मोबाईल वाढले; वारकरी झाले ऑनलाईन
जेजुरी : सतीश मोरेपंढरीची वारी कालची आणि आजची याबाबत माहीती घेतली आणि तुलना केली तर खुप मुद्दे आहेत. 500-1000 वारकरी घेऊन जाणारी फार फार पुर्वीची वारी, त्यानंतर 1970 च्या सुमारास 10000 वारकरी, 1990 च्या सुमारास 20000 वारकरी आणि 1995 मध्ये वारी लाखावर पोहोचलेली वारी ! 2000 नंतर तीन लाख वारकरी आता चार लाखावर पोहचलेल्या ज्ञानेश्वर माऊली सोहळा. सोहळ्यात बरेच बदल झाले आहेत. वारीसाठी घर सोडल्यानंतर महिनाभरात कुटुंबाशी कसलाही संपर्क नसलेला पुर्वीचा वारकरी मात्र आता ऑनलाईन झाला आहे, रोज संध्याकाळी आपल्या कुटुंबातील सदस्यासोबत बोलत आहे, वारीचे अनुभव सांगत आहे.
संत तुकारामांच्या घराण्यात वारीची परंपरा फार वर्षापासून होती. तुकाराम महाराजांनी ती पुढे चालवली. त्याच्यनंतर त्यांचे कनिष्ठ बंधू कानोबांनी वारी सुरू ठेवली. तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव श्री नाराङ्मण बाबा यांनी 1685 मध्ये या वारीला सोहळ्याचे स्वरूप दिले. देहूहून ते तुकोबारायांच्या पादुका पालखीत घालून श्री क्षेत्र आळंदीला जात. त्याठिकाणी पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन ही पालखी पंढरपूरला जात होती. श्री नारायण बाबांच्या पश्चात 1830 पर्यंत हा सोहळा अखंडीत सुरू होता. संत तुकाराम महाराजांच्या वंशजामध्ये वाद झाल्यामुळे हा सोहळा काही काळ खंडीत झाला. आज सुरू असलेला संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा 1832 मध्ये माऊलींचे निश्चिम भक्त श्री हैबत बाबा पवार आरफळकर यांनी सुरू केला. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या कडे सरदार म्हणून असलेल्या पवार कुळातील हैबत बाबा यांनी आळंदी ते पंढरपूर वारी सोहळा खुलवला, वाढवला.
ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात गेल्या काही दशकात अनेक बदल टप्प्याटप्प्याने होत गेले आहेत. अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या वारीत महाराष्ट्रातील तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील वारकरी सहभागी होतात. सुरुवातीला हा आकडा शेकड्यात होता, पुढे हजारात, विसाव्या शतकाच्या अखेरीस लाखावर, आता तीन ते चार लाखांच्या घरात गेला आहे.
पुर्वी वारीसाठी वारकरी आठ दहा दिवस अगोदर आळंदीला जायला निघत. पुढे बैलगाडी आली . टमटम, एसटी बस आली. आळंदी ते पंढरपूर वारी व पंढरपूर येथे दोन दिवस, परतीचे दहा दिवस असा महीना दिड महिना वारी कार्यक्रम असायचा. आता यामधील पंधरा वीस दिवस कमी झाले आहेत.
पुर्वी वारकरी पंढरीला निघाला की सारे गाव जमायचे, त्याचे दर्शन घेतले आमच्या वतीने पाडुरंगाला नमस्कार सांगा, हे पाच रूपये पेटीत टाका, असे सांगायचे. तो वारकरी पुन्हा कधी परत येणार याची खात्री नव्हती. मात्र आता इंटरनेट च्या जमान्यात वारी, पालखी सोहळा आणि वारकरी ऑनलाईन झाला आहे. गतवर्षी मी वारीमध्ये वारकर्यांकडे खुप कमी मोबाईल पाहीले होते. ऍन्ड्रॉईड फोन क्वचित होते. यावर्षी वारीला मोबाईल फोन घेऊन येणारे वारकरी खुप वाढले आहेत. महिला व पुरुष वृद्ध वारकरी छोटासा मोबाईल घेऊन येतात. दिवसभर त्याचा फोन बंद असतो, मात्र मुक्कामाला पोहचले की हे आज्जी,आजोबा फोन बाहेर काढून घरी फोन करतात. मी जेजुरीला पोहचली हाय, तब्येत चांगली आहे. काळजी करू नकोस, मी व्यवस्थित आहे, असा संवाद होतो. फक्त खुशाली आणि कुठे पोचलो आहे, येवढे सांगणे हाच फोन उद्देश असतो. या दरम्यान गावातील एखादा युवक, अनुभवी वारकरी त्या दिंडीत असेल तर तो वृद्ध वारकऱ्यांचे फोटो त्याच्या मुलाला पाठवतो, हे पहायला मिळाले.
टाळकरी, झेंडेकरी व इतर वारकऱ्यांकडे सुद्धा मोबाईल आला आहे. दुपारी विसावाच्या ठिकाणी थांबलो की यांचे फोन सुरु होतात. काही जण आपल्या फोनवर मोबाईल न आणलेल्या माऊलींना मोफत फोन लावून देत सेवा करतात. गळ्यात दोरा बांधून त्याला मोबाईल बांधला जातो. आधुनिक तरूण वारकरी, पहिली दुसरी वारी करणारे युवा वारकरी, संत वाडमय मंडळाचे सदस्य, शिष्य वारीत ऍन्ड्रॉईड फोन घेऊन आले आहेत. मोबाईल कॅमेरात सतत सेल्फी घेण्यात हे मग्न होते. फोटो काढून लगेच सोशल नेटवर्किंग साईट वर टाकले जातात. मोबाईल मोबाईल चार्ज करण्यासाठी अनेक ठिकाणी चार्जर सेंटर सुरू झाली आहेत. वारी अपडेट देण्यासाठी गेल्या काही वर्षांत फेसबुकवर समुह तयार झाले आहेत. वारी कव्हरेज देण्यासाठी मराठी चॅनल 24 तास कार्यरत आहेत. पण आता वारकरी मोबाईल लाईनवर, ऑनलाईन वरही येत आहेत, हा वारीतील सुखद अनुभव आहे. मुख्य पालखी सोहळ्यातील दिंडीच्या तुलनेत खुल्या समाजात खुप मोबाईल फोन असल्याचे आढळले.
वारी अपडेटस देण्यात सोशल मिडिया आघाडीवर आहे. फेसबुक, व्हॉटसअपवर वारीचे तासातासाला फोटो पडतात. वारी मार्गावर माऊली दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे फोटो सोशल मिडियावर पडत असतात.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा