फॉलोअर

२९ जुलै २०१७

त्यासीं म्हणे जो आपुला

त्यासी लोक म्हणती आपुले...!




वटवृक्षाखाली एखादं रोपटं लावलं तर त्या वृक्षाच्या छायेमुळे ते रोपटं वाढत नाही कोमजतं किंवा खुंटतं हा निसर्ग नियम आहे. खरंतर त्या रोपट्याला वटवृक्षाच्या सावलीमुळे सूर्यप्रकाश मिळत नाही. आणि त्यामुळे प्रकाश संष्लेषणाची क्रिया होत नाही. त्यामुळे ते रोपटं वाढत नाही, हे झालं ते रोपटं न वाढण्याचं शास्त्रीय कारण ! पण त्या रोपट्याच्या मनात थोड्या वेगळ्या दिशेने जायची इच्छा झाली तर ते सूर्यप्रकाशाकडे वळतं, ते रोपटं वेगळा मार्ग काढतं, मोठं होतं. आमदार बाळासाहेब पाटील यांच्याबाबत असंच म्हणाव लागेल. 

पी.डी.पाटील नावाचा वटवृक्ष कराड नगरीचं वैभव आहे. या वटवृक्षाने विकासाचा डोंगर उभा करताना सहमतीचे राजकारण करून 42 वर्षे कराडचा कारभार केला. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचे वारसदार पी.डी.साहेबांनी कराड शहर आणि त्यानंतर कराड उत्तरमधील विकासकामासाठी आयुष्य झोकून दिले. पी.डी.साहेबांच्या घरात शिस्तीचा प्रचंड पगडा त्यांच्या कुटुंबियांवर होता. अनुशासन, समर्पण आणि अचूकता साहेबांच्या नसानसात भिनलेली होती. त्यांना समाजकारणासाठी खूप वेळ द्यायला लागत असल्यामुळे कुटुंबियांसाठी खूप कमी वेळ देता आला. तरीही सर्व मुलांच्यावर चांगले संस्कार करताना पी.डी.साहेबांनी स्वत:च्या उच्च पदाचा फायदा कधीच मुलांना घेऊ दिला नाही. बाळासाहेबांना आपले राजकीय वारसदार म्हणून निवडताना पी.डी.साहेबांनी सर्व मुलांचे अचूक निरीक्षण केले होते. 

1992 साली सह्याद्रि कारखान्याच्या संचालकपदी बाळासाहेब पाटील यांना घेतल्यानंतर साहेबांनी त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी दिली. संस्थापक चेअरमनचा मुलगा म्हणून मान, सन्मान न देता कारखान्यात काम करताना काहीतरी शिका असा सल्ला साहेबांनी दिला. 1997 साली बाळासाहेब पाटील चेअरमन झाले. तेव्हा त्यांची झालेली भेट मला आजही आठवते. सफारी ड्रेस आणि कोरलेली दाढी असा एक सामान्य पेहराव असलेले बाळासाहेब पाटील 1997 साली माझ्या लग्नाला आले होते. साधेपणा आणि समोर आलेल्या माणसाचे सर्व म्हणणे ऐकून घेणे ह्या गुणामुळे बाळासाहेब हळूहळू सर्वांच्या मध्ये प्रिय होऊ लागले. सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाल्यानंतर त्यांनी बारकावा कसा असावा आणि कसा करावा हे कृतीतून दाखवून दिले.

राज्यातील इतर सर्व साखर कारखान्याच्या परिसरात गेल्यानंतर साखर कारखाना जवळ आला आहे याची जाणीव 1 कि.मी. अंतर असतानाच येते. पण याला अपवाद सह्याद्रि राहिला. याचे कारण पर्यावरण पूरक आणि प्रदुषण विरहित तंत्रज्ञान सह्याद्रिवर बाळासाहेबांनी आणले. बाळासाहेबांचे कारखान्यावर स्वत:हूनही अधिक प्रेम आहे. रात्री-अपरात्री कितीही वाजता जाग आली तर ते कारखान्यात फोन करून माहिती घेतात. कारखान्यातील कोणतीही मशिनरी कोणत्या ठिकाणी आहे, त्या मशिनरीची पूर्ण माहिती बाळासाहेबांना आहे. कोणत्याही विभागातील मशिनरीची माहिती असल्यामुळे कशाप्रकारचा बिगाड झाला हे समोरच्याने सांगितल्यानंतर त्याच्यावरील उपाय बाळासाहेबांच्याकडे तयार असतो. 

कारखान्यात सर्व नवीन तंत्रज्ञान बाळासाहेबांच्या दूरदृष्टीतून आलेले आहे. संगणकीकरण स्विकारणारा सह्याद्रि हा राज्यातला पहिला कारखाना असेल. ऊस नोंदणी कार्यक्रम संगणकीकृत करून सह्याद्रिने राज्यात नवा आदर्श घालून दिला. ऊस किती वाजता कारखान्यावर आला, किती टनेज झाले याचा संदेश सभासदांना पाठवण्याची सोय सह्याद्रिने पहिल्यांदा सुरू केली. त्यामुळे किती ऊस गेला यासाठी कारखान्यावर हेलपाटे घालण्याचे कारण सभासदांना उरले नाही. ऊस दरातही सह्याद्रि नेहमीच अग्रक्रमावर राहिला तो बाळासाहेबांच्या सुक्ष्म नियोजनामुळे. संचालक मंडळ आणि त्यांचे नातेवाईक यांच्यावर चहापाणी, वाहने, सहली हा खर्च इतर कारखान्यामध्ये नेहमी चर्चेचा विषय असतो. सह्याद्रि याला अपवाद आहे. वायफळ खर्च टाळून कमीतकमी खर्चात कारखाना चालवण्याचा सह्याद्रि पॅटर्न राज्यभर प्रसिद्ध आहे. बाळासाहेब पाटील यांनी पी.डी.साहेबांच्या सोबत आणि त्यांच्या पश्‍चात सह्याद्रि कारखाना अतिशय काटकसरीने चालविल्यामुळे यावर्षी राज्यात सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून सह्याद्रिने नंबर पटकावला आहे. 

बाळासाहेब पाटील यांचे राजकारण आणि त्यांच्या विरोधकांचे राजकारण यात जमिन अस्मानचा फरक आहे. कराड तालुक्यातील इतर कारखानदारांची, लोकप्रतिनिधींची कार्यकर्ता सांभाळण्याची आणि कार्यकर्ता तयार करण्याची स्टाईल फार वेगळी आहे. एखाद्या गावात बाळासाहेबांची सह्याद्रिच्या सभासदांसाठी सभा किंवा बैठक असेल तर कारखान्याचे कर्मचारी, अधिकारी नियोजन करतात. सभेच्या वेळी हे सर्व लोक खाली सामान्य नागरिकामध्ये, सभासदामध्ये बसलेले असतात आणि गावातील ज्येष्ठ नागरिक, सभासद, कारखान्याचे संचालक किंवा इतर लोकप्रतिनिधी व्यासपीठावर असतात. तालुक्यातील इतर लोकप्रतिनिधींच्या बाबतीत बरोबर याच्या उलटे चित्र असते. यामुळेच गावागावात बाळासाहेब पाटील यांना मानणारा वर्ग तयार झाला आहे.

पी.डी.पाटील यांच्यानंतर सर्वांना विश्‍वासात घेणारा, होणार आहे तेच सांगणारा, खोटी आश्‍वासन देऊन समोरच्यांना झुलवत न ठेवणारा, स्पष्टोक्ता नेता म्हणून बाळासाहेब पाटील यांची ओळख आहे. गावागावात युवक वर्गामध्ये ते लोकप्रिय आहेतच शिवाय ज्येष्ठ नागरिकामध्ये त्यांना सन्मानाचे स्थान आहे. आबा, नाना, काका, दादा अशा टोपण नावाने ज्येष्ठांना बोलावून त्यांच्या घरात एकरूप होणारा नेता अशी खासियत बाळासाहेबांची ओळख आहे. 

पहिल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब चांगल्या मताने निवडून आले. यामागे पी.डी.साहेबांची पुण्याई होती. मात्र दुसर्‍या निवडणुकीत जोरदार लढत होऊनही केवळ संयमामुळे बाळासाहेब त्यातून बाहेर पडले. वैयक्तीक, खालच्या स्तरावर जाऊन दुसर्‍या निवडणुकीवेळी प्रचार झाला. मात्र नियोजित प्रचार आणि शेवटच्या क्षणी पी.डी.साहेबांनी घेतलेली एंट्री यामुळे ते दुसर्‍यांदा विजयी झाले. निवडणूक निकालानंतर कराड विमानतळावर आर.आर.पाटील यांच्या समवेत ते मुंबईला निघाले होते. त्यावेळी आर.आर.पाटलांनी त्यांना दिलेला सल्ला आम्ही ऐकला होता. ‘पहिली निवडणूक सोपी असते. दुसरी निवडणूक फार अवघड असते यातून बाहेर पडला की पुढच्या निवडणुका सोप्या होत जातात’. आर.आर.पाटलांचा हा राजकीय अभ्यास किती खरा होता याचा प्रत्यय बाळासाहेब पाटील यांना तिसर्‍या निवडणुकीवेळी आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट डावलूनही समोरच्या उमेदवाराला 41 हजाराच्या मताधिक्याने पराभूत करून ते विधानसभेत गेले. या निवडणुकीवेळी पुन्हा एकदा बाळासाहेबांचा संयमी प्रचार कामी आला. तिकीट डावलल्यानंतर अर्ज भरण्यावेळी शिवाजी स्टेडियम समोर झालेल्या सभेत काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही हे ते ठरवूनच गेले होते. याबाबत निवडक कार्यकर्त्यांबरोबरच काही पत्रकारांशी त्यांची चर्चा झाली होती. चौथ्या निवडणुकीत बाळासाहेबांनी समोर दोन उमेदवार असतानाही त्यांनी केवळ संयमी राजकारणाच्या जोरावर त्यांना पराभूत केले.

संयमी राजकारणाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून जिल्ह्यातील सर्व आमदार बाळासाहेबांना मान देतात. कितीही अडचणी आल्यातरी संयम न ढळू देता आणि तत्वांशी बांधिल राहून कराड उत्तर मतदारसंघात निर्माण केलेले कार्यकर्त्यांचे जाळे, सह्याद्रि साखर कारखान्याच्या माध्यमातून तयार झालेला कुटुंबप्रेमी सह्याद्रि सभासद वर्ग आणि रोजगाराचे जाळे यामुळे बाळासाहेब पाटील सतत विजय मिळवत गेले आहेत.

बाळासाहेब पाटील यांच्या विषयी खूप लिहिता येईल. त्यांच्या वक्तशीरपणा आणि सभ्यता याचा खूप जवळून अनुभव अनेकांनी घेतला आहे.
अनंत चतुर्थी दिवशी कराडच्या प्रसिद्ध गजानन हॉटेलमध्ये बाळासाहेबांसमवेत आलेला अनुभव शेअर करायलाच हवा. कराडचा फेरफटका मारून विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे का पहायला मी बाहेर पडलो. मित्रासमवेत दत्त चौकात आलो. चहा पिऊन उठणार तेवढ्यात आमदार बाळासाहेब पाटील हॉटेलात आले. आमदारसाहेब आल्यावर हॉटेलचे मालक, वेटर यांच्याबरोबरच नाष्टा करायला बसलेल्या सर्वांचीच लगबग सुरू झाली. 

सुरूवातीच्याच कक्षात टेबलावर नाष्टा करत दोन युवक बसले होते, त्याच्यासमोर साहेब आणि गंगाधर जाधव बसले. काय देणार खायला असे विचारून साहेबांनी पोहे न टाकता मिसळची ऑर्डर दिली. दरम्यान समोर बसलेल्या दोघांची साहेबांनी चौकशी केली. त्यांनी ओळख करून दिली. वडुजच्या त्या दोघांना कळलेच नाही समोरची व्यक्ती कोण आहे. दरम्यान कराडचे आमदार आपल्या सोबत, चौकातील छोट्या छोट्या हॉटेलात नाष्टा करायला बसलेत याचे त्यांना आश्चर्य वाटले. गप्पा मारत नाष्टा झाला. ते दोघे जायला निघाले तेव्हा त्यांना बाळासाहेबांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. वडूजला आमच्या घरी या असे निमंत्रण देऊन दोघे बाहेर पडले.

नाष्टा करून बाहेर पडलो. येतो म्हणून साहेबांना नमस्कार केला, पण थांबा, काय गडबड आहे, असे म्हणत गंगाधर जाधव यांच्या खताच्या दुकानात मला घेऊन गेले. तिथे पण खते, बियाणे याची माहिती घेताना नवीन कुठला शाळू आला आहे असे विचारून बियाणे पिशवी हातात घेऊन पाहिली. दरम्यान दत्त चौकातील नंदकुमार गणेश मंडळांने तयारी झाली आहे असा निरोप दिल्यानंतर आम्ही सारेजण उठलो. साहेबांच्या हस्ते मिरवणूक नारळ फोडण्यात आला. पालखी खांद्यावर घेऊन साहेब थोडे अंतर चालले. कराडच्या नवीन झांज पथकाने सुद्धा नारळ फोडण्याची विनंती केली. पथकातील युवकांची आस्थेने चौकशी केली, सर्वाना नमस्कार करून साहेब तेथून निघाले.

या दिवशी बाळासाहेब पाटील यांच्या लोकसंपर्काचे पैलू पहायला मिळाले. पी.डी.पाटील साहेबांचे राजकीय वारसदार म्हणून लोक त्यांना का मान देतात हे अनुभवायला आले.

१४ जुलै २०१७

पसारा

ती

पसारा सहज मांडला जातो ,
परंतु आवरताना जीव घेतो.....
मग तो घरातला असो
नाहीतर मनातला...........

पसारा मांडणारा
तो सहज मांडून जातो
मनाला मात्र घरघर लावून जातो !

तो

मनातला पसारा आवरायला,
आवरलेला पुन्हा मांडायला
लतिके तुझी साथ हवी आहे
अगं तुझा हात हवा आहे !

@ सतीश

०६ जुलै २०१७

फुगवा

फुगवा

चुकलं कोण, कोण बरोबर ?
थोडं तुझं अन् थोडं माझं  ,
आणि उरलेलं आपल्या दोघांचं !

इतकं रूसायचं असतं का कधी ?
तुटेपर्यत ताणायचं नसतं कधी !

खरं प्रेम म्हणजे दुखावलेली
मने परत जोडणे
खरं प्रेम म्हणजे भांडण
करुन परत जवळ येणे.....!!

तुझं माझं सख्ख नातं तुटंल का कधी ?
माझ्यातून वेगळ करता येणार ना कधी !

        @.....सतीश मोरे

०४ जुलै २०१७

वारीत उधळलं जातंय पसायदानाचं दान

 भाईजान झाले माऊलीमय, परदेशी विद्वत्यांना भुरळ
 वारीत उधळलं जातंय पसायदानाचं दान

पंढरपूर सतीश मोरे

भागवत धर्म सर्वांचा आहे. या धर्मांची पताका संत ज्ञानेश्वर महाराज यांनी उंचावली. तुकोबा माऊलीनी तर अल्लाह मध्येच पाडुरंग पाहिला. अवघ्या जगाची काळजी वाहणाऱ्या माऊलींनी  जगासाठी पसायदान मागीतले. आता विश्वात्मक देवे, येणे वागज्ञे तोषावे,असे म्हणत जगातील सर्व लोकांना जे जे हवे आहे ते मिळावे असे मागणे मागीतले. सर्वांसाठी मागते ती माऊली. ज्ञानोबा तुकोबाराय  माऊलींच्या या वैश्विक दृष्टीकोनावर फिदा झालेले जगभरातील भक्त वारीत सहभागी झाले आहेत. देव एकच आहे म्हणणारे ख्रिस्ती माऊलींचा गजर करत आहेतच शिवाय संतांच्या महाराष्ट्र भुमीतील मुस्लिम भाईजाननी तर स्वत:चे घर दार माऊलींच्या दिंडीला खुले केले आहे.  वारीत सर्व धर्मभाव जपला जातो,  वाढवला जातोय, वारीसाठी ईदचा सण सुद्धा एक दिवस पुढे ढकलला जातोय.  माऊलींच्या पसायदानाचे दान विश्वभर उधळलं जातंय. आज खरी आषाढी एकादशी साजरी होत आहे  असंच म्हणावं लागेल.

तुकोबा महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा गेल्या काही वर्षांत जागतिक पातळीवर जाऊ लागला आहे. माऊली सोहळ्याचे वेड अवघ्या महाराष्ट्राला तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेशातील काही भागाला शेकडो वर्षांपासून लागलेले आहेच.  गेल्या 1990 पर्यंत सोहळ्यात सहभागी काही हजारची संख्या 2000 मध्ये लाखांवर पोहोचली. त्यानंतरच्या काळात 2 लाख पुढे 3 , 4 ,5 लाखावर वारकरी यामध्ये सहभागी होऊ लागले. . माऊलीच्या प्रेमाने, ज्ञानानं सर्वांना भुरळ घातली असताना अवघ्या जगाचं लक्ष या सोहळ्याकडे  लागलेले आहे. परदेशी पर्यटक सुद्धा वारीत सहभागी होत आहेत. अवघे विश्वची माझे घर ही संकल्पना माऊलीनी शेकडो वर्षा पुर्वी मांडली होती.  ती आज सत्यात येताना दिसत आहे.

गुंथर सोन्थायमर नावाचा जर्मनी येथील विद्वत्ताने अनेक वर्षे पुर्वी माऊली पालखी सोहळा आणि जेजुरीचा खंडोबा यावर एक डाॅक्युमेंटरी तयार केली होती. या व्यक्तीला माऊली सोहळ्याची इतकी भुरळ पडली होती की त्यांनी हा व्हिडीओ जगभर प्रसिद्ध केला. युरिको इकेनोया ही जपान मधील एक व्यक्ती गेली 32 वर्षापासून वारीत सहभागी होत आहे. लिसा नावाची एक महिला भारतीय पारंपारिक साडी परिधान करून वारीत सहभागी होत आहे.  बाबा महाराज सातारकर यांच्या दिडीतून फ्रान्स मधील महिला वारी करत आहे.

वारी आणि मुस्लिम समाज यांचे नाते अनेक वर्षापासून घट्ट आहे. गावागावात हिंदु मुस्लिम ऐक्य  टिकून आहे याचे कारण दोन्ही समाजातील लोक एकमेकांना समजून घेतात, एकमेकांच्या धर्माचा सन्मान करतात.  खरं तर हिंदू मुस्लीम एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. संत तुकाराम महाराज यांच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग सांगीतला जातो.
 
जगदगुरु संत तुकोबाराय पुण्यातून दिंडी घेवून जात होते . मुख्य पुण्यातून जाताना एका भर चोेैकात जोराचा पाऊस सुरु झाला. दिंडीतले सर्व वारकरी आडोसा शोधत इकडे तिकडे पळायला लागले. सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी व्हरांड्यात वगैरे जावून उभे राहीले .
परंतु तुकोबाराय मात्र पावसातच भिजायला लागले. त्याच चौकात एक मस्जिद होती. मस्जिदित चर्चा सुरु झाली .
" आरे ओ तुकाराम भिग रहे है ओ बहुत ही बडे संत है "

आणि मग काय आश्चर्य मस्जितीतील मुसलमानांनी तुकोबारायांना आतमधे आदरपुर्वक धरुन नेले. नंतर सर्व दिंडी मस्जिदमध्ये गेली. सर्व वारकरी मस्जिदमधे जमले. रात्रीची किर्तनाची वेळ झाली. मुर्तीपुजा न माननार्याच्या मस्जिदित तुकोबा काय बोलतील आणि कसे किर्तन करतील याची सर्वांना उत्कंठा लागली. तुकोबाराय किर्तनाला उभे राहीले आणि अभंग घेतला.

अल्ला देवे अल्ला दिलावे !
अल्ला दवा अल्ला खिलावे !!
अल्ला बगर नही कोये !
अल्ला करे सो ही होये !! 1 !!
(अभंग क्र.444.गाथा देहुची प्रत )
 
ज्ञानेश्वर माऊलींनी यापुढे जाऊन अवघ्या विश्वाची काळजी वाहिली आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या शेवटच्या 18 व्या अध्यायात माऊलींनी जगातील सर्व जाती धर्माच्या, वंशाच्या, वर्णाच्या पंथाच्या लोकांसाठी पसायदान मागीतले आहे. हे संत सर्वांची काळजी घेतात, उच्च नीच मानत नाहीत. त्यामुळे मुस्लिम समाजावर माऊलींच्या विचारांचा प्रभाव पडला आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यात मुस्लिम समाज हिरीरीने सहभागी होतो.  शेकडो वर्षांपासून मांडवी ओढा येथे वारकर्यांच्या  दिंडीचा मुक्काम मुस्लिम कुटुंबात असतो. पिंपरद येथील  अनेक मुस्लिम कुटुंबे वारकरी मंडळाना अन्नदान करतात.  वारीकाळात कोकण  येथील एका दिंडीचा दुपारचा भोजन विसावा मुस्लिम कुटुंबातच असतो. तोंडले बोंडले येथे माऊलींच्या रथासमोर  असणारे मानाचे अश्व एका मुस्लिम कुटुंबातच पाणी पितात.  ठाकूरबा वस्ती येथे रिंगण झाल्यानंतर तेथील मुस्लिम हाॅटेल व्यवसायिक सर्वांना चहापान करतात.  बरड येथे असलेल्या दर्गाहमध्ये वारकरी मुक्काम करतात. माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाल्हेकर मुस्लिम कुटुंबाकडे जेवण असते.
 
सातारा जिल्हातील कुशी या गावातून अकबरसा शेख यांच्या नेतृत्वात तुकाराम महाराज सोहळ्यात 2 तर माऊली आहे सोहळ्यात 3 दिंड्या प्रतिवर्षी जातात. गतवर्षी रमजान ईदचा पवित्र सण माऊली सोहळा लोणंद मुक्कामी होता त्याच दिवशी आला होता. यादिवशी सुमारे तीन लाख वारकरी लोणंद मुक्कामी  असतात. याचा विचार मुस्लिम समाजाने ईदचा सण  एक दिवस पुढे ढकलला होता. माऊली सोहळ्यातील दिंडी क्रमांक 155 चा कारभारी मुस्लिम आहेत. दिवंगत जयतुंबी महाराज यांनी अनेक माऊली सोहळ्यात सहभागी होऊन वारी केली आहे. त्या किर्तन कार म्हणुन प्रसिद्ध होत्या. परवा तुकोबाराय यांची पालखी यवत मुक्कामी असताना ईदचा सण होता. तेथील मुस्लिम समाजाने वारकर्यांना शिरकुर्मा खाऊ घातला. तर मुस्लिम भाईजाननी वारकर्यानी दिलेली भाजी भाकरी खाल्ली. यावर्षी  आमच्या सोबत कराडचा हुसेन शेख यांनी आळंदी ते पंढरपूर दरम्यान आमच्या वाहनाचे सारथ्य केले आहे. माझी निम्मी वारी झाली,  मला हाजला जाण्याचे पुण्य लाभले अशी प्रतिक्रिया हुसेनने व्यक्त केली.

०३ जुलै २०१७

निर्मल वारी..... शक्य आहे


निर्मल माऊली सोहळा  शक्य आहे !

अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेणारी, जगाला वेड लावणारी  सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र  आणणारी तरीही कोणालाही जात न विचारणारी ,  कोणालाही निमंत्रण न देता लाखोंच्या संख्येने  एकत्र येणाऱ्या वारकर्याची पंढरीची वारी आणि ज्ञानेश्रर महाराज पालखी सोहळा स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी काही निवडक हात पुढे आले आहेत.  या हाताच्या सकारात्मक प्रयत्नाला फार मोठ्ठे यश आले आहे. वारी निर्मल होऊ शकते,  अवघड काही नाही.  गरज आहे फक्त माऊलीवर प्रेम करणार्‍या हातांची ! तुम्ही माऊलीच्या सोहळ्यात वारकर्य्च्या सेवेवेसाठी खुप काही करता, आता फक्त निर्मल वारी साठी आपले हात रिकामे करा. स्वच्छ  भारत सुंदर भारतचाच एक भाग म्हणून आपली वारी सुंदर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, संस्था, दानशूर व्यक्तींनी सहकार्य केले तर हे शक्य आहे,  होय 2018 चा निर्मल सोहळा शक्य आहे.

माऊली पालखी सोहळा किती मोठ्ठा, भव्य, अप्रतिम, शिस्तबद्ध  असतो याविषयी लिहील तेवढं थोडंच आहे. माऊली प्रेमी वाचक, वारकरी, भाविक हे सर्व जाणतातच ! माऊली सोहळ्याचे वेड  अवघ्या महाराष्ट्राला तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेशातील काही भागाला शेकडो वर्षापासून लागलेले आहेच.  गेल्या 1990 पर्यंत सोहळ्यात सहभागी काही हजारची संख्या 2000 मध्ये लाखावर पोहोचली. त्यानंतर काळात 2 लाख पुढे 3 , 4 ,5 लाखावर वारकरी यामध्ये सहभागी होऊ लागले. पुर्वी फार कमी प्रमाणात दखल घेणारे विचारवंत, प्रसिद्धी माध्यमे तसेच सरकारी यंत्रणा आता माऊली सोहळ्यात पुर्ण वेळ सहभागी होत आहेत. माऊलीच्या प्रेमाने सर्वांना वेड लावलेले असताना अवघ्या जगाचं लक्ष या सोहळ्याचे लागलेले आहे.  परदेशी पर्यटक सुद्धा  वारीत सहभागी होत आहेत. अवघे  विश्वची माझे घर ही संकल्पना माऊलीनी शेकडो वर्षे पुर्वी मांडली होती.  ती आज सत्यात येताना दिसत आहे.

जगात  वारकरी हा एकमेव  संप्रदाय  असेल जिथे कोणालाही जात विचारली जात नाही.  ज्ञानाची कवाडे सर्वाना खुले करणारा हा  एकमेव संप्रदाय असेल. त्यामुळेच केवळ याच संप्रदायात सर्व जाती धर्माचे संत होऊन गेले. तरीही त्याना कोणत्याही चौकटीत  अडकवून ठेवले गेले नाही.  यामुळेच निवृत्ती  ज्ञानदेव  , सोपान ,मुक्ताबाई  एकनाथ नामदेव , तुकाराम यांच्या  वारकरी संप्रदायाचे सार्‍याला वेड लागले आहे.  सोहळा फार मोठ्ठा होत आहे.  एकाच वेळी,  एकाच दिशेने, एकाच देवाच्या  विठ्ठलाच्या ध्यासाने, येवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन , सलग सतरा आठरा दिवस चालणारा हा जगातील  एकमेव धार्मिक कार्यक्रम आहे. ही  भारतीयाच्या दृष्टीने अअभिमानाची गोष्ट आहे. या सोहळ्याची दखल घ्यायला महाराष्ट्र आणि  भारत सरकारने खुप वेळ घेतला आहे.  म्हणूनच देहू आळंदी ते पंढरपूर मार्गाचे संत ज्ञानेश्वर,  संत तुकाराम पालखी मार्ग  असे नामकरण करून हा मार्ग चौपदरीकरण करणे सुरू आहे.  ही जमेची बाजू आहेच शिवाय  वारी मार्ग स्वच्छ, सुंदर आणि निर्मल होण्यासाठी गेल्या दोन तीन  वर्षांत सकारात्मक पाऊले उचलली गेली आहेत.

वारीत सहभागी होणाऱ्या 4 ते 5 लाख वारकरी माऊलीसाठी सर्वात मोठा प्रश्न  शौचालयाला कुठे जायचे हा असतो. माऊली सोहळ्यात वारकरी सुमारे 240 किमी अंतर चालत  पार पाडतात. पहाटे तीन वाजता त्याचा दिवस सुरू होतो. उठल्यावर नैसर्गिक विधी अत्यावश्यक  व  न टाळता येणारा असतो. एकवेळ जेवण नाही मिळाले तर वारकरी सांभाळून घेतात मात्र नैसर्गिक विधीचा प्रश्न गंभीर असतो. पालखी तळावर , परिसरात  एक लाखभर लोक राहतात. मुक्काम ठिकाणाहून पुढे तीन ते सहा किलोमीटर अंतरावर रस्त्याकडेला तंबू उभारून किंवा मिळेल त्या जागेवर सुमारे तीन लाख वारकरी मुक्कामी असतात. या सर्व लोकांची उठण्याची वेळ पहाटे 2 ते 4 अशी आहे.  सुमारे चार लाख लोकांसाठी शौचालयांची सोय करणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही.  मात्र तरीही पहाटे ऊठून लगेच मार्गक्रमण करणारे वारकरी साठी गावाबाहेर शौचालय युनिट उभारणे शक्य आहे. गेल्या दोन वर्षांत विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय सवयंसेवक संघ तसेच राज्य सरकारच्या स्वच्छता विभागाच्या वतीने सुमारे दहा हजार फिरते युनिट उभे करण्यात आले आहेत. त्याला वारकरी चांगला प्रतिसाद देत आहेत. स्वयंसेवक, कार्यकर्ते पहाटे रस्त्यावर  उभे राहून वारकरीना अडवतात,  हात जोडतात.  माऊली,  सर्व  सोय आहे,  पाणी पण भरपूर आहे,  बादली पण  आहे,  अशी विनंती करून शौचालय युनिट मध्येच जा असा आग्रह धरत आहेत. खरंच या कार्याला सलाम केला पाहिजे,
पंढरपूर, वाखरी येथे तर कायमस्वरूपी अनेक शौचालय  उभी करण्यात आली आहेत.  न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्रभागा नदी परिसरात  उघड्यावर शौचालयास बसणे गुन्हा दाखल केला जातो.

केवळ दहा हजार फिरते शौचालय युनिट बसवून निर्मल वारी साठी काहीनी पाऊल उचलले आहे.  अजून किमान 30000 हजार युनिटची गरज आहे.  या कामासाठी मोठ्या निधीची गरज लागणार आहे. वारकरी सेवेसाठी हजारो हात पुढे येतात,  हे लोक गरज नसेल तिथेही  फार खर्च करतात.  मोफत वस्तू वाटप करतात.  चांगल्या हेतूने कलेले दान योग्य कामी लागत नाही,  अनेक ठिकाणी अन्नाची नासाडी झालेले वारीत सर्रास दिसून येते. पालखी तळ परिसर  तसेच रस्त्यावर शिळे अन्न, भाजी, चपाती पडलेल्या दिसतात.  फक्त अन्नदान केले तरच फार मोठे पुण्य मिळते  असा (गैर) समज झाल्याने सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती तसेच मंडळे, ग्रामस्थ यावर खर्च करतात.  त्याऐवजी या लोकांनी वारी मार्गावरील गावांना शौचालय युनिट दान केली तर मोठ्या परिणाम होणार आहे,  वारकरी माऊलीची सोय होऊन वारकरी आशिर्वाद देतील,  पुण्य पदरी पडू शकेल.  निर्मल वारी, निर्मल पालखी मार्ग करणे अवघड,  अशक्य नाही.  यासाठी सहकार्याची गरज आहे.  कोणाही वारकर्याची उघड्यावर शौचालयास बसण्याची इच्छा नसते, पण सोय नसती आणि ही गोष्ट टाळणे अशक्य  असल्याने तो दुसरा मार्ग स्वीकारतो. पालखी सोहळा गावातून गेल्यावर त्या गावात साथीचे रोग पसरतात,  अनेक लोक आजारी पडतात. हे आपण थांबवू शकतो. 

  चौकट

सोहळा भारतातच का?
एवढ्या मोठ्या प्रमाणात धर्मिक सोहळा भारताबाहेर  एखाद्या प्रगत देशात  का होत नाही?  याचे कारण आणि उत्तर कधी आपण शोधले आहे का ? हे विश्वचि माझे घर,   आता विश्वात्मके देवे असा विचार करणारा भारत हा एकमेव देश आहे. शेकडो वर्षे पुर्वी माऊलीनी हे पसायदान मागीतले आहे.  त्यामुळे हा सोहळा भारतातच होऊ शकतो याचा विचार करून स्वच्छ आणि सुंदर वारी संकल्पना सत्यात उतरण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे इतर देशात हा सोहळा  असता तर त्या देशाने 230 किमी अंतराचा महामार्ग कधीच विकसित केला असता.  कायमस्वरूपी स्वच्छता सुविधा देऊन ही वारी जगाच्या नकाशावर नेऊन ठेवली असती, आता हे काम  आपण करू शकतो.  सरकारची जबाबदारी  सरकार  पुर्ण करेल आपण शौचालय युनिट साठी सढळ हाताने मदत केली पाहिजे.

०२ जुलै २०१७

मोकळ्या समाजातील वारकरी वाढताहेत !

मोकळ्या समाजातील वारकरी वाढताहेत !
मुख्य सोहळ्याची उंची कायम पण यंत्रणेवर ताण

सोहळ्यातील वारकरी पेक्षा मोकळा समाजात जास्त वारकरी

भंडीशेगाव सतीश  मोरे

माऊली पालखी सोहळा गेल्या दहा वर्षात खुप बदलतोय, वारीला अधिक  चांगलं आणि सुखसुविधा मिळत आहेत. वारीत सहभागी वारकर्याची संख्या दोन तीन लाख लाखावर सहा सात लाखावर पोहचली आहे. एकीकडे ही बाब सुखावह होत असताना शिस्तबद्ध पालखी सोहळ्यातील वारकरी संख्या कमी होऊन बेशिस्त मोकळ्या समाजातील मुक्त वारकर्याची संख्या वाढत चालली आहे. दोन्ही ठिकाणी सहभागी वारकरी पंढरीची वारीच करतात मात्र स्वच्छतेचा बोर्या उडत  आहे .शिस्तबद्ध पालखी सोहळा विरूद्ध मोकळा समाज याच्यातील साफसफाई बाबतच्या परस्पर विरोधी भुमिकेमुळे स्वच्छ आणि सुंदर वारी संकल्पनेला छेद बसत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काय असतो याबाबत अनेक जण  अनभिज्ञ आहेत.  काही जण आळंदी ते पंढरपूर दरम्यान वारकरी रथाच्या मागे पुढे चालतात, यालाच पालखी सोहळा असे म्हणतात. वास्तविक पालखी सोहळा हा एक शिस्तबद्ध संस्कार आहे. 
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आळंदी येथून तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहु येथून सुरू होतो. या सोहळ्यात राज्यभरातून अनेक दिंड्या सहभागी होतात. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात रथापुढे 27 तर रथामागे  सुमारे 300 नोंदणीकृत दिंड्या तसेच नोंदणी नसलेल्या सुमारे 200 दिंड्या आहेत. तुकोबा माऊली पालखी सोहळ्यात नोंदणीकृत 325 तर नोंदणी नसलेल्या 100 हून अधिक दिंड्या आहेत. या दोन्ही सोहळ्यामध्ये सुमारे 1 हजार दिंड्या असल्याची नोंद आहे. एका दिंडीमध्ये 50 ते एक हजार वारकरी असतात. यामध्ये  झेंडेकरी, वीणेकरी, टाळकरी, चोपदार, पाणी सेवा देणारे तसेच इतर सेवेकरी यांचा समावेश असतो. दोन्ही पालखी सोहळ्यात सहभागी नोंदणीकृत दिड्या, त्यामध्ये सहभागी सर्व वारकरी एकत्र येऊन जी परिक्रमा करतात त्याला पंढरीची वारी असे म्हणतात.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथापुढे आणि मागे असणाऱ्या दिंड्या पुर्ण सोळा दिवसात एकमेकांशी घट्ट बांधलेल्या असतात. सुरूवातीला नगारखाना, त्यापाठोपाठ 27 ते 1 या रथापुढे असणाऱ्या दिंड्या,  त्यामागे माऊली पालखी रथ, त्यानंतर  उर्वरित 300 दिंड्या असा पालखी सोहळा असतो.  या दिड्यातील वारकरी नियोजित वेळेत सकाळी सहा /सात वाजता चालायला सुरुवात करतात.  या सोहळ्यातील दिड्याचा क्रम,  दुपारचा भोजन विसावा, सकाळ संध्याकाळचा विसावा याची जागा निश्चित असते. या सर्व दिंडीसाठी पालखीतळावर जागा निश्चित असते, सर्व काही नियोजनबद्ध आणि पद्धतशीर  असते. यामध्ये सहभागी वारकरी, टाळकरी कोणालाही मध्येच कुठेही थांबता येत नाही,  मधूनच बाहेर जाता येत नाही, विश्रांती घेता येत नाही. वारी मार्गावर वाटप केल्या जाणाऱ्या कोणत्याही सुविधा, खाऊ, वस्तू याचा है वारकरी स्वाद घेत  नाहीत. सैनिकी शिस्तीने एका तालात ते चालतात,  ऐवढच काय विशिष्ट दिंडीचा विशिष्ट वेळी कोणता अभंग असतो, हेही ठरलेलं आहे. यामध्ये दिड ते दोन लाख वारकरी असतात   शिस्तबद्ध माऊली सोहळा हा इतका देखणा  असतो की दर्शनासाठी  आलेला भाविक त्याच्या प्रेमात पडलो.

नेमकं याच्या उलटं मोकळा समाज दिंडी मध्ये असते. गावातील मोठ्या किंवा माळकरी व्यक्तीनं पुढाकार घेऊन एक दिंडी स्थापन केली जाते. दिंडीचा खर्च करण्यासाठी वर्गणी  गोळा केली जाते, अनेक ठिकाणी भिशी पण आहे. अशा प्रकारच्या 1000 हून अधिक दिंड्या माऊली सोहळ्याच्या पुढे चालतात.  या दिंड्याबरोबरच पाच ते 25 च्या ग्रुपने चालणारे वारकरी,  माऊली सोहळ्यातील काही सेवेकरी हे पण मोकळ्या समाजातून चालतात.  हे वारकरी पहाटे दोन, तीन वाजता चालायला सुरुवात करतात. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण, बंधन नसते.  त्याच्या मुक्कामाच्या, भोजनाच्या, विसावा अशा कोणत्याही जागा ठरलेल्या नसतात. मात्र अनेक सधन दिंडी मालकांनी स्वमालकीचे तंबू घेतले आहेत.  पहाटे उठायचे, फ्रेश होऊन चालायला सुरुवात करायची, स्नान करायला योग्य जागा मिळाली की थांबायचे, पुन्हा चालायचे.  कुठेतरी मोफत चहा,  नाश्ता जेवणाची सोय  असेल तर हे वारकरी कुठेही थांबतात. ठराविक दिंड्या वगळता या वारकरी साठी स्वतंत्र भोजन व्यवस्था नसते.  कोणाचेही नियंत्रण नसल्याने मोकळा समाजातील वारकरी कुठेही थांबतात, कंटाळा आला की थांबतात. गेल्या काही वर्षांत सेवाभावी संस्था,  संघटना आणि मंडळानी वारी मार्गावर चहापाणी पासून आंघोळ,  भोजन सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.  स्वतंत्रपणे चालणे आणि कोणाचेही  नियंत्रण नसणे यामुळे गेल्या चार वर्षांत मोकळा समाजातील वारकर्याची संख्या दो लाखावरून चार लाखावर गेली आहे.

मोकळ्या समाजातील वारकरी माऊली सोहळ्यासाठी प्रशासनाने  उपलब्ध करून दिलेल्या सर्व सुविधांचा लाभ घेतात.  आपण सोहळ्यातच चालत  आहे अशी यांची भावना आहे.  पहाटे दोन ते सकाळी सहा सात पर्यंत तरी हे वारकरी चालतात त्यावेळी चार पाच तास त्याचा अखंड प्रवाह वाहत असतो. सात वाजता माऊली सोहळा सुरू होतो तेव्हा त्याच्या साठि वाट मोकळी करून दिली जाते. दोन्ही दिड्यातील वारकरी पंढरीच्या धारीचाच भाग आहेत.

मात्र सोहळ्यात पुढे चालणारा मोकळा समाज नियंत्रित नसल्यामुळे तो पुढे जाऊन जी घाण करतो, त्याचा फार मोठा फटका सोहळ्यातील वारकरीना बसतो.  स्वच्छ आणि सुंदर वारी उपक्रम गेल्या तीन वर्षांत चौपदार फौडेशनने प्रभावी पणे राबवला आहे.  या उपक्रमाला छेद देण्याचे काम मोकळा समाज करत आहे. मोकळा समाजातील वारकरीच्या स्वच्छता विषयक सोयीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...