फॉलोअर

१९ जुलै २०१६

सत्कार घरच्या लोकांकडून

भक्तीमार्गातून समाज घडतो : अॅड. उदयसिंह पाटील
वारकरी सांप्रदाय आपल्या संस्कृतीचे वैभव: सौरभ पाटील

समाजाच्या जडणघडणीत वारकरी सांप्रदायाचे योगदान खूप मोठे आहे. भक्तीमार्गातून समाज घडतो हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील यांनी केले.

दै. पुढारी कराड कार्यालयाचे प्रमुख सतीश मोरे यांनी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करून वारीचे उत्कृष्ठ लेखण केल्याबद्दल कराड कार्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अॅड. पाटील बोलत होते.

कार्यक्रमास आदरणीय पी. डी. पाटील सह्याद्री बॅकेचे युवा नेते सौरभ पाटील, कराड बाजार समितीचे संचालक अशोकराव पाटील पोतलेकर, प्रा. संभाजी शेवाळे, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक जयवंतराव थोरात, राजू जाधव, अजिंक्य पतसंस्थेचे संचालक अशोक माने, खरात माऊली, लोहार माऊली, संदीप पाटील, जॉन्टी थोरात   यांच्यासह  कराड कार्यालयातील अमोल चव्हाण, प्रतिभा राजे, चंद्रजित पाटील, महेश पाटील, अर्जुन काटवटे, ,गणेश पाटील, विशाल देशमुख, धनाजी चव्हाण आदी उपस्थित होते.

अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस  या प्रमाणे वारकरी सांप्रदायात अनेक संतांनी विचारांचे कळस रचण्याचे काम केले आहे. वारीत अमुलाग्र बदल झाले आहेत. वारीत सहभागी वारकऱ्यांची संख्याही प्रतिवर्षी वाढत आहे. यामधील युवकांचा सहभाग आत्मिक समाधान देणारा आहे. सतीश मोरे यांनी वारीचे केलेले वृतांकन समाजासाठी अत्यंत महत्वाचे असून वारीचे अनुभव पुस्तकरूपात यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सौरभ पाटील म्हणाले, वारकरी सांप्रदाय हे आपल्या संस्कृतीचे वैभव आहे. संत तुकाराम, संत चोखा मेळा, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्र , संत नामदेव यांचे समाजासाठीचे योगदान खूप मोठे आहे. या संतांनी उच्च शिक्षण घेतले नाही पण त्यांच्या विचारापुढे नतमस्तक व्हावे असे त्यांचे विचार महान आहेत. सर्व जाती- धर्माला सामावून घेणारा वारकरी सांप्रदाय आहे. कर्मकांडाला संतांनी नेहमीच विरोध केला म्हणून त्यांचे छळही झाले पण आज त्यांच्याच विचारांची गावोगावी पारायणे होत आहेत. सतीश मोरे यांनी वारी लिखानातून समाज प्रबोधनाचे काम केले आहे. हे लिखान समाजातील तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी ते पुस्तकरूपात प्रकाशीत व्हावे.

अशोकराव पाटील- पोतलेकर म्हणाले, सतीश मोरे यांचे अनेक पैलू मी पाहिले आहेत. आज ते ज्या पदावर आहेत त्यामागे त्यांनी केलेले प्रामाणिक काम आणि घेतलेले कष्ट महत्वाचे आहेत. भविष्यातही त्यांच्या हातून समाजाप्रति याच पध्दतीने काम व्हावे, अशी अपेक्षा आहे.

प्रा. संभाजी शेवाळे म्हणाले, वारीत वारकऱ्यांबरोबर उन्हा, पावसात चालत राहून वारीचे वृतांकन करणे खूप कठीण काम आहे, पण सतीश मोरे यांनी ते लिलया पेलले आहे. त्यांच्या "माझी वारी' या वारी वृतांकनामुळे प्रत्यक्ष वारी अनुभवता आली.

यावेळी सतीश मोरे यांनी वारीतील अनुभव विस्ताराने सांगितले. वारीत पावला पावलावर वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांमध्ये मला विठ्ठलाचे दर्शन झाले. वारी ही माणसाला सकारात्मक उर्जा देते याची प्रचिती वारीत भर पावसात चालताना आल्याचे त्यांनी सांगितले.

वैभव पाटील, बालीश थोरात, दिलीप धर्मे, अर्जुन काटवटे यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक मोहने यांनी सूत्रसंचालन केले.

विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले. संजू पाटील यांनी आभार मानले.

१६ जुलै २०१६

🚩🚩🚩माझी वारी🚩🚩🚩

दिनांक 16 जुलै 
कराड  सतीश मोरे 

कृतज्ञता हेच पुण्य,  माऊलोंनो आभार !

28 जुन रोजी वारी साठी कराडहून आळंदीला निघालो,  काल 15 जुलै आषाढी एकादशी झाली,  पाडुरंगाचे दर्शन झाले. आज सकाळी  एकादशीचा उपवास मारूती बुवा कराडकर मठात सोडला आणि साडे दहा वाजता ट्रकमध्ये बसून कराडच्या दिशेने निघालो. चार वाजता कराडात पोहचलो. पियुष न्यायला आला होता विठ्ठल चौकात. 

 गेल्या 19 दिवसात खुप सुंदर अनुभव आले, खुप पहायला मिळाले,  ऐकायला  मिळाले.  ज्ञानात भर पडली. आई वडलांची पुण्याई आणि तुम्हा सर्वांचे बळ यामुळे विनासायास वारी पूर्ण झाली. माझी वारी पूर्ण होण्यासाठी अनेकांनी सहकार्य केले त्याचे कृतज्ञता पुर्व आभार मानायलाच हवेत!  

कराड ते आळंदी ते पंढरपूर ते कराड अशा प्रवासात ज्यांनी 
मला मोलाची साथ दिली त्या माझ्या सहकारी वारकरी माऊलीचे आभार ! 

ज्यांनी माझ्यासाठी वाट पाहीली, 
रस्ता दाखवला, तंबूत बसताना जागा धरली,
जीपमध्ये,  ट्रक मध्ये बसायला जागा दिली, जागा धरली,
मला सारे काही दिले, अशा सहकारी  माऊलींचे आभार! 

माझे साहित्य, वळकटी, सॅक वाहून नेणारे ट्रक जीप चालक यांचे आभार! 
हे साहित्य वाहनात टाकणारे,  बॅगा वाहणारे सेवेकरी यांचे पण आभार! 

आमच्या साठी प्रत्येक तळावर तंबू ठोकणारे, काढणारे  सेवेकरी ,
प्रत्येक ठिकाणी आंघोळीचे पाणी उपलब्ध करून देणारे शेतकरी, 
टॅकर चालक,शासकीय व खासगी यंत्रणा मधील लोक व संस्थाचे आभार! 

आमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी झटणारे डाॅक्टर्स,
त्यांचे सहकारी, सेवाभावी संस्था, लायन्स , रोटरी क्लब,  
धर्मादाय ससंस्था आपले पण  आभार! 

रस्त्यावर भुक लागली की 
चहा, नाश्ता, जेवण मोफत देणारे दानशूर, 
सकाळी आणि संध्याकाळी 
स्वादिष्ट जेवण बनवणारे  स्वयंपाकी, आचारी, सहायक ,
दानशूर अन्नदाते, भांडी कुडी देणारे, 
घासणारे महिला सेवेकरी यांचे पण आभार! 

पंढरीची वारी संयोजक, 
चालक मालक, चोपदार, देवस्थान ट्रस्टी,
वारी यशस्वी करण्यासाठी झटलेले गावागातील हजारो हात,
वारीत सर्व सेवा पुरवणारे महसुल, पीडब्ल्लुडी,
जिल्हा परिषद, पोलीस यंत्रणेचे पण आभार! 

मोबाईल चार्ज करण्यासाठी जागा देणारे, 
अंधारात वाट दाखवणारे मशाल (टाॅर्च)धारी, 
शौचालय युनिट उपलब्ध करून देणारे 
भाजपायुमो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,  
सेवाभावी संस्था यांचे खुप आभार! 

माझ्या वारी दरम्यान चांगल्या प्रकारे 
कार्यालय सांभाळणारे माझे सहकारी, 
मी वारीला जाण्यासाठी प्रेरणा व परवानगी देणारी
माझ्या अनुपस्थित घर सांभाळणारी सौ गृहमंत्री तुझेही आभार! 

ज्ञानेश्रर महाराज म्हणतात 
श्रोता असेल तर वक्त्याला महत्त्व 
तसेच वाचणारा असेल तर लिहणाराला महत्त्व !
रोज संध्याकाळी माझी वारी वाचणारे,मला प्रोत्साहन देणारे,  
कौतुक करणारे आपण सारे वाचक आपले खुप खुप धन्यवाद. 
अनेक ग्रुपमध्ये वारी पाठवून देणारे तुम्ही सारे माऊली,
आपल्या सर्वाचे खुप खुप आभार !

सर्व वारी तुमच्या पर्यंत पोचवण्यासाठी साथ देणारा टॅब आणि इंटरनेटचे पण आभार !

माऊली माऊली 


     - सतीश मोरे 9881191302

 
🚩 माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩

१५ जुलै २०१६




पंढरीच्या वारीत विठ्ठल मज भेटला ..!
 पंढरपूर : सतीश मोरे
सर्वाघटी राम ,देहा देही एक,
सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी ।।

म्हणजे सर्व देहात मला ईश्वर दिसतो आहे. याची प्रचिती पंढरीऱ्या वारीत येत आहे. पंढरीची वारी म्हणजे आळंदी ते पंढरपूर चालत जाणे,वारी म्हणजे ध्यान , वारी म्हणजे  नामजपयज्ञ, वारी म्हणजे लोकसंग्रह,  वारी म्हणजे संत संगती,  वारी म्हणजे माऊलीची साथ सोबत, वारी म्हणजे दिंड्या,  वारी म्हणजे पालखी सोहळा,  वारी म्हणजे टाळ मृदंगाचा नाद, वारी म्हणजे विठ्ठल भेटीचा ध्यास,  वारी म्हणजे वारकऱ्यांची साथ, वारी म्हणजे भगवान भेटीचा योग, मार्ग  आणि ध्यास. गेली 18 दिवस वारीतून चालता चालता वारीचा थोडा अर्थ कळायला लागला,  वारीत मला माऊली भेटले,  देव भेटला, वारीत मला विठ्ठल दिसला.
कराड मधून जेव्हा वारकरी लोकांना नेणारा ट्रक शाहू चौकात पोहचला तेव्हा मागे बसलेल्या  एका माऊलीची एक चप्पल खाली पडली. रस्त्यावरून अनेक जण ये- जा करत होते.  अनेकांनी ते पाहीले, दुर्लक्ष केले. एक मुस्लिम युवकाने दुचाकी मागे वळवून ती चप्पल  उचलली,  ट्रकच्या मागे गाडी लावली, नाक्यावर आणून ती चप्पल परत दिली,  होय त्या युवकात मला विठ्ठल दिसला. आळंदी मध्ये वाहतुकीचा खोळंबा झाला होता.  अनेक जण खुप लांब उतरून गावात येत होते, मठाचा पत्ता विचारत होते. एक पोलिस सर्व जणांना पत्ता सांगत होते.  काहीना इच्छित स्थळी पोहचवत होते, तिथे मला विठ्ठल दिसला. माऊली सोहळा पुण्यात पोहचला. भरलेले रस्ते,  उंच  इमारती पाहून काही  वारकरी थोडे भांबवले, त्याना रस्ता पार करायला मदत करणारे  लोक मला दिसले. काहीनी त्यांना पीएमटीचा मार्ग दाखवला, बस मध्ये बसल्यावर डोक्यात टोपी, कपाळावर गंध पाहून कोणी जागा दिली, त्यामध्ये मला देव दिसला.


दिवे घाटाचा अवघड रस्ता पार करून वारकरी थकले होते,  चालवत नव्हते, पायाला गोळे आले होते. या माऊलीचे पाय तेल लावून चोळणारे,  चेपणारे योग विद्या मंडळाचे शेकडो लोक दिसले. रस्त्याकडेला वारकऱ्यांचे डोके मॉलिश करणारे वृद्ध मला दिसले,  त्याच्यामध्ये मला विठ्ठल दिसला. सासवड मध्ये बोअर मधील पाणी पाईपने टाकून माऊलींना आंघोळ घालणारे शेतकरी दिसले, त्यामध्ये मला विठ्ठल भेटला. जेजुरीला वारकरी पोहचले तेव्हा पावसात चिंब भिजले होते, चिखल झाल्याने त्यांना रहायला जागा नव्हती, अशा वारकऱ्यांना घराचे दरवाजे उघडले, मंगल कार्यालय खुले केले, त्या माऊलीमध्ये मला विठ्ठल दिसला. वाल्हेकर तर माऊली सेवेसाठी तत्पर होते. लांब असलेल्या विहिरीतील पाणी घराजवळच्या विहिरीत टाकून हे पाणी वारकऱ्यांना उपलब्ध करून देणारा विठ्ठल वारीत दिसला. निरा कॅनालमध्ये वारकरी स्नानासाठी जात होते,  पहाटेच्या वेळी चुकून एखादा पाण्यात पडू नये म्हणुन तिथे सतर्क असणारा पोलिस दुसरा कोणी नव्हे विठ्ठलच होता.  निरा असो वा लोणंद, वारकऱ्यांना स्वतःचे घर आराम करायला उपलब्ध करून देणारा विठ्ठलच होता. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन वारकऱ्यांना खाऊ घालणारी पिंपरद, तरडगावची माऊली विठ्ठलरूप होती.  फलटण मध्ये वारकरी लोकांच्या चपला मोफत दुरूस्त करणारे,  मोफत केशकर्तन सेवा देणारे, पत्रकार माऊली विठ्ठलाचेच रूप होते. बरड मध्ये रस्त्यावर पडलेल्या केळाच्या साली उचलून बाहेर टाकणारा तो युवक विठ्ठलच होता. माऊली भक्तासाठी घर आणि पिर खुले ठेवणारे मुल्ला मौलवी विठ्ठलच होते ना!

पंढरपूर : पंढरीच्या वारीत विठ्ठल पदोपदी दर्शन देत असतो.


नातेपुते गावात येताना भुकेलेल्या माऊलींना पुरी भाजी देणारे, भुक लागेल तेव्हा तेव्हा  माऊलींना शिरा,  उपीट, पोहे,  पिठलं भाकरी, भात खाऊ घालणारा विठ्ठल अनेक ठिकाणी भेटला. माळशिरस, वेळापूरमध्ये उघड्यावर शौचाला जाऊ नका म्हणून आवाहन करणारे, शौचालय युनिट उपलब्ध करून स्वच्छतेचा संदेश देणारा विठ्ठलच होता.
भंडीशेगाव  असो वा वाखरी, वारी मार्गावर जेव्हा जेव्हा कोणी आजारी पडला, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, सेवा करणाऱ्या नर्स,  सेवाभावी लोक हे सगळे दुसरे कोणी नाही तर विठ्ठलाचे रूप धारण करून आलेले लोक होते. वारकऱ्यांना खाऊ घालणारे, स्वयंपाक करणारे,  अंधारात मार्ग दाखवणारे,  तंबू उभे करून निवारा देणारे, स्वयंपाकाची भांडी स्वच्छ  करणाऱ्या महिला, मोफत मोबाईल चार्ज करून देणारे, नियोजनासाठी झटलेले, शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सेवक या सर्व माऊली मध्ये मला विठ्ठल दर्शन झाले.  पंढरीच्या वारीत प्रत्येक जण माऊली असतो, त्या माऊलीच्या रूपाने विठ्ठल पूर्ण वारीत सहभागी  असतो, हे मी ऐकले होते. गेल्या आठरा दिवसात तो विठ्ठल प्रत्यक्ष मी पाहीला.

१४ जुलै २०१६


महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा 
माऊलीभक्तांचा पालखी सोहळा


वाखरी : सतीश मोरे
पंढरीचा पाडुरंग अवघ्या विश्वात  आहे. जो नसानसा मध्ये ठासून भरलेला तो विठ्ठल. विठ्ठल नामाचा महिमा फार मोठा आहे आणि विठ्ठल भक्त जगभर  आहेत.  शेकडो वषार्र्ं पासून पंढरीचा वारकरी, वारी चूको ने दी हरी, हे लक्षात घेऊन वारीला जात आहे. वारीत सारे जण सहभागी झाले आहेत.  गरिब- श्रीमंत, काळा -गोरा, सवर्ण- कनिष्ठ,  लहान- मोठ्ठा  असा कोणताही भेदभाव  इथे नाही.  प्रांत, देश, विदेश, जात पात या सर्व  सीमा  इथं नसतात, असतो फक्त माऊली. अवघ्या महाराष्ट्रातून आलेले, कर्नाटक,  तेलंगणा आणि महाराष्ट्र  येथून आलेल्या वारकरी माऊलींची दिंडी सामाजिक ऐक्याचे प्रतिक आहे.
महाराष्ट्राबाहेर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात सुद्धा विठ्ठलाची जादू आहे.  या प्रांतातून अनेक वारकरी माऊली सोहळ्यात सहभागी झाले आहेत. धोंडोपंत दादा पंढरपूर यांच्या दिंडीला अनेक वर्षाची परंपरा आहे. माऊली रथाचे मागे 20 नंबरवर असणाऱ्या या दिंडीत सुमारे 3000  वारकरी  आहेत.  यामध्ये महाराष्ट्र,  कर्नाटक व तेलंगणा राज्यातील वारकऱ्यांचा संगम पहायला मिळाला.
आंध्र प्रदेश राज्यातून वेगळे झालेल्या तेलंगणा राज्यातील महाराष्ट्र सीमारेषेवर असणारा निजामाबाद या जिल्ह्यात वारकरी संप्रदायाचे अनेक लोक आहेत. अनेक वर्षे पंढरीची वारी करणारे वारकरी  आहेत.  यंदा पाऊस आला नव्हता,  गेल्या वर्षी पण कोरडे पडले होते,  तरीही पंढरीच्या वारीला या भागातील अनेक वारकरी आले आहेत.  निंभोरे ओढा येथे अनेक जण भेटले. या दिंडीत पहिली पंगत बसताना शर्ट काढून बसावे लागते.  जेवणाची पंगत  उठल्यानंतर कन्नड स्टाईल मराठीत बोलू लागले. आमच्याकडे श्रीमंत देव आहे,  पैसा  आहे. पण विठ्ठलासारखा देव नाही.  या देवाचे दर्शन घेतले की वर्षभर उर्जा मिळते. वारी सारखा आनंद जगात कोठेही नाही.  आमच्याकडे भजन, कीर्तन नित्य नेमाने होतात. अनेक गावात विठ्ठल रूक्मिणी मंदीर आहे, असे त्यांनी सांगितले. कर्नाटक राज्यातून आलेल्या लोकांची संख्या पण फार  आहे. गंगाधर महाराज पाटील चंडेगावकर मदनूर यांच्या पुढाकाराने आलेले वारकरी याच दिंडीत पहायला मिळाले. या माऊलींचे पाठांतर खूप आहे. तुकोबा गाथा मधील अनेक अभंग पाठ  आहेत. अनेक गावांमध्ये भजनी मंडळे आहेत.  पंढरीची वारी  कधी चुकवत नाहीत. सुमारे  1000 किलोमीटर प्रवास होतो. सारे जण पंढरपूर  मध्ये धोंडोपंत दादाच्या मठात एकत्र येऊन आळंदीला जातात. वारीमध्ये  पालखी सोहळ्यात सहभागी होतात, असे त्यांनी सांगितले.

वाखरी: उडीच्या खेळात टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर विठुनामाच्या गजरात तल्लीन होऊन नाचणारे वारकरी.



रिंगण  आणि  उडीचे खेळ
वारकरी  अखंड चालत असतात. दमतात,  थकतात पण थांबत नाहीत. त्यांना आनंद,  विरंगुळा देणारा क्षण म्हणजे उभे आणि  आडवे रिंगण. शाळेत जसा पीटीचा तास तसेच हे वारकरी खेळ.  या खेळात सात्विकता आणि  आनंद असतो. माऊली ज्यावर सवार  असतात  असा माऊली अश्व, दुसरा शितोळे सरकार यांचा मानाचा अश्व. माऊलीचा अश्व मोकळा  असतो, तो पुढे पळत राहतो. त्यामागे स्वार  असलेला अश्व धावतो.  माऊली अश्व रिंगणात  एक दोन वेढे काढतो,  आणि थांबतो. मग स्वार  अश्व त्यापुढे जातो आणि रिंगण पुर्ण होते. माऊली माऊलीचा घोष होताना दोन्ही  अश्व माऊली पालखी जवळ जातात आणि रिंगण संपते. त्यानंतर चोपदार सर्व दिंड्यांना उडीचे खेळासाठी निमंत्रण देतात. माऊली पालखी आणि घड्याळाचा काट्याप्रमाणे ओळी करून टाळकरी उभे राहतात. बाहेर गोलाकार सर्व  मृदंगधारक, विणेकरी आणि झेंडेकरी असतात. टाळ मृदंगाची जुगलबंदी सुरू होते. चोपदार बंधू चार ठिकाणी उभे राहून सूचना देतात, त्यावर टाळकरी ठेका धरतात. झोपून, गुडघे टेकून,  मागे, पुढे तोंड करून टाळकरी  बेफाम  होऊन नाचतात.अर्धा तास खेळ रंगतो. तुका म्हणे वृद्ध होती तरूण, अशी परिस्थिती  असते.  शेवटी चोपदार चोप वर करून उडी मारतात, उडीचे खेळ संपतात. सारेजण लोटांगण घालून नमस्कार करतात. यामागे  संताची धुळ शरिराला लागावी हा उद्देश  असतो.


🚩🚩🚩माझी वारी🚩🚩🚩

दिनांक 14 जुलै 
पंढरपूर  सतीश मोरे 

वाखरीत काल सायंकाळी पोहचले पासून खूप प्रयत्न केला पण नेट काय सुरू झाले नाही.  कसे होणार संत तुकाराम,  संत ज्ञानेश्वर महाराज,  सोपानकाका या मुख्य पालखी सोहळ्यात सहभागी सुमारे चार लाख वारकरी वाखरी येथे विसावले होते. वाखरी तळ फार मोठ्ठा आहे,  सर्व सुविधा उपलब्ध करून दिली होती,  पालिकेने.  खुप वेळ वाट पाहीली मात्र नेट सुरू झाले नाही,  तुम्ही सारे वाट बघत होता,  माझी वारी वाचण्याची.  पण नेट पुढे काय करायचे?साडे दहा वाजता पडलो,  झोप लागत नव्हती,  शेजारी  एका दिंडीत जागर सुरू होता. आकरा वाजणेच्या सुमारास झोप लागली. दरम्यान  एक वाजता जाग आली, नेट पाहीले,  3 G रेंज होती,  पटकन सर्व ग्रुपला,  तुम्हाला माझी वारी पाठवून दिली,  पुन्हा पडलो.  पहाटे अडीच  वाजता सहकार्यानी उठवले. चला तयार व्हा.   लगेच उठलो खरात माऊलीनी आंघोळीला नेले.  मुख्य रस्त्याला  अनेक नळ उभारले होते,  तिथे पोहोचलो. पाणी कमी होते,  गर्दी जास्त होती.  गडबडीत घुसलो आत,  उरकली आंघोळ. परत  आलो तयार होऊन निघालो दर्शनासाठी. 

तळावर खुप गर्दी होती.  पहिल्यांदा संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.  कमी होती गर्दी.  खुप जवळुन आणि निवांत  घेता आले दर्शन.  पुढे आलो सोपानकाका यांच्या पादुकांचे दर्शन घेतले.  माऊली दर्शन  अनेकदा झाले होते,  पण  आज  आणखी  एकदा मन भरून दर्शन घेतले,  डोके टेकवून.  मन प्रसन्न झाले.  येताना बंडा तात्या भेटले.  चहा घेऊन साडे तीन वाजता पुन्हा तंबूत येऊन पडलो.  सकाळी साडे सहा वाजता  उठवले. ब्रश करून 
घेतला.  गरमागरम दुध वाटप सुरू होत, आमच्या साठी.  वाखरी मध्ये संताचा मेळा जमला होता.  पुन्हा एकदा फिरून आलो.  सारे डोळ्यात घातले. आता  उद्या पासून तंबूत रहायला मिळणार नाही, उठून लवकर चालावे लागणार नाही,  एकादशी झाली की वारी पुर्ण, सारे जण बोलत होते . दरम्यान तंबू उतरणे सुरू झाले, साहित्य ट्रक मध्ये टाकले. किचन मधे वडे तळायचे सुरू होते, तिथे गेलो.  पाणी देणारे थोरात टीमचे फोटो काढले. दहा वाजता पंगती पडल्या.  कालेकरांची पंगत होती.  पुरी, श्रीखंड, कुर्मा, भात,  वरण भात,  बुंदी आणि केळी. सर्दी खोकला मुळे पुर्ण वारीत फळे व श्रीखंड खाल्ले नाही.  जेवण झाल्यावर निघण्याची तयारी सुरू झाली तेवढ्यात रामभाऊ  आणि राजाभाऊ चोपदार यांचे आगमन झाले.  सारे जण जमले,  वारी कशी झाली,  काय कमी जास्त ,सारी चौकशी केली त्या दोघांनी. अनेकांना चोपदार बंधू सोबत फोटो काढायचा होता.  फोटो काढायचा मोबाईल माझ्या कडे  असल्याने पुर्ण वारीत सारे जण माझ्या मागे असायचे, खुप वेगळा भाव होता त्या माऊलींच्या मनात.  मी स्वतःला नशीबवान समजतो, या भोळ्या भाबड्या लोकासोबत मी राहीलो, त्याचे फोटो काढायला मिळाले.  चोपदार बंधुच्या आगमनाने सारेच खुलले. आमच्या शेवटच्या तळ मुक्कामाच्या आठवणी चोपदार  बंधुच्या भेटीने सुखद झाल्या.






साडे आकरा वाजता निघालो पंढरीच्या दिशेने.  वारीचा अंतिम टप्पा. पाडुरंगाचे गावाला जाताना गेली सतरा दिवस  अनेक गावे गेली, आता देवाचे गाव.  सहा किलोमीटर अंतर फक्त. चालू लागलो.  सगळीकडे बघेल तिथे फक्त दिंड्या,  वारकरी,  भाविक,  पोलिस,  दुकाने  आणि वाहने.  गर्दी होती खुप. कडक उन्हात वारीचा शेवटचा टप्पा पार पडला.  एक वाजता पंढरीत पोहचलो.  एसटी स्टँड बाहेर  आणले होते.  दुतर्फा फक्त वारकरी होते.  येणारे जाणारे.  आमची वेळ योग्य म्हणा किंवा नशीब म्हणा. समोरून तीन महान संताच्या पालख्या आल्या.  या पालख्या माऊली भेटीला निघाल्या होत्या.  संत नामदेव पालखी पंजाब , संत निवृत्ती नाथ पालखी त्रिंबकेश्वर  आणि दिड महिन्यांत सुमारे एक हजार किलोमीटर अंतर पार करून जळगाव मुक्ताईनगर येथून आलेली संत मुक्ताई पालखी अशा एका पाठोपाठ एक  समोरून आल्या. जवळून दर्शन घेतले.  



पुढे आलो. कृषि पंढरी प्रदर्शनासाठी खुप गर्दी झाली होती, चार वाजता मुख्यमंत्री येणार होते उद्घाटन करायला.  रेल्वे लाईन ओलांडून शहरात  आलो.  सगळीकडे वारकरी दिसत होते.  दोन वाजता मारूती बुवा कराडकर मठात पोहचलो. घामाघूम झालो होतो.  ऑफिस शेजारच्या रूममध्ये माझी व्यवस्था होती.  मोबाईल चार्ज करण्यासाठी लावला. नेट सुरू होते, बायकोने लेकीचा फोटो पाठवला होता,  त्याच्या शाळेत आज पंढरीची वारी होती.  देवयानीने  डोक्यावर तुळस घेतलेला फोटो पाहून डोळे भरून आले. लेकीच्या  आठवणी जाग्या झाल्या.  डोळ्यातले पाणी थांबत नव्हते,  शेजारी महेश तवर होत,  म्हणून गेले,  लेकीचे प्रेम असेच असते! 

या आठवणीतच निवांत दोन तास झोपलो. 

साडे पाच वाजता फ्रेश होऊन पंढरपूर दर्शन करायला बाहेर पडलो एकटाच.  सारे रस्ते ओसंडून वाहत होते.  पाय ठेवायला पण जागा नव्हती.  एका मागोमाग एक दिंड्या शहरात प्रवेश करत होत्या.  माऊलींचा उत्साह पाहण्या सारखा होता.  तीन चार चौक पार करून उद्धव घाटातून चंद्रभागा तिरी आलो.  काय सुंदर चित्र होते ते. वाळवंटावरवैष्णवाचा मेळा भरला होता,  अनेक जण स्नानासाठी पात्रात उतरले होते. कुठे किर्तन सुरू होते,  तर कुठे नामसंकिर्तन. पालिकेने उच्च न्यायालयाचे आदेशानुसार पात्र दुषित,  अस्वच्छ  आणि  खराब होऊ नये म्हणून काळजी घेतली होती,  उघड्यावर बसू नये यासाठी पथके कार्यरत होती.  पुंडलिक मंदीर परिसरात मोठय़ा प्रमाणात भाविक होते.  

सारे पहात,  फोटो काढत महाघाटातून वर  आलो. तिथे आळंदीचे डाॅ विश्वनाथ कराड यांचे वतीने पवित्र चंद्रभागा नदीच्या नित्य  आरतीचा शुभारंभ कार्यक्रम सुरू होता. मोठे स्किन लावले होते.  महादजी शिंदे सरकाराचा फार जुना वाडा पाहून गतवैभव उभे राहिले.  पुढे आलो,  लांबून विठ्ठल मंदिर दिसू लागले.  नामदेव पायरी जवळून पुढे आलो.  दर्शन बारी भव्य मंडप  इमारत आकर्षक सजवली होती,  लाईन मोठी होती. डाव्या हाताने पुढे आलो,  महाद्वार बाजूला. रूक्मिनी मंदीराचा कळस दिसला,  आणखी पुढे आलो विठ्ठल मंदिर दिसले.  लांबून नमस्कार केला.  

मुख्य रस्त्यावर  आलो.  खेळणी, प्रसाद,  बुक्का,  कुंकु, देवाचे साहित्य यांची दुकाने फुलली होती. मठात  साडे सात वाजता पोहचलो. थोडा पडलो आणि टॅबवर काम सुरू केले. साडे आठ वाजता बाजरीची भाकरी, मटकीचे पातळ कालवण खाल्ले.  पुन्हा काम सुरू केले .


सकाळी लवकर उठून स्नान करण्यासाठी जायचे होते.  नेट बंद होते.  सुरू होण्याची वाट बघत बघत पडलो. 



     - सतीश मोरे 9881191302

     माऊली माऊली

🚩 माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩

१३ जुलै २०१६

समाज आरती फोटो

समाज आरती;  पालखी सोहळ्याचा मानबिंदू 

भंडीशेगाव : सतीश मोरे
माऊली पालखी सोहळा प्रस्थान झाल्यापासून  पालखी मुक्कामाला पोहचे पर्यंत सर्व कार्यक्रम शिस्तबद्ध  ,नियोजित,  नियमबद्ध आणि अचुक वेळी होतात.  सोहळ्यात सहभागी सुमारे अडीचशे दिंड्यामध्ये एकवाक्यता  असते. सोहळा मुक्कामाला पालखी तळावर पोहचल्यावर होणारी समाज आरती आणि तंबू उभारणी रचना हा सैनिक शिस्तीचा उत्तम नमुना आहे.  पालखी सोहळा सुरू करणारे हैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारकडे  सरदार असल्याने पालखी सोहळ्यावर सैनिक शिस्तीची छाप आहे.  समाज आरती हा लोकशाही दिंडी सोहळ्याचा मानबिंदू म्हणावा लागेल. 
संत तुकारामाच्या  घराण्यात वारीची परंपरा अनेक  वर्षापासून होती. तुकाराम महाराजांनी ती पुढे चालवली. त्याचे पश्चात त्यांचे  कनिष्ठ बंधू कानोबांनी वारी सुरू ठेवली. तुकाराम महाराजांचे  तृतीय चिरंजीव श्री नारायण बाबा यांनी 1685 मध्ये  या वारीला सोहळ्याचे स्वरूप दिले. देहूहून ते तुकोबारायाच्या पादुका पालखीत घालून श्री क्षेत्र आळंदीला नेत. . त्याठिकाणी पालखीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन ही पालखी पंढरपूरला जात होती. श्री नारायण बाबांच्या पश्चात 1830 पर्यंत हा सोहळा अखंडीत सुरू होता. संत तुकाराम महाराजांच्या वंशजामध्ये घरगुती वाद झाल्याने हा सोहळा खंडीत झाला. आज सुरू असलेला संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा 1832 मध्ये  माऊलींचे निश्चिम भक्त हैबत बाबा पवार आरफळकर यांनी सुरू केला. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांकडे सरदार म्हणून असलेल्या हैबत बाबानी आळंदी ते पंढरपूर वारी सोहळा खुलवला. 
हैबतबाबा सुरूवातीला माऊलींच्या पादुका गळ्यात बांधून पंढरीला जात.  सैन्य दलात काम केले  असल्याने पालखी सोहळ्यात त्यांनी तीच शिस्त आणली आहे. पालखी वेळेतच निघते,  पालखी मार्गावर कुठे आणि किती  थांबायचे, विसावा कुठे,  दुपारचे जेवण कुठे हे ठरलेले आहे.  या व्यतिरिक्त पालखी कुठेही थांबत नाही. वारकरी,  टाळकरी,  झेंडेकरी, विणेकरी यांचा क्रम, जागा ठरलेली आहे. या दरम्यान बाहेरचा कोणी  अनोळखी घुसू नये, दिंडी ओळीत चालावी, यासाठी प्रत्येक दिंडीत व्यवस्था  असते. पालखी सोहळ्याचे परंपरागत चोपदारांचे वंशज  बाळासाहेब, राजाभाऊ  आणि रामभाऊ रणदिवे (चोपदार) हे काम पाहतात.  सोहळा मालक आरफळकर,  सरदार शितोळे यांचे प्रतिनिधी, चोपदार आणि वास्कर बाबा तसेच  आळंदी देवस्थान कमिटी हे एकत्र बसून सर्व निर्णय घेतात  , एकटा कोणी निर्णय घेत नाही. सोहळ्यात लोकशाही अनेक वर्षे पासून सुरू आहे, यांचे हे प्रतिक आहे. 
समाजआरती दरम्यान चोपदारांनी चोप आणि
हात वर केल्यावर सारे शांत होतात.

