फॉलोअर

०८ जुलै २०१६

🚩🚩🚩माझी वारी🚩🚩🚩

दिनांक 8 जुलै 
बरड  सतीश मोरे

नेहमी प्रमाणे तीन वाजता चालणे सुरू केले.  काल फलटण मध्ये जराही पाऊस झाला नाही.  पण  आम्ही निघालो तेव्हा मोठी सर येऊन गेली. त्यामुळे रस्तावर चिखल झाला होता. पहाटेच्या वेळी पण काही मंडळे आणि सेवाभावी संस्थानी चहा आणि नाश्ता सोय केली होती. काही कार्यकर्ते रस्त्यावर येऊन उपीट वाटप करत होते,  तर बिसलेरी पाणी बाटली शहर वाटप सुरू होते.  आम्ही उभे राहूनच साडे तीन वाजता नाश्ता केला.  शहर  सोडून बाहेर आलो.

फलटण सोडून बाहेर आले नंतर कॅनाल आहे, त्यावर पुल  अरूंद आहे.  शिवाय रस्ता नागमोडी आहे.  सकाळी बाहेर पडलेले वारकरी व खुप  वाहने याचा विचार करून पोलिसांनी पुलाव अलिकडे रोप बॅरीकेटस तयार केले होते.  एकेरी रस्ता,  अरूंद पुल यामुळे वेग खुप मंदावला.  दाटीवाटी करून वारकरी  उभे राहिले होते,  पाय पुढे टाकायचा म्हणून टाकायचा, अशी परिस्थिती होती.  खाली चिखल होता. पाय अवघडले.  वीस मिनिटे गेली कॅनाॅल पुल ओलांडायला. चालत चालत  विडणी गाव आले.  चहाला थांबलो,  पुढे निघालो.  पिंपरद
गाव तीन किलोमीटर होते,  तिथे आम्ही जेवण करणार होतो,  त्यामुळे आंघोळीला जागा शोधून काढली .

रस्त्याकडेला एक विहीर होती,  नवीनच काढली असेल, दगड, माती माल बाहेर पडला होता.  तिथे खूप गर्दी होती. पिंपरदचे सयाजी रघू शिंदे यांच्या मालकीची ती विहीर आहे.  दोनशे मीटर पाटावर  आडवी पाईप लाईन  उंचावर बांधली होती.  त्या पाईपला दोन फुटावर छिद्र पाडले होते.  एकावेळी किमान शंभर लोक आरामात उभे राहून आंघोळ करू शकतील,  अशी अतिशय सुंदर व्यवस्था होती.  खरं तर  आज सकाळी पुन्हा सर्दीने नाक वाहू लागले त्यामुळे  मी आंघोळ करणार नव्हतो. पण  ओपन एअर शाॅवर पाहून बेत बदलला. स्नान केले,  गंध लावला  आणि विहिर मालकाला दुवा देऊन निघालो.

साडे आठ वाजता पिंपरद गावात पोहचलो. पिंपरद सोयायटी शेजारी  आमच्या गाड्या  उभ्या होत्या.  गतवर्षी प्रमाने पुन्हा  अर्चना काटकर यांनी माऊलींच्या घरी गेलो. वय पस्तीस चाळीस  असावे साधारण दहा बाय पंधराचे छोटे घर,  बाहेर नहाणी. अतिशय गरीब कुटुंबातील या विधवा महिलेला दोन मुले आहेत. पती निधनानंतर मोलमजुरी,  भांगलण करून तिने दोन मुले मोठी केली.  एक सहावीत,  दुसरा मुलगा आठवीत. दिवसभर शेतात मजुरी करणार्‍या या आर्थिकदृष्या गरिब पण मनाने दिलदार अशा माऊलींच्या घरी  आम्ही पोहोचलो तेव्हा  आमच्यातील काही वारकरी महिला घराबाहेर बाजरीच्या  भाकरी थापत होत्या. गरज भाकरीचा सुगंध आला.  आत जाऊन बसलो.  आमचे सहकारी कांदा पात कापत होते,  काहीनी लसूण सोलायला घेतला.  साडे नऊ पावणे दहा  वाजता स्वयंपाक तयार होता. जेवायला बसलो.  बाजरीची भाकरी, वांगे, वाटाणा मिक्स कालवण, कांद्याची पात, लाल चटणी , कांदा, शेंगदाणे  असा जबरदस्त मेनू होता. भरपेट जेवण झाले. काय चव होती त्या भोजनाला ! असे स्वादिष्ट जेवण आयुष्यात पहिल्यांदा खाल्ले असेल. 

किती विचित्र आहे  जीवन.  ज्याचेकडे खुप आहे, ते लोक  देताना कुरकुर करतात.  ज्यांचे हातावरचे पोट  आहे ते खुशाल देतात,  आनंद वाटतात. त्या माऊलीला खरंच पायावर डोके ठेवून नमस्कार करायची  इच्छा झाली.  पण माऊली म्हणाली,  तुम्ही लोक माझ्या गरीबाच्या घरी येता, देवच घरी येतो. मी तरी काय देते तुम्हाला भाजी भाकरीच की!  धन्य ती माऊली! 
धाकटा मुलगा कुणालने माझा टॅब हातात घेऊन पहायला लागला.  मी त्याची चौकशी केली, कोणत्या   शाळेत जातो?  काय  अडचण आहे?  बोलायला तयार नव्हता तो.  मग मीच विचारले क्लास लावला काय कोणता? त्यावर त्याने क्लास लावायचा  आहे पण महिन्याला दोनशे रुपये लागतात,  असे केविलवाणा चेहरा करून सांगितले.  मी आणखी चौकशी केली,  क्लास मॅडमचा नंबर मागितला,  फी व्यवस्था  आम्ही करतो,  असे सांगितले.  आठवीत असलेल्या भावाची फी 300 रूपये आहे,  असे समजले. दोघांची सोय कराडचे माऊली करतील,  असे त्याच्या आईला सांगून बाहेर पडलो. शेक्षणिक असमतोल,  गरीबी सारे विचार  मनात येऊन गेले. 



बरड  गावी एक वाजता पोहचलो,  तंबू तयार होते. कागद  अंथरून अंग टाकून दिले. चार वाजता  उठून जीप मध्ये बसून बातमी केली,  मेल केली.  

आमच्या बारा नंबर दिंडीत भोजन व्यवस्था करण्यासाठी सेवेकरी टीम सतत कार्यरत  असते. श्रीपती हणमंत शिर्के, नादलापूर हणमंत शामराव खबाले,संभाजी तुकाराम कुंभार ,पाडुरंग रघुनाथ होगले,
नंदकुमार नानासो संकपाळ,सुनिल यादव,दत्तात्रय दिनकर ढेबे,
दिलीप ज्ञानदेव काकडे,सुरेश ज्ञानदेव काकडे ,संदीपमामा कार्वेकर,
विकास बबन खबाले अशी टीम पंचपक्वान खाऊ घालतात. त्याच्या साठी स्वतंत्र वाहन  उद्योजक शाम पवार काका यांनी केली आहे. दुपारी या टीम सोबत गप्पा मारल्या, फोटो काढले. 


सायंकाळी संभाजी  शेवाळे यांचे अॅमवे नेटवर्क मित्र डाॅक्टर हणमंत शिंदे यांच्या घरी जाऊन मोबाईल चार्ज करायला ठेवला. खुप छान स्वागत केले या कुटुंबाने! रहायला यायचा आग्रह केला. 

 येताना  एक वेगळच चित्र दिसले. पीर मंडपात सारे वारकरी विसावले होते.  कोणी कंपाऊंड ग्रील वर कपडे सुकायला टाकले होते. गळयात चार पाच तुळशी माळा घातलेल्या  एका वृदाला विचारले, तुम्ही मुसलमानाच्या पीरात झोपणार?  त्यावर तो म्हणाला, जिथे त्याला अडचण नाही, मग तुम्ही आम्ही काय? वारकरी हिंदू मुस्लीम मानत नाहीत.

 सायंकाळी डाॅक्टर जोशीयांचे कडे जाऊन खोकला औषध घेतले . जेवण झाल्यावर माझी वारी लिहली. पाठवली. नऊ वाजता  अंथरूणावर पडलो. 

दातृत्व कसे असते,  कसे करावे हे सांगणारा

आजचा दिवस माऊली कृपेने  मस्तच. 

     - सतीश मोरे 9881191302

     माऊली माऊली

🚩 माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या 🚩
Read my blog

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...