दिनांक 11 जुलै
वेळापूर सतीश मोरे
पहाटे
2 वाजताच गोवारेच्या बापूंनी त्याच्या स्टाईलमधे हाळ्या मारत जागे केले.
सारेजण उठले. सारे विधी आटोपून तीन च्या सुमारास रस्त्यावर आलो. वारकरी
जेव्हा प्रवास सुरू करतो तेव्हा निघताना रस्त्याला नमस्कार करतो आणि मगच
पुढे जातो. यामागे कृतज्ञतेची भावना असते. ज्या रस्त्यावरन चालायचे आहे,
तो रस्ता साथ देणार आहे, त्यावरून चालणार आहे त्याला नमस्कार करून, त्याची
परवानगी घेणे, हा त्यामागचा हेतू आहे.
आज 18
किलोमीटर अंतर पार करायचे होते, फार नव्हते. पण तरीही आम्ही लवकर निघालो .
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेवचा ताल ठेका धरत अंधारात चाललो होतो. खुप
गर्दी होती. वाहने पण खुप होती. हवा अजिबात नव्हती, त्यामुळे धुराचा
त्रास होत होता. पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून चोख
नियोजन केले होते. आम्ही चालत राहिलो. चहा पाणी करण्यासाठी चार च्या
सुमारास थांबलो. पुन्हा चालायला लागलो.
पंढरपूर
आता जवळ आले आहे, आता दोन तीन मुक्काम राहीले, चर्चा सुरू होती. आज
आणि उद्या लवकर उठावे लागणार, परवा पासून अंतर कमी असल्याने चालायला
सुरुवात दुपारी असणार, काही जण सांगत होते. गेली 13 दिवस पहाटे उठायला
लागतेय, आता दोनच दिवस हे करावे लागणार, हा विचारच खुप सुख देऊन जात
होता. आम्ही खुललो होतो, चालत राहिलो. पुन्हा पावणे पाचच्या सुमारास
चहाला थांबलो. मी चहावाल्याला फक्त गरम पाणी करून मागीतले. घसा स्वच्छ
झाला, खोकला पण कमी झाला यामुळे. तिथेच सारेजण थांबले. लवकर निघालो आहे,
पुढे जाऊन अंधारात कॅनाल मध्ये कसे उतरायचे? चला इथेच पडा, सारे सहमत.
आम्ही तिथेच कागद अंथरला, जवळपास आत मोठी रोपवाटिका होती . हवा थंडगार
होती, मस्त झोप लागली. साडे पाच वाजता महेश तवर यांनी उठवले, चला
उजाडले. पुन्हा चालू लागलो . सव्वा सहा वाजता आम्ही कॅनाल जवळ पोहचलो. मी
खरे तर आंघोळ करणार नव्हतो, पण वाहते पाणी पाहून बेत बदलला. सारे जण आत
उतरले. मनसोक्त स्नान करून तयार झालो, सुतार माऊलीनी गंध लावला.
कॅनाल
जवळच आमचे दुपारचे जेवण होते. लगेच पोहचलो तेथे. हवा जोरात सुटली होती.
कपडे, टाॅवेल वाळायला टाकली आणि पिक अप जीप च्या मागे फळ्यावर जाऊन बसलो.
फ्रेश मुड मध्ये एक विषय टॅबवर तयार केला. थोडा पेंग आला, डुलकी काढली.
पुन्हा उठलो आणखी एक विषय तयार केला. दहा वाजले होते, तिकडे जेवणाची
तयारी सुरू झाली होती. आज कराडचे भैया तवर, रामभाऊ शिंदे, तुकाराम पोळ,
चंद्रनील कारखानीस, जालिंदर यादव यांचे वतीने जेवण होते. सारे जण आकरा
वाजता आले, श्रीखंड घेऊन, बाकी स्वयंपाक तयार होता . पण दिंडी आली नव्हती.
स्वयंपाक तयार असला तरी जोवर दिंडी येत नाही तोवर पंगत पडत नाही. आज
खुडुस फाट्यावर दुसरे रिंगण होते. ते रिंगण झाल्यावर बराच वेळ वारकरी तेथे
खेळ करत होते. त्यामुळे वेळ लागत होता. इकडे आम्ही सारे दिंडीच्या
प्रतिश्क्षेत होतो. भुक तरी जाम लागली होती. कुणी चिवडा लाडू खाऊन घेतला,
कोणी चहाला गेले. साडे बारा वाजता दिंडी आली. बसायला जागा योग्य नव्हती
त्यामुळे बुफे सिस्टीमने जेवण झाले. ताट हातात घेऊन मिळेल त्या जागेवर बसत
होते. वारीत आपले जेवण झाले की स्वतचे ताट स्वत धुवायला लागते. जेवण
करताना काही वाटत नाही, ताट धुवायला सुद्धा काही वाटत नाही, पण पाणी टाकी
पुढे इतकी गर्दी होते, त्यात भर नळाखाली
झालेला चिखल, त्यामुळे
तिथे जाऊ वाटत नाही. मी रोज एक आयडिया करतो, कमी जेवण घ्यायचे, लवकर
खायचे आणि कोणी यायचे अगोदर टाकीजवळ जाऊन ताट वाटी धुवायची. आज गर्दी खुप
होती. पण आमचे भाग्य नाही जेवलेले लोक आमचे ताट स्वत मागून घेत होते.
माझे ताट एका वृद्ध माऊलीने मागीतले, पण मी धुवून तुम्हालाच देतो , असे
सांगितले, तरी त्यानी ऐकले नाही. शेवटी मी ताट दिले. आपले ताट
दुसर्याला धुवायला
लावले, फिल झाले. पण मग त्या माऊलीचा शोध घेतला, पाणी बाटली भरून त्या माऊलीला दिली, तेव्हा हलके वाटले.
दोन
वाजता निघालो, वेळापूर दिशेने. पुढे बोर्ड वाचला वेळापूर 5 किलोमीटर. बरे
वाटले. वारीत चालताना अंतर कसे निघून जाते हे कळत नाही. सकाळच्या
टप्प्यात काहीच वाटत नाही, पण दुपारी संध्याकाळी पाय थोडे दुखतात, तेव्हा
अंतर बोर्ड पाहून हायसे वाटते. स्वच्छ हवा होती, वातावरण ढगाळलेले होते,
उन नव्हते. चालत राहीलो.
वेळापूर अलिकडे
उतार रस्ता आहे. तिथे आल्यावर तुकाराम महाराजांना पंढरपूर मंदीर दिसले
होते, भास झाला होता, त्यामुळे ते येथून धावत सुटले होते, अशी श्रद्धा
आहे. याठिकाणी पालखी खांद्यावर घेऊन धावतात, पालखी यायला वेळ होता.
सिंचन करितां मूळ । वृक्ष वोल्हावे सकळ ॥1॥
नको पृथकाचे भरी । पडों एक मूळ धरीं ॥ध्रु.॥
पाणचो-याचें दार। वरिल दाटावें तें थोर ॥2॥
वश जाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ॥3॥
एक चिंतामणी । फिटे सर्व सुखधणी ॥4॥
तुका ह्मणे धांवा । आहे पंढरिये विसांवा ॥5॥
आमचे
सहकारी धावू लागले, इतरही वारकरी धावत होते. हा क्षण टिपायला चॅनेलच्या
व्हॅन तयार होत्या, तसेच परिसरातील लोक जमले होते, उंचावर बसले होते.
येथे धावा आणि भारूड सादर केले जाते. बुलढाणा जिल्ह्य़ातील लोक भारूड करत
होते, काही महीलानी पिंगा धरला होता, मजा आली.
साडे
तीन वाजता तळावर पोहचलो, काही तंबू तयार होते. कागद टाकला आणि पडलो
तासभर. साडे चार वाजता आमचे तंबूत आलो, पुन्हा झोपलो. साडे पाच वाजता
हरिपाठ सुरू झाला, उठलो. नंतर वारी लिखाण केले .
जेवण
तयार होते, निरोप आला पण भुक लागली नव्हती. तरीही सहकारी निघाले साडे सात
वाजता जेवायला बसलो. जेवण झाल्यावर तंबूत गप्पा पावसाच्या. वसिम शेख यांनी
मला कराड कृष्णा नदीचा पूर फोटो पाठवला होता, तो सर्वानी पाहीला. यंदा
पुलावरून पाणी जाईल का यावर अटकळी सुरू झाल्या. कृष्णा नदीतील मड्या मारूती
मंदिर पाण्यात बुडणे हे कराडकरांसाठी पुर सिम्बॉल आहे. ती चर्चा रंगली.
गप्पा मारत एक एक जण झोपू लागला.
एकंदरीत आजचा दिवस छान गेला.
- सतीश मोरे
9881191302
माऊली माऊली



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा