माऊली नाम आहे चालणाऱ्या
वारकऱ्याचे टाॅनिक
दिवे घाट : सतीश मोरे
अरे वारकऱ्या
तुले नाही ऊन वारा
थंडी झुगारीत अवघ्याले
आली पंढरीची वारी
तुले नाही ऊन वारा
थंडी झुगारीत अवघ्याले
आली पंढरीची वारी
वारकरी संप्रदायाचे दैवत विठ्ठल आणि या देवाजवळ जाण्याचा सहज सोपा मार्ग दाखविणारे संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या नावात किती ताकद आहे याचा प्रत्यय वारकऱ्यानी पुन्हा एकदा अनुभवला. दिवे घाटातील चढ उतार, वेडीवाकडी वळणे कधी आली आणि संपली माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी माऊलीना कळलेच नाही. बालकापासून ऐंशी वर्षाच्या वृद्धाला वारीत चालण्याची ताकद मिळते फक्त माऊली नामाने. आळंदी ते पंढरपूर दरम्यान सुमारे पावणे तीनशे किलोमीटर अंतर सहज पार होते ते माऊली नामामुळे!
पंढरीची वारी करावी अशी अनेकांची इच्छा असते. मात्र सर्वानाच वारीला जायला जमत नाही. विठ्ठल भेटीची ओढ ज्याच्या हृदयात उफाळून येते, संत संगतीचा ध्यास लागतो आणि या दोन्ही गोष्टी जुळल्यानंतर ज्याला विठ्ठलाचे बोलावणे येते त्यालाच पंढरीच्या वारीचे भाग्य लाभते, असे म्हणतात. वर्षानुवर्षे घरात सुरू असलेली वारी परंपरा चालू ठेवणारा वारकरी, स्वतःच्या इच्छेने आलेला वारकरी असो वा लेकाने सुनेने इथं काय करताय बसून असे म्हणत बळजबरीने वारीला आलेला वृद्ध, संसारातील कटकटीला कंटाळलेला कुणाचा पती, कुणाची पत्नी, सासु , सुन , तरूण, तरूणी, म्हातारी, म्हातारा, लहान मुले, मुली सारे सारे जण पंढरीच्या वारीला आले आहेत. इच्छेने असो की अनिच्छेने वारीला जाण्यासाठी माऊलींच्या पालखी सोहळ्यात दिंडीत तो कष्टकरी भाविक सहभागी झाला आहे.
माऊलींच्या पालखी सोहळ्यातून पंढरीला निघालेला हा वारकरी वारीचा आनंद लुटत आहे. काशी यात्रा आणि पंढरीची,आळंदीची वारी यात फरक आहे. इतर सर्व यात्रा पापक्षालन आणि पुण्यसंपादनासाठी एकवार केल्या जातात. मात्र आळंदी पंढरीची वारी नित्यनेमाने प्रतिवर्षी करायची असते. यातून फार मोठा आनंद मिळतोच शिवाय संताच्या भेटी गाठी होतात. पायी वारी करण्याचा आनंद काही औरच.
भक्तीप्रेमरसाची अनुभुती घेण्यासाठी आलेला या वारकऱ्यानी आळंदीतून चालायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी जोश होता. संताची साथ आणि जवळच्या लोकांची सोबत होती. 25-30 किमी अंतर चालून वारकरी पुण्यनगरीत मुक्कामाला आले. दोन दिवस पुणेकराच्या आदर अतिथ्याने सारे भारावले. पुण्यभूमीला कृतज्ञपणे वंदन करून वैष्णवांचा मेळा सासवडकडे निघाला.
पंढरीच्या वारीमध्ये सर्वात अवघड,लांब पण आल्हाददायक, आनंददायी असा हा टप्पा. त्यात भर म्हणजे दिघीचा घाट आणि एकादशीचा उपवास . साडे सहा वाजता माऊलींची पालखी निघाली. शिंदे छत्री येथे सकाळचा विसावा, हडपसर येथे दुपारचे भोजन करून विठ्ठल नामाचा जयघोष करीत पालखी दिघी घाटात पोहचली. चढाचा रस्ता सुरू झाला आणि वैष्णवाचा जोश वाढू लागला.
अवघड रस्ता, घाट, खाचखळगे तसेच उन, वारा आणि पावसातही वारकरी बेभान होऊन नाचत असतात. त्याला कशाचीच फिकीर नसते. त्याला ही ताकद मिळते फक्त माऊलींच्या नामामुळे.
वारीमध्ये तसेच कीर्तन, अभंग म्हणताना वारकरी का नाचतात याबाबत किर्तनकार गोष्ट सांगतात. एकाने दुसऱ्याला विचारले हे वारकरी का नाचतात ? दुसरा सद्पुरूषाने हसत हसत उत्तर दिले, अरे बाबा मनुष्याच्या डोक्यावर मोठे थोरले ओझं दिल तो नाचणार नाही. कुंथतच राहील. पण ते ओझे कुणी काढून टाकले तर तो उड्या मारत नाचेल. प्रत्येक माणसाच्या डोक्यावर दोन मोठ्ठी ओझ्याची गाठोडी असतात. एक प्रपंचाचे दुसरे परमार्थाच. या दोन्हीच्या भाराखाली मनुष्य दबलेला असतो. पंढरीच्या वारीमध्ये अशी मौज आहे की पाठीमागे असणाऱ्या ज्ञानोबा माऊलीनी त्याच्या डोक्यावरून परमार्थाच ओझं काढून घेतले आहे तर पुढे असलेल्या पाडुरंगाने प्रपंचाचे ओझे पळवले आहे. त्यामुळे तो या वारीत बेफाम होऊन नाचतात आणि त्यामुळेच घाट रूपी रस्त्याचे दुख कसे संपते हे त्याला समजत नाही.

तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष वारीत सर्व काळ सुरू असतो. दिवे घाटाचा रस्ता आला. हळुहळु पालखी आणखी चढाला लागली. आभाळ भरून आले होत . वैष्णवानी आता राधा राधा राधा कृष्ण राधा चा ठेका धरत नाचायला सुरवात केली. दुसरीकडे काहींनी जय जय राम कृष्ण हरी चा नाद धरला. अंतर कमी होत होतं. वैष्णव जन नाचत होते.
पालखी पुढे पुढे जात होती, वारकरी माऊली नामात रंगून गेले. . भजनात दंग होऊन नाचणाऱ्या वैष्णवाना पायाखालची वाट कशी निघून गेली हे कळलेच नाही. सर्व इंद्रिये भजनरंगात रंगल्याने अदभुत शक्ती मिळून वृद्धाच्या ठिकाणी सुध्दा तरूणासारखा आवेश व उत्साह निर्माण झाला आणि घाटातील अवघड वाटेच्या रूपातील दुख संपून गेलं. माऊलीच्या पालखी सोहळ्यात रस्ता कधी संपतो हे लक्षातच येत नाही याचा प्रत्यय आणि प्रत्यक्ष अनुभव वैष्णवाच्या संगतीत आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा