावर किंवा राज्यातील एका विषयावर प्रश्न विचारून बोलतं करणे आणि तो कॉल रेकॉर्ड करणे हे कोणत्याही तत्वात बसत नाही. पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे नेते आहेत. त्या संबंधित व्यक्ती सोबत बोलताना त्या व्यक्तीवर पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वास होता किंवा संबंधित व्यक्ती त्या उंचीची विश्वासू व्यक्ती असेल म्हणून ते काही गोष्टी बोलून गेले असतील. खरंतर या गोष्टी खासगीमध्ये बोलायच्या असतात, खाजगी मध्येच बोलल्या जातात. समोरून बोलणारी व्यक्ती तितकी विश्वासार्ह असल्यामुळे पृथ्वीराजबाबा खाजगीमध्ये काही गोष्टी बोलून गेले असतील. राज्यातील सर्व पक्षाचे छोटे मोठे नेते अनेकदा खाजगीमध्ये बोलत असतात.एकनाथ खडसे तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांना खाजगीमध्ये सल्ले देत असतात. मात्र त्यांचा सल्ला किंवा त्यांचा संवाद कोणी रेकॉर्डिंग करून व्हायरल करत नाही. पृथ्वीराज चव्हाण हेही फोनवर बोलताना अनौपचारिकपणे काही गोष्टी बोलले असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा औपचारिकपणे खूप काही बोलून जातात.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा अनौपचारिकपणे गप्पा मारताना अनेक गोष्टी बोलत असतात. मात्र समोर असणारा विश्वासू आहे,याची खात्री करूनच ते बोलत असतात. समोरची व्यक्ती विश्र्वासातील आहे म्हणून कोणीही नेता सहजपणे आपल्या मनातले बोलत असतो. पृथ्वीराज चव्हाण सुद्धा त्या पद्धतीने बोलले गेले असतील. मात्र ह्या बोलण्यावरून त्यांचा महाविकास आघाडीवरील नाराजी सिद्ध होत नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळेच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. काँग्रेसचे दिल्लीमधील नेतृत्व आणि त्या नेतृत्वाला सल्ला देणारे ज्येष्ठ सल्लागार कोणीही महाराष्ट्रात शिवसेनेसोबत काँग्रेसने जावे या विचाराचे नव्हते. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार आले आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यापाठीमागे पृथ्वीराज चव्हाण यांचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे चव्हाण हे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलतील हे पटत नाही. खाजगीमध्ये किंवा अनौपचारिकपणे ते उद्धव ठाकरे यांना सल्ला देऊ शकतात आणि देतात. मात्र काही न पटणार्‍या गोष्टी खाजगीमध्ये बोलाव्या लागतात,बोलल्या जातात. ह्या गोष्टी व्हायरल करणे हे कुठल्याही तत्वात बसत नाही.

 उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. एक माजी मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण उद्धव ठाकरे यांना सर्व प्रकारचा सल्ला देत असतात. शरद पवार यांना उद्धव ठाकरे जितका मान देतात तेवढाच मान ते पृथ्वीराज चव्हाण यांनाही देतात. ज्येष्ठत्वाच्या नात्याने आणि माजी मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेले सल्ले त्यांनी आचरणात आणले आहेत. मात्र कोरोणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्य शासनाचा आर्थिक कणा मोडला आहे आणि तो व्यवस्थित करण्यासाठी निधीमध्ये कपात करण्यात आली आहे हे जगजाहीर आहे.आपल्या गावासाठी,भागासाठी निधी मागणाऱ्या त्या व्यक्तीने कोणाच्या तरी सांगण्यावरून हा फोन रेकॉर्ड केला असावा आणि त्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या मधील संबंध ताणावेत आणि याचा फायदा कोणत्यातरी पक्षाला व्हावा असा,असा त्यांचा उद्देश असावा. मात्र अशा प्रकारामुळे पृथ्वीराज चव्हाण खचणारे नाहीतच. मात्र यापुढील काळात फोनवरून कुणाशी आणि काय बोलायचे? औपचारिक बोलायचे की अनौपचारिक बोलायचे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे कराड तालुक्यातील अनेक पत्रकारांची जवळचे संबंध आहेत,माझेही आहेत. मात्र बाळासाहेब पाटील यांना कोणत्याही विषयावर फोनवरून प्रतिक्रिया विचारली तर ते प्रतिक्रिया देण्याचे टाळतात.समोर येऊन बोला तुम्हाला जे हवं आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो, तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणावर घेऊन जातो,असे बाळासाहेब पाटील नेहमी सांगतात. आजपर्यंत बाळासाहेब पाटील यांनी फोनवरून कोणाही पत्रकाराला प्रतिक्रिया दिलेली नाही.कारण फोनवरून दिलेल्या प्रतिक्रिया तोडमोड केली जाते असे त्यांचे म्हणणे आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचा रेकॉर्ड झालेला हा फोन आणि त्यामुळे निर्माण झालेला वाद,चर्चा याचा विचार केला तर बाळासाहेब पाटील हे फोनवरून प्रतिक्रिया देत नाहीत, कोणाशीही फोनवरून खाजगीमध्ये आणि अनौपचारिक सुद्धा बोलत नाहीत, हे किती योग्य आहे हे जाणवते.




माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनौपचारिक पणे बोललेल्या काही गोष्टी व्हायरल करुन त्यांची राजकिय बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामागे त्यांच्या पक्षातील किंवा विरोधी गटातील लोकांचा हात असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  पृथ्वीराज चव्हाण यांचे संबंध बिघडवून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळेच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. 

*सतीश वसंतराव मोरे*
9881191302

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...