दिनांक 9 जुलै
नातेपुते सतीश मोरे
बरड
पालखी मुक्काम उंचावर आहे. जोरदार वाहणारे वारे आणि मधुनच येणार रिमजिम
पाऊस यामुळे हवा थंड होती. अनेक वारकरी आजारी पडले होते. मी पण सर्दीने
जाम. रात्री औषधे घेतली. झोप लागली. सकाळी तीन वाजता नेहमी प्रमाणे चालणे
सुरू केले. आज 19 किलोमीटर अंतर पार करून नातेपुते येथे दुपारी बारा वाजता
जेवायला पोहचायचे होते. वेग वाढवला आम्ही. पण सुरूवातीला रस्त्यावर
येण्यारी वाहने आणि वारकरी याची गर्दी होती.
साडे
सहा वाजता आम्ही सोलापूर जिल्हा प्रवेश केला. सोलापूर जिल्हा परिषद व
प्रशासनाने स्वागत कक्ष उभारला होता. लगेच कॅनाल दिसला. खास वारकरी
माऊलीसाठी पाणी सोडले होते. तिथे भाविकांनी गर्दी केली होती, कोण कपडे धुत
होते तर काही स्नान करत होते. पुढे चालत राहिलो. रस्ता नवीन केला होता,
मोठा होता, वेग वाढविला, आता धर्मपुरी गाव आले होते, या गावादरम्यान
इंग्रजी एस आकाराचे धोकादायक वळण पार करून पुढे आलो. मगाशी गेलेला कॅनाल
पुन्हा एकदा आला. थांबलो. येथे आंघोळीला सहकारी गेले. पाण्याला वेग
होता, पण काठावर पायर्या बांधल्या आहेत, तिथेच स्नान करावे, अशा सुचना
लावल्या होत्या. आंघोळ करून बाहेर आले सारे, गंध लावला, पुढे चालायला
लागलो. पावणे आठ वाजले होते.
नातेपुते आता सात
किलोमीटर राहीले होते. पहाटे बरेच अंतर कमी झाल्या आता आवाक्यात आले होते.
लांबूनच शिंगणापूर डोंगर दिसू लागला होता. मोरोची गाव आले. या गावात
चहा पिला, बिस्किटे खाल्ली, पेपर घेतला. परत चालत राहिलो. आता
शिंगणापूर महादेव डोंगर आणखी जवळ दिसू लागला होता. शिंगणापूर फाटा आला.
खुप गर्दी होती तिथे. बस स्टॅड तयार करण्यात आले होते तिथे. महामंडळाने
छान तयारी केली होती. अनेक भाविक येथून शिंगणापूरला जातात, 12 किलोमीटर
अंतर आहे. या माऊलीनो, चला शिंगणापूर. दर्शन लगेच होतंय. तास दिड तासात
परत, असे स्पिकर वर जाहीर केले जात होते.
येथून
नातेपुते 3 किलोमीटर आहे. चालत राहिलो. पण वेग मंदावला होता.
रस्त्याकडेला नांदेड येथील रामीनवार परिवाराचे वतीने पुरी भाजी नाश्ता मोफत
पुरवला होता. सारेच थांबलो, नाश्ता केला. परत प्रवास सुरू. साडे दहा
वाजता माझा मित्र राहुल खोचीकर यांचे आजोळी मंगेश दिक्षित यांचे घरी
पोहोचलो. हे कुटुंब दरवर्षी पंचवीस तीस लोकांसाठी जेवण करते. आम्ही बारा
पर्यंत आराम केला व नंतर भजन सुरू केले. तासभर अतिशय सुरेख गायन झाले.
आरती झाली. नंतर जेवण होऊन सारे लोक मुक्काम ठिकाणी गेले. मी तिथेच
थांबून आराम केला. राहुलचे डाॅक्टर बंधू प्रशांत दिक्षित यांनी इंजेक्शन
दिले, औषधे दिली. जेवण करून झोपलो.
.
चार वाजता उठून
बातमी तयार केली. पाच वाजता माझे कुटुंब आले. सौभाग्यवती विद्या , मुलगा
पियुष, कन्या देवयानी आणि आई आले होते, मला भेटायला. आल्या आल्या लेक
अशी बिलगली की सारे अंगदुखी पळून गेली. गेल्या काही दिवसांत काय काय केले,
टेस्ट मध्ये किती मार्क मिळाले, एक दात हालतोय , पडलेला दात उगवला, हे
सारे सांगितले. खुप गप्पा मारल्या. पियुष सोबत बोललो. सहा वाजता सारे जण
पालखी दर्शन करायला गेलो. दरम्यान पाऊस सुरू झाल्याने सारे आमच्या तंबूत
गेलो. . हे आमचे घर, दुपारी बांधतो, सकाळी काढतो, असे लेकीला सांगितले.
नंतर त्यांना किचन व्यवस्था, तंबू व्यवस्था, पाणी व्यवस्थापन सारे
दाखवले. परत माऊली दर्शन घ्यायला गेलो. तिथे कराडचे सर्कल मित्र युवराज
पाटील सहकुटुंब भेटले. गर्दी मुले रथ दर्शन घेऊन निघाले होते. त्यांना
थांबवले. चोपदार राजाभाऊ यांच्या तंबूत गेलो, भेटलो, त्यानी दर्शन
व्यवस्था केली. काही मिनिटांत दर्शन झाले. परत आलो सोहळा मालक आरफळकर ,
राजाभाऊ चोपदार यांची बैठक सुरू होती. सदाशिवनगर रिंगण जागा बदलू नये
म्हणून श्रीमती मोहिते आल्या होत्या.
तेथून
बाहेर आलो. तळावर बंडा तात्या कराडकर यांचे किर्तन सुरू होते . सोपे वर्म
आम्हा सांगीतले संता टाळ हाती घेऊनी नाचा, हा अभंग घेतला होता. तेथून
पुन्हा बाहेर दिक्षित यांच्या घरी आलो. जेवण झाल्यावर सारे कराडला
निघाले. पप्पा लवकर या, काळजी घ्या , असे पियुष म्हणाला, देवयानी दूर
जाईपर्यत गाडीतून हात बाहेर काढत होती. डोळ्यातून पाणी आले.
आज दिक्षित यांच्या घरीच मुक्काम होता. वारी लिहायला घेतली. दहा वाजता झोपलो.
आजचा दिवस इमोशनल गेला.
माऊली माऊली
सतीश मोरे 9881191302
माऊली माऊली
[7/10, 10:21 PM] Satish More: 

माझी वारी



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा