दिनांक 5 जुलै
तरडगाव: सतीश मोरे
लोणंद
ते तरडगाव हे अंतर 10 किलोमीटर आहे. त्यामुळे लोणंदला दिड मुक्काम होता.
यावर्षी लोणंदात एक दिवस मुक्काम कमी झाला होता . सकाळी लवकर उठायचे
नव्हते, तरीही खरात माऊलींनी पहाटे चार उठवलेच. चला लवकर टाकीला पाणी
आहे, नंबर नाहीत, गर्दी नाही, असे सांगितले. मी ब्रश करतो, विधीला
जातो, असे म्हणताच ही कामे आंघोळ झाल्यावर करता येतील, असे मिश्कीलपणे
सांगत ते मला पाणी टॅकर जवळ घेऊन गेले . नळाखाली बसून थंड गार पाण्याने
मस्त स्नान केले. पहिल्यांदाच अशी आंघोळ केली असेल!
तयार
झालो, पाच वाजता रस्त्यावर काॅफी प्यायला गेलो. सोबत 12 नंबर दिंडीचे
निवास व्यवस्था प्रमुख बाजीराव नाना, चितळीचे घाडगे, खरात व लोहार माऊली
होते. काही वारकरी पुढे निघाले होते. वारी नियोजन करताना काय त्रास होतो,
कशी माणसे आणावी लागतात, त्यातून कशी वारीची गोडी लागते, हे नानानी
सांगितले . परत तंबूत आलो, थोडा वेळ पडलो. सात वाजता विवेक राव यांच्या
घरी गेलो, टॅब चार्ज करण्यासाठी दिला आणि नाश्ता करायला रेल्वे स्थानक
परिसरातील हाॅटेलात गेलो. नंतर रस्त्यावर असलेल्या दुकानात शर्ट इस्त्री
करून घेतला. पुन्हा राव यांच्या घरी जाऊन चहा घेतला. त्याचे पप्पा सोबत
गप्पा मारल्या. या कुटुंबातील सर्वानी पुढच्या वर्षी वारीला आल्यावर
आमचेकडे मुक्कामाला या, असे निमंत्रण दिले.
परत
तंबूमध्ये आलो, नऊ वाजले होते. दरम्यान दिलिप भाऊ चव्हाण, पालकर साहेब,
थोरात सर भेटले. जेवण तयार होत होते. वेळ होता. खरात माऊलीकडून नेलकटर
घेतला, नखे काढून कागदात ठेवली. हा कागद तंबूतून बाहेर टाकताना तंबूतच
चिखलात पडला . आता खरात माऊलींनी माझेकडे पाहीले. त्यांना काही तर
सांगायचे होते, मला रागावून बोलायचे होते, पण ते काही बोलले नाहीत.
साडे
नऊ वाजता सारे जेवायला बसले. गुलाबजाम स्वीट डिश होती, त्याला गोळी
म्हणतात हे मला वारीतच गेल्या वर्षी कळले होते . आकरा वाजता पालं काढून
बाहेर पडलो सुरुवात केली. आजचा दिवस वेगळा मौसम होता. पाऊस अजिबात
नव्हता, वातावरण ढगाळ, होते. या वातावरणात चालताना खुप त्रास झाला,
उकडायला लागले. कापडगाव आले, मी जॅकेट काढून हातात घेतले, घामाघूम झाले
होते सारे. चालत राहिलो. चांदोबाचा माळ येथे पहिल्या उभ्या रिंगणाची
तयारी सुरू होती. वाहतूक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. गेल्या वर्षी
पाहिले असल्याने मी येथे न थांबता पुढे निघालो. आता खरात माऊली माझ्या
जवळ आली व त्यानी चोर आणि नखे ही गोष्ट सांगितली. ही गोष्ट माझ्या मनात
बसली, नखे घराबाहेर टाकतात, असे न केल्यास दारिद्र्य येते या आशयाची खूप
छान गोष्ट होती ती.
नंतर कधीतरी ही गोष्ट ऐकवतो. आता खुप कंटाळा आला आहे.
तरडगाव
आले, या गावातील लोकांनी वारकर्यासाठी जेवणाची व्यवस्था केली होती. गर्दी
होती तिथे. गाव पार करून पुढे उजव्या बाजूला पालखी मुक्काम तळ होते.
त्याजवळच आमचे तंबू होते. अजून वाहने आली नव्हती. तोवर तळ पाहिला, फोटो
काढले. एका ठिकाणी कागद टाकून पडलो, बातमी तयार करून मेल केली. परत शाम
पवार काका समवेत त्याच्या गाडीतच बोलत बसलो, चहा प्यायला गेलो. थोडा वेळ
खबाले पाटील विंगकर यांच्या ट्रकमध्ये बसलो. कराड ते दिल्ली चर्चा झाली .
सहा
वाजता पालखी आली. तळावर पालखी आली की समाज आरती असते, त्याविषयी मी
स्वतंत्र लिहणार आहेच. या दरम्यान राजाभाऊ चोपदार भेटले, सोबत फोटो
काढले. मी तुमचा ब्लॉग वाचतो, पण पुर्ण वाचलेले नाही , असे सांगितले.
लगेच त्याचे धाकटे बंधू रामभाऊ म्हणाले, पण मी वाचतो सारं, तुम्ही आजारी
पडला होता हे मी ब्लॉगवर वाचले असे सांगून आता बरे आहे का? अशी विचारणा
केली. खूप आनंद झाला .माऊली चोपदार बंधु यांची ओळख गेली वर्षे भर,
तरीही त्यांनी मला आपले केले. महान विभुती आहेत, हे सारे जण.
आरती
करून परत आलो, पुन्हा वारी लिखाण केले. ट्रकात आज जेवण गौतम करपे याचे
वतीने भाकरी पिठलं, सुके वांगे भात असे जेवण होते. गौतमनी मला पाहून
मिठी मारली. जेवण झाल्यावर टॅबवर काम केले आणि झोपलो.
आजचा दिवस माऊली कृपेने मस्तच.
- सतीश मोरे 9881191302
माऊली माऊली
Read my blog

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा