फॉलोअर

०८ एप्रिल २०२०

'शक्ति' अमिताभ बच्चनची... बाप दिलिपकुमारची, आणि आई राखीची..!






'शक्ति' अमिताभ बच्चनची...
बाप दिलिपकुमारची, पत्नी स्मिताची
आणि आई राखीची..!




कोरोना लाॅकडाऊन कालावधीत गेल्या काही दिवसापासून वर्क फ्रॉम होम सुरू आहेच, शिवाय रोज सहा ते सात तास ऑफिसमध्ये जाऊन काम करावे लागत आहे. घरामध्ये जास्त वेळ राहण्याची संधी आता मिळाली आहे. या संधीचा फायदा घेत गेल्या काही दिवसापासून मी रोज कधीही न पाहायला मिळालेले सिनेमा टीव्हीवर पाहत आहे. याच दरम्यान रामायण मालिका सुरू झाल्यापासून आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सकाळी नऊ वाजता आणि रात्री नऊ वाजता रामायण पाहण्याचा तोही सहकुटुंब एक वेगळाच आनंद आम्ही चौघेजण लुटत आहोत. रामायण मालिकेविषयी वाटणारी ओढ, आनंद याविषयी वेगळे लिहिणारच आहेत पण आज मी एक वेगळ्या विषयावर लिहायचं किंवा प्रकट व्हायचे ठरवले आहे.


अमिताभ बच्चन हा माझा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आवडता विषय आहे,माझं पहिलं प्रेम आहे. अमिताभ बच्चन यांच्याविषयी काय बोलायचे आणि काय लिहायचे, किती लिहायचे हे समजत नाही, इतका वेगळा अनुभव आणि आत्मीयता माझी अमिताभ बच्चन यांच्याविषयी आहे. अमिताभ बच्चन यांचे चित्रपट मी किती वेळा पाहिलेत याची गणती करता येणार नाही, मलाही ते आठवत नाही. मात्र अमिताभ बच्चन यांचा एक सिनेमा मी खूप कमी वेळा म्हणजे दहा पंधरा वेळा पाहिला असेल तो सिनेमा म्हणजे दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेला शक्ती . हा सिनेमा पहिल्यांदा मी पाहिला कराडच्या कराडच्या रॉयल चित्रपटगृहात. तेव्हा मी सातवी किंवा आठवीत असेन. रॉयल चित्रपटगृह हे त्यावेळी अमिताभ बच्चन यांचे चांगले चांगले दर्जेदार चित्रपट प्रदर्शनाचे एक केंद्र होते. अमिताभ बच्चन यांचे सर्व प्रमुख चित्रपट रॉयल चित्रपटगृहात लागत असत. शक्ती हा सिनेमा मी सुरुवातीला पाहिला होता तेव्हा मला सिनेमातलं फार काही कळत नव्हतं. एक मनोरंजन आणि अमिताभ बच्चन हेच आकर्षण असल्यामुळे असल्यामुळे मी हा सिनेमा पाहिला होता. मात्र नंतरच्या काळात कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर चित्रपट रसग्रहणाचा आनंद मी अनुभवत गेलो.



1990 च्या काळात टीव्ही आला व्हिडिओ आला, कॅसेट आले आणि त्या काळात व्हिडिओ आणि विसीआर घरात आणून चित्रपट पाहण्याचीएक क्रेझ होती. त्यावेळी मी अमिताभ बच्चन यांचे चित्रपट कराडच्या प्रभात चित्रपटगृह शेजारी असलेल्या दोन व्हिडिओ सेंटर मध्ये तसेच नगरपालिके समोरील एका व्हिडिओ मिनी थिएटरमध्ये पाहिले होते.


परवा सोनी मॅक्स वर जेव्हा शक्ती हा सिनेमा लागला तेव्हा तो सिनेमा पूर्ण पाहिला पाहिजे अशी माझी इच्छा झाली आणि मी रिमोट हातात घेतला. आमच्या घरात अमिताभ बच्चन यांचा चित्रपट टीव्हीवर लागला की माझे राज्य असते, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे अनेकदा तेच ते चित्रपट पाहून घरातले कंटाळतात हे मात्र तरीही माझ्यासाठी ते रिमोट हातात उपलब्ध करून देतात. रामायण संपल्यानंतर शक्ती सिनेमा लागला हा सिनेमा मी पाहायला लागलो.


शक्ती हा चित्रपट खरंच दर्जेदार आहे. अभिनयाचे सम्राट म्हणून ज्या दिलीप कुमार यांच्याकडे पाहिले जाते त्या दिलीप कुमार यांना अमिताभ बच्चन अभिनयातील गुरु मानतात. आज देखील अमिताभ बच्चन मी अभिनय करायला शिकतोय असं म्हणतात. अमिताभ बच्चन यांची कारकीर्द जेव्हा टॉपवर होती तेव्हा दिलीप कुमार एवढे जोशात नव्हते. मात्र या दोन दिग्गजांना एकत्र येऊन चित्रपट काढण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शक रमेश सिप्पि यांनी उचलले. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि दिलीपकुमार या बाप लेकाच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळाली. मुलगा आणि बापातील सुप्त संघर्ष, प्रेम असूनही व्यक्त न होण्यामुळे दोघांच्या मध्ये वाढलेला दुरावा, वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्यामुळे कुटुंबाकडे किंबहुना मुलाकडे लक्ष द्यायला मिळालेला कमी वेळ, आदर्शवादाचा फार मोठा पगडा आणि असा दमदार बाप दिलीप कुमार यांनी अतिशय उंचीवर नेऊन निभावला आहे. दिलीप कुमार यांना त्याच तोडीत अभिनयाची टक्कर देण्यात अमिताभ बच्चन सुद्धा कुठेही कमी पडले नाहीत.


 या चित्रपटातील अनेक संवाद माझ्या पाठ आहेत. मेरे बाप ने दो शादी है, एक मेरी माँ के साथ और दुसरी अपनी नोकरी के साथ, मेरी माँ का बेटा मैं हु और मेरी दुसरी माॅंका यानी मेरी सौतेली माॅ का बेटा है कानून,  हा संवाद मला खूप आवडतो. हा संवाद पाहत असताना, ऐकत असताना मुलांमधील आणि बापा मधील दरी का वाढत जाते, याचा राहून राहून पुन्हा  अनुभव आला. किंबहुना यावर थोडेसे चिंतन चिंतन करावे वाटले. मुलगा आणि वडील यांनी खरे तर मित्राप्रमाणे राहायचे असते. बापाची चप्पल मुलगा घालायला लागला की बापाने मुलाशी एक वेगळ्या प्रकारे नाते निर्माण करायचे असते. काही गोष्टी शेअर करायच्या असतात. कर्तव्याची जाणीव करून द्यायची असते. त्याचबरोबर अधिकार म्हणजे काय हे समजून सांगताना कोणत्या स्टेजला कोणते अधिकार द्यावेत हेही बापाने मुलांना समजावून सांगायचे असते. शक्ती चित्रपट पाहताना हा एक वेगळा पैलू मला पाहायला मिळाला. अमिताभ बच्चन यांनी जी भूमिका निभावलेली आहे ते बालपणीचा अमिताभ जेव्हा एका संकटात सापडतात तेव्हा त्याला त्याचे वडील मदत करत नाहीत. मात्र एक अनोळखी माणूस मदत करतो आणि तोच मनुष्य तरुणपणी पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांना नोकरी देतो,अशी कथा आहे. आपणास ही कथा माहिती असेल.

लहानपणी किंवा अडचणीच्या वेळी वडिलांनी मदत केली नाही आणि मित्रांनी मदत केली किंवा इतरांनी केलेली मदत  मुलं चांगले लक्षात ठेवतात. काहीजण हे समजून घेतात तर काही मुलं माझा बाप माझ्यासाठी काहीच करत नाहीत असं समजतात आणि ही दरी वाढत जाते. आजच्या काळात बाप मुलांसाठी सर्व काय करतो, अनेक आपल्या गरजांना मुरड घालतो. काहीही करून, कष्ट करून चांगल्या मार्गाने वाईट मार्गाने कशाही प्रकारे घरात पैसा आणतो. प्रसिद्धी आणि पैसा याच्यासाठी सर्व काही तत्त्वाला मुरड घालतो.

चाळीस वर्षांपूर्वीचा काळ पहिला तर एक आदर्शवादी बाप आणि आदर्शवादी मुलगा असे एक परिस्थिती होती. आज काळ बदलला असला तरी बाप मुलातील नातं अजूनही तसंच आहे. त्यांच्यातील दरी पैशामुळे किंवा उपलब्ध सुविधांमुळे थोडी कमी झालेली दिसली असली तरी बाप मुलातील संघर्ष अजूनही आहे. कारण आज ज्यांची मुले वीस ते तीस वर्षाची आहेत त्यांनी जो काळ पाहिला आहे, ज्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले आहे, दहावीला गेल्यानंतर ज्यांना फुल पॅन्ट मिळाली आहे, हॉटेलमध्ये जेवण काय असते हे ज्यांना नोकरी लागल्यानंतर कळले होते. तोच बाप परस्पर याच्या उलटं चित्र आपल्या मुलाकडून अनुभवत आहे.

 आजची मुलं ज्यांना हॉटेलमधे जायला किंवा ऑनलाइन वरून महिन्यातून तीन चार वेळा नवीन नवीन वस्तू ,कपडे मागायला काहीच वाटत नाही, या मुलांना आपल्या बापाची दुःखी कशी करणार ! मात्र तरीही आजची पिढी थोडी प्रगल्भ झालेली आहे. मुले बापाला समजू लागली आहेत. सहज उपलब्ध झालेला पैसा खोटा झाला आहे. पैशापुढे नाती काहीच राहिलेली नाहीत. बाप मुलातील संघर्ष घराघरांमध्ये आहेच. मात्र तो संघर्ष टोकाला जात नाही कारण बापाने स्वतःला मुरड घातली आहे.

माझ्या वैयक्तिक अनुभव बद्दल सांगायचे म्हटले तर माझ्या मुलाने डॉक्टर व्हावे असे माझी इच्छा होती. मात्र माझ्या मुलाला पियुषला यामध्ये कसलाही इंटरेस्ट नव्हता. त्याने हॉटेल मॅनेजमेंटचे करिअर स्वीकारले. सुरुवातीला मला ते पटले नाही मात्र बारावीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील हाॅबीज अॅण्ड इंटरेस्ट नावाचा एक धडा मी शिकवला होता, शिकलो होतो. ज्याला ज्याच्या आवडीचे काम मिळाले तो सर्वात सुखी असं एक वाक्य त्या धड्यांमध्ये होते. माझ्या मुलाला जर हॉटेल मॅनेजमेंट मध्ये इंटरेस्ट असेल त्याला जगातील सर्वात मोठा कुक व्हायची इच्छा असेल आणि या माध्यमातून त्याला जग पाहायची इच्छा असेल तर त्याने खूप मोठ्ठं व्हावे असे मी माझ्या मनाला समजावले आणि मी माझ्या मुलाला त्याचे करिअर करायला पूर्ण परवानगी दिली. वास्तविक इंजिनिअरिंग पेक्षा जास्त फी या कोर्ससाठी आहे. तरीही मी कर्जाचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे मुलाला हॉटेल मॅनेजमेंटला जाऊ दिले आणि तो आज त्या कॉलेजमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे, मी आनंदी आहे. अनेकदा माझा आणि माझ्या मुलाचा संवाद होतो, काही गोष्टीवरून वाद होतो मात्र कुठे थांबावे कुठपर्यंत बोलावे याची जाणीव मला स्वतःला असल्यामुळे आमचं नातं भक्कम आहे. शक्ती चित्रपट पाहताना बाप मुलाचं नातं आणखी समृद्ध व्हावा यासाठी काय करता येईल याचाही मी विचार केला.


शक्ती या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची हीरोइन स्मिता पाटील आहे, स्मिता पाटील यांनी नमक हलाल, शक्ती या दोन चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले आहे. स्मिता पाटील ही बहुगुणी अशी मराठी कलाकार होती. स्मिता पाटील यांच्या अभिनयाचा मी पहिल्यापासून चाहता आहे. मराठीमधील जैत रे जैत पासून आखिर क्यू , डान्स डान्स आणि स्मिता पाटील यांचा शेवटचा चित्रपट असलेला वारीस हा चित्रपट मी अनेकदा पाहिला आहे. स्मिता पाटील यांचा अतिशय कमी वयात मृत्यू झाला. स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांचे अतिशय जवळचे नाते होते. नमक हलाल हा चित्रपटाचे शूटिंग करताना एका पावसाच्या गाण्यावेळी स्मिता पाटील यांना थोडसं शरमल्यासारखे झालं होतं. शूटिंगच्या वेळेला खूप अवघडल्यासारखं झालं होतं. मात्र यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांना फार मोठा धीर दिला आणि त्या गाण्याचे शुटिंग पूर्ण झालं. अमिताभ बच्चन यांना 82 झाली कुली चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान अपघात झाला होता. या अपघाताच्या आदल्या दिवशी स्मिता पाटील यांना एक स्वप्न पडले होते आणि हे स्वप्न स्मिता पाटील यांनी अमिताभ बच्चन यांना फोन करून बोलून दाखवले होते. अमिताभ बच्चन यांच्याविषयी काही तरी विपरीत घडले अशा आशयाचं स्वप्न होतं. स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांचं हे भावनिक नातं एक वेगळंच होतं.


अमिताभ बच्चन यांच्यासोबत शक्ती चित्रपटांमध्ये राखी यांनी अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका केली आहे. खरंतर मुकद्दर का सिकंदर, कसमे वादे, बेमिसाल, बरसात की एक रात, कभी कभी आदी चित्रपटात अमिताभ आणि राखी यांची जोडी फार गाजली होती. प्रेमाचं प्रतीक आणि प्रेमाची सुंदर जोडी म्हणून राखी आणि अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहिले जात होतं. बेमिसाल चित्रपटात राखी अमिताभ बच्चनची सखी होती. अमिताभ बच्चन आणि राखी यांनी अनेक चित्रपटांमध्ये अतिशय सहज सुंदर अभिनयाचे दर्शन घडवत आपले वेगळेपण दाखवले आहे. या सर्व चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन आणि राखी यांनी प्रियकर आणि प्रेमिका अशी भूमिका निभावली आहे. लावारिस नावाचा सुपरहिट चित्रपट येऊन गेला. या चित्रपटात मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है फिमेल आवाजातील गाणे राखी यांच्यावर चित्रित झाले होते. या चित्रपटात राखी अमिताभ बच्चन यांची आई झाली होती. मात्र आई आणि मुलगा असे कुठेही समोरासमोर आले नव्हते किंवा संवाद नव्हता.


राखी आणि अमिताभ यांच्याकडे पाहताना प्रेम कसे करावे याचे मूर्तिमंत उदाहरण दर्शकांना पाहायला मिळत होते. कभी कभी चित्रपटात राखी आणि अमिताभ यांची जोडी फार गाजली. कभी कभी मेरे दिल में खयाल आता है हे लता दीदींच्या आवाजातील  राखीवर चित्रित झालेले गाणे सर्वांच्या स्मरणात आहे. अमिताभ बच्चन यांच्या दमदार आणि धीरगंभीर आवाजातील कभी कभी मेरे दिल में खयाल आता है, हा संवाद अजूनही युवा पिढीला आकर्षित करतो. मुकद्दर का सिकंदर मधली अमिताभची मेमसाब राखी कोण बर विसरू शकेल. बरसात की एक रात मधील अमिताभ की अंध प्रेयसी राखी सर्वांच्या स्मरणात आहे. कसमे वादे मधील अमिताभ राखी ची जोडी प्रेमाची साक्ष देते. बेमीसाल  चित्रपटात किसी बात पर मै किसी से खफा हुं, असे म्हणत राखी कडे चोरून पाहणारा अमिताभ लाजबाबच होता. मात्र अमिताभ बच्चन यांच्यासोबत हिरोईन म्हणून काम केलेल्या राखीला शक्ती चित्रपटात अमिताभ बच्चन यांची आई म्हणून पाहताना मला एक वेगळाच अनुभव होता.


या भूमिकेविषयी मी अनेकदा लिहिले आहे किंवा बोललो आहे. मात्र काल शक्ती चित्रपट पाहताना अमिताभ बच्चन आईला मम्मा म्हणून हाक मारतो, हे खरंच एक वेगळं दृश्य होतं. अमिताभ बच्चन यांच्या अनेक चित्रपटात निरूपा रॉय यांनी अमिताभची आईची भूमिका निभावली आहे. मात्र शक्तीमध्ये राखीला अमिताभची आई म्हणून पाहताना मला कसतरी वाटत होतं. हा चित्रपट पाहताना शेवटच्या टप्प्यात आईच्या भेटीसाठी असलेला अमिताभ पाहिल्यानंतर दिवार मधल्या विजयची मला खुप आठवण झाली. अमिताभची आई म्हणून रोहिणी हट्टंगडी, निरुपा रॉय यांनी केलेल्या अनेक चित्रपटात शेवटी अमिताभ बच्चन मरतो, मात्र शक्ती या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची आई अगोदर मरते, नंतर अमिताब मरतो. आईच्या अंत्यदर्शनासाठी आलेला अमिताभ आईच्या पार्थिवासमोर समोर जाऊन काहीही बोलत नाही, फक्त रडतो. नंतर बापाला जाऊन भेटतो. हा प्रसंग पाहताना न बोलताही अभिनय कसा करतात, हे फक्त अमिताभ करू शकतो हे ठामपणे सांगावेसे वाटते. अनेक चित्रपटात अमिताभची आई निरुपा रॉय एक वेगळी भूमिका निभावते, निभावलेली आहे, मात्र शक्ती चित्रपटात राखीने अमिताभची आई निभावताना खरंच दमदार अभिनय केला आहे, असे म्हणावे लागेल.

शक्ती या चित्रपटातून अनिल कपूर यांनी पदार्पण केले. या चित्रपटात अनिल कपूर यांनी अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्या मुलाची भूमिका निभावली आहे. या चित्रपटाची सुरुवात आणि शेवट अनिल कुमार यांच्यावर होते. या चित्रपटात अनिल कपूर आणि अमिताभ बच्चन कुठेही समोरासमोर दिसलेले नाहीत. मात्र अनिल कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा असलेला हा एकमेव चित्रपट आहे.

अमिताभ अमिताभ का आहे हे पाहायचा असेल तर राखी आणि अमिताभ अभिनित मुकंदर का सिकंदर पहावाच लागेल.पण शक्तीही पाहिला पाहिजे. बेमिसाल मध्ये सखी सखे म्हणून राखीच्या मागे धावणारा अमिताभ शक्तीमध्ये मम्मा म्हणून जेव्हा आई राखी समोर उभा राहतो तेव्हा तो प्रसंग आणि या प्रसंगात आई आणि मुलाने केलेला अभिनय मला खरंच खूप भावला. राखी एक प्रतिभावंत कलाकार आहे. प्रत्येक भूमिकेत तिने जीव ओतून काम केलेले आहे. राखी सोबत अमिताभने केलेल्या प्रत्येक चित्रपटात राखी कुठेच कमी पडलेली नाही. कभी कभी चित्रपटात शशिकपूर, ऋषी कपूर, अमिताभ हे दिग्गज कलाकार असूनही राखीने त्यांच्यासमोर केलेला अभिनय आणि जिवंत केलेली भूमिका खूप वेगळी आहे. शक्ती चित्रपट पाहताना राखी आणि अमिताभ बच्चन यांच्यातील यांच्या चित्रपटातील हळुवार भूमिकांच्या मी प्रेमात का पडलो होतो याचे मला उत्तर मिळाले,म्हणून तर तुमच्यापुढे शेअर केले.


Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...