सायंकाळी सहा ते सात दरम्यान  (वाहतुक परिस्थिती नुसार ) पालखी तळावर पोचते.  तळाच्या मध्यभागी माऊली पालखी ठेवण्यासाठी अलिशान तंबू तयार असतो.  या पुढे पालखी आत यायला जागा सोडून दोन्ही बाजूला आयत आकारात वारकरी, भाविक बसतात.  एका मागोमाग एक नामघोष करत दिंड्या चहुबाजूला येऊन  उभ्या राहतात. यामध्ये फक्त मृदंगचालक, झेंडेकरी,  टाळकरी, विणेकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला ऐवढेच असतात.  मानाच्या सर्व दिंड्या तळावर पोहचल्यावर स्थानिक ग्रामस्थ पालखी नाचवतच तळावर आणून उंच ठिकाणी ठेवतात.  या दरम्यान माऊली, माऊली चा जयघोष आणि टाळ, मृदंगाच्या नादाने वातावरण फुललेले असते. 
अचानक हो. .....असा प्रमुख चोपदार बाळासाहेब यांचा आवाज येतो आणि  एका क्षणात सर्व काही शांत होते. सारे टाळ बंद होतात. मृदंग वाजवणे थांबतो.  कोणीही बोलत नाही.  फक्त ज्या दिंडी मालकाची अडचण  असेल, दिवसभर त्यांना त्रास झाला  असेल तर त्याच दिंड्या टाळ वाजवत राहतात.  चोपदार स्वत: किंवा त्याचे प्रतिनिधी त्याचेकडे जातात,  अडचणी,  तक्रार  ऐकून घेतात.  शक्य त्या समस्या जागेवरच सोडवल्या जातात, उर्वरितांसाठी नंतर तळावर बोलवले जाते. यानंतर प्रमुख चोपदार हरवलेल्या  आणि सापडलेल्या वस्तूची यादी वाचून दाखवतात. ओळख पटवून त्या वस्तू नेण्याचे आवाहन करतात,  सुचना देतात  आणि शेवटी 'उद्या पालखी सकाळी सहा वाजता निघणार आहे हो ', असे जाहीर करतात.  दुसऱ्या दिवशीचे अंतर पाहून वेळ सांगीतली जाते. ही वेळ पाहून वारकरी दुसऱ्या दिवसाचे नियोजन करतात. सैन्य दलाच्या जवानांना अशाच सुचना दिल्या जातात.  
यानंतर चोपदार दंड  (चोप) विशिष्ट पद्धतीने वर उचलतात आणि  लगेच ज्ञानेश्वर माऊली आणि जगतगुरू तुकोबाराय याची समाज आरती होते.  आरती वेळी बाळासाहेब चोपदाराचे शेजारी, मालक आरफळकर समोर राजाभाऊ आणि रामभाऊ चोपदार उभे असतात. त्याचे बाजूला हैबतबाबाचे विणेकरी,  शितोळे सरकार प्रतिनिधी  आणि समाज म्हणून  वास्करबाबा असतात. हे सर्व ठरले प्रमाणे शिस्तबद्ध होते.  
आरती संपलेनंतर सर्व दिंड्या आपल्या जागेवर जातात.  दरम्यान सोहळा मालकांचा तंबू  उभारण्यात येतो.  हा तंबू तयार झालेशिवाय  इतर तंबू  उभे केले जात नाहीत.हा तंबू कसे उभारावेत हे पण निश्चित आहे. या तंबू च्या आठ खुट्यावर प्रमुखांचे काही तंबू उभारले जातात. प्रचंड शिस्तीचा हा सोहळा असून समाज  आरती मानबिंदू आहे.



Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...